अध्याय १८
देवाचा “शोध घ्यावा आणि . . . तो त्यांना सापडावा”
पौलने आपल्या ऐकणाऱ्यांचा विचार केला आणि ते सहमत होतील अशा मुद्द्यांवर बोलला
प्रे. कार्यं १७:१६-३४ वर आधारित
१-३. (क) अथेन्सला आल्यावर पौल का चिडला? (ख) पौलने दिलेल्या भाषणाचं परीक्षण केल्यामुळे आपल्याला काय शिकायला मिळेल?
पौल खूप चिडला आहे. तो ग्रीसमधल्या अथेन्स शहरात आला आहे. एकेकाळी सॉक्रेटीस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांनी जिथे शिकवलं होतं, असं हे विद्येचं केंद्र आहे. अथेन्सचे लोक खूप धार्मिक आहेत. पौलची नजर जिथे जाईल तिथे, मंदिरांत, चौकांत आणि रस्त्यांवरही त्याला मूर्ती व प्रतिमा दिसतात. अथेन्सचे लोक अनेक देवांची पूजा करतात. पण, मूर्तिपूजेबद्दल खरा देव यहोवा काय विचार करतो हे पौलला माहीत आहे. (निर्ग. २०:४, ५) आणि या विश्वासू प्रेषितालाही अगदी यहोवासारखंच वाटतं. त्यालाही मूर्तींची घृणा वाटते!
२ शहराच्या बाजारपेठेत आल्यावर पौलला आणखीनच धक्का बसतो. उत्तरपश्चिम दिशेला असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका कोपऱ्यात हर्मेस देवाचे अनेक नग्न पुतळे ओळीने उभे केलेले त्याला दिसतात. या संपूर्ण बाजारपेठेत बरीच देवळं आहेत. मग, मूर्तिपूजेने भरलेल्या या शहरात हा आवेशी प्रेषित कशा प्रकारे प्रचार करणार आहे? तो स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून, लोक सहमत होतील अशा मुद्द्यांवर त्यांच्याशी बोलू शकेल का? या शहरात त्याला असे थोडेतरी लोक सापडतील का, ज्यांना तो खऱ्या देवाला शोधायला आणि त्याच्याजवळ यायला मदत करू शकेल?
३ प्रेषितांची कार्यं १७:२२-३१ यात पौलने अथेन्सच्या विद्वानांना दिलेलं भाषण आपल्याला वाचायला मिळतं. हे भाषण म्हणजे लोकांच्या भावना न दुखावता, त्यांच्याशी प्रभावीपणे आणि विचारपूर्वक कसं बोलावं, याचा एक फार चांगला नमुना आहे. पौलच्या त्या भाषणाचं परीक्षण केल्यामुळे आपल्याला बरंच काही शिकायला मिळेल. खासकरून, ऐकणारे सहमत होतील अशा मुद्द्यांवर त्यांच्याशी कसं बोलावं आणि त्यांना विचार करायला कशी मदत करावी, हे आपण शिकू शकतो.
पौल “बाजारात” शिकवतो (प्रे. कार्यं १७:१६-२१)
४, ५. पौलने अथेन्समध्ये कुठे प्रचार केला आणि तो ज्यांच्याशी बोलला त्यांना प्रचार करणं सोपं का नव्हतं?
४ पौल इ.स. ५० च्या आसपास त्याच्या दुसऱ्या मिशनरी दौऱ्याच्या वेळी अथेन्सला आला. a सीला आणि तीमथ्य यांची बिरुयाहून येण्याची वाट पाहत असताना पौल नेहमीप्रमाणे, “सभास्थानात यहुद्यांशी . . . तर्क करू लागला.” तसंच, अथेन्समध्ये राहणाऱ्या यहुदी नसलेल्या इतर लोकांशी बोलण्याची संधी मिळावी, म्हणून तो “बाजारात” गेला. (प्रे. कार्यं १७:१७) ॲक्रोपोलिस टेकडीच्या उत्तरपश्चिम दिशेला असलेली अथेन्सची ही बाजारपेठ, जवळजवळ १२ एकर जागेवर पसरली होती. ही बाजारपेठ फक्त खरेदी-विक्री करण्याचं ठिकाण नव्हतं. तर, ते शहराचं मुख्य सार्वजनिक ठिकाण होतं. एका संदर्भ ग्रंथात असं सांगितलं आहे, की अथेन्सची बाजारपेठ ही “शहराचं आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक केंद्रस्थान” होतं. अथेन्सच्या लोकांना इथे जमून मोठमोठ्या विषयांवर चर्चा करायला खूप आवडायचं.
५ बाजारात पौलला जे लोक भेटले, त्यांना प्रचार करणं सोपं नव्हतं. पौलचा संदेश ऐकणाऱ्यांमध्ये एपिकूर आणि स्तोयिक या पंथांचे लोक होते. या दोन्ही तत्त्वज्ञानी पंथांचे विचार एकमेकांच्या विरोधात होते. b एपिकूर पंथाच्या लोकांचा असा विश्वास होता, की सर्व सृष्टी आपोआप अस्तित्वात आली. जीवनाबद्दल त्यांच्या दृष्टिकोनाचा थोडक्यात सारांश असा होता: “देवाला घाबरण्याची गरज नाही; मृत्यूमुळे कोणत्याही वेदना होत नाहीत; जीवनात चांगल्या गोष्टी मिळवणं आणि वाईट गोष्टी सोसणं शक्य आहे.” दुसरीकडे पाहता, स्तोयिक पंथाचे लोक तर्कावर भर द्यायचे; देव एक व्यक्ती आहे असं ते मानत नव्हते. ख्रिस्ताचे शिष्य शिकवत असलेल्या पुनरुत्थानावर एपिकूर किंवा स्तोयिक या दोन्ही पंथांच्या लोकांचा विश्वास नव्हता. साहजिकच या दोन पंथांच्या विचारांचा, पौल प्रचार करत असलेल्या संदेशाशी अजिबात ताळमेळ नव्हता. या पंथांचे विचार तत्त्वज्ञानावर आधारित होते, तर पौल शिकवत असलेल्या गोष्टी खऱ्या ख्रिस्ती विश्वासाच्या, उच्च दर्जाच्या सत्यावर आधारित होत्या.
६, ७. ग्रीक विद्वानांपैकी काहींनी पौलच्या शिकवणींना कसा प्रतिसाद दिला, आणि आजही कदाचित काही लोक आपल्याला कसा प्रतिसाद देतील?
६ या ग्रीक विद्वानांनी पौलच्या शिकवणीला कसा प्रतिसाद दिला? काहींनी त्याला ‘वटवट्या’ म्हटलं. (अभ्यासासाठी माहिती-प्रे. कार्यं १७:१८, nwtsty-E; टेहळणी बुरूज०३ ७/१५ पृ. २२ परि. ३) ज्या ग्रीक शब्दाचं वटवट्या असं भाषांतर केलं आहे, त्या शब्दाबद्दल एका विद्वानाने असं म्हटलं, “हा शब्द मुळात, इकडे-तिकडे उड्या मारत, दाणे वेचणाऱ्या एका लहानशा पक्ष्यासाठी वापरला जायचा. नंतर, तो अशा व्यक्तींच्या संदर्भात वापरला जाऊ लागला, जे बाजारात उरल्या-सुरल्या खाण्याच्या वस्तू आणि रद्दी उचलत फिरायचे. पुढे हा शब्द लाक्षणिक अर्थाने अशा कोणत्याही व्यक्तीसाठी वापरला जाऊ लागला, जी इकडून-तिकडून माहिती गोळा करते; आणि विशेषतः अशी व्यक्ती जिला ती माहिती नीट समजत नाही.” दुसऱ्या शब्दांत ते विद्वान असं म्हणत होते, की पौल इकडून-तिकडून ऐकलेल्या गोष्टी सांगत फिरणारा एक अडाणी माणूस आहे. पण, आपण पुढे पाहणारच आहोत, की त्या लोकांनी पौलला अशी नावं ठेवली, तरी तो त्यांना घाबरला नाही.
७ आजही परिस्थिती बदललेली नाही. यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण बायबलच्या आधारावर ज्या गोष्टी मानतो, त्यांमुळे बरेच लोक आपल्याला नावं ठेवतात. उदाहरणार्थ, काही शिक्षक असं शिकवतात की उत्क्रांतिवाद खरा आहे आणि प्रत्येक सुशिक्षित माणसाने तो मानलाच पाहिजे. दुसऱ्या शब्दांत, त्यांचं असं म्हणणं आहे, की जे ही शिकवण मान्य करत नाहीत, ते सगळे अडाणी आहेत. आपण बायबलमधून लोकांना शिकवतो आणि सर्व गोष्टी एका सृष्टिकर्त्याने निर्माण केल्या आहेत असं सांगतो; पण, या विद्वानांना आपण सांगत असलेल्या गोष्टी म्हणजे नुसतीच निरर्थक ‘वटवट’ आहे असं वाटतं. असं असलं तरी, आपण त्यांच्या अशा बोलण्याला घाबरत नाही. उलट, आपण आत्मविश्वासाने लोकांशी बोलतो. पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींची रचना एका बुद्धिमान निर्माणकर्त्याने केली आहे, हा आपला विश्वास आपण त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो.—प्रकटी. ४:११.
८. (क) पौलचा संदेश ऐकणाऱ्यांपैकी काहींची प्रतिक्रिया कशी होती? (ख) पौलला अरीयपगला का नेण्यात आलं? (तळटीप पाहा.)
८ बाजारात पौलचा संदेश ऐकणाऱ्या इतरांची प्रतिक्रिया थोडी वेगळी होती. ते म्हणाले, “हा कुठल्यातरी परक्या दैवतांचा प्रचारक दिसतोय.” (प्रे. कार्यं १७:१८) पौल खरोखरच अथेन्सच्या लोकांना कोणत्या नवीन देवांबद्दल सांगत होता का? असं असलं, तर ही फार गंभीर गोष्ट होती. कारण, काही शतकांआधी सॉक्रेटीसवर खटला चालवून त्याला मृत्युदंड देण्यात आला, तेव्हा त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांपैकी हाही एक आरोप होता. म्हणूनच, लोकांनी पौलला अरीयपगच्या सभेपुढे नेलं आणि अथेन्सच्या लोकांना नवीन वाटलेल्या या शिकवणीचं स्पष्टीकरण द्यायला सांगितलं. c पण, शास्त्रवचनांबद्दल काहीही माहीत नसलेल्या या लोकांना पौल आपल्या संदेशाबद्दल कसं सांगणार होता?
“अथेन्सच्या माणसांनो, . . . माझ्या पाहण्यात आलंय” (प्रे. कार्यं १७:२२, २३)
९-११. (क) ऐकणारे सहमत होतील अशा विषयावर पौल त्यांच्याशी कसं बोलला? (ख) आपण आपल्या सेवाकार्यात पौलच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो?
९ पौलने अथेन्समधल्या मूर्ती आणि प्रतिमा पाहिल्या तेव्हा तो किती चिडला होता हे तुम्हाला आठवत असेल. पण, मागचा-पुढचा विचार न करता, मूर्तिपूजेची कडक शब्दांत टीका करण्याऐवजी त्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं. त्याच्यासमोर असलेल्या लोकांच्या भावनांचा विचार करून तो खूप समजूतदारपणे बोलला आणि ते सहमत होतील असा एक मुद्दा त्याने मांडला. तो म्हणाला: “अथेन्सच्या माणसांनो, तुम्ही सगळ्या बाबतींत देवीदेवतांची इतरांपेक्षा जास्त भीती बाळगता, असं माझ्या पाहण्यात आलंय.” (प्रे. कार्यं १७:२२) एका अर्थाने, पौल त्यांना असं म्हणत होता, ‘तुम्ही खूप धार्मिक वृत्तीचे दिसता.’ पौलने धार्मिक असल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. खोट्या विश्वासांमुळे आंधळ्या झालेल्या या लोकांमध्ये काही चांगल्या मनाचे लोकही नक्कीच असतील, हे त्याने ओळखलं. कारण, त्याला जाणीव होती, की तो स्वतःसुद्धा एकेकाळी “अज्ञानामुळे आणि विश्वास नसल्यामुळे” वाईट वागला होता.—१ तीम. १:१३.
१० ऐकणारे सहमत होतील अशा मुद्द्यांवर पुढे बोलत, पौलने अथेन्सच्या लोकांच्या धार्मिक वृत्तीच्या आणखी एका पुराव्याचा उल्लेख केला. तो पुरावा म्हणजे, त्यांनी एका “अज्ञात” देवासाठी बांधलेली वेदी. एका पुस्तकानुसार “‘अज्ञात देवांसाठी’ वेदी बांधण्याची पद्धत ग्रीक लोकांमध्ये सामान्य होती. देवांपैकी एखाद्याची उपासना न केल्यामुळे त्या देवाचा कोप होईल या भीतीने ते अशा वेदी बांधायचे.” अज्ञात देवासाठी वेदी बांधून अथेन्सचे लोक अशा एका देवाचं अस्तित्व मान्य करत होते, ज्याच्याबद्दल त्यांना माहीत नव्हतं. पौलने या वेदीचा उल्लेख करून तो प्रचार करत असलेल्या आनंदाच्या संदेशाकडे त्या लोकांचं लक्ष वेधलं. तो त्यांना म्हणाला: “तुम्ही न जाणता ज्याची उपासना करत आहात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो.” (प्रे. कार्यं १७:२३) पौलने त्यांच्याशी काळजीपूर्वक, पण खूप प्रभावीपणे तर्क केला. काहींनी त्याच्यावर आरोप लावल्याप्रमाणे, तो कोणत्याही नवीन देवाबद्दल प्रचार करत नव्हता. तर त्यांच्यासाठी अज्ञात असलेल्या देवाबद्दल, म्हणजेच खऱ्या देवाबद्दल त्यांना सांगत होता.
११ आपण आपल्या सेवाकार्यात पौलच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो? जर आपण लक्ष दिलं, तर एखाद्या व्यक्तीच्या पेहरावावरून किंवा तिच्या घरात किंवा अंगणात असलेल्या एखाद्या गोष्टीवरून, ती धार्मिक वृत्तीची असल्याचं आपल्या लक्षात येईल. अशा व्यक्तीला आपण म्हणू शकतो: ‘तुम्ही धार्मिक आहात असं वाटतं. आज आम्ही तुमच्यासारख्याच लोकांची भेट घेत आहोत.’ धर्माबद्दल आवड असल्याबद्दल त्या व्यक्तीची प्रशंसा केल्यामुळे, आपल्याला असा एखादा विषय मिळू शकतो ज्याच्याशी ती व्यक्ती कदाचित सहमत होईल. मग, त्या आधारावर आपण तिच्याशी पुढे बोलू शकतो. कोणाच्याही धार्मिक विश्वासांवरून त्यांच्याबद्दल आधीच मत बनवण्याची आपली इच्छा नाही. कारण, आज आपल्या बांधवांमध्ये असे अनेक जण आहेत जे पूर्वी खोट्या धार्मिक विश्वासांचं अगदी प्रामाणिकपणे पालन करायचे.
“देव आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही” (प्रे. कार्यं १७:२४-२८)
१२. ऐकणाऱ्यांचा विचार करून पौलने आपल्या बोलण्याच्या पद्धतीत कोणते बदल केले?
१२ ऐकणारे सहमत होतील अशा विषयावर पौलने बोलायला सुरुवात तर केली होती, पण पुढेही त्यांना साक्ष देताना ते सहमत होतील अशा विषयांवर बोलणं त्याला शक्य झालं का? ते लोक ग्रीक तत्त्वज्ञान शिकले होते, पण शास्त्रवचनांबद्दल त्यांना जास्त ज्ञान नव्हतं हे पौलला माहीत होतं. त्यामुळे, त्याने आपल्या बोलण्याच्या पद्धतीत काही बदल केले. पहिली गोष्ट म्हणजे, त्याने शास्त्रवचनांचा थेट उल्लेख न करता त्यांना बायबलच्या शिकवणी सांगितल्या. दुसरी गोष्ट म्हणजे, “आपल्यापैकी” आणि “आपण” यांसारख्या शब्दांचा अधूनमधून वापर करून पौलने आपणही त्यांच्यापैकी एक असल्याचं दाखवलं. तिसरी गोष्ट म्हणजे, तो शिकवत असलेल्या काही गोष्टी त्या लोकांच्या पुस्तकांमध्येही सांगितलेल्या आहेत, हे दाखवण्यासाठी त्याने काही ग्रीक लेखकांचे शब्द वापरले. आता आपण पौलच्या त्या प्रभावी भाषणाचं परीक्षण करू या. अथेन्सच्या लोकांसाठी अज्ञात असलेल्या देवाबद्दल पौलने त्यांना कोणकोणती महत्त्वाची सत्यं सांगितली?
१३. विश्व कसं अस्तित्वात आलं याबद्दल पौलने काय सांगितलं, आणि त्याला नेमकं काय म्हणायचं होतं?
१३ देवाने विश्व निर्माण केलं. पौल म्हणाला: “ज्या देवाने हे जग आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी बनवल्या, तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक असल्यामुळे हातांनी बनवलेल्या मंदिरांत राहत नाही.” d (प्रे. कार्यं १७:२४) हे विश्व आपोआप अस्तित्वात आलं नाही. खरा देव सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे. (स्तो. १४६:६) तो अथेना देवीसारखा किंवा त्या इतर देवीदेवतांसारखा नाही. मंदिरं, देवळं आणि वेदी बांधून या देवीदेवतांचा गौरव केला जातो. पण, स्वर्ग आणि पृथ्वीचा सर्वोच्च प्रभू हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही. (१ राजे ८:२७) पौलला जे म्हणायचं होतं ते अगदी स्पष्ट होतं: खरा देव माणसांनी बांधलेल्या मंदिरांतल्या, हातांनी घडवलेल्या मूर्तींपेक्षा कित्येक पटीने महान आहे.—यश. ४०:१८-२६.
१४. देव माणसांवर अवलंबून नाही हे पौलने कसं दाखवलं?
१४ देव मानवांवर अवलंबून नाही. अथेन्सचे मूर्तिपूजक लोक सहसा त्यांच्या मूर्तींना महागडी वस्त्रं घालायचे, त्यांना मौल्यवान वस्तू अर्पण करायचे, तसंच खाण्यापिण्याच्या वस्तू त्यांच्यासमोर ठेवायचे. जणू त्या मूर्तींना या सगळ्या गोष्टींची गरज होती! पण, देवाला माणसांकडून कोणत्याच गोष्टीची गरज नाही, असं पौलने त्यांना सांगितलं. पौलचं भाषण ऐकणाऱ्या ग्रीक तत्त्वज्ञानी लोकांपैकी निदान काहींना तरी ही गोष्ट मान्य असावी. तसं असलं, तर पौलच्या पुढच्या शब्दांशी ते नक्कीच सहमत झाले असतील. तो म्हणाला, “माणसांच्या हातच्या सेवेचीही त्याला गरज नाही. कारण त्याला तर कशाचीच कमी नाही.” खरंच, निर्माणकर्त्या देवाला माणूस कोणतीही वस्तू देऊ शकत नाही. उलट, देवच माणसांच्या सर्व गरजा पुरवतो. “तोच सगळ्यांना जीवन, श्वास आणि इतर सगळ्या गोष्टी,” म्हणजेच ऊन, पाऊस आणि सुपीक जमीन देतो. (प्रे. कार्यं १७:२५; उत्प. २:७) त्यामुळे, माणसांच्या सर्व गरजा पुरवणारा देव, स्वतः कशासाठीही त्यांच्यावर अवलंबून नाही.
१५. ग्रीक नसलेल्या लोकांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या अथेन्सच्या लोकांना पौलने बायबलमधलं सत्य कसं सांगितलं, आणि आपण त्याच्याकडून कोणता महत्त्वाचा धडा शिकू शकतो?
१५ देवाने माणसांना बनवलं. अथेन्सचे लोक स्वतःला ग्रीक नसलेल्या लोकांपेक्षा श्रेष्ठ समजायचे. पण स्वतःच्या राष्ट्राबद्दल किंवा जातीबद्दल अभिमान बाळगणं हे बायबलमधल्या सत्याच्या विरोधात आहे. (अनु. १०:१७) या नाजूक विषयावर बोलताना पौल त्या लोकांच्या भावनांचा विचार करून खूप सांभाळून आणि कुशलतेने बोलला. देवाने “एका माणसाद्वारे सगळी राष्ट्रं बनवली,” असं म्हणून पौलने आपलं ऐकणाऱ्यांना विचार करायला लावलं. (प्रे. कार्यं १७:२६) पौल या ठिकाणी माणसांचा पहिला पूर्वज आदाम याच्याविषयी उत्पत्तीच्या पुस्तकात दिलेल्या अहवालाबद्दल सांगत होता. (उत्प. १:२६-२८) सर्व माणसं एकाच पूर्वजापासून आले असल्यामुळे कोणतीही जात किंवा राष्ट्र दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही. ही गोष्ट पौलचं भाषण ऐकणाऱ्यांपैकी कोणीच नाकारू शकत नव्हतं. पौलच्या उदाहरणातून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. साक्षकार्य करताना लोकांच्या भावनांचा विचार करून समजूतदारपणे बोलणं नक्कीच महत्त्वाचं आहे. पण, फक्त इतरांनी आपला संदेश स्वीकारावा म्हणून आपण कधीही बायबलच्या सत्याचा एखादा भाग त्यांच्यापासून मुद्दामहून लपवून ठेवणार नाही.
१६. निर्माणकर्त्याने माणसांना कोणत्या उद्देशाने बनवलं?
१६ माणसांचा आपल्यासोबत जवळचा संबंध असावा अशी देवाची इच्छा आहे. माणसांच्या जीवनाचा उद्देश काय आहे, याबद्दल पौलचं भाषण ऐकणाऱ्या त्या तत्त्वज्ञानी लोकांनी कितीही वाद केला असता, तरी या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर त्यांना कधीच देता आलं नसतं. पण, निर्माणकर्त्याने माणसांना कोणत्या उद्देशाने बनवलं होतं हे पौलने त्या लोकांना स्पष्टपणे सांगितलं. तो उद्देश म्हणजे, “माणसांनी त्याचा शोध घ्यावा आणि चाचपडत चाचपडत शेवटी तो त्यांना सापडावा. मुळात, देव आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.” (प्रे. कार्यं १७:२७) अथेन्सच्या लोकांसाठी खरा देव अज्ञात असला, तरी त्याला जाणून घेणं त्यांना अशक्य नव्हतं. खरंतर, जे प्रामाणिक मनाने त्याचा शोध घेतात आणि त्याच्याबद्दल शिकून घेतात अशा कोणत्याही व्यक्तीपासून तो दूर नाही. (स्तो. १४५:१८) पौलने या वचनात “आपल्यापैकी” असं म्हटलं याकडे लक्ष द्या. असं बोलून त्याने स्वतःलाही त्या लोकांमध्ये सामील केलं, ज्यांनी “चाचपडत” देवाचा “शोध” घेतला पाहिजे.
१७, १८. माणसांना देवाची ओढ का वाटली पाहिजे, आणि पौल आपल्या श्रोत्यांशी ज्या पद्धतीने बोलला त्यावरून आपण काय शिकू शकतो?
१७ माणसांना देवाबद्दल ओढ वाटली पाहिजे. पौल म्हणाला, देवामुळेच “आपण जिवंत आहोत आणि चालतो-फिरतो; त्याच्यामुळेच आपलं अस्तित्व आहे.” काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे, की पौल इथे इ.स.पू. सहाव्या शतकात होऊन गेलेला क्रेत इथला कवी एपिमेनिडीझ याच्या शब्दांचा उल्लेख करत होता. अथेन्सच्या धार्मिक परंपरांवर या कवीचा बराच प्रभाव होता. माणसांना देवाची ओढ का वाटली पाहिजे, याचं आणखी एक कारण पौलने सांगितलं. तो म्हणाला: “तुमच्या काही कवींनीसुद्धा म्हटलंय, की ‘आपण सगळे त्याची मुलं आहोत.’” (प्रे. कार्यं १७:२८) माणसांना देवाबद्दल आपुलकी वाटली पाहिजे कारण त्यानेच पहिल्या माणसाची निर्मिती केली आणि त्या माणसापासूनच इतर सर्व लोक आले आहेत. आपल्या श्रोत्यांना आपलं बोलणं पटावं म्हणून पौलने काही ग्रीक लिखाणांतल्या शब्दांचा वापर केला. हे योग्यच होतं, कारण त्याचं भाषण ऐकणाऱ्यांच्या मनात या लिखाणांबद्दल आदर होता. e पौलप्रमाणेच, आपणही ऐतिहासिक ग्रंथ, ज्ञानकोश किंवा इतर सुप्रसिद्ध संदर्भग्रंथ यांतल्या शब्दांचा अधूनमधून वापर करू शकतो. उदाहरणार्थ, साक्षीदार नसलेल्या व्यक्तीला एखादी धार्मिक प्रथा किंवा सण खोट्या धर्मातून आला आहे, हे पटवून सांगण्यासाठी आपण एखाद्या प्रसिद्ध ग्रंथातून त्याविषयीची योग्य माहिती सांगू शकतो.
१८ पौलने आपल्या भाषणात आतापर्यंत आपल्या श्रोत्यांचा विचार करून, देवाबद्दलची महत्त्वाची सत्यं त्यांना पटतील अशा पद्धतीने खूप कुशलतेने सांगितली. ही मौल्यवान माहिती मिळाल्यावर अथेन्सच्या लोकांनी काय करावं असं पौलला वाटत होतं? त्याने लगेच आपल्या भाषणात या गोष्टीचा खुलासा केला.
सर्व लोकांनी “पश्चात्ताप करावा” (प्रे. कार्यं १७:२९-३१)
१९, २०. (क) माणसांनी तयार केलेल्या मूर्तींची उपासना करणं चुकीचं आहे, हे पौलने कुशलतेने कसं दाखवलं? (ख) पौलचं भाषण ऐकणाऱ्यांनी काय करणं गरजेचं होतं?
१९ आपल्या श्रोत्यांनी नेमकं काय केलं पाहिजे हे त्यांना सांगण्यासाठी आता पौल तयार होता. ग्रीक लिखाणांतून सांगितलेल्या शब्दांची त्यांना पुन्हा आठवण करून देत तो म्हणाला: “तर मग, आपण देवाची मुलं असल्यामुळे कधीही असा विचार करू नये, की देव सोनं, चांदी किंवा दगड यांसारखा, किंवा माणसांनी आपल्या कलाकौशल्याने घडवलेल्या एखाद्या वस्तूसारखा आहे.” (प्रे. कार्यं १७:२९) माणसांना देवाने बनवलं हे जर खरं आहे, तर मग माणसांनी तयार केलेल्या मूर्तींमध्ये देव कसा काय असू शकतो? पौलने कुशलतेने केलेल्या या तर्कामुळे माणसांनी बनवलेल्या मूर्तींची उपासना करणं किती व्यर्थ आहे, हे अगदी स्पष्ट झालं. (स्तो. ११५:४-८; यश. ४४:९-२०) “आपण . . . कधीही असा विचार करू नये” असं म्हणून पौलने स्वतःला सामील केल्यामुळे, त्याने दिलेलं ताडन स्वीकारणं त्या लोकांना नक्कीच थोडं सोपं गेलं असावं.
२० त्या लोकांनी योग्य पाऊल उचलणं किती महत्त्वाचं होतं हे पौलने त्यांना स्पष्टपणे सांगितलं. तो म्हणाला, “पूर्वी लोक अज्ञानामुळे असं वागले, पण देवाने त्या काळाकडे [मूर्तींची उपासना करून देवाचं मन आनंदित करता येतं असं समजण्याच्या काळाकडे] दुर्लक्ष केलंय. आता तो सगळ्या लोकांना सांगतोय, की त्यांनी पश्चात्ताप करावा.” (प्रे. कार्यं १७:३०) पश्चात्ताप करण्याचा हा सल्ला ऐकून पौलचं भाषण ऐकणाऱ्यांपैकी काहींना कदाचित धक्का बसला असेल. पण, त्याच्या प्रभावी भाषणातून त्याने स्पष्ट केलं, की देवानेच त्यांना जीवन दिलं असल्यामुळे त्यांना आपल्या कार्यांबद्दल देवाला हिशोब द्यावा लागेल. त्यांनी देवाचा शोध घेणं, त्याच्याविषयीचं सत्य जाणून घेणं आणि आपलं पूर्ण जीवन त्याच्या इच्छेनुसार जगणं गरजेचं होतं. देवाच्या इच्छेनुसार जगण्यासाठी अथेन्सच्या लोकांनी, आपण मूर्तिपूजा करून पाप करत आहोत हे कबूल करणं आणि ते सोडून देणं फार गरजेचं होतं.
२१, २२. पौलने कोणत्या प्रभावी शब्दांनी आपल्या भाषणाचा शेवट केला, आणि त्याचे शब्द आज आपल्यासाठीही महत्त्वाचे का आहेत?
२१ पौलने या प्रभावी शब्दांनी आपल्या भाषणाचा शेवट केला: “त्याने [देवाने] एक दिवस ठरवलाय, आणि त्या दिवशी त्याने नियुक्त केलेल्या एका माणसाद्वारे संपूर्ण जगाचा नीतिमत्त्वाने न्याय करायचा संकल्प केलाय. आणि त्या माणसाला मेलेल्यांतून उठवून त्याने सगळ्या लोकांना या गोष्टीची खातरी दिली आहे.” (प्रे. कार्यं १७:३१) भविष्यात न्यायाचा दिवस येणार असल्यामुळे, त्या लोकांनी खऱ्या देवाला शोधणं आणि त्याला प्राप्त करून घेणं किती महत्त्वाचं होतं! देवाने न्याय करण्यासाठी कोणाला निवडलं होतं हे पौलने त्यांना सांगितलं नाही. त्याऐवजी, या न्यायाधीशाबद्दल पौलने त्यांना आश्चर्य वाटेल अशी माहिती दिली. त्याने सांगितलं, की तो माणूस म्हणून जगला, त्याचा मृत्यू झाला आणि देवाने त्याला मेलेल्यांतून उठवलं!
२२ पौलने भाषणाच्या शेवटी बोललेले ते लक्षवेधक शब्द आज आपल्यासाठीही खूप महत्त्वाचे आहेत. देवाने नियुक्त केलेला न्यायाधीश हा पुनरुत्थान झालेला येशू ख्रिस्त आहे, हे आपल्याला माहीत आहे. (योहा. ५:२२) तसंच, न्यायाचा तो दिवस हजार वर्षांचा असेल आणि तो फार जवळ आला आहे हेही आपल्याला माहीत आहे. (प्रकटी. २०:४, ६) न्यायाच्या दिवसाची आपल्याला भीती वाटत नाही, कारण त्या वेळी ज्यांचा विश्वासू म्हणून न्याय केला जाईल त्यांना असंख्य आशीर्वाद मिळतील असं बायबलमध्ये सांगितलं आहे. आणि त्या अद्भुत भविष्याची आपली आशा नक्कीच पूर्ण होईल याची खातरी आपल्याला मिळाली आहे. ती खातरी आजपर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या चमत्कारामुळे देण्यात आली. तो चमत्कार म्हणजे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान!
“काही माणसांनी विश्वास ठेवला” (प्रे. कार्यं १७:३२-३४)
२३. पौलचं भाषण ऐकल्यावर लोकांनी कोणत्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दाखवल्या?
२३ पौलच्या भाषणाला लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दाखवल्या. पुनरुत्थानाबद्दल ऐकून काही जण “थट्टा करू लागले.” इतर जणांनी पौलचं ऐकून तर घेतलं, पण लगेच विश्वास स्वीकारला नाही. ते म्हणाले: “आम्ही याबद्दल तुझ्याकडून नंतर कधीतरी ऐकू.” (प्रे. कार्यं १७:३२) पण काही मोजक्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला: “त्यांच्यापैकी काही माणसांनी विश्वास ठेवला आणि ते त्याच्यासोबत सामील झाले. त्यांच्यात, अरीयपगच्या न्यायालयात न्यायाधीश असलेला दिओनुस्य आणि दामारी नावाची एक स्त्री, तसंच इतर जणही होते.” (प्रे. कार्यं १७:३४) आपल्या सेवाकार्यातही आपल्याला असेच अनुभव येतात. काही लोक आपली थट्टा करतात; तर, इतर जण विरोध करत नसले, तरी आपल्या संदेशात आवडही दाखवत नाहीत. पण, जेव्हा काही जण राज्याच्या संदेशाचा स्वीकार करून साक्षीदार बनतात तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो.
२४. पौलने अरीयपग इथे दिलेल्या भाषणातून आपण कोणत्या गोष्टी शिकू शकतो?
२४ पौलच्या भाषणाकडे लक्ष दिलं, तर लोकांशी तर्क कसा करावा, त्यांना आपलं म्हणणं कसं पटवून द्यावं आणि श्रोत्यांचा विचार करून आपल्या बोलण्याच्या पद्धतीत बदल कसा करावा याबद्दल आपण बरंच काही शिकू शकतो. शिवाय, आपल्या भावनांवर नियंत्रण कसं ठेवावं आणि खोट्या धार्मिक विश्वासांमुळे आंधळ्या झालेल्या लोकांच्या भावना न दुखावता, त्यांच्याशी कसं बोलावं याबद्दलही आपण शिकतो. यासोबतच आपण आणखी एक महत्त्वाचा धडा शिकतो: फक्त श्रोत्यांना दुखावण्याच्या भीतीने आपण कधीही बायबलचं सत्य त्यांच्यापासून मुद्दामहून लपवून ठेवू नये. प्रेषित पौलच्या उदाहरणाचं अनुकरण केल्यामुळे आपण सेवाकार्यात आणखी प्रभावीपणे शिकवणारे बनू शकतो. आणि मंडळीत देखरेख करणारेसुद्धा बांधवांना आणखी परिणामकारक पद्धतीने कसं शिकवावं, हे पौलकडून शिकू शकतात. अशा रितीने आपण सर्व जण इतरांना मदत करू शकतो, ज्यामुळे त्यांनी देवाचा “शोध घ्यावा आणि . . . तो त्यांना सापडावा.”—प्रे. कार्यं १७:२७.
a “ अथेन्स—प्राचीन जगाची सांस्कृतिक राजधानी” ही चौकट पाहा.
b “ एपिकूर आणि स्तोयिक पंथाचे लोक” ही चौकट पाहा.
c ॲक्रोपोलिसच्या उत्तरपश्चिम दिशेला असलेलं अरीयपग इथे अथेन्सच्या मुख्य न्यायमंडळाची सभा भरायची. “अरीयपग” हा शब्द एकतर त्या न्यायमंडळाला किंवा त्या टेकडीला सूचित करू शकतो. त्यामुळे, पौलला या टेकडीवर किंवा टेकडीजवळ नेण्यात आलं, की बाजारात दुसऱ्या कोणत्या ठिकाणी त्या न्यायमंडळाच्या सभेसमोर नेण्यात आलं, याबद्दल विद्वानांमध्ये वेगवेगळी मतं आहेत.
d “जग” असं भाषांतर केलेला मूळ ग्रीक शब्द कॉस्मॉस आहे. ग्रीक लोक हा शब्द सहसा जगात राहणाऱ्या लोकांसाठी वापरायचे. पौलनेही कदाचित याच अर्थाने या शब्दाचा वापर केला असेल. आपलं बोलणं ऐकणाऱ्या ग्रीक लोकांनी आपल्याशी सहमत व्हावं म्हणून पौलने मुद्दामहून हा शब्द वापरला असेल.
e पौलने, स्तोयिक कवी अराटस याने लिहिलेल्या फीनॉमीना या ग्रह-ताऱ्यांवर आधारित असलेल्या कवितेतले शब्द वापरले. अशाच अर्थाचे शब्द इतर ग्रीक लिखाणांत, जसं की, क्लीअँथीस या स्तोयिक लेखकाच्या हिम टू झ्यूस या कवितेतही आढळतात.