उपासनेत एकता—याचा तुमच्याकरता काय अर्थ असावा?
अध्याय १
उपासनेत एकता—याचा तुमच्याकरता काय अर्थ असावा?
१, २. (अ) आपल्या काळामध्ये कोणत्या आधारावर उपासनेची एकता घडवून आणण्यात येत आहे? (ब) घडत असलेल्या गोष्टींचे वर्णन पवित्र शास्त्र कसे करते?
उपासनेतील एकतेच्या दिशेने सर्व जगभर एक रोमांचकारी चळवळ चालली आहे. सर्व देशांच्या, जातींच्या व भाषांच्या लोकांना ती एकत्रित करत आहे. त्यांची एकता ही काही अनेक श्रद्धांच्या तडजोडीचा परिपाक नव्हे. देवाच्या वचनाविरूद्ध असलेल्या जीवन-पद्धतींवर टीका करण्याचे टाळून ती साध्य केली जात नाही. तर मग तिच्या मागचे कारण काय? यहोवा हाच एकमेव खरा देव असल्याचे सर्व प्रकारच्या लोकांना माहीत होत आहे, आणि त्याच्या नीतिमान मार्गांशी आपले जीवन जुळवून घेण्याची त्यांची तयारी आहे, ही वस्तुस्थिती.—पडताळा प्रकटीकरण १५:३, ४.
२ सुमारे २,७०० वर्षांपूर्वी मीखा संदेष्ट्याने नमूद केलेल्या भविष्यवाणीची ही पूर्तता आहे. “शेवटल्या दिवसां”बद्दल त्याने लिहिले: “देशोदेशींच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील, ‘चला, आपण परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.’” (मीखा ४:१, २) * हे होत असल्याचे तुम्हाला दिसते का?
३, ४. (अ) “राष्ट्रे” यहोवाकडे वळत आहेत हे कसे खरे आहे? (ब) आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?
३ यहोवाच्या आध्यात्मिक घरात उपासनेसाठी कोणतेही “राष्ट्र” संपूर्णतया आलेले नाही. परंतु अशा राष्ट्रातल्या व्यक्ती मात्र येत आहेत. यहोवा देवाच्या प्रेमळ उद्देशांबद्दल आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाबद्दल शिकू लागल्यावर त्यांच्या हृदयांवर खोलवर परिणाम होतो. देवाची त्यांच्यापासून काय अपेक्षा आहे याचा ते नम्रतेने शोध करू लागतात. विश्वासू दाविदाप्रमाणे त्यांचीही प्रार्थना आहे: “तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकीव; कारण तू माझा देव आहेस.”—स्तोत्र. १४३:१०.
४ यहोवाच्या उपासकांच्या त्या विशाल लोकसमुदायात तुम्ही स्वतःला गणता का? प्राप्त सूचनांना तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाने असे सिद्ध होते का की, यहोवा त्या सूचनांचा उगम असल्याची तुम्हाला खरोखर जाणीव आहे? किती प्रमाणात तुम्ही “त्याच्या पथांनी” चालत आहात?
ते कसे साध्य होते
५. (अ) कालांतराने उपासनेची एकता किती प्रमाणात साध्य केली जाईल? (ब) आताच यहोवाचे उपासक बनणे निकडीचे का आहे व ते करण्यात आपण इतरांना कशी मदत करू शकतो?
५ उपासनेमध्ये सर्व बुद्धिमान सृष्टीची एकता असावी—असत्याने कोणीही मार्गभ्रष्ट नसावे, जीवनाचा खरा अर्थ शोधण्यातल्या अपयशामुळे कोणीही चाचपडत नसावे—असा यहोवाचा उद्देश आहे. हयात असलेले सर्व लोक जेव्हा एकमेव खऱ्या देवाला धन्यवाद देतील तो दिवस पाहण्याची आपल्याला किती ओढ वाटते! (स्तोत्र. १०३:१९-२२) परंतु ते शक्य होण्यापूर्वी, त्याची प्रेमळ राजसत्ता तुच्छतेने झिडकारणाऱ्या व इतरांच्या जीवनात बिबा घालण्याचा आग्रह धरणाऱ्यांना यहोवाने त्याच्या सृष्टीतून नष्ट केले पाहिजे. दयाळूपणे, आपण करणार असलेल्या गोष्टींची आगाऊ सूचना तो देतो. त्यामुळे सर्वत्र लोकांना आपला मार्ग बदलण्याची संधी मिळते. “देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा. कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे निर्माण केले त्याला नमन करा,” अशी तातडीची विनंती अगदी आपल्या दिवसातही जगभर करण्यात येत आहे. (प्रकटी. १४:६, ७) ते निमंत्रण तुम्ही स्वीकारले आहे का? स्वीकारले असल्यास तसे करण्यास इतरांना मदत करण्यामध्ये, यहोवाच्या संस्थेसह कार्य करण्याचा विशेषाधिकार आता तुम्हाला आहे.
६. पवित्र शास्त्राच्या मूलभूत शिकवणी आत्मसात केल्यावर पुढील कोणती प्रगती करण्यास आपण झटून प्रयत्न केला पाहिजे?
६ त्यांचा यहोवावर विश्वास असून नंदनवनामध्ये राहण्याची त्यांची इच्छा असल्याचे जे केवळ म्हणतात, पण त्याचवेळी स्वतःचे स्वार्थी हितसंबंध जोपासत राहतात, अशा लोकांना आपल्या संस्थेमध्ये आणण्याचा देवाचा उद्देश नाही. लोकांनी “त्याच्या इच्छेसंबंधी पूर्ण ज्ञानाने भरले जावे” आणि त्या ज्ञानाचे प्रतिबिंब त्यांच्या जीवनात दिसावे अशी त्याची अपेक्षा आहे. (कलस्सै. १:९, १०) गुणग्राहक व्यर्क्तिना पवित्र शास्त्रातल्या मूलभूत शिकवणींची माहिती झाल्यानंतर, ख्रिस्ती प्रौढत्वाकडे प्रगती करण्याची त्यांची इच्छा असते. यहोवाशी दाट परिचय करून घेण्याची, त्याच्या वचनाविषयी त्यांचे आकलन विस्तृत व सखोल करण्याची आणि त्यांच्या जीवनात ते अधिक समग्रपणे लागू करण्याची ओढ त्यांना असते. त्याचे गुण प्रदर्शित करून व त्याच्या दृष्टिकोनातून सर्व गोष्टींकडे पाहून, ते त्यांच्या स्वर्गीय पित्यासारखे बनण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आज आपल्या दिवसात पृथ्वीवर तो करवून घेत असलेल्या कार्यात शक्य तितके अधिक सहभागी होण्याचे मार्ग शोधण्यास ते प्रवृत्त होतात. हेच तुम्ही करीत आहात का?—इफिस. ५:१; इब्री. ५:१२–६:३; १ तीम. ४:१५.
७. कोणत्या मार्गांनी खरी एकता शक्य आहे व ती कशी साध्य केली जाते?
७ यहोवाची सेवा करणाऱ्या लोकांमध्ये ऐक्य असले पाहिजे असे पवित्र शास्त्र दर्शवते. (इफिस. ४:१-३) आपण विभक्त जगात राहात असलो व अजूनही स्वतःच्या अपूर्णतेशी झगडत असलो तरी, आज हे ऐक्य असले पाहिजे. खऱ्या ऐक्याचा आस्वाद घेत त्याच्या शिष्यांनी एक व्हावे, अशी कळकळीची प्रार्थना येशूने केली. त्याचा अर्थ काय असेल? सर्वप्रथम यहोवा व त्याच्या पुत्राशी त्यांचे चांगले संबंध असतील. तसेच त्यांचे परस्परांशी ऐक्य असेल. (योहा. १७:२०, २१) यहोवाच्या “घरी” मिळणाऱ्या सूचना ते जसजशा लागू करतात तसतसे ते ऐक्य आता साध्य होत आहे.
कोणते घटक ऐक्याला कारणीभूत होतात?
८. (अ) आपल्यावर प्रभाव टाकणाऱ्या प्रश्नांची तर्कशुद्ध उत्तरे शोधण्यासाठी व्यक्तिशः पवित्र शास्त्राचा उपयोग केल्यास, आपण काय वाढवतो? (ब) वर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन ख्रिस्ती एकतेला हातभार लावणाऱ्या घटकांचे विश्लेषण करा.
८ ऐक्याला कारणीभूत होणारे काही महत्त्वाचे घटक खाली दिले आहेत. त्यापुढील प्रश्नांची उत्तरे देताना त्या प्रत्येकाचा, यहोवा आणि ख्रिस्ती बांधवांशी असलेल्या तुमच्या संबंधांवर कसा परिणाम होतो, यावर ध्यान द्या. सोबत दिलेल्या शास्त्रवचनांच्या प्रकाशात या मुद्यांवर विचार केल्याने, आपणा सर्वांना आवश्यक असलेली देवासारखी विचार-क्षमता व मर्मभेदक दृष्टी उत्पन्न करण्यात आपल्याला मदत होईल. (नीती. ५:१, २; फिलिप्पै. १:९-११) तेव्हा, एकावेळी एक असा या घटकांचा विचार करा
(१) आपण सर्व यहोवाची उपासना करतो आणि चांगल्या व वाईटाबद्दल मानक ठरवण्याचा त्याचा हक्क मान्य करतो.
आपल्याला क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीबाबत त्याच्या उपदेशाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्यास, यहोवा त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहील? (लूक १६:१०; पडताळा मलाखी १:६-८.)
आपण नेहमी यहोवाच्या आज्ञा न पाळल्यास त्याचा इतरांवर परिणाम होतो का? (पडताळा रोमकरांस ५:१२; यहोशवा ७:२०-२६; १ राजे १४:१६.)
(२) जगात कोठेही असलो तरी मार्गदर्शनासाठी आपल्यापाशी देवाचे वचन आहे.
निर्णय घेताना फक्त आपल्याला योग्य “वाटते” ते करण्यात काय धोका आहे? (यिर्म. १७:९; नीती. १४:१२)
एखाद्या विशिष्ट बाबतीत पवित्र शास्त्र काय सल्ला देते ते ठाऊक नसल्यास आपण काय करावे? (नीती. २:३-५)
(३) आपणा सर्वांना एकाच आध्यात्मिक भोजनाच्या कार्यक्रमाचा लाभ होतो.
आध्यात्मिक भोजनाच्या यहोवाच्या योजनेची कदर न करणाऱ्यांमध्ये कशी परिस्थिती असते? (पडताळा यशया १:३; ९:१६; ६५:१४.)
(४) आपला नेता आणि ज्याच्यामार्फत आपण सर्व भक्तीभावाने यहोवाकडे जातो, तो, कोणी मानव नव्हे तर येशू ख्रिस्त आहे.
एक व्यक्ती या नात्याने इतरांपेक्षा वरचढ आहोत असे मानण्यास आपल्यापैकी कोणापाशी सबळ कारण आहे का? (रोम. ३:२३, २४; १२:३; मत्त. २३:८-१०)
(५) कोठेही राहात असलो तरी मानवजातीची एकमेव आशा म्हणून आपण देवाच्या राज्याकडे पाहातो.
त्यामुळे विघटनकारी प्रभावांपासून आपले संरक्षण कसे होते? (मत्त. ६:९, १०; मीखा ४:३)
(६) ख्रिस्ती ऐक्याला अत्यावश्यक असलेले गुण, पवित्र आत्मा यहोवाच्या उपासकांमध्ये उत्पन्न करतो.
देवाच्या आत्म्याची फळे आपल्यामध्ये उत्पन्न करण्यासाठी त्याला आपण कशी वाट करून देतो? (स्तोत्र. १:२; नीती. २२:४; प्रकटी. ३:६; प्रे. कृत्ये ५:३२)
आपल्यामध्ये आत्म्याची फळे असण्याचा, यहोवाशी असलेल्या आपल्या संबंधावर कसा परिणाम होतो? आपल्या बंधूंशी असलेल्या संबंधावर कसा परिणाम होतो? (गलती. ५:२२, २३)
(७) देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे.
आपल्या ख्रिस्ती बांधवांसह या प्रचार कार्यात गढून राहिल्याने त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावनांवर कसा प्रभाव पडतो? (पडताळा कलस्सैकरांस ४:७, ११.)
९. ही सत्ये आपल्या जीवनात खरोखर लागू केल्यास काय परिणाम होतो?
९ या गोष्टी मान्य करणे ही एक बाब झाली. त्यानुरूप आचरण ठेवण्यासाठी बऱ्याच अधिक गोष्टींची गरज असते. पण तसे करतो तेव्हा आपण यहोवाच्या अधिक जवळ आकर्षित होतो. आपल्या समविश्वासी बांधवांचा सहवासही उत्साहवर्धक होतो. स्तोत्रसंहिता १३३:१ मध्ये म्हटल्याप्रमाणे: “पाहा, बंधूंनी ऐक्याने राहणे किती चांगले व मनोरम आहे!” सर्वत्र स्वार्थाने भरलेल्या जगापासून अलग होणे व यहोवावर खरे प्रेम करणाऱ्या इतरांसोबत सभांना उपस्थित राहणे किती उत्साहवर्धक असू शकते हे तुम्ही व्यक्तिशः अनुभवलेले नाही का?
विघटनकारी प्रभावांना टाळा
१०. स्वतंत्रतेची भावना टाळण्यासाठी खबरदारी घेण्याची आपल्याला का गरज आहे?
१० ते बहुमोल ऐक्य बिघडू नये म्हणून आपण विघटनकारी प्रभावांना टाळलेच पाहिजे. त्यातील अग्रगण्य प्रभावांपैकी एक आहे स्वातंत्र्याची भावना. तिच्या निर्मात्याचे, दियाबलाचे, खरे स्वरूप उघड करून, ती टाळण्यास यहोवा आपली मदत करतो. देवाच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करणे आणि आपले निर्णय स्वतः घेणे तिच्या फायद्याचे होईल, असा विचार करायला लावण्यामध्ये हव्वेला फसवणारा तोच आहे. त्या विद्रोहात आदाम तिला सामील झाला. परिणामी त्यांच्यावर व आपल्यावर अनर्थ ओढवला. (उत्प. २:१६, १७; ३:१-६, १७-१९) त्या स्वातंत्र्याच्या भावनेने ओतप्रोत भरलेल्या जगात आपण राहात आहोत. तेव्हा, आपल्या मधल्या त्या भावनेला आळा घालण्याची गरज पडावी याचे आश्चर्य वाटू नये. त्याच्या संस्थेमार्फत सल्ला देऊन, यहोवा, प्रेमाने तसे करण्यास आपल्याला मदत करतो.
११. देवाच्या नीतिमान नवीन व्यवस्थेमध्ये जगण्यासाठी आपण मनःपूर्वक तयारी करत आहोत किंवा नाही हे कशावरून दिसून येईल?
११ ज्यामध्ये “नीतिमत्त्व वास करिते” असे नवे आकाश व नवी पृथ्वी ही सध्याच्या परिस्थितीची जागा घेईल, या देवाच्या उदात्त वचनाबद्दल आपल्याला याच संस्थेमार्फत माहिती झाली आहे. (२ पेत्र ३:१३) लवकरच हे दुष्ट जग जाऊन पृथ्वीचे नंदनवनामध्ये रूपांतर होईल, या भावी आशेने आपण रोमांचित होतो. परंतु, नीतिमत्त्व आचरण्याचा पायंडा असेल अशा जगातल्या जीवनासाठी मनःपूर्वक तयारी करत असल्याचे, आपल्या दिनचर्येवरून दिसून येते का? पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगते: “जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही.” (१ योहा. २:१५) या जगाबद्दलच्या अनेक गोष्टी आपल्या कोणालाही आवडत नाहीत, हे अगदी खरे. परंतु सध्याच्या जीवनाचा उपभोग घेण्यावर तात्कालिक अतिक्रमण करणाऱ्या, जगाच्या पैलूबद्दल आपल्याला विशेष तिरस्कार वाटतो का? अथवा, आपण या जगाची वृत्ती—त्याचा स्वतंत्रपणाचा कल, स्वतःबद्दलची फाजील काळजी—हे देखील टाळतो का? यहोवाचे ऐकण्याची आणि देहाची स्वाभाविक इच्छा कितीही विपरित असली तरी, अंतःकरणपूर्वक त्याच्या आज्ञा पाळण्याची खरोखरची सवय आपण लावून घेत आहोत का? कोठेही असलो, काहीही करत असलो, तरी आपले विचार व उद्देश देवाला अनुसरून असल्याचा पुरावा आपल्या संपूर्ण जीवन-मार्गाने दिला पाहिजे.—नीती. ३:५, ६.
१२. (अ) यहोवाचे मार्ग शिकण्याच्या व ते आपल्या जीवनात पाळण्याच्या संधीचा फायदा आताच घेणे महत्त्वाचे का आहे? (ब) परिच्छेदात उल्लेख केलेल्या शास्त्रवचनांचे आपल्याला व्यक्तिशः काय मोल वाटते?
१२ ही दुष्ट व्यवस्था आणि तिच्या मार्गांची आवड असणाऱ्या सर्वांचा नाश करण्याची यहोवाची ठरलेली वेळ येईल तेव्हा तो विलंब करणार नाही. तो ती वेळ पुढे ढकलणार नाही. किंवा अजूनही या जगाला बिलगण्याचा प्रयत्न करणाऱ्या, देवाच्या इच्छेची माहिती करून घेऊन तसे आचरण करण्याचा नावापुरता प्रयत्न करणाऱ्या लोकांना समावून घेण्यासाठी, आपले दंडकही तो बदलणार नाही. कृती करण्याची वेळ आताच आहे! (लूक १३:२३, २४; १७:३२; २१:३४-३६) अशा स्थितीत, या अमोल संधीचा फायदा घेणाऱ्या व यहोवा त्याच्या संस्थेमार्फत देत असलेले शिक्षण उत्सुकतेने घेऊन त्याच्या मार्गांवर एकतेने चालणाऱ्या लोकांचा “मोठा समुदाय” पाहून किती आनंद होतो!
[तळटीपा]
^ या पुस्तकातील शास्त्रवचनांची अवतरणे, बायबल सोसायटी ऑफ इंडियाच्या संदर्भासहित सुधारित पवित्र शास्त्रातून घेतलेली आहेत. न्यू.व. असा संकेत दर्शवणारी वचने न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स या इंग्रजी शास्त्रानुरूप आहेत.
पुनरावलोकन चर्चा
• उपासनेबाबत यहोवाचा उद्देश काय आहे?
• मूलभूत पवित्र शास्त्र-शिकवणींची माहिती करून घेतल्यानंतर त्यापुढील कोणती प्रगती करण्याचा आपण मनःपूर्वक प्रयत्न केला पाहिजे?
• आपण ज्यांची नुकतीच चर्चा केली त्या, एकता करणाऱ्या घटकांचा व्हायला हवा तसा परिणाम आपल्या जीवनावर होण्यासाठी, आपण व्यक्तिशः काय करू शकतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[४ पानांवरील चित्र]