पुनरूत्थानाच्या आशेचे सामर्थ्य
अध्याय ९
पुनरूत्थानाच्या आशेचे सामर्थ्य
१. पुनरुत्थानामुळे कोणत्या भावी आशा शक्य झाल्या आहेत?
पुनरूत्थानाविना मृत मानवांना भावी जीवनाची कोणतीही आशा नाही. यहोवाने अपात्री कृपेच्या भावनेपोटी, मरण पावलेल्या करोडोंना अनंत जीवनाचा आनंद उपभोगण्याची अमोल संधी खुली केली आहे. परिणामतः मृत्युत निद्रावश झालेल्या आपल्या प्रियजनांना परत भेटण्याची सुखद आशा आपल्यालाही आहे.—पडताळा मार्क ५:३५, ४१, ४२; प्रे. कृत्ये ९:३६-४१.
२. (अ) यहोवाचा उद्देश अमलात आणण्यामध्ये पुनरूत्थान कोणकोणत्या मार्गांनी महत्त्वाचे ठरले आहे? (ब) पुनरूत्थानाची आशा विशेषतः कधी आपल्यासाठी बलाचा मोठा स्रोत असते?
२ पुनरूत्थानामुळे यहोवा, त्याच्या सेवकांना अक्षय हानी न होऊ देता, “मनुष्य आपल्या प्राणासाठी सर्वस्व देईल” हा सैतानाने आकसाने केलेला दावा सिद्ध करण्याच्या प्रयत्नात त्याला परिसीमेला जाऊ देतो. (ईयो. २:४) येशूला मृतातून उठवल्यामुळे आपल्या मानवी बलिदानाचे मोल तो त्याच्या पित्याच्या स्वर्गीय सिंहासनापुढे सादर करु शकला. त्यामुळे आपल्याला जीवनदायक फायदे मिळतात. पुनरुत्थानाने ख्रिस्ताच्या सहवारसांचा, स्वर्गीय राज्यात त्याच्याशी मिलाप होतो. आणि मृत्युला सामोरे नेणाऱ्या आपत्ती आपण सोसतो तेव्हा, आपणा विश्वासूंसाठी पुनरूत्थान हा सर्वसाधारण बळाच्या पलिकडच्या सामर्थ्याचा स्रोत असतो.
ख्रिस्ती विश्वासासाठी मूलभूत असण्याचे कारण
३. (अ) कोणत्या अर्थाने पुनरूत्थान हे एक “प्राथमिक तत्त्व” आहे? (ब) सर्वसाधारण जगाला पुनरुत्थानाबद्दल काय वाटते?
३ इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रात ६:१, २ मध्ये म्हटल्याप्रमाणे पुनरूत्थान हे विश्वासाच्या पायाचा भाग असलेले असे एक ‘प्राथमिक तत्त्व’ आहे की, ज्याविना आपण कधीही प्रौढ ख्रिस्ती होऊ शकणार नाही. पण जगातल्या सर्वसाधारण लोकांच्या विचाराशी ते विसंगत आहे. आध्यात्मिकतेची उणीव असल्याने अधिकाधिक लोक सुखलोलुप जीवन व्यतीत करत आहेत. फक्त सध्याचे जीवनच खरे जीवन आहे असे त्यांना वाटते. (१ करिंथ. १५:३२) ज्यामुळे पुनरूत्थान अनावश्यक ठरेल असा एक अमर जीव [सोल] त्यांच्यामध्ये आहे असे ख्रिस्ती धर्म-जगतामध्ये वा बाहेर, परंपरागत धर्मांना चिकटून राहणाऱ्यांना वाटते. जे कोणी या दोहोंची सांगड घालण्याचा प्रयत्न करतात त्यांना तसे करणे आशादायक असण्यापेक्षा अधिक घोटाळ्यात टाकणारे असल्याचे दिसून येते. जे ऐकण्यास तयार आहेत त्यांना आपण कशी मदत करू शकू?— प्रे. कृत्ये १७:३२.
४. (अ) पुनरुत्थानाचे महत्त्व त्याला कळण्यापूर्वी आपण एखाद्या व्यक्तीशी कशाची चर्चा करणे जरूरी आहे? (ब) जीव म्हणजे काय व मृतांची अवस्था यांचा खुलासा करण्यासाठी तुम्ही कोणत्या शास्त्रवचनांचा उपयोग कराल? (क) परंतु त्या शास्त्रवचनांतील सत्ये दुर्बोध वाटतील असे पवित्र शास्त्राचे भाषांतर कोणी वापरत असल्यास कसे?
४ पुनरूत्थानाची तरतूद किती अद्भुत आहे याची जाणीव अशा लोकांना होऊ शकण्यापूर्वी, जीव म्हणजे काय तसेच मृतांची अवस्था त्यांना समजण्याची गरज आहे. अनेकदा सत्यासाठी भुकेल्या व्यक्तीला, या गोष्टींचा खुलासा होण्यासाठी थोडीशी शास्त्रवचने पुरेशी असतात. (उत्प. २:७; यहे. १८:४; स्तोत्र. १४६:३, ४) परंतु पवित्र शास्त्राची काही आधुनिक भाषांतरे वा वेगळ्या शब्दात त्याचा मथितार्थ देणाऱ्या आवृत्त्या, या सत्यांना दुर्बोध करून टाकतात. ह्या कारणासाठी पवित्र शास्त्राच्या मूळ भाषांमध्ये योजलेल्या शब्दांचा विचार करण्याची गरज पडेल.
५. तशा व्यक्तीला जीव [सोल] चा अर्थ समजण्यास तुम्ही कशी मदत कराल?
५ तसे करताना न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशन विशेष उपयुक्त आहे, कारण इब्री भाषेतील नेफेश व त्याचा समानार्थी ग्रीक शब्द सुके यांचे भाषांतर त्यात सातत्याने “जीव” [सोल] असे करण्यात आले आहे. आणि त्याच्या परिशिष्टामध्ये, हे शब्द जेथे आढळतात त्या अनेक शास्त्रवचनांची सूची आहे. इतर आधुनिक भाषांतरांमध्ये त्याच मूळ शब्दांचे “जीव”च नव्हे तर “प्राणी,” “कोणी,” “व्यक्ती” व “जीवन” असेही भाषांतर केलेले असण्याची शक्यता आहे. तसेच, “माझा नेफेश”चे भाषांतर “मी” व “तुझा नेफेश”चे भाषांतर “तू” केले असण्याची शक्यता आहे. पवित्र शास्त्राच्या अशा भाषांतराची काही जुन्या भाषांतरांशी किंवा न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशनशी तुलना केल्यास, “जीव” [सोल] असे भाषांतर केलेले मूळ भाषेतील शब्द (१) व्यक्ती (२) प्राणी व (३) ते उपभोगत असलेले जीवन यांना संबोधून आहेत, हे समजण्यास एखाद्या प्रामाणिक विद्यार्थ्याला मदत होईल. परंतु जीव [सोल] मृत्युच्या वेळी शरीरातून निघून जाऊ शकणारा व जाणीवा टिकवून ठेऊन इतरत्र अस्तित्त्व असू शकणारा, अदृष्य व स्पर्श न करता येण्यासारखा आहे अशी कल्पना ते शब्द कधीही करून देत नाहीत.
६. (अ) काही आधुनिक भाषांतरामुळे शिओल, हेडिज व गेहेन्ना यांच्या अर्थाबद्दल वाचक गोंधळात का पडतात? (ब) शिओल वा हेडिज आणि गेहेन्ना यांमधील लोकांच्या स्थितीचा खुलासा तुम्ही पवित्र शास्त्रातून कसा कराल?
६ त्याचप्रमाणे, न्यू वर्ल्ड ट्रान्स्लेशन मध्ये सातत्याने इब्री शब्द शिʹओल हा रोमन लिपीमध्ये शिओल असा, ग्रीक शब्द हेʹडिज ही हेडिज असा व गेʹएन․ना देखील गेहेन्ना असा वापरला आहे. परंतु हेʹडिज व गेʹएन․ना या दोहोंचे भाषांतर “नरक”, व त्याशिवाय “कबर” व “मृतलोक” (अधोलोक) असेही करुन काही आधुनिक भाषांतरे व मथितार्थ इतर शब्दांत सांगणारी पवित्र शास्त्रे वाचकाला गोंधळात टाकतात. जरुर तेथे वेगवेगळ्या भाषांतराची तुलना करून दाखवता येते की शिओल व हेडिज हे समानार्थी शब्द आहेत. (स्तोत्र. १६:१०; प्रे. कृत्ये २:२७) मानवजातीची सर्वसाधारण कबर, म्हणजेच शिओल अथवा हेडिज यांचा संबंध मृत्युशी आहे, जीवनाशी नाही, असे पवित्र शास्त्र स्पष्ट करते. (स्तोत्र. ८९:४८; प्रकटी. २०:१३) पुनरूत्थानाद्वारे तेथून परतण्याच्या भावी शक्यतेकडेही ते इशारा करते. (ईयो. १४:१३; प्रे. कृत्ये २:३१) या उलट, गेहेन्नामध्ये जाणाऱ्यांसाठी भावी जीवनाची आशा ठेवलेली नाही, आणि तेथे असताना जिवाला जाणीवयुक्त अस्तित्व असते असे अर्थातच म्हटलेले नाही.—मत्त. १८:९; १०:२८.
७. पुनरूत्थानाचा अर्थ नीट कळल्याने एखाद्या व्यक्तीच्या मनोवृत्तीवर आणि कृतींवर कसा प्रभाव पडू शकतो?
७ या गोष्टींचा खुलासा झाल्यावर ख्रिस्ताच्या मृत्यु व पुनरुत्थानाला खरा अर्थ प्राप्त होतो. पुनरूत्थानाचा त्याच्यासाठी काय अर्थ होऊ शकेल याचे आकलन होण्यास आता एखाद्या व्यक्तीला मदत करता येते. व अशी अद्भुत तरतूद करण्यामागील यहोवाच्या प्रेमाची त्याला जाणीव होऊ शकते. मृत्युत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत अशांना होणाऱ्या दुःखाची जागा आता, देवाच्या नवीन व्यवस्थेमध्ये, पुनर्भेटीची आनंदी आशा घेऊ शकेल. पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांच्या लक्षात आले की, येशू ख्रिस्ताचे पुनरूत्थान ही ख्रिस्ती विश्वासाची एक कोनशिला होती. त्याबद्दल आणि त्याने निश्चित केलेल्या आशेबद्दल त्यांनी इतरांना उत्साहाने साक्ष दिली. त्याचप्रमाणे आज त्याची कदर करणारे, हे बहुमोल सत्य इतरांना सांगण्यास उत्सुक आहेत.—प्रे. कृत्ये ५:३०-३२; १०:४०-४३; १३:३२-३९; १७:३१.
‘अधोलोकाच्या किल्ल्या’ वापरणे
८. “मृत्युच्या व अधोलोकाच्या किल्ल्या” येशूने वापरण्याचा त्याच्या, आत्म्याने अभिषिक्त अनुयायांसाठी काय अर्थ होतो?
८ त्याच्या स्वर्गीय राज्यात जे सर्व ख्रिस्तासोबत राहणार आहेत त्यांना अखेरीस मेलेच पाहिजे. परंतु, “मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे. आणि मरणाच्या व अधोलोकाच्या [“हेडिज,” न्यू.व.] किल्ल्या माझ्याजवळ आहेत.” असे प्रेषित योहानाला तो म्हणाला तेव्हा त्याने दिलेले आश्वासन त्यांना चांगले ठाऊक आहे. (प्रकटी. १:१८) त्याच्या बोलण्याचा अर्थ काय? तो स्वतःच्या अनुभवाकडे त्यांचे लक्ष वेधत होता. तोही मेला होता. पण देवाने त्याला अधोलोकातच [हेडिज] सोडून दिले नाही. तिसऱ्या दिवशी यहोवाने स्वतः त्याला आत्मिक जीवनात उठवले व अमरत्व बहाल केले. एवढेच नव्हे तर मानवजातीच्या सर्वसाधारण कबरेतून व आदामामुळे आलेल्या पापाच्या परिणामांपासून इतरांना सोडवण्यासाठी वापरण्यास “मरणाच्या व अधोलोकाच्या [“हेडिज,” न्यू.व.] किल्ल्या” देवाने त्याला दिल्या. या किल्ल्यांवर ताबा असल्याने येशू त्याच्या विश्वासू अनुयायांना मृतातून उठवू शकतो. तसे तो करील तेव्हा, त्याच्या पित्याने त्याला बहाल केल्याप्रमाणे तोही त्याच्या मंडळीच्या, आत्म्याने अभिषेक झालेल्या सभासदांना अमर स्वर्गीय जीवनाची बहुमोल भेट देईल.—रोम. ६:५; फिलिप्पै. ३:२०; २१.
९. विश्वासू अभिषिक्त ख्रिश्चनांचे पुनरूत्थान कधी होते?
९ विश्वासू अभिषिक्त ख्रिश्चनांना त्या पुनरूत्थानाचा अनुभव कधी मिळतो? ते आधीच सुरू झालेले आहे. प्रेषित पौल खुलासा करतो की, “त्याच्या [ख्रिस्ताच्या] उपस्थितीच्या काळी” ते उठवले जातील. ती उपस्थिती इ.स. १९१४ मध्ये सुरू झाली. (१ करिंथ. १५:२३, न्यू.व.) आता, त्यांचे भूतलावरचे जीवन संपले की त्यांचा प्रभू परतेपर्यंत त्यांना मृत्युत वाट पाहावी लागत नाही. त्यांचे निधन झाल्याबरोबर “क्षणात, निमिषात” बदलले जाऊन आत्म्यात त्यांना उठवले जाते. त्यांना मोठा आनंद लाभतो कारण “त्यांची कृत्ये त्यांच्याबरोबर जातात”!—१ करिंथ. १५:५१, ५२; प्रकटी. १४:१३.
१०. दुसरे कोणते पुनरूत्थान असेल व ते कधी सुरू होईल?
१० पण त्यांचे पुनरूत्थान हेच एकमेव पुनरूत्थान नव्हे. त्याला ‘पहिले पुनरुत्थान’ म्हटले आहे यावरुनच त्याच्यामागून दुसरे झाले पाहिजे हे दिसून येते. (प्रकटी. २०:६) या दुसऱ्या पुनरूत्थानाचा लाभ मिळणाऱ्यांच्या समोर नंदनवनमय पृथ्वीवरील अनंत जीवनाची आनंददायक आशा असेल. ते पुनरुत्थान कधी होईल? प्रकटीकरणाचे पुस्तक दर्शवते की सध्याच्या दुष्ट व्यवस्थेची “पृथ्वी व आकाश” ही नाहीशी केल्यावर ते घडेल. जुन्या व्यवस्थेचा तो अंत अत्यंत निकट आहे. त्यानंतर देवाच्या नियुक्त वेळी पृथ्वीवरील पुनरूत्थानाची सुरूवात होईल.—प्रकटी. २०:११, १२.
११. पृथ्वीवर जीवनासाठी उठवलेल्या विश्वासू लोकांमध्ये कोणाकोणाचा समावेश असेल, आणि ती भावी आशा रोमांचकारी का आहे?
११ त्यात कोणाकोणाचा समावेश होईल? अगदी सुरुवातीच्या काळातल्या यहोवाच्या विश्वासू सेवकांचा. त्यांच्यामध्ये काही, जे पुनरूत्थानावरील त्यांच्या बळकट विश्वासामुळे, मृत्युपासून बचाव व्हावा म्हणून आपले सत्त्व धोक्यात टाकणाऱ्या कृत्यांची “[“काहीतरी,” न्यू.व.] खंडणी भरून मिळणारी सुटका” स्वीकारण्यास तयार नव्हते असे लोक असतील. (इब्री. ११:३५) त्यांना व्यक्तिशः जाणणे, आणि पवित्र शास्त्रात ज्यांची फारच थोडी माहिती दिलेली आहे अशा घटनांचा तपशील प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकणे किती हर्षदायक असेल! अशा लोकांमध्ये यहोवाचा पहिला विश्वासू साक्षीदार हाबेल असेल. जलप्रलयापूर्वी, इशारा देणाऱ्या देवाच्या संदेशाची निडरपणे घोषणा करणारे हनोख व नोहा. स्वर्गदूतांचे आदरातिथ्य करणारा अब्राहाम. सिनाय पर्वतापाशी ज्याच्यामार्फत नियमशास्त्र देण्यात आले तो मोशे. इ.स. पूर्वी ६०७ मध्ये यरुशलेमचा नाश ज्याने पाहिला त्या यिर्मयासारखे धैर्यवान संदेष्टे. आपला पुत्र अशी येशूची ओळख करुन देताना प्रत्यक्ष देवाचा आवाज ऐकणारा बाप्तिस्मा करणारा योहान. तसेच सध्याच्या व्यवस्थेच्या या शेवटल्या काळात मरण पावलेले एकनिष्ठ लोकही असतील.—इब्री. ११:४-३८; मत्त. ११:११.
१२. (अ) अधोलोकामधले किती मृत उठवले जातील? (ब) याचा अर्थ त्यांत कोणाचा समावेश असेल? व का?
१२ यथाकाळी इतरांनाही उठवण्यात येईल. प्रेषित योहानाला दिलेल्या एका दृष्टांतामध्ये मानवजातीच्या फायद्याकरिता “अधोलोकाच्या किल्ल्या” येशू किती प्रमाणात वापरील ते दाखवले आहे. त्यात अधोलोक “अग्नीच्या सरोवरात” टाकलेला त्याने पाहिला. त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ, त्याचा नाश केला जातो; संपूर्ण रिकामा केल्यामुळे तो अस्तित्त्वात राहात नाही. अशा रीतीने दयाळूपणाने अधोलोकातून [हेडिज अथवा शिओलमधून] यहोवाच्या विश्वासू सेवकांना उठवण्याव्यतिरिक्त अनीतिमानांनाही येशू परत आणील. यांच्यापैकी कोणालाही केवळ मृत्युदंड देण्यासाठी उठवण्यात येत नाही. देवाच्या राज्याखालच्या नीतिमान वातावरणात आपले जीवन यहोवाच्या मार्गानुरूप करण्यात त्यांना मदत केली जाईल. त्या दृष्टांतात ‘जीवनाचे पुस्तक’ उघडलेले दाखवले आहे. आणि त्यात आपल्या नावाचा समावेश करुन घेण्याची संधी त्यांना मिळेल. पुनरूत्थानानंतर केलेल्या “ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे” त्यांचा न्याय होईल. (प्रकटी. २०:१२-१४; प्रे. कृत्ये २४:१५) अंतिम परिणामाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यांचे पुनरूत्थान ‘जीवनाचे पुनरूत्थान’ ठरू शकते व अटळपणे ‘न्यायाचे [दोषी ठरवणारे] पुनरूत्थान’ होणार नाही.—योहा. ५:२८, २९.
१३. (अ) कोणाचे पुनरूत्थान होणार नाही? (ब) पुनरूत्थानाच्या सत्याविषयीच्या ज्ञानाने आपल्या जीवनावर कसा परिणाम व्हावा?
१३ अर्थात, आतापर्यंत होऊन गेलेल्या सर्वांचेच पुनरूत्थान होणार नाही. ज्यासाठी क्षमा शक्य नाही अशी पापे काहींनी केली. आता नजिकच असलेल्या ‘मोठ्या संकटा’ मध्ये ज्यांचा नाश केला जाईल त्यांचा, कायमचा नाश होणाऱ्यांमध्ये समावेश असेल. (मत्त. १२:३१, ३२; २३:३३; २४:२१, २२; २५:४१, ४६; २ थेस्सलनी. १:६-९) अशा रीतीने, अधोलोकात असलेल्यांना मुक्त करण्यात असामान्य दया दर्शवली असली तरी, आज आपण कसे जगतो याबद्दल बेपर्वा राहण्यास पुनरूत्थान काहीही आधार देत नाही. याउलट, देवाच्या या कृपेची आपल्याला किती सखोल जाणीव आहे ते प्रदर्शित करण्यात आपण प्रवृत्त व्हावे.
पुनरूत्थानाच्या आशेने बलवान होणे
१४. सध्याच्या जीवनाचा अंत निकट आलेल्या व्यक्तीला पुनरूत्थान हे मनोबलाचे स्रोत कसे ठरु शकेल?
१४ पुनरूत्थानाच्या आशेला आत्मसात करणाऱ्यांना त्यापासून मोठे बल प्राप्त होऊ शकते. जीवनाचा अंत जवळ आल्यावर, कोणतेही वैद्यकीय उपचार केले तरी, त्यांना मृत्युला अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलता येणे शक्य नाही, हे त्यांना ठाऊक असते. (उप. ८:८) प्रभूच्या कामात मग्न राहून त्याच्या संस्थेसोबत विश्वासूपणे सेवा केलेली असल्यास ते संपूर्ण खात्रीने भविष्याकडे पाहू शकतात. पुनरुत्थानाद्वारे, देवाच्या नेमलेल्या समयी ते जीवनाचा पुन्हा उपभोग घेतील हे त्यांना ठाऊक आहे. आणि ते जीवन किती उत्तम असेल! त्यालाच प्रेषित पौलाने “खरे जीवन” म्हटले.—१ तीम. ६:१९; १ करिंथ. १५:५८; इब्री. ६:१०-१२.
१५. हिंसक छळवाद्यांकडून धोका संभवल्यावर यहोवाशी एकनिष्ठ राहण्यासाठी आपल्याला कशाची मदत होऊ शकेल?
१५ पुनरूत्थान असल्याची केवळ माहितीच नव्हे तर त्या तरतुदीचा स्रोत असलेल्या व्यक्तीला जाणल्याने आपण बलवान होतो. हिंसक छळवाद्यांच्या हातून मरण्याचा धोका असला तरी त्यामुळे देवाशी एकनिष्ठ राहण्यास आपल्याला बळकटी येते. लोकांना आपल्या दास्यत्वात जखडून ठेवण्यासाठी सैतानाने फार पूर्वीपासून अकाली मृत्युच्या भीतीचा उपयोग केला आहे. परंतु येशू अशा भीतीपुढे नमला नाही; मृत्युपर्यंत तो यहोवाशी एकनिष्ठ राहिला. त्याच्या मृत्युने साध्य झालेल्या गोष्टीची तरतुद त्याने, इतरांना अशा भीतीपासून मुक्त करण्यासाठी केली. (इब्री. २:१४, १५) त्या तरतुदीवरचा, त्यांच्या विश्वासाचा परिणाम म्हणून त्याच्या खऱ्या अनुयायांनी सत्त्व टिकवणारे या नात्याने एक ठळक इतिहास घडवला आहे. दबावात टाकल्यावर त्यांनी सिद्ध केले आहे की यहोवापेक्षा अधिक “त्यांनी आपल्या जिवावर प्रीती केली नाही.” (प्रकटी. १२:११) सूज्ञपणे, ते आपले सध्याचे जीवन वाचवण्याचा—ख्रिस्ती तत्त्वे सोडून व त्यामुळे सार्वकालिक जीवनाची आशाच गमावून—प्रयत्न करत नाहीत. (लूक ९:२४, २५) तुमचा विश्वास अशा प्रकारचा आहे का? तुमची यहोवावर खरी प्रीती असेल आणि पुनरूत्थानाच्या आशेचा आपल्यासाठी अभिप्रेत असलेला अर्थ तुम्ही मनावर घेतला असल्यास तुमचा विश्वास तसा होईल.
पुनरावलोकन चर्चा
• पुनरूत्थानाचे महत्त्व कळण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला, जीव म्हणजे काय, तसेच मृतांची अवस्था, या गोष्टी समजण्याची गरज का आहे?
• मृतातून कोण कोण परत येईल? या ज्ञानाचा आपल्यावर कसा परिणाम व्हावा?
• पुनरूत्थानाची आशा आपल्याला बलवान कशी करते?
[अभ्यासाचे प्रश्न]