व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या बाप्तिस्म्याचा अर्थ

तुमच्या बाप्तिस्म्याचा अर्थ

अध्याय १२

तुमच्या बाप्तिस्म्याचा अर्थ

१, २. (अ) पाण्यातील बाप्तिस्म्यामध्ये आपल्यातील प्रत्येकाला आस्था का असावी? (ब) परिच्छेद २ मध्ये दिलेल्या प्रश्‍नांची तुम्ही थोडक्यात उत्तरे कशी द्याल?

 इ.स. २९ मध्ये, यार्देन नदीत बुडवून, येशूचा बाप्तिस्मा झाला. स्वतः यहोवा ते पाहात होता व त्याने त्याबद्दल समाधान व्यक्‍त केले. (मत्त. ३:१६, १७) साडेतीन वर्षांनी, त्याच्या पुनरूत्थानानंतर, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा. त्यांस . . . बाप्तिस्मा द्या,” असे म्हणत येशूने त्याच्या शिष्यांना सूचना दिल्या. (मत्त. २८:१८, १९) तेथे येशूने सांगितल्याप्रमाणे तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे का? की तुम्ही त्याची तयारी करत आहात?

दोहोंपैकी कोणतेही खरे असले तरी बाप्तिस्म्याबद्दल स्पष्ट समज असणे महत्त्वाचे आहे. पुढे दिल्याप्रमाणे काही प्रश्‍न, विचार करण्यासारखे आहेत: आज ख्रिश्‍चनांचा होणारा बाप्तिस्मा आणि येशूचा बाप्तिस्मा यांचा अर्थ एकच आहे का? पवित्र शास्त्रात बाप्तिस्म्याबद्दल सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला लागू होतात का? ख्रिस्ती बाप्तिस्मा सूचित करत असलेल्या गोष्टींना अनुसरून जगण्यात काय गोवलेले आहे?

योहानाने केलेले बाप्तिस्मे

३. योहानाचा बाप्तिस्मा कोणापर्यंत मर्यादित होता?

येशूच्या बाप्तिस्म्याच्या साधारण सहा महिने आधी, “पश्‍चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे” अशी घोषणा करत, बाप्तिस्मा करणारा योहान यहूदाच्या अरण्यात गेला. (मत्त. ३:१, २) त्या सर्व प्रदेशातल्या लोकांनी योहानाचे बोलणे ऐकले, त्यांच्या पापांची उघड कबुली दिली व त्याच्याकडून यार्देनमध्ये बाप्तिस्मा घेतला. तो बाप्तिस्मा यहुद्यांकरता होता.—प्रे. कृत्ये १३:२३, २४; लूक १:१३-१६.

४. (अ) यहूद्यांना पश्‍चात्तापाची निकडीची गरज का होती? (ब) “अग्नीने बाप्तिस्मा” होणे टाळावयाचे असल्यास, त्यांना कशाची गरज होती?

त्या यहूद्यांना तातडीने पश्‍चात्तापाची गरज होती. इ.स.पू. १५१३ मध्ये सिनाय पर्वतापाशी त्यांच्या पूर्वजांनी यहोवा देवाशी एक राष्ट्रीय करार केला होता. पण त्या करारातील त्यांच्या जबाबदाऱ्‍यांना ते जागले नव्हते. आणि त्यामुळे त्या कराराने, पापी म्हणून त्यांना दोषी ठरवले. त्यांची स्थिती बिकट होती. मलाखीने पूर्वसूचना दिलेला “यहोवाचा मोठा व भयंकर दिवस” जवळ होता व इ.स. ७० मध्ये त्वरित नाशाच्या रूपात तो यरूशलेमवर गुदरला. त्या नाशापूर्वी, “प्रभूसाठी [यहोवा, न्यू.व.] सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून,” एलियासारखी खऱ्‍या उपासनेची कळकळ असलेल्या, बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाला पाठवले गेले. नियमशास्त्राविरूद्ध त्यांनी केलेल्या पापांसाठी पश्‍चात्ताप करण्याची व यहोवा त्यांच्याकडे ज्याला पाठवत होता, त्या देवाच्या पुत्राला स्वीकारण्यासाठी हृदय व मनाची तयारी करण्याची त्यांना आवश्‍यकता होती. (मला. ४:४-६; लूक १:१७; प्रे. कृत्ये १९:४) योहानाने खुलासा केल्याप्रमाणे देवाचा पुत्र पवित्र आत्म्याने (हा बाप्तिस्मा इ.स. ३३च्या पेन्टेकॉस्टला विश्‍वासू शिष्यांनी प्रथम अनुभवला) व अग्नीने बाप्तिस्मा करणार होता (इ.स. ७० मध्ये नाशाच्या रूपात हा पश्‍चात्ताप न करणाऱ्‍यांवर आला). (लूक ३:१६) वैयक्‍तिकरित्या ‘अग्नीच्या बाप्तिस्म्या’चा अनुभव टाळण्यासाठी पहिल्या शतकातल्या त्या यहूद्यांना पश्‍चात्तापाचे प्रतीक म्हणून पाण्यात बाप्तिस्मा घेण्याची गरज होती व तशी संधी खुली होईल तेव्हा येशू ख्रिस्ताचे शिष्य बनणे आवश्‍यक होते.

५. (अ) बाप्तिस्मा घेण्यासाठी येशू आला तेव्हा योहानाने त्याला आक्षेप का घेतला? (ब) येशूचा पाण्यातला बाप्तिस्मा कशाचे प्रतीक होता? (क) त्याच्याविषयी देवाची इच्छा पूर्ण करण्याबाबत येशू किती गंभीर होता?

बाप्तिस्मा करून घेण्यासाठी योहानाकडे येणाऱ्‍यांमध्ये खुद्द येशू होता. पण का? येशूमध्ये कबुली देण्याजोगे पापच नव्हते, हे योहानाला माहीत होते. आणि त्यामुळेच तो म्हणाला: “आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा असे असता आपण माझ्याकडे येता हे काय?” परंतु येशूचा बाप्तिस्मा हे इतर कशाचे तरी प्रतीक होते. त्यामुळे त्याने प्रत्युत्तर केले: “आता हे होऊ दे. कारण ह्‍या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे.” (मत्त. ३:१३-१५) येशूचा बाप्तिस्मा पश्‍चात्तापाचे प्रतीक असणे शक्य नव्हते किंवा स्वतःचे देवाला समर्पण करण्याचीही त्याला गरज नव्हती कारण आधीच यहोवाला समर्पित राष्ट्राचा तो एक सभासद होता. तर ३० व्या वर्षी यहूदी रिवाजानुसार प्रौढत्व प्राप्त झाल्यावर त्याचा बाप्तिस्मा, त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने स्वतःला त्याच्या स्वर्गीय पित्याला सादर केले, याचे प्रतीक होता. ‘ख्रिस्त येशू या मनुष्या’साठी असलेल्या देवाच्या इच्छेमध्ये देवाच्या राज्यासंबंधाने कार्य तसेच खंडणी आणि नव्या कराराचा आधार म्हणून त्याच्या पूर्ण मानवी जीवनाचे बलिदान या गोष्टींचा अंतर्भाव होता. (लूक ८:१; १७:२०, २१; इब्री. १०:५-१०; मत्त. २०:२८; २६:२८; १ तीम. २:५, ६) त्याचा पाण्यातला बाप्तिस्मा ज्या गोष्टींचे प्रतीक होता, त्या येशूने अतिशय गंभीर मानल्या. त्याने आपले मन इतर आमिषांनी विचलित होऊ दिले नाही. पृथ्वीवरील त्याच्या जीवनाच्या अंतापर्यंत तो देवाची इच्छा करत राहिला.—योहा. ४:३४.

मृत्यूतील बाप्तिस्मा

६. येशूने दुसरा कोणता बाप्तिस्मा, किती काळ अनुभवला?

येशूचा पाण्यातला बाप्तिस्मा ज्या गोष्टींचे प्रतीक होता त्यांना अनुसरून त्याने आणखी एक बाप्तिस्मा अनुभवला. देवाने त्याला नेमून दिलेल्या कामामुळे बलिदान म्हणून त्याला आपल्या मानवी जीवनाचा त्याग करावा लागेल पण तिसऱ्‍या दिवशी आत्म्यात उठवले जाईल, हे त्याला माहीत होते. यालाच त्याने एक प्रकारचा बाप्तिस्मा असे म्हटले. इ.स. २९ मध्ये या ‘बाप्तिस्म्याची’ सुरूवात झाली. पण, येशू प्रत्यक्ष मरून परत उठवला जाईपर्यंत तो पूर्ण झालेला नव्हता त्यामुळे त्याच्या पाण्यातल्या बाप्तिस्म्यानंतर सुमारे तीन वर्षांनी तो यथोचितपणे म्हणू शकला: “मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे, व तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात आहे!”—लूक १२:५०

७. (अ) मृत्यूत आणखी कोणाचा बाप्तिस्मा होतो? (ब) हा बाप्तिस्मा कोण देतो?

ख्रिस्ताच्या स्वर्गीय राज्यात त्याच्यासह राज्य करणाऱ्‍यांचादेखील तसाच मृत्यूमध्ये बाप्तिस्मा झाला पाहिजे. (मार्क १०:३७-४०; कलस्सै. २:१२) येशूप्रमाणे, त्यांच्या मृत्यूच्या वेळी ते त्यांचे मानवी जीवन कायमचे सोडतात. आणि त्यांच्या पुनरूत्थानाच्या वेळी ते स्वर्गीय शासनात त्याला येऊन मिळतात. कोणी मानव नव्हे तर त्याच्या स्वर्गीय पुत्रामार्फत देव हा बाप्तिस्मा देतो.

८. त्यांचा ‘ख्रिस्त येशूमध्येही बाप्तिस्मा’ होण्याचा अर्थ काय?

येशूच्या मृत्यूत ज्यांचा बाप्तिस्मा होतो त्यांचा “ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा” झाला आहे, असे म्हटले जाते. आत्म्याने अभिषिक्‍त मंडळीचे, म्हणजेच त्याच्या “शरीरा”चे, सभासद म्हणून, ख्रिस्तामार्फत दिलेल्या पवित्र आत्म्याच्या योगे, त्यांचा प्रमुख असलेल्या ख्रिस्ताशी संयोग होतो. ख्रिस्ताचे श्रेष्ठ व्यक्‍तिमत्व प्रदर्शित करण्यात तो (आत्मा) त्यांना मदत करत असल्यामुळे, ते “ख्रिस्त येशूच्या ठायी एकच (व्यक्‍ती)” बनतात असे त्यांच्याविषयी म्हणता येते.—रोम. ६:३-५; १ करिंथ. १२:१३; गलती. ३:२७, २८; प्रे. कृत्ये २:३२, ३३.

ख्रिस्ती शिष्यांचा पाण्यातील बाप्तिस्मा

९. (अ) मत्तय २८:१९ मध्ये निर्देश केल्यासारखा बाप्तिस्मा प्रथम कधी झाला? (ब) या परिच्छेदासह दिलेल्या प्रश्‍नांचा व शास्त्रवचनांचा उपयोग करून बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्‍या उमेदवारांनी काय मान्य केले पाहिजे असे येशू दर्शवत होता, याचे विश्‍लेषण करा.

येशूच्या सुरूवातीच्या शिष्यांना योहानाने पाण्यात बाप्तिस्मा दिला व त्यानंतर येशूच्या आध्यात्मिक वधूचे भावी सभासद म्हणून त्यांना त्याच्याकडे पाठवण्यात आले. (योहा. ३:२५-३०) येशूच्या निर्देशनाखाली त्यांनीदेखील काहींना बाप्तिस्मे दिले; त्यांचे महत्त्व योहानाच्या बाप्तिस्म्यासारखेच होते. (योहा. ४:१-३) परंतु इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टपासून, “पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने” बाप्तिस्मा देण्याची कामगिरी पूर्ण करण्यास त्यांनी सुरूवात केली. (मत्त. २८:१९) खालील प्रश्‍नांसह दिलेल्या शास्त्रपदांच्या अनुरोधाने त्याचा अर्थ काय याचा आढावा घेणे फार फायदेशीर असल्याचे तुम्हाला दिसून येईल:

 “पित्याच्या . . . नावाने” बाप्तिस्मा घेण्यासाठी एखाद्या व्यक्‍तीने पित्याविषयी काय जाणले पाहिजे? (२ राजे १९:१५; स्तोत्र. ३:८; ७३:२८; यश. ६:३; रोम. १५:६; इब्री. १२:९; याको. १:१७)

 “पुत्राच्या” नावाने बाप्तिस्मा घेण्यासाठी कशाला मान्यता द्यावी लागते? (मत्त. १६:१६, २४; फिलिप्पै. २:९-११; इब्री. ५:९, १०)

 “पवित्र आत्म्याच्या” नावाने बाप्तिस्मा घेण्यासाठी एखाद्या व्यक्‍तीला कशावर विश्‍वास ठेवावा लागेल? (लूक ११:१३; योहा. १४:१६, १७; प्रे. कृत्ये १:८; १०:३८; गलती. ५:२२, २३; २ पेत्र १:२१)

१०. (अ) आज पाण्यातला ख्रिस्ती बाप्तिस्मा कशाचे प्रतीक आहे? (ब) तो येशूच्या स्वतःच्या बाप्तिस्म्याहून वेगळा कसा आहे? (क) शास्त्रवचनानुसार पात्रता असलेल्या व्यक्‍तींचा बाप्तिस्मा झाल्यावर, ते काय होतात?

१० येशूच्या या सूचनांना अनुसरून बाप्तिस्मा देण्यात आलेले सुरूवातीचे लोक, राष्ट्रीय पातळीवर यापूर्वीच देवाला समर्पित असे यहुदी (व यहुदीय मतानुसारी) होते. इ.स. ३६ पर्यंत त्यांना देवाने विशेष सवलत दिली. परंतु ख्रिस्ती शिष्यत्वाचा विशेषाधिकार शमरोनी व परराष्ट्रीयांना दिला गेल्यावर, बाप्तिस्मा होण्यापूर्वी त्यांना वैयक्‍तिकरित्या, त्याच्या पुत्राचे शिष्य म्हणून त्याची सेवा करण्यासाठी, यहोवाला स्वतःचे संपूर्ण समर्पण करावे लागत होते. आज आपल्या दिवसापर्यंत यहूद्यांसकट सर्वांसाठी पाण्यातल्या ख्रिस्ती बाप्तिस्म्याचे हेच महत्त्व आहे. खरे ख्रिस्ती बनणाऱ्‍या सर्वांना हा “एकच बाप्तिस्मा” लागू होतो. अशा रीतीने ते, यहोवाचे ख्रिस्ती साक्षीदार, देवाचे नियुक्‍त सेवक, बनतात.—इफिस. ४:५; २ करिंथ. ६:३, ४.

११. (अ) पाण्यातला ख्रिस्ती बाप्तिस्मा कशासारखा आहे आणि कसा? (ब) अशा तऱ्‍हेने एखादी ख्रिस्ती व्यक्‍ती कशापासून वाचते?

११ देवाच्या दृष्टीने अशा बाप्तिस्म्याचे मोठे महत्त्व आहे. नोहा व त्याचे कुटुंब ज्या तारवामध्ये प्रलयातून वाचले, त्याच्या बांधणीचा उल्लेख केल्यानंतर प्रेषित पेत्राने याकडे लक्ष वेधले. त्याने लिहिले: “त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुऊन टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे असा आहे.” (१ पेत्र ३:२१) ते तारू, देवाची इच्छा करण्यासाठी नोहाने स्वतःचे समर्पण केले असल्याचा, स्पष्ट पुरावा होता. व त्यानंतर देवाने नेमून दिलेले काम त्याने प्रामाणिकपणे केले होते. त्यामुळे तो वाचला. त्याचप्रमाणे पुनरूत्थित ख्रिस्तावरील विश्‍वासाच्या आधारे, यहोवाला स्वतःचे समर्पण करणारे, त्याचे प्रतीक म्हणून बाप्तिस्मा घेणारे आणि मग आपल्या दिवसात देवाची त्याच्या सेवकांसाठी असलेली इच्छा करत जाणारे लोक, सध्याच्या दुष्ट जगापासून वाचवले जातात. (गलती. १:३, ४) बाकीच्या जगाबरोबर आता ते विनाशाकडे निघालेले नाहीत. त्यापासून त्यांना वाचवण्यात आलेले आहे आणि देवाने त्यांना शुद्ध विवेक बहाल केला आहे.

आपल्या जबाबदाऱ्‍यांना जागणे

१२. एखाद्याने बाप्तिस्मा घेणे हीच तारणाची हमी का नाही?

१२ बाप्तिस्मा घेतलेला असणे हीच तारणाची हमी आहे, असा निष्कर्ष काढणे चूक ठरेल. एखाद्या व्यक्‍तीने येशू ख्रिस्तामार्फत यहोवाला खरोखरी स्वतःचे समर्पण केले असेल आणि त्यानंतर प्रामाणिकपणे शेवटपर्यंत तो देवाच्या इच्छेप्रमाणे वागेल तरच त्याला अर्थ आहे.—मत्त. २४:१३.

१३. (अ) बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिश्‍चनांनी त्यांचे जीवन कसे जगावे याबद्दल देवाची इच्छा काय आहे? (ब) आपल्या जीवनात ख्रिस्ती शिष्यत्वाला किती महत्त्व असावे?

१३ मानव म्हणून त्याने आपले जीवन कसे घालवले हे येशूकरता असलेल्या देवाच्या इच्छेत सामील होते. बलिदानाच्या रूपात मृत्यूमध्ये त्याचा त्याग करावयाचा होता. आपल्या बाबतीत स्वार्थत्यागी जीवन जगण्यासाठी आपले देह देवाला सादर करावयाचे आहेत. फक्‍त देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठीच त्यांचा उपयोग करावयाचा आहे. (रोम. १२:१, २) अधूनमधूनही जर आपण जाणूनबुजून सभोवतालच्या जगाप्रमाणे वागलो किंवा देवाची नावापुरती सेवा करत स्वार्थी उद्योगांभोवती आपले जीवन गुंफले, तर आपण नक्कीच तसे करत नसू. (१ पेत्र ४:१-३; १ योहा. २:१५-१७) कोणा एका यहूद्याने, त्याला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी काय करावे लागेल असे विचारले तेव्हा, शुद्ध नैतिक जीवन जगण्याच्या महत्त्वाची आठवण येशूने त्याला करून दिली; आणि मग ख्रिस्ती शिष्यत्वाला, येशूचे अनुयायी राहून, जीवनात प्रथम स्थान देण्याची गरज त्याच्या निदर्शनास आणून दिली. भौतिक उद्योगांच्या नंतर त्याचा नंबर लागू शकत नाही.—मत्त. १९:१६-२१.

१४. (अ) देवाच्या राज्यासंबंधी सर्व ख्रिश्‍चनांवर कोणती जबाबदारी आहे? (ब) पृष्ठ १०१ वर चित्रित केल्याप्रमाणे हे काम करण्याचे काही परिणामकारक मार्ग कोणते? (क) अशा कार्यात आपण मनःपूर्वक सहभागी झाल्यास, तो कशाचा पुरावा आहे?

१४ येशूकरता असलेल्या देवाच्या इच्छेमध्ये, देवाच्या राज्यासंबंधी अत्यंत महत्त्वाच्या कार्याचा समावेश होता याचीही आठवण ठेवली पाहिजे. खुद्द येशूचा राजा होण्यासाठी अभिषेक झाला होता. परंतु पृथ्वीवर असताना तो त्या राज्याचा आवेशी साक्षीदार देखील होता. आपल्याला तसेच साक्षीचे काम करायचे आहे आणि ते मनःपूर्वक करण्यास आपल्याला सबळ आधार आहे. तसे करण्याने यहोवाच्या सार्वभौमत्वाबद्दल वाटणारी कदर आणि इतर मानवांसाठी वाटणारे प्रेम आपण प्रदर्शित करू शकतो. त्या राज्यातील सार्वकालिक जीवनाच्या ध्येयाकडे नेटाने जाण्यात आपण त्या राज्याचे साक्षीदार असलेल्या सहउपासकांशी एक झालेले असल्याचे दाखवून देतो.

पुनरावलोकन चर्चा

• येशूचा बाप्तिस्मा व आजच्या पाण्यातल्या बाप्तिस्म्यामध्ये कोणता सारखेपणा व कोणते फरक आहेत?

• योहानाचा बाप्तिस्मा कोणासाठी होता? मृत्यूत कोणाचा बाप्तिस्मा होतो? व “ख्रिस्त येशूमध्ये” कोणाचा बाप्तिस्मा होतो?

• पाण्यातल्या ख्रिस्ती बाप्तिस्म्याच्या जबाबदाऱ्‍यांना जागण्यात काय अंतर्भूत आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१०१ पानांवरील चित्रं]

तुम्ही कोणत्या मार्गांनी देवाच्या राज्याची घोषणा करता?

घरोघर जाऊन

आस्थेवाईकांची परतभेट घेऊन

गृह पवित्रशास्त्र अभ्यासात

रस्त्यांवर

सहविद्यार्थ्यांना

सहकर्मचाऱ्‍यांना