व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय २२

“यहोवाच्या इच्छेप्रमाणे घडो”

“यहोवाच्या इच्छेप्रमाणे घडो”

देवाची इच्छा पूर्ण करण्याचा पक्का निश्‍चय करून पौल यरुशलेमला जातो

प्रे. कार्यं २१:१-१७ वर आधारित

१-४. पौल यरुशलेमला का निघाला आहे, आणि तिथे त्याच्यासोबत काय होणार आहे?

 पौल आणि लूक मिलेता इथून निघाल्यामुळे बांधव खूप दुःखी आहेत. त्या दोघांच्याही मनात इफिसच्या मंडळीतल्या या वडिलांबद्दल खूप जिव्हाळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या वडिलांना सोडून जाणं त्यांनाही खूप कठीण वाटत आहे. जड मनाने ते दोघं जहाजावर चढतात. प्रवासात लागणाऱ्‍या सर्व गोष्टी बांधवांनी त्यांना दिल्या आहेत. यहूदीयाच्या गरीब बांधवांसाठी गोळा केलेल्या देणग्याही त्यांच्यासोबत आहेत. या देणग्या लवकरात लवकर बांधवांकडे पोहोचवण्यासाठी पौल आणि त्याचे साथीदार उत्सुक आहेत.

हलकेच वाहणाऱ्‍या वाऱ्‍याने जहाजाची शिडं फडफडू लागतात आणि जहाज बंदराच्या गोंधळापासून दूर जाऊ लागतं. पौल व लूक आणि त्यांच्या सात साथीदारांच्या नजरा बंदरावर उभ्या असलेल्या बांधवांच्या उदास चेहऱ्‍यांवर खिळल्या आहेत. (प्रे. कार्यं २०:४, १४, १५) त्यांचे चेहरे दिसेनासे होईपर्यंत ते हात हलवून त्यांचा निरोप घेतात.

पौलने जवळजवळ तीन वर्षं इफिसच्या मंडळीतल्या या वडिलांसोबत मिळून काम केलं होतं. पण, आता पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनामुळे तो यरुशलेमला जायला निघाला आहे. त्याच्यासोबत काय घडणार आहे याची त्याला थोडीफार कल्पना आहे. काही वेळाआधीच त्याने या वडिलांना सांगितलं होतं: “पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे, मी यरुशलेमला जातोय. तिथे गेल्यावर माझं काय होईल हे मला माहीत नाही. मला इतकंच माहीत आहे, की तुरुंगवास आणि संकटं माझी वाट पाहत असल्याची साक्ष, पवित्र शक्‍ती मला प्रत्येक शहरात देत आहे.” (प्रे. कार्यं २०:२२, २३) पुढे धोका आहे हे पौलला माहीत आहे. पण, त्याला “पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे” यरुशलेमला जाण्याची इच्छा आहे आणि तसं करणं तो त्याचं कर्तव्य समजतो. पौलला आपल्या जिवाची कदर आहे, पण देवाची इच्छा पूर्ण करणं ही त्याच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

तुम्हालाही पौलप्रमाणेच वाटतं का? आपण आपलं जीवन यहोवाला समर्पित करतो, तेव्हा आपल्या जीवनात त्याच्या इच्छेला सर्वात महत्त्वाचं स्थान देण्याचं आपण त्याला वचन देत असतो. प्रेषित पौलने विश्‍वासूपणे मांडलेल्या उदाहरणाचं परीक्षण केल्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होईल.

ते “कुप्र” बेटाजवळून जातात (प्रे. कार्यं २१:१-३)

५. पौल आणि त्याचे साथीदार कोणत्या मार्गाने सोर इथे गेले?

पौल आणि त्याच्या साथीदारांचं “जहाज वेगाने” निघालं. वारा चांगला असल्यामुळे ते दिशा न बदलता त्याच दिवशी कोस इथे पोहोचलं. (प्रे. कार्यं २१:१) जहाजाने तिथेच रात्रभर नांगर टाकला असावा. त्यानंतर ते रुदा आणि पातरा इथे गेलं. आशिया मायनरच्या दक्षिण किनाऱ्‍याला असणाऱ्‍या पातरा इथून बांधव माल वाहून नेणाऱ्‍या एका मोठ्या जहाजावर चढतात. हे जहाज त्यांना सरळ फेनिकेमधल्या सोर इथे घेऊन जातं. जाताना त्यांना “डावीकडे [बंदर होतं त्या दिशेला] कुप्र बेट दिसलं.” (प्रे. कार्यं २१:३, तळटीप) प्रेषितांची कार्यं पुस्तकाचा लेखक लूक याने इथे ही खास माहिती का दिली?

६. (क) कुप्रचं बेट पाहून पौलला प्रोत्साहन का मिळालं असावं? (ख) यहोवाने तुम्हाला जे आशीर्वाद आणि जी मदत दिली आहे, त्यावर मनन केल्यामुळे तुम्हाला काय वाटतं?

कदाचित पौलने या बेटाकडे बोट दाखवून त्याच्या तिथल्या अनुभवांबद्दल सांगितलं असेल. नऊ वर्षांआधी त्याच्या पहिल्या मिशनरी दौऱ्‍याच्या वेळी पौल, बर्णबा आणि योहान मार्क यांना तिथे अलीम जादूगार भेटला होता. त्याने त्यांच्या प्रचारकार्याचा विरोध केला होता. (प्रे. कार्यं १३:४-१२) ते बेट पाहून आणि तिथे काय घडलं होतं त्यावर विचार केल्यामुळे पौलला पुढे येणाऱ्‍या संकटांना तोंड देण्यासाठी प्रोत्साहन मिळालं असेल. देवाने आपल्याला जे आशीर्वाद दिले आहेत आणि संकटांचा सामना करायला मदत केली आहे, त्यावर मनन केल्यामुळे आपल्यालाही फायदा होतो. असं मनन केल्यामुळे आपल्यालाही दावीदप्रमाणे वाटू शकतं. त्याने लिहिलं: “नीतिमान माणसावर बरेच कठीण प्रसंग येतात, पण त्या सर्वांतून यहोवा त्याला वाचवतो.”​—स्तो. ३४:१९.

“आम्ही शिष्यांचा शोध घेतला” (प्रे. कार्यं २१:४-९)

७. सोरला आल्यावर पौल आणि त्याच्या साथीदारांनी काय केलं?

ख्रिस्ती बांधवांचा सहवास किती महत्त्वाचा आहे हे पौलला माहीत होतं. त्यामुळे आपल्या बांधवांना भेटायला तो खूप उत्सुक होता. लूक लिहितो, की सोरला पोहोचल्यावर “आम्ही शिष्यांचा शोध घेतला.” (प्रे. कार्यं २१:४) सोर इथे ख्रिस्ती बांधव आहेत हे माहीत असल्यामुळे, या प्रवाशांनी त्यांना शोधलं आणि कदाचित ते त्यांच्यासोबत राहिले असावेत. सत्य मिळाल्यामुळे आपल्याला एक मोठा आशीर्वाद मिळाला आहे. आपण जगात कुठेही गेलो, तरी आपल्यासारखाच विश्‍वास ठेवणारे ख्रिस्ती बांधव आपल्याला भेटतात आणि ते आपलं स्वागत करतात. जे लोक देवावर प्रेम करतात आणि खरी उपासना करतात, त्यांचे संपूर्ण जगात मित्र असतात.

८. प्रेषितांची कार्यं २१:४ या वचनाचा काय अर्थ होतो?

सोरमध्ये त्यांनी घालवलेल्या सात दिवसांबद्दल सांगताना लूक एक अशी गोष्ट लिहितो जी पहिल्यांदा आपल्याला बुचकळ्यात टाकू शकते. तो म्हणतो, “पवित्र शक्‍तीने जे प्रकट केलं होतं, त्यामुळे शिष्य [सोरमधले बांधव] वारंवार पौलला असं सांगू लागले, की त्याने यरुशलेमला जाऊ नये.” (प्रे. कार्यं २१:४) पौलने दुसऱ्‍या कोणत्या ठिकाणी जावं असं यहोवाला वाटत होतं का? किंवा त्याने आता यरुशलेमला जाऊ नये अशी तो त्याला आज्ञा देत होता का? नाही. यरुशलेमला गेल्यावर पौलला संकटांचा सामना करावा लागेल असं पवित्र शक्‍तीने सूचित केलं होतं. पण, त्याने यरुशलेमला जाऊ नये असं पवित्र शक्‍तीने सुचवलं नाही. पवित्र शक्‍तीच्या मदतीने सोरमधल्या बांधवांनी अचूकपणे ओळखलं की यरुशलेममध्ये पौलला छळ सोसावा लागेल. म्हणूनच, पौलची काळजी वाटत असल्यामुळे ते त्याला यरुशलेमला जाण्यापासून थांबवत होते. त्याला या धोक्यापासून सुरक्षित ठेवण्याची त्यांची इच्छा होती हे समजण्यासारखं आहे. तरीही, देवाची इच्छा पूर्ण करण्याचा पौलचा पक्का निश्‍चय असल्यामुळे, तो यरुशलेमला जायला निघतो.​—प्रे. कार्यं २१:१२.

९, १०. (क) सोरच्या बांधवांनी व्यक्‍त केलेली काळजी पाहून, पौलला कोणती घटना आठवली असावी? (ख) आज जगातल्या लोकांची मनोवृत्ती कशी आहे, आणि ती येशूच्या शब्दांच्या अगदी विरुद्ध कशी आहे?

बांधवांनी दाखवलेली काळजी पाहिल्यावर, पौलला कदाचित येशूसोबत घडलेली घटना आठवली असेल. येशूने जेव्हा आपल्याला यरुशलेमला जावं लागेल, दुःख सोसावं लागेल आणि ठार मारलं जाईल, हे शिष्यांना सांगितलं, तेव्हा त्यांनीही त्याला असंच अडवण्याचा प्रयत्न केला होता. भावनांच्या भरात पेत्र येशूला म्हणाला होता: “हे काय बोलतोस प्रभू? तुला नक्कीच असं काही होणार नाही.” पण येशू पेत्रला म्हणाला: “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! तू माझ्यासाठी अडखळण आहेस. कारण तुझे विचार देवाचे नाहीत तर माणसांचे आहेत.” (मत्त. १६:२१-२३) आपल्या जीवनाचं बलिदान दिलं जावं ही देवाची इच्छा आहे हे येशूला माहीत होतं. आणि ती पूर्ण करण्याचा त्याचा निश्‍चय होता. आता, पौललाही तसंच वाटत होतं. पेत्रप्रमाणेच सोरच्या बांधवांचा हेतू चांगला होता, पण देवाची इच्छा काय आहे हे त्यांनी ओळखलं नव्हतं.

येशूच्या शिष्यांनी आत्मत्यागी वृत्ती दाखवली पाहिजे

१० आज अनेक लोक असा मार्ग निवडतात जो त्यांना सोपा वाटतो. पण तो मार्ग नेहमीच योग्य नसतो. लोकांना सहसा असा धर्म हवा असतो जो सोयीचा आहे आणि ज्यात त्यांना जास्त कष्ट करावे लागणार नाहीत. याउलट येशूने आपल्या शिष्यांना फार वेगळी मनोवृत्ती ठेवण्याचा सल्ला दिला. तो त्यांना म्हणाला: “जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल, तर त्याने स्वतःला नाकारावं आणि आपला वधस्तंभ उचलून माझ्यामागे चालत राहावं.” (मत्त. १६:२४) येशूचं अनुकरण करणं हाच योग्य मार्ग आहे. पण हा मार्ग सोपा नाही.

११. सोरच्या बांधवांनी पौलवरचं प्रेम आणि त्याच्या सेवाकार्यासाठी पाठिंबा कसा व्यक्‍त केला?

११ लवकरच, पौल, लूक आणि इतरांची तिथून निघण्याची वेळ झाली. बांधवांनी त्यांना ज्या प्रकारे निरोप दिला त्याबद्दलचा अहवाल अगदी मनाला स्पर्श करणारा आहे. पुरुष, स्त्रिया आणि मुलं-बाळं पौलला सोडायला समुद्रकिनाऱ्‍यावर आली. त्या सर्वांनी गुडघे टेकून एकत्र प्रार्थना केली आणि मग पौलला निरोप दिला. सोरच्या बांधवांचं पौलवर किती प्रेम होतं हे यावरून दिसतं. तसंच, त्याच्या सेवाकार्याला त्यांचा पाठिंबा होता हेही दिसून येतं. यानंतर, पौल, लूक आणि त्यांचे साथीदार दुसऱ्‍या जहाजाने पतलमैस इथे गेले. पतलमैसला गेल्यावर ते तिथल्या बांधवांना भेटले आणि त्यांच्यासोबत एक दिवस राहिले.​—प्रे. कार्यं २१:५-७.

१२, १३. (क) विश्‍वासूपणे सेवा करत राहण्याबद्दल फिलिप्पने कोणतं चांगलं उदाहरण मांडलं होतं? (ख) आजच्या ख्रिस्ती कुटुंबांतल्या वडिलांसाठी फिलिप्प चांगलं उदाहरण कसा आहे?

१२ लूक पुढे म्हणतो, पौल आणि त्याचे साथीदार कैसरीयाला गेले. तिथे गेल्यावर ते “प्रचारक फिलिप्प” याच्या घरी गेले. a (प्रे. कार्यं २१:८) त्याला पाहून त्यांना नक्कीच खूप आनंद झाला असावा. २० वर्षांआधी प्रेषितांनी फिलिप्पला नवीनच स्थापन झालेल्या मंडळीत, जेवणाचं वाटप करण्याच्या कामात मदत करण्यासाठी नियुक्‍त केलं होतं. फिलिप्प अनेक वर्षांपासून एक आवेशी प्रचारक होता. छळामुळे जेव्हा शिष्य विखुरले गेले तेव्हा फिलिप्प शोमरोनला जाऊन प्रचार करू लागला, हे तुम्हाला आठवत असेल. त्यानंतर, त्याने कूशी षंढाला प्रचार केला आणि त्याला बाप्तिस्मा दिला. (प्रे. कार्यं ६:२-६; ८:४-१३, २६-३८) खरंच, विश्‍वासूपणे सेवा करत राहण्याचं फिलिप्पने किती चांगलं उदाहरण मांडलं होतं!

१३ सेवाकार्यात फिलिप्पचा आवेश कमी झाला नव्हता. तो आता कैसरीयामध्ये राहत होता आणि अजून प्रचारकार्यात व्यस्त होता. त्यामुळेच लूक त्याला “प्रचारक” म्हणतो. अहवालातून आपल्याला हेही कळतं, की त्याला चार मुली होत्या आणि त्या भविष्यवाणी करायच्या. यावरून हे दिसतं, की त्यांनी आपल्या वडिलांच्या उदाहरणाचं अनुकरण केलं. b (प्रे. कार्यं २१:९) फिलिप्पने आपल्या कुटुंबाचं यहोवासोबत नातं मजबूत करण्यासाठी खूप मेहनत केली असावी. आजच्या काळातही ख्रिस्ती कुटुंबातले वडील फिलिप्पचं अनुकरण करू शकतात. प्रचारकार्यात पुढाकार घेऊन ते आपल्या मुलांमध्ये या कार्याची आवड वाढवू शकतात.

१४. पौल बांधवांच्या घरी गेल्यामुळे काय झालं, आणि आजही आपल्याकडे कोणती संधी आहे?

१४ पौल ज्या-ज्या ठिकाणी गेला त्या-त्या ठिकाणी त्याने बांधवांना शोधलं आणि त्यांच्यासोबत वेळ घालवला. या मिशनरी बांधवाचा आणि त्याच्या साथीदारांचा पाहुणचार करायला ते बांधवही तितकेच उत्सुक असतील. अशा भेटींमुळे, त्यांना नक्कीच “एकमेकांना प्रोत्साहन देता” आलं. (रोम. १:११, १२) आजही आपल्याकडे अशीच संधी आहे. तुम्ही विभागीय पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नीला तुमच्या घरी राहायला बोलवू शकता. तुमचं घर लहान असलं तरी संकोच करू नका. कारण असं केल्यामुळे तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतील.​—रोम. १२:१३.

“मी . . . मरायलाही तयार आहे” (प्रे. कार्यं २१:१०-१४)

१५, १६. अगबने कोणता संदेश आणला, आणि ऐकणाऱ्‍यांवर त्याचा कसा परिणाम झाला?

१५ पौल फिलिप्पच्या घरी होता, तेव्हा तिथे आणखी एक महत्त्वाचा पाहुणा आला. तो म्हणजे अगब. अगब हा संदेष्टा आहे, हे फिलिप्पच्या घरी असलेल्या सर्वांना माहीत होतं. अगबने क्लौद्यच्या शासनकाळात एका मोठ्या दुष्काळाबद्दल भविष्यवाणी केली होती. (प्रे. कार्यं ११:२७, २८) घरात जमलेल्या सर्वांना प्रश्‍न पडला असेल: ‘अगब इथे का आला आहे? त्याने कोणता संदेश आणला असेल?’ ते सर्व त्याच्याकडे पाहत असताना त्याने पौलच्या कमरेचा पट्टा घेतला. या कापडाच्या पट्ट्यात सहसा पैसे आणि इतर वस्तू ठेवल्या जायच्या. अगबने त्या पट्ट्याने स्वतःचे हातपाय बांधले. मग त्याने एक गंभीर संदेश सांगितला. तो म्हणाला: “पवित्र शक्‍ती म्हणते: ‘हा पट्टा ज्या माणसाचा आहे, त्याला यरुशलेमचे यहुदी अशाच प्रकारे बांधून विदेशी लोकांच्या हवाली करतील.’”​—प्रे. कार्यं २१:११.

१६ पौल यरुशलेमला जाणार, हे या भविष्यवाणीमुळे निश्‍चित झालं. तिथे यहुद्यांना प्रचार केल्यामुळे त्याला “विदेशी लोकांच्या हवाली” करण्यात येईल हेही स्पष्ट झालं. ही भविष्यवाणी ऐकून ते सर्व थक्क झाले. लूकने लिहिलं: “हे ऐकल्यावर आम्हीच नाही, तर तिथे असलेले इतर जणही, पौलला वर यरुशलेमला न जाण्याची विनंती करू लागले. तेव्हा पौल म्हणाला: ‘तुम्ही असं रडून माझा निश्‍चय मोडायचा प्रयत्न का करता? मी तर, प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेममध्ये फक्‍त बंधनांत जायलाच नाही, तर मरायलाही तयार आहे.’”​—प्रे. कार्यं २१:१२, १३.

१७, १८. आपला निश्‍चय पक्का असल्याचं पौलने कसं दाखवलं, आणि त्याबद्दल बांधवांनी कशी प्रतिक्रिया दाखवली?

१७ फिलिप्पच्या घरी कसं वातावरण असेल याची कल्पना करा. लूक आणि इतर बांधव पौलला न जाण्याची विनंती करत आहेत. काही जण रडत आहेत. त्याच्याबद्दलची त्यांची काळजी पाहून पौल त्यांना प्रेमळपणे म्हणतो, “तुम्ही असं रडून माझा निश्‍चय मोडायचा प्रयत्न का करता?” किंवा काही भाषांतरांमध्ये म्हटल्याप्रमाणे “तुम्ही माझं मन का दुखवता?” पण, सोरच्या बांधवांना भेटल्यावर पौलचा निर्धार जसा पक्का होता, तसाच तो आताही आहे. विनंत्या आणि अश्रूंनी त्याचा विचार बदलणार नव्हता. याउलट, त्याने यरुशलेमला का गेलं पाहिजे हे तो त्यांना समजावून सांगतो. खरंच, पौलने किती धाडस आणि निश्‍चय दाखवला! येशूप्रमाणेच, त्यानेही यरुशलेमला जाण्याचा पक्का निर्धार केला होता. (इब्री १२:२) पौल आपल्या विश्‍वासासाठी शहीद होण्याचा प्रयत्न करत नव्हता. पण, तसं झालंच तर ख्रिस्त येशूचा शिष्य या नात्याने, त्याने तो एक बहुमान मानला असता.

१८ पौलच्या निश्‍चयाबद्दल बांधवांनी कशी प्रतिक्रिया दाखवली? थोडक्यात सांगायचं तर त्यांनी आदर दाखवला. अहवालात आपण वाचतो: “तो आपला विचार बदलायला तयार नाही, हे पाहून आम्ही त्याला अडवायचं सोडून दिलं आणि म्हणालो: ‘यहोवाच्या इच्छेप्रमाणे घडो.’” (प्रे. कार्यं २१:१४) जे बांधव पौलला यरुशलेमला जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनी पौलला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचा आग्रह केला नाही. त्यांनी पौलचं म्हणणं ऐकलं आणि ते मान्य केलं. त्यांच्यासाठी हे कठीण असलं, तरी त्यांनी यहोवाची इच्छा काय आहे हे ओळखून ती मान्य केली. पौलने असा मार्ग निवडला होता, ज्यामुळे त्याला मृत्यूचा सामना करावा लागणार होता. तेव्हा, त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला नसता, तर त्याच्यासाठी तो प्रवास सोपा ठरला असता.

१९. पौलसोबत जे घडलं त्यावरून आपण कोणता महत्त्वाचा धडा शिकू शिकतो?

१९ पौलसोबत जे घडलं त्यावरून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो: देवाची सेवा करण्यासाठी इतरांनी जर आत्मत्यागाची वृत्ती दाखवली, तर आपण त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत नाही. फक्‍त जीवन-मरणाचा प्रश्‍न असतो तेव्हाच नाही, तर इतर अनेक परिस्थितींमध्ये आपण हा धडा लागू करू शकतो. उदाहरणार्थ, अनेक ख्रिस्ती पालकांची मुलं यहोवाची सेवा करण्यासाठी दूरच्या देशात गेली आहेत. आपल्या मुलांना दूर जाताना पाहणं या पालकांसाठी फार कठीण असतं. पण ते आपल्या मुलांना अडवण्याचा प्रयत्न करत नाहीत. फिलिस ही इंग्लंडमध्ये राहणारी बहीण आपल्या अनुभवाबद्दल सांगते. तिच्या एकुलत्या एक मुलीने आफ्रिकेत जाऊन मिशनरी सेवा करण्याचं ठरवलं. फिलिस म्हणते, “त्या वेळी मी खूप भावुक झाले होते. माझी मुलगी माझ्यापासून इतकी दूर जाणार ही माझ्यासाठी कठीण गोष्ट होती. मला तिचा अभिमान तर वाटत होता, पण वाईटही वाटत होतं. म्हणून, मी या गोष्टीबद्दल खूप प्रार्थना केली. हा माझ्या मुलीचा स्वतःचा निर्णय होता आणि मी तो बदलण्याचा प्रयत्न केला नाही. कारण मीच तर तिला देवाच्या राज्याला पहिलं स्थान द्यायला शिकवलं होतं! तिने ३० वर्षं वेगवेगळ्या देशांत सेवा केली आहे. आणि तिच्या विश्‍वासूपणासाठी मी रोज यहोवाला धन्यवाद देते.” आपण आपल्या आत्मत्यागी बांधवांना प्रोत्साहन देणं ही खरंच किती चांगली गोष्ट आहे!

आत्मत्यागी वृत्ती दाखवणाऱ्‍या बांधवांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे

“बांधवांनी आमचं आनंदाने स्वागत केलं” (प्रे. कार्यं २१:१५-१७)

२०, २१. पौलला आपल्या बांधवांच्या सहवासात राहायला आवडायचं हे कशावरून दिसतं, आणि त्यामागचं कारण काय होतं?

२० पुढच्या प्रवासाची तयारी झाल्यावर पौल यरुशलेमला जायला निघाला. त्याचे साथीदारही त्याच्यासोबत निघाले. यावरून दिसतं की त्याच्या निर्णयाला त्यांचा पूर्ण पाठिंबा होता. यरुशलेमला जाताना प्रत्येक ठिकाणी पौल आणि त्याच्या साथीदारांनी ख्रिस्ती बांधवांना शोधून त्यांच्यासोबत वेळ घालवला. सोरमध्ये त्यांनी बांधवांना शोधलं होतं आणि त्यांच्यासोबत ते सात दिवस राहिले होते. पतलमैसमध्येही ते भाऊबहिणींना भेटून त्यांच्यासोबत एक दिवस राहिले होते. मग, कैसरीयामध्ये ते फिलिप्पच्या घरी बरेच दिवस राहिले होते. यानंतर, कैसरीयातल्या काही शिष्यांनी त्यांना यरुशलेमपर्यंत आणलं. तिथे ते सुरुवातीच्या शिष्यांपैकी असलेल्या मनासोनच्या घरी उतरले. शेवटी लूक म्हणतो, यरुशलेमला पोहोचल्यावर “बांधवांनी आमचं आनंदाने स्वागत केलं.”​—प्रे. कार्यं २१:१७.

२१ पौलला आपल्या बांधवांच्या सहवासात राहायला आवडायचं हे स्पष्टच आहे. कारण आज आपल्याप्रमाणेच, पौललाही या भाऊबहिणींकडून प्रोत्साहन मिळालं. या प्रोत्साहनामुळेच, त्याचा जीव घेऊ पाहणाऱ्‍या संतापलेल्या विरोधकांचा सामना करण्याचं बळ त्याला मिळालं.