अध्याय २३
“माझी बाजू ऐकून घ्या”
संतापलेल्या जमावांपुढे आणि न्यायसभेसमोर पौल सत्याची बाजू मांडतो
प्रे. कार्यं २१:१८–२३:१० वर आधारित
१, २. प्रेषित पौल यरुशलेमला कशासाठी आला आहे, आणि इथे त्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे?
शेवटी पौल यरुशलेमला पोहोचला आहे. पुन्हा एकदा या शहराच्या गजबजलेल्या गल्लीबोळांतून फिरताना कदाचित त्याने या शहराच्या इतिहासाबद्दल विचार केला असेल. यहोवाच्या लोकांच्या इतिहासात या शहराला पूर्वीपासूनच खूप महत्त्व आहे. आणि इथल्या लोकांना या शहराच्या वैभवी इतिहासाचा खूप अभिमान आहे. पण यरुशलेममध्ये राहणारे काही ख्रिस्ती या शहराच्या पूर्वीच्या गोष्टींनाच खूप जास्त महत्त्व देत आहेत. आणि यामुळे यहोवाने त्याच्या उपासनेच्या संबंधात केलेल्या बदलांनुसार, त्यांनी आपल्या विचारांत आणि वागण्यात अजूनही बदल केलेले नाहीत. पौलला ही गोष्ट माहीत आहे. खरंतर, इफिसमध्ये असताना पौलने यरुशलेमच्या गरीब बांधवांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने या महान शहरात परत येण्याचं ठरवलं होतं. पण, इथल्या बांधवांना आध्यात्मिक अर्थानेही मदतीची गरज आहे हे त्याला जाणवलं. (प्रे. कार्यं १९:२१) म्हणून, यरुशलेमला येणं धोकादायक आहे हे माहीत असूनही तो इथे आला आहे.
२ पण आता पौलला यरुशलेममध्ये कोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागणार आहे? एक समस्या ख्रिस्ताच्या शिष्यांकडूनच येणार आहे. या शिष्यांपैकी काही जण पौलविषयी ऐकलेल्या काही अफवांमुळे गोंधळात पडले आहेत. यासोबतच, ख्रिस्ताच्या शत्रूंकडून पौलवर आणखी मोठ्या समस्या येणार आहेत. ते त्याच्यावर खोटे आरोप लावून त्याला मारहाण करतील आणि ठार मारण्याची धमकीही देतील. पण या खळबळजनक घटनांमुळे पौलला स्वतःची बाजू मांडण्याचीही संधी मिळेल. अशा कठीण परिस्थितींचा सामना करताना नम्रता, धैर्य आणि विश्वास दाखवून पौलने आजच्या काळातल्या ख्रिश्चनांसमोर फार चांगलं उदाहरण ठेवलं आहे. हे त्याने कसं केलं यावर आता चर्चा करू या.
“ते देवाची स्तुती करू लागले” (प्रे. कार्यं २१:१८-२०क)
३-५. (क) यरुशलेमला आल्यावर पौल कोणत्या सभेला गेला, आणि तिथे कशाविषयी चर्चा झाली? (ख) यरुशलेममध्ये पौलने वडिलांसोबत केलेल्या चर्चेतून आपण कोणत्या गोष्टी शिकू शकतो?
३ यरुशलेमला आल्यावर दुसऱ्याच दिवशी पौल आणि त्याचे सोबती मंडळीच्या वडिलांना भेटायला गेले. या अहवालात कोणत्याही प्रेषिताचा उल्लेख नाही. कदाचित, आतापर्यंत ते सर्व जगाच्या वेगवेगळ्या भागांत सेवा करण्यासाठी गेले असावेत. पण, येशूचा भाऊ याकोब हा मात्र अजूनही यरुशलेममध्येच होता. (गलती. २:९) त्या दिवशी, ‘सगळे वडील’ आणि पौल उपस्थित असलेल्या त्या सभेचा अध्यक्ष याकोबच असावा.—प्रे. कार्यं २१:१८.
४ वडिलांना भेटल्यावर पौलने, “विदेशी लोकांमध्ये देवाने त्याच्या सेवाकार्याद्वारे ज्या गोष्टी घडवून आणल्या होत्या, त्यांबद्दल सविस्तर सांगितलं.” (प्रे. कार्यं २१:१९) हे ऐकून त्या सर्वांना किती प्रोत्साहन मिळालं असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्याच प्रकारे आज आपल्यालाही इतर देशांत होत असलेल्या प्रगतीबद्दल ऐकल्यावर खूप आनंद होतो.—नीति. २५:२५.
५ त्यानंतर, पौलने युरोपच्या बांधवांनी पाठवलेल्या देणग्यांबद्दल वडिलांना सांगितलं असेल. दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या बांधवांनी दाखवलेली ही काळजी आणि प्रेम पाहून यरुशलेमच्या त्या बांधवांना खरंच खूप दिलासा मिळाला असेल. अहवालात म्हटलं आहे, की पौलने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यावर “ते [वडील] देवाची स्तुती करू लागले.” (प्रे. कार्यं २१:२०क) आजही जेव्हा संकटांचा किंवा गंभीर आजारांचा सामना करणाऱ्यांना, मंडळीतले बांधव योग्य वेळी मदत करतात आणि प्रेमाने बोलून त्यांना सांत्वन देतात, तेव्हा त्यांना खूप बरं वाटतं.
अनेक जण अजूनही “नियमशास्त्राबद्दल आवेशी” (प्रे. कार्यं २१:२०ख, २१)
६. पौलला कोणत्या समस्येबद्दल सांगण्यात आलं?
६ यानंतर वडिलांनी पौलला एका अशा समस्येबद्दल सांगितलं, जिचा त्याच्याशीच संबंध होता. ते म्हणाले: “पौल, आमच्या भावा, यहुद्यांमध्ये विश्वास ठेवणारे हजारो लोक असून, ते सर्व नियमशास्त्राबद्दल आवेशी आहेत, हे तर तुला माहीतच आहे. पण, त्यांनी तुझ्याबद्दल अशा अफवा ऐकल्या आहेत, की तू सगळ्या राष्ट्रांतल्या यहुद्यांना मोशेच्या नियमशास्त्राविरुद्ध जायची शिकवण देतोस. आणि त्यांनी आपल्या मुलांची सुंता करू नये आणि नेमून दिलेल्या प्रथा पाळू नयेत, असं शिकवतोस.” a—प्रे. कार्यं २१:२०ख, २१.
७, ८. (क) यहूदीयातल्या बऱ्याच ख्रिश्चनांचा कोणता चुकीचा समज होता? (ख) यहुदी ख्रिस्ती चुकीचा विचार करत असले, तरी त्यांना धर्मत्यागी का म्हणता येणार नाही?
७ मोशेचं नियमशास्त्र रद्द होऊन आता २० वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला होता. मग, बरेच ख्रिस्ती अजूनही या नियमशास्त्राबद्दल आवेशी का होते? (कलस्सै. २:१४) इ.स. ४९ मध्ये यरुशलेममध्ये झालेल्या एका सभेनंतर प्रेषितांनी आणि वडिलांनी मंडळ्यांना एक पत्र पाठवलं होतं. विदेशी ख्रिश्चनांनी सुंता करणं आणि मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करणं आवश्यक नसल्याचं त्या पत्रात स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं. (प्रे. कार्यं १५:२३-२९) पण, त्या पत्रात यहुदी ख्रिश्चनांचा उल्लेख करण्यात आला नव्हता. त्यामुळे, मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करण्याची आता गरज नाही ही गोष्ट त्यांच्यापैकी अनेकांना अजूनही समजली नव्हती.
८ पण, यहुदी ख्रिस्ती असा चुकीचा विचार करत असल्यामुळे ते धर्मत्यागी होते, असं आपण म्हणू शकतो का? नाही. हे बांधव काही पूर्वी मूर्तिपूजक धर्माचं पालन करणाऱ्यांपैकी नव्हते. शिवाय, ते मूर्तिपूजक परंपरांचं पालन करण्याचा आग्रह धरत होते असंही नाही. ज्या नियमशास्त्राला ते यहुदी बांधव इतकं महत्त्व देत होते, ते खरंतर यहोवानेच दिलेलं होतं. त्याचा भूतविद्येशी संबंध नव्हता किंवा त्यात चुकीचं असं काहीही नव्हतं. इतकंच, की ते नियमशास्त्र जुन्या करारावर आधारित होतं आणि आता ख्रिस्ती लोक नव्या कराराच्या अधीन होते. त्यामुळे, नियमशास्त्राच्या करारात दिलेल्या प्रथांना खऱ्या उपासनेत आता काहीही अर्थ राहिला नव्हता. नियमशास्त्राबद्दल आवेश असलेल्या इब्री ख्रिश्चनांना या गोष्टी नीट समजल्या नव्हत्या आणि अजूनही त्यांना ख्रिस्ती मंडळीवर पूर्ण भरवसा नव्हता. या बांधवांनी, सत्याविषयी प्रकट झालेल्या नवीन गोष्टींनुसार आपल्या विचारांत बदल करण्याची गरज होती. b—यिर्म. ३१:३१-३४; लूक २२:२०.
“अफवांमध्ये काहीच अर्थ नाही” (प्रे. कार्यं २१:२२-२६)
९. पौलने मोशेच्या नियमशास्त्राविषयी काय शिकवलं?
९ पण, पौल सर्व राष्ट्रांतल्या यहुद्यांना, “आपल्या मुलांची सुंता करू नये आणि नेमून दिलेल्या प्रथा पाळू नयेत” असं शिकवत असल्याच्या अफवांबद्दल काय? पौलला विदेशी लोकांसाठी प्रेषित म्हणून नेमण्यात आलं होतं. त्यामुळे, नियमन मंडळाच्या निर्णयाप्रमाणे त्यांनी नियमशास्त्राचं पालन करण्याची गरज नाही असं तो त्यांना शिकवत होता. तसंच, जे लोक या विदेशी बांधवांना मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करून सुंता करण्याची जबरदस्ती करत होते, त्यांची चूकही त्याने दाखवून दिली. (गलती. ५:१-७) पण, पौल ज्या-ज्या शहरात गेला त्या-त्या शहरात त्याने यहुदी लोकांनाही आनंदाचा संदेश सांगितला. त्यांच्यापैकी ज्यांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यांना पौलने नक्कीच हे समजावून सांगितलं असेल, की येशूच्या मृत्यूमुळे नियमशास्त्र रद्द झालं होतं. तसंच, एक व्यक्ती नियमशास्त्राचं पालन केल्यामुळे नाही, तर ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे नीतिमान ठरते हेही त्याने त्यांना सांगितलं असेल.—रोम. २:२८, २९; ३:२१-२६.
१०. नियमशास्त्र आणि सुंता यांबाबतीत पौलने कशा प्रकारे योग्य मनोवृत्ती दाखवली?
१० असं असलं तरी, काही यहुदी ख्रिस्ती पूर्वीच्या सवयीप्रमाणे, शब्बाथाच्या दिवशी काम न करणं किंवा विशिष्ट पदार्थ न खाणं, यांसारख्या यहुदी प्रथा अजूनही पाळत होते. अशा बांधवांशी पौल समजूतदारपणे वागला. (रोम. १४:१-६) तसंच, सुंता करण्याविषयी त्याने कोणतेही नियम बनवले नाहीत. उलट, तीमथ्यचे वडील ग्रीक असल्यामुळे त्याच्याबद्दल कोणी शंका घेऊ नये म्हणून पौलने तीमथ्यला सुंता करायला सांगितली. (प्रे. कार्यं १६:३) सुंता करणं किंवा न करणं हा एक वैयक्तिक निर्णय होता. पौलने गलतीयाच्या ख्रिश्चनांना असं सांगितलं: “ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असलेल्यांसाठी सुंता करण्याला किंवा न करण्यालाही काही महत्त्व नाही; तर प्रेमाद्वारे कार्य करणारा विश्वास महत्त्वाचा आहे.” (गलती. ५:६) पण, नियमशास्त्राचं पालन करण्यासाठी सुंता करणं, किंवा यहोवाची कृपा मिळण्यासाठी सुंता करणं आवश्यक आहे असं शिकवणं नक्कीच चुकीचं होतं. यावरून एका व्यक्तीचा विश्वास खरा नसल्याचं दिसून आलं असतं.
११. वडिलांनी पौलला काय करायला सांगितलं, आणि त्यासाठी त्याला काय करावं लागलं असेल? (तळटीपही पाहा.)
११ पौलबद्दल उठवलेल्या या अफवा पूर्णपणे खोट्या होत्या, तरीही यहुदी बांधवांच्या भावना त्यांमुळे दुखावल्या गेल्या होत्या. म्हणून, वडिलांनी पौलला असं सांगितलं: “आमच्यात चार माणसं आहेत आणि त्यांनी नवस केलाय. तर आता, या माणसांना सोबत घेऊन जा आणि स्वतःचं आणि त्यांचं विधीपूर्वक शुद्धीकरण करवून घे. आणि त्यांना मुंडण करता यावं म्हणून त्यांचा खर्च उचल. म्हणजे, तुझ्याबद्दल ऐकलेल्या अफवांमध्ये काहीच अर्थ नाही आणि तू काही चुकीचं करत नाहीस आणि नियमशास्त्राचंही पालन करतोस, हे सगळ्यांना समजेल.” c—प्रे. कार्यं २१:२३, २४.
१२. पौल नमतं घ्यायला आणि वडिलांच्या सांगण्यानुसार वागायला तयार होता हे त्याने कसं दाखवलं?
१२ पौल त्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे करायला नकार देऊ शकला असता. लोकांच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत आणि मुळात यहुदी ख्रिस्ती, नियमशास्त्राबद्दल आवेशी असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे, असा तर्क तो करू शकला असता. पण, तो नमतं घ्यायला तयार होता. वडिलांनी जे सांगितलं होतं, ते देवाच्या तत्त्वांच्या विरोधात नसल्यामुळे त्यांच्या सांगण्यानुसार करायला त्याची हरकत नव्हती. याआधी त्याने असं लिहिलं होतं: “मी स्वतः नियमशास्त्राच्या अधीन नसलो, तरी नियमशास्त्राच्या अधीन असलेल्यांना मिळवण्यासाठी, मी नियमशास्त्राच्या अधीन असलेल्यांसारखा झालो.” (१ करिंथ. ९:२०) या प्रसंगी, पौल यरुशलेममधल्या वडिलांच्या सांगण्यानुसार वागून “नियमशास्त्राच्या अधीन” झाला. असं करण्याद्वारे त्याने आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण मांडलं. आपणही स्वतःच्याच मनाप्रमाणे वागण्याऐवजी, मंडळीतल्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे करायला नेहमी तयार असलं पाहिजे.—इब्री १३:१७.
“हा जिवंत राहायच्या लायकीचा नाही!” (प्रे. कार्यं २१:२७–२२:३०)
१३. (क) काही यहुद्यांनी मंदिरात गोंधळ का घातला? (ख) पौलचा जीव कसा वाचला?
१३ नवस पूर्ण करण्याचे दिवस संपत आले तेव्हा पौल मंदिरात गेला. पण, तिथे खूप गोंधळ माजला. कारण आशियातून आलेल्या यहुद्यांनी पौलला पाहिलं आणि त्याने विदेश्यांना मंदिरात आणलं आहे, असा खोटा आरोप लावून त्यांनी दंगल करायला सुरुवात केली. रोमन सेनापती मध्ये पडला नसता, तर कदाचित त्या दिवशी लोकांनी पौलला मरेपर्यंत मारहाण केली असती. पण झालं असं, की रोमन सेनापतीने त्याला अटक केली. त्या दिवसानंतर पौल पुढची चार वर्षं कैदेतच असणार होता. शिवाय, त्याच्या जिवाला अजूनही धोका होताच. सेनापतीने जेव्हा लोकांना ते पौलवर हल्ला का करत आहेत, असं विचारलं तेव्हा ते ओरडून पौलवर वेगवेगळे आरोप करू लागले. या सर्व गोंधळात, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे सेनापतीला कळत नव्हतं. शेवटी, सैनिकांना पौलला तिथून उचलून न्यावं लागलं. ते पौलला रोमन सैनिकांच्या राहण्याच्या ठिकाणी घेऊन आले. ते आत जाणारच होते, इतक्यात पौलने सेनापतीला म्हटलं: “मी तुम्हाला विनंती करतो, मला लोकांशी बोलायची परवानगी द्या.” (प्रे. कार्यं २१:३९) सेनापतीने त्याची विनंती मान्य केली आणि पौलने लोकांशी बोलून धैर्याने आपल्या विश्वासाचं समर्थन केलं.
१४, १५. (क) पौलने यहुद्यांना काय सांगितलं? (ख) यहुदी लोक का संतापले आहेत हे जाणून घेण्यासाठी रोमन सेनापतीने काय केलं?
१४ पौलने बोलायला सुरुवात केली आणि म्हणाला, “माझी बाजू ऐकून घ्या.” (प्रे. कार्यं २२:१) पौल लोकांशी इब्री भाषेत बोलल्यामुळे ते लगेच शांत झाले आणि ऐकू लागले. यानंतर, आपण ख्रिस्ताचे शिष्य का बनलो याबद्दल अगदी स्पष्ट शब्दांत त्याने त्यांना सांगितलं. त्यांच्याशी बोलताना पौलने असे काही मुद्दे मांडले, जे खरे असल्याची ते यहुदी स्वतः खातरी करू शकत होते. पौलने त्यांना सांगितलं, की त्याने सुप्रसिद्ध शिक्षक गमलियेल याच्याकडून शिक्षण घेतलं होतं. तसंच, त्याने ख्रिस्ताच्या शिष्यांचा छळ केला होता असंही त्याने सांगितलं. तिथे उभ्या असलेल्या लोकांपैकी काहींना कदाचित हे माहीत असेल. मग, दिमिष्कला जात असताना पुनरुत्थान झालेला ख्रिस्त त्याला दृष्टान्तात दिसला आणि त्याच्याशी बोलला असं तो म्हणाला. पौलच्या सोबत प्रवास करणाऱ्यांनीही एक तेजस्वी प्रकाश पाहिला आणि त्यांना काहीतरी आवाज ऐकू आला, पण त्यांना काही समजलं नाही. (अभ्यासासाठी माहिती-प्रे. कार्यं ९:७; २२:९, nwtsty-E) पुढे पौल म्हणाला की त्याच्या साथीदारांनी त्याचा हात धरून त्याला दिमिष्कला नेलं, कारण तो आंधळा झाला होता. तिथे पोहोचल्यावर हनन्या, ज्याला त्या भागातले बरेच यहुदी ओळखत होते, पौलला भेटायला आला. त्याने चमत्कार करून पौलची दृष्टी त्याला परत दिली.
१५ यानंतर, यरुशलेमला परत आल्यावर येशूने मंदिरात आपल्याला दर्शन दिल्याचं पौलने त्यांना सांगितलं. हे ऐकून यहुदी लोक खूप संतापले आणि ते ओरडू लागले: “या माणसाला मारून टाका. हा जिवंत राहायच्या लायकीचा नाही!” (प्रे. कार्यं २२:२२) पौलचा जीव वाचवण्यासाठी सेनापतीने त्याला सैनिकांच्या राहण्याच्या ठिकाणी नेण्याचा हुकूम दिला. यहुदी लोक पौलवर इतके का संतापले आहेत, हे सेनापतीला कसंही करून जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे त्याने पौलला फटके मारून त्याची चौकशी करण्याचा आदेश दिला. पण, पौलने रोमन नागरिक या नात्याने त्याला कायद्याने मिळणाऱ्या संरक्षणाचा वापर केला. आजही यहोवाच्या साक्षीदारांनी बऱ्याचदा त्यांच्या विश्वासाचं समर्थन करण्यासाठी त्यांना मिळालेल्या कायदेशीर हक्कांचा वापर केला आहे. (“ रोमन कायदे आणि ” आणि “ रोमन नागरिक आधुनिक काळातले न्यायालयीन खटले” ही चौकट पाहा.) पौल रोमन नागरिक आहे हे ऐकताच, सेनापतीला कळलं की त्याला हवी असलेली माहिती मिळवण्यासाठी त्याला दुसरा मार्ग शोधावा लागेल. त्यामुळे, दुसऱ्या दिवशी त्याने न्यायसभेची म्हणजेच यहुदी लोकांच्या उच्च न्यायालयाची एक खास सभा बोलावली.
“मी एक परूशी” आहे (प्रे. कार्यं २३:१-१०)
१६, १७. (क) पौलने न्यायसभेसमोर बोलायला सुरुवात केल्यावर काय झालं? (ख) पौलच्या थोबाडीत मारण्यात आलं तेव्हा त्याने नम्रता कशी दाखवली?
१६ न्यायसभेसमोर स्वतःची बाजू मांडताना पौलने असं म्हणून सुरुवात केली: “माणसांनो, बांधवांनो, मी आजपर्यंत देवासमोर अगदी शुद्ध विवेकाने वागलोय.” (प्रे. कार्यं २३:१) पण, तो पुढे काहीच बोलू शकला नाही. कारण अहवालात म्हटलं आहे: “हे ऐकून, महायाजक हनन्या याने जवळ उभ्या असलेल्यांना पौलच्या थोबाडीत मारायची आज्ञा दिली.” (प्रे. कार्यं २३:२) खरंच हा किती मोठा अपमान होता! आणि कोणताही पुरावा ऐकून घेण्याआधीच त्याला खोटं ठरवणारे ते न्यायाधीश किती पक्षपाती होते, हेही यावरून दिसून आलं. म्हणूनच पौलने असं उत्तर दिलं: “अरे चुना लावलेल्या भिंती! देव तुला मारेल. तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करायला बसला आहेस आणि स्वतःच नियमशास्त्राविरुद्ध जाऊन मला मारायची आज्ञा देतोस?”—प्रे. कार्यं २३:३.
१७ तिथे उभ्या असलेल्या काहींना खूप आश्चर्य झालं. पौलच्या थोबाडीत मारलं म्हणून नाही, तर तो जे बोलला ते ऐकून त्यांना आश्चर्य झालं. ते म्हणाले: “तू देवाच्या महायाजकाचा अपमान करतोस?” त्यावर पौल म्हणाला: “बांधवांनो, हा महायाजक आहे हे मला माहीत नव्हतं. कारण असं लिहिलंय, की ‘तुम्ही तुमच्यातल्या अधिकाऱ्याबद्दल वाईट बोलू नका.’” d (प्रे. कार्यं २३:४, ५; निर्ग. २२:२८) आता पौलने एक वेगळी युक्ती वापरली. न्यायसभेत परूशी आणि सदूकी या दोन्ही पंथांचे लोक आहेत हे माहीत असल्यामुळे तो म्हणाला: “माणसांनो, बांधवांनो, मी एक परूशी आणि परूश्यांचा मुलगा आहे. मला मेलेल्यांच्या पुनरुत्थानाची आशा आहे, म्हणून माझी न्यायचौकशी केली जात आहे.”—प्रे. कार्यं २३:६.
१८. पौलने स्वतःला परूशी का म्हटलं, आणि काही वेळा आपणही अशाच प्रकारे तर्क कसा करू शकतो?
१८ पौलने स्वतःला परूशी का म्हटलं? कारण तो “परूश्यांचा मुलगा” म्हणजेच त्या पंथातल्या एका कुटुंबाचा सदस्य होता. त्यामुळे, बरेच जण अजूनही त्याला परूशीच समजत असावेत. e पण, परूशी लोक पुनरुत्थानाबद्दल जे मानत होते त्याच्याशी पौल कसा सहमत होऊ शकत होता? परूशी असं मानायचे की मृत्यूनंतर माणसाचा आत्मा जिवंत राहतो आणि चांगल्या लोकांच्या आत्म्यांना पुन्हा जगण्यासाठी मानवी शरीर दिलं जाईल. पौलचा साहजिकच अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. पुनरुत्थानाबद्दल येशूने जे शिकवलं त्यावर त्याचा विश्वास होता. (योहा. ५:२५-२९) पण, मृत्यूनंतरही पुन्हा जीवनाची आशा आहे या बाबतीत तो परूश्यांशी सहमत होता. दुसरीकडे, सदूकी लोक भविष्यात जीवनाची आशा आहे असं मानत नव्हते. इतर धर्मांच्या लोकांशी बोलताना आपणही अशाच प्रकारे तर्क करू शकतो. उदाहरणार्थ, आपण त्यांना सांगू शकतो, की कदाचित देवाबद्दल त्यांचे आणि आपले विश्वास वेगळे असतील. कारण आपण बायबलमध्ये देवाबद्दल जे सांगितलं आहे, ते मानतो. पण, देव आहे हे मात्र त्यांच्याप्रमाणेच आपणही मानतो.
१९. न्यायसभेत गोंधळ का माजला?
१९ पौलने असं म्हटल्यामुळे न्यायसभेत फूट पडली. अहवालात असं म्हटलं आहे: “यामुळे बरीच खळबळ माजली आणि परूश्यांच्या पक्षाचे काही शास्त्री उठून तावातावाने म्हणू लागले: ‘या माणसात आम्हाला काहीच दोष सापडत नाही. पण एखादा अदृश्य प्राणी किंवा स्वर्गदूत त्याच्याशी बोलला असेल तर. . . .’” (प्रे. कार्यं २३:९) स्वर्गदूत पौलशी बोलला ही गोष्ट परूश्यांनी सुचवताच सदूकी भडकले. कारण, स्वर्गदूतांच्या अस्तित्वावर त्यांचा विश्वास नव्हता! (खाली दिलेली “ सदूकी आणि परूशी” ही चौकट पाहा.) गोंधळ इतका वाढला की पुन्हा एकदा रोमन सेनापतीला पौलला लोकांपासून वाचवावं लागलं. (प्रे. कार्यं २३:१०) पण पौलच्या जिवाला अजूनही धोका होता. आता यानंतर प्रेषित पौलसोबत काय घडणार होतं? याबद्दल आपण पुढच्या अध्यायात पाहणार आहोत.
a यरुशलेममधल्या बांधवांची संख्या मोठी असल्यामुळे त्या सर्वांच्या आध्यात्मिक गरजांची काळजी घेण्यासाठी या शहरात अनेक मंडळ्या होत्या. या मंडळ्यांच्या सभा कदाचित बांधवांच्या घरांत होत असाव्यात.
b याच्या काही वर्षांनंतर प्रेषित पौलने इब्री लोकांना पत्र लिहिलं. या पत्रात त्याने नवा करार कशा प्रकारे श्रेष्ठ आहे हे सिद्ध केलं. नवा करार आल्यामुळे जुना करार रद्द झाला आहे, हेही त्याने या पत्रात स्पष्ट करून सांगितलं. पौलने आपल्या पत्रात असे अनेक पटण्यालायक तर्क मांडले, ज्यांचा वापर करून यहुदी ख्रिस्ती, नियमशास्त्राबद्दल आवेशी असलेल्या यहुद्यांना उत्तर देऊ शकतील. पौलने केलेल्या या प्रभावी तर्कांमुळे, मोशेच्या नियमशास्त्राला खूप जास्त महत्त्व देणाऱ्या काही ख्रिश्चनांचा विश्वास नक्कीच मजबूत झाला असेल.—इब्री ८:७-१३.
c काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे, की कदाचित या माणसांनी नाझीर होण्याचा नवस केला असेल. (गण. ६:१-२१) हा नवस मोशेच्या नियमशास्त्रानुसार करण्यात आला असल्यामुळे, साहजिकच आता त्याला काही महत्त्व उरलं नव्हतं. तरीपण, पौलने कदाचित असा तर्क केला असेल, की या माणसांनी यहोवाला वचन दिलं असल्यामुळे तो नवस पूर्ण करणं चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे, त्यांच्यासोबत मंदिरात जाणं आणि त्यांचा खर्च उचलणं पौलला चुकीचं वाटलं नाही. त्यांनी नक्की कोणत्या प्रकारचा नवस केला होता हे आपल्याला माहीत नाही. पण, प्राण्यांचं बलिदान करण्यात (नाझीर करायचे त्याप्रमाणे) पौल नक्कीच सामील झाला नसेल. कारण यावरून असं दिसून आलं असतं की या बलिदानांद्वारे माणसाच्या पापांचं शुद्धीकरण होतं असं तो मानतो. पण, ख्रिस्ताच्या परिपूर्ण बलिदानामुळे पापांच्या क्षमेसाठी प्राण्यांच्या बलिदानांची गरज उरली नव्हती. पौलने आपल्या विवेकाच्या विरोधात कोणतीही गोष्ट केली नसेल, याची आपण खातरी बाळगू शकतो.
d काहींनी असं सुचवलं आहे की कदाचित पौलला डोळ्यांनी नीट दिसत नसल्यामुळे त्याला महायाजकाला ओळखता आलं नसेल. किंवा कदाचित तो बऱ्याच दिवसांनंतर यरुशलेमला आला असल्यामुळे सध्याच्या महायाजकाला तो ओळखत नसावा. किंवा, खूप गर्दी असल्यामुळे त्याला मारण्याचा हुकूम देणारा कोण होता, हे त्याला दिसलं नसावं.
e विदेश्यांनी मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करणं आवश्यक आहे का, याविषयी इ.स. ४९ मध्ये, प्रेषित आणि वडिलांची चर्चा झाली. तिथे उपस्थित असलेल्या काहींबद्दल अहवालात असं म्हटलं आहे, की ते “परूश्यांच्या पंथातून” होते, आणि त्यांनी “विश्वास स्वीकारला होता.” (प्रे. कार्यं १५:५) यावरून असं दिसतं की ख्रिस्ती बनल्यावरही, ते पूर्वी परूश्यांच्या पंथातले असल्यामुळे एका अर्थाने त्यांना परूशी म्हटलं जायचं.