जीवन व रक्त—यांना तुम्ही पवित्र मानता का?
अध्याय २०
जीवन व रक्त—यांना तुम्ही पवित्र मानता का?
१. (अ) जीवनाकडे देव कोणत्या दृष्टीने पाहतो? (ब) देवाने दिलेल्या जीवनाच्या भेटीची कदर करत असल्याचे आपण कसे दाखवू?
जीवनाबद्दल देवाचा दृष्टिकोन जगाच्या दृष्टिकोनाहून भिन्न आहे, या गोष्टीचे आपल्याला आश्चर्य वाटू नये. देवाला मानवी जीवन पवित्र वाटते. तुम्हीही त्याच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहता का? जो “जीवन, प्राण व सर्व काही . . . स्वतः सर्वांना देतो” अशा देवावर आपण सर्वस्वी अवलंबून आहोत. (प्रे. कृत्ये १७:२५-२८; स्तोत्र. ३६:९) देवासारखाच दृष्टिकोन असल्यास आपण आपले जीवन जतन करू. परंतु सध्याचे जीवन वाचवण्याच्या प्रयत्नात आपण ईश्वरी नियमांचे उल्लंघन करणार नाही. त्याच्या पुत्रावर खरोखरी विश्वास ठेवण्यासाठी देवाने दिलेले सार्वकालिक जीवनाचे वचन आपण बहुमोल मानू.—मत्त. १६:२५, २६; योहा. ६:४०; यहू. २१.
२. जीवनाबाबत जग कोणाची वृत्ती प्रकट करते, आणि त्यामुळे काहीवेळा कोणत्या प्रकारचा युक्तिवाद होतो?
२ या उलट, या युगाचा देव, दियाबल सैतान हा “प्रारंभापासून मनुष्यघातक होता” असे येशू म्हणाला. (योहा. ८:४४; १२:३१) त्याच्या बंडखोर मार्गाच्या अगदी सुरूवातीपासून त्याने मानव जातीवर मृत्यू आणला. या जगाच्या हिंसक इतिहासात त्याच्या वृत्तीचे प्रतिबिंब दिसते. पण सैतान वरकरणी एक वेगळे रूपही दाखवू शकतो. त्यामुळे त्याच्या विचारांचा प्रभाव पडलेले लोक म्हणतात की, धार्मिक असणे कदाचित चांगले असले तरी, जिवावर बेतले असताना पवित्र शास्त्राचा हवाला देण्याऐवजी, “विशेषज्ञ” म्हणून त्यांचा सल्ला ऐकण्याने तुमचा फायदा होईल. (पडताळा २ करिंथकरांस ११:१४, १५.) जगतो की मरतो अशा परिस्थितीला तोंड देत असल्यास, तुमचे अंतःकरण कोणीकडे झुकेल? आपल्याला अर्थातच देवाला प्रसन्न करण्याची इच्छा असली पाहिजे.
३. (अ) रक्ताबद्दल पवित्र शास्त्र जे म्हणते त्यात आपल्याला विशेष आस्था का असावी? (ब) उत्पत्ती ९:३-६ व प्रे. कृत्ये १५:२८, २९ वाचा, आणि मग या शास्त्रवचनांसोबत वर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
३ “शरीराचे जीवन रक्तात असते” असे म्हणून देवाचे वचन, जीवन आणि रक्त यांच्यातील घनिष्ट संबंध उघड करते. जसे जीवन पवित्र आहे तसे देवाने रक्तही पवित्र केले आहे. ती त्याच्या मालकीची गोष्ट असून, त्याला योग्य वाटते त्याच तऱ्हेने वापरली गेली पाहिजे. (लेवी. १७:३, ४, ११; अनु. १२:२३) तेव्हा, रक्तासंबंधी तो आपल्याकडून कशाची अपेक्षा करतो, याचा काळजीपूर्वक विचार आपण केलेला बरा.
उत्पत्ती ९:३-६ वाचा
तुमच्या परिसरातील कोणत्या रिवाजामुळे, प्राण्यांचे रक्त न खाण्यासंबंधी तुम्हाला जागरूक राहण्याची गरज आहे?
चवथ्या वचनात प्राण्यांच्या रक्ताबद्दल जे म्हटले आहे ते ध्यानात घेता, (रोमन ग्लॅडिएटर स्पर्घांच्या वेळी केले जात होते तसे) मानवी रक्त पिण्याबाबत तुमची प्रतिक्रिया कशी असेल?
पाचव्या व सहाव्या वचनात दाखवल्याप्रमाणे, मानवी रक्त सांडल्याबद्दल एखाद्यास मुख्यत्वेकरून कोणाला जाब द्यावा लागेल?
प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९ वाचा
या अटी फक्त काही मर्यादित काळ लागू असतील, असे येथे म्हटले आहे का? त्या आपल्याला लागू आहेत का?
येथे केलेल्या शब्दप्रयोगाने मानवी रक्त वगळले आहे का?
आणीबाणीच्या परिस्थितीत अपवाद केल्यास चालेल, असे हे शास्त्रवचन सुचवते का?
४. येथे चर्चा केल्याप्रमाणे, रक्तदोषामध्ये सहभागी व्हावयाचे नसल्यास, एखाद्या व्यक्तीला काय करावे लागेल असे पवित्र शास्त्र दाखवते?
४ मानवी रक्ताच्या बाबतीत, फक्त खून न करण्याने आपण निरपराध ठरतो, असा समज आपण करून घेऊ शकत नाही. शास्त्रवचने स्पष्ट करतात की, देवाच्या दृष्टीने रक्तदोषी असलेल्या एखाद्या संस्थेत आपण असल्यास, तिच्या पापात सहभागी व्हावयाचे नसेल तर, तिच्याशी असलेले आपले सर्व संबंध तोडले पाहिजेत. (प्रकटी. १८:४, २४; मीखा ४:३) या गोष्टीकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे.
५. क्षेत्रसेवेतील परिश्रमाचा, रक्तदोषापासून मुक्त असण्याशी कसा संबंध आहे?
५ येऊ घातलेल्या मोठ्या संकटाबद्दल इशारा देण्यासाठी देवाने नियुक्त केलेल्या त्याच्या सेवकांच्या बाबतीत पाहता, रक्तदोषापासून मुक्त राहण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे त्या संदेशाची घोषणा करण्याची गरज आहे. (पडताळा यहेज्केल ३:१७-२१.) त्याला सोपवलेल्या सेवेमुळे, प्रेषित पौल स्वतःला सर्व प्रकारच्या लोकांचा ऋणी समजत असे. उद्धारासाठी देवाने केलेल्या तरतुदींबद्दल लोकांना पुरी साक्ष दिल्यावरच, त्याला त्यांच्या रक्ताच्या जबाबदारीतून मोकळे झाल्यासारखे वाटले. (रोम. १:१४, १५; प्रे. कृत्ये १८:५, ६; २०:२६, २७) क्षेत्रसेवेतील तुमच्या मेहनतीत, यहोवाच्या सर्व साक्षीदारांवरच्या या जबाबदारीची तशीच जाणीव दिसून येते का?
६. अपघाताला प्रतिबंध घालण्याचा व जीवनाच्या पावित्र्याला आदर दाखवण्याचा, परस्परांशी काय संबंध?
६ आपल्याला प्राणघातक अपघातांची देखील गंभीर जाणीव असली पाहिजे. मोशेच्या नियमशास्त्रानुसार अपघाताने दुसऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत होणारे, निर्दोष समजले जात नसत. त्यासाठी दंड केला जात असे. (निर्ग. २१:२९, ३०; अनु. २२:८; गण. ३५:२२-२५) येथे गोवलेले तत्त्व मनावर घेतल्यास, ज्या प्रकारे आपण वाहन चालवतो त्यामुळे, वेड्यासारखा एखादा धोका पत्करण्याने अथवा आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती अस्तित्वात राहू देण्याने, एखाद्या प्राणघातक अपघाताला हातभार लावण्याचे टाळण्याची आपण काळजी घेऊ. या बाबतींतली तुमची वृत्ती जीवनाच्या पावित्र्याबद्दल पुरेपूर आदर व्यक्त करते का?
रक्ताच्या वैद्यकीय उपयोगाबद्दल काय म्हणता येईल?
७. (अ) एका माणसाचे रक्त दुसऱ्यामध्ये संक्रमित करण्याचा मेळ, रक्ताच्या पावित्र्याशी जमतो का? (ब) ‘रक्त वर्ज्य’ करण्याची आज्ञा पहिल्या शतकात प्रचलित असलेल्या चालीरीतींपुरती मर्यादित ठेवणे असमंजसपणाचे का आहे?
७ हा प्रघात नवीन नसला तरी, विशषतः २०व्या शतकात, जीवनाला आधार देण्याच्या उद्देशाने, संक्रमणासाठी रक्त अनेक ठिकाणी वापरले गेले आहे. संपूर्ण रक्त तसेच त्याचे प्राथमिक घटक या दोन्ही गोष्टी अशा तऱ्हेने वापरल्या जातात. अर्थात, अशा वैद्यकीय उपचारांमुळे रोगी दगावणार नाही याची खात्री देता येत नाही. वस्तुतः काही वेळा रक्ताच्या अशा उपयोगामुळेच मृत्यू घडतो. पण त्याहून अधिक चिंतेची बाब म्हणजे, आपण ‘रक्त वर्ज्य करावे’ ही पवित्र शास्त्राची अट या वैद्यकीय उपचाराला लागू होते का? होय! मानव असो की प्राणी कोणत्याही दुसऱ्या प्राण्यापासून, आपल्या शरीरात रक्त घेण्याने ईश्वरी नियमाचे उल्लंघन होते. त्याने रक्ताच्या पावित्र्याला अनादर प्रदर्शित होतो. (प्रे. कृत्ये १५:१९, २०) ‘रक्त वर्ज्य करावे’ ही आज्ञा पहिल्या शतकात प्रचलित असलेल्या प्रघातांपुरतीच लागू करण्यास व अशा रीतीने आधुनिक वैद्यकीय तंत्रांना वर्ज्य करण्यास, कोणताही आधार नाही. पुढील गोष्टीवर विचार करा: बंदुका ह्या नंतर बऱ्याच काळाने शोधून काढण्यात आल्या म्हणून बंदुकीने अवैधपणे माणसाचा जीव घेणे, खुनास मनाई करणाऱ्या पवित्र शास्त्राच्या नियमाखाली येत नाही, असा दावा कोण करील? आणि नशाबंदी फक्त पहिल्या शतकात माहीत असलेल्या पेयांनाच लागू होती व आधुनिक काळातल्या दारूला नाही, असे म्हणणे समंजसपणाचे ठरेल का? देवाला प्रसन्न करण्याची खरोखरची इच्छा असलेल्या लोकांसाठी, ‘रक्त वर्ज्य करावे’ या आज्ञेचा अर्थ उघड आहे.
८. (अ) ख्रिस्ती माणसासाठी एखादा वैद्यकीय उपचार योग्य आहे किंवा नाही हे तुम्ही कसे ठरवू शकता? (ब) तुमचे स्वतःचे रक्त काढून, साठवून, ते परत तुमच्या शरीरात घालण्याची इच्छा एखाद्या डॉक्टरला असल्यास, सुयोग्य निर्णय घेण्यात पवित्र शास्त्रातील कोणती तत्वे तुम्हाला सहाय्यभूत ठरतील? (क) शरीराबाहेरील उपकरणातून रक्ताचे अभिसरण ज्यात होते अशा उपचारांबाबत एखादी व्यक्ती कसा विचार करील?
८ असे असले तरी, काही वैद्यकीय उपचारांच्या क्लिष्टतेमुळे अनेक प्रश्न उद्भवण्याचा संभव आहे. ते कसे सोडवता येतील बरे? प्रथम, आपल्या डॉक्टरांना नियोजित उपचाराबद्दल स्पष्ट खुलासा मागा. मग, पवित्रशास्त्रातील तत्त्वांच्या अनुरोधाने प्रार्थनापूर्वक त्याचे विश्लेषण करा. जरूर पडल्यास, पुढील शस्त्रक्रियेमध्ये वापरण्यासाठी तुमचे स्वतःचे रक्त काढून साठवून ठेवावे, असे डॉक्टर सुचवतील. त्याच्याशी तुम्ही सहमत व्हाल का? लक्षात ठेवा की, मोशेमार्फत दिलेल्या देवाच्या नियमानुसार, एखाद्या प्राण्यामधून काढलेले रक्त जमिनीवर ओतून टाकावयाचे होते. (अनु. १२:२४) आज आपण त्या नियमशास्त्राच्या अधीन नाही. परंतु रक्त पवित्र आहे, हा त्यामागील संदेश असून, एखाद्या प्राण्याच्या शरीरातून ते काढल्यावर, देवाचे पदासन असलेल्या पृथ्वीवर ओतून ते त्याला परत करावयाचे असते. (पडताळा मत्तय ५:३४, ३५.) तेव्हा, रक्त साठवून (अल्प काळासाठी देखील) ते परत तुमच्या शरीरात घालणे कसे योग्य ठरेल? परंतु, शस्त्रक्रियेच्या काळात तुमचे रक्त तुमच्या शरीराबाहेरील उपकरणातून नेऊन परत शरीरात घातले जाईल, असे डॉक्टरांनी म्हटल्यास कसे? तुम्ही त्याला होकार द्याल का? त्या उपकरणात रक्तहीन द्रव भरलेले असल्यास, स्वच्छ विवेकाने त्यांना या उपचाराला परवानगी देता येईल असे काही लोकांना वाटले आहे. शरीराबाहेरील उपकरणे ही त्यांच्या रूधिराभिसरण संस्थेचा विस्तारित भाग आहेत असा त्यांचा दृष्टीकोन आहे. परिस्थिती अर्थातच वेगवेगळी असते, आणि निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. पण तुमच्या निर्णयाने देवासन्मुख तुमचा विवेक शुद्ध राखला पाहिजे.—१ पेत्र ३:१६; १ तीम. १:१९.
९. (अ) ‘रक्त वर्ज्य’ करण्याच्या तुमच्या निर्णयाचा आदर होण्याची खात्री करण्यासाठी, कोणत्या खबरदाऱ्या घेतल्याच पाहिजेत? (ब) आणीबाणीच्या वेळीही, अप्रिय वादविवाद कधी कधी कसा टाळता येईल? (क) एखाद्या डॉक्टरने वा कोर्टाने रक्त संक्रमणाची बळजबरी केल्यास, तुम्ही काय कराल?
९ ‘रक्त वर्ज्य’ करण्याच्या तुमच्या निर्णयाचा डॉक्टरांनी आदर करावा याची खात्री करण्यासाठी, वैद्यकीय दृष्ट्या आणीबाणीची स्थिती येण्यापूर्वी त्यांच्याशी बोला, उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची गरज पडल्यास, रक्त न वापरण्याची लेखी विनंती करण्याची सावधगिरी घ्या. तसेच, केस हाताळणाऱ्या डॉक्टरशी त्याविषयी वैयक्तिकरित्या बोला. परंतु आकस्मिकपणे आणीबाणीची स्थिती आल्यास कसे? तुमच्या ख्रिस्ती विवेकाचा आदर राखून, मदत करण्याचे त्यांचे कौशल्य वापरण्यासाठी आग्रहाची विनंती करत, डॉक्टरांशी समंजसपणाने चर्चा केल्याने अनेकदा नकोसे वादविवाद टाळता येतात. (नीती. १५:१; १६:२१, २३) तरीही कदाचित, रक्त नाकारल्याने आपल्या जिवाला धोका होईल असा आग्रह धरून, नमते घेण्यासाठी सद्हेतुक वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्यास, मग काय? यहोवाच्या मार्गांच्या औचित्यावरील विश्वासाने आपल्याला खंबीर केले पाहिजे. मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानणे पसंत करत असल्याने, आपण यहोवावरील निष्ठेमुळे दृढ निश्चयाने प्रतिकार केला पाहिजे.—प्रे. कृत्ये ५:२९; पडताळा ईयोब २:४ नीतीसूत्रे २७:११.
ही गोष्ट किती गंभीर आहे?
१०. जीव वाचवण्यासाठी संक्रमणाची आवश्यकता असल्याच्या दाव्याने, या बाबतीतला आपला दृष्टीकोन का बदलणार नाही?
१० यहोवाला अद्याप न जाणणाऱ्या लोकांना, रक्त संक्रमणाच्या बाजूने मांडलेले मुद्दे जीवनाच्या पावित्र्याला मोठा आदर दाखवतात असे काही वेळा वाटेल. पण, अशा रीतीने वादविवाद करणारे अनेकजण गर्भपाताने होणाऱ्या जीवांच्या नाशाकडे कानाडोळा करतात, ही गोष्ट आपल्याला माहीत आहे. कोणाही वैद्यकीय “विशेषज्ञा”पेक्षा यहोवाला जीवन आणि रक्ताबद्दल अधिक माहिती आहे. त्याच्या सर्व आज्ञा आपल्या हिताच्या, आपले सध्याचे जीवन आणि भविष्याच्या आशेचे संरक्षण करणाऱ्या असल्याचे सिद्ध झाले आहे. (यश. ४८:१७; १ तीम. ४:८) रक्त वर्ज्य करण्याची आज्ञा काही वेगळी आहे का?
११. (अ) यहोवाने इस्राएल लोकांना रक्ताचा कोणता एकमेव उपयोग करण्याची परवानगी दिली? (ब) ख्रिस्ती आहोत म्हणून, या गोष्टीचे महत्त्व आपल्याला का आहे?
११ यहोवाने सांगितलेल्या रक्ताच्या एकमेव उपयोगाने, रक्ताच्या पावित्र्याला आदर दाखवण्याच्या गांभीर्यावर जोर दिला आहे. “शरीराचे जीवन तर रक्तात असते, आणि तुमच्या जीवांबद्दल वेदीवर प्रायःश्चित करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे; कारण रक्तात जीव असल्याकारणाने रक्तानेच प्रायश्चित होते. म्हणून मी इस्राएल लोकांना म्हटले आहे की, तुमच्यातील कोणी रक्त सेवन करू नये”. (लेवी. १७:११, १२) या अटीला अनुसरून यहोवाच्या वेदीपाशी ओतले गेलेले सर्व रक्त, येशूच्या बहुमोल रक्ताचे प्रतीक होते. (इब्री. ९:११, १२; १ पेत्र १:१८, १९) अशा रीतीने, रक्ताचा इतर कोणताही उपयोग करण्यास मनाई करणाऱ्या देवाच्या नियमाने येशूच्या रक्ताच्या पावित्र्यावर जोर दिला जातो. यावरून असे दिसून येते की, रक्ताचा कोणताही गैरवापर, यहोवाने त्याच्या पुत्रामार्फत केलेल्या तारणाच्या तरतुदीला अक्षम्य अनादर प्रदर्शित करतो.
१२. मृत्यूला तोंड द्यावे लागल्यास, जिवंत राहण्याच्या प्रयत्नात खरा ख्रिश्वन, रक्ताचा कोणता गैरवापर का करणार नाही?
१२ जगतो की मरतो अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागले असताना, देवाकडे पाठ फिरवणे किती अदूरदर्शीपणाचे ठरेल! सद्सद्विवेकाशी प्रामाणिक असणाऱ्या डॉक्टरांच्या सेवेची आपल्याला कदर असली तरी, जणू हेच जीवन सर्वकाही आहे असे समजून, देवाचा नियम तोडून, स्वतःला वा आपल्या प्रियजनांना थोडे अधिक दिवस किंवा वर्षे जगवण्याचा आटोकाट प्रयत्न आपण करत नाही. येशूच्या सांडलेल्या रक्ताच्या मूल्यावर आणि त्यामुळे शक्य झालेल्या सार्वकालिक जीवनावर आपला विश्वास आहे. देवाच्या विश्वासू सेवकांना—अगदी मरण पावलेल्यांनाही—सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ दिले जाईल, यावर आपला मनःपूर्वक विश्वास आहे.—योहा. ११:२५; १ तीम. ४:१०.
पुनरावलोकन चर्चा
• जीवन व रक्त कशामुळे पवित्र होते? जग वेगळ्या दृष्टीकोनाचे समर्थन का करते?
• प्राण्यांच्या बाबतीत, त्यांच्या रक्ताच्या पावित्र्याला आपण कसा आदर दाखवतो?
• मानवी जीवन पवित्र असल्याचे आपण मानतो, ही गोष्ट आपण सर्वांनी कोणत्या वेगवेगळ्या रीतीने दाखवली पाहिजे? तसे करणे किती महत्त्वाचे आहे?
[अभ्यासाचे प्रश्न]