व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या समस्या त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?

आपल्या समस्या त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?

आपल्या समस्या त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?

आकाशात काळे ढग जमू लागले होते. वादळ होणार होते. रामू खडकाळ रस्त्याने शेजारच्या घरी जाण्यास निघाला. त्याला काहीसे उदास वाटत होते. त्याची परिक्षा जवळ आली होती. त्याला गणिताचे काही धडे नीट येत नव्हते. त्याची आई त्यानं शेजारी जाऊन तेथील मास्टरजींकडून ते नीट शिकून घ्यावेत असा सतत आग्रह करीत होती. पण रामू आतापर्यंत त्यांच्याशी बोलला नव्हता. ते शहरातल्या शाळेत गणित शिकवीत असत. आईनं त्याला असंही सांगितलं होतं की, मास्टरजींच कुटुंब फार प्रेमळ आहे; मास्टरजी जरूर मदत करतील. एकदा आईची परिस्थिती बघूनच मास्टरजींच्या बायकोने रास्त-भाव धान्य-दुकानातून तिचं सामान आणून दिलं नव्हतं का?

रामू आईबद्दलच विचार करीत होता. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ती किती कष्ट उपसते. आणि आता तर कुटुंबात चिमुकला पाहुणाही येणार होता. त्याचीही खाण्यापिण्याची, कपड्यालत्त्याची सोय करायला हवी होती. बाप सारखं म्हणत होता, चांगलं शिकून घे, चांगली नोकरी मिळव, चार पैसे आण, मगच कोठे कुटुंबाला थोडा हातभार मिळणार.

विचाराच्या नादात मास्टरजींचं घर आलं. रामू काही काळ दरवाजासमोरच खोळंबला. तेवढ्यात आतून आवाज आला, “कोण आहे, आत या.” आणि रामूने आत प्रवेश केला.

काही वेळानं रामूचा बाप आनंद कामावरुन घरी परतत असता त्याला रामू मास्टरजींच्या घरातून निघत असल्याचे दिसले. रामू काहीसा आनंदी दिसत होता. त्याच्या चालीवरुन बापानं ते ओळखलं. आनंद मास्टरजींच्या घराजवळून जात असता पाऊस सुरु झाला, पावसाच्या मोठमोठ्या सरी पडू लागल्या. रामूला आपल्या घराकडे पळत जाताना पाहात असता मास्टरजींनी त्याच्या बापाला पाहिले, त्याला आत बोलावले आणि मुसळधार कोसळणाऱ्‍या पावसामुळे लगेच दरवाजा ओढून घेतला.

आपण तोंड देत असलेल्या समस्या

आनंद खाली बसला. दिवसभर सायकल दुकानात काम करून त्याचा जीव थकून गेला होता. मास्टरजींची पत्नी मरियम हिने गरम चहाचा कप आणताच आनंदचा चेहरा फुलला. चहा घेता घेता त्यानं सभोवार नजर टाकली. किती टापटीप होतं ते घर. मरियम परत आपल्या शिवणकामाला लागली होती आणि पॉल व रेचेल ही मास्टरजींची दोन मुलं आपला गृहपाठ करीत बसली होती. एकाएकी आनंद उसळून म्हणालाः “तुम्हाला माझ्यासारख्या दरदिवशीच्या काही समस्या आहेत असं काही दिसत नाही. तुम्ही किती शांत व समाधानी वाटता. मला तर हे बघून तुमचा फारचं हेवा वाटतो!” मास्टरजींनी स्मित केलं व म्हटलं: “आमच्याही काही समस्या आहेत आनंद, पण तुला कोणती समस्या सध्या भेडसावते आहे?”

मास्टरजींच्या सहानुभूतीपूर्वक शब्दांनी उत्तेजित होऊन आनंदने आपले हृदय त्यांच्यापुढे मोकळे केले. पैसा ही ती मुख्य बाब होती. त्याला पैसा पुरतचं नव्हता. घरमालक भाडं वाढवीत होता; शाळेची फी आणि वह्‍या-पुस्तके, गणवेश यांचा खर्च नाही नाही म्हणता केवढा झाला होता! त्याची बायको निर्मला बाजारहाट करून घरी आल्यावर दर वेळेला म्हणत असे, किती ही महागाई! जरुरीच्या गोष्टींनाही किती पैसे मोजावे लागतात. आता तर ती गर्भवती होती आणि डॉक्टरांनी सांगितलं, तिची प्रकृती नाजूक व अशक्‍त आहे म्हणून टॉनिक्स घेतली पाहिजेत. या सगळ्या गोष्टींसाठी कोठून पैसा येणार? रामूची शाळा संपायला अजून काही वर्षे आहेत; त्याला शिकण्यासाठी चांगल्या शाळेत पाठवलं, इतका पैसा त्याच्यासाठी खर्च केला आहे तरी त्याला चांगली नोकरी थोडीच मिळणार? कॉलेजात शिकून कितीतरी पदव्या मिळवलेलेही बहुतेक बेकारच आहेत ना? मी, तर आता दुकानात सायकल दुरुस्त करणारा बापडा, मला अशी काय दुसरी मोठी नोकरी मिळणार की, माझं घरचं भलं होऊ शकेल. माझ्या मुली मोठ्या झाल्या तर हुंड्याविना त्यांची लग्नं तरी कशी होणार? हुंडा घेणं-देणं हा कायद्याने गुन्हा आहे हे मानलं, पण लोक तर या वा त्या मार्गानं त्याची मागणी करतातच ना?

आपण सभ्य गृहस्थ आहोत असं आनंदला नेहमीच वाटतं होतं. त्याच्या आईबापानं त्याला खोटं बोलू नये व चोरी करू नये असं शिकवलं होतं. पण यामुळं त्याला काय मिळालं? त्याला भ्रष्टाचार आवडत नव्हता. पण आपल्या प्रामाणिकपणामुळं आपण पुढं जाऊ शकत नाही, असं त्याला दिसून आलं होतं. सायकल दुरुस्ती करणारे दुसरे लोक चोरलेल्या सायकलींची विक्री करीत आणि जुने झालेले भाग नवे म्हणून विकीत, त्यांचा व्यवसाय मात्र तेजीत चालला होता. मग, मी पण तेचं का करू नये? थोडा जादा पैसा जवळ असता तर त्यामुळं बराचं भार हलका झाला असता.

आनंद आपली कथा सांगत असता मास्टरजी शांतपणे ऐकून घेत होते. त्यांच्या चेहऱ्‍यावर सहानुभूती दिसत होती.

“आनंद,” ते म्हणाले, “तुला वाटतं का की, पैशानं सर्व समस्या सुटू शकतील? सगळे श्रीमंत लोक सुखी, सुरक्षित, आणि कोणा समस्येविना आहेत असं तुला वाटतं का? त्यांना आजार होत नाही? त्यांच्या मुलांविषयी काय, जी नशेबाज, अनैतिक किंवा बंडखोरही होतात? जेथे पैसा मुबलक आहे असं म्हणतात त्या राष्ट्रातही आपण भ्रष्टाचार, लाच घेणं, बेकारी आणि वाढत्या हिंसाचाराच्या बातम्या ऐकत नाही का? नाही आनंद, पैशानं तुझ्या व माझ्या सर्व समस्या सुटू शकतील हे मी मानायला तयार होणार नाही.”

“पण मास्टरजी, तुमच्याही समस्या?” आनंद म्हणाला, “कोणत्या त्या?”

“ज्या तुझ्या आहेत त्याच माझ्याही आहेत, आणि मला वाटतं की, आपल्या सर्वांना सारख्याच समस्या आहेत.”

“पण मी तर बघतोय की, तुम्ही काही माझ्यासारखे त्रासलेले दिसतं नाही. तुमच्या कुटुंबाकडे पाहता, ते सर्व शांत व सुखी वाटतात. यामागील गुपित काय आहे, मास्टरजी?”

“आनंद, आमच्या कुटुंबातील सर्वांची खात्री झालेली आहे की, कोणीतरी आमच्या सर्व समस्या लवकरच सोडवणार आहे.”

“काय म्हणता, म्हणजे तुम्हाला मोठी रक्कम मिळणार की काय?”

“तसं नाही, आनंद,” मास्टरजी हसत म्हणाले. “आमचा विश्‍वास आहे की, लवकरच देव जागतिक घडामोडीत हस्तक्षेप करणार आहे आणि असा काही बदल घडवून आणणार आहे की, सभ्य, शांतीप्रिय लोकांना मग पुन्हा महागाई, आजार, गुन्हेगारी, घरांची टंचाई, बेकारी, हिंसा किंवा असुरक्षितता यांचा कधीच अनुभव येणार नाही.”

आनंद विस्मयचकित झाला. तो म्हणालाः “मास्टरजी, तुम्ही माझ्या आईसारखंच बोलता बघा. ती सुद्धा म्हणत होती की, ‘सगळं काही देवावर सोडून दे बाबा, तुझं नशीब त्याच्याचं हाती आहे.’ मास्टरजी, तुम्ही एवढे शिकलेले असून असा विचार कराल असं मला कधीच वाटलं नाही. मी तर याचा कधी विचारचं केला नव्हता. तुम्ही ख्रिस्ती आहात हे ठीक. पण मला जे दुसरे ख्रिस्ती लोक ठाऊक आहेत त्यांना, तुम्हाला वाटतं तसं वाटतं नाही, हे मला माहीत आहे. ते तर राजकारण, मोर्चे यात लुडबुडत आहेत. त्यांना वाटतं की त्यांच्या कतृत्वानं सगळं सुधारलं जाईल. ते काही ‘देवावर सोपवून देत नाही.’”

“मला वाटतं आनंद की, सुरवातीला मी हे स्पष्ट केलेलं बर की, मी व माझं कुटुंब जे मानतो ते आणि चर्चमध्ये जे शिकवलं व आचरलं जात त्यामध्ये खूप फरक आहे. आपल्या शहरात वेगवेगळी चर्चेस आहेत हे तुला माहीत आहे व ते सगळे ख्रिस्ती असल्याचा दावा करतात. याचा अर्थ ते म्हणतात की, ते येशूचे अनुकरण करतात आणि बायबलचा उपदेश पाळून चालतात. पण तू जर त्यांच्या विश्‍वासाचे निरिक्षण केलेस तर त्यांच्या कित्येक शिकवणी ख्रिस्ताच्या शिकवणींपासून दुरावल्या आहेत. आता बघ ना, ख्रिस्तानं म्हटलं की, त्याच्या अनुयायांनी अहिंसावादी असावं आणि आपल्या शत्रूंवरही प्रेम करावं. तर आता ही ख्रिस्ती म्हणविणारी राष्ट्रे या उपदेशाचे अनुकरण करीत आहेत का? यांनीच दोन जागतिक महायुद्धात तसेच अणुची शस्त्रे निर्माण करण्यात पुढाकार घेतला नाही का? शिवाय अहवाल दाखवितो की, चर्चनी याला आपली संमती दिली आहे. आता हे लोक आपल्या मिशनऱ्‍यांना ख्रिस्ती नसलेल्या राष्ट्रात पाठवितात तेव्हा ते नेहमीच आपणासोबत ख्रिस्ताची शिकवण देत नाही.

“परंतु, आज जगभरात आमच्यासारखे काही लोक आहेत, ज्यांचा विश्‍वास आहे की, देव लवकरच आमच्या समस्या सोडवील. आमची ही आशा बायबलमध्ये फार पूर्वी जी भाकिते करण्यात आली आहेत त्यावर आधारलेली आहे. यामुळे आमची खात्री पटलेली आहे की, लवकरच एक जागतिक बदल होणार आणि यामुळेच आम्ही होता होईल तितक्या प्रमाणात ही आनंदाची वार्ता आपल्या शेजाऱ्‍यांमध्ये सांगण्यासाठी वेळ देत असतो. हा बदल करण्याचे अभिवचन ज्याने दिले आहे त्या बायबलच्या देवाचे नाव यहोवा असल्यामुळे आम्हाला यहोवाचे साक्षीदार या नावानं ओळखण्यात येतं.”

“मास्टरजी, तुम्ही सांगितलेलं सारं काही खरं आहे, पण हे मला सगळं नवं वाटतं बघा. याबद्दल आपण पुन्हा कधी तरी आणखी बोलू, बर कां.”

पृथ्वीवर आनंदात राहण्याची इच्छा

“मामंजी, त्यांचा देवावर विश्‍वास आहे,” निर्मला आपल्या सासऱ्‍यास सांगत होती.

“तू कशाबद्दल बोलत आहेस, निर्मला?”

“तुम्हाला वाटत असेल की मास्टरजी व त्यांच्या घरातील लोक कधीच कोणत्या मंदिरात, वा मशिदीत किंवा चर्चमध्ये गेले नाहीत आणि त्यांच्या घरामध्ये मूर्त्या किंवा धार्मिक फोटोही नाहीत, म्हणून ते देवाला मानीत नसतील. पण त्यांचा देवावर विश्‍वास आहे. मरीयमनं मला एकदा, मी माझ्या येणाऱ्‍या बाळासाठी तिच्या घरी बसून कपडे कसे शिवावेत हे ती मला शिकवीत असताना सांगितलं होतं. ती म्हणाली की, ज्यानं सर्व काही निर्माण केलं त्या देवावर त्यांचा विश्‍वास आहे व त्याचं नाव यहोवा आहे. तो अदृश्‍य देव आहे व आतापर्यंत कोणी त्याला पाहू शकले नसल्यामुळे ते त्याची मूर्ति किंवा फोटो बनवीत नाही. ती म्हणाली की, त्यांच्या शास्त्रात, बायबलमध्ये असे म्हटले आहे की, “देव आत्मा आहे व त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” (योहान ४:२४) या देवाला प्रार्थना म्हणताना ते कोणतीही दिसणारी वस्तु समोर ठेवीत नाहीत. ते स्वतःला यहोवाचे साक्षीदार असे म्हणवतात.”

“आणि तिनं देवाची खरेपणाने उपासना करण्याविषयी एक मनोरंजक गोष्ट सांगितली. ती म्हणाली की, खरेपणानं याचा अर्थ जे खरं किंवा सत्य आहे ते, आणि यामध्ये कसल्याही काल्पनिक किंवा दंतकथेच्या गोष्टी येत नाहीत. या कारणास्तव ते मानवी तत्त्वज्ञानावर विश्‍वास ठेवीत नाहीत, कारण ते वस्तुस्थितीला जुळणारे नाही असे ती म्हणाली. (मार्क ७:७, ८) याचे उदाहरण देताना तिने म्हटले की, बहुतेक धर्म शिकवतात की, ही पृथ्वी सोडून वर स्वर्गात देवाला जाऊन मिळणे हे आमचे अंतिम ध्येय आहे किंवा जीवनानंतर कोणा आत्मिक क्षेत्रात विलीन होणे हा एक बहुमान आहे. पण ती म्हणते की, हे वस्तुस्थितीशी जुळणारे नाही, कारण मानवाची स्वाभाविक इच्छा ती नाही. तिनं म्हटले की, मानवाला काय पाहिजे, एक चांगले घर, उत्तम आरोग्य, आनंदी परिवार आणि प्रेमळ शेजारी. लोक आनंदी असतात तेव्हा त्यांना मरावेसे व स्वर्गाला जावेसे किंवा निर्वाण वा मोक्ष मिळविणे आणि आपले व्यक्‍तीत्व हरवून कोणा अस्तित्व नसल्यासारखे व्हावेसे वाटत नाही. तिने मला विचारले, ‘मग, या पृथ्वीवर आनंदाने जीवन जगण्याची इच्छा मानवाठायी कोणी घातली असावी बरे?’ ज्याने त्याची निर्मिती केली त्यानेच. यामुळेच ती म्हणते त्याप्रमाणे यहोवा देवाने मानवाला या पृथ्वीवर सदासर्वदा आनंदी राहण्यासाठी निर्माण केले असे बायबल सांगते. ही माणसाची स्वाभाविक इच्छा असल्यामुळे ती म्हणाली की, बायबलचे हे शिक्षण जे खरे आहे ती वस्तुस्थिती दाखविते व म्हणून याला सत्य म्हटले पाहिजे.”

“ते जर बरोबर आहे निर्मला, तर मी म्हणेन की, हा देव आपला उद्देश पुरा करण्यात अपयशी झाला आहे. लोक आज पृथ्वीवर आनंदात नाहीत. समस्या व त्रास हेच आज पृथ्वीवरचे जीवन झाले आहे, आणि हे जग सोडले तरच आपल्याला यापासून खरी मुक्‍तता मिळू शकते. आनंद म्हणाला की, आज सायंकाळी मास्टरजी व त्यांचे कुटुंब येथे येणार आहे. तर पाहू या की, मास्टरजीला याविषयी काय म्हणायचं आहे.”

सर्व समस्या निवारण करण्याचे अभिवचन देणारा

सायंकाळी हवामानाच्या व मुलांच्या जवळ येत असणाऱ्‍या परिक्षांविषयी गप्पा झाल्या. मग दादाजीने आधी आपली सून निर्मला हिच्यासोबत बोलणे करून जी चर्चा केली होती तिची प्रस्तुती येथे केली. मास्टरजीने क्षणभर विचार केला व मग आनंदच्या आईला विचारले, “दादीजी, मला सांगा की, घरातील कोणाला मलेरिया झाल्यावर तुम्ही काय करता?”

मास्टरजींचा प्रश्‍न ऐकून ती जरा चमकली, पण म्हणालीः “मी त्याला औषध देणार. आम्हाला बऱ्‍याच वेळेला मलेरियाचा त्रास काढावा लागला तेव्हा कोणते औषध पाहिजे हे मी स्वतःच जाऊन दुकानातून आणते.”

मग, दादाजींकडे वळून मास्टरजी म्हणालेः “पाहिलं का दादाजी, जेव्हा कोणी त्रासात असतो तर त्यावेळेला ही गोष्ट करणं अगदी व्यवहार्य आहे. बर होण्यासाठी औषध घेतलं पाहिजे. तुम्ही म्हणाल का की, ‘मला मरु द्या व या जगातून जाऊ द्या?’ आता समजा, आपल्यापाशी जगातील सर्व त्रास व सर्व समस्या काढून टाकणारे ‘औषध’ आहे. मग, आम्हाला मरण्यापेक्षा व आमच्या प्रिय नातेवाईकांना सोडून जाण्यापेक्षा येथे राहणं बरं वाटणार नाही का?

“अर्थात, माणसाला आपल्या सर्व समस्या सोडविण्याइतकी ताकद नाही. याकरताच तर, त्याला जगात इतका काळ त्रास सहन करावा लागला आहे. तुम्ही मानता त्याप्रमाणे कलियुगात देव अवतार घेऊन येणार आहे व तो या पृथ्वीवर सत्ययुग आणणार आहे असे तुमचा विश्‍वास शिकवीत नाही का? तर मग, ज्या प्राचीन तत्त्ववेत्यांनी हे शिक्षण शिकविले त्यांचाही असा विश्‍वास नव्हता का की, मानवानं या पृथ्वीवर आनंदात राहावं अशी देवाची पूर्वीपासून इच्छा होती?

“दादाजी, आपण ज्या वसाहतीत राहात आहोत, तिचा जरा विचार करा. ती पहिल्यांदा बांधण्यात आली तेव्हा किती चांगली होती, होना? पण आज तिची दशा पहा ना. आज कित्येक निवासी येथे राहायला आले आहेत ज्यांना या वसाहतीची मुळी कदर नाही. त्यांनी रस्त्यावरचे दिवे मोडले आहेत, त्यांना हवा तिथे कचरा टाकताहेत, खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत; आणि पहा ना नळांचीही चोरी केली आहे. आता पाणी निष्कारण वाहत राहून जमीनीवर किती चिखल झालेला दिसतोय. तर आता काय केलं पाहिजे? वाईट निवासियांना काढून टाकलं व वसाहतीची दुरुस्ती केली तर मग, आम्हाला राहण्याचा पूर्वीसारखाच आनंद मिळणार नाही का? देवानं अगदी हेच सबंध पृथ्वीवर करण्याचे योजिले आहे.

“बायबलच्या मते, देवाने मानवाची पूर्ण स्वरुपाची, आरोग्यदायी आणि आनंदी अशी निर्मिती केली होती. पण देवाच्या आज्ञा अवमानून लोकांनी विनाशकारी गोष्टी केल्या आणि ते दोषी बनले. (अनुवाद ३२:४, ५) इतकेच नाही, तर ते देवाची निर्मिती, ही पृथ्वी हिची देखील आज नासाडी करीत आहेत. यासाठीच, पवित्र शास्त्र म्हणते की, देव प्रथम अशा वाईट ‘निवासियां’ना या जगातून काढून टाकणार व मग चांगल्या लोकांना येथे आनंदी वातावरण पुन्हा आणण्याच्या कामी मदत देणार.”—प्रकटीकरण ११:१८.

“पण मास्टरजी, मला वाटतं की, काही काळ गेल्यावर पुनः एकदा सर्व काही वाईटच होणार. आणि म्हणूनच देवाने पृथ्वीला शुद्ध करून सत्ययुग आणल्यावर परत वाईट गोष्टी घडतात व मग पुन्हा कलियुग येते. तर मला वाटतं की, या जगापासून सुटका झाल्यावरचं आपल्याला चिरकालिक शांती मिळणार. आमच्या कुटुंबात मी वेळोवेळी समस्या सोडवीत आलो आहे, पण त्या पुनःपुन्हा येत राहतात किंवा त्यांच्या जागी दुसऱ्‍या येतात.”

“होय, हे प्रत्येकाच्या बाबतीत घडते. पण ते देवाबद्दल घडू शकणार नाही. देवाठायी समस्या सोडविण्याची केवळ नव्हे तर त्या पुन्हा उद्‌भवू नयेत यासाठी ताकद व इच्छा ही आहेत. संपूर्ण पृथ्वीवर शांती व सुरक्षा कायमची स्थापित करण्याची क्षमता त्याच्याठायी आहे.”—नहूम १:९.

आता, इतक्या वेळ शांतपणे बसून चाललेले संभाषण ऐकणाऱ्‍या आनंदने मध्येच शिरकाव केला. तो म्हणालाः “मास्टरजी, मला क्षमा करा, पण मी तुमच्या बोलण्याशी सहमत होऊ शकत नाही. कारण आपल्याला इतका काळ समस्यांचा सामना करावा लागला आहे व तरीही देव कधी मध्ये पडला का? कधीच नाही! म्हणून मला वाटतं की, आपण मानवच हा बदल करून दाखवू शकतो. आम्ही सर्व व्यवस्थाच बदलली पाहिजे, सर्व श्रीमंत, बंडखोर याविरुद्ध बंड पुकारून अशांना सत्तेतून काढून टाकलं पाहिजे. जगातले सर्व दुःखी, दरिद्र्‌यांनी त्रासाविरुद्ध उचल खाल्ली तर आम्हाला हा बदल घडवून आणता येईल. मग, मला रामू व प्रिया यांना चांगल्या शाळेत टाकता येईल आणि यासाठी मोठी देणगी देण्याची किंवा कोणाचा वशिला लावण्याचीही गरज राहणार नाही.”

“आनंद, मला तुझ्या भावना कळतात. अशा परिस्थितीविषयी खरे पाहता बायबलमध्ये आधीच सांगण्यात आलं आहे की, आज कित्येक शतके ‘एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याची हानि करतो.’”—उपदेशक ८:९.

“पण, हेच तर देवाला आवडतं ना?” आनंदने विचारले. “जेथे देवाची भक्‍ती होते तेथेही श्रीमंत लोक गरीबांना नाडवतात व त्यांच्यावर जुलूम करतात.”

“नाही आनंद, देवाची तशी इच्छा नव्हती व नाही. बायबलमधील अहवाल सांगतो की, सहमानवावर नाही तर, कमी प्रतीच्या जिवांवर म्हणजे जनावरे, मासे व पक्षी यांजवर सत्ता चालविण्यासाठी देवाने मानवाची निर्मिती केली होती.”—उत्पत्ती १:२८.

“ते ठीक आहे. आता मी म्हणतो की, मानवावर मानवाने सत्ता गाजविणे हे देवाच्या इच्छेविरुद्ध आहे तर जगातील सर्व क्रांतीकाऱ्‍यांनी मिळून सर्व भ्रष्ट व जुलूम करणाऱ्‍या लोकांचा नाश केला तर ती देवाची इच्छा पूर्ण करण्यासारखे नसेल का?”

“समजा, असं घडलं, तर त्यानंतर काय होईल? तेव्हा हेच क्रांतीकारी सत्ता आपल्या हाती घेतील आणि मग ते देखील जाच करणारे बनू शकतील व मग, शेवटी काय तर पालथ्या घड्यावर पाणी! आपण होतो तेथेच पुन्हा जाऊ. तथापि, देवाविषयी बघता, तो सर्व दुष्ट आधिपत्य काढून टाकू शकतो इतकेच नाही तर ईश्‍वरी आधिपत्य प्रस्थापित करून दीर्घकालीन शांती आणू शकतो. हेच यहोवा देव लवकर करणार असे बायबल म्हणते. हाच आमचा तसेच जगभरातील हजारो यहोवाचे साक्षीदार व त्यांच्या कुटुंबियांचा विश्‍वास आहे. यामुळे आम्हाला भविष्यासंबंधाने तेजोमय आशा मिळते.”

समस्या केव्हा सुटणार?

“हे ऐकायला बरं वाटतं,” आनंद म्हणाला. “पण मास्टरजी, बदल होत आहे याविषयी मला काही चिन्ह किंवा सुधारणा तर सध्या दिसत नाही. मग, माझ्या जीवनमानात हा बदल देव घडवून आणील हे मी कसे मानावे?”

“समजा आनंद की मी तुला असं म्हटलं की, तू घरात नसताना मी तुझ्या बागेत आंब्याचं एक बी लावलं आहे. तू बाहेर जाऊन बघतोस, आणि तुला काय दिसते, काहीच नाही. जमीन उकरलेली देखील दिसत नाही. मी तर परका आहे. तेव्हा तू असा विचार करशीलः ‘हा परका येऊन माझ्या बागेत आंब्याचे बी लावण्याची एवढी तसदी का घेतो?’ मी, जे काही केल्याचे सांगतो त्यावर तुझा खराच विश्‍वास बसेल का?”

“नाही, मला नाही वाटतं. तुम्ही ते केलंच असेल की काय अशी शंका मला वाटू लागेल.”

“बरोबर. असंच कोणालाही वाटेल. पण आता समज की, काही काळाने तुला दिसलं की, जमिनीतून पाते आले आहे व त्याची वाढ होत आहे, आणि कोणीतरी अज्ञातपणे, तू घरी नसता, त्याला येऊन पाणी घालून जात आहे. वेळ जातो, वर्षेही जातात. आता तुला कळते की हे खरेच आंब्याचे झाड आहे. मग, एके वर्षी तुला हे दिसते की झाडाला बहर आला आहे. आता तुला कसे वाटेल?”

“तेव्हा मी समजेन की, तुम्ही जे म्हणाला ते खरे होते. माझ्याठायी तुम्हाविषयी सद्‌भावना उत्पन्‍न होईल, कारण हे दयाळू काम तुम्ही मजसाठी केले. माझी नजर नेहमीच झाडाला खिळलेली राहील आणि झाडाला कधी आंबा येतो त्याचे निरिक्षण करीत राहील.”

“छान. अशीच आशा सगळे धरतील. आता आनंद, हे जे उदाहरण मी तुला सांगितलं आहे ते यासाठी की, यहोवाचे साक्षीदार जगात लवकरच प्रचंड बदल घडून येणार आहे अशी का अपेक्षा धरतात ते स्पष्ट करण्यासाठी. मला याविषयी आणखी सांगू दे.

“बायबलचं लिखाण होण्यासाठी साधारण १,६०० वर्षे लागली. ४० पेक्षा अधिक वेगवेगळ्या लोकांनी ६६ लहान पुस्तकात त्याचं लिखाण केलं. नंतर ही सर्व पुस्तके संग्रहीत करून त्याचा एक मोठा ग्रंथ बनला. लेखकांपैकी एकानेही हे म्हटलं नाही की पुस्तकात लिहिण्यात आलेले विचार त्याच्या स्वतःचे आहेत. त्यांनी म्हटलं की, काय लिहावं याची माहिती देव त्यांना पुरवीत होता व ती माहिती त्याच्यापासून आली होती. यापैकीचा एक लेखक, जो मध्यपूर्वेत एकेकाळी राजा होता, त्यानं म्हटलं: ‘यहोवाचा आत्मा माझ्याद्वारे म्हणाला; त्याचे वचन माझ्या जिव्हेवर आले.’—२ शमुवेल २३:२.

“अगदी पहिलेच पुस्तक निर्मितीचे वर्णन देते; ते म्हणते की, यहोवा देवाने मानवाची पूर्णतेत निर्मिती केली व त्याच्या मार्गदर्शनार्थ आपले नियम त्याला दिले. पण त्याने त्याला स्वेच्छा स्वातंत्र्य देखील बहाल केले होते की, ज्यामुळे देवाचे नियम पाळावे की नाही ते तो ठरवू शकेल. त्या नियमांचे पालन त्याला धन्यता देणार होती आणि त्यांचा भंग त्याच्यावर शिक्षा आणणार होता. मानवाने देवाची आज्ञा मोडली व अशाप्रकारे स्वतःवर आणि आपल्या संतानावर त्रास व मरण ओढावून घेतले. पण देवाने एक ‘बी’ रोवले. होय, ते आशेचे ‘बी’ होते की, एके दिवशी देव आमच्या सर्व समस्या सोडवून मानवजातीत परत शांती व आनंद प्रस्थापित करणार.

“हे ‘बी’ देवाने एका अभिवचनाच्या रुपात दिले की, तो बदल घडवून आणणार होता. आता इतिहासभर बहुतेक लोकांना देव अज्ञात किंवा ‘परका’ असा होता. यहोवाने ते आपले मूळचे अभिवचन दिले किंवा उदाहरणाच्या भाषेत म्हणायचे की ते ‘बी’ लावले, तेव्हा तू, मी, किंवा आज जिवंत असणारे कोणीही तेथे हजर नव्हते. याचप्रमाणे तो या ‘बी’ला पाणी देत राहिला, म्हणजे या अभिवचनाची तो शतकानुशतके पुनरावृत्ती करीत राहिला व त्याविषयीची अधिक माहिती देत राहिला तेव्हाही आपण कोणी तेथे नव्हतो. पण याविषयीची माहिती मात्र आपल्याला बायबलमध्ये विविध पुस्तकातून विवेचीत केल्याचे पहायला मिळते. बायबलचे लिखाण पूर्ण झाले तेव्हा त्यात, देव मानवजातीच्या समस्या कशा सोडविणार त्याची पूर्ण स्पष्टता दिलेली होती.

“तर असा होता माझ्या उदाहरणामागील मुद्दा. तुला तो समजला का आनंद. ‘बी’ची पेरणी—देवाचे मूळचे अभिवचन तसेच त्याला पाणी घालणे म्हणजे देवाने याविषयी पुरविलेली अधिक माहिती, हे आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिले नाही तरी आता पूर्णपणे बहरलेला वृक्ष आपण पाहू शकतो. तेव्हा याला फळ येईलच असेही आपण खात्रीने अपेक्षू शकतो.”

“तुमच्या म्हणण्याचा काय अर्थ आहे? मघाशी मी तुम्हाला म्हटलंच होतं की, बदल घडून येणार याविषयी तर मला काही दिसत नाही.”

“तुला ते दिसेल. पण तुला ती जाणीव होत नाही याचे कारण हे की, कसे बघावे हे तुला कोणी समजावून सांगितलेले नाही. देव हस्तक्षेप करील तेव्हा या पृथ्वीवर कशी परिस्थिती असेल त्याबद्दल बायबल सविस्तर वर्णन देते. ते म्हणते की, कित्येक उल्लेखनीय गोष्टींचे निरिक्षण एका पिढीतले लोक करतील, आणि जी पिढी ते ‘चिन्ह’ पाहील तीच दुष्टाईचा अंत झालेला आणि शांतीमय नव्या जगाची सुरवात झालेली पाहू शकेल. (मत्तय २४:३) तर आनंद, बायबल काय म्हणते ते तुला जाणण्याची इच्छा आहे का म्हणजे तुलाच प्रत्यक्षात त्याविषयीचा निवाडा ठरविता येईल आणि त्या गोष्टी तशाच घडत आहे का हे बघता येईल.”

“होय, जरुर. मला ते आवडेल.”

“चिन्ह”

“तुला आठवतं का आपण मागे एकदा सायंकाळी, आपल्या वसाहतीत हिंसाचार केवढा वाढत चालला आहे ते बोललो होतो आणि असंही म्हटलं होतं की अंधार पडल्यावर स्त्रियांनी व मुलांनी बाहेर जाऊ नये? पूर्वी शांततेचं वातावरण असलेल्या या क्षेत्रात कितीतरी लोकांवर हल्ले झाले आहेत, त्यांना लुबाडण्यात आले आहे. तर हाच तो ‘चिन्ह’ याचा भाग आहे. बायबल म्हणते की, ‘अधर्माची वाढ’ होईल व लोक ‘धनलोभी, . . . असंयमी, क्रूर’ होतील. आपण अलिकडेच मादक औषधे बनवणाऱ्‍या उत्पादकांवर जी धाड पडली होती त्याविषयीही बोललो होतो—आठवते ना? केवढी घातक वस्तु आहे ती, पैसे बनविण्यासाठी लोकांच्या जीवनाचा बळी घेणं! साधारणतः कोणी आजारी आहे असे दिसल्यावर लोकांना वाईट वाटत असते, पण बायबल म्हणते की, या दुष्ट जगाच्या शेवटल्या काळी लोक ‘स्वार्थी, . . . स्वाभाविक कळवळा नसणारी, . . . चांगुलपणाविषयी प्रेम न बाळगणारी’ होतील तेव्हा तो कठीण काळ असेल.”—मत्तय २४:१२; २ तीमथ्य ३:१-३.

रामू मध्येच म्हणालाः “दादी आम्हाला हेच म्हणत होती की, हे कलियुगाचे चिन्ह आहे; ती म्हणते की, लोक कलियुगात खूपच स्वार्थी व लोभी आहेत. पण तिचं म्हणणं आहे की सत्ययुग यायला अजून बराच अवकाश आहे; तो तिच्या जमान्यात येणार नाही.”

“रामू, दादीला वाटतं तसं आज अनेकांना वाटत आहे. परिस्थिती खूपच वाईट आहे याची त्यांना कल्पना आहे आणि बदल व्हावा अशीही त्यांना अपेक्षा वाटते, पण तो केव्हा येईल याविषयी त्यांच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. येथेच बायबल आमची मदत करते. ते स्पष्टपणे सांगते की हा बदल आमच्या काळात येईल. त्याने जे चिन्ह दिले आहे त्यामध्ये माणसाचं व्यक्‍तीमत्व वाईट होण्यापेक्षाही अधिक गोष्टी समाविष्ट आहेत हे मला तुम्हाला आणखी स्पष्ट करावंसं वाटतं.

“बायबलमध्ये मत्तयाच्या पुस्तकात २४ अध्याय व ७ व्या वचनात असं म्हटलं आहेः ‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील.’ चिन्हातील हा भाग येशू ख्रिस्ताने यासाठी भाकित केला की, त्याद्वारे दुष्टाईचे शेवटले दिवस आले आहेत आणि देवाकडील नाश जवळ आहे याची स्पष्टता करावी. आता याची तुलना, याच काळाविषयी बायबलचे शेवटले पुस्तक प्रकटीकरण यामध्ये जे वर्णन देण्यात आले आहे त्याच्याशी करून बघा. ६ वा अध्याय आणि ४ ते ८ वचनांमध्ये, अशी परिस्थिती सबंध जगभर असेल असे म्हटल्याचे आढळेल. युद्धाचे वर्णन देताना त्यात ‘पृथ्वीची शांती हरण’ केल्याचे म्हटले आहे. रामू तुला इतिहास या विषयात पहिले जागतिक महायुद्ध १९१४ मध्ये सुरु झाल्याचे शिकायला मिळाले असेल. इतिहासकार म्हणतात तेव्हापासून इतिहासाला वेगळेच वळण लागले कारण तेव्हापासून आपल्याला एकामागून एक युद्धे होत असलेली आणि सबंध पृथ्वीतून शांती हरण केल्याचे पहावयास मिळाले आहे.

“येशूने अन्‍नटंचाईविषयी जे म्हटले त्याची अधिक माहिती हा अध्याय देतो. तो, सबंध दिवसाच्या पगाराला थोडेसे गहू मिळत असल्याचे सांगतो. आणि आनंद, निर्मला जेव्हा बाजाराला जाते तेव्हा तिची हीच तक्रार असते ना? जरुरीच्या गोष्टींना किती पैसे मोजावे लागतात, असं ती म्हणाली नव्हती का? आफ्रिका व आशिया खंडात दुष्काळाने जी भयानक अन्‍न टंचाई निर्माण केली आहे ती बघा. लाखो लोक रात्री अन्‍नाविना झोपी जातात. अपुऱ्‍या आहारामुळे जडलेल्या आजारामुळे मुले मरतात. खरंच, अन्‍न टंचाई ही आमच्या काळातील जागतिक पिडा बनली आहे.

“या चिन्हाचा आणखी एक भाग म्हणजे मऱ्‍या किंवा रोगराई. औषधोपचारात इतकी प्रगति झालेली असली तरी आज डासांकरवी उद्‌भवणारा हिंवताप व इतर आजारांपासून आपली सुटका होऊ शकली नाही. आपल्याला सर्वत्र शुद्ध पाणी मिळू शकत नाही व यामुळेच विषमज्वर, साथीचे रोग, कावीळ, हगवण किंवा किड्यांचा संसर्गरोग यांची बाधा होते. प्रगत म्हटल्या जाणाऱ्‍या देशात हे आजार कमी असले तरी तेथे कर्करोग, हृदयविकार, लैंगिकरित्या जडणारे आजार व इतर पीडा सतावत आहेत.

“तर आता, येथे बायबल आम्हाला अंत खरा कधी येईल ती अचूक वेळ सांगते. प्रिया, कृपया मत्तयाचे पुस्तक काढून तेथील २४ व्या अध्यायामध्ये ३२ ते ३४ वचने वाचून दाखवतेस का.”

“अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या. त्याची डहाळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्हीही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ, दाराशीच आहे असे समजा. मी तुम्हास खचित सांगतो की, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.”

“धन्यवाद प्रिया. याचा काय अर्थ होतो ते तुम्हाला समजले का? झाडाला पाने फुटू लागली की, उन्हाळा जवळ आल्याचे आपण समजतो. तसेच जेव्हा तुम्ही चिन्ह —ज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडणार असल्याचे म्हटले आहे ते—बघता तेव्हा तुम्ही समजू शकता की, देवाने जगातील कारभार आपणाकडे घेण्याची वेळ जवळ आली आहे. पण किती जवळ? येशू म्हणतो, ‘हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.’ कोणती पिढी? जी हे चिन्ह पाहते तीच. तसे नाही तर चिन्ह देण्याचा अर्थ तो काय? हा या काळी राहणाऱ्‍या लोकांना इशारा असा आहे की, त्यांनी आता आपल्या जीवनाचा बचाव करता यावा म्हणून कृती केलीच पाहिजे. रेल्वे फलाटावर घंटा होते तेव्हा गाडी उद्या येईल असे आपण समजतो का? आम्ही खाली बसून झोपा काढतो का? नाही. आपण आपले सर्व सामानसुमान नीट करतो कारण गाडी थोड्याच वेळात फलाटाला येईल हे आपल्याला समजलेले असते. अशाप्रकारे येशूने म्हटले की, ज्या पिढीचे लोक हे इशारेवजा चिन्ह पाहतील त्यांचीच पिढी या दुष्ट जगाचा पूर्ण नाश पाहील. दुसऱ्‍या शब्दात म्हणायचे तर या चिन्हाचा सुरवातीचा भाग १९१४ मध्ये दिसला तेव्हा जे लोक जिवंत होते व ज्यांना त्याची जाणीव झाली होती, त्यापैकीचे काही लोक अंत येईल तेव्हा जिवंत असतील.”

“दादाजी, तुम्ही १९१४ मध्ये होता का?”

“नाही रामू, मी अद्याप तितका म्हातारा झालो नाही. पण माझा जन्म त्यानंतर काही वर्षातच झाला, आणि मला आठवतं की, मी लहान असताना माझी आई म्हणाली होती की, माझे वडील व त्यांच्या घरचे कित्येक लोक या पहिल्या महायुद्धानंतर जो भयानक आजार सर्वत्र पसरला होता त्यामध्ये बळी पडले. त्याला स्पॅनिश फ्ल्यू असे म्हणण्यात आले व यामुळे जगात सर्वत्र लाखो लोक मेले.”

“तर दादाजी, हा देखील त्या चिन्हाचा एक भाग आहे. ती पीडा इतकी भयानक होती की ती तुम्हाला आज ७० वर्षे निघून गेली तरी चांगली आठवणीत आहे.”

“परंतु, देवाने आपल्या दयेनुसार, तो काय करणार आहे याविषयी इतकी स्पष्ट ताकीद दिली असली तरी बायबल म्हणते की, बहुतेक मानवजात याकडे दुर्लक्ष करील. ते म्हणते की, लोकांचे दैनंदिन कामात लक्ष लागून राहील; त्यांना खाण्यापिण्याची तसेच आपली मुले कोणाबरोबर लग्न करतील अशा साधारण गोष्टींविषयीची चिंता वाटत असेल, त्यामुळे तो नाश एकाएकी येऊन त्यांच्यावर कोसळेल तरीही ते दखल घेणार नाहीत. पवित्र शास्त्र असेही भाकित करते की, या दुष्ट जगाचा नाश येत आहे असे सांगितल्यावर पुष्कळजण थट्टा व उपहास करतील. यामुळेच नम्र व प्रांजळ लोकांना हा इशारा मिळतो की, त्यांनी त्या बहुतांसारखे होऊ नये तर ती ताकीद गंभीर समजावी.—मत्तय २४:३८, ३९; लूक २१:३४-३६; २ पेत्र ३:३, ४.

“हेच जगातील २१२ देशातील ४० लाखापेक्षा अधिक लोकांनी केलं आहे. त्यांचा या इशाऱ्‍यावर विश्‍वास आहे आणि आपण त्या मोठ्या नाशातून पार व्हावे व देवाने मानवास दिलेल्या या सुंदर पृथ्वीघरात राहण्यास योग्य असे ‘निवासी’ आहोत हे शाबीत करावे यासाठी करण्याजोगे सर्वकाही करीत आहेत. तुम्हाला जेथे जेथे हे यहोवाचे साक्षीदार आढळतील तेथे ते त्यांच्यामध्ये वंश, जात किंवा वर्ण यांचा भेदाभेद मानीत नसल्याचे दिसेल; ते एका मोठ्या जागतिक कुटुंबाचे आहेत. देवाची आज्ञा मानून ते युद्धात भाग घेत नाहीत; तसेच हिंसाचार, क्रांत्या आणि जगात बदल घडवून आणावेत म्हणून राजकीय हालचाली करीत नाहीत. उलटपक्षी, ते सर्वांविषयी प्रेम दर्शवितात, आणि ते दाखविण्यासाठी आपला वेळ, श्रम व पैसा देऊन लोकांच्या घरी भेटी देतात व यांना देवाकडील इशाऱ्‍याकडे लक्ष देण्याचे उत्तेजन देतात. लोकांनी देवाच्या शांतीप्रिय नव्या जगात जीवनाचा आनंद घ्यावा अशी त्यांची मनोमन इच्छा आहे.”

नवे जग—किती वेगळे?

“मास्टरजी,” रामू म्हणाला, “तुम्ही नवे जग व देव करीत असलेल्या बदलाविषयी बोलत आहात. तर आम्हाला सांगू शकाल का की देव कोणते बदल घडवून आणील? म्हणजे मला असं म्हणायचं की, या नव्या जगात वेगळं असं काय असणार?”

“आपण त्याविषयी रेचेललाच विचारू या रामू. रेचेल, तू याविषयी बायबलमध्ये काय वाचलं आहेस? देव मानवाच्या घडामोडीत हस्तक्षेप करील तेव्हा पृथ्वीवर तो कोणती परिस्थिती आणणार आहे? तुला त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आवडल्या ते आम्हाला जरा सांग.”

“मला बायबलचे हे वचन वाचायला फार आवडते,” रेचेल म्हणाली. “कारण मला जनावरांशी खेळायला खूप मजा वाटते. मी ते वाचू का? ते यशयाच्या पुस्तकातील ११ व्या अध्यायातील ६ ते ८ वचने आहेत. तेथे म्हटले आहेः ‘लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल, वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील; त्यांस लहान मूल वळील. गाय व अस्वल एकत्र चरतील; त्यांचे बच्चे एकत्र बसतील; सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल, तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, थानतुटे मूल फुरशाच्या बुबुळाला हात लावील.’ मला वाटतं की, तेव्हा रानामधून जाताना केवढा आनंद वाटेल, कारण तेथे सिंहाचा हल्ला होणार नाही की, सर्प डसणार नाहीत; आम्हाला सर्व प्राण्यांशी खेळता येईल.

“मला जेव्हा थंडीताप किंवा हिंवताप येतो किंवा खूप सर्दी होते तेव्हा मी या वचनाची आठवण करते जेथे म्हटले आहेः ‘“मी रोगी आहे,” असे एकही रहिवासी म्हणणार नाही.’ (यशया ३३:२४) माझ्या शाळेत एक लुळी मुलगी आहे, जी लहान असताना तिला पोलिओ झाला होता. तिला खूप त्रास होतो; ती आम्हाबरोबर खेळू शकत नाही. मी माझं बायबल एके दिवशी शाळेत घेऊन गेले व तिला यशया ३५:५, ६ ही वचने वाचून दाखवलीः ‘तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.’ तिला ते ऐकून किती आनंद झाला होता!

“याच्या पुढचे वचन मी आमच्या खेड्यात राहणाऱ्‍या व शेती करणाऱ्‍या काकांना वाचून दाखविले तेव्हा त्यांनाही आनंद वाटला होता. ते वचन म्हणतेः ‘जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल; तृषित भूमीचे ठिकाणी उपळत झरे होतील.’ (यशया ३५:७) पावसाळ्यात पाऊस कमी होतो आणि त्यांची पिके वाया जातात तेव्हा त्यांना बराच त्रास काढावा लागतो. पण बायबल सांगते की, देवाच्या नव्या जगात सर्वांसाठी भरपूर अन्‍न असेल—त्यावेळी पिकांची नासाडी होणार नाही! ते म्हणते की, यहोवा देव ‘सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्‍नाची मेजवानी’ करील आणि ‘भूमीत भरपूर पीक येईल.’ (यशया २५:६; स्तोत्रसंहिता ७२:१६) तसेच यहेज्केल ३४:२७ आम्हाला सांगतेः ‘मळ्यातील झाडे फलद्रुप होतील, भूमि आपला उपज देईल व ते आपल्या भूमीवर निर्भयपणे वसतील.’ हे किती आनंदाचे आहे ना?”

“मला तर खरोखरीच एखाद्या सिंहाबरोबर खेळायला आनंद वाटेल,” आनंदची सर्वात धाकटी मुलगी आशा म्हणाली. “मी त्यांना प्राणिसंग्राहलयात पाहिले आहे आणि ते केवढे भीतीदायक दिसतात!”

“तुला नक्कीच खेळायला आनंद वाटेल, आशा,” मास्टरजी म्हणाले. “तर आता आनंद तुला हे दिसलं का की, आमच्या समस्या कोणत्या ते यहोवा देवाला माहीत असल्याचे व त्या सोडविण्याची कोणती अभिवचने तो देऊन आहे याविषयी बायबल किती सांगते? आम्हाला सर्वांनाच आजार, कमी पाऊस व पिकांची नासाडी यामुळे निर्माण होणारा अन्‍न तुटवडा याकरवी बराच त्रास काढावा लागत आहे. घरांची टंचाई ही देखील आज प्रधान समस्या बनली आहे. पण देवाच्या नव्या जगात भाडेपद्धत, वाढते भाडे तसेच गर्दीने राहणे या गोष्टी नसणार. घरांविषयी यशया ६५:२१ व २२ वचन म्हणतेः ‘ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील व त्यात दुसरे राहतील; ते लावणी करतील आणि फळ दुसरे खातील असे व्हावयाचे नाही.’ तर देव पृथ्वीवरील प्रत्येकासाठी घर व बागेचे अभिवचन देऊन आहे.

“तथापि, सभोवताली दुष्ट लोक लढाया करीत राहिले, हिंसाचार आचरत राहिले तर या चांगल्या गोष्टींना काही अर्थ राहणार नाही. देव अशांचा नाश करील. स्तोत्रसंहिता ३७:१० म्हणतेः ‘थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल; तू त्याचे ठिकाण शोधून पाहशील तरी त्याचा पत्ता लागणार नाही.’ दुष्ट लोकांचा संहार होणार असल्यामुळेच आम्हाला या अभिवचनाविषयी आत्मविश्‍वास वाटतो की, देव ‘दिगंतापर्यंत लढाया बंद करील.’—स्तोत्रसंहिता ४६:९.

“या सर्व गोष्टी यहोवा देव एका सरकारच्या माध्यमाने पूर्ण करण्याचे अभिवचन देऊन आहे आणि बायबल त्याला देवाचे राज्य म्हणते. हे सरकार पुष्कळ बाबतीत मानवी सरकारांपेक्षा भिन्‍न असेल. एक गोष्ट म्हणजे की ते स्वर्गीय सरकार राहील, त्यामुळे येथे भ्रष्टाचाराला थारा नसणार. दुसरी गोष्ट ही की, निव्वळ श्रीमंत किंवा बलवान लोकांना नाही तर सर्वांना न्याय मिळण्याची हमी ते देईल. या कार्यवाहित असणाऱ्‍या सरकारविषयीची सुंदर माहिती मला तुम्हाला बायबलमधून दाखवू द्या. ‘तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील, पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील. . . . धार्मिकता त्याचे वेष्टन व सत्यता त्याचा कमरबंद होईल.’—यशया ११:४, ५.

“शेवटी देवाचे राज्य इतर सर्व सरकारची जागा घेईल. हे दानीएलच्या पुस्तकातील एका थरारक भविष्यवादात सांगण्यात आले आहे. ते म्हणतेः ‘त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील; त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍यांच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.’ (दानीएल २:४४) होय, देवाचे राज्य आपला अंमल गाजवू लागेल तेव्हा सगळ्याच गोष्टी वेगळ्या असतील. याच कारणास्तव, येशूने आपल्या शिष्यांना त्या राज्याच्या येण्यासंबंधाने जी वाट बघायला सांगितली त्यात एवढे आश्‍चर्य नव्हते. त्याने त्यांना अशीही प्रार्थना करायला शिकविलेः ‘तुझे राज्य येवो; जसे स्वर्गात, तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.’—मत्तय ६:१०.

“तर आता तुम्हाला हे दिसले का की, सर्वसमर्थ देव, ज्याचे नाव यहोवा असे आहे तो, आमच्या सर्व अडचणींविषयी जागृत आहे व तो आमच्याविषयी काळजी बाळगून आहे. तो आम्हास खात्री देतो की, तो लवकरच आमच्या समस्या सोडविण्यासाठी हालचाल करील.

सूज्ञ सल्ल्याकडून आता मिळणारे लाभ

“हे सगळे ऐकायला बरे वाटते, मास्टरजी. पण नुसते बसून राहून आणि देव कधी बदल घडवून आणतो त्याकरता थांबून राहून आज माझ्या मुलांना अन्‍न व कपडे मिळू शकणार नाहीत. आम्हाला काम केलं पाहिजे. जीवनातील आमची स्थिती सुधारण्यासाठी आम्ही परिश्रम करण्यास हवेत.”

“बरोबर आनंद, आम्ही खचितच काम केलं पाहिजे. बायबल देखील म्हणते की, कठीण काळात आमच्यावर अवलंबून असणाऱ्‍यांच्या चरितार्थासाठी काम केलं पाहिजे. (१ तीमथ्य ५:८) ते तर स्पष्ट म्हणते की, ‘कोणाला काम करण्याची इच्छा नसेल, तर त्याने खाऊही नये.’ (२ थेस्सलीनकाकर ३:१०) ते आमचे आरोग्य व सुख यासंबंधाने कायदे, तत्त्वे व सूचना देते ज्यांचा आम्हाला आज लाभ उचलता येईल. उदाहरणार्थ, खादाडपणाने खाणे व अति मद्यप्राशन करणे या गोष्टीचा देवाला वीट आहे, असे ते म्हणते. या दोन्ही गोष्टी आमच्या आरोग्याला अत्यंत घातक असून त्या आमचा कष्टाचा पैसा वाया घालवतात हे आपल्याला माहीत आहे.

“याचप्रमाणे बायबलची तत्त्वे आम्हाला तंबाखू, सुपारी खाणे टाळावे असे सांगतात कारण यापासून आपल्या आरोग्याला धोका संभवतो, असे डॉक्टर देखील सांगतात आणि हे सुद्धा आमच्या पैशाचा अपव्यय करणारे आहे, जो कदाचित इतर देणे देण्यासाठी किंवा आमच्या कुटुंबासाठी खाद्यपदार्थ घेण्यासाठी वापरला जाऊ शकतो. (२ करिंथकर ७:१) तसेच आरोग्याविषयी बायबलचे उच्च नैतिक दर्जे व सूज्ञ सल्ला आम्हाला भावनिकदृष्ट्या आनंदी ठेवतात व पुष्कळ आजार टाळण्यास साहाय्य देतात. या कारणास्तव, बायबलमध्ये यहोवा देव स्वतःविषयी म्हणतो की, तो ‘तुला जे हितकारक ते . . . शिकवितो,’ आणि पुढे तो म्हणतोः ‘तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर किती बरे होते! मग तुझी शांती नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती.’—यशया ४८:१७, १८.

‘तथापि, आपल्याला हे कबूल करावे लागेल की, सूज्ञ सल्ला अनुसरल्याने आज बहुतांशी आमच्या जीवनाची पातळी सुधारू शकत असली तरी अन्याय, भ्रष्टाचार, वंशीय व जातीय अहंकार, पक्षपातीपणा, गंभीर आजार आणि मृत्यु या गोष्टींचे उच्चाटन आम्हाला जमणे शक्य नाही. यांना जर कायमचे काढून टाकायचे आहे तर देवाकडील हस्तक्षेप जरूरीचा आहे.”

“मला वाटतं की, आपण स्वतः चांगली कामं करून मोठाले बदल घडवून आणू शकतो,” दादी मध्ये म्हणाली. “आपल्या चांगल्या कर्मांमुळे इतरांवर परिणाम होऊ शकतो आणि रोज ध्यान केल्यामुळे आपणाला आंतरिक शांती लाभते व मग आम्हाला ज्या ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यामुळे चलबिचल होत नाही.’

“तुम्हाला वाटतं तसच इतर पुष्कळांना वाटतं, दादी, पण एक गोष्ट मात्र निश्‍चित आहे. आमची कामे कितीही चांगली असली तरी ती पृथ्वीवरून दुष्टता घालवू शकणार नाही. हे खरे की आमच्या चांगल्या कृतीमुळे इतरांवर चांगले करण्याचा प्रभाव पडेल, पण काही लोक मुळीच बदलणार नाहीत. खरे म्हणजे, तुम्ही जे चांगले करता त्याचा ते लोक फायदाच उचलतील व आणखी वाईट गोष्टी करतील.

“देवाने अवतार घेतल्यावरच सत्ययुग येईल असा बहुतेक हिंदूंचा विश्‍वास आहे याविषयी सर्वत्र सहमत आहे. जेव्हा बहुतेक लोक वाईट कर्मे आचरीत असतात तेव्हा देवाचा हस्तक्षेप अत्यंत आवश्‍यक आहे, असं त्यांना वाटतं. तसंच दादी याचा जरा विचार करा की, ध्यान करून तुम्ही आंतरिक शांती मिळविली तर यामुळे आनंद आपल्या परिवारासाठी अन्‍न, वस्त्र तसेच शिक्षण याकरता पुरेसा पैसा संपादित करील याची काही शाश्‍वती मिळते का? नाही, हो ना?

“तरीपण, तुम्ही ध्यान किंवा मनन करण्याविषयी जे काही म्हटले ते आस्थेचे वाटते. प्रथमतः मला वाटतं की, मनन योग्यप्रकारे कसं करावं ते आपल्याला माहीत करून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ, ज्याविषयी मनन करायचं आहे त्याची माहिती हवी. व याचकरता आपण मुलांना शाळेत पाठवतो; येथे त्यांना माहीतगार शिक्षकांकडून शिकवण्यात येते. मग, मुले जे काही शिकून घेतले आहे त्यावर मनन करू शकतात. आम्ही त्यांना असं म्हणत नाही की, घरी बसून ध्यानस्थ व्हा आणि मग, ज्ञान तुमच्या आतूनच तुम्हाला मिळत राहो. आम्हाला येथे शिक्षक किंवा गुरुची गरज दिसते, ज्याला आम्हापेक्षा अधिक माहिती असते. मग मला सांगा की, माणूस स्वतः व त्याच्या समस्या याविषयीची माहिती, ज्याने माणसाची निर्मिती केली त्यापेक्षा अधिक कोणाला असणार? या कारणास्तव आम्ही आमच्या निर्माणकर्त्याविषयी शिक्षक तसेच आम्हाला आमच्या समस्यांचा उपाय दाखविणारा या अर्थाने अपेक्षा धरू शकतो. आमच्या मुलांवर आमची प्रीती आहे म्हणून तर आम्ही त्यांना शिकवीत असतो, हो ना? मग, प्रेमळ, सर्वसमर्थ स्वर्गीय पित्याविषयी आम्हाला हेच अपेक्षिता येणार नाही का?”

“तुमचं म्हणणं पटण्याजोगं आहे असं मी म्हणेन, मास्टरजी,” दादाजी मध्येच म्हणाले. “पण, तुम्ही तर अगदी साधेपणात या सर्व गोष्टी सांगितल्या. पण आमच्या धर्मात गाढ तत्त्वज्ञान आहे. आमचे साधुसंत वर्षानुवर्षे जीवनाचा अर्थ काय यावर ध्यान करीत आले आहेत. मी स्वतः माझ्या आयुष्यभर आमची पवित्र पुस्तके वाचली आहेत, पण सबंध विश्‍वातील व जीवनातील रहस्ये व त्यांचा उद्देश याविषयीची समज मला अद्याप झालेली नाही.”

“दादाजी, आमच्यापेक्षा देवाचे ज्ञान हे अत्यंत श्रेष्ठ आहे हे निर्विवाद आहे. बायबल देखील ईयोब नावाच्या माणसाची माहिती देऊन सांगते की, या माणसाने देव व त्याची निर्मिती याविषयी पुष्कळ वर्षे खोल विचार केला, पण त्याने म्हटलेः ‘पाहा, या त्याच्या कार्यक्षेत्राच्या केवळ सीमा आहेत; त्याची केवळ चाहूल आपल्या कानी येते!’ (ईयोब २६:१४) तथापि, आम्ही आमच्या कमकुवत मनानं देवाविषयीच्या सर्व गोष्टी समजू शकत नसलो तरी जे काही आम्ही समजून घेण्याची गरज आहे ते तो त्याची इच्छा झाल्यास आम्हास शिकवणार नाही का?

“समजा, एखादा गणिताचा प्राध्यापक, ज्याची गणितात अगदी हुशार अशी ख्याति आहे, त्याने रामूला शिकवण्याचे ठरविले व तेही कोणतेही शुल्क न घेता, तर, ‘त्या प्राध्यापकाचे ज्ञान फारच अगाध आहे; रामूला त्याची शिकवणी कळणार नाही,’ असे म्हणून तुम्ही ती नाकारणार का? मुळीच नाही! तुम्हाला माहीत आहे की, कोणी खूपच तल्लख बुद्धीचा असा प्रामाण्य आहे व तो जर उत्तम शिक्षक आहे तर तो बालवाडीतील मुलांनाही आत्मसात करण्याजोगे व समजण्याजोगे चांगले शिक्षण देईल. तर मग, सर्वसूज्ञ देव आम्हाला, त्याच्या मुलांना, ज्याविषयीची माहिती होणे जरुरीचे आहे ती समजण्यास सोप्या अशा भाषेत शिकवू शकणार नाही का? हे तो करतो असे बायबल सांगते. ते म्हणतेः ‘तुझी सर्व मुले यहोवापासून शिक्षण पावतील.’ (यशया ५४:१३) या कारणामुळेच तुम्हाला पवित्र शास्त्रातील शिकवण ही इतकी साधी व आम्हा मानवांना समजण्याजोगी आहे असे दिसते. त्यात पुष्कळ उदाहरणे आहेत; सर्वसाधारण लोकांचे अहवाल आहेत, आणि साध्या भाषेत लिहिलेले दैनंदिन जीवनातील घडामोडींचे वर्णन आहे जे आपणापैकी कोणालाही चांगले कळू शकते. श्रेष्ठ बुद्धिच्या माणसाने या माध्यमाने आमच्या समस्यांचा उपाय दाखवावा हा उत्तम मार्ग आहे.

“पण आता आम्हाला जायला हवंय. इतका वेळ बोलण्यात आनंद वाटला; तुम्ही दाखविलेल्या पाहुणाचाराविषयी धन्यवाद देतो.”

सूचना प्रदान करणारे पुस्तक

काही दिवसांनी, मरीयमच्या घरातील शिवणयंत्र बिघडले तेव्हा मरीयम व निर्मला या दोघांनी त्या यंत्राविषयी माहिती देणारे पुस्तक चाळले आणि आवश्‍यक ती दुरुस्ती केली. यानंतर मरीयमने निर्मलाला विचारलेः “हे पहा निर्मला, देवानं आपल्या सर्वांना निर्माण केलं आहे, तर तो, आम्हाला काही समस्या आल्यास त्या सोडवता याव्या म्हणून, जेथून मार्गदर्शन घेता येईल असं एखादं पुस्तक आपल्याला देईल असं तुलां वाटतं नाही का?”

“तुम्हाला काय म्हणायचं?” निर्मलानं आश्‍चर्याने विचारले.

“मला असं म्हणायचं की, जेव्हा आम्ही हे मशीन विकत आणलं तेव्हा दुकानदारानं आम्हाला याविषयी माहिती देणारं हे पुस्तक सोबत दिलं होतं. याचप्रमाणं, देव जर आमचा निर्माता आहे तर त्यानं देखील आम्हाला एक सूचना देणारं असं पुस्तक द्यावं की ज्यामधील सूचना पाळल्यामुळं आमचा फायदाचं होईल हे अपेक्षिणं व्यवहार्य नाही का?”

“मला वाटतं की, तुम्ही बायबल हे ते सूचना देणारं पुस्तक असल्याचं मानता, होय ना?”

“होय, निर्मला. तसं पाहता, अशी पुष्कळं पुस्तकं आहेत, जी पवित्र समजली जातात. यापैकीच्या काही दंतकथा आहेत, तर काही कोणाची स्वतःची तत्त्वप्रणाली आहे जी इतिहासाच्या विशिष्ट काळी राहात असलेल्या लोकांनी सांगितली. इतर काही पुस्तकात नैतिक पाठ व सामाजिक कायदे आहेत जे त्या विशिष्ट काळी विशिष्ट स्थानाला अनुलक्षून होते. ही सर्व पुस्तके वेगवेगळे शिक्षण देतात आणि लोकांना जे जे आवडते ते ते अनुसरतात. जसे एखादी स्त्री, तिला जी साडी घालायला आवडते, त्यासारखे हे आहे.

“पण, बायबल हे मात्र वेगळंच आहे. आपल्या आधीच्या चर्चेत आपण हे पाहिलं होतं की, याच्या कोणाही लेखकानं त्यातील विचार आपले विचार आहेत असा दावा केला नाही. एका लेखकानं हे स्पष्टही केलं की, बायबलचा संदेश हा ‘कोणा माणसाच्या इच्छेनं कधी झाला नाही, तर लोकांनी तो देवापासून सांगितला आहे.’ (२ पेत्र १:२१) बायबलची सूचना ती लिहिण्यात आली त्याला काळात व्यवहारिक तर होतीच, पण आजही ती २०व्या शतकात व्यावहारिक आहे, कारण देवाचे मार्गदर्शन हे चिरकालिक लाभाचे असून त्याचे दर्जे कधीच बदलत नाहीत. जे त्यांना अनुसरतात त्यांच्या जीवनात ते नेहमीच चांगल्यासाठी कार्यप्रवर्तक ठरले आहेत. यामुळे त्यांच्या जीवनात प्रचंड स्वरुपात बदल घडविले गेले. या कारणासाठी एक वकील, जो सुमारे २,००० वर्षांपूर्वी हयात होता तो याविषयी म्हणाला, ‘देवाचे वचन सजीव व सतेज आहे.’—इब्रीयांस ४:१२.

“आज जिवंत असणाऱ्‍या आम्हासाठी बायबलचे अत्यंत उल्लेखनीय महत्त्व हे आहे निर्मला की, ते आमच्या पिढीकडे, ती देवाने भाकित केलेला बदल पाहील अशी सूचकता दाखविते. यात त्या ‘चिन्हा’चा उल्लेख आहे ज्याविषयीची चर्चा आपण मागे तुमच्या घरात बसून केली होती. बायबलच्या लेखकांनी त्या अभूतपूर्व काळाकडे आपली दृष्टी लावली, पण त्यांनी लिखित केलेल्या भविष्यवादांचा त्यांना अर्थ समजू शकला नाही. तरी त्यांना, देव मानवजातीच्या समस्या कशा सोडवील हे जाणून घेण्याची मोठी उत्कंठा लागली होती. उदाहरणार्थ, दानीएलला ज्या गोष्टी लिहिण्यास सांगण्यात आले होते, त्याचे स्पष्टीकरण त्याने विचारले. पण त्याला जे उत्तर मिळालं ते बघः ‘हे दानीएला, तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव . . . ज्यांना अंतर्दृष्टी आहे त्यांना ते समजेल.’—दानीएल १२:४, ८-१०.

“आज हे खरेपणाने घडत आहे. कित्येक शतके बायबल हे केवळ मूळ भाषेत उपलब्ध होते. मग ते आणखी एकदोन भाषेत निघाले. पण आज, हे बायबल सबंध जगात १,९०० पेक्षा अधिक भाषांत उपलब्ध असून त्याचे वितरण जगभर २०० कोटीपेक्षाही अधिक प्रतींमध्ये करण्यात आले आहे. यात आणखी भर ही की आज ४० लाखापेक्षा अधिक यहोवाचे साक्षीदार घरोघर जाऊन बायबल समजण्याविषयी लोकांना मदत देत आहेत. तर हा भविष्यवाद कसा पूर्ण होत आहे हे तुला दिसतच असेल. जी ‘वचने गुप्त’ होती ती आता या ‘शेवटल्या काळी’ ‘खरे ज्ञान’ वाढत असता उलगडली जात आहेत. हे जरुरीचे आहे, कारण यामुळेच लोकांना या दुष्ट जगातून बचाव मिळविण्यासाठी देवाकडील सूचना शिकून घेता येईल. बायबलचा अभ्यास केल्यामुळे लोकांना दिसून येते की, ज्या गोष्टींचे भाकित देवाने गतकाळी केले होते त्या सर्व घडून आल्या व यामुळेच तो आमच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी जे नवे जग आणण्याचे अभिवचन देऊन आहे त्यावर त्यांना विश्‍वास ठेवता येईल.”

बचावासाठी आम्ही काय करण्यास हवे

निर्मलाबरोबर मरीयम तिच्या घरी आली तेव्हा दादीनं नुकतीच प्रार्थना संपविली होती. बाळाचे तयार झालेले कपडे बघून दादीनं खूप कौतुक केलं, पण तिनं एकाएकी विषय बदलला.

“मास्टरजींचं म्हणणं खरं असलं,” ती म्हणाली, “आणि देव जर दुष्ट लोकांचा नाश करणार आहे तर आम्ही त्यातून निभावू. आम्ही कोणाची फसवणूक किंवा लबाडी करीत नाही, आम्ही मंदिरात जाऊन प्रार्थना करतो आणि नैतिक जीवन जगतो. आमच्या कुटुंबाला काहीही इजा होणार नाही.”

“हे खरं दादी की, देव दुष्टांचा करीत असलेल्या नाशातून वाचण्यासाठी नैतिक स्वरुपाचे जीवन जगणे जरूरीचे आहे,” मरीयम म्हणाली. “आपल्या नव्या जगात तो लबाड, फसवणूक करणारे, ठार मारणारे लोक यांना राहू देणार नाही, कारण मग, ते जग सध्यापेक्षा काही वेगळे दिसणार नाही. होय ना? पण दादी, जरा विचार करा. एखादा पूर आला तर शासन, लोकांनी बचाव मिळवावा यासाठी खास सूचना सर्वत्र देते. या सूचना त्यांना वस्तुस्थितीची कल्पना असते व काय होणार ते माहीत असल्यामुळे ते देते. अशा वेळी आपण घरी बसून असं म्हणणार का, ‘मी तर चांगला माणूस आहे, मला काही होणार नाही’? तर देव पुरापेक्षा भयानक नाश आणणार आहे. तो युद्ध करील व याला बायबल हर्मगिदोनचे युद्ध म्हणते. याचा परिणाम पृथ्वीवरील प्रत्येकावर होईल. (प्रकटीकरण १६:१४-१६) बचावासाठी नैतिकदृष्ट्या चांगले असणे ही एक मूलभूत गरज आहे हे पवित्र शास्त्रवचने सांगतात. पण देवाने परिस्थितीला अनुलक्षून आणखी विशिष्ट सूचना दिल्या आहेत. आम्हाला बचावासाठी यांचेही पालन केलं पाहिजे. जे देवाच्या सूचना मान्य करतील अशांनाच ‘धार्मिक,’ ‘नीतीमान,’ व ‘निष्कलंक’ असल्याचे समजले जाईल आणि ते, देवाने दुष्टांचा नाश केल्यावर या पृथ्वीमध्ये बचावून राहतील असे बायबल म्हणते.”—नीतीसूत्रे २:२०-२२.

तेव्हा दादाजी म्हणालेः “आता आमच्या सध्याच्या दशेत बचावासाठी कोण नीतीमान आहे असं कसं समजायचं?”

मरीयम म्हणाली, “याबद्दल मानवाची मदत करावी म्हणून देवानं एक आश्‍चर्यकारक असा कायदेशीर आधार पुरविला आहे. हे मला उदाहरणानं स्पष्ट करू द्या. समजा, निर्मला, तू रामूला दहा रुपये देऊन दुकानातून एक किलो साखर आणायला सांगितली. जाताना त्याला त्याचे मित्र काही खेळ खेळताना दिसतात. तो थांबतो व त्यांच्यासोबत खेळतो. या दरम्यान त्याचे पैसे कुठेतरी हरवतात. आता तो दुकानात जातो, तर दुकानदार त्याला पैशाविना साखर देईल का?”

“मुळीच नाही,” निर्मला उत्तरली.

“रामू रडू लागतो. त्याला ठाऊक आहे की, पैसे हरवल्यामुळे कुटुंबाला त्रास होणार. त्याचे रडणे जवळच उभा असणारा एक दयाळू मनुष्य ऐकतो. त्याला रामूची दया येते व तो त्याला दहा रुपये देतो. तो ते दुकानदाराला साखरेसाठी देतो आणि या साखरेचा तुम्ही घरी वापर करता.

“बायबल म्हणते की, आमच्या समस्या, देवाने निर्माण केलेल्या पहिल्या जोडप्यानं त्यांच्या स्वतंत्र इच्छेचा गैरवापर केला आणि देवाने दिलेल्या सूज्ञ सूचनांचा भंग केला तेव्हा सुरु झाल्या. याचा काय परिणाम होईल हे देवानं आधीचं बजावलं होतं—परिपूर्णता गमावणं, त्यांच्या नंदनवनरुपी घराचा नाश, आणि भूतलावर चिरकालिक जीवन जगण्याच्या हक्काचाही नाश. देवानं न्याय्यपणे आपले कायदे लागू केले. यामुळे या जोडप्याची संतती निराधार झाली, ती जणू रडू लागली, कारण त्यांनी खूप काही गमावलं होतं. तथापि, देवानं आपल्या न्यायाला प्रेमानं सौम्य करून मानवाला, पहिल्या जोडप्यानं जे गमावलं होतं ते पुन्हा प्राप्त करून देण्याची व्यवस्था करून दिली. उदाहरणात सांगितलेल्या त्या दयाळू माणसाप्रमाणं त्यानं, जे गमावलं त्याची पुरेपूर किंमत दिली. हे त्यानं, स्वर्गातील आपल्या स्वतःच्या आत्मिक पुत्राला या पृथ्वीवर मानव बनवून पाठवलं, त्या द्वारे केलं. तो पुत्र येशू ख्रिस्त होता. येशूनं, पहिला परिपूर्ण मानव आदामाच्या तुल्य असणारं पण त्यानं घालवून दिलेल्या परिपूर्ण मानवी जीवनाचं स्वइच्छेनं बलिदान केलं आणि त्याचं मूल्य देवाला सादर केलं तेव्हा या मूल्याचा वापर, जे गमावण्यात आलं होतं ते म्हणजे उद्यानमय पृथ्वीवरील परिपूर्ण स्वरुपातील चिरकालिक जीवनाची प्राप्ती मानवाला मिळवून देण्याच्या आधारासाठी केला गेला.”

या वेळेला, मास्टरजी, जे काही काळाआधी आनंदबरोबर घरात आले होते ते, या चर्चेत सहभागी झाले. ते म्हणालेः “तर आता, मरीयमनं जे नुकतचं म्हटलं त्याद्वारे हे स्पष्ट झाले असेल की, येशू हा देवाचा अवतार नव्हता तर तो देवाचा आत्मिक पुत्र होता व तो, मानवासाठी आपले परिपूर्ण जीवन देता यावे म्हणून मनुष्य असा जन्मला व यामुळे त्याला, पहिल्या मानवी जोडप्यानं आज्ञाभंग केल्यामुळं जे गमावलं ते परत मिळविण्याचा मार्ग उघडा करता आला. देवाने केलेल्या या व्यवस्थेचा जेव्हा आपण स्वीकार करतो तेव्हा स्वतःला या दुष्ट जगाच्या नाशातून बचाव मिळवून देणाऱ्‍या आणि समस्यारहित पृथ्वीवरील शांतीमय चिरकालिक जीवनाच्या मार्गावर ठेवत असतो. ही आशा इतकी अद्‌भूत आहे की, जगभर यहोवाचे साक्षीदार सर्व राष्ट्रातील लोकांना याविषयीचे शिक्षण देण्यासाठी खूप परिश्रम घेत आहेत. ही आशा खरी आहे हे स्वतःच्या बाबतीत सिद्ध करून दाखविण्यासाठी परिश्रमाची गरज आहे, पण जे फायदे आपणापुढे ठेवले आहेत ते पाहता हे प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय ठरतील.”

तेजोमय भवितव्य

निळ्या आकाशात सूर्य लख्ख चकाकत होता, आणि आनंद व निर्मला यांनी आपल्या नव्या बाळाला इस्पितळातून घरी आणलं. पावसाळा बहुधा सरलाच आहे असं दिसत होतं. घरातील लोकांना खूपच आनंद झाला होता आणि शेजारपाजाऱ्‍यांनाही चिमुकल्याचे दर्शन घेण्याची ओढ लागली होती. आनंद अंगणात आला. त्यानं पाहिलं, एक चिमणी आपलं घरटं तयार करीत होती व ती धाग्याचा एक तुकडा खोबणीत सरकवत होती. ‘आपल्या कुटुंबाला माझ्यासारखंच सुरक्षेचं भवितव्य असावं असं हिलाही वाटतंय्‌ असं दिसतं,’ असे आनंद मनोमन पुटपुटला.

मास्टरजींनी सांगितलेल्या सर्वच गोष्टी खऱ्‍या घडल्या तर? मग, त्याच्या घरातील नवजात बालकाला पुढे खरेच अद्‌भूत भवितव्य मिळणार. काही दिवसांआधी मास्टरजींबरोबर जी चर्चा झाली त्यामधील शेवटले बोल आनंदला आठवले. त्यांनी म्हटलं होत, ‘समजा, रामूचं शिक्षण संपल्यावर तुम्ही नोकरीविषयीची एक जाहिरात वर्तमानपत्रात पाहिली. त्यामध्ये उल्लेखिण्यात आलेली पात्रता रामूने मिळविलेल्या गुणवत्तेप्रमाणेची होती. भरपूर पगार आहे, तुम्हाला जे स्थळ हवे तेथे राहू शकता, राहण्यासाठी चांगली जागा आहे, आणि मनमुराद आनंद मिळू शकेल असे काम आहे. तुम्ही काय कराल? या जाहिरातीकडे दुर्लक्ष कराल की, ते काम मिळविण्यासाठी जे करता येईल ते सर्व कराल?” ‘याचे उत्तर अगदी स्पष्ट आहे,’ आनंदने विचार केला.

मग, आज जिवंत असलेल्या लोकांविषयी देव जे करणार आहे असे बायबल सांगते त्याविषयी काय? एक उद्यानमय पृथ्वी, चांगले घर, खाण्यास मुबलक अन्‍न, समाधान देणारे काम, परिपूर्ण आरोग्य आणि सर्वतोपरि सुरक्षितता. हे खरंच असलं तर? आनंद बराच काळ विचार करीत राहिला.

सूर्य पश्‍चिमेकडे परिघावर झुकू लागला आणि आकाशात रंगीबेरंगी छटा दिसू लागल्या. शेवटी आनंदने निश्‍चय केला. ‘होय,’ तो मनाशीच म्हणाला. ‘हा बदल खरोखरीच येणार आहे की काय याविषयी मी व माझं कुटुंब मिळून पूर्ण रुपाचं परिक्षण करणार. माझी खात्री पटली तर दुष्टाईच्या अंतामधून वाचून, जेथे आमच्या सर्व समस्या सुटलेल्या असतील त्या आनंदी भवितव्यात आनंद लुटण्यासाठी आम्हाला करता येण्याजोगे आम्ही केलंच पाहिजे.’

उजळणी प्रश्‍न

आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील?

रामू मास्टरजींच्या घरी का गेला?

मास्टरजींना कशामुळे आनंदला आपल्या घरात येण्याचे सांगावे लागले?

आम्हा सर्वांपुढे असणाऱ्‍या समस्या

आनंदला एवढा कटुपणा का वाटला?

त्याच्या कोणकोणत्या समस्या होत्या?

आनंदने आपली व्यथा सांगितल्यावर मास्टरजींनी त्याबद्दल कशी प्रतिक्रिया दाखवली?

मास्टरजींचे कुटुंब का आनंदी होते?

मास्टरजींचा धर्म, चर्चमध्ये आचरल्या जाणाऱ्‍या धर्मांपैकीचा होता का? का नाही?

पृथ्वीवर आनंदात राहण्याची इच्छा

मरीयमने निर्मलाला देवाविषयीचे कोणते स्पष्टीकरण दिले?

“सत्य” म्हणजे काय?

मानवाची कोठे जीवन व्यतित करण्याची स्वाभाविक इच्छा आहे?

सर्व समस्या निवारण करण्याचे अभिवचन देणारा

मानवाची या पृथ्वीवर राहण्याची इच्छा आहे हे स्पष्ट करण्यासाठी मास्टरजींनी जे उदाहरण दिले ते सांगा.

मानवाच्या समस्या कोण सोडवील व किती काळासाठी, असे मास्टरजी म्हणतात?

आनंद त्याबरोबर सहमत का होत नाही?

हिंसाचार मानवाच्या समस्या मिटवू शकत नाही हे मास्टरजी कसे दाखवितात?

समस्या केव्हा सुटणार?

आंब्याच्या झाडाचे जे उदाहरण मास्टरजींनी दिले त्यामागील मुद्दा काय होता?

बायबलविषयीची काही वैशिष्ट्ये सांगा.

“चिन्ह”

“चिन्ह” याची कोणकोणती वैशिष्ट्ये (अ) २ तीमथ्य ३:१-३ मध्ये; (ब) मत्तय २४:७ मध्ये; (क) प्रकटीकरण ६:४-८ मध्ये दिसतात?

शेवट खरोखरी केव्हा येणार हे मत्तय २४:३२-३४ कसे सूक्ष्मपणे दर्शविते?

देव दुष्टांचा लवकरच नाश करील या इशाऱ्‍याविषयी बहुतेकांच्या कशा प्रतिक्रिया आहेत?

यहोवाचे साक्षीदार कसे भिन्‍न आहेत?

नवे जग—किती वेगळे?

रेचेलला देवाच्या नव्या जगाविषयी कोणकोणत्या गोष्टी आवडल्या?

देव आमच्या विशिष्ट समस्या ओळखून आहे व त्या तो निवारण करण्याचे अभिवचन देऊन आहे हे बायबलमधून दाखवा.

सूज्ञ सल्ल्याकडून आता मिळणारे लाभ

बायबल कामाविषयी काय म्हणते?

बायबलचे कायदे व तत्त्वे कसे लाभदायक आहेत?

बायबलची शिकवण इतकी साधी व समजण्याजोगी का आहे?

सूचना प्रदान करणारे पुस्तक

बायबल हे देवाकडील सूचना देणारे पुस्तक आहे ही मरीयमची का खात्री आहे?

ते आज आम्हाला खासपणे कसे लाभदायक ठरू शकते?

बचावासाठी आम्ही काय करण्यास हवे

नैतिकदृष्ट्या चांगले असणे हेच केवळ बचावासाठी पुरेसे आहे का?

मरीयम हे कसे विवेचीत करते?

आम्हाला आमची मुक्‍तता करण्याएवढी चांगली कामे करता येत नसल्यामुळे आमच्या बचावासाठी देवाने कोणती कायदेशीर तरतुद पुरविली आहे?

तेजोमय भवितव्य

नवजात बालकाला घरी आणल्यावर आनंद कोणत्या विचारात गुंग होतो?

[५ पानांवरील संक्षिप्त आशय]

“तुम्हाला माझ्यासारख्या दरदिवशीच्या काही समस्या आहेत असं काही दिसत नाही. तुम्ही किती शांत व समाधानी वाटता. मला तर हे बघून तुमचा फारचं हेवा वाटतो!”

७ [पानांवरील संक्षिप्त आशय]

मानवाला काय पाहिजे, एक चांगले घर, उत्तम आरोग्य, आनंदी परिवार आणि प्रेमळ शेजारी

[१३ पानांवरील संक्षिप्त आशय]

जे चिन्ह दिलं आहे त्यामध्ये माणसाचं व्यक्‍तीमत्व वाईट होण्यापेक्षाही अधिक गोष्टी समाविष्ट आहेत

[२० पानांवरील संक्षिप्त आशय]

वाईट निवासियांना काढून टाकलं व वसाहतीची दुरुस्ती केली तर मग, आम्हाला राहण्याचा पूर्वीसारखाच आनंद मिळणार नाही का? अगदी हेच देवानं सबंध पृथ्वीवर करण्याचे योजिले आहे

[२३ पानांवरील संक्षिप्त आशय]

“आमच्यापेक्षा देवाचे ज्ञान हे अत्यंत श्रेष्ठ आहे हे निर्विवाद आहे”

[२७ पानांवरील संक्षिप्त आशय]

“आता आमच्या सध्याच्या दशेत बचावासाठी कोण नीतीमान आहे असं कसं समजायचं?”

[८ पानांवरील चित्रं]

मानवाला जगात इतका काळ त्रास सहन करावा लागला आहे

[९ पानांवरील चित्रं]

मग एखाद्या क्रांतीमुळे त्यांना आनंदी भवितव्याची संधि मिळू शकेल का?

[१४, १५ पानांवरील चित्रं]

झाडांना पालवी फुटते तेव्हा उन्हाळा जवळ आला आहे हे तुम्ही समजता. याचप्रमाणे सबंध चिन्ह पूर्ण होत असताना शेवट जवळ आलेला असेल

[१६, १७ पानांवरील चित्रं]

पवित्र शास्त्र नम्र व प्रांजळ लोकांना देवाकडील इशारे गंभीरपणे घेण्यास सांगते

[२५ पानांवरील चित्रं]

बायबलची सूचना आज व्यवहार्य आहे कारण देवाचे वचन चिरकालिक आहे

[२९ पानांवरील चित्रं]

“मी व माझं कुटुंब मिळून पूर्ण रुपाचं परिक्षण करणार”