व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय २४

“हिंमत धर!”

“हिंमत धर!”

ठार मारण्याचा कट करणाऱ्‍यांपासून पौल वाचतो आणि फेलिक्ससमोर स्वतःची बाजू मांडतो

प्रे. कार्यं २३:११–२४:२७ वर आधारित

१, २. यरुशलेममध्ये छळ सहन करावा लागत आहे याचं पौलला आश्‍चर्य का वाटत नाही?

 यरुशलेममध्ये संतापलेल्या जमावापासून वाचवण्यात आल्यावर पौल पुन्हा एकदा कैदेत आहे. या शहरात आपल्याला छळाचा सामना करावा लागत आहे याचं या आवेशी प्रेषिताला आश्‍चर्य वाटत नाही. कारण यरुशलेममध्ये त्याला “तुरुंगवास आणि संकटं” सोसावी लागतील हे त्याला आधीच सांगण्यात आलं होतं. (प्रे. कार्यं २०:२२, २३) आता पुढे नेमकं काय होणार आहे हे तर त्याला माहीत नाही, पण येशूच्या नावासाठी आपल्याला आणखी दुःखं सहन करावी लागतील याची त्याला कल्पना आहे.​—प्रे. कार्यं ९:१६.

काही ख्रिस्ती संदेष्ट्यांनीही पौलला सांगितलं होतं, की त्याला बांधून “विदेशी लोकांच्या हवाली” सोपवलं जाईल. (प्रे. कार्यं २१:४, १०, ११) काही दिवसांआधीच एका यहुदी जमावाने त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, काही दिवसांतच न्यायसभेच्या सदस्यांमध्ये त्याच्यामुळे वाद निर्माण झाला आणि ते त्याचे “फाडून तुकडे करतील” असं वाटत होतं. आता पौल तुरुंगात, रोमन सैनिकांच्या ताब्यात आहे. यानंतर त्याला अनेकदा न्यायालयांत चौकशीसाठी नेलं जाणार आहे आणि त्याच्यावर बरेच आरोप लावले जाणार आहेत. (प्रे. कार्यं २१:३१; २३:१०, तळटीप) खरंच, या परिस्थितीत प्रेषित पौलला प्रोत्साहनाची आणि सांत्वनाची खूप गरज आहे.

३. प्रचारकार्य करत राहण्यासाठी लागणारं प्रोत्साहन आपल्याला कुठून मिळतं?

आपल्याला माहीत आहे, की या शेवटच्या काळात “ख्रिस्त येशूमध्ये देवाची भक्‍ती करत जीवन जगू इच्छिणाऱ्‍या सगळ्यांचा छळ केला जाईल.” (२ तीम. ३:१२) आपल्यालाही हिंमत न हारता प्रचारकार्य करत राहण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनाची गरज असते. म्हणूनच, “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” याच्याद्वारे पुरवल्या जाणाऱ्‍या प्रकाशनांतून आणि त्याने आयोजित केलेल्या सभांतून आपल्याला योग्य वेळी जे प्रोत्साहन आणि सांत्वन मिळतं, त्यासाठी आपण किती आभारी आहोत! (मत्त. २४:४५) यहोवाने आपल्याला हे आश्‍वासन दिलं आहे, की आनंदाच्या संदेशाचे विरोधक कधीही त्यांच्या प्रयत्नांत यशस्वी होणार नाहीत. ते कधीही यहोवाच्या सेवकांचा एक गट या नात्याने नाश करू शकणार नाहीत, किंवा त्यांचं प्रचारकार्य थांबवू शकणार नाहीत. (यश. ५४:१७; यिर्म. १:१९) पण प्रेषित पौलबद्दल काय? विरोध होत असूनही साक्ष देण्याचं काम करत राहण्यासाठी त्याला हवं असलेलं प्रोत्साहन मिळालं का? त्याला हे प्रोत्साहन कसं मिळालं आणि त्यानंतर त्याने काय केलं?

“शपथ” घेऊन रचलेला कट फसला (प्रे. कार्यं २३:११-३४)

४, ५. पौलला कोणी आणि कसं प्रोत्साहन दिलं, आणि हे प्रोत्साहन त्याला अगदी योग्य वेळी मिळालं असं का म्हणता येईल?

खरंच, प्रेषित पौलला प्रोत्साहनाची खूप गरज होती. ज्या दिवशी त्याला न्यायसभेतून वाचवण्यात आलं त्या रात्री असं काहीतरी घडलं, ज्यामुळे त्याला हे प्रोत्साहन मिळालं. बायबलमधल्या अहवालात असं म्हटलं आहे: “त्या रात्री प्रभू त्याच्याजवळ उभा राहून त्याला म्हणाला: ‘हिंमत धर! कारण माझ्याबद्दल तू जशी यरुशलेममध्ये अगदी पूर्णपणे साक्ष देत आहेस, तशीच तुला रोममध्येसुद्धा द्यावी लागेल.’” (प्रे. कार्यं २३:११) येशूच्या या प्रोत्साहनदायक शब्दांमुळे पौलला खातरी मिळाली, की त्याची नक्कीच सुटका होईल. रोमला जाऊन तिथे येशूविषयी साक्ष देण्याचा सन्मान त्याला मिळणार होता. त्यामुळे, हे घडेपर्यंत तरी आपल्याला ठार मारलं जाणार नाही हे पौलला कळलं.

“त्यांच्यापैकी चाळीसपेक्षा जास्त माणसं त्याला ठार मारण्यासाठी लपून बसली आहेत.”​—प्रे. कार्यं २३:२१

पौलला हे प्रोत्साहन अगदी योग्य वेळी मिळालं. कारण, दुसऱ्‍याच दिवशी ४० पेक्षा जास्त यहुदी माणसांनी “एक कट रचून अशी शपथ घेतली, की जोपर्यंत आम्ही पौलला ठार मारत नाही, तोपर्यंत आम्ही काहीही खाणार-पिणार नाही.” त्यांनी “शपथ” घेऊन हा कट रचला, त्यावरून त्यांना कसंही करून पौलचा जीव घ्यायचा होता, हे दिसून येतं. हा कट पूर्ण करता आला नाही, तर आपल्याला शाप लागेल किंवा आपल्यासोबत काहीतरी वाईट घडेल असा त्यांचा समज होता. (प्रे. कार्यं २३:१२-१५) त्यांच्या या योजनेला मुख्य याजक आणि वडिलांचीही परवानगी होती. पौलविषयी आणखी अचूक माहिती मिळवण्यासाठी त्याला पुन्हा चौकशीसाठी आणायचं असं त्यांनी ठरवलं. पण मुळात त्यांनी अशी योजना केली होती, की काही जण दबा धरून बसतील आणि पौलला न्यायसभेकडे नेलं जात असताना वाटेतच त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारतील.

६. पौलला ठार मारण्याचा कट कशा प्रकारे उघडकीस आला, आणि या अहवालातून तरुण लोक काय शिकू शकतात?

पण पौलच्या भाच्याला या कटाबद्दल समजलं आणि त्याने पौलला याविषयी सांगितलं. तेव्हा त्याने ही गोष्ट रोमन सेनापती क्लौद्य लुसिया याला कळवावी, असं पौलने त्याला सांगितलं. (प्रे. कार्यं २३:१६-२२) पौलच्या या भाच्याचं नाव बायबलमध्ये दिलेलं नाही. पण आजही, त्याच्यासारखे अनेक तरुण स्वतःचा विचार करण्याऐवजी धैर्याने देवाच्या लोकांच्या भल्यासाठी कार्य करतात. तसंच, ते राज्याच्या कामाच्या वाढीसाठी त्यांना जे काही करता येईल ते विश्‍वासूपणे करतात. यहोवा अशा सर्व तरुणांवर खूप प्रेम करतो यात शंका नाही.

७, ८. क्लौद्य लुसियाने पौलच्या सुरक्षेसाठी कोणती व्यवस्था केली?

पौलच्या विरोधात केलेल्या कटाबद्दल समजताच क्लौद्य लुसिया, ज्याला १,००० सैनिकांवर अधिकार होता, त्याने ४७० सैनिकांची एक तुकडी तयार करण्याचा आणि त्याच रात्री पौलला यरुशलेममधून सुरक्षितपणे कैसरीयाला नेण्याचा हुकूम दिला. या तुकडीत पायी चालणारे आणि भाला घेतलेले सैनिक, तसंच घोडेस्वारही होते. यरुशलेमला पोहोचल्यावर पौलला राज्यपाल फेलिक्स याच्या हवाली सोपवलं जाणार होतं. a कैसरीया, यहूदीया प्रांताचं राजधानी शहर होतं आणि इथूनच रोमन सरकार या प्रांतावर शासन करायचं. इथे बरेच यहुदी राहत असले, तरी इथे जास्तकरून विदेशी लोक राहायचे. यरुशलेममध्ये लोक इतर धर्मांबद्दल आपला द्वेष उघडपणे व्यक्‍त करायचे आणि तिथे सहसा दंगली व्हायच्या. पण याच्या तुलनेत कैसरीयात जास्त शांतिपूर्ण वातावरण होतं. तसंच, यहूदीयातल्या रोमन फौजेचं मुख्यालयही कैसरीयातच होतं.

रोमन कायद्यानुसार लुसियाने पौलच्या प्रकरणाबद्दल माहिती देण्यासाठी फेलिक्सला एक पत्रही पाठवलं. यहुदी लोक पौलला “ठार मारायच्या बेतात होते,” पण पौल रोमन नागरिक असल्याचं कळल्यावर आपण त्याला यहुद्यांपासून वाचवलं, असं त्याने पत्रात लिहिलं. लुसियाने असंही लिहिलं, की “मृत्युदंड देण्यासारख्या किंवा तुरुंगात टाकण्यासारख्या” कोणत्याही गुन्ह्याबद्दल पौल दोषी असल्याचं मला आढळलं नाही. पण, पौलच्या विरोधात एक कट करण्यात आल्यामुळे मी पौलला तुमच्या हवाली करत आहे असं त्याने म्हटलं. पौलवर आरोप करणाऱ्‍यांचं ऐकून घेतल्यावर फेलिक्सने निर्णय घ्यावा असं त्याने पत्रात लिहिलं.​—प्रे. कार्यं २३:२५-३०.

९. (क) रोमन नागरिक या नात्याने पौलच्या हक्कांचं उल्लंघन कसं करण्यात आलं? (ख) एखाद्या देशाचे नागरिक या नात्याने मिळालेल्या हक्कांचा वापर आपल्याला का करावा लागू शकतो?

लुसियाने पत्रात सर्वकाही अगदी प्रामाणिकपणे लिहिलं होतं का? नाही. तो राज्यपालासमोर आपली चांगली प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करत असावा. पौल रोमन नागरिक आहे हे कळल्यामुळे तो त्याला वाचवायला आला नव्हता. शिवाय, आपण पौलला “दोन साखळ्यांनी बांधायचा” हुकूम दिल्याचं, आणि नंतर “फटके मारून त्याची उलटतपासणी” करण्याचाही हुकूम दिल्याचं त्याने पत्रात सांगितलं नाही. (प्रे. कार्यं २१:३०-३४; २२:२४-२९) असं वागून लुसियाने खरंतर रोमन नागरिक या नात्याने पौलच्या हक्कांचं उल्लंघन केलं होतं. आजही, सैतान आपला छळ करण्यासाठी धर्मांध विरोधकांचा वापर करतो आणि काही वेळा ते आपल्या उपासना करण्याच्या हक्कांचं उल्लंघन करतात. पण पौलप्रमाणे, देवाचे लोकही एखाद्या देशाचे नागरिक या नात्याने त्यांना मिळालेल्या हक्कांचा वापर करतात आणि कायद्याचं संरक्षण मिळवण्यासाठी पावलं उचलतात.

मला “आपली बाजू मांडताना आनंद होतोय” (प्रे. कार्यं २३:३५–२४:२१)

१०. पौलवर कोणते गंभीर आरोप करण्यात आले?

१० पौलवर आरोप करणारे यरुशलेमहून कैसरीयाला येईपर्यंत, त्याला “हेरोदच्या वाड्यात पहाऱ्‍याखाली” ठेवण्यात आलं. (प्रे. कार्यं २३:३५) ते पाच दिवसांनी तिथे आले. त्यांच्यात महायाजक हन्‍ना, तिर्तुल्ल नावाचा एक जाहीर वक्‍ता आणि काही वडीलही होते. तिर्तुल्लने सर्वातआधी, फेलिक्स यहुद्यांसाठी जे करत होता त्यासाठी त्याची स्तुती केली. तो साहजिकच फेलिक्सची मर्जी मिळवण्याच्या हेतूने त्याची वाहवा करत होता. b मग मुख्य विषयावर येत, तिर्तुल्लने पौलविषयी म्हटलं, की “हा माणूस खूप त्रासदायक आहे आणि तो संपूर्ण जगातल्या सगळ्या यहुद्यांना बंड करायला चिथवतोय. शिवाय, तो नासरेथकरांच्या पंथाचा पुढारी आहे. त्याने मंदिरही दूषित करायचा प्रयत्न केला, त्यामुळे आम्ही त्याला धरलं.” तेव्हा इतर यहुदीही “त्याच्या विरोधात बोलू लागले आणि या सगळ्या गोष्टी खऱ्‍या आहेत असं ठामपणे म्हणू लागले.” (प्रे. कार्यं २४:५, ६, ९) इतरांना विद्रोह करायला चिथावणं, एका धोकादायक पंथाचा पुढारी असणं आणि मंदिर दूषित करण्याचा प्रयत्न करणं हे सर्व खूप गंभीर आरोप होते आणि त्यांसाठी एका व्यक्‍तीला मृत्युदंडही दिला जाऊ शकत होता.

११, १२. पौलने त्याच्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचं कसं दाखवलं?

११ यानंतर पौलला बोलण्याची परवानगी देण्यात आली. त्याने असं म्हणून सुरुवात केली, की मला “आपली बाजू मांडताना आनंद होतोय.” त्याच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत असं त्याने स्पष्टपणे सांगितलं. आपण मंदिर दूषित केलं नाही आणि कोणालाही विद्रोह करायला भडकवलं नाही असंही त्याने सांगितलं. खरंतर आपण “बऱ्‍याच” वर्षांपासून यरुशलेममध्ये नव्हतो, आणि आता आपल्या देशातल्या गरीब लोकांसाठी “दान” घेऊन आलो आहोत असंही तो म्हणाला. हे दान, दुष्काळामुळे किंवा छळामुळे गरिबी आलेल्या ख्रिस्ती बांधवांसाठी होतं. तसंच, मंदिरात जाण्याआधी आपण स्वतःचं “विधीप्रमाणे शुद्धीकरण” केलं होतं, आणि आपण “नेहमी देवासमोर आणि माणसांसमोर माझा विवेक शुद्ध ठेवायचा प्रयत्न” केला आहे, असंही पौलने त्यांना आवर्जून सांगितलं.​—प्रे. कार्यं २४:१०-१३, १६-१८.

१२ पण, “ज्या मार्गाला ते पंथ असं म्हणतात, त्या मार्गाप्रमाणे” मी आपल्या पूर्वजांच्या देवाची पवित्र सेवा करतो, ही गोष्ट मात्र पौलने कबूल केली. असं असलं, तरी “नियमशास्त्रात आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांत लिहिलेल्या सगळ्या गोष्टींवर माझा विश्‍वास आहे” असं त्याने आवर्जून सांगितलं. तसंच, आपल्यावर आरोप करणाऱ्‍यांप्रमाणेच आपणही “नीतिमान आणि अनीतिमान अशा सगळ्या लोकांना मेलेल्यांतून उठवलं जाणार आहे” अशी आशा बाळगत असल्याचंही तो म्हणाला. यानंतर, आपल्यावर आरोप करणाऱ्‍यांनी त्यांचे आरोप सिद्ध करावेत अशी पौलने मागणी केली. तो म्हणाला: “इथे उपस्थित असलेल्या या माणसांनी सांगावं, की मी न्यायसभेपुढे उभा असताना त्यांना माझ्यावर दोष लावण्यासारखं काय सापडलं? काही दोष असेल, तर तो इतकाच की मी त्यांच्यामध्ये उभा राहून मोठ्याने म्हणालो: ‘मेलेल्यांच्या पुनरुत्थानावरून आज तुमच्यासमोर माझी न्यायचौकशी केली जात आहे!’”​—प्रे. कार्यं २४:१४, १५, २०, २१.

१३-१५. अधिकाऱ्‍यांसमोर धैर्याने साक्ष देण्याच्या बाबतीत पौलने आपल्यासाठी चांगलं उदाहरण कसं मांडलं?

१३ पौलने आपल्यासाठी फार चांगलं उदाहरण मांडलं आहे. कधीकधी आपल्या उपासनेमुळे आपल्याला अधिकाऱ्‍यांसमोर नेलं जाऊ शकतं. तसंच, आपण शांती भंग करतो, लोकांना विद्रोह करण्यासाठी भडकवतो किंवा एखाद्या धोकादायक पंथाचे सदस्य आहोत, असे आरोपही आपल्यावर लावले जाऊ शकतात. अशा वेळी आपण पौलच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतो. पौलने तिर्तुल्लप्रमाणे, राज्यपालाची मर्जी मिळवण्यासाठी त्याची खोटी प्रशंसा केली नाही. तो आदराने आणि शांतपणे बोलला. विचारपूर्वक शब्द निवडत, त्याने अगदी स्पष्ट आणि खरीखरी माहिती दिली. पौलने राज्यपालाला सांगितलं, की ज्यांनी त्याच्यावर मंदिर दूषित करण्याचा आरोप लावला होता, ते “आशिया प्रांतातून आलेले” यहुदी तिथे नव्हते. कायद्यानुसार, त्यांनी समोरासमोर येऊन पौलवर आरोप लावायला हवे होते.​—प्रे. कार्यं २४:१८, १९.

१४ पण, सगळ्यात लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे, पौल आपल्या विश्‍वासांबद्दल अगदी स्पष्टपणे बोलला. पुनरुत्थानावर आपला विश्‍वास असल्याचं त्याने पुन्हा एकदा धैर्याने सांगितलं. खरंतर, याच मुद्द्‌यावरून न्यायसभेत गोंधळ माजला होता. (प्रे. कार्यं २३:६-१०) पण तरीही, आपली बाजू मांडताना पौलने पुनरुत्थानाच्या आशेवर जोर दिला. त्याने असं का केलं? कारण, पौल येशूविषयी आणि त्याच्या पुनरुत्थानाविषयीच साक्ष देत होता. त्याचे विरोधक मात्र ही गोष्ट मान्य करायला तयार नव्हते. (प्रे. कार्यं २६:६-८, २२, २३) पण, मुळात पुनरुत्थानाच्या मुद्द्‌यावरून आणि खासकरून येशू आणि त्याच्या पुनरुत्थानावरच्या विश्‍वासामुळेच हा वाद निर्माण झाला होता.

१५ पौलप्रमाणेच, आपणही धैर्याने साक्ष देऊ शकतो. असं करण्यासाठी, येशूने आपल्या शिष्यांना जे सांगितलं होतं त्यातून आपल्याला बळ मिळेल. येशू म्हणाला होता: “माझ्या नावामुळे सगळे लोक तुमचा द्वेष करतील. पण जो शेवटपर्यंत धीर धरेल, त्यालाच वाचवलं जाईल.” पण अधिकाऱ्‍यांसमोर नेलं जातं, तेव्हा काय बोलावं याबद्दल आपण चिंता करावी का? नाही, कारण येशूने असं आश्‍वासन दिलं: “जेव्हा ते तुम्हाला न्यायालयाच्या स्वाधीन करण्यासाठी नेतील, तेव्हा काय बोलावं याबद्दल आधीपासूनच चिंता करू नका. तर, त्या वेळी तुम्हाला जे सुचवलं जाईल तेच बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र शक्‍ती आहे.”​—मार्क १३:९-१३.

“फेलिक्स घाबरला” (प्रे. कार्यं २४:२२-२७)

१६, १७. (क) फेलिक्सने पौलचं प्रकरण कसं हाताळलं? (ख) फेलिक्स का घाबरला असावा, आणि तरीही तो पुन्हापुन्हा पौलला का बोलवायचा?

१६ ख्रिस्ती विश्‍वासांबद्दल ऐकण्याची राज्यपाल फेलिक्सची ही पहिली वेळ नव्हती. अहवालात असं म्हटलं आहे: “फेलिक्सला प्रभूच्या मार्गाबद्दल चांगली माहिती असल्यामुळे त्याने त्यांना असं म्हणून टाळलं: ‘सेनापती लुसिया आल्यावर, मी तुमच्या प्रकरणाचा निकाल लावीन.’ मग त्याने सैन्याच्या अधिकाऱ्‍याला असा हुकूम दिला, की पौलला कैदेत ठेवावं, पण त्याला थोडीफार मोकळीक द्यावी आणि त्याच्या लोकांना त्याची सेवा करायची परवानगी द्यावी.”​—प्रे. कार्यं २४:२२, २३.

१७ काही दिवसांनी फेलिक्सने पौलला बोलावून घेतलं आणि आपली पत्नी द्रुसिल्ला (जी एक यहुदी होती) हिच्यासोबत त्याने “ख्रिस्त येशूवरच्या विश्‍वासाबद्दल त्याच्याकडून ऐकलं.” (प्रे. कार्यं २४:२४) पण, जेव्हा पौल “नीतिमत्त्व, संयम आणि येणाऱ्‍या न्यायदंडाबद्दल बोलू लागला, तेव्हा फेलिक्स घाबरला.” कारण तो स्वतः आपल्या जीवनात बऱ्‍याच वाईट गोष्टी करत होता आणि पौलचं बोलणं ऐकून कदाचित त्याचा विवेक त्याला बोचू लागला असेल. त्यामुळे, त्याने पौलला पाठवून दिलं. तो म्हणाला: “आता तू जा. वेळ मिळाला म्हणजे मी तुला परत बोलावून घेईन.” यानंतर, फेलिक्सने बऱ्‍याच वेळा पौलची भेट घेतली. पण, त्याला सत्य जाणून घेण्याची इच्छा असल्यामुळे नाही, तर पौल आपल्याला लाच देईल या आशेने तो त्याला पुन्हापुन्हा बोलवायचा.​—प्रे. कार्यं २४:२५, २६.

१८. पौलने फेलिक्स आणि त्याच्या पत्नीला “नीतिमत्त्व, संयम आणि येणाऱ्‍या न्यायदंडाबद्दल” का सांगितलं?

१८ पौलने फेलिक्स आणि त्याच्या पत्नीला “नीतिमत्त्व, संयम आणि येणाऱ्‍या न्यायदंडाबद्दल” का सांगितलं? त्यांनी “येशूवरच्या विश्‍वासाबद्दल” ऐकण्यासाठीच त्याला बोलावलं होतं, हे तुम्हाला आठवत असेल. पौलला माहीत होतं की ते त्यांच्या जीवनात अनैतिक गोष्टी करत होते, आणि क्रूरतेने व अन्यायाने वागत होते. म्हणूनच, ज्यांना येशूचे शिष्य बनायचं आहे त्यांनी काय केलं पाहिजे, हे तो त्यांना स्पष्टपणे सांगत होता. पौलने फेलिक्स आणि त्याच्या पत्नीला जे सांगितलं, त्यावरून त्यांचं जीवन यहोवाच्या नीतिमान स्तरांच्या किती विरोधात होतं, हे अगदी स्पष्ट झालं. यामुळे त्यांना जाणीव झाली असेल, की माणूस जे काही विचार करतो, जे काही बोलतो किंवा जसं वागतो त्यासाठी त्याला देवाला हिशोब द्यावा लागेल. तसंच, पौलच्या बाबतीत जो काही न्याय केला जाईल त्यापेक्षा त्यांच्यावर देवाचा जो न्यायदंड येणार होता, तो जास्त महत्त्वाचा होता हेही त्यांना समजलं असेल. आणि म्हणूनच फेलिक्स “घाबरला.”

१९, २०. (क) जे सुरुवातीला सत्याबद्दल आवड असल्याचं दाखवतात, पण ज्यांना आपल्या जीवनात बदल करण्याची इच्छा नसते, अशा लोकांच्या बाबतीत आपण काय केलं पाहिजे? (ख) फेलिक्सला पौलची मनापासून काळजी नव्हती असं आपण का म्हणू शकतो?

१९ सेवाकार्य करताना आपल्यालाही फेलिक्ससारखे लोक भेटू शकतात. सुरुवातीला कदाचित ते सत्याबद्दल आवड असल्याचं दाखवतील. पण, खरं पाहिलं तर त्यांना आपल्या जीवनात बदल करण्याची इच्छा नसते. अशा लोकांना मदत करताना आपण सावध राहिलं पाहिजे. पण, पौलप्रमाणे विचारपूर्वक शब्द निवडून आपण त्यांना देवाच्या नीतिमान स्तरांबद्दल सांगू शकतो. कदाचित सत्याचा त्यांच्या हृदयावर प्रभाव पडेल. पण, ते आपल्या जीवनात करत असलेल्या वाईट गोष्टी सोडून द्यायला तयार नाहीत असं दिसलं, तर आपण त्यांच्या मागे लागणार नाही. त्याऐवजी, आपण अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, जे सत्याचा मनापासून शोध घेत आहेत.

२० फेलिक्सच्या मनात खरोखर काय होतं, हे आपल्याला पुढील शब्दांतून कळतं: “अशा रितीने दोन वर्षं उलटून गेल्यावर पुर्क्य फेस्त फेलिक्सच्या जागी आला. पण फेलिक्सला यहुद्यांची मर्जी राखायची इच्छा असल्यामुळे त्याने पौलला कैदेतच ठेवलं.” (प्रे. कार्यं २४:२७) फेलिक्सला पौलची मनापासून काळजी नव्हती. खरंतर, ‘प्रभूच्या मार्गाचे’ शिष्य हे विद्रोही किंवा क्रांतिकारी नाहीत हे फेलिक्सला माहीत होतं. (प्रे. कार्यं १९:२३) तसंच, पौलने कोणताही रोमन कायदा मोडला नव्हता हेही त्याला माहीत होतं. तरीही, “यहुद्यांची मर्जी राखायची इच्छा असल्यामुळे” फेलिक्सने पौलला कैदेतच ठेवलं.

२१. पुर्क्य फेस्त राज्यपाल बनल्यानंतर पौलसोबत काय घडलं, आणि त्याला कशामुळे बळ मिळत राहिलं असेल?

२१ प्रेषितांची कार्यं पुस्तकातल्या २४ व्या अध्यायाच्या शेवटल्या वचनातून आपल्याला कळतं, की फेलिक्सच्या जागी पुर्क्य फेस्त राज्यपाल बनला तेव्हा पौल अजूनही कैदेतच होता. यानंतर पुन्हा पौलच्या अनेकदा सुनावण्या झाल्या आणि त्याला एकापाठोपाठ एक अधिकाऱ्‍यांकडे पाठवण्यात आलं. खरंच, या धाडसी प्रेषिताला अनेक “राजांच्या आणि राज्यपालांच्या समोर” नेण्यात आलं. (लूक २१:१२) यानंतर, त्याने त्याच्या काळातल्या सर्वात शक्‍तिशाली शासकाला म्हणजेच रोमच्या सम्राटालाही साक्ष दिली, हे आपण पुढे पाहणार आहोत. पण, या सर्व परिस्थितींना तोंड देत असताना पौलचा विश्‍वास क्षणभरही डळमळला नाही. “हिंमत धर!” हे येशूचे शब्द त्याला सतत बळ देत राहिले यात काहीच शंका नाही.

b फेलिक्सने देशात “फार शांतता” आणल्याबद्दल तिर्तुल्लने त्याचे आभार मानले. पण खरं पाहता, इतर कोणत्याही राज्यपालाच्या शासनकाळाच्या तुलनेत फेलिक्सच्या शासनकाळात यहूदीयात सर्वात जास्त अशांती होती आणि शेवटी यहुदी लोकांनी रोमविरुद्ध बंड केलं. तसंच, फेलिक्सने केलेल्या सुधारणांबद्दल यहुदी लोक त्याचे “खूप आभारी” आहेत, असं जे तिर्तुल्लने म्हटलं तेसुद्धा अगदी खोटं होतं. खरंतर, बहुतेक यहुदी लोक फेलिक्सचा तिरस्कार करायचे कारण तो त्यांच्यावर खूप अत्याचार करायचा. तसंच, बंड करणाऱ्‍यांविरुद्धही तो खूप क्रूरतेने कारवाई करायचा.​—प्रे. कार्यं २४:२, ३.