अध्याय १७
“तो त्यांच्याशी शास्त्रवचनांतून तर्क करत राहिला”
शास्त्रवचनांच्या आधारावर प्रभावीपणे शिकवणं; बिरुयाच्या लोकांचं चांगलं उदाहरण
प्रे. कार्यं १७:१-१५ वर आधारित
१, २. फिलिप्पैवरून थेस्सलनीका इथे कोण प्रवास करत आहेत, आणि त्यांच्या मनात कोणते विचार येत असावेत?
डोंगराळ भागामधून जाणारा तो रस्ता, कुशल रोमन कारागिरांनी बनवला होता. त्या रस्त्यावरून सतत लोकांची ये-जा सुरू असायची. आजही त्या रस्त्यावर अशीच गर्दी आहे. या गर्दीत ओझी वाहणाऱ्या गाढवांच्या ओरडण्याचा आणि दगडी रस्त्यावरून जाणाऱ्या रथांच्या चाकांचा अधूनमधून आवाज ऐकू येत आहे. तसंच आपापल्या कामासाठी त्या रस्त्यावरून जात असलेले सैनिक, व्यापारी आणि कारागीर अशा अनेक लोकांचा गोंधळही ऐकू येत आहे. याच रस्त्याने आज पौल, सीला आणि तीमथ्य हे तीन बांधव फिलिप्पैवरून १३० किलोमीटर दूर थेस्सलनीका इथे जायला निघाले आहेत. पण, पौल आणि सीला यांच्यासाठी हा प्रवास सोपा नाही. कारण अलीकडेच फिलिप्पै इथे त्यांना सोट्यांनी मारण्यात आलं होतं. त्या जखमा अजूनही त्यांच्या शरीरावर आहेत.—प्रे. कार्यं १६:२२, २३.
२ मग हे बांधव इतका मोठा प्रवास कसा करू शकणार होते? कदाचित ते प्रवासात एकमेकांशी बोलत राहिले असतील. यामुळे, त्यांना हा प्रवास थोडा सोपा वाटला असेल. फिलिप्पैमधल्या तुरुंगाच्या अधिकाऱ्याने आणि त्याच्या कुटुंबाने विश्वास स्वीकारल्याचा चांगला अनुभव अजून त्यांना आठवत असावा. त्या अनुभवामुळे, देवाचं वचन सांगत राहण्याचा या बांधवांचा निश्चय आणखी मजबूत झाला आहे. लवकरच ते समुद्रकिनारी असलेल्या थेस्सलनीका शहरामध्ये पोहोचणार आहेत. आता या शहरातले यहुदी आपल्याशी कसे वागतील, असा विचार कदाचित त्यांच्या मनात येत असेल. इथेही त्यांच्यावर हल्ला होईल का? फिलिप्पैमध्ये मारण्यात आलं, तसं इथेही त्यांना मारलं जाईल का?
३. पौलच्या उदाहरणामुळे आज आपल्याला कशी मदत मिळेल?
३ थेस्सलनीकाला जाताना पौलला नेमकं कसं वाटत होतं, हे त्याने काही काळाने तिथल्या बांधवांना लिहिलेल्या पत्रातून आपल्याला कळतं: “फिलिप्पै इथे सुरुवातीला आमचा छळ झाला आणि आम्हाला वाईट वागणूक देण्यात आली. पण, इतका विरोध होत असूनही तुम्हाला देवाबद्दलचा आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आम्ही आमच्या देवाच्या मदतीने धैर्य एकवटलं.” (१ थेस्सलनी. २:२) फिलिप्पैमध्ये जे घडलं, त्यानंतर थेस्सलनीका शहरात जाण्याविषयी पौलच्या मनात थोडी भीती होती, असं या शब्दांवरून दिसतं. पौलच्या भावना तुम्ही समजू शकता का? आनंदाचा संदेश सांगणं तुम्हालाही कधीकधी कठीण वाटतं का? प्रचार करत राहण्यासाठी लागणारी शक्ती आणि धैर्य मिळावं म्हणून पौल यहोवावर अवलंबून राहिला. पौलच्या उदाहरणावर मनन केल्यामुळे तुम्हालाही धैर्याने प्रचार करता येईल.—१ करिंथ. ४:१६.
“तो त्यांच्याशी शास्त्रवचनांतून तर्क करत राहिला” (प्रे. कार्यं १७:१-३)
४. पौल थेस्सलनीकामध्ये तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिला असावा असं आपण का म्हणू शकतो?
४ अहवालात असं म्हटलं आहे, की पौलने तीन शब्बाथ थेस्सलनीकाच्या सभास्थानात प्रचार केला. याचा अर्थ तो फक्त तीन आठवडे त्या शहरात राहिला का? नाही, तो कदाचित तिथे जास्त काळ राहिला असावा. कारण तिथे पोहोचल्यावर पौल पहिल्यांदा सभास्थानात किती दिवसांनी गेला हे आपल्याला माहीत नाही. आणि, पौलच्या पत्रांवरून आपल्याला हेही समजतं, की आपल्या गरजा भागवण्यासाठी त्याने आणि त्याच्या सोबत्यांनी तिथे कष्टाचं काम केलं. (१ थेस्सलनी. २:९; २ थेस्सलनी. ३:७, ८) शिवाय, तिथे राहत असताना पौलला दोनदा फिलिप्पैच्या बांधवांकडून मदतही पाठवण्यात आली. (फिलिप्पै. ४:१६) त्यामुळे पौल थेस्सलनीकामध्ये तीन आठवड्यांहून जास्त काळ राहिला असावा असं दिसतं.
५. पौलने कशा प्रकारे लोकांना विचार करायला लावलं?
५ सभास्थानात जमलेल्या लोकांशी पौल धैर्याने बोलला. नेहमीप्रमाणे “तो त्यांच्याशी शास्त्रवचनांतून तर्क करत राहिला. ख्रिस्ताने दुःख सोसणं आणि मेलेल्यांतून उठणं आवश्यक होतं, हे त्याने शास्त्रवचनांच्या आधारावर स्पष्ट करून त्यांना पटवून दिलं. मग तो म्हणाला: ‘ज्या येशूबद्दल मी तुम्हाला सांगतोय, तोच हा ख्रिस्त आहे.’” (प्रे. कार्यं १७:२, ३) पौलचं भाषण नुसतंच लोकांच्या भावना जागवणारं नव्हतं, तर त्याने त्यांना विचार करायला लावलं. कारण सभास्थानात येणारे सर्व लोक देवाच्या वचनाचा आदर करायचे आणि त्यांना त्याचं चांगलं ज्ञान होतं, ही गोष्ट पौलला माहीत होती. पण या लोकांना शास्त्रवचनांची पूर्ण समज नव्हती. म्हणूनच, पौलने त्यांच्याशी शास्त्रवचनांतून तर्क केला आणि त्यांना समजावून हे सिद्ध केलं, की नासरेथचा येशू हाच वचन दिलेला मसीहा किंवा ख्रिस्त होता.
६. येशूने शास्त्रवचनांच्या आधारावर कसं शिकवलं, आणि त्याचा काय परिणाम झाला?
६ पौल येशूचंच अनुकरण करत होता. येशूही शास्त्रवचनांच्या आधारावर लोकांना शिकवायचा. उदाहरणार्थ, मनुष्याच्या मुलाला दुःख सोसावं लागेल, मरावं लागेल आणि त्याला मेलेल्यांतून उठवलं जाईल या सर्व गोष्टी आपल्या सेवाकार्यादरम्यान येशूने लोकांना शास्त्रवचनांतून शिकवल्या. (मत्त. १६:२१) येशूच्या पुनरुत्थानानंतर तो त्याच्या शिष्यांना दिसला. त्याने शिकवलेल्या गोष्टी खऱ्या होत्या हे दाखवण्यासाठी खरंतर हीच गोष्ट पुरेशी होती. तरीही, येशूने त्यांना आणखी पुरावे दिले. त्याने काही शिष्यांना जे सांगितलं, त्याबद्दल अहवालात असं लिहिलं आहे: “मोशेपासून सुरुवात करून सर्व संदेष्ट्यांची लिखाणं, असं करत त्याने सगळ्या शास्त्रवचनांत स्वतःबद्दल सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ त्यांना समजावून सांगितला.” याचा काय परिणाम झाला? ते शिष्य म्हणाले: “रस्त्याने चालताना जेव्हा तो आपल्याशी बोलत होता आणि शास्त्रवचनं अगदी स्पष्ट करून सांगत होता, तेव्हा आपल्याला आतल्या आत एक वेगळाच उत्साह जाणवत नव्हता का?”—लूक २४:१३, २७, ३२.
७. शास्त्रवचनांच्या आधारावर शिकवणं महत्त्वाचं का आहे?
७ देवाच्या वचनातल्या संदेशात खूप ताकद आहे. (इब्री ४:१२) त्यामुळेच, येशू, पौल आणि इतर प्रेषितांप्रमाणेच आजचे ख्रिस्तीही देवाच्या वचनाच्या आधारावरच शिकवतात. आपणही लोकांसोबत तर्क करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना शास्त्रवचनांचा अर्थ सांगतो. तसंच, आपण जे शिकवतो ते बायबलमधूनच आहे हे सिद्ध करण्यासाठी घरमालकांना बायबलमधून वचनंही वाचून दाखवतो. कारण, आपण आपल्या स्वतःच्या मनातल्या गोष्टी लोकांना शिकवत नाही. म्हणूनच आपण प्रचारकार्यात बायबलचा शक्य तितका वापर करतो. यामुळे आपण आपल्या मनातल्या नाही, तर देवाच्या शिकवणी शिकवतो हे लोकांना समजायला मदत होते. तसंच, आपणही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की आपला संदेश पूर्णपणे देवाच्या वचनावर आधारित आहे. देवाचं वचन पूर्णपणे भरवशालायक आहे. या गोष्टीमुळे, पौलप्रमाणेच आपल्यालाही देवाचा संदेश धैर्याने सांगण्याचा आत्मविश्वास मिळतो.
“काही जणांनी विश्वास स्वीकारला” (प्रे. कार्यं १७:४-९)
८-१०. (क) थेस्सलनीकाच्या लोकांनी आनंदाच्या संदेशाला कसा वेगवेगळा प्रतिसाद दिला? (ख) काही यहुदी पौलचा द्वेष का करू लागले? (ग) या यहुदी विरोधकांनी काय केलं?
८ येशूने म्हटलं होतं: “दास आपल्या मालकापेक्षा मोठा नसतो. जर त्यांनी माझा छळ केला, तर ते तुमचाही छळ करतील. जर त्यांनी माझ्या शिकवणी पाळल्या असतील, तर ते तुमच्याही शिकवणी पाळतील.” (योहा. १५:२०) हे शब्द किती खरे आहेत हे पौलने याआधीच अनुभवलं होतं. थेस्सलनीकामध्ये पौलला वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटले. काही जण देवाचं वचन पाळायला उत्सुक होते, तर काहींनी त्याचा विरोध केला. ज्यांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यांच्याबद्दल लूकने असं लिहिलं: “त्यांच्यापैकी काही जणांनी [यहुद्यांनी] विश्वास स्वीकारला [ख्रिस्ती बनले] आणि तेसुद्धा पौल आणि सीला यांच्यात सामील झाले. शिवाय, देवाची उपासना करणाऱ्या ग्रीक लोकांच्या एका मोठ्या समुदायाने आणि बऱ्याच प्रतिष्ठित स्त्रियांनीही तसंच केलं.” (प्रे. कार्यं १७:४) शास्त्रवचनांतल्या गोष्टींची योग्य समज मिळाल्यामुळे या नवीन शिष्यांना नक्कीच खूप आनंद झाला असेल.
९ काहींना पौलच्या शिकवणींची कदर होती, तर इतरांना त्याचा खूप राग आला. “ग्रीक लोकांच्या एका मोठ्या समुदायाने” पौलचा संदेश स्वीकारला, म्हणून थेस्सलनीका इथले काही यहुदी त्याचा द्वेष करू लागले. तिथल्या विदेश्यांनी यहुदी धर्म स्वीकारावा, असं या यहुद्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी तिथल्या ग्रीक विदेश्यांना हिब्रू शास्त्रवचनांबद्दल शिकवलं होतं. त्यामुळे आता या ग्रीक विदेश्यांवर आपला अधिकार आहे, असं हे यहुदी समजत होते. पण, पौल अचानक त्यांच्याच सभास्थानात येऊन या ग्रीक विदेश्यांना त्याच्या शिकवणी शिकवत होता. आणि यामुळे आता त्यांनी यहुद्यांच्या शिकवणी पाळायचं सोडून दिलं होतं. म्हणूनच, यहुदी खूप संतापले होते.
१० पुढे काय झालं त्याबद्दल लूक म्हणतो: “हे पाहून यहुद्यांचा जळफळाट झाला. त्यांनी बाजारातल्या काही रिकामटेकड्या गुंडांना जमा करून, शहरात खळबळ माजवायचा प्रयत्न केला. त्यांनी यासोनच्या घरावर हल्ला केला. आणि ते पौल आणि सीला यांना बाहेर जमावापुढे आणायची मागणी करू लागले. पण त्यांना ते सापडले नाहीत, तेव्हा त्यांनी यासोनला आणि काही बांधवांना फरफटत शहराच्या अधिकाऱ्यांपुढे आणलं. ते मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले: ‘ज्या माणसांनी सगळ्या जगात उलथापालथ केली आहे, ते आता इथेही पोहोचले आहेत! आणि यासोनने त्यांना आपल्या घरात पाहुणे म्हणून ठेवलंय. ही सगळी माणसं, येशू नावाचा दुसराच कोणी राजा आहे असं म्हणून कैसराच्या हुकमांच्या विरोधात वागत आहेत.’” (प्रे. कार्यं १७:५-७) जमावाने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा पौल आणि त्याच्या साथीदारांवर काय परिणाम झाला?
११. पौल आणि त्याच्या साथीदारांवर कोणते आरोप लावण्यात आले, आणि कैसराच्या कोणत्या हुकमावरून ते आरोप लावत होते? (तळटीप पाहा.)
११ भडकलेल्या लोकांचा जमाव काहीही करू शकतो. तो पूर आलेल्या नदीसारखा भयानक असतो. त्याला आवरणं कोणालाच शक्य नसतं. पौल आणि सीला यांना शहरातून घालवण्यासाठी यहुद्यांनीही लोकांना भडकवलं. मग शहरात “खळबळ” माजवल्यानंतर, त्यांनी अधिकाऱ्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, की पौल आणि त्याच्या साथीदारांवर गंभीर आरोप आहेत. त्यांचा पहिला आरोप होता, की पौल आणि त्याच्या साथीदारांनी “सगळ्या जगात उलथापालथ केली आहे.” पण थेस्सलनीकामध्ये ही खळबळ पौल आणि त्याच्या साथीदारांनी माजवली नव्हती. यहुद्यांचा या बांधवांविरुद्ध असलेला दुसरा आरोप याहूनही गंभीर होता. ते येशूला राजा घोषित करून कैसराचे हुकूम मोडत आहेत, असं या यहुद्यांचं म्हणणं होतं. a
१२. थेस्सलनीकामध्ये बांधवांवर लावलेल्या आरोपांचे गंभीर परिणाम होऊ शकत होते, असं आपण का म्हणू शकतो?
१२ तुम्हाला आठवत असेल, की काही धार्मिक पुढाऱ्यांनी येशूवरही असेच आरोप लावले होते. ते पिलात याला म्हणाले: “हा माणूस आमच्या राष्ट्राच्या लोकांना भडकवतो . . . आणि मी ख्रिस्त आणि राजा आहे असं म्हणतो.” (लूक २३:२) पिलाताला वाटलं, की येशूला सोडलं तर आपण राजद्रोहाला मान्यता देत आहोत असं सम्राटाला वाटेल. या भीतीमुळे त्याने येशूला वधस्तंभावर खिळण्यासाठी लोकांच्या हाती दिलं. त्याप्रमाणेच थेस्सलनीकामध्ये या बांधवांवर लावलेल्या आरोपांचे गंभीर परिणाम होऊ शकले असते. एका संदर्भ ग्रंथात म्हटलं आहे: “यामुळे त्या लोकांना [बांधवांना] खरंच खूप मोठा धोका होता. कारण ‘एखाद्याने सम्राटांविरुद्ध राजद्रोह केल्याचं कोणी नुसतं बोललं, तरी ज्याच्यावर हा आरोप असेल त्याला ठार मारलं जाऊ शकत होतं.’” बांधवांवर द्वेषाने केलेला हा हल्ला यशस्वी होणार होता का?
१३, १४. (क) थेस्सलनीकामध्ये लोकांचा जमाव प्रचारकार्य का थांबवू शकला नाही? (ख) पौलने ख्रिस्तासारखा सावधपणा कसा दाखवला आणि आपण त्याच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतो?
१३ पण हा लोकांचा जमाव थेस्सलनीकामध्ये प्रचारकार्य थांबवू शकला नाही. का? याचं एक कारण म्हणजे, पौल आणि सीला त्यांना सापडले नाहीत. इतकंच काय, तर शहराच्या अधिकाऱ्यांनाही त्यांचे आरोप खरे आहेत ही गोष्ट पटली नाही. म्हणून, ‘जामीन घेतल्यावर’ त्यांनी त्यांच्यासमोर आणलेल्या यासोन आणि इतर बांधवांना सोडून दिलं. (प्रे. कार्यं १७:८, ९) “सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे भोळे असा,” हा येशूचा सल्ला पौलने पाळला. त्यामुळे तो या धोक्यापासून लांब राहू शकला आणि दुसरीकडे प्रचार करायला गेला. (मत्त. १०:१६) पौलकडे धैर्य होतं पण त्यामुळे तो बेसावधपणे वागला नाही. आज ख्रिस्ती त्याचं अनुकरण कसं करू शकतात?
१४ आजच्या काळातही, ख्रिस्ती धर्मजगतातल्या पाळकांनी बऱ्याचदा लोकांच्या जमावांना यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध भडकवलं आहे. साक्षीदार देशद्रोही आहेत आणि राष्ट्रविरोधी कार्य करत आहेत, असे आरोप लावून ते शासकांना त्यांच्याविरुद्ध कारवाई करायला लावतात. पहिल्या शतकात प्रेषितांचा छळ करणाऱ्यांप्रमाणेच आजच्या काळातले विरोधकही साक्षीदारांचा द्वेष करत असल्यामुळे त्यांना त्रास देतात. पण, खरे ख्रिस्ती कधीही स्वतःहून समस्या ओढवून घेत नाहीत. सहसा आपण भांडखोर प्रवृत्तीच्या, आणि स्वतःच्याच मतांवर अडून राहणाऱ्या लोकांशी वाद घालण्याचं टाळतो. त्याऐवजी, शक्य असेल तर आपण वातावरण शांत झाल्यावर पुन्हा त्या क्षेत्रात जाऊन आपलं काम सुरू ठेवतो.
ते “थेस्सलनीकाच्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते” (प्रे. कार्यं १७:१०-१५)
१५. बिरुयाच्या लोकांनी आनंदाच्या संदेशाला कसा प्रतिसाद दिला?
१५ पौल आणि सीला यांच्या सुरक्षेसाठी त्यांना ६५ किलोमीटर दूर असलेल्या बिरुयाला पाठवण्यात आलं. तिथे पोहोचल्यावर पौल सभास्थानात जाऊन जमलेल्या लोकांशी बोलू लागला. इथल्या लोकांनी त्याचं बोलणं चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं. हे पाहून पौलला किती आनंद झाला असेल! लूकने लिहिलं की बिरुयामधले यहुदी “थेस्सलनीकाच्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. कारण त्यांनी फार उत्सुकतेने देवाचं वचन स्वीकारलं. शिवाय, आपण ऐकत असलेल्या गोष्टी तशाच आहेत की नाही, याची खातरी करण्यासाठी ते दररोज शास्त्रवचनांचं काळजीपूर्वक परीक्षण करायचे.” (प्रे. कार्यं १७:१०, ११) पण, थेस्सलनीकामध्ये ज्यांनी सत्य स्वीकारलं होतं, त्यांचीही मनोवृत्ती चांगली नव्हती असा या शब्दांचा अर्थ होतो का? मुळीच नाही. कारण नंतर पौलने थेस्सलनीकाच्या बांधवांना असं लिहिलं: “आम्ही देवाचे सतत आभार मानतो. कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून देवाचं वचन ऐकलं, तेव्हा तुम्ही ते माणसांचं वचन म्हणून नाही, तर देवाचं वचन म्हणून स्वीकारलं; आणि ते खरोखर देवाचंच वचन आहे आणि तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये कार्यही करत आहे.” (१ थेस्सलनी. २:१३) पण बिरुयाचे यहुदी मोठ्या मनाचे होते असं का म्हणण्यात आलं?
१६. बिरुयाचे लोक “मोठ्या मनाचे” होते असं जे लूकने म्हटलं ते योग्य का होतं?
१६ बिरुयाच्या लोकांसाठी पौल शिकवत असलेल्या गोष्टी नवीन होत्या. तरीही, त्यांनी त्यांविषयी शंका घेतली नाही किंवा टीकाही केली नाही. पण, ते भोळे होते असाही याचा अर्थ होत नाही. सर्वातआधी, त्यांनी पौलचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं. मग, पौलने ज्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या होत्या, त्या खऱ्या आहेत की नाही याची त्यांनी शास्त्रवचनांतून खातरी केली. तसंच, ते फक्त शब्बाथाच्या दिवशीच नाही, तर दररोज देवाच्या वचनाचा काळजीपूर्वक अभ्यास करायचे. आणि हे सर्व त्यांनी “फार उत्सुकतेने” केलं. या नव्या शिकवणीविषयी शास्त्रवचनांत काय सांगितलं आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. यानंतर त्यांनी नम्रपणे स्वतःच्या विचारांत आणि वागणुकीत बदल केला. अहवालात असं म्हटलं आहे, की “त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी प्रभूवर विश्वास ठेवला.” (प्रे. कार्यं १७:१२) खरंच, हे लोक “मोठ्या मनाचे” होते असं जे लूकने म्हटलं ते अगदी योग्यच होतं.
१७. बिरुयाच्या बांधवांनी आपल्यासाठी चांगलं उदाहरण मांडलं आहे असं का म्हणता येईल, आणि सत्य स्वीकारून बरीच वर्षं झाल्यावरही आपण त्यांचं अनुकरण कसं करत राहू शकतो?
१७ आपण दाखवलेल्या चांगल्या मनोवृत्तीबद्दल देवाच्या वचनात लिहून ठेवलं जाईल आणि भविष्यातही देवाच्या सेवकांना आपल्या उदाहरणातून शिकायला मिळेल, याची कदाचित बिरुयाच्या लोकांना कल्पनाही नसेल. पौलला त्यांच्याकडून जी अपेक्षा होती, तेच त्यांनी केलं. तसंच, यहोवा देवाची त्यांच्याबद्दल जी इच्छा होती त्याप्रमाणेच ते वागले. आज आपणही लोकांना बायबलचं काळजीपूर्वक परीक्षण करून, देवाच्या वचनात जे सांगितलं आहे त्यावर विश्वास ठेवण्याचं प्रोत्साहन देतो. पण, ख्रिस्ती विश्वास स्वीकारल्यानंतर काय? त्यानंतरही आपण बायबलचं परीक्षण करत राहिलं पाहिजे का? हो नक्कीच. खरंतर, विश्वास स्वीकारल्यानंतर यहोवाकडून शिकायला आणि त्याच्या शिकवणींचं पालन करायला आपण आणखीनच उत्सुक असलं पाहिजे. असं केल्यामुळे आपण यहोवाला त्याच्या इच्छेनुसार आपल्याला घडवण्याची आणि शिकवण्याची संधी देतो. (यश. ६४:८) यामुळे, आपण आपल्या स्वर्गातल्या पित्याचं मन आनंदित करू शकतो आणि तो त्याच्या सेवेसाठी आपला उपयोग करू शकतो.
१८, १९. (क) पौल बिरुयात जास्त दिवस का राहिला नाही, आणि तरीही धीराने प्रचार करत राहण्याविषयी त्याने आपल्यासमोर कोणतं उदाहरण मांडलं? (ख) यानंतर पौल कोणाला आणि कुठे प्रचार करणार आहे?
१८ पौल बिरुयात जास्त दिवस राहिला नाही. अहवालात म्हटलं आहे: “पौल बिरुयातही देवाच्या वचनाची घोषणा करत असल्याचं थेस्सलनीकातल्या यहुद्यांना समजलं, तेव्हा लोकांना भडकवण्यासाठी आणि खळबळ माजवण्यासाठी ते तिथे आले. त्यामुळे बांधवांनी पौलला लगेच समुद्राकडे पाठवून दिलं. पण सीला आणि तीमथ्य तिथेच राहिले. पौलसोबत आलेल्या बांधवांनी त्याला अथेन्सपर्यंत आणलं. मग ते तिथून निघाले तेव्हा पौलने त्यांना सीला आणि तीमथ्य यांना लवकरात लवकर आपल्याकडे पाठवून द्यायला सांगितलं.” (प्रे. कार्यं १७:१३-१५) आनंदाच्या संदेशाच्या त्या विरोधकांचं अजूनही समाधान झालं नव्हतं. पौलला थेस्सलनीकातून हाकलून लावल्यानंतर ते बिरुयालाही आले. तिथेही त्यांनी गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला, पण याचा काही उपयोग झाला नाही. कारण, पौल दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपलं प्रचारकार्य करत राहिला; आपल्याजवळ फार मोठं क्षेत्र आहे हे त्याला माहीत होतं. आज आपणही पौलसारखीच मनोवृत्ती दाखवली पाहिजे आणि विरोधकांनी कितीही रोखण्याचा प्रयत्न केला, तरी धीराने प्रचारकार्य करत राहिलं पाहिजे.
१९ पौलने थेस्सलनीका आणि बिरुयामधल्या यहुद्यांना अगदी पूर्णपणे साक्ष दिली. या दोन्ही ठिकाणी प्रचार करताना धैर्याने साक्ष देणं, आणि शास्त्रवचनांच्या मदतीने लोकांना विचार करायला लावणं किती महत्त्वाचं आहे, याची पौलला नक्कीच खातरी पटली असेल. आपल्यालाही पौलकडून बरंच काही शिकायला मिळालं आहे. पण, आता पौल वेगळ्या प्रकारच्या लोकांना प्रचार करणार आहे. ते आहेत अथेन्स इथले विदेशी. या शहरात पौलला कसा अनुभव आला? याविषयी आपण पुढच्या अध्यायात पाहू या.
a एका जाणकाराच्या मते, त्या वेळी कैसराचा असा हुकूम होता, की “सम्राटाचा अधिकार काढून घेईल किंवा त्याचा न्याय करेल अशा कोणत्याही नवीन राजाबद्दल किंवा राज्याबद्दल” कोणीही बोलू नये. पौलच्या संदेशामुळे हा हुकूम मोडला जात आहे, असा खोटा आरोप पौलच्या शत्रूंनी त्याच्यावर लावला. पान क्रमांक १३७ वर “ प्रेषितांची कार्यं पुस्तकातला काळ आणि कैसर” ही चौकट पाहा.