व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ज्याच्याविषयी सर्व संदेष्ट्यांनी साक्ष दिली तो

ज्याच्याविषयी सर्व संदेष्ट्यांनी साक्ष दिली तो

अध्याय ४

ज्याच्याविषयी सर्व संदेष्ट्यांनी साक्ष दिली तो

१. येशूच्या मानव-जन्मापूर्वीच्या अस्तित्वाबद्दलची वस्तुस्थिती, यहोवाशी असलेल्या त्याच्या संबंधाबाबत काय दाखवते?

 यहोवाशी असलेल्या त्याच्या स्वत:च्या प्रेमळ नात्याचे वर्णन करताना येशू म्हणाला: “पिता पुत्रावर प्रीती करितो आणि स्वत: जे काही करितो ते सर्व त्याला दाखवितो.” (योहान ५:१९, २०) त्या नात्यातल्या जवळीकीची सुरवात, त्याच्या मानवी जन्माच्या अगणित वर्षांपूर्वी झाली. तो देवाचा एकुलता पुत्र, स्वत: यहोवाने घडलेला एकुलता एक होता. स्वर्ग व पृथ्वीवरील इतर सर्व गोष्टी, त्या प्रियतम ज्येष्ठ पुत्राकडून निर्मिल्या गेल्या. ज्याच्यामार्फत देवाची इच्छा इतरांना कळवली जात होती, असा देवाचा शब्द वा प्रवक्‍ता म्हणूनही त्याने काम केले. हाच देवाचा विशेष आवडता पुत्र, येशू ख्रिस्त नावाचा माणूस झाला.—कलस्सै. १:१५, १६; योहान १:१४; १२:४९, ५०.

२. पवित्र शास्त्रातील भविष्यवाद येशूचा उल्लेख किती प्रमाणात करतात?

एक मानव म्हणून त्याचा अद्‌भुतरित्या जन्म होण्यापूर्वी, त्याच्याविषयी अनेक प्रेरित भविष्यवादांची नोंद करण्यात आली होती. प्रेषित पेत्राने कर्नेल्याला निक्षून सांगितल्याप्रमाणे: ‘सर्व संदेष्टे त्याच्याविषयी साक्ष देतात.’ (प्रे. कृत्ये १०:४३) शुद्ध भक्‍तीच्या संदर्भात पवित्र शास्त्रामध्ये येशूच्या भूमिकेला इतके महत्त्व दिलेले आहे की, एका देवदूताने प्रेषित योहानाला सांगितले: “नमन देवाला कर; कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे.” (प्रकटी. १९:१०) ते भविष्यवाद स्पष्टपणे त्याची ओळख पटवतात आणि त्याच्याविषयी देवाच्या उद्देशातल्या, आज आपल्याला अतिशय आस्था असलेल्या पैलूंकडे लक्ष वेधतात.

त्या भविष्यवादांनी प्रकट केलेल्या गोष्टी

३. (अ) उत्पत्ती ३:१४, १५मधील भविष्यवादात “सर्प”, “स्त्री” आणि ‘सर्पाची संतती’ हे कोणाचे प्रतिनिधित्व करतात? (ब) ‘सर्पाचे डोके फोडले’ जाण्यात यहोवाच्या सेवकांना मोठी आस्था का असावी?

अशा भविष्यवादांमधला पहिला, एदेन बागेतल्या बंडाळीनंतर उच्चारला गेला. सर्पाला उद्देशून यहोवाने दिलेल्या शिक्षेमध्ये तो सामावलेला होता. यहोवा म्हणाला: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडिशील.” (उत्प. ३:१४, १५) त्याचा अर्थ काय? देवाच्या दृष्टीने यथाकाळी इतर भविष्यवादांनी त्याचा खुलासा व विस्तार केला. परिणामी, ती ज्याला उद्देशून केली तो, सर्पाने प्रतिनिधित्व केलेला, दियाबल सैतान आहे हे आपल्याला कळते. “स्त्री” ही यहोवाची स्वत:ची एकनिष्ठ स्वर्गीय संस्था होय. ती त्याला निष्ठावंत पत्नीप्रमाणे आहे. ‘सर्पाच्या संतति’मध्ये, सैतानाची वृत्ती प्रदर्शित करणाऱ्‍या, देवदूत व मानव अशा दोघांचा समावेश आहे. ते यहोवा आणि त्याच्या लोकांना विरोध करतात. एदेन बागेत दियाबलाने सर्पाचा ज्या रीतीने उपयोग केला तो लक्षात घेता, ‘सर्पाचे डोके फोडण्या’चा संबंध, ज्याने यहोवाची निंदा केली व मानवजातीवर अनंत दु:खे आणली, त्या देवाच्या बंडखोर पुत्राच्या यथावकाश नाशाशी आहे. परंतु फोडण्याचे काम करणाऱ्‍या “संतति”ची ओळख, दीर्घ काळापर्यंत एक रहस्य राहिली.—रोम. १६:२५, २६.

४. वचनदत्त संतान तो येशूच होय, अशी ओळख करून देण्यात येशूच्या पूर्वजांच्या वंशावळीची कशी मदत झाली?

मानवी इतिहासाच्या सुमारे २,००० वर्षांनंतर यहोवाने अधिक तपशील पुरवला. अब्राहामाच्या वंशजांमध्ये ती संतती उत्पन्‍न होईल असे त्याने सूचित केले. (उत्प. २२:१५-१८) परंतु संततिची ती वंशावळ फक्‍त दैहिक कुळावरच अवलंबून राहणार नसून देवाच्या निवडीवर अवलंबून राहील. हागार दासीपासून जन्मलेल्या, इश्‍माएल या आपल्या पुत्रावर अब्राहामाचे प्रेम असले तरी, यहोवाने स्पष्ट सांगितले: “तुला सारेच्या पोटी इसहाक होईल; त्याच्याशीच मी आपला करार करीन.” (उत्प. १७:१८-२१; २१:८-१२) पुढे इसहाकाच्या ज्येष्ठ पुत्राशी, एसावाशी नव्हे, तर इस्राएलाचे १२ वंश ज्याच्यापासून उत्पन्‍न झाले त्या याकोबाशी, त्या कराराची पुष्टी करण्यात आली. (उत्प. २८:१०-१४) कालांतराने, ती संतती यहूदाच्या वंशात, दावीदाच्या घराण्यात जन्म घेईल असे सूचित करण्यात आले.—उत्प. ४९:१०; १ इति. १७:३, ४, ११-१४.

५. भूतलावरल्या येशूच्या सेवेच्या सुरुवातीलाच तो मसीहा असल्याचे आणखी कशाने उघड झाले?

त्या संततिच्या मानवी जन्माची जागा म्हणून, ७००हून अधिक वर्षे आधीच, पवित्र शास्त्राने बेथलेहेमचा उल्लेख केला. शिवाय असेही स्पष्ट केले की, तो आधीच, स्वर्गात त्याला निर्माण केल्यापासून, “अनादि काळापासून,” अस्तित्वात होता. (मीखा ५:२) दानीएल संदेष्ट्यामार्फत, यहोवाचा अभिषिक्‍त, मसीहा म्हणून, पृथ्वीवर आगमन करण्याच्या त्याच्या वेळेची भविष्यवाणी करण्यात आली होती. (दानी. ९:२४-२६) आणि पवित्र आत्म्याने त्याचा अभिषेक झाला तेव्हा आकाशातल्या वाणीने त्याची ओळख दिली. (मत्त. ३:१६, १७) त्यामुळे येशूचा अनुयायी बनल्यावर फिलिप्प खात्रीपूर्वक म्हणू शकला: “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्ट्यांनी लिहिले तो म्हणजे योसेफाचा [दत्तक] मुलगा येशू नासरेथकर आम्हाला सापडला आहे.”—योहान १:४५.

६. (अ) येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यांना काय समजून आले? (ब) ‘स्त्रीचे संतान’ मुख्यत्वे कोण आहे व त्याने सर्पाचे डोके फोडण्याचा अर्थ काय?

त्यानंतर येशूच्या अनुयायांना समजून आले की, प्रेरित शास्त्रलेखांमध्ये त्याच्यासंबंधी भविष्यवादांचे खरोखर अनेक उल्लेख गुंफलेले आहेत. त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानानंतर, त्याने स्वत: “संपूर्ण शास्त्रातील आपणाविषयींच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला.” (लूक २४:२७) सैतानाचे अस्तित्त्व कायमचे नाहीसे होईल अशा रीतीने “सर्पा”चे डोके फोडणारी ‘स्त्रीची संतति’ मुख्यत्त्वे येशूच आहे, हे आता उघड आहे. देवाने मानवजातीला दिलेली सर्व अभिवचने, आपण ज्यांची उत्कटतेने इच्छा करतो अशा सर्व गोष्टी, येशूच्या योगे पूर्णतेला नेण्यात येतील.—२ करिंथ. १:२०.

७. या भविष्यवाण्यांमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या व्यक्‍तीची ओळख पटवण्याशिवाय आणखी कशाचा विचार करणे हितावह आहे?

यातले काही भविष्यवाद प्रथम वाचले तेव्हा, कदाचित त्या एथिओपियन (कुशी) षंढाप्रमाणे तुम्ही विचारले असेल: “संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो?” पण उत्तर मिळाल्यावर त्या षंढाने गोष्ट तेथेच सोडली नाही. फिलिप्पाने केलेला खुलासा लक्षपूर्वक ऐकल्यावर, येशूने भविष्यवादांची पूर्ती ज्या रीतीने केली त्याला कदर दाखवण्यासाठी, बाप्तिस्मा घेण्याची कृती करण्याची जरूरी असल्याचे त्याच्या ध्यानात आले. (प्रे. कृत्ये ८:३२-३८; यशया ५३:३-९) अशाच तऱ्‍हेने आपणही प्रतिसाद देतो का? काही वेळा भविष्यवाणी सादर करण्याच्या शैलीचा आपल्यावर खोलवर परिणाम होतो. किंवा भविष्यवादाची पूर्तता दाखवताना पवित्र शास्त्रातच काढण्यात आलेले अनुमान हृदयस्पर्शी ठरू शकते.

८. येथे येशूविषयी चार भविष्यसूचक नमुन्यांचा विचार करण्यात आला आहे. आपल्यावर या भविष्यवादांचा कसा परिणाम होतो हे दाखवण्यासाठी, दिलेल्या प्रश्‍नांवर व शास्त्रवचनांवर युक्‍तिवाद करा. एकावेळी फक्‍त एकाचा विचार करा.

येशू ख्रिस्ताबद्दल खालील भविष्यसूचक अभिवचनांच्या व नमून्यांच्या बाबतीमध्ये हे कसे दिसून येते ते पहा. सोबत दिलेल्या शास्त्रवचनांच्या मदतीने तुम्ही प्रश्‍नांची उत्तरे द्यायची आहेत.

 (१) इसहाकाचा बळी देण्याच्या अब्राहामाने केलेल्या प्रयत्नाच्या अहवालाने, आपल्या पुत्रामार्फत खंडणी देण्यासाठी यहोवाने केलेल्या कृतीची कदर करण्यास, आपल्याला कशी मदत होते? (योहान ३:१६; उत्प. २२:१-१८ [वचन २मध्ये इसहाकाचे वर्णन कसे केले आहे याकडे लक्ष द्या.])

 त्यामुळे आपल्याला कशाचा विश्‍वास वाटावा? (रोम. ८:३२, ३८, ३९)

पण आपण काय करण्याची गरज आहे? (उत्प. २२:१८; योहान ३:३६)

 (२) मोशेसारखा संदेष्टा म्हणून येशूची ओळख करून देताना, पवित्र शास्त्र आपल्याला कोणत्या गंभीर जबाबदारीची आठवण करून देते? (प्रे. कृत्ये ३:२२, २३; अनु. १८:१५-१९)

 येशूने आपल्याला सांगितलेल्या गोष्टींपैकी काही कोणत्या आणि आता त्या समयोचित का आहेत? (मत्त. २८:१८-२०; १९:४-९; १८:३-६)

 (३) अहरोनाचे याजकपण कशाचे पूर्वचिन्ह होते याचा खुलासा करताना, मुख्य याजक या नात्याने येशूच्या कोणत्या आकर्षक गुणांकडे पवित्र शास्त्र लक्ष वेधते? (इब्री. ४:१५–५:३; ७:२६-२८)

 तेव्हा, आपल्या कमकुवतपणावर मात करण्यात मदतीकरता, प्रार्थनेने ख्रिस्तामार्फत देवाकडे वळण्याबद्दल आपल्याला कसे वाटावे?

 (४) येशूच्या बलिदानाची महत्ता लक्षात घेता, (त्याने मोशेच्या नियमशास्त्रानुसार दिल्या जाणाऱ्‍या सर्व होमबलींची जागा घेतली) देव ज्यामुळे नाखुष होईल हे आपल्याला ठाऊक आहे अशा, कोणत्याही गोष्टीची सवय लागू न देण्याबाबत आपण अतिशय दक्ष का असावे? (इब्री. १०:२६, २७)

 येशूच्या बलिदानामुळे शक्य झालेल्या जीवनाच्या आशेची आपल्याला खरोखर कदर असल्यास, कोणत्या गोष्टी करण्यास आपण परिश्रम घेऊ? (इब्री. १०:१९-२५)

ख्रिस्तावरचा विश्‍वास आपण कसा दाखवू शकू?

९. येशू व्यतिरिक्‍त आपल्याला तारण का नाही?

येशूमध्ये भविष्यवादाची पूर्तता कशी झाली होती याकडे यरुशलेममधल्या यहूदी उच्च न्यायालयाचे लक्ष वेधल्यावर प्रेषित पेत्राने ठामपणे समारोप केलाः “तारण दुसऱ्‍या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.” (प्रे. कृत्ये ४:११, १२; स्तोत्र. ११८:२२) आदामाचे सर्व वंशज पापी आहेत, म्हणून पापाच्या दंडापायी त्यांचा मृत्यू होतो व कोणासाठी खंडणी म्हणून लागू करता येण्यासारखे त्यांचे मोल नाही. परंतु येशू पूर्णावस्थेत होता आणि त्याच्या मृत्यूला बलिदानाचे मोल आहे. (स्तोत्र. ४९:६-९; इब्री. २:९) आदामाने त्याच्या वंशजांकरता जे काही गमावले, त्याच्या तंतोतंत मोलाची खंडणी त्याने देवाला अर्पण केली. त्याचा आपल्याला काय फायदा झाला आहे?—१ तीम. २:५, ६.

१०. येशूच्या बलिदानाने आपल्याला झालेल्या मोठ्या फायद्यातल्या एकाचा खुलासा करा.

१० त्यामुळे आपल्याला, मोशेच्या नियमशास्त्रानुसार प्राण्यांच्या बळींनी इस्राएलांसाठी कोणत्याही वेळी जे काही साध्य केले त्यापेक्षा कितीतरी अधिक, म्हणजे पापांच्या क्षमेमुळे शुद्ध विवेक बाळगणे शक्य झाले आहे. (प्रे. कृत्ये १३:३८, ३९; इब्री. ९:१३, १४) त्यासाठी अर्थातच स्वत:शी प्रामाणिक असण्याची व येशूवर आपला खरा विश्‍वास असण्याची गरज आहे. ख्रिस्ताच्या बलिदानाची आपल्याला किती गरज आहे, याची आपल्याला व्यक्‍तिश: कदर आहे का? “‘आपल्याठायी पाप नाही’, असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वत:ला फसवितो, व आपल्याठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्‍वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.”—१ योहान १:८, ९.

११. देवाबाबत शुद्ध विवेक प्राप्त करण्यामध्ये, पाण्याने बाप्तिस्मा घेणे हा एक महत्त्वाचा घटक का आहे?

११ तरीही, आपण पापी आहोत हे त्यांना ठाऊक आहे, असे म्हणणारे व येशूवर विश्‍वास असल्याचा दावा करणारे आणि येशूप्रमाणे देवाच्या राज्याबद्दल थोड्याफार प्रमाणात इतरांना सांगणारे काही लोक, येशूवर संपूर्ण विश्‍वास ठेवत नाहीत. ते कसे? पवित्र शास्त्रात दाखवल्याप्रमाणे, पहिल्या शतकातले लोक खरोखर विश्‍वासू झाले तेव्हा, ती गोष्ट त्यांनी जाहीरपणे कशी सिद्ध केली? त्यांनी बाप्तिस्मा घेतला. का बरे? कारण शिष्यांचा बाप्तिस्मा व्हावा अशी आज्ञा येशूने दिली होती. (मत्त. २८:१९, २०; प्रे. कृत्ये ८:१२; १८:८) येशू ख्रिस्तामार्फत यहोवाने केलेल्या प्रेमळ तरतुदींनी एखाद्याचे मन प्रभावित झाल्यावर तो पाय मागे घेणार नाही. तो त्याच्या जीवनात जरूर ते बदल करील, देवाला स्वत:चे समर्पण करील व त्याचे प्रतीक म्हणून पाण्यात बाप्तिस्मा घेईल. पवित्र शास्त्रात दाखवल्याप्रमाणे, अशा रीतीने विश्‍वासाचे प्रदर्शन करून तो ‘शुद्ध विवेकासाठी देवाला विनंती’ करतो.—१ पेत्र ३:२१, न्यू.व.

१२. आपण एखादे पाप केले असल्याचे ध्यानात आल्यास, त्याबद्दल आपण काय करावे व का?

१२ त्यानंतरही, पापी स्वभाव नक्कीच डोके वर काढील. तेव्हा कसे? प्रेषित योहान म्हणाला: “तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो.” तेव्हा, कामात, बोलण्यात वा वृत्तीमध्ये व्यक्‍त होणारे पाप आपण क्षुल्लक मानू नये. “जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्‍न असा जो येशू ख्रिस्त, तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.” (१ योहान २:१, २) आपण काहीही केले तरी ‘आमच्या पापांची क्षमा कर’, अशी प्रार्थना देवाला केल्यास सर्व ठीक होईल, असा याचा अर्थ आहे का? नाही. खरा पश्‍चात्ताप ही क्षमेची गुरुकिल्ली आहे. तसेच ख्रिश्‍चन मंडळीतल्या वडिलांच्या मदतीची गरजही असेल. केलेल्या गोष्टीतली चूक आपल्या ध्यानात आली पाहिजे व त्यासाठी मन:पूर्वक पश्‍चात्ताप वाटला पाहिजे. म्हणजे त्या चुकीची पुनरावृत्ती टाळण्याचा आपण कसून प्रयत्न करू. (प्रे. कृत्ये ३:१९; याकोब ५:१३-१६) या गोष्टी केल्यास आपल्याला येशूच्या मदतीची हमी मिळू शकेल. त्याच्या बलिदानात पापाची भरपाई करण्याचे मोल असल्याच्या आपल्या विश्‍वासाच्या आधारावर, यहोवाची मर्जी पुन्हा प्राप्त होणे शक्य आहे. आणि आपली भक्‍ती त्याला मान्य होण्यासाठी ही गोष्ट अत्यंत अगत्याची आहे.

१३. (अ) आपल्याला येशूच्या बलिदानाच्या, आणखी एका मार्गाने झालेल्या फायद्याचा खुलासा करा. (ब) आपण करत असलेल्या देवाच्या सेवेने आपल्याला हे दान का कमावता येत नाही? (क) परंतु खरोखर विश्‍वास असल्यास, आपण काय करत असू?

१३ येशूच्या बलिदानाने आपल्याकरता सार्वकालिक जीवनाची संधी—“लहान कळपा”साठी स्वर्गात व इतर लक्षावधी लोकांसाठी नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर—खुली झाली आहे. (लूक १२:३२; प्रकटी. २०:११, १२; २१:३, ४) हे दान आपण कमावत नाही. आपण यहोवाची कितीही सेवा केली तरी, देवाने आपल्याला जीवन देणे भाग पडेल इतका चांगुलपणा आपण कधीही प्राप्त करू शकणार नाही. सार्वकालिक जीवन हे ‘आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाचे कृपादान’ आहे. (रोम. ६:२३; इफिस. २:८-१०) तरीही त्या कृपादानावर आपला विश्‍वास असेल आणि ज्या रीतीने ते देण्यात आले त्याची कदर असेल तर, ते आपण प्रकट करू. त्याची इच्छा साध्य करण्यात यहोवाने येशूचा किती अद्‌भुत रीतीने उपयोग केला आहे आणि आपण येशूच्या पावलावर पाऊल ठेवणे किती अगत्याचे आहे, याची जाणीव ठेवून, ख्रिश्‍चन सेवेला आपल्या जीवनात एक सर्वात महत्त्वाचे स्थान देऊ. देवाच्या या उत्कृष्ट दानाबद्दल आपण इतरांना ज्या खात्रीने सांगू, त्यातून आपला विश्‍वास प्रकट होईल.—पडताळा प्रे. कृत्ये २०:२४.

१४. येशू ख्रिस्तावरील अशा विश्‍वासाने एकता होण्याचा परिणाम कसा होतो?

१४ अशा विश्‍वासाने एकतेचा किती उत्तम परिणाम होतो! त्यामुळे आपण यहोवाकडे, त्याच्या पुत्राकडे आणि ख्रिश्‍चन मंडळीमध्ये परस्परांकडे आकर्षित होतो. (१ योहान ३:२३, २४) यहोवाने ममतेने त्याच्या पुत्राला देवाचे नाव सोडून इतर “सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ नाव ते . . . दिले. ह्‍यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देव पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.” या गोष्टीचा आपल्याला आनंद होतो.—फिलिप्पै. २:९-११.

पुनरावलोकन चर्चा

• मसीहा प्रकट झाला तेव्हा देवाच्या वचनावर खरोखर विश्‍वास असणाऱ्‍यांना त्याची ओळख स्पष्ट का होती?

• पृष्ठ ३४वर, येशूमध्ये पूर्ण झालेले भविष्यसूचक नमूने दाखवले आहेत. त्यांचा आपल्यावर कसा परिणाम व्हावा?

• येशूच्या बलिदानाचा कोणकोणत्या मार्गाने आपल्याला फायदा झालेला आहे? त्यासाठी वाटणारी कदर आपण कशी दाखवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[३४ पानांवरील चौकट/चित्रं]

येशूबद्दल भविष्यसूचक नमूनेत्यांचा आपल्यावर कसा परिणाम व्हावा?

इसहाकाचा बळी देताना, अब्राहाम

देवाच्या प्रवक्त्याच्या भूमिकेतला मोशे

मुख्य याजकाच्या भूमिकेत अहरोन

प्राण्यांचे होमबली