व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय २

“तुम्ही . . . माझ्याबद्दल साक्ष द्याल”

“तुम्ही . . . माझ्याबद्दल साक्ष द्याल”

येशू आपल्या शिष्यांना प्रचारकार्यात पुढाकार घेण्यासाठी तयार करतो

प्रे. कार्यं १:१-२६ वर आधारित

१-३. येशू त्याच्या प्रेषितांचा निरोप कसा घेतो आणि आपल्यापुढे कोणते प्रश्‍न उभे राहतात?

 प्रेषितांसाठी गेले काही आठवडे फार रोमांचकारी होते. येशूच्या मृत्यूमुळे जरी ते खूप दुःखी झाले होते, तरी त्याचं पुनरुत्थान झाल्याचं पाहिल्यावर त्यांच्या आनंदाला सीमा नव्हती. खरंतर हे दिवस कधीच संपू नयेत असं त्यांना वाटत आहे. गेल्या ४० दिवसांत येशू कितीतरी वेळा त्यांच्यासमोर प्रकट झाला होता आणि त्याने त्यांना आणखी शिकवून प्रोत्साहन दिलं होतं. पण आज मात्र त्यांच्यासमोर प्रकट होण्याची त्याची शेवटची वेळ आहे.

जैतुनांच्या डोंगरावर उभे राहून प्रेषित, येशूचा प्रत्येक शब्द अगदी मन लावून ऐकत आहेत. त्याचं बोलणं आपण असंच ऐकत राहावं असं त्यांना वाटत आहे. पण त्याचं बोलणं संपतं आणि तो हात उंचावून त्यांना आशीर्वाद देतो. मग तो पृथ्वीवरून आकाशाकडे जाऊ लागतो तेव्हा त्याचे प्रेषित त्याच्याकडे एकटक बघत राहतात. शेवटी तो एका ढगाच्या आड दिसेनासा होतो. तो अदृश्‍य झाल्यावरही ते आकाशाकडे पाहत तसेच उभे राहतात.​—लूक २४:५०; प्रे. कार्यं १:९, १०.

या घटनेनंतर येशूच्या प्रेषितांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. त्यांचा प्रभू स्वर्गात गेला आहे. मग आता ते काय करतील? त्यांच्या प्रभूने सुरू केलेलं काम पुढे चालू ठेवण्यासाठी, त्याने त्यांना आधीच तयार केलं होतं यात शंका नाही. पण या महत्त्वाच्या कामगिरीसाठी त्याने त्यांना कसं तयार केलं? आणि त्याच्या प्रेषितांनी कशी मनोवृत्ती दाखवली? आजच्या ख्रिश्‍चनांवर याचा कसा प्रभाव होतो? प्रेषितांची कार्यं याच्या पहिल्या अध्यायात आपल्याला या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरं मिळतात.

“पुष्कळ खातरीलायक” पुरावे (प्रे. कार्यं १:१-५)

४. लूक, प्रेषितांची कार्यं या पुस्तकातल्या अहवालाची सुरुवात कशी करतो?

लूक, प्रेषितांची कार्यं पुस्तकातल्या अहवालाची सुरुवात थियफील याला उद्देशून करतो. त्याने त्याचं आनंदाच्या संदेशाचं पुस्तकही थियफील यालाच उद्देशून लिहिलं होतं. a या अहवालाच्या सुरवातीला लूक, आनंदाच्या संदेशाच्या पुस्तकातल्या शेवटच्या काही घटनांचा सारांश देतो. यामुळे हे स्पष्ट होतं, की हा अहवाल आनंदाच्या संदेशाच्या वृत्तान्ताचा पुढचा भाग आहे. पण या वेळी तो त्या घटना वेगळ्या शब्दांत सांगतो आणि त्यांबद्दल आणखी माहितीही देतो.

५, ६. (क) येशूच्या शिष्यांचा विश्‍वास कशामुळे मजबूत होणार होता? (ख) आजच्या ख्रिश्‍चनांचा विश्‍वास “पुष्कळ खातरीलायक” पुराव्यांवर आधारित आहे असं का म्हणता येईल?

येशूच्या शिष्यांचा विश्‍वास कशामुळे मजबूत होणार होता? प्रेषितांची कार्यं १:३ मध्ये आपण येशूबद्दल असं वाचतो, “आपण पुन्हा जिवंत झालो आहोत हे त्याने पुष्कळ खातरीलायक पुराव्यांच्या मदतीने आपल्या शिष्यांना दाखवलं.” लूक ज्याला “सगळ्यांचा लाडका वैद्य” म्हणण्यात आलं आहे, फक्‍त त्यानेच ‘खातरीलायक पुरावे’ या अर्थाचा शब्द बायबलमध्ये वापरला आहे. (कलस्सै. ४:१४) हा शब्द सहसा वैद्यकीय लिखाणांमध्ये वापरला जायचा. याचा अर्थ, असा पुरावा जो एखादी गोष्ट स्पष्टपणे दाखवतो, जो निष्कर्षापर्यंत पोचायला मदत करतो आणि जो भरवशालायक असतो. येशूने असाच पुरावा दिला होता. तो आपल्या शिष्यांसमोर अनेकदा प्रकट झाला. तो कधी एका-दोघांना तर कधी सगळ्या प्रेषितांना दिसला. एकदा तर तो ५०० पेक्षा जास्त शिष्यांना दिसला. (१ करिंथ. १५:३-६) खरंच, हे खातरीलायक पुरावे नव्हते का?

आजच्या खऱ्‍या ख्रिश्‍चनांचा विश्‍वासही अशाच “पुष्कळ खातरीलायक” पुराव्यांवर आधारित आहे. येशू या पृथ्वीवर खरोखरच जगला का? आपल्या पापांसाठी त्याने स्वतःच्या जीवनाचं बलिदान दिलं का? त्याचं पुनरुत्थान झालं का? हे सर्व घडलं याला पुरावा आहे का? नक्कीच आहे. देवाच्या प्रेरित वचनात, अनेकांनी या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी घडताना पाहिल्याचे उल्लेख आहेत. असे अनेक भरवशालायक पुरावे आपल्याला बायबलमध्ये सापडतात. या अहवालांचा आपण प्रार्थनापूर्वक अभ्यास केला तर आपला विश्‍वास नक्कीच मजबूत होईल. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की भक्कम पुरावा नसला तर एखाद्याचा विश्‍वास, हा खरा विश्‍वास नसून फक्‍त अंधविश्‍वास असेल. आणि सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी खरा विश्‍वास असणं गरजेचं आहे.​—योहा. ३:१६.

७. प्रचारकार्यात आणि शिकवण्याच्या कार्यात येशूने आपल्या शिष्यांसमोर कोणतं उदाहरण ठेवलं?

येशूने आणखी कोणत्या मार्गाने खातरीलायक पुरावा दिला? आपल्या शिष्यांसमोर प्रकट होण्यासोबतच तो “त्यांच्याशी देवाच्या राज्याबद्दल बोलत राहिला.” उदाहरणार्थ, मसीहाला दुःख सहन करून मरावं लागेल हे सांगणाऱ्‍या भविष्यवाण्यांचा अर्थ त्याने त्यांना समजावून सांगितला. (लूक २४:१३-३२, ४६, ४७) मसीहा म्हणून आपण काय करणार आहोत याविषयी सांगताना येशू नेहमी देवाच्या राज्याकडे शिष्यांचं लक्ष वेधायचा. तो देवाच्या येणाऱ्‍या राज्याचा नियुक्‍त राजा होता. देवाचं राज्य हाच नेहमी येशूच्या प्रचार कार्याचा मुख्य विषय होता आणि आजही त्याचे शिष्य देवाच्या राज्याविषयीच प्रचार करतात.​—मत्त. २४:१४; लूक ४:४३.

“पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत” (प्रे. कार्यं १:६-१२)

८, ९. (क) येशूच्या प्रेषितांचे कोणते दोन गैरसमज होते? (ख) येशूने त्यांचे गैरसमज कसे सुधारले आणि त्यामुळे आज देवाच्या सेवकांना कोणता धडा शिकायला मिळतो?

प्रेषित जेव्हा जैतुनांच्या डोंगरावर एकत्र आले, तेव्हा येशूला भेटण्याची ती त्यांची शेवटची वेळ होती. त्यांनी उत्सुकतेने त्याला विचारलं, “प्रभू, तू आताच इस्राएलच्या राज्याची परत स्थापना करणार आहेस का?” (प्रे. कार्यं १:६) त्यांच्या या प्रश्‍नातून त्यांचे दोन चुकीचे समज दिसून आले. पहिला म्हणजे, जन्माने इस्राएली असलेल्या लोकांना देवाचं राज्य मिळेल. आणि दुसरा म्हणजे, देवाने वचन दिलेलं त्याचं राज्य “आताच” म्हणजे लगेच सुरू होईल. येशूने त्यांना त्यांची समज सुधारायला कशी मदत केली?

येशूला कदाचित हे माहीत होतं की त्यांचा पहिला गैरसमज लवकरच दूर होईल. कारण त्याचे शिष्य लवकरच म्हणजे फक्‍त दहा दिवसांतच आध्यात्मिक इस्राएल राष्ट्राची स्थापना होताना पाहणार होते. जन्माने इस्राएली असलेल्या लोकांचा, देव लवकरच त्याग करणार होता. त्यांचा जो दुसरा गैरसमज होता, त्याबद्दल येशूने त्यांना प्रेमळपणे अशी आठवण करून दिली, की “जे काळ आणि नेमलेले दिवस पित्याने आपल्या इच्छेप्रमाणे ठरवले आहेत, ते तुम्ही जाणून घेऊ शकत नाही.” (प्रे. कार्यं १:७) यहोवा हा अचूक वेळ पाळणारा देव आहे. येशू त्याच्या मृत्यूपूर्वी असं म्हणाला होता, की अंत कधी येईल हे मुलाला म्हणजेच त्यालासुद्धा माहीत नव्हतं. कारण “त्या दिवसाबद्दल आणि त्या वेळेबद्दल” फक्‍त पित्यालाच माहीत होतं. (मत्त. २४:३६) आजही देवाचे सेवक या जगाचा अंत कधी येईल याविषयी जर जास्त चिंता करत असतील, तर ते अशा गोष्टीविषयी चिंता करत आहेत जी त्यांच्या हातात नाही.

१०. प्रेषितांप्रमाणेच आपणही कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे, आणि का?

१० येशूच्या प्रेषितांचा जरी गैरसमज झाला असला, तरी त्यांचा विश्‍वास दृढ होता. खरंतर, आपल्याला त्यांच्याबद्दल आदर वाटला पाहिजे. कारण त्यांनी नम्रपणे आपली चूक सुधारली. जरी त्यांची विचार करण्याची पद्धत चुकीची असली, तरी त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नातून त्यांची चांगली मनोवृत्तीही दिसून येते. येशूने नेहमीच आपल्या शिष्यांना “सतत जागे राहा” असं सांगितलं होतं. (मत्त. २४:४२; २५:१३; २६:४१) त्यामुळे येशूचे हे शिष्य आध्यात्मिक रितीने जागे होते; यहोवा लवकरच कार्य करणार आहे याचा पुरावा पाहण्यासाठी ते आतुर होते. आपणही आज अशाच प्रकारचा दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खरंतर या “शेवटच्या दिवसांत” असं करणं आणखीनच गरजेचं आहे, कारण आता अंत खूप जवळ आला आहे.​—२ तीम. ३:१-५.

११, १२. (क) येशूने आपल्या शिष्यांवर कोणती कामगिरी सोपवली? (ख) येशूने प्रचाराची कामगिरी सोपवताना केलेला पवित्र शक्‍तीचा उल्लेख योग्य का होता?

११ येशूने त्याच्या प्रेषितांना आठवण करून दिली की त्यांनी खरंतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार केला पाहिजे. तो म्हणाला: “पवित्र शक्‍ती तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल आणि तुम्ही यरुशलेममध्ये, संपूर्ण यहूदीयामध्ये आणि शोमरोनमध्ये, तसंच पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत माझ्याबद्दल साक्ष द्याल.” (प्रे. कार्यं १:८) यरुशलेममध्ये म्हणजे जिथे लोकांनी येशूला मृत्युदंडाची शिक्षा दिली होती, तिथेच सर्वात आधी त्याच्या पुनरुत्थानाच्या बातमीची घोषणा केली जाणार होती. त्यानंतर हा संदेश इतर ठिकाणी म्हणजेच संपूर्ण यहूदीयात, मग शोमरोनात आणि मग दूर-दूरच्या क्षेत्रांत पोहोचवण्यात येणार होता.

१२ म्हणूनच, येशूने त्यांच्यावर प्रचाराची कामगिरी सोपवण्याच्या आधी त्यांना मदत करण्यासाठी पवित्र शक्‍ती पाठवण्याचं पुन्हा वचन दिलं. प्रेषितांची कार्यं पुस्तकात, “पवित्र शक्‍ती” या शब्दाचा ४० पेक्षा जास्त वेळा उल्लेख येतो. बायबलचं हे पुस्तक आपल्याला पुन्हा-पुन्हा या गोष्टीची स्पष्टपणे जाणीव करून देतं, की आपण यहोवाची इच्छा त्याच्या पवित्र शक्‍तीच्या मदतीशिवाय पूर्ण करू शकत नाही. म्हणूनच आपण त्याची पवित्र शक्‍ती मिळण्यासाठी सतत प्रार्थना करत राहणं फार महत्त्वाचं आहे. (लूक ११:१३) पूर्वी कधी नव्हती इतकी आज आपल्याला पवित्र शक्‍तीची गरज आहे!

१३. देवाच्या लोकांना आज प्रचाराचं कार्य किती मोठ्या प्रमाणावर करायचं आहे, आणि आपण ते मनापासून का केलं पाहिजे?

१३ “पृथ्वीच्या कानाकोपऱ्‍यांपर्यंत” या शब्दांचा अर्थ आज फार बदलला आहे. पण सुरुवातीच्या अध्यायात आपण पाहिल्याप्रमाणे यहोवाचे साक्षीदार त्यांना दिलेलं साक्षकार्य अगदी मनापासून करत आहेत. कारण त्यांना माहीत आहे, की सर्व प्रकारच्या लोकांनी देवाच्या राज्याविषयीचा आनंदाचा संदेश ऐकावा अशी देवाची इच्छा आहे. (१ तीम. २:३, ४) लोकांचं जीवन वाचवण्याच्या या कार्यात तुम्ही मनापासून भाग घेत आहात का? यापेक्षा जास्त समाधान देणारं दुसरं कोणतंच काम असू शकत नाही! हे कार्य करण्यासाठी लागणारी शक्‍ती यहोवा तुम्हाला देईल. या कामात यशस्वी होण्यासाठी कोणत्या पद्धती योग्य आहेत आणि त्यासाठी तुम्ही कसा दृष्टिकोन ठेवला पाहिजे, याबद्दल तुम्हाला प्रेषितांची कार्यं या पुस्तकातून बरंच काही शिकायला मिळेल.

१४, १५. (क) स्वर्गदूतांनी येशूच्या परत येण्याबद्दल काय म्हटलं, आणि त्यांच्या बोलण्याचा काय अर्थ होता? (तळटीपही पाहा.) (ख) येशू स्वर्गात गेला “त्याच पद्धतीने” परत कसा आला?

१४ या अध्यायाच्या सुरुवातीला आपण पाहिलं, की येशू पृथ्वीवरून आकाशात गेला आणि दिसेनासा झाला. तरीही ते ११ प्रेषित आकाशाकडे एकटक बघत राहिले. शेवटी दोन स्वर्गदूत तिथे आले आणि त्यांनी त्यांना समजावलं: “गालीलच्या माणसांनो, तुम्ही आकाशाकडे पाहत का उभे राहिलात? हा येशू, जो तुमच्यामधून वर आकाशात घेतला गेलाय, तो ज्या पद्धतीने तुम्हाला आकाशात जाताना दिसला, त्याच पद्धतीने परत येईल.” (प्रे. कार्यं १:११) येशू त्याच शरीरात परत येईल असं त्या स्वर्गदूतांना म्हणायचं होतं का? काही ख्रिस्ती पंथांत असंच शिकवलं जातं. पण त्या स्वर्गदूतांच्या बोलण्याचा हा अर्थ नव्हता. आपण असं का म्हणू शकतो?

१५ ते स्वर्गदूत म्हणाले की, येशू परत येईल पण त्याच स्वरूपात नव्हे तर “त्याच पद्धतीने.” b मग येशू कोणत्या पद्धतीने गेला होता? स्वर्गदूत प्रेषितांशी येऊन बोलले तोपर्यंत येशू अदृश्‍य झाला होता. तिथे असलेल्या फक्‍त थोड्याच लोकांना, म्हणजेच प्रेषितांना हे समजलं की येशू आता पृथ्वीवरून स्वर्गात आपल्या पित्याजवळ जात आहे. परत येतानाही येशू याच पद्धतीने येणार होता आणि तसंच घडलं. आज ज्यांना आध्यात्मिक गोष्टींची समज आहे, फक्‍त त्यांनाच या गोष्टीची जाणीव आहे की येशू राजा म्हणून राज्य करत आहे. (लूक १७:२०) येशूच्या उपस्थितीचा पुरावा आपण जाणून घेतला पाहिजे आणि त्याबद्दल इतरांनाही सांगितलं पाहिजे. असं केलं तरच त्यांना हे कळेल की आज अंत किती जवळ आहे.

“तू कोणाला निवडलं आहेस ते आम्हाला दाखव” (प्रे. कार्यं १:१३-२६)

१६-१८. (क) प्रेषितांची कार्यं १:१३, १४ या वचनांमधून ख्रिस्ती सभांबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं? (ख) येशूची आई मरीया हिच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो? (ग) आज ख्रिस्ती सभा इतक्या महत्त्वाच्या का आहेत?

१६ साहजिकच प्रेषित “खूप आनंदाने यरुशलेमला परत गेले.” (लूक २४:५२) पण येशूने दिलेल्या मार्गदर्शनाचं आणि सूचनांचं त्यांनी खरंच पालन केलं का? आपण प्रेषितांची कार्यं या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाच्या १३ व्या आणि १४ व्या वचनांमध्ये वाचतो, की ते “माडीवरच्या खोलीत” एकत्र जमले होते. त्या काळातल्या अशा सभांबद्दल आपल्याला काही विशेष माहिती मिळते. पूर्वी पॅलेस्टाईनमध्ये घराच्या माडीवर सहसा अशी खोली असायची आणि त्या खोलीत जाण्यासाठी घराबाहेरून जिना असायचा. प्रेषितांची कार्यं १२:१२ यात असं सांगितलं आहे, की मार्कच्या आईच्या घरी भाऊबहिणी उपासनेसाठी एकत्र यायचे. मग वरच्या वचनांमध्ये ज्या ‘माडीवरच्या खोलीचा’ उल्लेख केला आहे, ती कदाचित याच घरावर असावी का? हे तर खातरीने सांगता येणार नाही, पण नक्कीच ही एक साधीशी खोली असेल, जिथे ख्रिस्ताचे शिष्य एकत्र जमायचे. मग त्या दिवशी या खोलीमध्ये कोण जमले होते आणि त्यांनी काय केलं?

१७ लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे या सभेत फक्‍त प्रेषित किंवा पुरुष जमले नव्हते. तर, ‘काही स्त्रियाही’ तिथे होत्या. त्यांच्यामध्ये येशूची आई मरीयासुद्धा होती. बायबलमध्ये हा तिच्या नावाचा शेवटचा उल्लेख आहे. ती कोणत्याही प्रकारचा मोठेपणा न दाखवता, तिच्या स्वभावाप्रमाणेच अगदी नम्रपणे इतर आध्यात्मिक भाऊबहिणींसोबत उपासनेसाठी तिथे आली होती. तिची आणखी चार मुलं, ज्यांनी येशू जिवंत असताना त्याच्यावर विश्‍वास ठेवला नव्हता, तीसुद्धा तिच्यासोबत होती. या गोष्टीचं मरीयाला किती समाधान वाटलं असेल! (मत्त. १३:५५; योहा. ७:५) त्यांच्या भावाचा मृत्यू आणि त्यानंतर त्याचं पुनरुत्थान झाल्यावर ते फार बदलले होते.​—१ करिंथ. १५:७.

१८ शिष्य कशासाठी जमले होते याकडेही लक्ष द्या: “ते सगळे सतत एकदिलाने प्रार्थना करत” होते. (प्रे. कार्यं १:१४) एकत्र जमणं हा पूर्वीपासूनच ख्रिस्ती उपासनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी, मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाऊबहिणींसोबत मिळून आपला स्वर्गातला पिता, यहोवा याची उपासना करण्यासाठी सभांमध्ये एकत्र जमतो. अशा वेळी आपण जेव्हा प्रार्थना करतो आणि त्याच्या स्तुतीसाठी गीतं गातो, तेव्हा यहोवाला आनंद होतो आणि यामुळे आपल्यालाही फायदा होतो. अशा पवित्र आणि प्रोत्साहन देणाऱ्‍या सभांना नेहमी उपस्थित राहण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करू या!​—इब्री १०:२४, २५.

१९-२१. (क) मंडळीत पेत्रने जो पुढाकार घेतला त्यावरून आपण काय शिकतो? (ख) यहूदाच्या ऐवजी नवीन प्रेषित निवडण्याची गरज का होती, आणि ज्या प्रकारे हा प्रश्‍न सोडवण्यात आला त्यावरून आपण काय शिकतो?

१९ आता ख्रिस्ताच्या शिष्यांसमोर एक महत्त्वाचा प्रश्‍न होता आणि तो सोडवण्यासाठी प्रेषित पेत्रने पुढाकार घेतला. (वचनं १५-२६) काही आठवड्यांपूर्वीच पेत्रने तीन वेळा आपल्या प्रभूला नाकारलं होतं. पण आता त्याच्यामध्ये किती मोठा बदल झाला होता हे पाहून आपल्याला खूप दिलासा मिळतो. (मार्क १४:७२) पेत्रच्या उदाहरणातून आपण हेच शिकतो की आपल्या सर्वांकडून पाप होऊ शकतं; पण यहोवा “चांगला आणि क्षमाशील” आहे आणि तो मनापासून पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना क्षमा करतो.​—स्तो. ८६:५.

२० पेत्रला ही जाणीव झाली की यहूदा, ज्याने येशूचा विश्‍वासघात केला होता, त्याच्याऐवजी त्यांनी एका नवीन प्रेषिताला निवडायला हवं. पण नक्की कोणाला? हा नवीन प्रेषित असा हवा होता, जो येशूने पृथ्वीवर केलेल्या सेवाकार्याच्या वेळी त्याच्यासोबत होता आणि ज्याने त्याचं पुनरुत्थानही पाहिलं होतं. (प्रे. कार्यं १:२१, २२) हे येशूने दिलेल्या या वचनाप्रमाणेच होतं: “माझ्यामागे आलेले तुम्ही, १२ राजासनांवर बसून इस्राएलच्या १२ वंशांचा न्याय कराल.” (मत्त. १९:२८) कदाचित यहोवाने असं ठरवलं असावं, की येशूच्या पृथ्वीवरच्या सेवाकार्यात त्याच्यासोबत असलेले १२ प्रेषित, पुढे जाऊन नव्या यरुशलेमच्या भिंतीचा “१२ दगडांचा” पाया ठरतील. (प्रकटी. २१:२, १४) अशा प्रकारे, “देखरेख करण्याची त्याची जबाबदारी दुसऱ्‍याला मिळो” ही भविष्यवाणी यहूदावर पूर्ण होते, हे देवाने पेत्रला समजायला मदत केली.​—स्तो. १०९:८.

२१ नवीन प्रेषिताला कशा प्रकारे निवडण्यात आलं? चिठ्ठ्या टाकून. बायबलच्या काळात ही पद्धत सहसा वापरली जायची. (नीति. १६:३३) पण बायबलमध्ये, चिठ्ठ्या टाकून निवड करण्याचा हा शेवटचा उल्लेख आहे. काही काळाने शिष्यांवर पवित्र शक्‍ती आल्यानंतर ही पद्धत बंद झाली असावी. पण चिठ्ठ्या का टाकण्यात आल्या हे आपण पाहू या. प्रेषितांनी अशी प्रार्थना केली: “हे यहोवा, तू सगळ्यांची मनं जाणतोस. तेव्हा यांपैकी तू कोणाला निवडलं आहेस ते आम्हाला दाखव.” (प्रे. कार्यं १:२३, २४) ही निवड यहोवाने करावी अशी त्यांची इच्छा होती. आणि मत्थियाची निवड करण्यात आली. येशूने ज्या ७० शिष्यांना प्रचार करण्यासाठी पाठवलं होतं, त्यांच्यापैकी तो कदाचित एक असावा. अशा प्रकारे मत्थिया “१२” प्रेषितांपैकी एक बनला. c​—प्रे. कार्यं ६:२.

२२, २३. आपण मंडळीत देखरेख करणाऱ्‍यांच्या अधीन राहून त्यांच्या सूचनांचं पालन का केलं पाहिजे?

२२ देवाच्या लोकांनी संघटितपणे काम करणं किती महत्त्वाचं आहे, हे या घटनेवरून आपल्याला कळतं. आजही मंडळ्यांमध्ये देखरेख करण्यासाठी जबाबदार बांधवांना निवडलं जातं. या बांधवांना निवडताना वडील, देखरेख करणाऱ्‍यांसाठी बायबलमध्ये दिलेल्या पात्रतांचा काळजीपूर्वक विचार करतात. तसंच ते पवित्र शक्‍तीच्या मार्गदर्शनासाठी प्रार्थनाही करतात. त्यामुळे मंडळीतल्या सर्वांना याची जाणीव असते की या बांधवांना पवित्र शक्‍तीने नियुक्‍त केलं आहे. म्हणूनच, आपण या बांधवांच्या अधीन राहून आणि त्यांच्या सूचनांचं पालन करून मंडळीमध्ये एकमेकांना साहाय्य करण्याची भावना वाढवायला मदत करतो.​—इब्री १३:१७.

आपण मंडळीतल्या नियुक्‍त बांधवांच्या अधीन राहून त्यांच्या सूचनांचं पालन करतो

२३ येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर त्याला प्रत्यक्ष पाहिल्यामुळे शिष्यांना आता खूप धीर मिळाला आहे. तसंच, मंडळीमध्ये देखरेख करण्याच्या व्यवस्थेत झालेल्या सुधारणेमुळेही शिष्यांना प्रोत्साहन मिळालं आहे. आता ते लवकरच घडणार असलेल्या एका अतिशय महत्त्वाच्या घटनेसाठी पूर्णपणे तयार आहेत. या घटनेविषयी, आपण पुढच्या अध्यायात चर्चा करणार आहोत.

a लूकच्या आनंदाच्या संदेशाच्या पुस्तकात, लूक या व्यक्‍तीला “हे आदरणीय थियफील” असं म्हणतो. यावरून असं दिसतं की ही एखादी प्रतिष्ठित व्यक्‍ती असावी, जिने अजून ख्रिस्ती विश्‍वास स्वीकारला नव्हता. (लूक १:१) पण प्रेषितांची कार्यं या पुस्तकात मात्र लूक त्याला फक्‍त “हे थियफील” असं म्हणतो. काही जाणकार असं म्हणतात, की लूकचं आनंदाच्या संदेशाचं पुस्तक वाचल्यानंतर थियफीलने ख्रिस्ती विश्‍वास स्वीकारला असावा. म्हणून लूक त्याला एका प्रतिष्ठित व्यक्‍तीप्रमाणे नाही, तर एका ख्रिस्ती बांधवाप्रमाणे उद्देशून लिहितो.

b या ठिकाणी बायबलमध्ये मोरफी  म्हणजेच “स्वरूप” या अर्थाचा ग्रीक शब्द वापरण्यात आलेला नाही, तर ट्रोपोस  म्हणजेच “पद्धत” हा शब्द वापरण्यात आला आहे.

c पौललाही नंतर “प्रेषित म्हणून विदेशी लोकांकडे” पाठवण्यात आलं, पण त्याला कधीच १२ प्रेषितांपैकी एक मोजण्यात आलं नाही. (रोम. ११:१३; १ करिंथ. १५:४-८) तो त्या खास बहुमानासाठी पात्र नव्हता, कारण येशूच्या पृथ्वीवरच्या सेवाकार्यात तो त्याच्यासोबत नव्हता.