व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मत्तय अध्याय ५-७

मत्तय अध्याय ५-७

पुष्कळ लोक जमलेले पाहून तो डोंगरावर गेला. तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो त्यांना शिकवू लागला. तो म्हणाला:

“ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे ते सुखी आहेत, कारण स्वर्गाचं राज्य अशाच लोकांचं आहे.

जे शोक करतात ते सुखी आहेत, कारण त्यांचं सांत्वन केलं जाईल.

जे नम्र a ते सुखी आहेत, कारण त्यांना पृथ्वीचा वारसा मिळेल.

   ज्यांना नीतिमत्त्वाची b तहान आणि भूक आहे ते सुखी आहेत, कारण त्यांना तृप्त केलं जाईल.

जे दयाळू ते सुखी आहेत, कारण त्यांच्यावर दया केली जाईल.

ज्यांचं मन शुद्ध ते सुखी आहेत, कारण ते देवाला पाहतील.

जे शांती टिकवून ठेवायचा प्रयत्न करतात c ते सुखी आहेत, कारण त्यांना देवाची मुलं म्हटलं जाईल.

१० नीतिमत्त्वासाठी d ज्यांचा छळ झालाय ते सुखी आहेत, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे.

११ माझ्यामुळे जेव्हा लोक तुमचा अपमान आणि छळ करून तुमच्यावर सर्व प्रकारचे खोटे आरोप लावतात, तेव्हा तुम्ही सुखी आहात. १२ हर्ष करा आणि खूप आनंदित व्हा, कारण स्वर्गात तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल. तुमच्याआधी होऊन गेलेल्या संदेष्ट्यांचाही त्यांनी असाच छळ केला होता.

१३ तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. पण मिठाचा खारटपणा गेला, तर तो पुन्हा कशाने आणता येईल? ते टाकून देण्याशिवाय आणि पायांखाली तुडवण्याशिवाय कसल्याही उपयोगाचं राहणार नाही.

१४ तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेलं शहर लपू शकत नाही. १५ लोक दिवा लावून टोपलीखाली ठेवत नाहीत, तर एखाद्या उंच ठिकाणी ठेवतात. त्यामुळे घरातल्या सर्वांना प्रकाश मिळतो. १६ त्याचप्रमाणे, तुमचा प्रकाश लोकांपुढे पडू द्या, म्हणजे ते तुमची चांगली कामं पाहून स्वर्गातल्या तुमच्या पित्याचा गौरव करतील.

१७ मी नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचं लिखाण रद्द करायला आलोय, असं समजू नका. मी ते रद्द करायला नाही, तर पूर्ण करायला आलोय. १८ मी तुम्हाला खरं सांगतो, की एकवेळ आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण नियमशास्त्रातलं एकही अक्षर किंवा अक्षरातली एक रेषसुद्धा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. १९ त्यामुळे जो यातली सर्वात लहान आज्ञा मोडतो आणि दुसऱ्‍यांनाही तसं करायला शिकवतो, त्याला स्वर्गाच्या राज्यात सगळ्यात लहान म्हटलं जाईल. पण, जो या आज्ञांचं पालन करतो आणि दुसऱ्‍यांनाही तसं करायला शिकवतो त्याला स्वर्गाच्या राज्यात महान म्हटलं जाईल. २० कारण मी तर तुम्हाला सांगतो, की तुमचं नीतिमत्त्व शास्त्री आणि परूशी यांच्या नीतिमत्त्वापेक्षा जास्त नसलं, तर स्वर्गाच्या राज्यात तुम्हाला मुळीच जाता येणार नाही.

  २१ पूर्वीच्या काळातल्या लोकांना जे सांगण्यात आलं होतं ते तुम्ही ऐकलंय, की ‘खून करू नका आणि जो खून करतो त्याला न्यायालयात जाब द्यावा लागेल.’ २२ पण मी तर तुम्हाला म्हणतो, की जो आपल्या भावाबद्दल मनात राग बाळगतो त्याला न्यायालयात जाब द्यावा लागेल. जो आपल्या भावाला शिव्याशाप देतो त्याला सर्वोच्च न्यायालयात जाब द्यावा लागेल. आणि जो त्याला ‘अरे नीच मूर्खा!’ असं म्हणतो, तो गेहेन्‍नाच्या e आगीत टाकला जाण्यासाठी पात्र ठरेल.

२३ तर मग, तू आपलं अर्पण वेदीजवळ आणत असताना, तुझ्या भावाला तुझ्याविरुद्ध काही तक्रार आहे हे तुला आठवलं, २४ तर तुझं ते अर्पण तिथेच वेदीसमोर ठेवून निघून जा. आधी आपल्या भावाशी समेट कर आणि मग परत येऊन आपलं अर्पण दे.

२५ जो तुझ्याविरुद्ध खटला भरणार आहे त्याच्यासोबत न्यायालयात जात असतानाच लवकरात लवकर वाद मिटव. नाहीतर, तो तुला न्यायाधीशाच्या हाती सोपवेल, न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती सोपवेल आणि शेवटी तुला तुरुंगात टाकलं जाईल. २६ मी तुला नक्की सांगतो, की तू त्याची एकेक दमडी फेडेपर्यंत तुला तिथून मुळीच सुटका मिळणार नाही.

२७ ‘व्यभिचार करू नका,’ असं सांगण्यात आलं होतं, हे तुम्ही ऐकलंय. २८ पण, मी तर तुम्हाला सांगतो, की जो एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहत राहतो, त्याने केव्हाच आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाय. २९ म्हणून, जर तुझा उजवा डोळा तुला अडखळायला लावत असेल, f तर तो उपटून टाक आणि फेकून दे. कारण संपूर्ण शरीर गेहेन्‍नात g टाकलं जावं, यापेक्षा एक अवयव गमावलेला बरा. ३० तसंच, तुझा उजवा हात तुला अडखळायला लावत असेल, h तर तो कापून टाक आणि फेकून दे. कारण संपूर्ण शरीर गेहेन्‍नात i पडावं, यापेक्षा एक अवयव गमावलेला बरा.

३१ तसंच, असंही सांगण्यात आलं होतं, की ‘जो आपल्या बायकोला घटस्फोट देतो त्याने तिला सोडचिठ्ठी द्यावी.’ ३२ पण मी तर तुम्हाला सांगतो, की जो अनैतिक लैंगिक कृत्यांशिवाय j इतर कोणत्याही कारणाने आपल्या बायकोला घटस्फोट देतो, तो तिला व्यभिचार करायला प्रवृत्त करतो. आणि जो अशा घटस्फोट झालेल्या स्त्रीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो.

३३ शिवाय, तुम्ही हेही ऐकलंय, की पूर्वीच्या काळातल्या लोकांना असं सांगण्यात आलं होतं: ‘घेतलेली शपथ मोडू नका. यहोवाला केलेले नवस पूर्ण करा.’ ३४ पण मी तर तुम्हाला म्हणतो: शपथच घेऊ नका. स्वर्गाची घेऊ नका, कारण स्वर्ग देवाचं राजासन आहे; ३५ पृथ्वीची शपथ घेऊ नका, कारण ती त्याच्या पायाचं आसन आहे. आणि यरुशलेमचीही घेऊ नका, कारण ते महान राजाचं नगर आहे. ३६ आपल्या डोक्याची शपथ घेऊ नका, कारण तुमचा एकही केस तुम्ही पांढरा किंवा काळा करू शकत नाही. ३७ त्यामुळे तुमचं बोलणं ‘हो’ तर हो, ‘नाही’ तर नाही इतकंच असावं. कारण यापेक्षा जे काही जास्त, ते त्या दुष्टाकडून आहे.

३८ ‘डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात,’ असं म्हणण्यात आलं होतं हे तुम्ही ऐकलंय. ३९ पण मी तर तुम्हाला सांगतो: दुष्ट माणसाचा प्रतिकार करू नका, तर जो तुमच्या उजव्या गालावर मारतो, त्याच्यापुढे दुसराही गाल करा. ४० जर कोणी न्यायालयात तुमच्याविरुद्ध तक्रार करून तुमचा झगा घ्यायचा प्रयत्न करत असेल, तर त्याला तुमचं बाहेरचं वस्त्रही द्या. ४१ जर एखाद्या अधिकाऱ्‍याने त्याची काही सेवा करायला तुम्हाला एका मैलापर्यंत जायला भाग पाडलं, तर त्याच्यासोबत दोन मैल जा. ४२ जो तुमच्याकडे काही मागतो त्याला ते द्या आणि ज्याला तुमच्याकडून काही उसनं k घ्यायचंय त्याच्याकडे पाठ फिरवू नका.

४३ ‘तू आपल्या शेजाऱ्‍यावर प्रेम कर आणि आपल्या शत्रूचा द्वेष कर,’ असं सांगण्यात आलं होतं, हे तुम्ही ऐकलंय. ४४ पण मी तर तुम्हाला सांगतो: आपल्या शत्रूंवर प्रेम करत राहा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहा. ४५ असं केलं, तर तुम्ही स्वर्गातल्या तुमच्या पित्याची मुलं असल्याचं सिद्ध कराल. कारण तो चांगल्या लोकांसोबतच दुष्टांवरही सूर्य उगवतो आणि नीतिमान लोकांसोबतच अनीतिमान लोकांवरही पाऊस पाडतो. ४६ कारण तुमच्यावर प्रेम करणाऱ्‍यांवर जर तुम्ही प्रेम करत असाल, तर तुम्हाला काय प्रतिफळ मिळणार? जकातदारसुद्धा तसंच करत नाहीत का? ४७ आणि जर तुम्ही फक्‍त आपल्या भावांनाच नमस्कार करत असाल, तर तुम्ही विशेष असं काय करता? विदेशी लोकसुद्धा तसंच करत नाहीत का? ४८ म्हणूनच, स्वर्गातला तुमचा पिता जसा परिपूर्ण आहे, तसेच तुम्हीही परिपूर्ण व्हा.

सांभाळा, लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून त्यांच्यासमोर चांगली कामं करू नका; नाहीतर स्वर्गातल्या तुमच्या पित्याकडून तुम्हाला कोणतंही प्रतिफळ मिळणार नाही. म्हणून, तुम्ही दानधर्म करता तेव्हा लोकांनी आपली वाहवा करावी म्हणून ढोंगी लोकांसारखं सभास्थानांत आणि रस्त्यांवर गाजावाजा करू नका. मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांना त्यांचं पूर्ण प्रतिफळ मिळालंय. उलट तुम्ही दानधर्म करता, तेव्हा तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका; म्हणजे तुमचा दानधर्म गुप्त राहील आणि तुमचा पिता, जो गुप्त गोष्टीही पाहू शकतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल.

तसंच, तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंगी लोकांसारखी करू नका. कारण लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून सभास्थानांत आणि चौकांत उभं राहून प्रार्थना करायला त्यांना आवडतं. मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांना त्यांचं पूर्ण प्रतिफळ मिळालंय. उलट, तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून घ्या आणि तुमच्या अदृश्‍य पित्याला प्रार्थना करा. मग, तुमचा पिता जो गुप्त गोष्टीही पाहू शकतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल. प्रार्थना करताना विदेश्‍यांसारखं त्याच गोष्टी पुन्हापुन्हा बोलू नका. कारण आपण पुष्कळ बोललो तर आपली प्रार्थना ऐकली जाईल असं त्यांना वाटतं. तेव्हा त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुम्हाला कशाची गरज आहे हे तुम्ही मागायच्या आधीच तुमच्या पित्याला माहीत असतं.

म्हणून अशा प्रकारे प्रार्थना करा:

‘हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो. १० तुझं राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही पूर्ण होवो. ११ आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. १२ आणि जसं आम्ही आमच्या कर्जदारांना माफ केलंय, तसं तूही आमची कर्जं l माफ कर. १३ आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, तर त्या दुष्टापासून वाचव.’ a

१४ कारण जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा केली, तर स्वर्गातला तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करेल. १५ पण, जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा केली नाही, तर स्वर्गातला तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.

१६ तुम्ही उपास करता तेव्हा ढोंगी लोकांसारखं चेहरा उदास करायचं सोडून द्या. कारण आपण उपास करत आहोत हे लोकांना दिसावं, म्हणून ते मुद्दामहून स्वतःकडे दुर्लक्ष करतात. मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांना त्यांचं पूर्ण प्रतिफळ मिळालंय. १७ पण तू उपास करताना आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपलं तोंड धू; १८ म्हणजे तू उपास करत आहेस हे माणसांना नाही, तर फक्‍त तुझ्या अदृश्‍य पित्याला दिसेल. मग तुझा पिता, जो गुप्त गोष्टीही पाहू शकतो तो तुला प्रतिफळ देईल.

१९ पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवायचं सोडून द्या. तिथे कसर b आणि गंज लागून ती नष्ट होते आणि चोर घरफोडी करून ती लुटतात. २० त्याऐवजी स्वर्गात संपत्ती साठवा. तिथे कसर आणि गंज लागून ती नष्ट होत नाही आणि चोर घर फोडून ती लुटत नाहीत. २१ कारण जिथे तुझं धन आहे, तिथे तुझं मनही असेल.

२२ डोळा हा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमची नजर एकाग्र असेल, तर तुमचं संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल. २३ पण जर तुमची नजर ईर्ष्येने भरलेली c असेल, तर तुमचं पूर्ण शरीर अंधकारमय होईल. आणि जर तुमच्यात असलेला प्रकाशच अंधकारमय झाला, तर तो अंधार किती मोठा असेल!

२४ कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही. कारण एकतर तो त्यांच्यापैकी एकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्‍यावर प्रेम करेल, किंवा एका मालकाशी एकनिष्ठ राहील आणि दुसऱ्‍याला तुच्छ लेखेल. तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.

२५ म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, काय खावं किंवा काय प्यावं अशी आपल्या जिवाबद्दल, किंवा काय घालावं अशी आपल्या शरीराबद्दल चिंता करायचं सोडून द्या. अन्‍नापेक्षा जीव आणि कपड्यांपेक्षा शरीर जास्त महत्त्वाचं नाही का? २६ आकाशातल्या पक्ष्यांकडे निरखून पाहा. ते पेरणी करत नाहीत, कापणी करत नाहीत किंवा कोठारांत धान्य साठवत नाहीत; तरीही स्वर्गातला तुमचा पिता त्यांना खाऊ घालतो. तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त मौल्यवान नाही का? २७ चिंता करून कोणी आपलं आयुष्य हातभर वाढवू शकतं का? २८ तसंच, काय घालावं याची चिंता का करता? रानातल्या फुलांकडून शिका. ती कशी वाढतात? ती तर कष्ट करत नाहीत किंवा सूतही कातत नाहीत. २९ पण मी तुम्हाला सांगतो, की शलमोन इतका वैभवी राजा असूनही त्यानेसुद्धा कधी या फुलांसारखा सुंदर पेहराव केला नव्हता. ३० रानातली झाडंझुडपं आज आहेत, पण उद्या ती भट्टीत टाकली जातील. त्यांना जर देव इतकं सुंदर सजवतो, तर अरे अल्पविश्‍वासी लोकांनो, तो तुम्हाला घालायला कपडे देणार नाही का? ३१ म्हणून, ‘काय खावं?’, ‘काय प्यावं?’ किंवा ‘काय घालावं?’ याची कधीही चिंता करू नका. ३२ कारण या गोष्टी मिळवण्यासाठी जगातले लोक धडपड करत आहेत. पण तुम्हाला या सर्व गोष्टींची गरज आहे हे स्वर्गातल्या तुमच्या पित्याला माहीत आहे.

३३ म्हणून, आधी देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व d मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. मग या सगळ्या गोष्टीही तुम्हाला दिल्या जातील. ३४ त्यामुळे, उद्याची चिंता कधीही करू नका, कारण उद्याचा दिवस नव्या चिंता घेऊन उगवेल. ज्या दिवसाची चिंता त्या दिवसाला पुरे.

तुमचे दोष काढले जाऊ नयेत, म्हणून तुम्ही दुसऱ्‍यांचे दोष काढायचं सोडून द्या. कारण ज्या प्रकारे तुम्ही दुसऱ्‍यांचा न्याय करता, त्याच प्रकारे तुमचाही न्याय केला जाईल. आणि ज्या मापाने तुम्ही दुसऱ्‍यांना मापून देता, त्याच मापाने तेही तुम्हाला मापून देतील. तर मग, तुझ्या स्वतःच्या डोळ्यातलं लाकूड न बघता, तू तुझ्या भावाच्या डोळ्यातली बारीकशी काडी का बघतोस? किंवा तुझ्या स्वतःच्या डोळ्यात लाकूड असताना, ‘मला तुझ्या डोळ्यातली काडी काढू दे,’ असं तू आपल्या भावाला कसं काय म्हणू शकतोस? अरे ढोंगी माणसा! आधी स्वतःच्या डोळ्यातलं लाकूड काढ; म्हणजे मग तुझ्या भावाच्या डोळ्यातली काडी कशी काढायची हे तुला स्पष्ट दिसेल.

पवित्र गोष्टी कुत्र्यांना देऊ नका आणि तुमचे मोती डुकरांपुढे टाकू नका. नाहीतर, ते त्यांना पायांखाली तुडवतील आणि उलटून तुमच्यावर हल्ला करतील.

मागत राहा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडेल. आणि ठोठावत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. कारण जो मागतो त्याला दिलं जातं, जो शोधतो त्याला सापडतं आणि जो ठोठावतो त्याच्यासाठी उघडलं जातं. खरंच, तुमच्यापैकी असा कोण आहे जो आपल्या मुलाने भाकर मागितल्यावर त्याला दगड देईल? १० किंवा मासा मागितल्यावर साप देईल? कोणीही असं करणार नाही. ११ तुम्ही पापी असूनही जर तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी द्यायचं कळतं, तर मग स्वर्गातला तुमचा पिता त्याच्याकडे मागणाऱ्‍यांना त्या देणार नाही का?

१२ म्हणून, ज्या गोष्टी इतरांनी आपल्यासाठी कराव्यात असं तुम्हाला वाटतं, त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत. कारण नियमशास्त्रात आणि संदेष्ट्यांच्या लिखाणांत हेच सांगितलंय.

१३ अरुंद दरवाजाने आत जा. कारण, नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद आणि रस्ता पसरट आहे आणि त्यातून जाणारे बरेच आहेत. १४ पण जीवनाकडे जाणारा दरवाजा अरुंद आणि रस्ता छोटा आहे आणि फार कमी लोकांना तो सापडतो.

१५ खोट्या संदेष्ट्यांपासून जपून राहा. कारण ते मेंढरांच्या वेषात तुमच्याकडे येतात, पण आतून ते क्रूर लांडगे आहेत. १६ तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल. काटेरी झुडपांना द्राक्षं किंवा अंजिरं कधी लागतात का? १७ त्याचप्रमाणे, प्रत्येक चांगलं झाड चांगलं फळ देतं, पण कीड लागलेलं झाड खराब फळ देतं. १८ चांगल्या झाडाला कधी खराब फळ येऊ शकत नाही आणि कीड लागलेल्या झाडाला कधी चांगलं फळ येऊ शकत नाही. १९ चांगलं फळ न देणारं प्रत्येक झाड कापून आगीत टाकलं जातं. २० खरंच, त्या माणसांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल.

२१ मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणणारा प्रत्येक जण स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही, तर स्वर्गातल्या माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करणाराच त्या राज्यात जाईल. २२ त्या दिवशी बरेच लोक मला म्हणतील: ‘प्रभू, प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले नाहीत का? तुझ्या नावाने दुष्ट स्वर्गदूत e काढले नाहीत का? आणि तुझ्या नावाने बरेच चमत्कार केले नाहीत का?’ २३ पण, मी त्यांना स्पष्टपणे सांगीन: ‘अरे दुष्टांनो! मी तुम्हाला कधीच ओळखत नव्हतो, माझ्यापुढून निघून जा!’

२४ म्हणून, जो माझे हे शब्द ऐकून त्यांप्रमाणे वागतो तो अशा एका बुद्धिमान माणसासारखा आहे, ज्याने आपलं घर खडकावर बांधलं. २५ मग मुसळधार पाऊस आला, पूर आला आणि वादळी वारे त्या घरावर आदळले. तरी ते घर कोसळलं नाही, कारण ते खडकावर बांधलेलं होतं. २६ याउलट, जो माझे हे शब्द ऐकून त्यांप्रमाणे वागत नाही, तो अशा एका मूर्ख माणसासारखा आहे ज्याने आपलं घर वाळूवर बांधलं. २७ मग मुसळधार पाऊस आला, पूर आला आणि वादळी वारे त्या घरावर आदळले. तेव्हा ते घर कोसळलं आणि जमीनदोस्त झालं.”

२८ येशूचं हे बोलणं संपल्यावर लोक त्याची शिकवायची पद्धत पाहून थक्क झाले. २९ कारण तो त्यांच्या शास्त्र्यांसारखा नाही, तर अधिकार असलेल्या व्यक्‍तीसारखा त्यांना शिकवत होता.

a किंवा “सौम्य वृत्तीचे.”

b शास्त्रवचनांत, देवाने योग्य आणि अयोग्य यांसाठी स्तर ठरवले आहेत; त्यानुसार योग्य ते करणं म्हणजे नीतिमत्त्व.

c किंवा “जे शांतिप्रिय.”

d  ५:६ ची तळटीप बघा.

e यरुशलेमच्या बाहेर केरकचरा जाळण्याची जागा. प्राचीन यरुशलेमच्या दक्षिण-पश्‍चिमेला असलेल्या ‘हिन्‍नोम खोऱ्‍याचं’ ग्रीक नाव. अनेकांना वाटतं, की गेहेन्‍ना हे असं एक अदृश्‍य ठिकाण आहे जिथे मेलेल्या व्यक्‍तीला कायम यातना देण्यासाठी खरोखरच्या आगीत टाकलं जातं. पण, गेहेन्‍नामध्ये प्राण्यांना किंवा माणसांना जिवंत जाळलं जायचं किंवा यातना दिल्या जायच्या याचा कोणताही पुरावा नाही. म्हणूनच, गेहेन्‍ना हे कायम यातना देण्यासाठी असलेल्या आगीच्या ठिकाणाला सूचित करत नाही. याउलट, येशूने आणि त्याच्या शिष्यांनी जेव्हा गेहेन्‍नाचा उल्लेख केला, तेव्हा त्यांनी तो कायमच्या नाशाला सूचित करण्यासाठी केला.

f किंवा “पाप करायला प्रवृत्त करत असेल.”

g  ५:२२ ची तळटीप बघा.

h किंवा “पाप करायला प्रवृत्त करत असेल.”

i  ५:२२ ची तळटीप बघा.

j पोर्निया  या ग्रीक शब्दावरून. हा शब्द बायबलमध्ये अशा काही लैंगिक कृत्यांना सूचित करतो जी देवाच्या नजरेत चुकीची आहेत. यात व्यभिचार, वेश्‍याव्यवसाय, लग्न न झालेल्या व्यक्‍तींमधले लैंगिक संबंध, समलैंगिक संबंध आणि प्राण्यांसोबत ठेवलेले लैंगिक संबंध या गोष्टींचा समावेश होतो.

k म्हणजे, बिनव्याजाने.

l किंवा “पापं.”

a किंवा “सोडव.”

b किंवा “कीड.”

c शब्दशः “वाईट; दुष्ट.”

d  ५:६ ची तळटीप बघा.

e माणसांपेक्षा जास्त शक्‍तिशाली असलेले आणि अदृश्‍य असलेले दुष्ट प्राणी.