‘पहिल्याने त्याचे राज्य मिळवण्यास झटा’
अध्याय ११
‘पहिल्याने त्याचे राज्य मिळवण्यास झटा’
१. (अ) येशूने १,९०० वर्षांपूर्वी, प्रथम देवाचे राज्य मिळवण्यासाठी झटण्यास का सांगितले? (ब) आपण स्वत:ला कोणता प्रश्न विचारावा?
येशूने १,९०० हून अधिक वर्षांपूर्वी, गालीलात दिलेल्या एका भाषणामध्ये त्याच्या श्रोत्यांना आवर्जून सांगितले: “तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा.” पण का बरे? ख्रिस्ताच्या राज्यारोहणाची वेळ अजून अनेक शतके दूर नव्हती का? होय. परंतु त्या मशीही राज्याद्वारेच खुद्द यहोवाचे पवित्र नाव निर्दोष शाबीत होईल व पृथ्वीबद्दल त्याचा गौरवी उद्देश पूर्ण होईल. या गोष्टीच्या महत्त्वाची खरी जाणीव असलेली कोणीही व्यक्ती त्या राज्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान देईल. ही गोष्ट पहिल्या शतकात खरी होती आणि आता ते राज्य शासन करत असताना नक्कीच खरी ठरत आहे. तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य मिळवण्यासाठी झटत असल्याचे तुमच्या जीवनातून दिसून येते का?—मत्त. ६:३३.
२. सर्वसाधारण लोक कोणत्या गोष्टी मिळवण्याची धडपड करत आहेत?
२ सर्वसाधारण लोकांना इतर गोष्टींमध्ये अधिक आस्था आहे. संपत्ती आणि कपडेलत्ते, अन्न व इतर भौतिक मालमत्ता तसेच पैशाने मिळणाऱ्या सुखांच्या मागे ते आतुरतेने लागतात. (मत्त. ६:३१, ३२) ते स्वत:मध्ये आणि सुखविलासामध्ये गर्क असल्याचे त्यांचे जीवन दर्शवते. त्यांचा देवावर विश्वास असलाच तर त्यांच्या जीवनात त्याचे स्थान दुय्यम आहे.
३. (अ) त्याच्या शिष्यांना कोणत्या प्रकारची संपत्ती मिळवण्यास येशूने उत्तेजन दिले व का? (ब) भौतिक गरजांबद्दल अवास्तव चिंता करण्याची गरज त्यावेळी का नव्हती?
३ परंतु येशूने त्याच्या शिष्यांना बोध केला: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका,” कारण अशी कोणतीच मालमत्ता कायमची टिकत नाही. “तर”, तो म्हणाला की यहोवाची सेवा करून “स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा.” फक्त एका गोष्टीवर, देवाच्या इच्छेनुसार कार्य करण्यावर, लक्ष केंद्रित करून, त्याच्या अनुयायांनी त्यांचा डोळा “निर्दोष” ठेवावा असा आग्रह त्याने केला. त्याने त्यांना सांगितले, “तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.” परंतु अन्न, वस्त्र व निवारा या भौतिक गरजांबाबत काय? येशूने सल्ला दिला: “चिंता करीत बसू नका.” त्याने पक्ष्यांकडे त्यांचे लक्ष वेधले—देव त्यांना खावयास देतो. त्याने त्याच्या अनुयायांना फुलांपासून बोध घेण्याचे उत्तेजन दिले—देव त्यांना सुंदर वस्त्रांनी सजवतो. त्यांच्यापेक्षा यहोवाचे बुद्धिमान मानवी सेवक श्रेष्ठ नाहीत का? त्यामुळे येशू म्हणाला, “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे याबरोबर ह्याही सर्व [गरजेच्या] गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्त. ६:१९-३४) यावर तुमचा विश्वास आहे का? तुमचे वर्तन तसे दर्शवते का?
राज्याबद्दलच्या सत्याची गळचेपी होऊ देऊ नका
४. एखाद्या व्यक्तीने भौतिक गोष्टींवर फाजील भर दिल्यास काय परिणाम होऊ शकेल? उदाहरणाने स्पष्ट करा.
४ एखाद्या व्यक्तीला भौतिक गोष्टीची फाजील काळजी असल्यास अनर्थकारक परिणाम होऊ शकतात. देवाच्या राज्यामध्ये त्याला आस्था असल्याचा दावा तो करत असला तरी, त्याच्या अंत:करणामध्ये त्याने इतर गोष्टींना प्रथम स्थान दिलेले असल्यास, त्या राज्याबद्दलच्या सत्याची गळचेपी होईल. (मत्त. १३:१८, १९, २२) उदाहरणार्थ, एका प्रसंगी एका श्रीमंत व तरूण अधिकाऱ्याने येशूला विचारले, “सार्वकालिक जीवन हे वतन मिळवण्यास मी काय केले पाहिजे?” येशूच्या उत्तरावरील त्याच्या प्रतिक्रियेने दिसून आले की तो नैतिक जीवन जगत होता व इतरांशी चांगला वागत होता. परंतु आपल्या भौतिक मालमत्तेवर त्याचे अवास्तव प्रेम होते. ख्रिस्ताचा अनुयायी होण्यासाठी ती सोडण्यास त्याचे मन तयार होईना. त्यामुळे स्वर्गीय राज्यात ख्रिस्ताबरोबर राजा होण्याची संधी त्याने गमावली. त्या प्रसंगी येशूने म्हटल्याप्रमाणे: “श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे बघा!”—मार्क १०:१७-२३.
५. (अ) कोणत्या गोष्टींवर समाधान मानण्यास पौलाने तीमथ्याला उत्तेजन दिले व का? (ब) विनाशकारी पाश म्हणून ‘द्रव्य-लोभा’चा उपयोग सैतान कसा करतो?
५ त्यानंतर अनेक वर्षांनी, श्रीमंत व्यापारी केंद्र असलेल्या इफिसमध्ये त्यावेळी असलेल्या तीमथ्याला प्रेषित पौलाने पत्र लिहिले. त्यात त्याने त्याला स्मरण करून दिले: “आपण जगात काही आणिले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही. आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” स्वत:साठी व स्वत:च्या कुटुंबासाठी अन्नवस्त्राची तरतूद करण्याकरता काम करणे योग्य आहे. परंतु पौलाने इशारा दिला: “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात.” सैतान कावेबाज आहे. प्रथम लहान-सहान गोष्टींनी तो एखाद्या व्यक्तीला मोहात टाकेल. त्यापाठोपाठ अनेकदा अधिक मोठा दबाव येतो. उदाहरणार्थ, अधिक पगाराची, पण पूर्वी आध्यात्मिक गोष्टींसाठी बाजूस ठेवलेला वेळ घेणारी, बढतीच्या कामाची संधी. आपण सावध न राहिल्यास, “द्रव्याचा लोभ” अतिमहत्त्वाच्या राज्य-हिताची गळचेपी करू शकतो. पौलाने म्हटल्याप्रमाणे “त्याच्या [द्रव्य-लोभाच्या] पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वत:स पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.”—१ तीम. ६:७-१०.
६. (अ) त्या पाशात अडकणे टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे? (ब) जगाची आजची आर्थिक स्थिती लक्षात घेता तसे करणे व्यवहार्य आहे का?
६ त्याच्या ख्रिस्ती बंधूवरच्या खऱ्या प्रेमाने पौलाने तीमथ्याला आग्रहाने सांगितले: “तू ह्यांपासून पळ”; व “विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर.” (१ तीम. ६:११, १२) सभोवतालच्या भौतिकवादी जीवनक्रमासोबत वाहात जाणे आपल्याला टाळावयाचे असल्यास, निश्चयपूर्वक प्रयत्नाची गरज आहे. परंतु आपण विश्वासानुसार झटलो तर मात्र यहोवा कधीही आपला त्याग करणार नाही. अतिशय महागाई आणि बेरोजगारी असली तरी गरजेच्या गोष्टी आपल्याला मिळतील याची खात्री तो करील.—इब्री. १३:५, ६.
सुरुवातीचे शिष्य कित्ता घालून देतात
७. प्रेषितांना इस्राएलात प्रचारासाठी येशूने पाठवले तेव्हा त्याने कोणत्या सूचना दिल्या व त्या उचित का होत्या?
७ येशूने त्याच्या प्रेषितांना उचित प्रशिक्षण देऊन, सुवार्तेची घोषणा करण्यासाठी इस्राएलात पाठवले. “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे” असा तो संदेश किती रोमहर्षक होता! मशीही राजा, येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये होता. प्रेषितांनी स्वत:ला देवाच्या सेवेला वाहून घेतलेले असल्याने, देव त्यांची काळजी घेईल असा विश्वास बाळगण्यास येशूने त्यांना आवर्जून सांगितले. त्या कारणासाठी तो म्हणाला: “वाटेसाठी काही घेऊ नका. काठी, झोळी, भाकरी किंवा पैका घेऊ नका, अंगरखेही दोन दोन घेऊ नका, ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल, तेथेच राहा व तेथूनच निघून जा.” (मत्त. १०:५-१०; लूक ९:१-६; १०:४-७) इस्राएलांमध्ये परक्या माणसाचे आदरातिथ्य करण्याची वहिवाट होती. त्या इस्राएली बांधवांमार्फत त्यांच्या गरजा पुरवल्या जाण्याची काळजी यहोवा घेईल.
८. (अ) येशूच्या मृत्यूपूर्वी त्याने वेगळ्या सूचना का दिल्या? (ब) असे असले तरी, त्यांच्या जीवनात अजूनही कोणत्या गोष्टीला प्रथम स्थान असावे?
८ त्यानंतर, त्याच्या मृत्यूच्या किंचित आधी, येशूने त्याच्या प्रेषितांना, त्यापुढे बदललेल्या वातावरणात कार्य करावे लागेल याबद्दल सावध केले. अधिकृत विरोधामुळे इस्राएलात तेवढ्या तत्परतेने आदरातिथ्य केले न जाण्याची शक्यता होती. तसेच, लवकरच राज्याचा संदेश त्यांना परराष्ट्रीयांच्या मुलखात न्यावयाचा होता. त्यामुळे आता त्यांना (पैशाची) “पिशवी” आणि (अन्नाची) “झोळी” सोबत न्यावयाची होती. तरीही गरजेचे अन्न आणि वस्त्र मिळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नावर देवाचे आशीर्वाद असतील अशा विश्वासाने, त्यांनी प्रथम यहोवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटावयाचे होते.—लूक २२:३५-३७.
९. (अ) पौलाने देवाच्या राज्याला प्रथम स्थान कसे दिले? (ब) त्याच्या भौतिक गरजा कशा भागवल्या गेल्या? (क) या बाबतींमध्ये त्याने इतरांना कोणता उपदेश दिला?
९ येशूचा उपदेश कसा लागू करावा याचे उत्तम उदाहरण प्रेषित पौलाने घालून दिले. पौलाने देवाच्या सेवेसभोवती त्याचे जीवन गुंफले होते. (प्रे. कृत्ये २०:२४, २५) प्रचार कार्यासाठी एखाद्या भागात तो गेला की, राहुट्या बनवण्याचे काम करून तो आपल्या भौतिक गरजा भागवत असे. इतरांनी त्याची काळजी घ्यावी अशी अपेक्षा त्याने केली नाही. (प्रे. कृत्ये १८:१-४; १ थेस्सलनी. २:९; १ करिंथ. ९:१८) परंतु आदरातिथ्य करून व भेटी देऊन त्यांचे प्रेम व आदर व्यक्त करण्याची इतरांची इच्छा असल्यास, त्याने त्यांचा कृतज्ञतेने स्वीकार केला. (प्रे. कृत्ये १६:१५, ३४; फिलिप्पै. ४:१५-१७) प्रचाराच्या कार्याला जाण्यासाठी त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यास नव्हे तर त्यांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या समतोलपणे हाताळण्यास, ख्रिस्ती स्त्री-पुरूषांना त्याने उत्तेजन दिले. आपल्या हातांनी काम करण्याचा, आपल्या कुटुंबावर प्रेम करण्याचा व सढळ हस्ते परोपकार करण्याचा उपदेश त्यांना त्याने केला. (इफिस. ४:२८; २ थेस्सलनी. ३:७-१२; तीत २:३-५) भौतिक मालमत्तेमध्ये नव्हे तर देवावर भरवसा ठेवण्यास व जीवनात अधिक महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत हे त्यांना खरोखर कळले असल्याचे दिसून येईल, अशा रीतीने जीवन व्यतीत करण्यासही त्याने कळकळीने सांगितले. येशूच्या शिकवणींना अनुसरून, देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्त्व प्रथम मिळवण्यासाठी झटणे, असा त्याचा अर्थ होता.—फिलिप्पै. १:९-११.
तुमच्या जीवनात त्या राज्याला प्रथम स्थानावर ठेवा
१०. (अ) ‘प्रथम देवाचे राज्य मिळवण्यास झटणे’ याचा अर्थ काय? (ब) परंतु कशाकडे दुर्लक्ष होऊ नये?
१० देवाच्या राज्याची सुवार्ता व्यक्तिश: आपण इतरांना किती प्रमाणात देतो? काही अंशी ते आपल्या परिस्थितीवर व बऱ्याच प्रमाणात ते आपल्या जाणीवेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. ‘तुम्हाला इतर काही काम नसेल तेव्हा राज्य मिळवण्यास झटा’ असे येशूने म्हटले नाही, हे लक्षात ठेवा. किंवा ‘अधून मधून तुम्ही देवाच्या राज्याबद्दल बोलत असलात, तर जरूर ते सर्व तुम्ही करत आहात’ असेही त्याने म्हटले नाही. अथवा ‘राज्यहिताच्या तळमळीने आरंभ करा; पण नवी व्यवस्था येण्यास बराच उशीर आहे असे वाटल्यास, देवाच्या सेवेत काहीही करा पण इतरांसारखे जगा’ असेही त्याने म्हटले नाही. त्या राज्याचे महत्त्व चांगले ठाऊक असल्याने त्या गोष्टीबद्दल देवाची इच्छा त्याने सांगितली. तो म्हणाला: “त्याचे राज्य मिळवण्यास [“सतत,” न्यू.व.] झटा,” किंवा प्रेषित मत्तयाने नमूद केल्याप्रमाणे: “तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा. [“झटत राहा,” न्यू.व.]” (लूक १२:३१; मत्त. ६:३३) आपल्यातील बहुतेकांना स्वत:च्या व कुटुंबाच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी कोणा ना कोणा प्रकारचे काम करण्याची गरज असते. तरी आपल्यामध्ये खरोखर विश्वास असल्यास त्याच्या राज्याच्या संबंधात देवाने आपल्याला दिलेले काम आपल्या जीवनाचा केंद्र-बिंदू होईल. त्याच बरोबर आपण कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणार नाही.—१ तीम. ५:८; नीती. २९:१५.
११. (अ) देवाच्या राज्याचा संदेश पसरवण्यात सर्व सारख्याच प्रमाणात काम करू शकणार नाहीत ही वस्तुस्थिती येशूने दृष्टांताने कशी दाखवली? (ब) या बाबतीत कोणत्या घटकांचा संबंध येतो?
११ आपल्यापैकी काही, क्षेत्रसेवेला इतरांपेक्षा जास्त वेळ देऊ शकतात. परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनींच्या त्याच्या दृष्टांतामध्ये, ज्यांची अंत:करणे चांगल्या जमिनीसारखी असतात ते फळे देतात, हे येशूने दाखवले. किती फळे देतात? व्यक्तिगत परिस्थितीत फरक असतो. वय, स्वास्थ व कौटुंबिक जबाबदाऱ्या हे सर्व त्याचे घटक आहेत. पण खरोखरची जाणीव असल्यास बरेच काही साध्य करता येते.—मत्त. १३:१९, २३.
१२. कोणत्या हितकारक आत्मिक ध्येयांचा विचार करण्यास तरुणांना विशेष उत्तेजन दिलेले आहे?
१२ राज्य-सेवेमध्ये आपला सहभाग वाढवण्यात आपल्याला मदत करतील अशी ध्येये ठेवणे बरे. तीमथ्य नावाच्या उत्साही ख्रिस्ती जवानाच्या उत्तम उदाहरणाचा तरूणांनी गंभीरपणे विचार करावा. (फिलिप्पै. २:१९-२२) त्यांचे शालेय-शिक्षण संपल्यावर पूर्ण वेळेच्या सेवेपेक्षा अधिक चांगले त्यांच्याकरता काय असू शकेल? मोठ्यांनाही हितकारक आध्यात्मिक ध्येये ठेवल्याने फायदा होईल.
१३. (अ) राज्य-सेवेत तुम्ही वैयक्तिकपणे काय करू शकता हे कोण ठरवते? (ब) आपण खरोखरच देवाचे राज्य मिळवण्यास झटत असलो तर तो कशाचा पुरावा आहे?
१३ ज्यांना अधिक काही करता येईल असे आपल्याला वाटते, अशांवर टीका करण्यापेक्षा आपल्या स्वत:च्या परिस्थितीत शक्य असेल तेवढ्या पूर्ण प्रमाणात देवाची सेवा करता यावी म्हणून आपल्या वैयक्तिक सुधारणेसाठी प्रयत्न करण्यास विश्वासामुळे आपण प्रेरित झाले पाहिजे. (रोम. १४:१०-१२; गलती. ६:४) ईयोबाच्या बाबतीत पाहिल्याप्रमाणे, आपल्याला मुख्यत्वे भौतिक मालमत्तेमध्ये, स्वत:च्या सुखसोयींमध्ये व वैयक्तिक हितामध्ये आस्था आहे व देवाची सेवा करण्यात आपला हेतू स्वार्थी आहे असा दावा सैतान करतो. परंतु आपण खरोखरच प्रथम राज्य मिळवण्यास झटलो तर सैतान, जसा तो आहेच तसा उघडपणे लबाड असल्याचे सिद्ध करण्यात आपल्याला सहभाग मिळतो. आपल्या जीवनात भौतिक मालमत्ता वा वैयक्तिक सुखसोयींना प्रथम स्थान नसून देवाच्या सेवेला आहे याचा पुरावा आपण देतो. अशा रीतीने उक्ती व कृतीने आपण, यहोवाबद्दलचे आपले गाढ प्रेम, त्याच्या सार्वभौमत्त्वाला असलेला आपला एकनिष्ठ पाठिंबा व मानवजातीबद्दलचे आपले प्रेम, सिद्ध करतो.—नीती. २७:११; ईयो. १:९-११; २:४, ५.
१४. (अ) क्षेत्र-सेवेसाठी वेळापत्रक लाभदायक का आहे? (ब) क्षेत्र-सेवेमध्ये अनेक साक्षीदार कोणत्या प्रमाणात सहभागी होत आहेत व का?
१४ वेळापत्रक बनवल्यास, त्याविना करू शकू त्यापेक्षा अधिक साध्य करण्यात आपल्याला मदत होते. त्याचा उद्देश अंमलात आणण्याचा स्वत: यहोवाचा ‘नियुक्त काळ’ असतो आणि आपण त्याचा कित्ता गिरवणे चांगले. (निर्ग. ९:५; मार्क १:१५, न्यू.व.; गलती. ४:४) शक्य असल्यास प्रत्येक आठवड्यात एक वा अधिक नियुक्त वेळांना क्षेत्रसेवेत सहभागी होणे चांगले असते. जगभरात यहोवाच्या हजारो साक्षीदारांनी सहाय्यक पायनियर म्हणून नावे नोंदवली आहेत व सुवार्तेचा प्रचार करण्यात दिवसाला सरासरी दोन तास घालवण्याचा आनंद ते लुटतात. काहीजण हे काम नियमितपणे करतात, इतर वर्षातून काही वेळा करतात. याशिवाय इतरही हजारो नियमित पायनियर म्हणून सेवा करतात. राज्याच्या संदेशाची घोषणा करण्यात ते सरासरी दिवसाकाठी तीन तास खर्च करतात. खास पायनियर व मिशनरी म्हणून इतर काही राज्य-सेवेत याहून अधिक वेळ खर्च करतात. आणि प्रत्यक्ष क्षेत्रसेवेत असो वा नसो प्रत्येक सोईस्कर प्रसंगी, ऐकण्यास तयार असलेल्यांना राज्याची आशा देण्याची संधी आपण शोधू शकतो. (पडताळा योहान ४:७-१५.) “सर्व राष्ट्रांस साक्ष म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल,” या येशूच्या भविष्यवाणीच्या सूचितार्थाचा आपण सर्वांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे. आपल्या परिस्थितीत शक्य असेल तेवढे अधिक या कार्यात सहभागी होण्याची आपली इच्छा असली पाहिजे.—मत्त. २४:१४; इफिस. ५:१५-१७.
१५. आपल्या सेवेसंबंधी १ करिंथकर १५:५८ मधील उपदेश आजच्या वेळेला योग्य आहे असे तुम्हाला का वाटते?
१५ जगाच्या सर्व भागांमध्ये, मग ते कोणत्याही देशात राहणारे असोत, यहोवाचे साक्षीदार एकजुटीने सेवेच्या या मोठ्या विशेषाधिकारात सक्रीयपणे सहभागी होत आहेत. “प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहा; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा,” हा पवित्र शास्त्राचा उपदेश ते स्वत:ला लागू करतात.—१ करिंथ. १५:५८.
पुनरावलोकन चर्चा
• प्रथम देवाचे राज्य मिळवण्यासाठी झटण्यास येशूने सांगितले तेव्हा, कशाला दुसऱ्या स्थानावर ठेवावे असे तो सूचित करत होता?
• आपल्या व आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजा भागवण्याच्या बाबतीत कोणता दृष्टीकोण ठेवला पाहिजे? देव आपल्याला कोणती मदत देईल?
• राज्यसेवेत थोडेफार सहभागी होत असल्यास, त्यात आपण किती कार्य करतो याला महत्त्व आहे का? व का?
[अभ्यासाचे प्रश्न]