व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा”

“एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा”

अध्याय १७

“एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा”

१, २. (अ) यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमध्ये अनेकदा नवागतांवर कशाची छाप पडते? (ब) आपल्या अधिवेशनामध्ये या गुणाचा आणखी कोणता पुरावा त्यांना दिसून येतो?

 जेव्हा लोक यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीच्या सभेला प्रथमच येतात तेव्हा तेथे प्रदर्शित झालेल्या प्रीतीने अनेकदा त्यांच्यावर सखोल परिणाम होतो. परस्परातील आपुलकी व त्यांच्या स्वतःच्या झालेल्या स्वागतात ती त्यांना दिसून येते.

आपल्या अधिवेशनामध्ये उपस्थित असलेल्या बहुतेक जणांचे वर्तन अतिशय सभ्य असते ही गोष्टही पाहुण्यांच्या लक्षात येते. अशा एका अधिवेशनाबद्दल एका वार्ताहराने लिहिले: ‘कोणीही अमली पदार्थांच्या वा दारूच्या प्रभावाखाली नाही. आरडाओरड व किंचाळ्या नाहीत. पुढे जाण्यासाठी धडपड नाही. ढकलाढकल नाही. कोणाच्या तोंडी अपशब्द व शिव्या नाहीत. अश्‍लील विनोद किंवा असभ्य भाषा नाही. धुराने कोंदलेली हवा नाही. चोरी नाही. हिरवळीवर कोणी कचरा टाकत नाही. तो अनुभव खरोखरच आगळा होता.’ हा सर्व प्रीतीचा, ‘गैरशिस्त वागत नाही व स्वार्थ पाहत नाही’ अशा प्रकारच्या प्रीतीचा, पुरावा आहे.—१ करिंथ. १३:४-८.

३. (अ) कालांतराने, आपली प्रीती प्रदर्शित होण्याबद्दल कोणता पुरावा दिसून आला पाहिजे? (ब) येशूचे अनुकरण करण्यात आपण कशा प्रकारचे प्रेम उत्पन्‍न केले पाहिजे?

प्रीती हा प्रत्येक खऱ्‍या ख्रिस्ती व्यक्‍तीची ओळख पटवणारा गुण आहे. (योहा. १३:३५) आध्यात्मिकरित्या जसजशी आपली वाढ होते तसतसा आपण तो अधिक प्रमाणात व्यक्‍त केला पाहिजे. त्याच्या बंधूंची प्रीती “उत्तरोत्तर अतिशय वाढावी” अशी प्रार्थना प्रेषित पौलाने केली. (फिलिप्पै. १:९; १ थेस्सलनी. ३:१२) तसेच त्याच्या ख्रिस्ती बंधूंनी त्यांच्या प्रीतीमध्ये संपूर्ण ‘बंधुवर्गा’चा समावेश करावा असे पेत्राने त्यांना आग्रहाने सांगितले. (१ पेत्र २:१७) ज्या लोकांची वैयक्‍तिक ओळख करून घेण्यासाठी आपण काही प्रयत्न करत नाही, अशांबरोबर केवळ सभांना उपस्थित राहण्यापेक्षा अधिक काही करण्यास प्रीतीने आपल्याला प्रेरणा दिली पाहिजे. वेळोवेळी हसतमुखाने “काय, कस काय?” म्हणण्यापेक्षा त्यात अधिक गोष्टींचा समावेश असला पाहिजे. प्रेषित योहानाने दाखवले की, त्या प्रीतीत स्वार्थत्यागाची भावना असली पाहिजे. त्याने लिहिले: “[देवाच्या पुत्राने] आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला ह्‍यावरून आपल्याला प्रीतीची जाणीव झाली आहे; तेव्हा आपणही आपल्या बंधूंकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे.” (१ योहा. ३:१६; योहा. १५:१२, १३) आपण अजून तसे केलेले नाही. परंतु खरोखरच आपल्या बंधूंसाठी आपण आपले जीवन देऊ का? आताही, आपल्याला सोयीचे नसले तरी, त्यांना मदत करण्याचा आपण किती प्रमाणात विशेष प्रयत्न करतो?

४. (अ) दुसऱ्‍या कोणत्या मार्गाने आपण प्रीती अधिक जास्त प्रमाणात व्यक्‍त करू शकू, असे आपल्याला दिसून येणे शक्य आहे? (ब) एकमेकांबद्दल नितांत प्रीती असणे अत्यावश्‍यक का आहे?

स्वार्थ-त्यागी वृत्ती प्रकट करणाऱ्‍या कार्यांसोबत आपल्या बंधूंसाठी खरोखर आपुलकीची भावना देखील असणे महत्त्वाचे आहे. देवाचे वचन आपल्याला आग्रह करते: “बंधूप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा.” (रोम. १२:१०) आपणा सर्वांना काही व्यक्‍तींच्या बाबतीत तसे वाटते. अशी आपुलकी ज्यांच्याविषयी वाटते अशांच्या गटात आपण आणखी लोकांचा अंतर्भाव करू शकू का? या जुन्या व्यवस्थेचा अंत जवळ येत असताना, आपल्या ख्रिस्ती बांधवांच्या अधिकाधिक निकट जाणे आपल्याला अत्यावश्‍यक आहे. “सर्वांचा शेवट जवळ आला आहे . . .  मुख्यतः एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा; कारण प्रीती पापांची रास झाकून टाकिते.” असे म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला या बाबतीत सावध करते.—१ पेत्र ४:७, ८.

५. मंडळीच्या सभासदांमध्ये समस्या उद्धवणार नाहीत अशी अपेक्षा करणे चुकीचे का असेल?

अर्थात, अपूर्ण आहोत तोवर आपल्या हातून इतरांचे मन दुखावले जाण्याचे प्रसंग येतील. तेही अनेक मार्गांनी आपल्या विरूद्ध पाप करतील. (१ योहा. १:८) आपण अशा परिस्थितीत असल्याचे आढळून आल्यास तुम्ही काय करावे?

समस्या उद्‌भवल्यास काय करावे

६. (अ) पवित्र शास्त्राचा सल्ला नेहमीच आपल्या वृत्तीशी जुळणारा का नसेल? (ब) परंतु आपण तो लागू केल्यास, काय परिणाम होईल?

शास्त्रवचने जरूर ते मार्गदर्शन देतात. परंतु त्यांतील सल्ला आपणा अपूर्ण मानवांच्या प्रवृत्तीशी जुळेलच असे नाही. (रोम. ७:२१-२३) तरीही, तो लागू करण्यासाठी आपण केलेला निकराचा प्रयत्न, यहोवाला प्रसन्‍न करण्याच्या आपल्या प्रामाणिक इच्छेचा पुरावा असेल. आणि त्यामुळे इतरांबद्दलच्या आपल्या प्रेमाचा दर्जाही सुधारेल.

७. (अ) कोणी आपल्याला दुखावल्यास, बदला का घेऊ नये? (ब) आपल्याला दुखावणाऱ्‍या बंधूला केवळ टाळू नये ते का?

काही वेळा, दुखावले गेल्यास, लोक उट्टे काढण्याचे मार्ग शोधतात. पण त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडते. परतफेडीची गरज असल्यास, आपण ती देवावर सोपवावी. (नीती. २४:२९; रोम. १२:१७-२१) चूक करणाऱ्‍याशी संपर्क टाळून, त्याला आपल्या जीवनातून बाहेर टाकण्याचा प्रयत्न इतर लोक करण्याचा संभव आहे. परंतु सहउपासकांच्या बाबतीत आपण तसे करू शकत नाही. आपल्या भक्‍तीचा स्वीकार काही अंशी, बांधवांवरल्या आपल्या प्रेमावर अवलंबून आहे. (१ योहा. ४:२०) ज्याच्याशी आपण बोलत नाही किंवा ज्याची केवळ उपस्थिती आपल्याला खटकते, त्याच्यावर आपले प्रेम आहे असे आपण प्रामाणिकपणे म्हणू शकू का? समस्येला सामोरे जाऊन ती सोडवण्याची आपल्याला गरज आहे. ते कसे करता येईल?

८, ९. (अ) एखाद्या बंधूविरूद्ध आपल्याला तक्रार असल्यास, काय करणे योग्य आहे? (ब) परंतु त्याने आपल्याविरूद्ध वारंवार पाप केले असल्यास कसे? (क) आपण ती बाब अशा रीतीने का हाताळावी, व तसे करण्यास आपल्याला कशाची मदत होईल?

या बाबतीत प्रेषित पौलाने लिहिले: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरूद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने [यहोवा, न्यू.व.] तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा.” (कलस्सै. ३:१३) तुम्ही ते करू शकाल का? एखाद्याने तुमच्या विरूद्ध पुनःपुन्हा वेगवेगळ्या मार्गांनी पाप केल्यास कसे?

प्रेषित पेत्राला तोच प्रश्‍न पडला होता, व एखाद्या बंधूला सात वेळा क्षमा करण्याचा प्रयत्न करावा असे त्याने सुचवले. येशूने उत्तर दिले: “सात वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर साताच्या सत्तर वेळा.” पण असे का? कोणीही मानव आपल्याला देणे लागतो त्याच्या तुलनेत, आपण देवाचे किती मोठ्या प्रमाणावर देणे लागतो यावर जोर देणाऱ्‍या एका दाखल्याने येशूने खुलासा केला. (मत्त. १८:२१-३५) अनंत प्रकारांनी आपण दररोज देवाविरूद्ध पाप करतो—कधी स्वार्थी कामांनी, पुष्कळदा आपल्या बोलण्याने व विचारांनी, तसेच आपण केले पाहिजे त्यात उणे पडून. आपण केलेल्या काही गोष्टी चूक आहेत हे अज्ञानामुळे आपल्याला कळतही नाही. किंवा जीवनाच्या धावपळीत त्या गोष्टीचा आपण जरूर त्या गांभीर्याने विचार करत नाही. आपल्या पापांची फेड करण्यासाठी देव आपले जीवन मागू शकतो. (रोम. ६:२३) पण तो आपल्याशी दयाळूपणे वागत आला आहे. (स्तोत्र. १०३:१०-१४) तेव्हा, आपण एकमेकांशी तसेच वागावे अशी अपेक्षा त्याने करण्यात काहीही गैरवाजवी नाही. (मत्त. ६:१४, १५; इफिस. ४:१-३) राग न बाळगता आपण तसे करतो तेव्हा, “अपकार स्मरत नाही” अशी प्रीती आपण साध्य केली असल्याचा तो पुरावा आहे.—१ करिंथ. १३:४, ५; १ पेत्र ३:८, ९.

१०. एखाद्या बंधूच्या मनात आपल्याविरूद्ध काही असल्यास आपण काय करावे?

१० एखाद्या बंधूविषयी आपल्या मनात कठोर भावना नसली तरी, त्याच्या मनात आपल्याविरूद्ध काहीतरी असल्याचे आपल्या ध्यानात येते, असे प्रसंग येतात. तेव्हा आपण काय करावे? विनाविलंब आपण त्याच्याशी बोलले पाहिजे व शांतिपूर्ण संबंध स्थापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यात आपण पुढाकार घ्यावा असे पवित्र शास्त्र आग्रहाने सुचवते. (मत्त. ५:२३, २४) कदाचित तसे करणे सोपे नसेल. त्यासाठी प्रीतीच्या जोडीला नम्रता हवी. पवित्र शास्त्राच्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही वागाल, इतके हे गुण तुमच्यात बळकट आहेत का? साध्य करण्याचे हे एक महत्त्वाचे ध्येय आहे.

११. आपण अस्वस्थ होऊ अशा गोष्टी एखादा बंधू करत असला तर त्याबद्दल काय केले पाहिजे?

११ या उलट, असे असू शकेल की तुम्ही—व कदाचित इतरही—अस्वस्थ व्हाल अशा गोष्टी कोणी करत असेल. तेव्हा त्याच्याशी कोणीतरी बोलल्यास बरे होणार नाही का? कदाचित होईल. वैयक्‍तिकरित्या तुम्ही गोडीने त्याला समस्येचा खुलासा केलात तर, त्यामुळे चांगला परिणाम होण्याची शक्यता आहे. पण प्रथम तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे: ‘तो करत असलेल्या गोष्टी खरोखर शास्त्रवचनांशी विसंगत आहेत का? की, बऱ्‍याच प्रमाणात ही समस्या, माझी पार्श्‍वभूमी व मला मिळालेली शिकवण त्याच्यापेक्षा वेगळी असल्याने उत्पन्‍न झाली आहे?’ तसे असल्यास, स्वतःचे मानक स्थापन करून त्यानुसार दोष न लावण्याची खबरदारी घ्या. (याको. ४:११, १२) यहोवा निःपक्षपातीपणे सर्व प्रकारच्या पार्श्‍वभूमीच्या लोकांचा स्वीकार करतो आणि आध्यात्मिक दृष्ट्या त्यांची वाढ होत असताना त्यांच्या बाबतीत सहनशील असतो.

१२. (अ) मंडळीमध्ये घोर अपराध झाला असल्यास त्याची काळजी कोण घेतो? (ब) परंतु कोणत्या परिस्थितीत प्रथम कृती करण्याची जबाबदारी दुखावलेल्यावर आहे? कोणत्या ध्येयाने?

१२ परंतु, मंडळीतील कोणी घोर अपराधात गुंतल्यास, त्याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज असते. पण कोणी? बहुधा वडील वर्गाने. तरीही, त्यात बांधवांमधील व्यावसायिक बाब गोवलेली असली किंवा एखादे वेळी गैर बोलण्याने कोणाला गंभीर हानी झाली असली तर, प्रथम, दुखवला गेलेल्याने दुखवणाऱ्‍याला वैयक्‍तिकरित्या मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काहींना हे कठीण वाटेल. पण मत्तय १८:१५-१७ येथे येशूने हाच सल्ला दिला आहे. आपल्या बंधूसाठी प्रीती आणि तो आपला बंधू राहावा अशी तीव्र इच्छा यांमुळे, शक्य असल्यास, चुकणाऱ्‍याच्या मनाला भिडेल अशा तऱ्‍हेने ते करण्यास त्याला मदत होईल.—नीती. १६:२३.

१३. आपण व दुसऱ्‍या एखाद्या बंधुमध्ये समस्या उद्‌भवल्यास, त्या गोष्टीकडे योग्य दृष्टीने पाहण्यास आपल्याला कशाची मदत होईल?

१३ एखादी समस्या उद्‌भवली की, मग ती मोठी असो वा लहान, यहोवा त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे समजण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला मदत होते. कोणत्याही प्रकारचे पाप यहोवाला पसंत नाही, पण ते त्याला आपल्या सर्वांमध्ये दिसते. त्याला योग्य वाटेल तेव्हा, बुद्धिपुरस्सर पाप करण्यात निर्ढावलेल्यांना त्याच्या संस्थेतून काढून टाकले जाते. पण बाकीच्यांचे काय? आपणा सर्वांना त्याची सहनशीलता व दया प्राप्त होते. आपण गिरवावा असा कित्ता तो घालून देतो. तसे करताना आपण त्याचे प्रेम प्रतिबिंबित करतो.—इफिस. ५:१, २.

“विशाल” होण्याचे मार्ग शोधा

१४. (अ) पौलाने करिंथकरांना “विशाल” होण्यास प्रोत्साहन का दिले? (ब) याबद्दल आपण विचार करणे शहाणपणाचे असल्याचे, येथे दिलेली शास्त्रवचने कसे दर्शवतात?

१४ ग्रीसमध्ये करिंथ येथील मंडळी उभारण्यात प्रेषित पौलाने अनेक महिने खर्च केले होते. तिथल्या बंधूंना मदत करण्यासाठी त्याने अतिशय कष्ट घेतले होते. शिवाय त्याचे त्यांच्यावर प्रेम होते. पण त्यातल्या काहींना त्याच्याविषयी माया नव्हती. ते कडक टीका करत. आपुलकी व्यक्‍त करण्यात “विशाल” होण्याचा आग्रह त्याने त्यांना केला. (२ करिंथ. ६:११-१३; १२:१५) इतरांसाठी किती प्रमाणात प्रीती व्यक्‍त करतो याचा आपण सर्वांनी विचार करणे व “विशाल” होण्याचे मार्ग शोधणे शहाणपणाचे होईल.—१ योहा. ३:१४; १ करिंथ. १३:३.

१५. ज्यांच्याकडे आपण वैयक्‍तिकरित्या आकर्षित होऊ असे वाटत नाही, अशांबद्दल प्रीती वृद्धिंगत करण्यात आपल्याला कशाचे सहाय्य होऊ शकेल?

१५ ज्यांच्या निकट जाणे आपल्याला कठीण वाटते असे काही जण मंडळीत आहेत का? जसे त्यांनी आपल्या बाबतीत करावे अशी आपली इच्छा आहे, तसे त्यांच्या क्षुल्लक चुकांवर पांघरूण घालण्याचा आपण विशेष प्रयत्न केल्यास, परस्परांमधील नात्यात आपुलकी उत्पन्‍न होण्यास मदत होईल. (नीती. १७:९; १९:११) त्यांच्यातले चांगले गुण शोधून काढून आपण त्यांच्याकडेच लक्ष दिले तर, त्यांच्याविषयी आपल्या भावना सुधारू शकतात. यहोवा या बांधवांचा कोणकोणत्या मार्गांनी उपयोग करत आहे याकडे आपण खरोखर ध्यान दिले आहे का? त्यामुळे, त्यांच्याबद्दल आपल्याला वाटणारे प्रेम नक्कीच वाढेल.—लूक ६:३२, ३३, ३६.

१६. वास्तविकपणे, आपल्या मंडळीतल्या लोकांना प्रेम प्रदर्शित करण्यात आपण कसे “विशाल” होऊ शकू?

१६ आपण इतरांसाठी जे करू शकतो त्याला मर्यादा आहेत, हे मान्य. प्रत्येक सभेच्या वेळी आपण प्रत्येकाला अभिवादन करू शकणार नाही. आपण स्नेह्‍यांना जेवावयास बोलावतो तेव्हा त्यात प्रत्येकाचा समावेश करणे शक्य नसेल. ज्यांच्या बरोबर आपण अधिक वेळ घालवतो असे निकटचे सोबती आपणा सर्वांना असतात. पण आपण अधिक “विशाल” होऊ शकू का? जो आपला निकटचा मित्र नाही अशा, मंडळीतल्या कोणाबरोबर अधिक चांगली ओळख करून घेण्यासाठी दर आठवड्याला थोडासा वेळ आपण घालवू शकू का? क्षेत्रसेवेत आपल्याबरोबर काम करण्यासाठी त्यातल्या एखाद्याला आपण कधीमधी बोलावू का? आपल्याला परस्परांबद्दल खरोखर नितांत प्रीती असल्यास, ती दाखवण्याचे मार्ग आपण नक्कीच शोधून काढू.

१७. ज्यांना आपण आधी कधी भेटलेलो नाही अशा बंधूंमध्ये असताना, त्यांच्याविषयीही आपल्याला नितांत प्रीती आहे किंवा नाही हे कशामुळे दिसून येईल?

१७ ख्रिस्ती अधिवेशने आपल्या प्रीतीत “विशाल” होण्याच्या उत्तम संधी देतात. तेथे हजारो लोक उपस्थित असतील. त्या सर्वांना आपण भेटू शकत नाही. त्यांना आपण आधी कधीही भेटलो नसलो तरी, आपल्या सोयीपेक्षा त्यांच्या कल्याणाला आपण महत्त्व देत असल्याचे प्रदर्शित होईल अशा तऱ्‍हेने आपण वागू शकतो. शिवाय आपल्या सभोवतालच्यांना भेटण्यात पुढाकार घेऊन, मध्यंतरात आपण व्यक्‍तिगत आस्था दाखवू शकतो. भविष्यात, पृथ्वीवर राहणारे सर्व जण, देव-पित्याची उपासना एकतेने करणारे बंधू व भगिनी असतील. तेव्हा, अनेक व विविध गुण असलेल्या त्या सर्वांची ओळख होणे किती आनंदाचे असेल! त्यांच्याबद्दलचे नितांत प्रेम, तसे करण्याच्या इच्छेची प्रेरणा आपल्याला देईल. तर त्याची सुरूवात आताच का करू नये?

पुनरावलोकन चर्चा

• बंधू वा भगिनींमध्ये समस्या उत्पन्‍न झाल्यास, त्या कशा सोडवल्या पाहिजेत? व का?

• आपण आध्यात्मिकरित्या वाढत असताना, आपली प्रीतीही कोणत्या मार्गांनी वाढली पाहिजे?

• निकट-मित्रांच्या वर्तुळापेक्षा अधिक लोकांना नितांत प्रीती दाखवणे कसे शक्य आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]