भाग ४
पैशाचे नियोजन कसे कराल?
“प्रत्येक बेत मसलतीने सिद्धीस जातो.”—नीतिसूत्रे २०:१८
कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी सर्वांनाच पैशांची गरज भासते. (नीतिसूत्रे ३०:८) कारण, पैसा “आश्रय देणारा आहे.” (उपदेशक ७:१२) पती-पत्नी या नात्याने पैशाबद्दल बोलणे कदाचित कठीण वाटू शकते. पण, पैशामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ देऊ नका. (इफिसकर ४:३२) पती-पत्नीने एकमेकांवर भरवसा ठेवला पाहिजे आणि पैसे कसे खर्च करावेत हे दोघांनी मिळून ठरवले पाहिजे.
१ काळजीपूर्वक नियोजन करा
बायबल काय म्हणते: “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरूज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?” (लूक १४:२८) तुम्ही तुमच्या पैशांचा उपयोग कसा कराल हे एकत्र मिळून ठरवणे खूप महत्त्वाचे आहे. (आमोस ३:३) तुम्हाला कशाची गरज आहे आणि तुम्ही किती पैसे खर्च करू शकता हे ठरवा. (नीतिसूत्रे ३१:१६) एखादी गोष्ट विकत घेण्याची ऐपत असली म्हणजे ती घ्यावीच असे नाही. कर्जबाजारी होण्याचे टाळा. बायबल म्हणते: “उसने घेणारा उसने देणाऱ्यांचा सेवक आहे.” (नीतिसूत्रे २२:७, पं.र.भा.) तेव्हा, अंथरूण पाहून पाय पसरा.—नीतिसूत्रे १५:२२.
तुम्ही काय करू शकता:
-
महिन्याच्या अखेरीस तुमच्याकडे पैसे उरले असतील तर त्याचे काय करावे हे एकत्र मिळून ठरवा
-
पैसे अपुरे पडल्यास खर्च कुठे कमी करता येईल हे ठरवा. उदाहरणार्थ, हॉटेलमध्ये जाण्याऐवजी तुम्ही घरीच स्वयंपाक करू शकता
२ प्रामाणिक असा व परिस्थितीची जाणीव राखा
बायबल काय म्हणते: “आम्ही प्रामाणिक आहोत हे देवाला माहीत आहे, पण ते प्रत्येकाला माहीत व्हावे.” (२ करिंथकर ८:२१, सुबोधभाषांतर) तुम्ही किती कमवता आणि किती खर्च करता ते प्रामाणिकपणे आपल्या सोबत्याला सांगा.
पैशांबद्दल महत्त्वाचे निर्णय घेताना नेहमी आपल्या सोबत्याशी चर्चा करा. (नीतिसूत्रे १३:१०) यामुळे तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात शांती राखण्यास मदत मिळेल. कमवलेला पैसा केवळ तुमचा नसून तुमच्या कुटुंबाचाही आहे असा विचार करा.—१ तीमथ्य ५:८.
तुम्ही काय करू शकता:
-
जेथे सोबत्याला विचारण्याची गरज नाही असे छोटेमोठे खर्च करण्यासाठी प्रत्येकी किती रक्कम बाजूला ठेवावी हे ठरवा
-
पैशाबद्दल बोलण्यासाठी एखादी समस्या निर्माण होईपर्यंत थांबू नका