व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय १०

“यहोवाचं वचन झपाट्याने पसरत गेलं”

“यहोवाचं वचन झपाट्याने पसरत गेलं”

पेत्रची सुटका होते, आणि छळामुळे आनंदाच्या संदेशाचा प्रसार होणं थांबत नाही

प्रे. कार्यं १२:१-२५ वर आधारित

१-४. पेत्रवर कोणती कठीण परिस्थिती आली, आणि तुम्ही त्याच्या जागी असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं?

 पेत्रने तुरुंगात पाऊल ठेवताच, तुरुंगाचा विशाल लोखंडी दरवाजा मोठा आवाज करत बंद झाला. मग दोन रोमन पहारेकऱ्‍यांनी त्याला धरून त्याच्या खोलीकडे नेलं. आता त्याच्यासोबत काय होणार हे जाणून घेण्यासाठी तो अनेक दिवस, तास न्‌ तास वाट पाहतो. फक्‍त तुरुंगाच्या भिंती, दारं, त्याला जखडून ठेवणाऱ्‍या साखळ्या आणि पहारेकरी, इतकंच काय ते त्याला दिसतं.

मग एक वाईट बातमी येते. राजा हेरोद अग्रिप्पा पहिला याने पेत्रला ठार मारायचं ठरवलं आहे. a इतकंच काय तर यहुदी लोकांना खूश करण्यासाठी, तो वल्हांडणाच्या सणानंतर पेत्रला त्यांच्यासमोर आणून त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावणार आहे. ही फक्‍त एक पोकळ धमकी नाही. कारण याच शासकाने आणखी एका प्रेषिताला, म्हणजेच याकोबला नुकतंच ठार मारलं आहे.

संध्याकाळची वेळ आहे. दुसऱ्‍या दिवशी पेत्रला मृत्युदंड देण्यात येणार आहे. त्या अंधाऱ्‍या खोलीत पेत्र कसला विचार करत असेल? त्याला येशूचे शब्द आठवले असतील का? काही वर्षांपूर्वी येशूने म्हटलं होतं, की एक दिवशी पेत्रला बांधून त्याच्या इच्छेविरुद्ध नेलं जाईल, म्हणजेच मृत्युदंड दिला जाईल. (योहा. २१:१८, १९) हीच तर ती वेळ नाही ना, असं कदाचित पेत्रला वाटलं असावं.

तुम्ही जर पेत्रच्या जागी असता तर तुम्हाला कसं वाटलं असतं? आता कोणतीच आशा नाही असा विचार करून अनेकांचा धीर खचला असता. पण विचार करा. येशूच्या खऱ्‍या शिष्यांकडे कोणतीही आशा नाही असा खरंच कुठलाही प्रसंग असू शकतो का? छळ होत असताना, पेत्र आणि इतर ख्रिस्ती जसे वागले त्यावरून आपण काय शिकू शकतो? चला पाहू या.

“बांधव . . . कळकळीने प्रार्थना करत होते” (प्रे. कार्यं १२:१-५)

५, ६. (क) राजा हेरोद अग्रिप्पा पहिला याने ख्रिस्ती मंडळीचा का आणि कशा प्रकारे छळ केला? (ख) याकोबचा मृत्यू ही मंडळीवर आलेली मोठी परीक्षा का होती?

याआधीच्या अध्यायात आपण पाहिलं, की विदेशी असलेला कर्नेल्य आणि त्याचं कुटुंब ख्रिस्ती कसं बनलं. त्यांचं परिवर्तन ही ख्रिस्ती मंडळीसाठी एक आनंदाची आणि आश्‍चर्याची घटना होती. पण विश्‍वास न ठेवणाऱ्‍या यहुद्यांना हे जाणून धक्का बसला असावा, की यहुदी ख्रिस्ती आता विदेशी लोकांसोबत मिळून उपासना करत होते.

हेरोद हा एक धूर्त राजकारणी होता. यहुद्यांची मर्जी मिळवण्याची ही चांगली संधी आहे हे त्याने जाणलं, आणि म्हणून तो ख्रिश्‍चनांना सतावू लागला. प्रेषित याकोबवर येशूचं प्रेम होतं हे त्याला नक्कीच माहीत असावं. म्हणून हेरोदने, “योहानचा भाऊ याकोब याची तलवारीने हत्या केली.” (प्रे. कार्यं १२:२) खरंच ख्रिस्ती मंडळीवर आलेली ही एक मोठी परीक्षा होती! याकोब हा त्या तिघांपैकी होता ज्यांनी येशूचं रूपांतर आणि इतर चमत्कार पाहिले. हे चमत्कार इतर प्रेषितांनी पाहिले नव्हते. (मत्त. १७:१, २; मार्क ५:३७-४२) येशूने याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना त्यांच्या आवेशामुळे, “गर्जनेची मुलं” असं नाव दिलं होतं. (मार्क ३:१७) त्यामुळे मंडळीने खरोखरच एका धाडसी, विश्‍वासू साक्षीदाराला आणि त्यांच्या प्रिय प्रेषिताला गमावलं होतं.

७, ८. पेत्रला तुरुंगात टाकण्यात आलं तेव्हा मंडळीतल्या बांधवांनी काय केलं?

अग्रिप्पाने अपेक्षा केल्याप्रमाणेच, याकोबला ठार मारल्यामुळे यहुदी खूश झाले. यामुळेच तो आता पेत्रला मारण्याच्या बेतात होता. या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, त्याने पेत्रला तुरुंगात टाकलं. पण ५ व्या अध्यायात आपण पाहिलं होतं की, काही काळाआधी प्रेषित चमत्काराने तुरुंगातून सुटले होते. ही गोष्ट अग्रिप्पाच्या लक्षात असावी. त्यामुळे त्याने पेत्रला दोन पहारेकऱ्‍यांच्या मध्ये साखळ्यांनी बांधून ठेवलं होतं. तसंच पेत्रने पळून जाऊ नये, म्हणून १६ पहारेकरी रात्रंदिवस आळीपाळीने त्याच्यावर पहारा देत होते. या वेळी जर पेत्र सुटला, तर त्याची शिक्षा या पहारेकऱ्‍यांना मिळणार होती. पेत्र अशा कठीण परिस्थितीत असताना, मंडळीतल्या बांधवांनी काय केलं?

काय करायचं हे त्या बांधवांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. कारण प्रेषितांची कार्यं १२:५ इथे म्हटलं आहे, “पेत्र तुरुंगात होता, तेव्हा मंडळीतले सगळे बांधव त्याच्यासाठी देवाजवळ कळकळीने प्रार्थना करत होते.” हो, ते बांधव आपल्या या प्रिय भावासाठी अगदी मनापासून, कळकळीने प्रार्थना करत होते. याकोबच्या मृत्यूमुळे ते खचून गेले नव्हते. आणि प्रार्थना केल्याने काहीच होत नाही, असा दृष्टिकोन त्यांनी बाळगला नाही. यहोवा आपल्या प्रार्थनांना खूप महत्त्व देतो. आपल्या प्रार्थना त्याच्या इच्छेनुसार असल्या तर तो त्यांचं उत्तर नक्की देईल. (इब्री १३:१८, १९; याको. ५:१६) हा आजच्या काळातल्या ख्रिश्‍चनांसाठीही एक महत्त्वाचा धडा आहे.

९. प्रार्थना करण्याच्या बाबतीत पहिल्या शतकातल्या बांधवांच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?

तुम्हाला अशा बांधवांबद्दल माहीत आहे का, जे आज अशाच कठीण परीक्षांचा सामना करत आहेत? ते कदाचित छळाचा, सरकारने टाकलेल्या बंदीचा किंवा नैसर्गिक विपत्तींचा सामना करत असतील. त्यांच्यासाठी तुम्ही मनापासून आणि कळकळीने प्रार्थना कराल का? कधीकधी बांधव अशा समस्यांचा सामना करत असतात ज्या लगेच दिसून येत नाहीत, जसं की, कुटुंबातल्या समस्या, निराशा किंवा त्यांच्या विश्‍वासाची होत असलेली परीक्षा. तुम्हीही अशा काही बांधवांना ओळखता का? तुम्ही प्रार्थना करण्याआधी थोडा विचार केला, तर तुम्हाला प्रार्थना ऐकणाऱ्‍या यहोवा देवाशी बोलताना, या बांधवांचा नावाने उल्लेख करता येईल. (स्तो. ६५:२) कारण, आपल्यावर कठीण समस्या येतात तेव्हा आपल्या बांधवांनीही आपल्यासाठी असंच करावं असं आपल्याला वाटतं.

ख्रिस्ती विश्‍वासामुळे तुरुंगात असलेल्या बांधवांसाठी आपण प्रार्थना करतो

“माझ्या मागेमागे ये” (प्रे. कार्यं १२:६-११)

१०, ११. स्वर्गदूताने तुरुंगातून पेत्रची सुटका कशी केली याचं वर्णन करा.

१० पेत्रचा जीव धोक्यात असल्यामुळे त्याला भीती वाटत होती का? हे आपल्याला नक्की सांगता येणार नाही. पण तुरुंगात त्या शेवटच्या रात्री तो गाढ झोपला होता आणि ते दोन पहारेकरी त्याच्यावर पहारा देत होते. या विश्‍वासू माणसाला पक्कं माहीत होतं, की उद्याच्या दिवशी काहीही झालं तरी यहोवा त्याला नक्की सांभाळेल. (रोम. १४:७, ८) पण यानंतर ज्या विलक्षण घटना घडणार होत्या, त्यांबद्दल पेत्रने कधीच विचार केला नसेल. अचानक त्या अंधाऱ्‍या खोलीत प्रकाश पडला. एक स्वर्गदूत तिथे आला आणि त्याने पेत्रला उठवलं. पहारेकरी त्या स्वर्गदूताला पाहू शकले नाहीत. आणि पेत्रच्या हातातल्या मजबूत साखळ्या, चक्क गळून पडल्या!

“ते शहराकडे जाणाऱ्‍या लोखंडी फाटकाजवळ पोहोचले. तेव्हा ते फाटक त्यांच्यासाठी आपोआप उघडलं.”​—प्रे. कार्यं १२:१०

११ त्या स्वर्गदूताने पेत्रला एकापाठोपाठ एक सूचना दिल्या, “लवकर ऊठ! . . . तयार हो आणि पायात जोडे घाल. . . . तुझा अंगरखा घाल.” पेत्रने लगेच त्याच्या म्हणण्याप्रमाणे केलं. शेवटी तो स्वर्गदूत म्हणाला, “माझ्या मागेमागे ये.” तेव्हा पेत्र त्याच्यामागे निघाला. ते त्या खोलीतून बाहेर आले आणि आवाज न करता पहारेकऱ्‍यांच्या समोरून, तुरुंगाच्या त्या भल्या मोठ्या दरवाजाजवळ आले. पण या दरवाजातून बाहेर जायचं कसं? पेत्रच्या मनात कदाचित हा विचार आलाही असेल. पण त्याला फार वेळ विचार करावा लागला नाही. कारण ते त्या दरवाजाजवळ येताच तो “आपोआप” उघडला. काय होत आहे हे पेत्रला कळण्याआधीच ते त्या दरवाजातून बाहेर रस्त्यापर्यंत पोहोचले. मग तो स्वर्गदूत दिसेनासा झाला. पेत्र तिथे एकटाच उभा होता. तेव्हा, त्याला समजलं की हे सर्व खरोखरच घडलं आहे. हा दृष्टान्त नव्हता. पेत्रची सुटका झाली होती!​—प्रे. कार्यं १२:७-११.

१२. यहोवाने पेत्रची ज्या प्रकारे सुटका केली त्यावर मनन केल्यामुळे आपल्याला सांत्वन का मिळतं?

१२ आपल्या सेवकांची सुटका करण्याची अमर्याद शक्‍ती यहोवाकडे आहे, यावर मनन केल्यावर आपल्याला सांत्वन मिळत नाही का? ज्या राजाने पेत्रला कैद केलं होतं, त्याला त्या काळातल्या सर्वात शक्‍तिशाली साम्राज्याचा पाठिंबा होता. आणि तरीही, पेत्र अगदी सहज त्या तुरुंगातून बाहेर पडला होता! ही गोष्ट मान्य आहे की यहोवा आपल्या सर्वच सेवकांसाठी असे चमत्कार करत नाही. त्याने याकोबसाठी असा चमत्कार केला नव्हता; आणि पुढे जेव्हा पेत्रला मृत्युदंड होण्याबद्दल येशूने बोललेले शब्द खरे ठरले, तेव्हाही यहोवाने असं केलं नाही. आज ख्रिस्ती, आपली चमत्काराने सुटका होईल अशी अपेक्षा करत नाहीत. पण आपल्या हे लक्षात असलं पाहिजे की यहोवा बदलला नाही. (मला. ३:६) तो लवकरच आपल्या मुलाद्वारे, वर्षानुवर्षं मृत्यूच्या तुरुंगात असलेल्या असंख्य लोकांची सुटका करेल. (योहा. ५:२८, २९) आपल्यासमोर आज जेव्हा कठीण परीक्षा येतात, तेव्हा या अभिवचनामुळे आपल्याला खूप धैर्य मिळतं.

त्याला “पाहून त्यांना खूप आश्‍चर्य वाटलं” (प्रे. कार्यं १२:१२-१७)

१३-१५. (क) पेत्र परत आल्यावर मरीया हिच्या घरी असलेल्या बांधवांनी काय केलं? (ख) यापुढे प्रेषितांची कार्यं या पुस्तकात कोणता अहवाल आहे, पण पेत्रचा त्याच्या आध्यात्मिक भाऊबहिणींवर कोणता प्रभाव होत राहिला?

१३ पेत्र काळोखात त्या रस्त्यावर उभा होता. कुठे जावं असा विचार करत असताना, त्याला आठवतं की जवळच मरीया नावाची बहीण राहत होती. ही विधवा बहीण कदाचित श्रीमंत असावी. कारण तिचं घर इतकं मोठं होतं की संपूर्ण मंडळी तिथे जमू शकत होती. प्रेषितांची कार्यं पुस्तकातल्या या अहवालात पहिल्यांदाच तिच्या मुलाचा, म्हणजे योहान मार्क याचा उल्लेख येतो. तो पुढे पेत्रला मुलासारखा ठरतो. (१ पेत्र ५:१३) त्या रात्री इतका उशीर झाल्यावरही मंडळीतले अनेक बांधव मरीयाच्या घरी होते आणि कळकळीने प्रार्थना करत होते. ते नक्की पेत्रच्या सुटकेसाठीच प्रार्थना करत असावेत. पण यहोवा त्यांच्या प्रार्थनेचं असं उत्तर देईल, असा कोणीही विचार केला नसेल!

१४ पेत्र त्या घराचा बाहेरचा दरवाजा ठोठावतो. या दरवाजातून आत गेल्यावर, अंगणातून घरात जायचा रस्ता होता. रुदा (ज्याचा ग्रीक भाषेत “गुलाब” असा अर्थ होतो) नावाची दासी दरवाजाजवळ येते. ती पेत्रचा आवाज ऐकते, तेव्हा तिला तिच्या कानांवर विश्‍वासच बसत नाही. दरवाजा उघडण्याऐवजी, आनंदाच्या भरात ती पेत्रला तिथेच सोडून बांधवांना, पेत्र परत आला आहे हे सांगायला पळते. तिचं बोलणं ऐकल्यावर बांधव तिला वेड्यात काढतात. पण ती खरं तेच बोलत आहे, असं ती त्यांना पुन्हा-पुन्हा सांगते. तेव्हा काही जण असं म्हणतात, की कदाचित तिने एखाद्या स्वर्गदूताला पेत्रच्या वतीने बोलताना ऐकलं असावं. (प्रे. कार्यं १२:१२-१५) हे सर्व होत असताना, पेत्र बाहेर दार ठोठावत उभा असतो. शेवटी बांधव जाऊन दरवाजा उघडतात.

१५ दरवाजात त्याला “पाहून त्यांना खूप आश्‍चर्य” वाटतं. (प्रे. कार्यं १२:१६) त्यांना इतका आनंद होतो, की पेत्रला त्यांना शांत करावं लागतं. मग तो घडलेली सर्व हकीगत त्यांना सांगतो. त्यांनी ती याकोब आणि इतर बांधवांना कळवावी असं सांगून, हेरोदचे सैनिक त्याला शोधत तिथे येण्याआधीच तो तिथून निघतो. आपली सेवा विश्‍वासूपणे करता यावी यासाठी पेत्र दुसऱ्‍या सुरक्षित ठिकाणी निघून जातो. यापुढे प्रेषितांची कार्यं पुस्तकात फक्‍त एकदाच म्हणजे १५ व्या अध्यायात त्याचा उल्लेख येतो. त्या वेळी तो सुंता करण्यावरून झालेला वाद सोडवण्यासाठी मदत करतो. प्रेषितांची कार्यं पुस्तकातला पुढचा अहवाल प्रेषित पौलच्या कार्यांकडे आणि प्रवासाकडे आपलं लक्ष वेधतो. असं असलं, तरी आपण ही खातरी बाळगू शकतो की पेत्र जिथे-जिथे गेला असेल, तिथे-तिथे त्याने भाऊबहिणींचा विश्‍वास मजबूत केला असेल. पेत्र मरीयाच्या घरून जायला निघाला, तेव्हा बांधव आधीसारखे दुःखी नव्हते तर त्याला भेटल्यामुळे आता ते आनंदी होते.

१६. आपल्याला भविष्यात अनेक आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील अशी खातरी आपण का बाळगू शकतो?

१६ कधीकधी यहोवा आपल्या सेवकांसाठी अशा गोष्टी करतो, ज्या त्यांच्या कल्पनेपलीकडे असतात. त्यामुळे त्यांना इतका आनंद होतो की त्यांचा विश्‍वासच बसत नाही. त्या रात्री त्या बांधवांनाही असंच वाटलं. आज यहोवा आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो तेव्हा आपल्यालाही असंच वाटतं. (नीति. १०:२२) भविष्यात आपण मोठ्या प्रमाणावर यहोवाची सर्व अभिवचनं पूर्ण होताना पाहणार आहोत. त्या वेळी आपण ज्या गोष्टी प्रत्यक्ष पाहू, त्यांची आज आपल्याला कल्पनाही करता येणार नाही. तेव्हा, आपण जर यहोवाला विश्‍वासू राहिलो, तर आपल्याला भविष्यात अनेक आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील याची आपण खातरी बाळगू शकतो.

“यहोवाच्या दूताने त्याला मारलं” (प्रे. कार्यं १२:१८-२५)

१७, १८. लोकांनी हेरोदची प्रशंसा का केली?

१७ पेत्रच्या सुटकेमुळे हेरोदलाही धक्का बसला आणि तो संतापला. त्याने लगेच पेत्रला शोधून काढण्याची आज्ञा दिली. त्याने पहारेकऱ्‍यांचीही कसून चौकशी केली आणि “त्यांना शिक्षा द्यायचा हुकूम दिला.” त्याने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली असावी. (प्रे. कार्यं १२:१९) हेरोद अग्रिप्पा हा एक अतिशय क्रूर राजा होता. पण अशा या क्रूर माणसाला कधी शिक्षा मिळणार होती का?

१८ पेत्रला ठार मारण्यात अपयशी ठरल्यामुळे अग्रिप्पाच्या अभिमानाला नक्कीच ठेच पोहोचली असावी. पण त्याला स्वतःवर पुन्हा गर्व करता येईल अशी गोष्ट लवकरच घडली. त्याच्या काही शत्रूंना त्याच्याशी शांतीचा करार करायचा होता. त्यासाठी एक समारंभ ठेवण्यात आला. अग्रिप्पाला त्या समारंभात येणाऱ्‍या सर्व लोकांसमोर भाषण द्यायची खूप इच्छा होती. लूक या घटनेबद्दल सांगताना म्हणतो, या समारंभासाठी हेरोदने खास “राजवस्त्रं” घातली. यहुदी इतिहासकार जोसिफसने लिहिलं, की हेरोदची ही राजवस्त्रं चांदीची होती. त्यामुळे जेव्हा त्याच्यावर प्रकाश पडायचा, तेव्हा तो अगदी तेजस्वी दिसायचा. मग मोठेपणा मिरवण्यासाठी अग्रिप्पाने एक भाषण दिलं. राजाची खोटी प्रशंसा करण्यासाठी लोक ओरडले, “हा माणसाचा नाही, देवाचा आवाज आहे!”​—प्रे. कार्यं १२:२०-२२.

१९, २०. (क) हेरोदला यहोवाने का शिक्षा दिली? (ख) या अहवालात हेरोद अग्रिप्पा याला लगेच शिक्षा झाली हे पाहिल्यावर आपल्याला सांत्वन का मिळतं?

१९ असा महिमा फक्‍त देवाचाच केला जाऊ शकतो आणि देव हे सर्व पाहत होता! हेरोद आपल्यावर येणारं संकट टाळू शकला असता. त्याने लोकांची चूक सुधारायला हवी होती; किंवा लोकांची प्रशंसा त्याला मान्य नाही हे तरी दाखवायला हवं होतं. पण तो या नीतिवचनाचं जिवंत उदाहरण बनला, “गर्व झाला की नाश ठरलेला.” (नीति. १६:१८) “त्याच क्षणी यहोवाच्या दूताने त्याला मारलं.” गर्वाने फुगलेल्या या राजाला भयानक मृत्यूचा सामना करावा लागला. हेरोद “किडे पडून मेला.” (प्रे. कार्यं १२:२३) जोसिफसनेही असं लिहिलं आहे की अग्रिप्पाचा अचानक मृत्यू झाला. तो म्हणतो, की लोकांची खोटी प्रशंसा स्वीकारल्यामुळे आपल्याला हा जीवघेणा आजार झाला आहे, असं स्वतः हेरोदनेही कबूल केलं होतं. जोसिफसने पुढे असंही लिहिलं, की अग्रिप्पाला पाच दिवस त्रास सहन करावा लागला आणि मग त्याला मरण आलं. b

२० कधीकधी आपल्याला वाटू शकतं, की लोकांनी कितीही वाईट कामं केली तरी त्यांना काहीच शिक्षा होत नाही. पण यामुळे आपल्याला आश्‍चर्य वाटायला नको, कारण “सगळं जग सैतानाच्या नियंत्रणात आहे.” (१ योहा. ५:१९) तरीही, जेव्हा दुष्ट लोकांचा न्याय होत नाही तेव्हा देवाच्या विश्‍वासू सेवकांना वाईट वाटू शकतं. त्यामुळेच असे अहवाल आपल्याला सांत्वन देतात. कारण यहोवाने अन्यायाविरुद्ध कसं पाऊल उचललं, हे त्या घटनांमधून आपल्याला पाहायला मिळतं. तसंच, तो न्यायी आहे या गोष्टीचीही आपल्याला आठवण होते. (स्तो. ३३:५) आज ना उद्या, यहोवा नक्कीच न्याय करेल.

२१. प्रेषितांची कार्यं याच्या १२ व्या अध्यायातून आपण कोणता मुख्य धडा शिकतो, आणि त्यामुळे आज आपल्याला कसं प्रोत्साहन मिळतं?

२१ या अहवालाच्या शेवटी आपल्याला याहीपेक्षा मोठं प्रोत्साहन मिळतं. कारण तिथे असं म्हटलं आहे, “यहोवाचं वचन झपाट्याने पसरत गेलं आणि बऱ्‍याच लोकांनी विश्‍वास ठेवला.” (प्रे. कार्यं १२:२४) आपण या अहवालात वाचलं, की प्रचारकार्याची किती मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. यामुळे आजच्या काळातही यहोवाने या कामावर तसाच आशीर्वाद दिला आहे याची आपल्याला जाणीव होते. तेव्हा, प्रेषितांची कार्यं याच्या १२ व्या अध्यायात, फक्‍त एका प्रेषिताचा मृत्यू आणि दुसऱ्‍याची सुटका याबद्दलच माहिती नाही. तर यात आपल्याला यहोवाबद्दलही शिकायला मिळतं. सैतानाने ख्रिस्ती मंडळीचा छळ करण्याचा आणि त्यांचं आवेशी प्रचारकार्य थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही, यहोवाने तो कसा उधळून लावला याविषयीचा हा अहवाल आहे. सैतानाचे हे प्रयत्न फसले, तशाच पुढेही त्याच्या सर्व युक्त्या फसतील. (यश. ५४:१७) याउलट जे यहोवाच्या आणि येशूच्या बाजूने आहेत, ते असं कार्य करत आहेत जे कधीच अपयशी ठरणार नाही. या विचाराने आपल्याला प्रोत्साहन मिळत नाही का? खरंच, ‘यहोवाच्या वचनाचा’ प्रसार करण्याचा आज आपल्याला किती मोठा बहुमान मिळाला आहे!

b डॉक्टर आणि लेखक असलेल्या एका व्यक्‍तीने असं लिहिलं, की जोसिफसने आणि लूकने वर्णन केलेली रोगाची लक्षणं, जंतांनी (गोलकृमी) आतड्यांमध्ये अडथळा निर्माण केल्यामुळे दिसू शकतात. हे जंत कधीकधी उलटीवाटे बाहेर येतात, किंवा रुग्ण मेल्यावर त्याच्या शरीरातून बाहेर पडतात. एका संदर्भ ग्रंथात असं म्हटलं आहे, “वैद्य असलेल्या लूकने या रोगाचं नेमकं वर्णन केल्यामुळे, [हेरोदचा] मृत्यू किती भयानक होता हे आपल्याला अगदी स्पष्टपणे कळतं.”