व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचा दिवस ध्यानात असू द्या

यहोवाचा दिवस ध्यानात असू द्या

अध्याय २३

यहोवाचा दिवस ध्यानात असू द्या

१. (अ) या जुन्या व्यवस्थेच्या चिंतापासून लवकरच मुक्‍तता मिळणार असल्याचे प्रथम कळले तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? (ब) या संबंधात आपण कोणत्या प्रश्‍नांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे?

 सध्याच्या व्यवस्थेमधल्या जीवनाच्या चिंतांपासून लवकरच मुक्‍तता मिळणार आहे, ही गोष्ट पवित्र शास्त्राच्या अभ्यासात सुरूवातीलाच तुम्ही शिकलात, यात शंका नाही. (लूक २१:२८) सर्व पृथ्वीवर नंदनवन असावे असा देवाचा उद्देश असल्याचे तुमच्या ध्यानात आले. गुन्हे, युद्धे, आजारपण व मृत्यू यांचा अंत होईल आणि मरण पावलेल्या जिवलग व्यक्‍ती पुन्हा जिवंत होतील. किती हर्षदायक आहे ही आशा! इ.स. १९१४ मध्ये शासनकर्ता राजा म्हणून ख्रिस्ताच्या अदृश्‍य उपस्थितीची सुरूवात झाली आणि तेव्हापासून आपण या दुष्ट जगाच्या शेवटल्या काळात आहोत या पुराव्याने, या सर्व गोष्टींच्या समीपतेवर जोर दिला. या माहितीने तुमच्या जीवनात फरक घडवून आणला आहे का? “यहोवाचा दिवस” जवळ आहे, अशी ठाम खात्री तुमच्या जीवनसरणीने खरोखर दिसून येते का?

२. (अ) “यहोवाचा दिवस” कधी येईल? (ब) यहोवाने ‘तो दिवस व ती घटका,’ उघड केली नाही, ही गोष्ट कशी हितकारक ठरली आहे?

ख्रिस्ताच्या उपस्थितीचा आरंभ ज्या “पिढी”ने पाहिला, तीच अधार्मिकता आचरणाऱ्‍या सर्वांना देव जेव्हा शासन करील तो “परमेश्‍वराचा [“यहोवाचा,” न्यू.व.] मोठा दिवस”ही पाहील, असे शास्त्रवचने स्पष्ट दाखवितात. (मत्त. २४:३४; सफ. १:१४–२:३) पिढी आता बरीच वयस्क झाली आहे. परंतु पृथ्वीवरील सैतानाच्या व्यवस्थेविरूद्ध यहोवाचा दंडाधिकारी म्हणून ख्रिस्त कधी येईल तो नेमका दिवस पवित्रशास्त्र सांगत नाही. येशू म्हणाला, “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गांतील देवदूतांस नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे.” (मार्क १३:३२) हे फारच हितावह असल्याचे सिद्ध झाले आहे. ते कसे? त्यामुळे लोकांच्या मनात काय आहे ते स्पष्ट होण्यास मदत झाली आहे. जे कोणी यहोवावर खरोखर प्रीती करत नाही त्यांच्या मनाचा कल, त्याचा “दिवस” पुढे ढकलण्याकडे आणि त्यांच्या मनास भावणाऱ्‍या ऐहिक उद्योगांकडे वळण्याचा असतो. पण जे त्याच्यावर खरोखर प्रीती करतात आणि या दुष्ट व्यवस्थेचा अंत कधी होईल याची पर्वा न करता तन-मनाने त्याची सेवा करून ती व्यक्‍त करतात, अशांनाच यहोवा, त्याचे सेवक म्हणून मान्यता देतो. उदासीन व द्विधा मनाच्या लोकांना देव आणि त्याच्या पुत्राची मान्यता नसते.—प्रकटी. ३:१६; स्तोत्र. ३७:४; १ योहा. ५:३.

३. या बाबतीत आपल्याला इशारा देण्यासाठी येशूने काय म्हटले?

यहोवावर प्रीती करणाऱ्‍यांना सावधानतेचा इशारा देताना येशू म्हणाला: “सावध असा, जागृत राहा; कारण तो समय केव्हां येईल हे तुम्हाला ठाऊक नाहीं.” (मार्क १३:३३-३७) काळाच्या गांभिर्याकडे दुर्लक्ष व्हावे, इतके आपले लक्ष, खाणे पिणे व “संसाराच्या चिंता” यांच्यामध्ये गुरफटू नये, असे तो आपल्याला आग्रहाने सांगतो.—लूक २१:३४-३६; मत्त. २४:३७-४२.

४. पेत्राने खुलासा केल्याप्रमाणे, “यहोवाचा दिवस” काय करील?

त्या नंतर, ‘वाट पहा व यहोवाचा दिवस ध्यानात असू द्या. त्या दिवसामुळे आकाश, जळून लयास जाईल आणि सृष्टितत्वे तप्त होऊन वितळतील,’ असा सल्ला प्रेषित पेत्राने खरा विश्‍वास असणाऱ्‍या सर्वांना दिला. ‘यहोवाचा दिवस’ नजिक आहे या वस्तुस्थितीला आपण कोणीही कमी लेखू नये. असलेले शासकीय दृश्‍य आकाश व दुष्ट मानवी समाज यांची जागा देवाने बनवलेले “नवे आकाश व नवी पृथ्वी” लवकरच घेणार आहेत. आणि “यहोवाच्या दिवसा”च्या विध्वंसक उष्णतेमध्ये या ऐहिक व्यवस्थेसोबतच्या सर्व ‘सृष्टितत्वां’चा—त्यांची स्वतंत्र प्रवृत्ती, त्यांची अनैतिक व संसारिक राहणी यांचा—अंत करण्यात येईल. (२ पेत्र ३:१०-१३, न्यू.व.) जगाला चक्काचूर करणाऱ्‍या या घटना कोणत्याही क्षणी सुरू होतील याची जाणीव ठेवून आपण सावध राहण्याची गरज आहे.—मत्त. २४:४४.

चिन्हाची पूर्णता करणाऱ्‍या घटनांच्या बाबतीत जागरूक राहा

५. (अ) मत्तय २४:३ मधील प्रश्‍नाला येशूने दिलेले उत्तर, यहुदी व्यवस्थेच्या अंताला किती प्रमाणात लागू होत होते? (ब) त्याच्या उत्तराचे कोणते भाग इ.स. १९१४ नंतरच्या घटनांवर लक्ष केंद्रित करतात?

विशेषतः आपल्या काळाचा विचार करता, ‘शेवटल्या काळा’ची अथवा “ह्‍या युगाच्या समाप्ती”ची ओळख घडवणाऱ्‍या संमिश्र चिन्हाच्या बारीकसारीक तपशीलाची आपल्याला चांगली माहिती असली पाहिजे. ते चिन्ह अचूकपणे समजण्यासाठी, आपण ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, मत्तय २४:३ येथे नोंदलेल्या त्याच्या शिष्यांच्या प्रश्‍नाला येशूने उत्तर दिले तेव्हा, त्याने सांगितलेल्या काही गोष्टी पहिल्या शतकातल्या यहुदी व्यवस्थेच्या अंताला लागू झाल्या. परंतु मुख्यत्वे त्या बऱ्‍याच नंतरच्या काळाला लागू होत होत्या. वचन ४ ते २२ मध्ये त्याने सांगितलेल्या गोष्टींची छोट्या प्रमाणावरील पूर्णता इ.स. ३३ ते ७०च्या दरम्यान झाली. परंतु त्या भविष्यवाणीची मोठ्या प्रमाणावरील पूर्णता आपल्या काळात असून इ.स. १९१४ पासूनचा काळ हाच ख्रिस्ताच्या ‘येण्याचा व ह्‍या युगाच्या समाप्तीचा’ काळ असल्याची ओळख पटवतो. (तसेच मार्क १३:५-२० आणि लूक २१:८-२४) इ.स. ७०पासून ख्रिस्ताच्या उपस्थितीच्या काळापर्यंत काय घडेल ते मत्तय २४:२३-२८ मध्ये सांगितले आहे. (तसेच मार्क १३:२१-२३) मत्तय २४:२९ पासून २५व्या अध्यायाच्या शेवटापर्यंत वर्णन केलेल्या घडामोडी इ.स. १९१४ पासून पुढल्या काळाकडे इशारा करतात.—तसेच मार्क १३:२४-३७ आणि लूक २१:२५-३६.

६. (अ) चालू घटना ते “चिन्ह” कसे पूर्ण करतात, याबाबत आपण व्यक्‍तिशः जागरूक का असले पाहिजे? (ब) १९१४ पासून ते “चिन्ह” कसे पूर्ण झाले आहे ते दाखवण्यासाठी या परिच्छेदाच्या शेवटी दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे द्या.

‘चिन्हा’ची पूर्णता करणाऱ्‍या चालू घटनांवर आपण व्यक्‍तिशः सूक्ष्म नजर ठेवली पाहिजे. या घटनांचा पवित्र शास्त्राच्या भविष्यवादाशी संबंध लावल्यास यहोवाचा दिवस ‘ध्यानात ठेवण्या’स आपल्याला मदत होईल. तसेच “देवाचा सूड घेण्याचा दिवस” जवळ असल्याबद्दल इतरांना इशारा देताना, त्यांचे मन वळवण्याची कुवतही आपल्याला प्राप्त होईल. (यश. ६१:१, २) मनामध्ये ही उद्दिष्टे ठेवून, ‘चिन्हा’च्या खालील पैलूंचा आढावा घ्या.

 इ.स. १९१४ पासून पूर्वघोषित, ‘राष्ट्रावर राष्ट्राचे व राज्यावर राज्याचे’ उठणे कसे विलक्षणरित्या पूर्ण झाले? अलिकडच्या महिन्यांमध्येही त्या पूर्णतेत भर घालील असे काय घडले आहे?

 विसाव्या शतकातल्या वैज्ञानिक माहितीच्या पश्‍चातही अन्‍न-टंचाईने जगाला किती प्रमाणात प्रभावित केले आहे?

 इ.स. १९१४पासून, जागोजागी होणाऱ्‍या भूकंपांच्या प्रमाणात खरोखरच काही फरक पडला आहे का?

 कोणत्या संसर्गजन्य रोगाने महायुद्धापेक्षा अधिक बळी १९१८ मध्ये घेतले? वैद्यकीय ज्ञान उपलब्ध असले तरी कोणते रोग अजूनही साथींच्या प्रमाणावर आहेत?

 लूक २१:२६ मध्ये पूर्वसूचना दिल्यानुसार, लोक घाबरून गर्भगळित झाले असल्याचा कोणता पुरावा तुम्हाला दिसतो?

 तीमथ्याच्या दुसऱ्‍या पत्रातील ३:१-५ मध्ये वर्णन केलेली परिस्थिती, केवळ राहणीची नेहमीची पद्धत नसून जसजसे आपण शेवटल्या काळाच्या अंताकडे सरकत आहोत तशी, ती धक्कादायक प्रमाणापर्यंत विकोपाला जात आहे, याचे प्रमाण तुम्हाला कशाने मिळते?

लोकांचे विभाजन करणे

७. (अ) मत्तय १३:३६-४३ येथे वर्णन केलेल्या कोणत्या इतर घटनेचा संबंध येशूने या व्यवस्थेच्या अंताशी लावला? (ब) त्या दाखल्याचा अर्थ काय?

येशूने ह्‍या युगाच्या अंताशी ठळकपणे जोडलेल्या इतरही महत्वाच्या घटना आहेत. ‘राज्याच्या पुत्रां’ना ‘दुष्टाच्या पुत्रां’पासून अलग करणे ही त्यातली एक होय. वैऱ्‍याने मागाहून निदण पेरलेल्या गव्हाच्या शेताबद्दल येशूने दिलेल्या दाखल्यात त्याने हे सांगितले. या दाखल्यात “गहू”, खऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांचे प्रतिनिधित्व करतात. “निदण”, हे खोटे ख्रिस्ती होत. युगाच्या समाप्तीच्या वेळी “निदण,” ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे, परंतु दियाबल ज्याचा राजा आहे अशा जगाला चिटकून राहात असल्यामुळे स्वतःला ‘दुष्टाचे पुत्र’ शाबित करणारे—‘[देवाच्या] राज्याच्या पुत्रां’पासून अलग केले जातात व नाशासाठी नेमले जातात. (मत्त. १३:३६-४३) हे खरोखर घडले आहे का?

८. (अ) पहिल्या महायुद्धानंतर, ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या सर्वांना कसे विभागले गेले? (ब) ते खरोखरच “राज्याचे पुत्र” असल्याचा पुरावा खऱ्‍या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांनी कसा दिला?

पहिल्या महायुद्धानंतर ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्‍या सर्व लोकांना दोन वर्गात विभाजित करण्याचे मोठे काम खरोखरी झाले: (१) त्यांच्या राष्ट्रवादावरची पकड घट्ट ठेवून (आता संयुक्‍त राष्ट्रसंघ असलेल्या) लीग ऑफ नेशन्सला समर्थन देणारे ख्रिस्ती धर्मजगताचे पाद्री आणि त्यांचे अनुयायी. (२) त्या युद्धोत्तर काळातही, देवाच्या मसीही राज्याला संपूर्ण समर्थन देणारे खरे अभिषिक्‍त ख्रिस्ती तुलनात्मक दृष्ट्या थोडेच, असे होते. शांती व सुरक्षा साध्य करण्याचे एकमेव साधन म्हणून जगाच्या सरकारांना उघड समर्थन देऊन पहिल्या वर्गाने स्पष्ट केले की, ते खरे ख्रिस्ती नव्हते. (योहान १७:१६) या उलट, मत्तय २४:१५ मध्ये उल्लेखलेल्या, आधुनिक काळातला “ओसाडीचा अमंगळ पदार्थ” म्हणून यहोवाच्या सेवकांनी, लीग ऑफ नेशन्सची यथोचित ओळख करून दिली. स्वतः “[देवाच्या] राज्याचे पुत्र” असल्याचे प्रकट करून, “सर्व जगात” ‘राज्याच्या या सुवार्ते’चा प्रचार ते करू लागले. (मत्त. २४:१४) त्याचा परिणाम काय झाला?

९. या राज्य-प्रचाराच्या कार्याचा पहिला परिणाम कोणता?

प्रथम, “निवडलेल्या”पैकी, म्हणजेच आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपैकी, शेष जणांना गोळा केले गेले. राष्ट्रांमध्ये, जणू “चाऱ्‍ही दिशां”ना दूरवर पांगलेले असले तरी, स्वर्गदूतांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना संघटनात्मक ऐक्यात आणले गेले.—मत्त. २४:३१.

१०. (अ) पुढील विभाजनाचे काम कसे व कोणत्या भविष्यवादाला अनुसरून करण्यात आले? (ब) या भविष्यवादांची पूर्णता काय सूचित करते?

१० मग, येशूने पूर्वसूचना दिल्याप्रमाणे, जसा “मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करितो” तसा तो सर्व राष्ट्रातील लोकांना वेगळे करू लागला. त्याच्या स्वर्गीय सिंहासनावरून, ख्रिस्ताकडून मार्गदर्शन मिळालेले हे कार्य, आजतागायत चालू आहे. आणि व्यक्‍तिशः तुमच्यावर त्याचा प्रभाव पडतो. मानवजातीतले बहुसंख्य लोक देवाच्या राज्याला व आत्म्याने अभिषिक्‍त अशा त्याच्या ‘पुत्रां’ना झिडकारतात. व म्हणून ते मृत्यूमध्ये, ‘सार्वकालिक शिक्षे’च्या हवाली केले जातील. तथापि, सार्वकालिक जीवनाच्या आशेने त्याच्या राज्याचा पृथ्वीवरील प्रदेश वतन करून घेण्यासाठी प्रभू इतरांना पाचारण करील. ‘राज्याचे अभिषिक्‍त पुत्र’ क्रूर छळाचे लक्ष्य असले तरी, असे मेंढरांसारखे लोक त्यांच्या संगतीने राहिले आहेत. (मत्त. २५:३१-४६) देवाच्या राज्याच्या या अत्यावश्‍यक संदेशाला प्रसिद्धी देण्यासाठी निष्ठेने ते त्यांना मदत करतात. आज देवाच्या राज्याचा संदेश जगाच्या टोकापर्यंत ऐकू जात आहे. या घटनांचा अर्थ काय? याचा अर्थ असा की, आपण “शेवटल्या काळा”च्या अंताच्या अगदी जवळ आहोत, आणि “यहोवाचा दिवस” निकट आहे.

भविष्यात काय आहे?

११. “यहोवाचा दिवस” येण्यापूर्वी, आणखी प्रचाराचे काम करायचे आहे का?

११ यहोवाचा मोठा व भयंकर दिवस सुरू होण्यापूर्वी अजूनही काही भविष्यवाण्या पूर्ण व्हावयाच्या आहेत का? होय! देवाच्या राज्यासंबंधाने लोकांचे विभाजन करण्याचे काम अजून संपलेले नाही. अनेक वर्षे ज्या प्रांतात प्रखर विरोध अनुभवला गेला, तेथे आता शिष्यांचे अमाप पीक मिळत आहे. आणि जेथे लोक सुवार्तेचा अव्हेर करतात तेथेही, आपण साक्ष देत राहिल्याने यहोवाचा न्याय व त्याची दया उंचावले जातात. तेव्हा, लागा कामाला! काम पूर्ण झाले की, “शेवट होईल,” अशी हमी येशू आपल्याला देतो.—मत्त. २४:१४.

१२. (अ) पहिले थेस्सलनी ५:२, ३ येथे दर्शवल्याप्रमाणे, लक्षात घेण्यासारखी कोणती घटना अजून घडावयाची आहे? (ब) तिचा आपल्यासाठी काय अर्थ असेल?

१२ पवित्र शास्त्रातली आणखी एक अत्यंत महत्त्वाची भविष्यवाणी सांगते: “शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हां गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात्‌ वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात्‌ नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.” (१ थेस्सलनी. ५:२, ३) ‘शांती व निर्भयते’ची ती घोषणा कोणते स्वरूप धारण करील हे अजून कळलेले नाही. पण जागतिक पुढाऱ्‍यांनी मानवजातीच्या समस्या खरोखरच सोडवल्या आहेत असा त्याचा अर्थ निश्‍चितच नसेल. त्या घोषणेने, यहोवाच्या दिवसावर ‘ध्यान देणाऱ्‍यां’ची दिशाभूल होणार नाही. त्यांना माहीत आहे की, त्यानंतर “आकस्मात नाश” होईल.

१३. ‘शांती व निर्भयते’च्या घोषणेनंतर तात्काळ कोणत्या घटना कशा क्रमाने घडतील?

१३ शास्त्रवचनांनी दाखवल्याप्रमाणे, प्रथम जागतिक प्रमाणावर राजकीय शासक मोठ्या बाबेलवर, म्हणजेच खोट्या धर्माच्या जागतिक साम्राजावर, उलटतील आणि तिला नामशेष करतील. (प्रकटी. १७:१५, १६) धर्मांविरूद्ध, विशेषतः ख्रिस्ती धर्मजगातल्या धर्मांविरूद्ध, प्रतिकूल वृत्ती सध्याच दिसून येत आहे, ही गोष्ट खरोखर लक्षात घेण्यासारखी आहे. धर्मविरोधी प्रखर धोरणे असलेली सरकारे याआधीच संयुक्‍त राष्ट्रसंघामध्ये मोठा प्रभाव टाकत आहेत, आणि परंपरागत धार्मिक देशांमध्ये स्वतः जनता मोठ्या प्रमाणात त्यांच्या पूर्वापार धर्माचा त्याग करत आहे. या सर्वाचा अर्थ काय? असा की, सर्व खोट्या धर्माचा विध्वंस निकट आहे. त्यानंतर उद्धटपणे राष्ट्रे सर्व बळानिशी, यहोवाच्या सार्वभौमत्वाला उचलून धरणाऱ्‍यांवर तुटून पडतील तेव्हा, त्या राजकीय शासनांवर व त्यांच्या समर्थकांवर दैवी प्रकोप कोसळेल. परिणामी त्या सर्वांचा समूळ नाश होईल. शेवटी, प्रत्यक्ष सैतानाला त्याच्या दुरात्म्यांसह अथांग डोहात टाकले जाईल, मानवजातीला प्रभावित करण्यापासून पूर्णपणे रोखले जाईल. तो खरोखरच ‘यहोवाचा दिवस’, त्याचे नाव उच्चस्थानी विराजण्याचा दिवस, असेल.—यहे. ३८:१८, २२, २३; प्रकटी. १९:११-२०:३.

१४. यहोवाचा दिवस अजून खूप दूर आहे असा विचार करणे वेडेपणाचे का ठरेल?

१४ तो दिवस देवाच्या वेळापत्रकारानुसार, अचूक वेळी येईल. तो उशीर करणार नाही. (हब. २:३) ध्यानात ठेवा की, इ.स. ७० मध्ये अनपेक्षितपणे, धोका टळला आहे असे यहुद्यांना वाटत असताना, शीघ्रतेने विनाश आला. आणि प्राचीन बाबेलचे काय झाले? ते सामर्थ्यवान, आणि प्रचंड तटांनी बंदिस्त होते. पण एका रात्रीत त्याचा पाडाव झाला. त्याचप्रमाणे, या सद्य दुष्ट व्यवस्थेवर “अकस्मात्‌ नाश” ओढवेल. तसे होईल तेव्हा, यहोवाच्या दिवसाकडे ‘चित्त लावल्या’मुळे आपण खऱ्‍या भक्‍तीमध्ये एकत्रित आढळावे.

पुनरावलोकन चर्चा

• यहोवाचा दिवस ‘ध्यानात ठेवणे’ अत्यावश्‍यक का आहे? ते आपण कसे करू शकतो?

• लोकांना विभक्‍त करण्याचे जे काम चालले आहे, त्याने व्यक्‍तिशः आपल्यावर काय परिणाम होतो?

• यहोवाचा दिवस सुरू होण्यापूर्वी भविष्यात काय होणार आहे? तेव्हा, वैयक्‍तिकरित्या आपण काय करत असावे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]