आपण घरी ईश्वरी भक्ती आचरण्याची गरज आहे
अध्याय १८
आपण घरी ईश्वरी भक्ती आचरण्याची गरज आहे
१. (अ) विवाहाविषयी यहोवाच्या मानकाबद्दल शिकल्यावर, अनेक लोकांनी कोणते बदल केले आहेत? (ब) परंतु ख्रिस्ती कौटुंबिक जीवनात आणखी काय गोवलेले आहे?
या आधीच्या पवित्र शास्त्र अभ्यासात आपण शिकलेल्या सुखद सत्यांमध्ये, विवाह आणि कौटुंबिक जीवनाविषयीच्या सत्यांचा समावेश होता. यहोवा विवाहाचा संस्थापक असल्याचे आपण जाणले; आणि पवित्र शास्त्रात त्याने परिवारांसाठी सर्वोत्तम मार्गदर्शन पुरवले असल्याचे आपण पाहिले. त्या मार्गदर्शनाचा परिणाम म्हणून अनेक लोकांनी लैंगिक व्यभिचाराच्या जीवनाचा त्याग केला असून त्यांच्या विवाहाची यथोचित नोंदणी करवली, हे स्तुत्य आहे. परंतु ख्रिस्ती जीवनात त्यापेक्षा बरेच अधिक आहे. विवाह बंधनाची शाश्वतता, कुटुंबातील आपल्या जबाबदाऱ्यांची पूर्तता, व कुटुंबातल्या इतर सभासदांबरोबरचा आपला व्यवहार यांचाही त्यात समावेश आहे.—इफिस. ५:३३–६:४.
२. (अ) पवित्र शास्त्रातील माहीत असलेल्या गोष्टी सर्वजण आपापल्या घरात लागू करतात का? (ब) तसे करण्यावर येशू आणि पौल कसा जोर देतात?
२ या बाबतीत पवित्र शास्त्र काय म्हणते हे लाखो लोकांना माहीत आहे. पण स्वतःच्या घरात समस्येला तोंड द्यावे लागले की, ते तो सल्ला लागू करत नाहीत. आपल्या स्वतःबद्दल काय म्हणता येईल? धार्मिक भक्तीचा देखावा पुरेसा आहे असा विचार करून, माता-पित्यांना आदर दाखवण्याची अपेक्षा करणाऱ्या देवाच्या नियमाला बगल देत असल्यामुळे येशूने ज्यांचा धिक्कार केला, त्यांच्यासारखे होण्याची इच्छा आपल्यातील कोणालाही नक्कीच नसावी. (मत्त. १५:४-९) ईश्वरी भक्तीचे बाह्य रूप तर आहे, पण ती ‘आपल्या घरांत’ आचरण्यात जे उणे पडतात अशांसारखे होण्याची आपली इच्छा नसावी. तर, जिच्यामुळे “मोठाच लाभ” होतो अशी खरी ईश्वरी भक्ती प्रदर्शित करण्याची आपली इच्छा असली पाहिजे.—१ तीम. ५:४; ६:६; २ तीम. ३:५.
विवाह कोठवर टिकेल?
३. (अ) अनेक विवाहांचे काय झाले आहे, पण आपला काय निर्धार असावा? (ब) विवाहाच्या शाश्वततेबद्दल वरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपल्या पवित्र शास्त्राचा उपयोग करा.
३ दिवसेंदिवस, विवाह बंधने अधिकाधिक कमकुवत होत असल्याचे दिसून येत आहे. वीस, तीस किंवा चाळीस वर्षे एकत्र असलेले काही जोडीदार आता इतर कोणाबरोबर “नवीन जीवन” सुरू करण्याचा निर्णय घेत आहेत. तसेच तरूण जोडपी लग्नानंतर थोड्याच महिन्यांनी विभक्त झाल्याचे कानावर येणे असामान्य राहिलेले नाही. इतर काहीही करत असले तरी, यहोवाचे उपासक म्हणून, देवाला संतुष्ट करण्याची इच्छा आपल्याला असली पाहिजे. या बाबतीत त्याचे वचन काय म्हणते?
एक पुरूष आणि एक स्त्री विवाहबद्ध होतात तेव्हा, किती मुदतीपर्यंत एकत्र राहण्याची अपेक्षा त्यांनी करावी? (रोम. ७:२, ३; मार्क १०:६-९)
देवासन्मुख घटस्फोटाचे एकमेव वैधानिक कारण कोणते आहे? (मत्त. १९:३-९; ५:३१, ३२)
त्याच्या वचनाने मान्यता न दिलेल्या घटस्फोटांबद्दल यहोवाच्या भावना किती तीव्र आहेत? (मला. २:१३-१६)
वैवाहिक समस्या सोडवण्याचा एक मार्ग म्हणून, विभक्त होण्याचा पुरस्कार पवित्र शास्त्र करते का? (१ करिंथ. ७:१०-१३)
४. आधुनिक प्रवृत्तीला न जुमानता काही विवाह का टिकतात?
४ अनेक विवाह—ख्रिस्ती म्हणवणाऱ्यांच्या मधलेही—मोडत असताना, काही विवाह का टिकतात? दोन्ही पक्ष प्रौढ होईपर्यंत लग्न न करणे, हा अनेकदा एक महत्त्वाचा घटक असतो. समान आवड-निवड असलेला व ज्याच्याबरोबर मोकळेपणाने चर्चा करता येते असा जोडीदार मिळणे देखील महत्त्वाचे आहे. पण आपण स्वतः खरोखरची ईश्वरी भक्ती आचरणारी व्यक्ती असणे, हे त्याहूनही अधिक महत्त्वाचे आहे. एखाद्याचे यहोवावर मनःपूर्वक प्रेम असल्यास व त्याचे मार्ग योग्य असल्याची खात्री त्याला असल्यास, उद्भवणाऱ्या समस्यांना हाताळण्यासाठी उत्तम आधार असेल. (स्तोत्र. ११९:९७, १०४; नीती. २२:१९) अशा व्यक्तींच्या विवाहाला न जमल्यास त्याला कधीही विभक्त होता येईल किंवा घटस्फोट घेता येईल या मनोवृत्तीमुळे, सुरूंग लागणार नाही. जबाबदाऱ्या डावलण्यासाठी सबब म्हणून तो आपल्या जोडीदाराच्या उणीवा काढणार नाही; तर उलट, जीवनाच्या समस्यांना सामोरे जाण्यास शिकेल व अमलात आणण्याजोगे तोडगेही शोधील.
५. (अ) यहोवावरील आपली निष्ठा यात कशी गोवलेली आहे? (ब) पराकाष्ठेचे कष्ट सहन करावे लागले तरी, यहोवाच्या मानकाला चिटकून राहिल्याने कोणते फायदे होऊ शकतात?
५ वैयक्तिक दुःखे अनुभवावी लागली की, आपण यहोवाच्या मार्गांकडे दुर्लक्ष करू आणि काय बरे व काय वाईट आहे याचा निर्णय आपणच केलेला बरा असा निष्कर्ष काढू, असा दावा सैतान करतो याची आपल्याला चांगली जाणीव आहे. परंतु यहोवाशी एकनिष्ठ असलेले लोक तसे नाहीत. (ईयो. २:४, ५; नीती. २७:११) अविश्वासू जोडीदाराकडून ज्यांचा छळ झाला आहे अशा, यहोवाच्या साक्षीदारांतल्या बहुसंख्य व्यक्तींनी त्यांची विवाह-बंधने तोडलेली नाहीत. (मत्त. ५:३७) काही वर्षांच्या मुदतीनंतर, त्यांचे जोडीदार यहोवाच्या सेवेत त्यांना येऊन मिळाल्याचा आनंदही काहींनी अनुभवला आहे. (१ करिंथ. ७:१६; १ पेत्र ३:१, २) ज्यांचे जोडीदार बदलण्याची चिन्हे दाखवत नाहीत किंवा आपल्या विश्वासाला घट्ट धरून राहिले म्हणून ज्यांचे जोडीदार, त्यांना सोडून गेले अशांनाही माहीत आहे की, यहोवाच्या मानकांना धरून राहिल्यामुळे त्यांना किती विपुल आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. कोणत्या प्रकारे? त्यांच्या परिस्थितीने त्यांना यहोवाच्या अधिक निकट जाणे शिकवले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही दैवी गुण प्रकट करण्यास ते शिकले आहेत. ज्यांची जीवने ईश्वरी भक्तीचा पुरावा देतात, असे ते लोक आहेत.—स्तोत्र. ५५:२२; याको. १:२-४; २ पेत्र १:५, ६.
प्रत्येकाने आपले कर्तव्य करणे
६. यशस्वी विवाहासाठी कोणत्या व्यवस्थेची कदर केली पाहिजे?
६ खरोखरच्या यशस्वी विवाहासाठी, केवळ एकत्र राहण्यापेक्षा अधिक गोष्टींची जरूर असते. कुटुंबातल्या प्रत्येक सभासदाने प्रमुखपदाच्या अधिकाराबद्दल यहोवाच्या व्यवस्थेचा आदर करणे, ही एक मूलभूत गरज आहे. त्यामुळे घरात सुव्यवस्था व सुरक्षेची भावना निर्माण होण्यास मदत होते.—१ करिंथ. ११:३; तीत २:४, ५; नीती. १:८, ९; ३१:१०, २८.
७. कुटुंबामध्ये प्रमुखपद कसे चालवले पाहिजे?
७ तो प्रमुखपदाचा अधिकार कसा उपयोगात आणावयाचा असतो? येशू ख्रिस्ताचे गुण प्रतिबिंबित होतील अशा प्रकारे. यहोवाचे मार्ग उचलून धरण्यात येशू खंबीर आहे. त्याला न्यायाची आवड आणि अधर्माचा वीट आहे. (इब्री. १:८, ९) त्याच्या मंडळीवरही त्याचे गाढ प्रेम असून, तो तिला जरूर ते मार्गदर्शन करतो व तिची काळजी वाहतो. तो गर्विष्ठ आणि इतरांबद्दल बेपर्वाई करणारा नाही, तर “मनाचा सौम्य व लीन” आहे आणि त्याच्या प्रमुखपदाखाली येणाऱ्यांच्या ‘जिवास विसावा’ मिळतो. (मत्त. ११:२८, २९; इफिस. ५:२५-३३) एखादा पती व पिता जेव्हा अशाच प्रकारे आपल्या घरच्यांशी वागतो तेव्हा, तो, ईश्वरी भक्तीचा सर्वोत्तम कित्ता घालून देणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या अधीन राहात असल्याचे उघड आहे. अर्थात ख्रिस्ती मातांनीही त्यांच्या मुलांशी वागताना तेच गुण प्रकट केले पाहिजेत.
८. (अ) काही घरांमध्ये, ख्रिस्ती पद्धतीने इच्छित परिणाम साध्य होत नाहीत असे का वाटू शकेल? (ब) अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागल्यास आपण काय करावे?
८ परंतु मानवी अपूर्णतेमुळे समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. कुटुंबातली एखादी व्यक्ती पवित्र शास्त्राची तत्त्वे लागू करू लागण्यापूर्वी, दुसऱ्यांच्या मार्गदर्शनाबद्दल काही प्रमाणात राग धरण्याची सवय काहींच्यात खोलवर भिनलेली असण्याची शक्यता आहे. आपुलकीच्या विनंत्या व प्रेमळपणाने काम होत नाहीसे दिसेल. “संताप, क्रोध, गलबला व निंदा” दूर ठेवावीत असे पवित्र शास्त्र सांगते हे आपल्याला ठाऊक आहे. (इफिस. ४:३१) पण काही लोकांना इतर कशानेही बोध होत नाहीसे दिसल्यास काय केले पाहिजे? पराकाष्ठेच्या दबावाखाली असताना येशूची प्रतिक्रिया कशी होती? त्याने, धमक्या व शिवीगाळ करणाऱ्यांचे अनुकरण केले नाही. तर उलट, आपल्या पित्यावर विसंबून, त्याने स्वतःला त्याच्या हाती सोपवून दिले. (१ पेत्र २:२२, २३) त्याचप्रमाणे, घरात बिकट परिस्थिती उत्पन्न झाली असताना, जगाचे मार्ग अनुसरण्याऐवजी, मदतीसाठी प्रार्थना करून यहोवाकडे वळाल्यास, आपण ईश्वरी भक्तीचा पुरावा देतो.—नीती. ३:५-७.
९. अनेक ख्रिस्ती पती, दोष काढण्याऐवजी कोणते मार्ग वापरण्यास शिकले आहेत?
९ बदल नेहमीच चटकन होत नाहीत. पण पवित्र शास्त्राचा सल्ला खरोखरी लागू पडतोच. आपल्या बायकांच्या चुकांबद्दल अतिशय कडवटपणे तक्रार करणाऱ्या अनेक पतींनी, ख्रिस्ताने त्याच्या मंडळीशी केलेल्या व्यवहाराची स्वतः अधिक जास्त कदर केली तेव्हा सुधारणा होऊ लागल्याचे आढळून आले. ती मंडळी परिपूर्ण मानवांची बनलेली नाही. तरीही, येशू त्या मंडळीवर प्रीती करतो. तिच्यासाठी त्याने योग्य ते उदाहरण घालून दिले. तिच्यासाठी त्याने आपले जीवनही दिले. आणि ती त्याला सर्वथैव आवडावी म्हणून तिला सुधारण्यासाठी तो शास्त्रवचनांचा उपयोग करतो. (इफिस. ५:२५-२७; १ पेत्र २:२१) उत्तम उदाहरण घालून देण्याचा व सुधारणेसाठी प्रेमळ वैयक्तिक मदत देण्याचा प्रयत्न करण्यात, त्याच्या उदाहरणाने अनेक ख्रिस्ती पतींना प्रोत्साहन दिले आहे. सतत दोष काढणे अथवा अबोला धरण्यापेक्षा या पद्धतींनी अधिक चांगले परिणाम प्राप्त होतात.
१०. (अ) एखादा पती व पिता—स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाराही—त्याच्या घरातल्या इतरांचे जीवन कोणत्या मार्गांनी कष्टमय करत असेल? (ब) अशी परिस्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल?
१० अर्थात, पती किंवा पित्याच्या उणीवांमुळे देखील घरात समस्या उद्भवतात. तो त्याच्या कुटुंबाच्या भावनात्मक गरजांबाबत संवेदनशील नसल्यास अथवा कुटुंबात पवित्र शास्त्रावरील चर्चेची व इतर कार्यक्रमांची योजना करून खरोखरी पुढाकार घेत नसल्यास कसे? समस्येबद्दल स्पष्ट व आदरपूर्वक चर्चेनंतर काही घरांमध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत. (नीती. १५:२२; १६:२३; ३१:२६) परंतु इच्छित परिणाम पूर्णपणे प्राप्त झाले नसले तरी, व्यक्तीगतपणे आत्म्याची फळे जोपासून आणि कुटुंबातल्या इतर सभासदांबद्दल प्रेमळ काळजी व कदर दाखवून घरातल्या वातावरणामध्ये सुधारणा करण्यात प्रत्येकजण हातभार लावू शकतो. प्रगती होईल, पण दुसऱ्या व्यक्तीने काहीतरी करण्याची वाट पाहून नव्हे, तर स्वतःची भूमिका चोखपणे पार पाडून व अशा तऱ्हेने आपण स्वतः घरात ईश्वरी भक्ती आचरत असल्याचे दाखवून.—कलस्सै. ३:१८-२०, २३, २४.
उत्तरे कोठून मिळवावीत
११, १२. (अ) कौटुंबिक जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी यहोवाने कोणत्या तरतुदी केल्या आहेत? (ब) पुरेपूर फायदा घेण्यासाठी, आपण काय करावे असे सुचवण्यात आले आहे?
११ लोक त्यांच्या कौटुंबिक बाबींमध्ये सल्ल्यासाठी ज्यांच्याकडे वळतात असे अनेक स्रोत आहेत. परंतु देवाच्या वचनांत सर्वोत्तम उपदेश असल्याचे आपल्याला ठाऊक आहे, आणि तो आचरणात आणण्यासाठी त्याच्या दृश्य संस्थेमार्फत तो आपल्याला मदत करतो याबद्दल आपण आभारी आहोत. तुम्ही त्या मदतीचा पुरेपूर फायदा घेत आहात का?—स्तोत्र. ११९:१२९, १३०; मीखा ४:२.
१२ मंडळीच्या सभांना उपस्थित राहण्याव्यतिरिक्त, कौटुंबिक पवित्र शास्त्र अभ्यासासाठी तुम्ही नियमित वेळ काढून ठेवला आहे का? दर आठवड्याला नियमितपणे असे करणारी कुटुंबे उपासनेमध्ये एक होतात. त्यांच्या स्वतःच्या परिस्थितीला देवाचे वचन लागू करण्याबद्दल ते चर्चा करतात तेव्हा, त्यांचे कौटुंबिक जीवन संपन्न होते.—पडताळा अनुवाद ११:१८-२१.
१३. (अ) विशिष्ट वैवाहिक अथवा कौटुंबिक बाबीविषयी प्रश्न पडल्यास, जरूर ती मदत आपल्याला बहुधा कोठे मिळेल? (ब) आपण घेत असलेल्या सर्व निर्णयांमध्ये काय दिसून आले पाहिजे?
१३ कदाचित तुमच्याशी संबंधित असे, विशिष्ट वैवाहिक वा कौटुंबिक प्रश्न असतील. उदाहरणार्थ, संतती नियमन करावे का? ख्रिश्चनांनी संतती-प्रतिबंधक शस्त्रक्रिया करून घेणे योग्य आहे का? जन्माला येणाऱ्या बालकामध्ये विकृती असण्याची शक्यता दिसल्यास गर्भपात समर्थनीय ठरतो का? पती व पत्नी मधल्या योग्य प्रकारच्या लैंगिक संबंधांवर मर्यादा आहेत का? विशीच्या आतल्या एखाद्या युवकाला आध्यात्मिक गोष्टींमध्ये स्वारस्य नसल्यास, कौटुंबिक उपासनेमध्ये त्याने किती प्रमाणात भाग घ्यावा अशी अपेक्षा करावी? या प्रत्येक गोष्टीबाबत तुमचे निश्चितच काही मत असेल. पण पवित्र शास्त्रातील तत्त्वांच्या आधारे तुम्ही उत्तर देऊ शकता का? यातील प्रत्येक प्रश्नाची चर्चा टेहळणी बुरूज या मासिकात करण्यात आली आहे. अशी माहिती शोधण्यासाठी उपलब्ध सूचींचा उपयोग करण्यास शिका. सूचीमध्ये सांगितलेली जुनी प्रकाशने तुमच्यापाशी नसल्यास राज्य-सभागृहातल्या ग्रंथालयात शोधा. प्रत्येक प्रश्नाला होय किंवा नाही असे उत्तर मिळण्याची अपेक्षा करू नका. काही वेळा, तुम्हाला—व्यक्तिशः अथवा विवाहित जोडप्याने मिळून—निर्णय घ्यावा लागेल. तेव्हा यहोवा आणि तुमच्या कुटुंबातल्या इतर सभासदांवरील तुमचे प्रेम ज्यामुळे प्रकट होईल असे निर्णय घेण्यास शिका. देवाला संतुष्ट करण्याची तुमची उत्कट इच्छा दिसून येईल असे निर्णय घ्या. तसे केल्यास, फक्त लोकांसमोरच नव्हे तर स्वतःच्या घरातही तुम्ही खरोखर ईश्वरी भक्ती आचरता ही गोष्ट, यहोवा आणि तुम्हाला चांगले ओळखणाऱ्या इतर लोकांना स्पष्टपणे दिसून येईल.—इफिस. ५:१०; रोम. १४:१९.
पुनरावलोकन चर्चा
• आपण विवाहात दिलेल्या वचनाला जागण्यात, यहोवावरील आपली निष्ठा कशी गोवलेली आहे?
• कौटुंबिक समस्यांच्या दबावाखाली असताना, देवाला संतोषवणाऱ्या गोष्टी करण्यास आपल्याला कशाची मदत होईल?
• कुटुंबातले इतर जण उणे पडत असले तरी, परिस्थिती सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]