अध्याय ९
“देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही”
सुंता न झालेल्या विदेश्यांना प्रचार करण्याची सुरुवात
प्रे. कार्यं १०:१–११:३० वर आधारित
१-३. पेत्रला कोणता दृष्टान्त दिसला, आणि आपण त्याचा अर्थ का समजून घेतला पाहिजे?
इ.स. ३६ चं वर्ष. यापो या बंदर शहरात, समुद्राजवळ असलेल्या एका घराच्या गच्चीवर, पेत्र दुपारच्या उन्हात प्रार्थना करत आहे. काही दिवसांपासून तो याच घरी पाहुणा म्हणून राहत आहे. हे घर शिमोनचं आहे. शिमोन चामड्याचा व्यवसाय करतो आणि त्यामुळे सहसा कोणताच यहुदी त्याच्या घरी राहणं पसंत करणार नाही. a पण पेत्र तिथे राहायला तयार झाला, यावरून त्याच्या मनात अशा चुकीच्या भावना नसाव्यात असं दिसतं. तरीही, यहोवा कोणताच भेदभाव करत नाही याविषयी एक महत्त्वाचा धडा पेत्रला लवकरच शिकायला मिळणार आहे.
२ पेत्र प्रार्थना करत असताना, त्याला एक दृष्टान्त दिसतो. दृष्टान्तात त्याला जे दिसतं, त्यामुळे कोणत्याही यहुद्याला घृणा वाटली असती. त्याला आकाशातून मोठ्या चादरीसारखं काहीतरी खाली येताना दिसतं. त्याच्यात नियमशास्त्रानुसार अशुद्ध असलेले प्राणी असतात. पेत्रला त्या प्राण्यांना कापून खायला सांगितलं जातं, तेव्हा तो म्हणतो, “मी आजपर्यंत कधीही दूषित आणि अशुद्ध असं काहीही खाल्लं नाही.” तेव्हा त्याला तीनदा असं सांगण्यात येतं, “देवाने ज्या गोष्टी शुद्ध केल्या आहेत त्यांना तू दूषित म्हणायचं सोडून दे.” (प्रे. कार्यं १०:१४-१६) या दृष्टान्तामुळे पेत्र गोंधळात पडतो. पण लवकरच त्याला या दृष्टान्ताचा अर्थ स्पष्ट होतो.
३ पेत्रला दिसलेल्या दृष्टान्ताचा काय अर्थ होता? त्या दृष्टान्ताचा अर्थ जाणून घेणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कारण, यहोवा लोकांना कोणत्या दृष्टीने पाहतो हे आपल्याला या दृष्टान्तातून अगदी स्पष्टपणे कळतं. खरे ख्रिस्ती या नात्याने, आपल्याला देवाच्या राज्याबद्दल अगदी पूर्णपणे साक्ष द्यायची आहे. पण जोपर्यंत आपण लोकांकडे देवाच्या दृष्टिकोनातून पाहायला शिकत नाही, तोपर्यंत आपल्याला हे काम करताच येणार नाही. पेत्रला दिसलेल्या दृष्टान्ताचा अर्थ समजून घेण्यासाठी, आपण त्या वेळी घडलेल्या नाट्यमय घटनांचं परीक्षण करू या.
तो “देवाला नेहमी याचना करायचा” (प्रे. कार्यं १०:१-८)
४, ५. कर्नेल्य कोण होता, आणि तो प्रार्थना करत असताना काय घडलं?
४ या घटनेच्या आदल्या दिवशी, यापो शहराच्या उत्तरेकडे सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या कैसरीयात, कर्नेल्य नावाच्या एका माणसालाही देवाने असाच दृष्टान्त दाखवला होता. पण, या गोष्टीची पेत्रला काहीच कल्पना नव्हती. कर्नेल्य रोमन सैन्यातला अधिकारी होता आणि तो “एक नीतिमान माणूस” होता. b तो एक चांगला कुटुंबप्रमुखही होता, कारण “तो आणि त्याचं संपूर्ण घराणं देवाला भिऊन वागायचं” असं म्हटलं आहे. कर्नेल्य यहुदी धर्म स्वीकारलेल्यांपैकी नव्हता, तर तो सुंता न झालेला एक विदेशी होता. असं असलं तरीही, तो गरीब यहुद्यांना दयाळूपणे मदत करायचा. हा प्रामाणिक मनाचा माणूस, “देवाला नेहमी याचना करायचा.”—प्रे. कार्यं १०:२.
५ दुपारी ३ वाजण्याच्या आसपास कर्नेल्य प्रार्थना करत असताना, त्याला एक दृष्टान्त दिसला. त्यात एका स्वर्गदूताने त्याला असं म्हटलं, “तुझ्या प्रार्थनांची आणि तू दिलेल्या दानांची देवाने आठवण केली आहे.” (प्रे. कार्यं १०:४) स्वर्गदूताने सांगितल्याप्रमाणे, पेत्रला बोलवण्यासाठी कर्नेल्यने आपल्या माणसांना पाठवलं. सुंता न झालेल्या कर्नेल्यसाठी, आता असं एक दार उघडणार होतं, जे याआधी त्याच्यासाठी बंद होतं. कारण काही वेळातच त्याला तारणाचा संदेश ऐकायला मिळणार होता.
६, ७. (क) जे प्रामाणिक मनाने देवाचा शोध घेतात त्यांच्या प्रार्थनांचं तो उत्तर देतो, हे दाखवणारा एक अनुभव सांगा. (ख) अशा अनुभवांवरून आपण काय शिकू शकतो?
६ आजही सत्याचा शोध घेत असलेल्या प्रामाणिक लोकांच्या प्रार्थना देव ऐकतो का? एक उदाहरण पाहू या. आल्बेनिया देशामध्ये राहणाऱ्या एका स्त्रीने, मुलांना कसं वाढवायचं याविषयी माहिती देणारं टेहळणी बुरूज मासिक एका बहिणीकडून घेतलं. c तिच्या घरी गेलेल्या त्या बहिणीला ती म्हणाली, “तुम्हाला खरं वाटणार नाही, पण मी आत्ताच देवाला प्रार्थना करत होते, की माझ्या मुलींचा चांगल्या प्रकारे सांभाळ करायला मला मदत कर. आणि त्याने तुम्हाला पाठवलं! मला नेमकी ज्याची गरज होती तेच तुम्ही मला दिलं!” त्या स्त्रीने आणि तिच्या मुलींनी बायबल अभ्यास करायला सुरुवात केली. काही काळाने तिचा पतीही अभ्यास करू लागला.
७ हे फक्त एकच उदाहरण आहे का? अजिबात नाही! जगभरातून आपल्याला अशी इतकी उदाहरणं ऐकायला मिळतात, की ती फक्त योगायोग असूच शकत नाहीत. यावरून आपण काय शिकतो? पहिली गोष्ट म्हणजे, जे प्रामाणिक मनाने देवाचा शोध घेतात त्यांच्या प्रार्थनांचं तो उत्तर देतो. (१ राजे ८:४१-४३; स्तो. ६५:२) दुसरी म्हणजे, प्रचारकार्यामध्ये स्वर्गदूत आपल्याला मदत करतात.—प्रकटी. १४:६, ७.
प्रे. कार्यं १०:९-२३क)
“पेत्र अजूनही विचारात” होता (८, ९. देवाच्या पवित्र शक्तीद्वारे पेत्रला काय कळलं, आणि त्याने काय केलं?
८ गच्चीवर बसलेला “पेत्र अजूनही विचारात” होता. त्या दृष्टान्ताचा काय अर्थ असेल असा तो विचार करत असताना, कर्नेल्यने पाठवलेली माणसं तिथे पोहोचली. (प्रे. कार्यं १०:१७) नियमशास्त्रानुसार अशुद्ध असलेल्या गोष्टी खायला पेत्रने तीन वेळा नकार दिला होता. मग आता या लोकांसोबत एका विदेशी माणसाच्या घरी जायला तो तयार होणार होता का? या बाबतीत देवाची इच्छा काय आहे, हे पेत्रला पवित्र शक्तीद्वारे कळवण्यात आलं. त्याला सांगण्यात आलं, “पाहा! तीन माणसं तुझ्याविषयी विचारपूस करत आहेत. म्हणून ऊठ आणि खाली जा. मनात कोणतीही शंका न आणता त्यांच्यासोबत जा, कारण मीच त्यांना पाठवलंय.” (प्रे. कार्यं १०:१९, २०) चादरीसारख्या दिसणाऱ्या गोष्टीचा दृष्टान्त पेत्रने पाहिला असल्यामुळे, त्याला पवित्र शक्तीच्या या मार्गदर्शनाचं पालन करणं नक्कीच सोपं गेलं असेल.
९ आपल्याला बोलावण्याची आज्ञा देवानेच कर्नेल्यला दिली असल्याचं पेत्रला कळलं. तेव्हा त्याने या विदेशी लोकांना घरात बोलवलं आणि “आपले पाहुणे म्हणून त्यांची राहायची सोय केली.” (प्रे. कार्यं १०:२३क) देवाची इच्छा काय आहे, हे कळल्यावर प्रेषित पेत्रने आज्ञाधारकपणे आपल्या विचारांत बदल करायला सुरुवात केली होती.
१०. आज यहोवा आपल्या लोकांना कसं मार्गदर्शन देत आहे? आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारू शकतो?
१० आजच्या काळातही यहोवा त्याच्या लोकांची समज सतत सुधारत आहे. (नीति. ४:१८) पवित्र शक्तीद्वारे तो “विश्वासू आणि बुद्धिमान” दासाचं मार्गदर्शन करत आहे. (मत्त. २४:४५) काही वेळा देवाच्या वचनाबद्दल असलेली आपली समज सुधारली जाते किंवा संघटनेच्या कार्य करण्याच्या पद्धतींमध्ये काही बदल केले जातात. अशा वेळी आपण स्वतःला विचारलं पाहिजे, ‘असे बदल होतात तेव्हा मी काय करतो? देवाच्या पवित्र शक्तीद्वारे मिळत असलेल्या मार्गदर्शनाचा स्वीकार करून मी त्याप्रमाणे चालतो का?’
पेत्रने त्यांना “बाप्तिस्मा घ्यायची आज्ञा दिली” (प्रे. कार्यं १०:२३ख-४८)
११, १२. कैसरीयाला आल्यावर पेत्रने काय केलं, आणि त्याला काय शिकायला मिळालं?
११ दृष्टान्त पाहिल्याच्या दुसऱ्या दिवशी, पेत्र आणि त्याच्यासोबत आणखी नऊ जण, म्हणजे कर्नेल्यने पाठवलेली तीन माणसं आणि यापो शहरातले “सहा [यहुदी] बांधवही” कैसरीयाला जायला निघाले. (प्रे. कार्यं ११:१२) पेत्रची वाट बघत असलेल्या कर्नेल्यने “आपल्या नातेवाइकांना आणि जवळच्या मित्रांना आपल्या घरी बोलावून घेतलं होतं.” ते सर्व विदेशी असावेत असं दिसतं. (प्रे. कार्यं १०:२४) आता पेत्रने अशी गोष्ट केली, जी करण्याचा पूर्वी त्याने विचारही केला नसता. त्याने सुंता न झालेल्या एका माणसाच्या घरात प्रवेश केला! तो म्हणाला, “नियमाप्रमाणे एका यहुद्याने दुसऱ्या जातीच्या माणसाशी व्यवहार करणं किंवा त्याच्याकडे जाणं किती चुकीचं आहे, हे तर तुम्हाला माहीतच आहे. तरीपण, मी कोणत्याही माणसाला दूषित किंवा अशुद्ध म्हणू नये, असं देवाने मला दाखवलंय.” (प्रे. कार्यं १०:२८) आतापर्यंत पेत्रला हे कळून चुकलं होतं, की त्याला दिसलेला दृष्टान्त हा फक्त कोणत्या गोष्टी खाव्यात याबद्दल नव्हता. तर, त्याने “कोणत्याही माणसाला [विदेशी माणसालाही] दूषित” समजू नये, हेही त्याला शिकायला मिळालं होतं.
१२ पेत्रला काय सांगायचं आहे हे ऐकायला कर्नेल्यच्या घरातले सर्व उत्सुक होते. कर्नेल्य पेत्रला म्हणाला, “आम्ही सगळे देवासमोर हजर आहोत आणि यहोवाने तुम्हाला जे काही सांगायची आज्ञा केली आहे, ते ऐकायला उत्सुक आहोत.” (प्रे. कार्यं १०:३३) प्रचारकार्यात, एखादी आवड दाखवणारी व्यक्ती तुम्हाला असं म्हणाली तर तुम्हाला कसं वाटेल? पेत्रने मग या दमदार शब्दांनी सुरुवात केली: “आता माझी खातरी पटली आहे, की देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही. तर प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भीती बाळगून योग्य ते करतो, त्याचा तो स्वीकार करतो.” (प्रे. कार्यं १०:३४, ३५) पेत्र शिकला होता, की लोकांबद्दल देवाचा दृष्टिकोन हा वंश, देश किंवा इतर कोणत्याही बाहेरून दिसणाऱ्या गोष्टींवर आधारित नाही. पेत्रने मग त्यांना येशूचं सेवाकार्य, त्याचा मृत्यू आणि त्याच्या पुनरुत्थानाबद्दल साक्ष दिली.
१३, १४. (क) इ.स. ३६ मध्ये कर्नेल्य आणि इतर विदेशी लोकांच्या परिवर्तनामुळे कोणती महत्त्वपूर्ण गोष्ट घडली? (ख) आपण लोकांच्या बाहेरच्या रूपावरून त्यांच्याविषयी मत का बनवू नये?
१३ यानंतर, कधीही घडली नव्हती अशी एक घटना घडली. “पेत्र त्यांच्याशी या गोष्टींबद्दल अजून बोलतच” असताना देवाची पवित्र शक्ती या “विदेशी” लोकांवर आली. (प्रे. कार्यं १०:४४, ४५) एखाद्या व्यक्तीवर बाप्तिस्म्याच्या आधीच पवित्र शक्ती येण्याचा बायबलमधला हा एकमात्र उल्लेख आहे. देवाने विदेशी लोकांचा स्वीकार केल्याचं हे चिन्ह आहे, हे ओळखून पेत्रने “त्यांना [विदेशी लोकांना] . . . बाप्तिस्मा घ्यायची आज्ञा दिली.” (प्रे. कार्यं १०:४८) इ.स. ३६ मध्ये झालेल्या विदेशी लोकांच्या या परिवर्तनानंतर, यहुदी लोकांसाठी असलेला खास संधीचा काळ संपला. (दानी. ९:२४-२७) विदेशी लोकांना साक्ष देण्यात पुढाकार घेऊन पेत्रने ‘राज्याच्या किल्ल्यांमधली’ तिसरी, म्हणजे शेवटची किल्ली वापरली. (मत्त. १६:१९) या किल्लीमुळे, सुंता न झालेल्या विदेशी लोकांनाही अभिषिक्त ख्रिस्ती होण्याची संधी मिळाली.
१४ आजही राज्याचे प्रचारक असलेल्या आपल्या सर्वांना हे माहीत आहे की, “देव कधीच भेदभाव करत नाही.” (रोम. २:११) त्याची अशी इच्छा आहे की “सर्व प्रकारच्या लोकांचं तारण व्हावं.” (१ तीम. २:४) त्यामुळे, लोकांच्या बाहेरच्या रूपावरून आपण कधीच त्यांच्याविषयी मत बनवू नये. आपल्याला देवाच्या राज्याविषयी अगदी पूर्णपणे साक्ष देण्याची कामगिरी मिळाली आहे. म्हणूनच आपण वंश, देश, रंगरूप किंवा धर्म यांच्या आधारावर भेदभाव न करता सर्व लोकांना प्रचार केला पाहिजे.
“त्यांनी आणखी वाद घातला नाही” तर “देवाचा गौरव केला” (प्रे. कार्यं ११:१-१८)
१५, १६. काही यहुदी ख्रिस्ती, पेत्रची टीका का करू लागले, आणि त्याने आपली बाजू कशी मांडली?
१५ पेत्र यरुशलेमला जायला निघाला. नुकतंच जे घडलं होतं ते तिथे जाऊन सांगायला तो नक्कीच उत्सुक असेल. पण सुंता न झालेल्या विदेशी लोकांनी “देवाचं वचन स्वीकारलं” ही बातमी त्याच्याआधीच यरुशलेमला पोहोचली असं दिसतं. कारण पेत्र तिथे पोहोचल्यावर, “सुंता केलीच पाहिजे असं ज्या लोकांचं म्हणणं होतं, ते त्याची टीका करू लागले.” त्यांना या गोष्टीचा राग आला, की पेत्र “सुंता न झालेल्यांच्या घरात जाऊन त्यांच्यासोबत” जेवला होता. (प्रे. कार्यं ११:१-३) तेव्हा विदेशी लोक येशूचे शिष्य बनू शकतात की नाही याविषयी वाद नव्हता. तर, यहोवाची सेवा योग्य प्रकारे करण्यासाठी विदेश्यांनी नियमशास्त्र पाळणं आवश्यक आहे असं त्या यहुदी शिष्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामध्ये सुंता करण्याचाही समावेश होता. यावरून हे स्पष्ट होतं, की काही यहुदी शिष्यांना मोशेचं नियमशास्त्र आता ख्रिश्चनांना लागू होत नाही हे स्वीकारणं कठीण वाटत होतं.
१६ पेत्रने स्वतःची बाजू कशी मांडली? या गोष्टी करायचं मार्गदर्शन त्याला देवाकडूनच मिळालं आहे, याचे त्याने ४ पुरावे दिले. प्रेषितांची कार्यं ११:४-१६ या वचनांमध्ये आपण हे पुरावे पाहतो: (१) पेत्रला दिसलेला दृष्टान्त (वचनं ४-१०); (२) पवित्र शक्तीची आज्ञा (वचनं ११, १२); (३) स्वर्गदूताने कर्नेल्यला दिलेला संदेश (वचनं १३, १४); आणि (४) विदेश्यांवर आलेली पवित्र शक्ती. (वचनं १५, १६) शेवटी, पेत्रने विचार करायला लावणारा एक प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. तो म्हणाला, “प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे देवाने आपल्याला [यहुद्यांना] जे मोफत दान [पवित्र शक्ती] दिलं, तेच त्यांनाही [विश्वास ठेवणाऱ्या विदेश्यांनाही] दिलं. तर मग देवाला अडवणारा मी कोण?”—प्रे. कार्यं ११:१७.
१७, १८. (क) पेत्रने मांडलेल्या पुराव्यांमुळे यहुदी ख्रिश्चनांना कोणता निर्णय घेणं भाग होतं? (ख) मंडळीची एकता टिकवून ठेवणं कधीकधी कठीण का होऊ शकतं, आणि आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजे?
१७ पेत्रने यहुदी ख्रिश्चनांसमोर मांडलेल्या पुराव्यांमुळे, आता त्यांना निर्णय घेणं भाग होतं. आपल्या मनातले चुकीचे विचार काढून, ते या नवीनच बाप्तिस्मा झालेल्या विदेश्यांना आपले बांधव म्हणून स्वीकारणार होते का? अहवालात पुढे म्हटलं आहे, “हे ऐकल्यावर त्यांनी आणखी वाद घातला नाही. त्यांनी असं म्हणून देवाचा गौरव केला: ‘याचा अर्थ देवाने विदेशी लोकांना जीवन मिळावं म्हणून त्यांनाही पश्चात्ताप करायची संधी दिली आहे.’” (प्रे. कार्यं ११:१८) त्यांनी दाखवलेल्या या चांगल्या वृत्तीमुळे मंडळीची एकता टिकून राहिली.
१८ आजच्या काळातही मंडळीची एकता टिकवून ठेवणं कधीकधी कठीण होऊ शकतं. कारण देवाचे खरे उपासक, “सर्व राष्ट्रं, वंश, लोक आणि भाषा यांतून” आले आहेत. (प्रकटी. ७:९) त्यामुळे आपल्याला अनेक मंडळ्यांमध्ये वेगवेगळ्या वंशांचे, संस्कृतींचे आणि पार्श्वभूमीचे भाऊबहीण भेटतात. आपण स्वतःला असे प्रश्न विचारू शकतो, ‘मी माझ्या मनातून सर्व प्रकारचा भेदभाव काढून टाकला आहे का? जगात फूट पाडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत जसं की, राष्ट्राचा, प्रांताचा, भाषेचा, संस्कृतीचा किंवा जातीचा अभिमान; पण भाऊबहिणींसोबत वागताना या गोष्टींचा स्वतःवर परिणाम न होऊ देण्याचा मी निश्चय केला आहे का?’ विदेश्यांचं पहिल्यांदा परिवर्तन झाल्याच्या काही वर्षांनंतर पेत्र (केफा) कसा वागला याचा विचार करा. इतर जण भेदभाव करत असल्यामुळे तोही त्यांच्या प्रभावाखाली येऊन विदेश्यांपासून “वेगळा राहू लागला.” त्यामुळे पौलला त्याची चूक सुधारावी लागली. (गलती. २:११-१४) आपल्या मनात कधीही कोणत्याच प्रकारचा भेदभाव येणार नाही यासाठी आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे.
“बरेच जण विश्वास स्वीकारून प्रभूकडे वळले” (प्रे. कार्यं ११:१९-२६क)
१९. अंत्युखियामधल्या यहुदी ख्रिश्चनांनी कोणाला प्रचार केला, आणि त्याचा काय परिणाम झाला?
१९ मग यानंतर येशूच्या शिष्यांनी सुंता न झालेल्या विदेश्यांना प्रचार करायला सुरुवात केली का? सीरियाच्या अंत्युखियामध्ये काही काळाने काय घडलं ते पाहू या. d या शहरात अनेक यहुदी राहायचे. पण यहुद्यांमध्ये आणि विदेश्यांमध्ये फारसे वाद नव्हते. त्यामुळे अंत्युखिया शहरात विदेश्यांना प्रचार करण्याची ख्रिस्ती बांधवांकडे चांगली संधी होती. इथेच काही यहुदी शिष्यांनी “ग्रीक बोलणाऱ्या लोकांना” आनंदाचा संदेश सांगायला सुरुवात केली. (प्रे. कार्यं ११:२०) त्यांनी फक्त ग्रीक बोलणाऱ्या यहुद्यांनाच नाही, तर सुंता न झालेल्या विदेश्यांनाही प्रचार केला. यहोवाने त्यांच्या या कामावर आशीर्वाद दिला आणि “बरेच जण विश्वास स्वीकारून प्रभूकडे वळले.”—प्रे. कार्यं ११:२१.
२०, २१. बर्णबाने नम्रता कशी दाखवली, आणि सेवाकार्य करताना आपणही अशीच नम्रता कशी दाखवू शकतो?
२० अंत्युखियामध्ये ऐकण्यासाठी तयार असलेल्या लोकांना प्रचार करण्यासाठी, यरुशलेमच्या मंडळीने बर्णबाला तिथे पाठवलं. पण त्याला आवड दाखवणारे इतके लोक भेटले, की तो हे काम एकट्याने करूच शकत नव्हता. या कामात शौलच त्याची चांगली मदत करू शकला असता. कारण पुढे शौलच विदेश्यांसाठी प्रेषित बनणार होता. (प्रे. कार्यं ९:१५; रोम. १:५) बर्णबाने पौलकडे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं का? नाही, याउलट त्याने नम्रता दाखवली. तो स्वतः शौलला शोधण्यासाठी तार्सला गेला आणि त्याला मदतीसाठी अंत्युखियाला घेऊन आला. मग त्या दोघांनी वर्षभर तिथे राहून तिथल्या मंडळीतल्या बांधवांना प्रोत्साहन दिलं.—प्रे. कार्यं ११:२२-२६क.
२१ आपलं सेवाकार्य करताना आपणही नम्रता कशी दाखवू शकतो? यासाठी आपल्यामध्ये कोणत्या कमतरता आहेत हे आपण ओळखलं पाहिजे. आपल्या सर्वांमध्ये वेगवेगळी कौशल्यं आणि गुण असतात. उदाहरणार्थ, काही जण कुशलपणे घरोघरचा किंवा अनौपचारिक पद्धतीने प्रचार करू शकतात, पण त्यांना पुनर्भेट करणं किंवा बायबल अभ्यास सुरू करणं कठीण जातं. जर तुम्हालाही तुमच्या सेवाकार्यात एखाद्या खास गोष्टीमध्ये सुधारणा करायची असेल, तर तुम्ही स्वतःहून इतरांकडे मदत मागाल का? जेव्हा तुम्ही स्वतः अशा प्रकारे पुढाकार घ्याल, तेव्हा सेवाकार्यात तुम्हाला जास्त यश मिळेल आणि तुमचा आनंदही वाढेल.—१ करिंथ. ९:२६.
“बांधवांना मदत” पाठवली जाते (प्रे. कार्यं ११:२६ख-३०)
२२, २३. अंत्युखियातल्या बांधवांनी आपलं बंधुप्रेम कसं दाखवलं, आणि आज देवाचे लोक बंधुप्रेम कसं दाखवतात?
२२ अंत्युखियामध्येच पहिल्यांदा, “शिष्यांना देवाच्या मार्गदर्शनाने ‘ख्रिस्ती’ असं म्हणण्यात आलं.” (प्रे. कार्यं ११:२६ख) आपल्या जीवनात ख्रिस्ताचं अनुकरण करणाऱ्यांसाठी, देवाने मान्यता दिलेलं हे नाव अगदी योग्यच आहे. विदेशी लोक ख्रिस्ती विश्वास स्वीकारू लागले, तेव्हा यहुदी आणि विदेशी ख्रिश्चनांमध्ये भावाभावांसारखं नातं निर्माण झालं का? इ.स. ४६ मध्ये जेव्हा मोठा दुष्काळ पडला तेव्हा काय झालं, याचा विचार करा. e त्या वेळी या दुष्काळामुळे गरिबांवर फार वाईट परिस्थिती आली. त्यांच्याकडे पैसे किंवा अन्न काहीच नव्हतं. यहूदीयात राहणारे बहुतेक यहुदी गरीब होते आणि त्यांना मदतीची खरोखर गरज होती. ही गोष्ट कळल्यावर, अंत्युखियातल्या बांधवांनी, आणि त्यांच्यातल्या विदेशी ख्रिश्चनांनीही “यहूदीयातल्या बांधवांना मदत” म्हणून आवश्यक गोष्टी पाठवल्या. (प्रे. कार्यं ११:२९) बांधवांवरच्या खऱ्या प्रेमाचं किती अप्रतिम उदाहरण!
२३ आजही देवाच्या लोकांच्या बाबतीत हीच गोष्ट खरी आहे. आपल्याच क्षेत्रातल्या किंवा इतर देशांतल्या बांधवांना मदतीची गरज आहे, हे आपल्याला समजतं तेव्हा आपण आनंदाने त्यांना मदत करायला तयार होतो. वादळं, भूकंप किंवा सुनामी यांसारख्या नैसर्गिक विपत्तींमुळे आपल्या बांधवांचं नुकसान होतं, तेव्हा शाखा समित्या लगेच विपत्ती मदतकार्य समित्या तयार करतात. या सर्व मदतकार्यामुळे आपलं आपल्या बांधवांवर खरं प्रेम आहे हे सिद्ध होतं.—योहा. १३:३४, ३५; १ योहा. ३:१७.
२४. पेत्रला दिसलेल्या दृष्टान्ताचं महत्त्व आपल्याला समजलं आहे हे आपण कसं दाखवू शकतो?
२४ यापो शहरात घराच्या गच्चीवर पेत्रला दृष्टान्त दिसला. ही घटना पहिल्या शतकातली आहे. पण आज खरे ख्रिस्ती या नात्याने आपण त्याचं महत्त्व ओळखलं पाहिजे. आपण एका भेदभाव न करणाऱ्या देवाची उपासना करतो आणि त्याची इच्छा आहे, की आपण त्याच्या राज्याबद्दल अगदी पूर्णपणे साक्ष द्यावी. म्हणूनच, आपण सर्व वंशांच्या, सर्व देशांच्या आणि समाजातल्या सर्व प्रकारच्या लोकांना प्रचार केला पाहिजे. तेव्हा, जे कोणी आपला संदेश ऐकायला तयार असतील, त्यांना आनंदाचा संदेश स्वीकारण्याची संधी देण्याचा आपण पक्का निश्चय करू या.—रोम. १०:११-१३.
a चामड्याचं काम करणाऱ्यांना काही यहुदी तुच्छ समजायचे. कारण हे काम करणाऱ्यांना मेलेल्या प्राण्यांच्या कातडीला स्पर्श करावा लागायचा. तसंच, काही किळसवाण्या गोष्टींचाही वापर करावा लागायचा. चामड्याचं काम करणाऱ्यांनी मंदिरात येऊ नये असं समजलं जायचं. त्यांनी त्यांचा व्यवसाय शहराच्या कमीत कमी ७० फूट दूर राहून करावा, असा नियम करण्यात आला होता. म्हणूनच कदाचित शिमोनचं घर “समुद्राजवळ” होतं.—प्रे. कार्यं १०:६.
b “ कर्नेल्य आणि रोमन सैन्य” ही चौकट पाहा.
c “मुलांच्या संगोपनाकरता विश्वसनीय सल्ला” हा लेख, १ नोव्हेंबर २००६ च्या टेहळणी बुरूज मासिकात पान क्रमांक ४-७ वर आला आहे.
d “ सीरियाचं अंत्युखिया” ही चौकट पाहा.
e सम्राट क्लौद्य याच्या शासनकाळात (इ.स. ४१-५४) आलेल्या ‘मोठ्या दुष्काळाबद्दल’ यहुदी इतिहासकार जोसिफसने आपल्या लिखाणात उल्लेख केला आहे.