अध्याय १६
“मासेदोनियात येऊन आम्हाला मदत कर”
नेमणूक स्वीकारल्यामुळे आणि छळाचा आनंदाने सामना केल्यामुळे मिळालेले आशीर्वाद
प्रे. कार्यं १६:६-४० वर आधारित
१-३. (क) पवित्र शक्तीने पौल आणि त्याच्या साथीदारांचं कशा प्रकारे मार्गदर्शन केलं? (ख) आपण कोणत्या घटनांचं परीक्षण करणार आहोत?
मासेदोनियातल्या फिलिप्पै शहरातून काही स्त्रिया निघाल्या आहेत. काही वेळातच त्या गँगिटीस नावाच्या एका अरुंद प्रवाहाच्या नदीजवळ येऊन पोहोचतात. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्या स्त्रिया नदीच्या काठावर बसून इस्राएलच्या देवाला प्रार्थना करू लागतात. यहोवाचं लक्ष या स्त्रियांकडे आहे.—२ इति. १६:९; स्तो. ६५:२.
२ त्याच वेळी, फिलिप्पैपासून ८०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर, गलतीया प्रांताच्या दक्षिणेकडे असलेल्या लुस्त्र शहरातून काही माणसं प्रवासाला निघतात. काही दिवस प्रवास केल्यानंतर ते एका रोमन महामार्गाजवळ येतात. दगडी लाद्यांचा हा रस्ता पश्चिमेकडे आशिया प्रांताच्या सर्वात गजबजलेल्या प्रदेशाकडे जातो. ती माणसं, म्हणजेच पौल, सीला आणि तीमथ्य याच रस्त्याने इफिस शहराकडे जाण्याच्या विचारात आहेत. तिथून आणखी अनेक शहरांना भेट देण्याची त्यांची इच्छा आहे. कारण, या शहरांतल्या हजारो लोकांनी अजून ख्रिस्ताबद्दलचा संदेश ऐकलेला नाही. पण, या प्रवासाला सुरुवात करण्याआधीच पवित्र शक्ती त्यांना अडवते. त्यांना नेमकं कशा प्रकारे अडवलं जातं, हे अहवालात सांगितलेलं नाही. पण, आशिया प्रांतात त्यांना प्रचार करू दिला जात नाही. का? कारण, देवाच्या पवित्र शक्तीद्वारे येशूला, पौल आणि त्याच्या साथीदारांना आशिया मायनरचा सबंध प्रदेश पार करून एजियन समुद्रापलीकडे, गँगिटीस नावाच्या त्या लहानशा नदीजवळ न्यायचं आहे.
३ मासेदोनियाला पोहोचेपर्यंत त्या अतिशय विलक्षण प्रवासात येशूने ज्या प्रकारे पौल आणि त्याच्या साथीदारांचं मार्गदर्शन केलं, त्यावरून आज आपण बरेच मौल्यवान धडे शिकू शकतो. म्हणूनच, आता आपण इ.स. ४९ च्या सुमारास सुरू झालेल्या पौलच्या दुसऱ्या मिशनरी दौऱ्याच्या वेळी घडलेल्या काही घटनांचं परीक्षण करणार आहोत.
“देवाने आम्हाला बोलावलं आहे” (प्रे. कार्यं १६:६-१५)
४, ५. (क) बिथुनिया इथे पौल आणि त्याच्या साथीदारांसोबत काय घडलं? (ख) त्यांनी कोणता निर्णय घेतला, आणि याचा काय परिणाम झाला?
४ आशियात प्रचार करण्यापासून रोखण्यात आल्यावर, पौल आणि त्याचे साथीदार उत्तर दिशेला वळले आणि बिथुनियाच्या शहरांत प्रचार करण्यासाठी जायला निघाले. तिथे पोहोचण्यासाठी त्यांना फ्रुगिया आणि गलतीयाच्या कमी लोकसंख्या असलेल्या भागांतून, कच्च्या रस्त्यांनी बरेच दिवस पायी प्रवास करावा लागला असेल. पण, ते बिथुनियाला पोहोचणार इतक्यात येशूने पुन्हा एकदा पवित्र शक्तीद्वारे त्यांना अडवलं. (प्रे. कार्यं १६:६, ७) आता मात्र ही माणसं गोंधळात पडली असावीत. कशाबद्दल प्रचार करायचा आणि कसा प्रचार करायचा हे तर त्यांना माहीत होतं, पण कुठे प्रचार करायचा हे मात्र त्यांना कळत नव्हतं. आशियाला जाण्यासाठी त्यांनी जणू एक दार ठोठावलं होतं, पण ते दार त्यांच्यासाठी उघडण्यात आलं नाही. मग, बिथुनिया इथे जाण्यासाठी त्यांनी पुन्हा दार ठोठावलं, पण यावेळीही दार उघडलं नाही. असं असूनही पौलने हार मानली नाही. जोपर्यंत एखादं दार त्यांच्यासाठी उघडलं जात नाही, तोपर्यंत प्रयत्न करत राहण्याचा त्याचा पक्का निश्चय होता. आता, पौल आणि त्याच्या साथीदारांनी एक असा निर्णय घेतला, जो कदाचित आपल्याला थोडा विचित्र वाटेल. ते पश्चिमेकडे वळले आणि एकापाठोपाठ एक शहरं पार करून, ५५० किलोमीटर चालत त्रोवसच्या बंदरात येऊन पोहोचले. या बंदरातून मासेदोनिया प्रांतात प्रवेश केला जाऊ शकत होता. (प्रे. कार्यं १६:८) इथे, पौलने तिसऱ्यांदा एक दार ठोठावलं आणि आश्चर्य म्हणजे यावेळी त्यांच्यासाठी दार लगेच उघडण्यात आलं.
५ आनंदाच्या संदेशाच्या पुस्तकाचा लेखक लूक हाही त्रोवस इथे पौल आणि त्याच्या साथीदारांसोबत प्रवासात सामील झाला. पुढे काय झालं, याविषयी तो असं सांगतो: “रात्रीच्या वेळी पौलला एक दृष्टान्त दिसला. त्याने पाहिलं, की एक माणूस त्याच्यासमोर उभा राहून त्याला अशी विनंती करत आहे: ‘मासेदोनियात येऊन आम्हाला मदत कर.’ त्याने हा दृष्टान्त पाहिल्यावर आम्ही लगेच मासेदोनियाला जायला निघालो. कारण तिथल्या लोकांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी देवाने आम्हाला बोलावलं आहे, हे आम्ही ओळखलं.” a (प्रे. कार्यं १६:९, १०) शेवटी, कुठे प्रचार करायचा हेही पौलला समजलं होतं. आपण अर्ध्यातच प्रवास थांबवला नाही याचा त्याला किती आनंद झाला असेल! आता, ते चौघं जहाजाने मासिदोनियाला निघाले.
६, ७. (क) पौलच्या प्रवासात जे घडलं त्यावरून आपण काय शिकू शकतो? (ख) पौलच्या अनुभवातून आपल्याला कोणती खातरी मिळते?
६ या अहवालातून आपण काय शिकू शकतो? विचार करा: पौल आशियाला जायला निघाला, त्यानंतरच देवाच्या पवित्र शक्तीने त्याला मार्गदर्शन दिलं. मग, तो बिथुनियाजवळ आला, त्यानंतरच येशूने त्याला तिथे जाण्यापासून रोखलं; आणि पौल त्रोवसला पोहोचला, त्यानंतरच येशूने त्याला मासेदोनियाला जाण्याची आज्ञा दिली. मंडळीचं मस्तक असलेला येशू आज आपल्यालाही कदाचित अशाच प्रकारे मार्गदर्शन करेल. (कलस्सै. १:१८) उदाहरणार्थ, आपण काही काळापासून कदाचित पायनियर सेवा करण्याचा, किंवा राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या भागात राहायला जाण्याचा विचार करत असू. पण, आपलं हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण निश्चित पावलं उचलल्यानंतरच येशू, देवाच्या पवित्र शक्तीद्वारे आपलं मार्गदर्शन करेल. असं आपण का म्हणू शकतो? या उदाहरणाचा विचार करा: कारचा ड्रायव्हर डावीकडे किंवा उजवीकडे कार वळवू शकतो. पण, ती कार चालू असेल तरच तो असं करू शकेल. त्याच प्रकारे, आपलं सेवाकार्य वाढवण्यासाठी येशू नक्कीच आपलं मार्गदर्शन करेल. पण, जर आपण यासाठी पावलं उचलली असतील, म्हणजेच जर आपण अगदी मनापासून प्रयत्न करत असलो, तरच तो आपलं मार्गदर्शन करेल.
७ समजा आपल्या प्रयत्नांना लगेच यश आलं नाही, तर काय? देवाची पवित्र शक्ती आपलं मार्गदर्शन करत नाही, असा विचार करून आपण प्रयत्नच सोडून द्यावा का? नाही. पौलच्या मार्गातही अडथळे आले होते, हे विसरू नका. पण, तो दार ठोठावत राहिला आणि शेवटी त्याच्यासाठी एक दार उघडलं गेलं. आपणही “सेवा करता यावी, म्हणून संधीचं एक मोठं दार” उघडावं यासाठी हार न मानता प्रयत्न करत राहिलो, तर आपल्यालाही असाच आशीर्वाद मिळेल.—१ करिंथ. १६:९.
८. (क) फिलिप्पै शहराचं वर्णन करा. (ख) पौलने एका प्रार्थनेच्या ठिकाणी प्रचार केल्यामुळे कोणती आनंदाची घटना घडली?
८ मासेदोनिया प्रांतात आल्यावर पौल आणि त्याचे साथीदार फिलिप्पै शहरात गेले. या शहरातल्या लोकांना ते रोमन नागरिक असल्याचा फार अभिमान होता. तिथे राहणाऱ्या निवृत्त रोमन सैनिकांसाठी फिलिप्पैची ती वसाहत लहानशा इटलीसारखीच होती. जणू काही, मासेदोनियातच छोटंसं रोम! शहराच्या फाटकाबाहेर एका अरुंद प्रवाहाच्या नदीजवळ आल्यावर त्या मिशनरी बांधवांना एक असं ठिकाण दिसलं, जे त्यांना प्रार्थनेचं ठिकाण वाटलं. b शब्बाथाच्या दिवशी, ते त्या ठिकाणी गेले आणि तिथे त्यांना देवाची उपासना करण्यासाठी जमलेल्या अनेक स्त्रिया दिसल्या. तेव्हा बांधव खाली बसून त्यांच्याशी बोलू लागले. तिथे लुदिया नावाची एक स्त्रीसुद्धा होती. ती “लक्ष देऊन ऐकत होती. तेव्हा, . . . यहोवाने तिचं मन पूर्णपणे उघडलं.” मिशनरी बांधवांकडून ऐकलेल्या गोष्टींचा लुदियावर इतका प्रभाव पडला, की तिने आणि तिच्या घरातल्या लोकांनीही बाप्तिस्मा घेतला. मग, तिने पौल आणि त्याच्यासोबत प्रवास करत असलेल्या बांधवांना खूप आग्रह करून आपल्या घरी राहण्यासाठी नेलं. c—प्रे. कार्यं १६:१३-१५.
९. आज बऱ्याच जणांनी पौलच्या उदाहरणाचं अनुकरण कसं केलं आहे, आणि यामुळे त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?
९ लुदियाचा बाप्तिस्मा झाला तेव्हा सर्वांना किती आनंद झाला असेल! “मासेदोनियात येऊन आम्हाला मदत कर” हे निमंत्रण स्वीकारल्याचं पौलला खरंच खूप समाधान वाटलं असेल. तसंच, देवाची उपासना करणाऱ्या त्या स्त्रियांच्या प्रार्थनांचं उत्तर देण्यासाठी यहोवाने आपला आणि आपल्या साथीदारांचा उपयोग केला, याचाही पौलला आनंद झाला असेल. आजही कित्येक तरुण व वयस्कर, विवाहित व अविवाहित भाऊबहीण, राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या भागांत राहायला गेले आहेत. हे खरं आहे की तिथे त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. पण, लुदियासारखे लोक जेव्हा बायबलमधलं सत्य स्वीकारतात तेव्हा त्यांना इतकं समाधान मिळतं, की त्यापुढे त्या अडचणींचं त्यांना काहीच वाटत नाही. तुम्हीही आपल्या जीवनात फेरबदल करून जास्त गरज असलेल्या एखाद्या क्षेत्रात मदत करण्यासाठी जाऊ शकता का? असं केल्यामुळे तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळतील. उदाहरणार्थ, एरन हा विशीत असलेला एक बांधव मध्य अमेरिकेतल्या एका देशात राहायला गेला. त्याच्या अनुभवाबद्दल सांगताना तो म्हणतो, की “दुसऱ्या देशात जाऊन सेवा केल्यामुळे मला आध्यात्मिक प्रगती करायला आणि यहोवाच्या आणखी जवळ जायला मदत मिळाली. आणि इथे प्रचारकार्यही खूप छान असतं. मी सध्या आठ बायबल अभ्यास घेतो!” इतर बऱ्याच जणांनाही असाच अनुभव आला आहे.
“जमावाने त्यांच्यावर हल्ला केला” (प्रे. कार्यं १६:१६-२४)
१०. पौल आणि त्याच्या साथीदारांसाठी समस्या निर्माण करण्यात दुष्ट स्वर्गदूतांचा कशा प्रकारे हात होता?
१० सैतानाचा नक्कीच खूप संताप झाला असेल. कारण जगातल्या ज्या भागात आतापर्यंत त्याचा आणि त्याच्या दुष्ट स्वर्गदूतांचाच प्रभाव होता, तिथे आता आनंदाचा संदेश लोकांना सांगितला जात होता. यामुळे, काही काळातच पौल आणि त्याच्या साथीदारांच्या कामात समस्या निर्माण झाल्या. यामागे दुष्ट स्वर्गदूतांचा हात होता, यात शंका नाही! पण पौल आणि त्याचे साथीदार प्रार्थनेच्या त्या ठिकाणी लोकांना शिकवण्यासाठी जात राहिले. तेव्हा, दुष्ट स्वर्गदूताने पीडित असलेली एक मुलगी त्यांना भेटली. ती एक दासी होती आणि भविष्य सांगून आपल्या मालकांना पैसे मिळवून द्यायची. ती पौल आणि त्याच्या साथीदारांच्या मागेमागे जाऊन असं ओरडायची: “ही माणसं सर्वोच्च देवाचे सेवक आहेत आणि तुम्हाला तारणाचा मार्ग घोषित करत आहेत.” त्या मुलीच्या भविष्यवाण्याही पौलच्या शिकवणींप्रमाणेच देवाकडून आहेत, हे दाखवण्यासाठी कदाचित त्या दुष्ट स्वर्गदूतानेच तिला असं म्हणायला लावलं असेल. ख्रिस्ताच्या खऱ्या शिष्यांपासून दुसरीकडे लक्ष वळवणं हा त्यामागचा उद्देश असेल. पण, पौलने दुष्ट स्वर्गदूताला बाहेर काढून त्या मुलीला शांत केलं.—प्रे. कार्यं १६:१६-१८.
११. मुलीतून दुष्ट स्वर्गदूताला काढल्यावर पौल आणि सीला यांच्यासोबत काय घडलं?
११ आता आपल्याला पैसे मिळणार नाहीत, हे पाहून त्या मुलीच्या मालकांना खूप राग आला. त्यांनी पौल आणि सीला यांना बाजारात अधिकाऱ्यांपुढे फरफटत नेलं. हे रोमन अधिकारी न्यायिक वाद सोडवणारे न्यायाधीश होते. मुलीच्या मालकांनी त्यांच्याविरुद्ध न्यायाधीशांमध्ये असलेला भेदभाव आणि देशप्रेमाची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि थोडक्यात असं म्हणाले: ‘ही यहुदी माणसं खळबळ माजवत आहेत आणि असे रितीरिवाज मानायला शिकवतात, जे रोमी लोकांसाठी योग्य नाहीत.’ त्यांच्या या शब्दांचा लगेच परिणाम झाला. “लोकांच्या [बाजारातल्या] जमावाने त्यांच्यावर [पौल आणि सीला] हल्ला केला” आणि अधिकाऱ्यांनी “त्यांना काठ्यांनी मारायचा हुकूम दिला.” यानंतर पौल आणि सीला यांना तुरुंगात टाकण्यात आलं. तुरुंगाच्या अधिकाऱ्याने त्यांना आतल्या कोठडीत डांबलं आणि त्यांचे पाय खोड्यांत अडकवले. (प्रे. कार्यं १६:१९-२४) तुरुंगाच्या अधिकाऱ्याने दार बंद केल्यावर कोठडीत इतका अंधार झाला, की पौल आणि सीला एकमेकांना पाहूही शकत नव्हते. पण यहोवाची नजर मात्र त्याच्या या सेवकांवर होती.—स्तो. १३९:१२.
१२. (क) ख्रिस्ताच्या शिष्यांनी छळाकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं आणि का? (ख) आजही सैतान आणि त्याचे लोक कोणकोणत्या मार्गांनी आपला विरोध करतात?
१२ बऱ्याच वर्षांआधी येशूने त्याच्या शिष्यांना असं सांगितलं होतं: “ते तुमचाही छळ करतील.” (योहा. ) त्यामुळे, पौल आणि त्याचे साथीदार मासेदोनियात आले, तेव्हा आपलाही विरोध होऊ शकतो याची त्यांना जाणीव होती आणि ते त्याचा सामना करायला तयार होते. त्यांचा छळ करण्यात आला, तेव्हा यहोवा आपल्यावर नाराज असल्यामुळे असं झालं, असा विचार त्यांनी केला नाही. तर यातून सैतान त्याचा राग व्यक्त करत आहे हे त्यांनी ओळखलं. सैतानाने फिलिप्पैमध्ये ज्या पद्धती वापरल्या होत्या तशाच तो आजही वापरतो. शाळेत आणि कामाच्या ठिकाणी विरोधक बऱ्याचदा लोकांना खोटी माहिती देऊन त्यांना आपल्याविरुद्ध भडकवतात. काही देशांमध्ये धर्माच्या नावाखाली आपला विरोध करणारे न्यायालयांमध्ये आरोप लावतात, की ‘यहोवाचे साक्षीदार, अशा गोष्टी शिकवून खळबळ माजवत आहेत, ज्या आपण म्हणजेच “रूढीपरंपरा पाळणारे लोक” स्वीकारू शकत नाहीत.’ काही ठिकाणी, आपल्या बांधवांना मारहाण करून तुरुंगातही टाकलं जातं. पण, यहोवाचं लक्ष त्याच्या सेवकांवर आहे.— १५:२०१ पेत्र ३:१२.
“उशीर न लावता . . . बाप्तिस्मा घेतला” (प्रे. कार्यं १६:२५-३४)
१३. “तारण होण्यासाठी मी काय करू?” असं तुरुंगाच्या अधिकाऱ्याने का विचारलं?
१३ पौल आणि सीला यांना दिवसभर घडलेल्या घटनांच्या धक्क्यातून सावरायला थोडा वेळ लागला असेल. पण मध्यरात्रीपर्यंत ते दोघंही सावरले होते. खरंतर, ते “प्रार्थना करत होते. ते गीत गाऊन देवाची स्तुती करत होते” असं अहवालात म्हटलं आहे. मग, अचानक इतका मोठा भूकंप झाला की तुरुंग हादरून गेला! तुरुंगाचा अधिकारी जागा झाला तेव्हा त्याला दरवाजे उघडलेले दिसले. तेव्हा, कैदी पळून गेले असतील अशी भीती त्याला वाटली. कैद्यांना पळू दिलं म्हणून आपल्याला शिक्षा होईल या भीतीने त्याने “स्वतःचा जीव घेण्यासाठी आपली तलवार काढली.” पण पौल ओरडून त्याला म्हणाला: “आपला जीव घेऊ नकोस, आम्ही सगळे इथेच आहोत!” पश्चात्ताप झाल्यामुळे तुरुंगाच्या अधिकाऱ्याने विचारलं: “तारण होण्यासाठी मी काय करू?” पौल आणि सीला त्याचं तारण करू शकत नव्हते, तर फक्त येशूच करू शकत होता. म्हणून त्यांनी उत्तर दिलं: “प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझं . . . तारण होईल.”—प्रे. कार्यं १६:२५-३१.
१४. (क) पौल आणि सीला यांनी तुरुंगाच्या अधिकाऱ्याला कशी मदत केली? (ख) छळाचा आनंदाने सामना केल्यामुळे पौल आणि सीला यांना कोणता आशीर्वाद मिळाला?
१४ तुरुंगाच्या अधिकाऱ्याने हा प्रश्न प्रामाणिक मनाने विचारला होता का? पौलने त्या माणसाच्या प्रामाणिकतेबद्दल शंका घेतली नाही. तो अधिकारी एक विदेशी होता. त्यामुळे, त्याला शास्त्रवचनांचं ज्ञान नव्हतं. ख्रिस्ती बनण्याआधी त्याला शास्त्रवचनातल्या मुख्य शिकवणी जाणून घेण्याची आणि त्या स्वीकारण्याची गरज होती. म्हणून पौल आणि सीला यांनी त्याला “यहोवाचं वचन सांगितलं.” शास्त्रवचनांतून शिकवण्यात ते इतके गढून गेले, की त्यांना नुकत्याच मारण्यात आलेल्या फटक्यांचं दुखणं ते विसरून गेले. पण तुरुंगाच्या अधिकाऱ्याने त्यांच्या पाठीवरच्या जखमा पाहिल्या आणि त्या धुतल्या. मग त्याने आणि त्याच्या संपूर्ण घराण्याने “उशीर न लावता . . . बाप्तिस्मा घेतला.” छळाचा आनंदाने सामना केल्यामुळे पौल आणि सीला यांना खरंच किती मोठा आशीर्वाद मिळाला!—प्रे. कार्यं १६:३२-३४.
१५. (क) आज बऱ्याच साक्षीदारांनी पौल आणि सीला यांच्या उदाहरणाचं अनुकरण कसं केलं आहे? (ख) आपण आपल्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या घरी पुन्हा-पुन्हा का जात राहिलं पाहिजे?
१५ पौल आणि सीला यांच्याप्रमाणेच आजही अनेक साक्षीदारांनी त्यांच्या विश्वासासाठी तुरुंगात असताना आनंदाच्या संदेशाचा प्रचार केला आहे. त्यामुळे त्यांना चांगले परिणाम मिळाले आहेत. उदाहरणार्थ, एका देशात आपल्या कार्यावर बंदी होती. तिथे एकेकाळी ४० टक्के साक्षीदार असे होते, ज्यांना तुरुंगातच यहोवाबद्दलचं सत्य कळलं होतं! (यश. ५४:१७) पण, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? तुरुंगाच्या अधिकाऱ्याने भूकंप आल्यानंतरच मदत मागितली. त्याचप्रमाणे, आजही काही जण त्यांच्या वैयक्तिक जीवनात एखादी हादरून सोडणारी घटना घडल्यानंतरच राज्याचा संदेश ऐकायला तयार होतात. त्यामुळे, आपण आपल्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांच्या घरी पुन्हा-पुन्हा जात राहिलं पाहिजे. असं केल्यामुळे, त्यांना गरज असते तेव्हा आपण त्यांना मदत करायला हजर असू शकतो.
“आता काय आम्हाला गुपचूप इथून बाहेर काढायचा त्यांचा विचार आहे?” (प्रे. कार्यं १६:३५-४०)
१६. पौल आणि सीला यांना फटके मारल्यानंतर परिस्थिती कशा प्रकारे उलटली?
१६ पौल आणि सीला यांना फटके मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी न्यायाधीशांनी त्यांची सुटका करण्याचा हुकूम दिला. पण पौल म्हणाला: “आम्ही रोमी नागरिक असूनसुद्धा, त्यांनी गुन्हा सिद्ध न करताच आम्हाला सगळ्यांसमोर फटके मारून तुरुंगात डांबलं. आणि आता काय आम्हाला गुपचूप इथून बाहेर काढायचा त्यांचा विचार आहे? ते काही नाही! त्यांना म्हणावं, स्वतः येऊन आम्हाला इथून बाहेर न्या.” ही दोन माणसं रोमन नागरिक आहेत हे कळल्यावर ते न्यायाधीश “घाबरले” कारण त्यांनी त्या दोघांच्या हक्कांचं उल्लंघन केलं होतं. d आता परिस्थिती त्या न्यायधीशांवरच उलटली होती. ते पौल आणि सीला यांना फिलिप्पै शहर सोडून जाण्याची विनंती करू लागले. त्या दोघांनी त्यांच्या सांगण्यानुसार केलं. पण आधी त्यांनी तिथल्या नवीनच स्थापन झालेल्या आणि वाढत असलेल्या शिष्यांच्या गटाला प्रोत्साहन दिलं आणि त्यानंतरच ते तिथून निघाले.
१७. पौल आणि सीला यांनी धीराने छळ सहन केला हे पाहून नवीन शिष्यांना काय शिकायला मिळालं असेल?
१७ रोमन नागरिक या नात्याने पौल आणि सीला यांच्या हक्कांचा आदर करण्यात आला असता, तर त्यांना कदाचित फटके मारण्यात आले नसते. (प्रे. कार्यं २२:२५, २६) पण, यामुळे फिलिप्पैच्या शिष्यांना असं वाटण्याची शक्यता होती, की ख्रिस्तासाठी दुःख सोसावं लागू नये म्हणून या बांधवांनी आपल्या अधिकारांचा वापर केला. फिलिप्पै इथल्या रोमन नागरिक नसलेल्या शिष्यांच्या विश्वासावर याचा कसा परिणाम झाला असता? साहजिकच, ते रोमन नागरिक नसल्यामुळे कायद्याने त्यांचं संरक्षण केलं नसतं. त्यामुळे, शिक्षा सहन करून पौल आणि त्याच्या साथीदाराने त्या नवीन शिष्यांना आपल्या उदाहरणातून हे दाखवून दिलं, की ख्रिस्ताचे शिष्य छळाचा सामना करतानाही खंबीर राहू शकतात. दुसरीकडे, पौल आणि सीला यांनी अधिकाऱ्यांना आपलं नागरिकत्व मान्य करण्याची मागणी करून त्यांना सर्वांसमोर हे कबूल करायला लावलं, की त्यांनी कायदा मोडला होता. यामुळे, पुढे या अधिकाऱ्यांनी पौलच्या बांधवांना वाईट वागणूक देण्याआधी कदाचित विचार केला असता. शिवाय, भविष्यात अशा प्रकारचे हल्ले झाले, तर बांधवांना काही प्रमाणात कायद्याचं संरक्षण मिळू शकलं असतं.
१८. (क) आज ख्रिस्ती मंडळीत देखरेख करणारे पौलचं अनुकरण कसं करतात? (ख) आज आपण कशा प्रकारे ‘आनंदाच्या संदेशाचं समर्थन करतो आणि त्याला कायदेशीर मान्यता मिळवून देतो?’
१८ आज, ख्रिस्ती मंडळीत देखरेख करणारेसुद्धा आपल्या उदाहरणाने बांधवांना शिकवतात. ते बांधवांकडून ज्या गोष्टींची अपेक्षा करतात त्या गोष्टी ते स्वतःही करायला तयार असतात. तसंच, पौलप्रमाणे आपणही स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपल्या कायदेशीर हक्कांचा केव्हा आणि कसा वापर करावा याबद्दल नीट विचार करतो. गरज पडली, तर आपण आपली उपासना सुरू ठेवण्यासाठी कायदेशीर संरक्षण मिळावं म्हणून स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयांत दाद मागतो. असं करताना, समाजात सुधारणा घडवून आणण्याचा आपला उद्देश नसतो. तर, पौलने फिलिप्पै इथे तुरुंगवास झाल्यावर दहा वर्षांनंतर तिथल्या मंडळीला लिहिल्याप्रमाणे, ‘आनंदाच्या संदेशाचं समर्थन करणं आणि त्याला कायदेशीर मान्यता मिळवून देणं’ हा आपला उद्देश असतो. (फिलिप्पै. १:७) अशा खटल्यांचा काहीही निकाल लागला, तरी पौल आणि त्याच्या साथीदारांप्रमाणे, देवाची पवित्र शक्ती जिथे कुठे मार्गदर्शन करेल तिथे “आनंदाचा संदेश” सांगण्याचा आपला दृढनिश्चय आहे.—प्रे. कार्यं १६:१०.
a “ लूक—प्रेषितांची कार्यं पुस्तकाचा लेखक” ही चौकट पाहा.
b फिलिप्पैमध्ये जिथे रोमी सैन्याची तुकडी तैनात होती, तिथेच निवृत्त सैनिकांची वसाहत असल्यामुळे यहुद्यांना कदाचित या शहरात सभास्थान बनवण्याची मनाई करण्यात आली असावी. किंवा, त्या शहरात कदाचित दहा यहुदी पुरुष नसावेत. सभास्थान स्थापन करण्यासाठी कमीत कमी दहा यहुदी पुरुष असले पाहिजेत असा नियम होता.
c “ जांभळ्या कपड्यांची व्यापारी—लुदिया” ही चौकट पाहा.
d रोमन कायद्यानुसार, रोमन नागरिकाला योग्य प्रकारे खटला चालवल्यानंतरच दोषी ठरवण्याची परवानगी होती. आणि दोष सिद्ध झालेला नसताना त्याला कोणत्याही परिस्थितीत जाहीर रीत्या शिक्षा देण्याची परवानगी नव्हती.