व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘ते जगाचे नाहीत’

‘ते जगाचे नाहीत’

अध्याय २१

‘ते जगाचे नाहीत’

१. (अ) त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री, येशूने त्याच्या शिष्यांच्या वतीने कसली प्रार्थना केली? (ब) ‘या जगाचे नसणे’ इतके महत्त्वाचे का होते?

 वधस्तंभावर खिळला जाण्याच्या आदल्या रात्री, येशूने त्याच्या अनुयायांच्या वतीने मनःपूर्वक प्रार्थना केली. सैतान त्यांच्यावर प्रचंड दबाव आणील हे माहीत असल्याने, तो त्याच्या पित्याला म्हणाला: “तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करितो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.” (योहा. १७:१५, १६) जगापासून वेगळे राहण्याला इतके महत्त्व का आहे? कारण सैतान त्याचा अधिपती आहे. जगाचा भाग असलेले लोक त्याच्या नियंत्रणाखाली आहेत. (योहा. १४:३०; १ योहा. ५:१९) असे असताना, ‘जगाचे नसण्या’चा अर्थ समजणे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍तीला अत्यावश्‍यक आहे. येशूच्या बाबतीत ते कसे खरे होते?

२. कोणकोणत्या प्रकारे येशू ‘या जगाचा नव्हता’?

येशूने स्वतःला इतरांपासून दूर नक्की ठेवले नाही. तो या ‘जगाचा नव्हता’, याचा अर्थ त्याला इतरांबद्दल प्रेम नव्हते असा नाही. तर उलट, देवाच्या राज्याची सुवार्ता त्यांना सांगण्यासाठी तो गावोगावी गेला. त्याने रोग्यांना बरे केले, अंधांना दृष्टी दिली, मृतांना उठवले, एवढेच नव्हे तर मानवजातीच्यावतीने त्याने स्वतःचा प्राणही दिला. परंतु जगाच्या आत्म्याने भरलेल्या लोकांची अधर्मी वृत्ती व दुष्कृत्ये त्याला आवडली नाहीत. अनैतिक अभिलाषा, ऐहिक जीवनपद्धती आणि वैयक्‍तिक मोठेपणाचा हव्यास टाळण्याचा इशारा त्याने दिला. (मत्त. ५:२७, २८; ६:१९-२१; लूक १२:१५-२१; २०:४६, ४७) देवापासून दुरावलेल्या लोकांच्या जीवनपद्धतीचे अनुकरण करण्याऐवजी, येशू यहोवाच्या मार्गानुसार चालला. (योहा. ८:२८, २९) रोमन सत्ता व यहुदी लोक यांच्यातल्या राजकीय वादासंबंधात, स्वतः यहुदी असूनदेखील येशूने कोणाचीही बाजू घेतली नाही.

“माझे राज्य ह्‍या जगाचे नाही”

३. (अ) येशूच्या बाबतीत यहुदी धार्मिक नेत्यांनी पिलाताकडे कोणते आरोप केले, व का? (ब) मानवी राजा होण्यात येशूला स्वारस्य नव्हते, हे कशाने दिसून येते?

असे असले तरी, येशू राष्ट्रीय हिताला सुरूंग लावत असल्याचा आरोप यहुद्यांच्या धार्मिक नेत्यांनी केला. त्यांनी त्याला अटक करवून, रोमन सुभेदार, पंतय पिलाताकडे नेले. त्यांना खरे दुःख होते ते येशूच्या शिकवणींनी त्यांचा दांभिकपणा उघड केला, या गोष्टीचे. परंतु सुभेदाराने कारवाई करावी म्हणून त्यांनी आरोप केला: “हा आमच्या राष्ट्राला फितवितांना, कैसराला कर देण्याची मनाई करितांना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणतांना आम्हांला आढळला.” (लूक २३:२) वस्तुस्थिती अशी आहे की, एक वर्ष आधी, त्याला राजा करण्याची लोकांची इच्छा असताना, येशूने नकार दिला होता. (योहा. ६:१५) तो स्वर्गीय राजा बनणार होता आणि राजा होण्याची त्याची वेळ अजून आलेली नव्हती, या गोष्टींची त्याला जाणीव होती. तसेच लोकशाहीच्या किंवा लोकमान्य कारवाईने नव्हे तर, यहोवा देवाकडून तो सिंहासनस्थ होणार होता.

४. ‘कैसराला कर देण्या’बाबत येशूच्या मनोवृत्तीविषयी, वस्तुस्थिती काय प्रकट करते?

कर देण्याबद्दल म्हणायचे तर, येशूच्या अटकेच्या तीनच दिवस आधी, या बाबतीत तो गुन्हेगार ठरेल अशा गोष्टी त्याच्याकडून वदवून घेण्याचा प्रयत्न परूश्‍यांनी केला होता. पण त्यांच्या कावेबाज प्रश्‍नांना उत्तर देताना तो म्हणाला होता: “मला एक नाणे [“दिनार”, न्यू.व., एक रोमन नाणे] दाखवा. ह्‍याच्यावरील मुखवटा व लेख कोणाचा आहे?” “कैसराचा” असे त्यांनी म्हटल्यावर, त्याने उत्तर दिले, “तर कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरा.”—लूक २०:२०-२५.

५. (अ) त्याच्या अटकेच्या वेळी येशूने त्याच्या अनुयायांना कोणता धडा शिकवला? (ब) येशूने पिलाताला आपल्या कृतीच्या कारणाचा खुलासा कसा केला?

येशू रोमन सत्तेविरूद्ध बंडाचा उठाव करत नव्हता, आणि त्याच्या शिष्यांनी तसे करावे अशीही त्याची इच्छा नव्हती, हे त्याच्या अटकेच्या वेळी घडलेल्या घटनेने सिद्ध झाले. तरवारी व सोटे घेतलेल्या यहूद्यांबरोबर रोमन सैनिक येशूला पकडण्यासाठी आले. (योहान १८:३, १२; मार्क १४:४३) हे पाहून, प्रेषित पेत्राने तरवार उपसली आणि त्यातल्या एका माणसावर वार करून त्याचा उजवा कान कापला. तेव्हा येशूने पेत्राला दटावून म्हटले: “तुझी तरवार परत जागच्या जागी घाल, कारण तरवार धरणारे सर्वजण तरवारीने नाश पावतील.” (मत्त. २६:५१, ५२) दुसऱ्‍या दिवशी सकाळी, पिलातापुढे आपल्या कृतीच्या कारणाचा खुलासा करताना येशू म्हणाला: “माझे राज्य या जगाचे नाही, माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; परंतु आता माझे राज्य येथले नाही.”—योहा. १८:३६.

६. त्या खटल्याचा काय निकाल लागला?

पुराव्यावर विचार केल्यानंतर, येशूवर केलेल्या आरोपांच्या बाबतीत, “कांहींही दोष सापडला नाही” असा निर्वाळा पिलाताने दिला. असे असले तरी, जमावाच्या मागण्यांपुढे नमून त्याने येशूला वधस्तंभावर खिळवले.—लूक २३:१३-१५; योहा. १९:१२-१६.

अनुयायी धन्याच्या नेतृत्वाखाली चालतात

७. ते जगाची वृत्ती टाळत होते, पण त्यांना लोकांविषयी प्रेम होते, ही गोष्ट आरंभीच्या ख्रिस्ती लोकांनी कशी दाखवली?

पवित्र शास्त्र आणि इतर ऐतिहासिक साहित्यातला, आरंभीच्या ख्रिस्ती धर्माचा वृतांत दाखवतो की, ‘जगाचे नसण्या’त त्यांच्याकडून कशाची अपेक्षा होती, हे येशूच्या शिष्यांना समजले होते. जगाची वृत्ती टाळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. रोमन लोकांच्या सार्वजनिक क्रीडांगणातील व रंगमंचावरील हिंसक आणि अनैतिक मनोरंजनापासून दूर राहात असल्यामुळे, माणूसघाणे म्हणून त्यांचा उपहास केला गेला. परंतु, त्यांनी त्यांच्या बांधवांचा तिरस्कार तर केलाच नाही, उलट, उद्धारासाठी देवाने केलेल्या प्रेमळ तरतुदींचा लाभ उठवण्यासाठी, इतरांना मदत करण्यात त्यांनी स्वतःला खर्ची घातले.

८. (अ) “या जगाचे” नसल्यामुळे, आरंभीच्या त्या शिष्यांना काय अनुभवावे लागले? (ब) परंतु राजकीय शासक आणि कर देण्याबाबत त्यांचा दृष्टीकोन काय होता, व का?

त्यांच्या धन्याप्रमाणे त्यांचाही—अनेकदा चुकीची माहिती असलेल्या सरकारी अधिकाऱ्‍यांकडून—पराकोटीचा छळ झाला. (योहान १५:१८-२०) परंतु इ.स. ५६च्या सुमारास, प्रेषित पौलाने रोममधल्या बांधवांना, येशूने दिलेल्या सल्ल्याला बळकटी देणारे पत्र लिहिले. “वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या,” म्हणजेच राजनैतिक शासकांच्या, “अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही,” असे पौलाने त्यांना आग्रहाने सांगितले. लौकिक शासने यहोवाने स्थापन केलेली नाहीत, तरी ती त्याच्या अनुज्ञेने शासन करतात. ती कोणत्या क्रमाने सत्तेवर येतील हे देवाला आधीच समजले व तसे भविष्य त्याने केले असल्यामुळे, पौलाने खुलासा केला की, ते अधिकारी “देवाने नेमलेले आहेत” (“देवाने त्यांना परस्परांशी सापेक्ष स्थानी नेमले आहे,” न्यू.व.). येशू ख्रिस्ताच्या हातातील देवाचे स्वतःचे राज्य, जगावर शासन करणारे एकमेव राज्य होईपर्यंत, हे ‘वरिष्ठ अधिकारी’ म्हणजे सध्याच्या काळाकरता ‘देवाची व्यवस्था’ आहेत. त्यामुळे लौकिक अधिकाऱ्‍यांना यथोचित मान देण्याचा आणि त्यांनी लादलेले कर भरण्याचा सल्ला पौलाने ख्रिश्‍चनांना दिला.—रोम. १३:१-७; तीत ३:१, २.

९. (अ) ‘वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या’ अधीन असताना कशाचा विसर पडू नये? (ब) आरंभीचे ख्रिस्ती काळजीपूर्वक येशूचे उदाहरण पाळत होते, हे इतिहास कसे दाखवतो?

देव, देवाचे वचन आणि त्यांचा ख्रिस्ती विवेक यांची कदर न करता, सर्वस्वी त्यांच्या अधीन होण्यास पौलाने त्यांना सांगितले नाही. येशूने फक्‍त यहोवाची उपासना केली होती, लोकांकडून राजा करवून घेण्यास येशूने नकार दिला होता आणि तरवार म्यानात ठेवून देण्यास त्याने पेत्राला सांगितले होते, या गोष्टी त्यांना माहीत होत्या. ते त्यांच्या धन्याच्या नेतृत्वाला निष्ठावंत राहिले. ऑन द रोड टु सिव्हिलाइझेशनअ वर्ल्ड हिस्टरी (लेखक, हेकेल आणि सिग्मन, पृ. २३७, २३८) हे पुस्तक माहिती देते: “रोमन नागरिकांच्या कांही कर्तव्यांत सहभागी होण्यास ख्रिस्ती लोकांनी नकार दिला. लष्करात भरती होण्याने त्यांचा विश्‍वास भंगतो . . . असे ख्रिश्‍चनांना वाटत असे. ते राजकीय अधिकारपदावर राहात नसत. ते रोमन सम्राटाची उपासना करत नसत.”

१०. (अ) यरूशलेम मधल्या ख्रिश्‍चनांनी इ.स. ६६ मध्ये केलेल्या कृतीचे कारण काय? (ब) त्यामुळे, कोणत्या प्रकारे एक महत्त्वाचा कित्ता घालून दिला आहे?

१० त्यांच्या काळातल्या राजकीय आणि लष्करी वादविवादांसंबंधात, येशूच्या शिष्यांनी पूर्ण तटस्थता ठेवली होती. इ.स. ६६ साली रोमन साम्राज्याच्या यहुदा प्रातांतल्या यहुद्यांनी कैसराविरूद्ध बंड केले. रोमन सैन्याने त्वरेने यरूशलेमाला वेढा घातला. तेव्हा, त्या शहरातल्या ख्रिश्‍चनांनी काय केले? तटस्थ राहण्याचा व लढणाऱ्‍या सैन्यांच्या मधून निघून जाण्याचा, येशूचा सल्ला त्यांनी ध्यानात ठेवला. रोमन सैन्य तात्पुरते हटल्यावर, ख्रिश्‍चनांनी ती संधी साधली आणि ते यार्देन नदीच्या पलिकडल्या पेल्लाच्या डोंगराळ भागात पळून गेले. (लूक २१:२०-२४) त्यांच्या तटस्थतेने, भावी ख्रिश्‍चनांकरता ते एक विश्‍वासजनक उदाहरण ठरले.

शेवटल्या काळातले ख्रिस्ती तटस्थ

११. (अ) यहोवाचे साक्षीदार कोणत्या कामात व्यग्र राहतात आणि का? (ब) कोणत्या बाबतीत ते कसे तटस्थ आहेत?

११ आरंभीच्या त्या ख्रिश्‍चनांचे अनुकरण करून, इ.स. १९१४ पासून या “शेवटल्या काळात” एखाद्या गटाने ख्रिस्ती तटस्थतेचा मार्ग अनुसरला असल्याचे इतिहासात दिसून येते का? होय, यहोवाच्या साक्षीदारांनी तसे केले आहे. सर्व जगातल्या धार्मिकतेच्या चाहत्यांसाठी, शांती, समृद्धी व अबाधित आनंद मिळण्याचे एकमेव साधन, देवाचे राज्य होय, असा जगभर प्रचार करण्यात ते गढून गेले आहेत. (मत्त. २४:१४) परंतु राष्ट्रांच्या आपसातल्या वादविवादांसंबंधी त्यांनी कडक तटस्थता राखली आहे.

१२. (अ) साक्षीदारांची तटस्थता आणि पाद्री वर्गाच्या व्यवहारात कोणता विरोध आहे? (ब) यहोवाच्या साक्षीदारांच्या दृष्टीने, राजकारणाबाबतच्या तटस्थतेत कोणत्या गोष्टींचा समावेश आहे?

१२ याच्या अगदी विरूद्ध, ख्रिस्ती धर्मजगतातले पाद्री जगाच्या राजनैतिक व्यवहारात अत्यंत गुंतले आहेत. काही देशांमध्ये ते, उमेदवारांच्या बाजूने अथवा विरूद्ध सक्रीय प्रचार करतात. काही पाद्री तर स्वतःच राजनैतिक पदे भूषवतात. इतर काही, पाद्रीवर्गास पसंत असलेल्या कार्यक्रमांवर मेहेरबानी दाखवण्यासाठी, राजकारणी लोकांवर मोठा दबाव टाकतात. इतरत्र, “रूढमतवादी” पाद्री सत्तेवरील लोकांचे निकट सहकारी आहेत, तर “सुधारक” पाद्री व धर्मोपदेशक, त्यांना उलथून टाकण्यासाठी खटपट करणाऱ्‍या गुरिला चळवळींना पाठिंबा देत आहेत. परंतु यहोवाचे साक्षीदार मात्र कोणत्याही देशात राहात असले तरी, राजकारणात ढवळाढवळ करत नाहीत. एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करण्याबाबत, एखाद्या पदासाठी उभे राहण्याबाबत वा निवडणुकीत मतदान करण्याबाबत इतरांच्या कामात ते लुडबुड करत नाहीत. परंतु, त्याचे शिष्य ‘या जगाचे नसतील’ असे येशूने म्हटले असल्याने यहोवाचे साक्षीदार मात्र, राजनैतिक घडामोडीत जराही भाग घेत नाहीत.

१३. युद्धात भाग घेण्याच्या बाबतीत, यहोवाच्या साक्षीदारांची कोणती भूमिका असल्याचे, वस्तुस्थिती दर्शवते?

१३ येशूने आधीच सांगितल्याप्रमाणे, या “शेवटल्या काळात” राष्ट्रांनी पुनःपुन्हा युद्धे केली आहेत आणि राष्ट्रांतर्गत गटांनी परस्परांविरूद्ध शस्त्रे सज्ज केली आहेत. (मत्त. २४:३, ६, ७) पण अशा परिस्थितीत यहोवाच्या साक्षीदारांनी काय भूमिका घेतली आहे? अशा झगड्यांबाबत त्यांची तटस्थता जगातल्या सर्व भागात प्रसिद्ध आहे. येशू ख्रिस्ताने घेतलेल्या व नंतर त्याच्या शिष्यांनी दर्शवलेल्या भूमिकेच्या सुसंगतीने, नोव्हेंबर १, १९३९च्या द वॉचटावरच्या अंकात म्हटले होते: “प्रभूला अनुकूल असलेले सर्व, युद्धात पडलेल्या राष्ट्रांच्या बाबतीत तटस्थ राहतील, आणि पूर्णपणे, थोर दैवी शासक [यहोवा] आणि त्याने नियुक्‍त केलेला राजा [येशू ख्रिस्त] यांच्या बाजूला असतील.” वस्तुस्थिती दर्शवते की, सर्व देशांमध्ये आणि कोणत्याही परिस्थितीत यहोवाचे साक्षीदार याच भूमिकेवर दृढ राहतात. त्यांनी, जगाच्या फूट पाडणाऱ्‍या राजकारण व युद्धांना, यहोवाचे उपासक या नात्याने असलेले आपले आंतरराष्ट्रीय बंधुत्त्व भंग करू दिलेले नाही.—यश. २:३, ४; पडताळा २ करिंथकरांस १०:३, ४.

१४. (अ) त्यांच्या तटस्थ भूमिकेमुळे, आणखी कोणत्या गोष्टी करण्यास साक्षीदार नकार देतात? (ब) याच्या कारणाचा खुलासा ते कसा करतात?

१४ ऐतिहासिक वस्तुस्थितीचे परिक्षण केल्यास असे दिसते की, यहोवाच्या साक्षीदारांनी, केवळ लष्करी गणवेष घालण्यास व शस्त्रे धारण करण्यास नकार दिला होता असे नव्हे तर, निमलष्करी सेवा आणि लष्करी सेवेऐवजी दिलेले काम स्वीकारण्यासही नकार दिला होता. का बरे? कारण, देव आपल्याकडून करत असलेल्या अपेक्षांचा त्यांनी अभ्यास केला असून, मग सदसद्‌विवेक बुद्धीनुसार, वैयक्‍तिक निर्णय घेतलेला आहे. त्यांनी काय करावे हे कोणी त्यांना सांगत नाही. तसेच इतर जे करणे पसंत करतात, त्यात ते लुडबुड करत नाहीत. परंतु त्यांच्या भूमिकेचा खुलासा विचारल्यावर, यहोवाच्या साक्षीदारांनी जाहीर केले आहे की, समर्पणाने देवाला वाहून घेतलेल्या व्यक्‍ती म्हणून, त्याच्या सेवेसाठी आपल्या शरीरांचा उपयोग करणे त्यांना भाग आहे. आणि आता त्यांना ती, देवाच्या उद्देशाविरूद्ध वागणाऱ्‍या ऐहिक धन्यांच्या हवाली करता येत नाहीत.—रोम. ६:१२-१४; १२:१, २; मीखा ४:३.

१५. (अ) जगापासून आपले वेगळेपण टिकवण्यामुळे, यहोवाच्या साक्षीदारांना काय अनुभवावे लागले आहे? (ब) त्यांना तुरूंगात टाकल्यावरही, ख्रिस्ती तत्त्वांनी त्यांचे मार्गदर्शन कसे केले आहे?

१५ परिणाम असा झाला आहे की, येशूने म्हटल्याप्रमाणे: “तुम्ही जगाचे नाही . . . म्हणून जग तुमचा द्वेष करिते.” (योहा. १५:१९) आपली ख्रिस्ती तटस्थता न सोडल्यामुळे यहोवाच्या अनेक साक्षीदारांना तुरूंगात टाकण्यात आले आहे. काहींना अमानुष वागणूक देण्यात आली आहे, अगदी मृत्यूही. इतर काही, अनेक वर्षे अटकेत राहूनही त्यांची तटस्थता सिद्ध करत राहिले आहेत. व्हॅल्यूज ॲण्ड व्हायलन्स इन ऑश्‍विट्‌झ (ले. ॲना पॉवेल्झीन्स्का, पृ. ८९) हे पुस्तक सांगते: “[छळ छावणीमध्ये] यहोवाचा कोणताही साक्षीदार, त्याच्या विश्‍वासाच्या व निष्ठेच्या विरूद्ध असलेली आज्ञा पाळणार नाही, किंवा दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या विरूद्ध, मग तो एखादा खुनी वा एस. एस. अधिकारी असला तरी, कोणतीही कृती करणार नाही, हे प्रत्येकाला ठाऊक होते. या उलट, त्याच्याकरता नैतिक दृष्ट्या फरक न पडणारी इतर सर्व कामे, अगदी किळसवाणी असली तरी, तो त्याच्या कुवतीनुसार उत्तम रीतीने करील.”

१६. (अ) सर्व राष्ट्रे कोठे कूच करत आहेत, व म्हणून यहोवाचे साक्षीदार काय टाळण्याची खबरदारी बाळगतात? (ब) तेव्हा, जगापासून वेगळे राहणे, इतकी गंभीर बाब का आहे?

१६ सर्व राष्ट्रे हर्मगिदोन येथील “सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाई”कडे कूच करत आहेत, या गोष्टीची जाणीव यहोवाच्या साक्षीदारांना आहे. संगठितरित्या यहोवाच्या सेवकांनी त्याच्या ऐश्‍वर्यशाली मशीही राज्याला अनुकूल पवित्रा घेतला आहे. त्यामुळे, त्या राज्याच्या विरूद्ध भूमिका घ्यायला लावण्याच्या कारस्थानाला बळी न पडण्याची खबरदारी ते घेतात. (प्रकटी. १६:१४, १६; १९:११-२१) त्याचे खरे अनुयायी “या जगाचे नाहीत”, या येशूच्या विधानाचे गांभिर्य ते जाणतात. हे जुने जग लवकरच नाहीसे होईल, आणि चोखपणे देवाची सेवा करणारेच तेवढे सर्वकाळ राहतील, हे त्यांना माहीत आहे.—१ योहा. २:१५-१७.

पुनरावलोकन चर्चा

• ‘जगाचे नसण्या’त काय गोवलेले आहे? ते येशूने कसे दाखवले?

• (१) जगाची वृत्ती (२) ऐहिक शासक आणि कर देणे, (३) लष्करी सेवा यांच्या बाबतीतली आरंभीच्या ख्रिस्ती लोकांची मनोवृत्ती कशाने सूचित होते?

• आधुनिक काळामध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांच्या ख्रिस्ती तटस्थतेचा पुरावा कशा प्रकारे दिला आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]