अध्याय २१
“मी सगळ्या लोकांच्या रक्ताबद्दल निर्दोष आहे”
सेवाकार्यात पौलचा आवेश आणि त्याने वडिलांना दिलेला सल्ला
प्रे. कार्यं २०:१-३८ वर आधारित
१-३. (क) युतुखचा मृत्यू कसा झाला याचं वर्णन करा. (ख) पौलने काय केलं, आणि या घटनेमुळे आपण पौलबद्दल काय शिकू शकतो?
पौल आता त्रोवसमध्ये आहे. एका माडीवरच्या खोलीत खूप बांधव जमले आहेत. त्यांच्यासोबत पौलची ही शेवटची संध्याकाळ असल्यामुळे, तो त्यांच्याशी खूप वेळ बोलतो. आता मध्यरात्र उलटली आहे. खोलीत बरेच दिवे जळत असल्यामुळे उष्णता वाढली आहे आणि धूरही झाला आहे. युतुख नावाचा एक तरुण एका खिडकीवर बसला आहे. पौलचं भाषण चालू असताना, युतुखला डुलकी लागते आणि तो त्या तिसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली पडतो!
२ लूक वैद्य असल्यामुळे साहजिकच त्या तरुणाला काय झालं हे तपासण्यासाठी सर्वातआधी तो धाव घेतो. पण सर्वांनाच माहीत आहे की याचा काहीच उपयोग नाही. कारण युतुखला “उचलण्यात आलं तेव्हा तो मेला होता.” (प्रे. कार्यं २०:९) पण यानंतर एक चमत्कार होतो. पौल खाली वाकून युतुखला मिठी मारतो आणि बांधवांना म्हणतो: “गोंधळ घालू नका, कारण आता तो जिवंत आहे.” पौलने युतुखला पुन्हा जिवंत केलं!—प्रे. कार्यं २०:१०.
३ या घटनेतून देवाच्या पवित्र शक्तीचं सामर्थ्य दिसून येतं. युतुखच्या मृत्यूमागे पौलचा काहीच दोष नव्हता. पण या महत्त्वाच्या प्रसंगी अशी दुःखद घटना घडू नये अशी पौलची इच्छा होती. तसंच, ही घटना कोणासाठी अडखळण्याचं कारण बनू नये असंही त्याला वाटत होतं. युतुखला पुन्हा जिवंत करून पौलने तिथल्या बांधवांचं सांत्वन केलं आणि आवेशाने सेवाकार्य करत राहण्याचं त्यांना प्रोत्साहन दिलं. आपण दुसऱ्यांच्या जीवनासाठी जबाबदार आहोत असं पौलला वाटायचं, हे या घटनेवरून स्पष्ट होतं. यामुळे आपल्याला त्याच्या या शब्दांची आठवण होते: “मी सगळ्या लोकांच्या रक्ताबद्दल निर्दोष आहे.” (प्रे. कार्यं २०:२६) या बाबतीत पौलच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो ते आता पाहू या.
“तो मासेदोनियाला जायला निघाला” (प्रे. कार्यं २०:१, २)
४. पौलने कोणत्या कठीण प्रसंगाचा सामना केला होता?
४ आपण आधीच्या अध्यायात पाहिलं होतं, की पौलला एका खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला होता. इफिसमध्ये त्याच्या प्रचारकार्यामुळे बराच गोंधळ माजला होता. ज्या सोनारांचा व्यवसाय अर्तमी देवीच्या उपासनेवर अवलंबून होता, त्यांनी तिथे मोठी दंगल केली होती. प्रेषितांची कार्यं २०:१ इथे असं म्हटलं आहे, “गोंधळ शांत झाल्यावर पौलने शिष्यांना बोलावून त्यांना प्रोत्साहन दिलं. मग त्यांचा निरोप घेऊन तो मासेदोनियाला जायला निघाला.”
५, ६. (क) पौल मासेदोनियामध्ये किती काळ थांबला असावा, आणि त्याने तिथल्या बांधवांसाठी काय केलं? (ख) आपल्या बांधवांबद्दल पौलने कोणता दृष्टिकोन ठेवला?
५ मासेदोनियाला जाताना पौल काही काळ त्रोवसच्या बंदरात थांबला. त्याने तीत याला करिंथला पाठवलं होतं. तो परत येऊन त्याला त्रोवसला भेटेल असं पौलला वाटलं. (२ करिंथ. २:१२, १३) पण, तीत तिथे पोहोचू शकणार नाही हे त्याला कळल्यावर, पौल मासेदोनियाला गेला. तिथे कदाचित वर्षभर राहून पौलने “शिष्यांना बऱ्याच गोष्टी सांगून प्रोत्साहन दिलं.” a (प्रे. कार्यं २०:२) शेवटी, तीत त्याला मासेदोनियाला येऊन भेटला. पौलने करिंथच्या बांधवांना लिहिलेल्या पत्राला त्या बांधवांनी कसा चांगला प्रतिसाद दिला, हे तीतने पौलला सांगितलं. (२ करिंथ. ७:५-७) यामुळे पौलला आनंद झाला आणि त्याने त्यांना दुसरं पत्र लिहिलं. या पत्राला आता आपण ‘करिंथकर यांना दुसरं पत्र’ या नावाने ओळखतो.
६ पौलने इफिस आणि मासेदोनियाच्या बांधवांना ज्या भेटी दिल्या, त्यांबद्दल बोलताना लूक “प्रोत्साहन” हा शब्द वापरतो याकडे लक्ष द्या. आपल्या बांधवांबद्दल पौलचा किती चांगला दृष्टिकोन होता, हे आपल्याला या शब्दावरून समजतं. परूशी लोक इतरांकडे तुच्छ नजरेने पाहायचे. पण पौल बांधवांना आपले सहकारी समजायचा. (योहा. ७:४७-४९; १ करिंथ. ३:९) जेव्हा त्याला बांधवांना ताडन द्यावं लागायचं, तेव्हाही तो हाच दृष्टिकोन ठेवायचा.—२ करिंथ. २:४.
७. आज ख्रिस्ती मंडळीत देखरेख करणारे पौलचं अनुकरण कसं करू शकतात?
७ आज मंडळीतले वडील आणि विभागीय पर्यवेक्षक पौलचं अनुकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. एखाद्या बांधवाची चूक सुधारण्यासाठी त्याला सल्ला देतानाही, मदत करण्याचाच त्यांचा उद्देश असतो. देखरेख करणारे, बांधवांना दोषी ठरवण्याऐवजी त्यांची परिस्थिती समजून त्यांना प्रोत्साहन देण्याचाच प्रयत्न करतात. एका अनुभवी विभागीय पर्यवेक्षकाने असं म्हटलं: “आपल्या बहुतेक भाऊ-बहिणींची योग्य तेच करण्याची इच्छा असते. पण ते निराशा, भीती आणि निर्बलतेच्या भावनांशी लढत असतात.” देखरेख करणारे, अशा भावनांचा सामना करण्यासाठी या बांधवांना बळ देऊ शकतात.—इब्री १२:१२, १३.
“त्याच्याविरुद्ध कट” केला (प्रे. कार्यं २०:३, ४)
८, ९. (क) पौलने ठरवल्याप्रमाणे तो जहाजाने सीरियाला का जाऊ शकला नाही? (ख) यहुदी लोकांच्या मनात पौलबद्दल द्वेष का असावा?
८ पौल मासेदोनियाहून करिंथला गेला. b तिथे तीन महिने राहिल्यावर तो किंख्रिया इथे जायला उत्सुक होता. तिथून तो जहाजाने सीरियाला जाणार होता. सीरियाहून तो यरुशलेमला जाऊ शकला असता आणि तिथल्या गरीब बांधवांसाठी नेलेल्या देणग्या त्यांना देऊ शकला असता. c (प्रे. कार्यं २४:१७; रोम. १५:२५, २६) पण पौलने जे ठरवलं होतं त्यापेक्षा काही वेगळंच घडलं. प्रेषितांची कार्यं २०:३ यात म्हटलं आहे, “यहुद्यांनी त्याच्याविरुद्ध कट” केला!
९ यहुद्यांच्या मनात पौलबद्दल द्वेष असणं साहजिकच होतं, कारण त्यांच्या मते त्याने आपल्या धर्माचा त्याग केला होता. काही काळाआधी पौलने करिंथमध्ये प्रचार केल्यामुळे, तिथल्या सभास्थानाचा मुख्य अधिकारी क्रिस्प याने ख्रिस्ती विश्वास स्वीकारला होता. (प्रे. कार्यं १८:७, ८; १ करिंथ. १:१४) त्यानंतर, काही काळाने करिंथमधल्या यहुद्यांनी अखयाचा राज्यपाल गल्लियो याच्यासमोर पौलवर आरोप लावले होते. पण, गल्लियोने ते आरोप निराधार असल्यामुळे खटला रद्द केला होता. यामुळेही पौलचे शत्रू त्याच्यावर खूप संतापले होते. (प्रे. कार्यं १८:१२-१७) पौल लवकरच किंख्रिया इथून जहाजाने निघेल हे कदाचित करिंथच्या यहुद्यांना माहीत असावं किंवा त्यांनी तसा अंदाज बांधला असावा. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन त्याच्यावर हल्ला करण्याचा कट रचला. आता पौल काय करणार होता?
१०. पौल घाबरून किंख्रियाला जाण्याचं टाळत होता का? स्पष्ट करा.
१० स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि त्याच्याकडे सोपवण्यात आलेल्या देणग्या सुरक्षित ठेवण्यासाठी पौलने किंख्रिया इथून न जाता मासेदोनियाहून परत जाण्याचा निर्णय घेतला. खरंतर, पायी प्रवास करण्याचेही अनेक धोके होते. त्या काळात रस्त्याने प्रवास करताना लुटारूंची भीती असायची. तसंच, रस्त्यांवर असलेल्या धर्मशाळाही सुरक्षित नव्हत्या. पण किंख्रियाला गेल्यामुळे ज्या धोक्यांचा पौलला सामना करावा लागला असता, त्यांऐवजी रस्त्याने प्रवास करताना येणाऱ्या धोक्यांचा सामना करण्याचं त्याने ठरवलं. तरीसुद्धा, चांगली गोष्ट म्हणजे पौल एकटा प्रवास करणार नव्हता. त्याच्या मिशनरी दौऱ्याच्या या प्रवासात अरिस्तार्ख, गायस, सकूंद, सोपत्र, तीमथ्य, त्रफिम आणि तुखिक हे सर्व बांधव त्याच्यासोबत होते.—प्रे. कार्यं २०:३, ४.
११. आजचे ख्रिस्ती स्वतःच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावलं कशी उचलतात, आणि येशूने या बाबतीत कोणतं उदाहरण मांडलं?
११ पौलप्रमाणेच, आजच्या काळातले ख्रिस्तीही सेवाकार्य करताना स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेतात. काही क्षेत्रांमध्ये ते एकटे न जाता, गटांमध्ये किंवा जोडीने जातात. पण छळापासून ते स्वतःचं संरक्षण कसं करतात? कधी ना कधी छळाचा सामना करावाच लागेल हे ख्रिश्चनांना माहीत आहे. (योहा. १५:२०; २ तीम. ३:१२) पण, असं असलं तरी ते धोका असेल अशा ठिकाणी स्वतःहून जात नाहीत. येशूने काय केलं याचा विचार करा. एकदा यरुशलेममधले विरोधक त्याला मारण्यासाठी दगड उचलत असताना, “येशू लपला आणि मंदिराबाहेर निघून” गेला. (योहा. ८:५९) नंतर, आणखी एकदा यहुदी त्याला मारण्यासाठी कट रचत होते, तेव्हा “येशूने यहुद्यांच्या सार्वजनिक ठिकाणी जायचं सोडून दिलं. आणि तिथून निघून तो ओसाड रानाजवळच्या प्रदेशात” राहू लागला. (योहा. ११:५४) येशूने स्वतःच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावलं उचलली; पण देवाची त्याच्याबद्दल जी इच्छा होती, त्याच्या विरोधात न जाता त्याने असं केलं. आजही ख्रिस्ती येशूप्रमाणेच वागतात.—मत्त. १०:१६.
“त्यांना खूप सांत्वन मिळालं” (प्रे. कार्यं २०:५-१२)
१२, १३. (क) युतुखला पुन्हा जिवंत केल्यामुळे मंडळीतल्या बांधवांवर कोणता परिणाम झाला? (ख) ज्यांनी आपल्या जवळच्या लोकांना मृत्यूमुळे गमावलं आहे, त्यांना बायबलमधल्या कोणत्या आशेमुळे सांत्वन मिळतं?
१२ पौल आणि त्याच्या साथीदारांनी मासेदोनियापर्यंत एकत्र प्रवास केला. त्यानंतर ते वेगवेगळ्या मार्गांनी गेले असं दिसतं. मग ते त्रोवसमध्ये पुन्हा एकत्र आले असावेत. d अहवालात असं म्हटलं आहे: “आम्ही . . . पाच दिवसांत त्रोवसला त्यांच्याकडे आलो.” e (प्रे. कार्यं २०:६) या अध्यायाच्या सुरुवातीला आपण पाहिल्याप्रमाणे, त्रोवसमध्येच युतुख या तरुणाला पुन्हा जिवंत करण्यात आलं. युतुखला पुन्हा जिवंत झाल्याचं पाहून बांधवांना किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! अहवालात असं म्हटलं आहे, की “त्यांना खूप सांत्वन मिळालं.”—प्रे. कार्यं २०:१२.
१३ आजच्या काळात असे चमत्कार होत नाहीत हे खरं आहे. पण, ज्यांच्या जवळच्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यांना बायबलमधल्या पुनरुत्थानाच्या आशेमुळे “खूप सांत्वन” मिळतं. (योहा. ५:२८, २९) विचार करा: युतुख अपरिपूर्ण असल्यामुळे काही काळाने त्याला पुन्हा मरण आलं. (रोम. ६:२३) पण, देवाच्या नवीन जगात ज्यांचं पुनरुत्थान केलं जाईल, त्यांच्याकडे सर्वकाळ जगण्याची आशा असेल! तसंच, ज्यांचं येशूसोबत स्वर्गात राज्य करण्यासाठी पुनरुत्थान केलं जातं, त्यांना अमर जीवन मिळतं. (१ करिंथ. १५:५१-५३) आज अभिषिक्त जन आणि ‘दुसरी मेंढरं,’ अशा दोन्ही गटांच्या ख्रिश्चनांना भविष्याच्या आशेमुळे “खूप सांत्वन” मिळतं.—योहा. १०:१६.
पौल “सार्वजनिक रीत्या आणि घरोघरी” शिकवतो (प्रे. कार्यं २०:१३-२४)
१४. इफिसच्या मंडळीतले वडील मिलेतामध्ये आल्यावर पौल त्यांना काय म्हणाला?
१४ पौल आणि त्याच्यासोबत असलेले बांधव त्रोवसवरून अस्सा इथे गेले. तिथून त्यांनी मितुलेना, खिया, सामा आणि मिलेता इथपर्यंत प्रवास केला. पौलला पेन्टेकॉस्टच्या सणाआधी यरुशलेमला पोहोचायचं होतं. म्हणूनच त्याने परत जाताना, इफिसला न थांबणाऱ्या जहाजाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. पण, पौलला इफिसच्या मंडळीतल्या वडिलांशी बोलायचं होतं. त्यामुळे त्याने त्यांना मिलेता इथे भेटायला बोलवलं. (प्रे. कार्यं २०:१३-१७) ते आल्यावर तो त्यांना म्हणाला: “मी आशिया प्रांतात पाऊल ठेवलं त्या दिवसापासून तुमच्यामध्ये कसा राहिलो, हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. आणि यहुद्यांच्या कटांमुळे ओढवलेल्या परीक्षांना तोंड देत आणि अश्रू गाळत मी खूप नम्रपणे प्रभूची सेवा केली. शिवाय, तुमच्या हिताच्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला सांगण्यापासून, तसंच सार्वजनिक रीत्या आणि घरोघरी शिकवण्यापासून मी माघार घेतली नाही. पण पश्चात्ताप करून देवाकडे वळण्याबद्दल आणि आपल्या प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याबद्दल मी यहुदी आणि ग्रीक लोकांनासुद्धा अगदी पूर्णपणे साक्ष दिली.”—प्रे. कार्यं २०:१८-२१.
१५. घरोघरच्या प्रचारकार्याचे कोणते काही फायदे आहेत?
१५ आज लोकांपर्यंत आनंदाचा संदेश पोहोचवण्याचे अनेक मार्ग आहेत. पौलप्रमाणेच, आपणही लोक जिथे भेटतील तिथे जाण्याचा प्रयत्न करतो. जसं की, बस स्टॉप, गर्दी असलेले रस्ते किंवा बाजार. तरीही, घरोघरी प्रचार करणं हा यहोवाच्या साक्षीदारांचा प्रचार करण्याचा प्रमुख मार्ग आहे. का? याचं मुख्य कारण म्हणजे घरोघरच्या प्रचारकार्यामुळे सर्वांना वेळोवेळी राज्याचा संदेश ऐकण्याची चांगली संधी मिळते. तसंच, देव कोणासोबत पक्षपात करत नाही ही गोष्टही यामुळे सिद्ध होते. त्यासोबतच, घरोघरच्या प्रचारकार्यामुळे नम्र मनाच्या लोकांना त्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक मदत देता येते. शिवाय, हे कार्य करणाऱ्यांना स्वतःमध्ये विश्वास आणि धीर वाढवायला मदत होते. खरंच, “सार्वजनिक रीत्या आणि घरोघरी” शिकवण्यातला आवेश हे आजच्या खऱ्या ख्रिश्चनांचं ओळखचिन्ह आहे.
१६, १७. पौलने धाडसी असल्याचं कसं दाखवलं, आणि आज ख्रिस्ती त्याचं अनुकरण कसं करतात?
१६ यरुशलेमला गेल्यावर कोणत्या धोक्यांचा सामना करावा लागेल हे आपल्याला माहीत नाही, असं पौलने इफिसच्या मंडळीतल्या वडिलांना सांगितलं. तो त्यांना म्हणाला: “तरीसुद्धा, मी स्वतःच्या जिवाची जराही किंमत करत नाही. माझी फक्त इतकीच इच्छा आहे, की मी माझी धाव पूर्ण करावी. तसंच, मला प्रभू येशूकडून मिळालेलं सेवाकार्य मी पार पाडावं, म्हणजेच देवाच्या अपार कृपेबद्दल असलेल्या आनंदाच्या संदेशाची अगदी पूर्णपणे साक्ष द्यावी.” (प्रे. कार्यं २०:२४) कोणत्याही परिस्थितीत, म्हणजेच आजारपणाचा किंवा भयंकर विरोधाचा सामना करावा लागला तरीही पौलला धाडसाने आपली सेवा पूर्ण करायची होती.
१७ आजच्या काळातही ख्रिश्चनांना वेगवेगळ्या कठीण परिस्थितींचा सामना करावा लागतो. काहींना सरकारने आपल्या कामावर घातलेल्या बंदीचा किंवा छळाचा सामना करावा लागतो. तर इतर जण गंभीर शारीरिक किंवा मानसिक आजारांचा धैर्याने सामना करत आहेत. ख्रिस्ती मुलांना शाळांमध्ये सोबत्यांच्या दबावाला सामोरं जावं लागतं. यहोवाच्या साक्षीदारांसमोर अशा अनेक वेगवेगळ्या परिस्थिती येतात. तरीही पौलप्रमाणे, ते आपली सेवा करण्याचं सोडत नाहीत. “आनंदाच्या संदेशाची अगदी पूर्णपणे साक्ष” देण्याचा त्यांचा निश्चय अगदी पक्का आहे.
“स्वतःकडे आणि पूर्ण कळपाकडे लक्ष द्या” (प्रे. कार्यं २०:२५-३८)
१८. पौल सर्व लोकांच्या रक्ताबद्दल निर्दोष कसा राहिला, आणि सर्व लोकांच्या रक्ताबद्दल निर्दोष राहण्यासाठी इफिसच्या मंडळीतल्या वडिलांनी काय करायचं होतं?
१८ यानंतर पौलने स्वतःचं उदाहरण वापरून, इफिसच्या मंडळीतल्या वडिलांना एक स्पष्ट सल्ला दिला. सर्वातआधी त्याने त्यांना सांगितलं, की त्यांना भेटण्याची ही कदाचित त्याची शेवटची वेळ असेल. मग तो म्हणाला: “मी सगळ्या लोकांच्या रक्ताबद्दल निर्दोष आहे. कारण देवाच्या इच्छेबद्दल तुम्हाला सगळं काही सांगण्यापासून मी माघार घेतली नाही.” मग पौलप्रमाणेच, सर्व लोकांच्या रक्ताबद्दलनिर्दोष राहण्यासाठी या वडिलांनी काय करायचं होतं? पौलने त्यांना सांगितलं: “स्वतःकडे आणि पूर्ण कळपाकडे लक्ष द्या. कारण पवित्र शक्तीने तुम्हाला त्यांच्यावर देखरेख करणारे म्हणून नेमलंय. देवाने स्वतःच्या मुलाच्या रक्ताने विकत घेतलेल्या मंडळीची तुम्ही मेंढपाळांप्रमाणे काळजी घ्यावी, म्हणून तुम्हाला नेमण्यात आलंय.” (प्रे. कार्यं २०:२६-२८) मेंढरांमध्ये “क्रूर लांडगे” येतील आणि “शिष्यांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी चुकीच्या गोष्टी शिकवतील” याबद्दल त्याने त्यांना खबरदार केलं. मग, या वडिलांनी तेव्हा काय करायचं होतं? पौलने या गोष्टीचं उत्तर दिलं. तो म्हणाला: “सावध राहा आणि हे विसरू नका, की तीन वर्षं रात्रंदिवस अश्रू गाळत, मी तुमच्यापैकी प्रत्येकाला सल्ला द्यायचं सोडलं नाही.”—प्रे. कार्यं २०:२९-३१.
१९. पहिलं शतक संपेपर्यंत धर्मत्यागाला कशी सुरुवात झाली होती, आणि यामुळे पुढच्या शतकांमध्ये कोणते परिणाम झाले?
१९ पहिलं शतक संपेपर्यंत “क्रूर लांडगे” ख्रिस्ती मंडळीत आले होते. इ.स. ९८ मध्ये प्रेषित योहानने लिहिलं: “आतासुद्धा बरेच ख्रिस्तविरोधी आले आहेत . . . ते आपल्यातूनच बाहेर निघाले, पण ते आपल्यातले नव्हते. कारण जर ते आपल्यातले असते, तर ते आपल्यासोबत टिकून राहिले असते.” (१ योहा. २:१८, १९) तिसऱ्या शतकापर्यंत, धर्मत्यागामुळे ख्रिस्ती धर्मजगतात पाळक वर्गाची सुरुवात झाली होती. त्यानंतर, चौथ्या शतकात सम्राट कॉनस्टंटाईन याने भ्रष्ट झालेल्या या “ख्रिस्ती” धर्माला अधिकृत मान्यता दिली. खोट्या धर्मातल्या प्रथा स्वीकारून, त्यांना “ख्रिस्ती” असं नाव देणारे हे धर्मपुढारी खरंच “चुकीच्या गोष्टी” शिकवत होते. पहिल्या शतकातल्या या धर्मत्यागाचे परिणाम, ख्रिस्ती धर्मजगताच्या शिकवणी आणि प्रथा यांमध्ये आजही दिसतात.
२०, २१. पौलने आत्मत्यागी वृत्ती कशी दाखवली, आणि आज ख्रिस्ती वडील ती कशी दाखवतात?
२० पौलच्या काळानंतर आलेल्या खोट्या शिक्षकांनी मेंढरांचा फायदा घेतला. पण पौलचं जीवन त्यांच्यापेक्षा फार वेगळं होतं. बांधवांवर ओझं होऊ नये, म्हणून त्याने स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी कष्ट केले. त्याने बांधवांसाठी जे केलं त्यात स्वतःचा फायदा पाहिला नाही. पौलने इफिसच्या मंडळीतल्या वडिलांना अशीच आत्मत्यागी वृत्ती दाखवण्याचं प्रोत्साहन दिलं. तो त्यांना म्हणाला: “तुम्हीही असंच कष्ट करून दुर्बलांना मदत करावी. आणि प्रभू येशूचे हे शब्द नेहमी लक्षात ठेवावेत, की ‘घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.’”—प्रे. कार्यं २०:३५.
२१ पौलप्रमाणेच, ख्रिस्ती वडीलसुद्धा आज आत्मत्यागी वृत्ती दाखवतात. ते ख्रिस्ती धर्मजगतातल्या पाळकांप्रमाणे मेंढरांचा फायदा घेत नाहीत. ज्यांना कळपावर “देखरेख” करण्याची जबाबदारी दिली जाते, ते आपल्या जबाबदाऱ्या निःस्वार्थपणे पार पाडतात. गर्व आणि महत्त्वाकांक्षा यांना ख्रिस्ती मंडळीत स्थान नाही. कारण जे “स्वतःचा गौरव” करतात ते शेवटी अयशस्वी ठरतील. (नीति. २५:२७) गर्व केला तर अपमान ठरलेला आहे.—नीति. ११:२.
२२. इफिसच्या मंडळीतल्या वडिलांचं पौलवर प्रेम का होतं?
२२ पौलचं त्याच्या बांधवांवर खरं प्रेम होतं, त्यामुळे तेही पौलवर खूप प्रेम करायचे. जेव्हा त्याची तिथून निघण्याची वेळ झाली, “तेव्हा, ते सगळे खूप रडू लागले आणि पौलच्या गळ्यात पडून प्रेमाने त्याचे मुके घेऊ लागले.” (प्रे. कार्यं २०:३७, ३८) पौलप्रमाणे जे मेंढरांसाठी आत्मत्यागी वृत्ती दाखवतात, त्यांच्यावर ख्रिस्ती बांधवांचं मनापासून प्रेम असतं आणि ते त्यांची कदर करतात. “मी सगळ्या लोकांच्या रक्ताबद्दल निर्दोष आहे” असं जेव्हा पौल म्हणाला, तेव्हा तो बढाई मारत नव्हता किंवा अतिशयोक्ती करत नव्हता. पौलच्या उदाहरणाचं परीक्षण केल्यावर आपण सर्व जण ही गोष्ट नक्कीच मान्य करू.—प्रे. कार्यं २०:२६.
a “ मासेदोनियाहून लिहिलेली पौलची पत्रं” ही चौकट पाहा.
b या वेळी करिंथमध्ये असताना पौलने रोमकर यांना पत्र लिहिलं असावं.
c “ पौल गरीब बांधवांसाठी देणग्या आणतो” ही चौकट पाहा.
d प्रेषितांची कार्यं २०:५, ६ यातला अहवाल लिहिताना लूक पुन्हा स्वतःला त्यात सामील करतो. यावरून असं दिसतं, की तो पुन्हा पौलसोबत दौऱ्यात सामील झाला. तो काही काळापासून फिलिप्पैमध्येच होता.—प्रे. कार्यं १६:१०-१७, ४०.
e फिलिप्पैपासून त्रोवसपर्यंतचा प्रवास करायला पाच दिवस लागले. वारा विरुद्ध दिशेचा असल्यामुळे त्यांना इतका वेळ लागला असावा. कारण याआधी त्यांनी हाच प्रवास फक्त दोन दिवसांत केला होता.—प्रे. कार्यं १६:११.