व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या उद्देशाला गौरवी यश प्राप्त होते

यहोवाच्या उद्देशाला गौरवी यश प्राप्त होते

अध्याय २४

यहोवाच्या उद्देशाला गौरवी यश प्राप्त होते

१, २. (अ) त्याने निर्माण केलेल्या बुद्धिमान प्राण्यांबद्दल यहोवाचा उद्देश काय आहे? (ब) देवाच्या उपासकांच्या एकत्रित परिवारामध्ये कोणाचा समावेश आहे? (क) या बाबतीत कोणत्या वैयक्‍तिक प्रश्‍नाचा विचार केला पाहिजे?

 सर्व बुद्धिमान सृष्टीचे खऱ्‍या उपासनेमध्ये ऐक्य असावे व त्या सर्वांनी देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता उपभोगावी असा यहोवाचा बुद्धिमान व प्रेमळ उद्देश आहे. नीतिमत्तेची आवड असलेल्या सर्वांचीही तशीच मनःपूर्वक इच्छा आहे.

त्याने सृष्टी निर्माण करण्याचे काम सुरू केले तेव्हा यहोवा हा उदात्त उद्देश पूर्ण करु लागला. त्याने निर्माण केलेली पहिली गोष्ट “त्याच्या गौरवाचे तेज, व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप” असा पुत्र होता. (इब्री. १:१-३) एकट्या यहोवाने निर्माण केल्यामुळे हा अद्वितीय होता. त्याच्याद्वारे इतर पुत्रांना अस्तित्वात आणले गेले—प्रथम स्वर्गामध्ये देवदुतांना, नंतर पृथ्वीवर मानवांना. (ईयो. ३८:७; लूक ३:३८) या सर्व पुत्रांचे मिळून एक विश्‍व कुटुंब बनले. त्या सर्वांकरता यहोवा हा देव, ज्याची भक्‍ती करावी असा एकमेव, होता. तो विश्‍वाचा सार्वभौम राजा, तसेच त्यांचा प्रेमळ पिता होता. त्याचप्रमाणे तो तुमचा पिता आहे का आणि तुम्ही त्याच्या मुलांपैकी आहात का? ते किती अनमोल नाते असू शकते!

३. (अ) आपल्यापैकी कोणीही जन्मतः देवाचे पुत्र का नव्हते? (ब) परंतु आदामाच्या वंशजांसाठी यहोवाने कोणती प्रेमळ तरतूद केली?

असे असले तरी, आपल्या पहिल्या माता-पित्यांना, बुद्धिपुरस्सर पाप करणारे म्हणून, मृत्यूदंडाची शिक्षा दिली गेली तेव्हा, देवाने त्यांना एदेन बागेतून हाकलून दिले व त्यांचा त्याग केला. ते यहोवाच्या विश्‍व कुटुंबाचा भाग राहिले नाहीत. (उत्प. ३:२२-२४; पडताळा अनुवाद ३२:४, ५.) पापी आदामाचे वंशज असल्यामुळे आपण सर्व पापी वृत्तीसह जन्माला आलो आहोत. देवाच्या कुटुंबातून बहिष्कृत केलेल्या मातापित्यांची मुले असल्याने, केवळ मानवी जन्माच्या आधारावर देवाची मुले असण्याचा दावा आपण करू शकत नाही. परंतु यहोवाला माहीत होते की, आदामाच्या वंशजांमधले काही नीतिमत्वाची आवड धरतील. आणि म्हणून, अशांना देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता प्राप्त करणे शक्य व्हावे अशी प्रेमळ तरतूद त्याने केली.—रोम. ८:२०, २१.

इस्राएलांचे अनुग्रहित स्थान

४. (अ) इस्राएली लोक कशाच्या आधारे देवाचे ‘पुत्र’ होते? (ब) याचा काय अर्थ होत नव्हता?

आदामाच्या निर्मितीनंतर सुमारे २,५०० वर्षांनी आपले पुत्र म्हणून त्याच्याशी नाते ठेवण्याचा विशेषाधिकार यहोवाने पुन्हा काही मानवांना दिला. अब्राहामाशी त्याने केलेल्या करारानुसार, यहोवाने इस्राएलांना आपले लोक म्हणून निवडून घेतले. त्यामुळे इजिप्तच्या (मिसर) फारोशी तो बोलताना इस्राएलांविषयी, “माझा पुत्र” असे म्हणाला. (निर्ग. ४:२२, २३; उत्प. १२:१, २) त्यानंतर सिनाय पर्वतापाशी त्याने इस्राएलांना नियम दिले, त्या लोकांचे एक राष्ट्र उभारले आणि आपल्या उद्देशाच्या संबंधात त्यांचा उपयोग केला. राष्ट्रीय दृष्टिकोनातून पाहता, यहोवाचा “खास निधी” असल्याने, देवाची “मुले” असा त्यांचा उल्लेख केला गेला. (अनु. १४:१, २; यश. ४३:१) तसेच, त्या राष्ट्रातल्या काही व्यक्‍तींशी त्याने केलेल्या विशेष व्यवहारामुळे, यहोवाने त्यांना मुले म्हटले. (१ इति. २२:९, १०) हा दर्जा देवाशी झालेल्या कराराच्या नात्यावर आधारित होता. परंतु याचा अर्थ असा नव्हे की, देवाचा पुत्र म्हणून आदामाला होती, ती गौरवी मुक्‍तता ते उपभोगत होते. ते अद्यापही पाप व मृत्यूच्या बंधनात होते.

५. इस्राएलांनी देवापुढील आपले विशेष स्थान कसे गमावले?

तसे असले तरी, मुले या नात्याने देवासन्मुख त्यांना एक अनुग्रहित दर्जा होता. त्याचप्रमाणे, त्यांच्या पित्याचा आदर करण्याची व त्याच्या उद्देशानुसार कार्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी ते कर्तव्य पूर्ण करण्याच्या महत्त्वावर येशूने जोर दिला. म्हणजेच, देव आपला पिता असल्याचा केवळ दावा करु नये तर, ‘आपण त्याचे’ पुत्र असल्याचे सिद्ध करावे. (मत्त. ५:४३-४८; मला. १:६) परंतु एक राष्ट्र म्हणून यहुदी लोक या बाबतीत अपयशी ठरले. त्यामुळे, येशूच्या पृथ्वीवरील सेवाकार्याच्या शेवटल्या वर्षी, येशूला जिवे मारावयास पाहणाऱ्‍या यहुद्यांनी, “आम्हांस एकच पिता म्हणजे देव आहे” असे म्हटल्यावर, त्यांची कृती व ते दाखवत असलेली वृत्ती, अशा दाव्याला खोटे ठरवत असल्याचे येशूने खंबीरपणे दाखवले. (योहा. ८:४१, ४४, ४७) इ.स. ३३ मध्ये देवाने नियमशास्त्राचा अंत केला. आणि इस्राएलांनी उपभोगलेल्या विशेष नात्याचा आधार संपुष्टात आला. तरीही, ज्यांना यहोवाने मुले म्हणून स्वीकारले, असे मानवजातीतील लोक संपुष्टात आले नाहीत.

यहोवा त्याच्या लोकांचे एकीकरण करतो

६. इफिसकरांस १:९, १०मध्ये पौलाने कोणत्या ‘व्यवस्थे’चे वर्णन केले, व तिचा उद्देश काय?

ज्यायोगे विश्‍वास ठेवणारे लोक त्याच्या परिवाराचे प्रिय सभासद होऊ शकतात अशा देवाच्या योजनेबद्दल—त्याच्या लोकांचे एकीकरण करण्याच्या यहोवाच्या कार्यक्रमाबद्दल—प्रेषित पौलाने इफिसमधल्या ख्रिश्‍चनांना लिहिले. तो म्हणाला: “[देवाने] स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळविले; ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था [परिवाराचा कारभार] लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.” (इफिस. १:९, १०) ही “योजना” येशूभोवती गुंफलेली आहे. यहोवाशी एकनिष्ठ राहिलेल्या देवाच्या स्वर्गदूत-पुत्रांसोबत एकतेत सेवा करण्यासाठी, त्याच्यामार्फत मानवांना देवासन्मुख मान्यताप्राप्त स्थितीत आणले जाते—काहींना स्वर्गात, तर इतरांना पृथ्वीवर राहण्याच्या आशेसह.

७. “स्वर्गात . . . जे आहे” ते काय व ‘एकत्र केले जाणे’ याचा त्यांच्याकरता अर्थ काय?

इ.स. ३३च्या पेन्टकॉस्टपासून सुरुवात करून, प्रथम “स्वर्गात . . . जे आहे” म्हणजे स्वर्गीय राज्यात ख्रिस्ताबरोबर सहवारिस होणाऱ्‍यांच्याकडे लक्ष दिले गेले. ख्रिस्ताच्या बलिदानाच्या मूल्यावरील त्यांच्या विश्‍वासाच्या आधारावर, देवाने त्यांना नीतिमान ठरवले. (रोम. ५:१, २) त्यानंतर ते ‘नव्याने जन्मले’ किंवा स्वर्गीय जीवनाच्या आशेसह देवाचे पुत्र म्हणून प्रसवले गेले. (योहा. ३:३; १:१२, १३) एक आध्यात्मिक राष्ट्र म्हणून देवाने त्यांच्याशी नवा करार केला. यथाकाळी, त्यात यहुदी व परराष्ट्रीयांचा समावेश होणार होता, व त्यांची एकूण संख्या १,४४,००० असेल.—गलती. ३:२६-२९; प्रकटी. १४:१.

८. पित्याशी राज्याच्या वारसांचे नाते व मोशेच्या नियमशास्त्रांतर्गत यहुद्यांचे त्याच्याशी असलेले नाते यांची तुलना केल्यास काय दिसून येते?

शरीराने अजून अपूर्ण असले तरी, स्वर्गीय राज्याच्या अशा वारसातले शेष लोक पित्याशी बहुमोल व घनिष्ट नात्याचा आनंद उपभोगतात. यासंबंधी पौलाने लिहिले: “तुम्ही पुत्र आहां, म्हणून देवाने अब्बा बापा, अशी हाक मारणाऱ्‍या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणात पाठविले आहे. म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस; आणि पुत्र आहेस तर देवाद्वारे वारीसही आहेस.” (गलती. ४:६, ७) “अब्बा” या अरामी शब्दाचा अर्थ आहे “पिता”, पण लहान मूल त्याच्या पित्यासाठी वापरते तसे ते प्रेमळ संबोधन आहे. येशूच्या बलिदानाचा वरिष्ठ दर्जा, आणि स्वतः देवाची अपात्रित कृपा यांमुळे हे आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिस्ती लोक, नियमशास्त्राच्या अधीन असलेल्या अपूर्ण मानवांपेक्षा अधिक घनिष्ट नात्याचा आनंद लुटतात. पण भविष्यात त्यांना मिळणाऱ्‍या गोष्टी त्याहुनही अधिक अद्‌भुत आहेत.

९. त्यांच्या पुत्रत्वाचे पूर्ण मूर्त-स्वरूप प्राप्त होण्याचा अर्थ काय?

मरणापर्यंत विश्‍वासू राहिल्यास, स्वर्गात अमर जीवनाचे पुनरूत्थान मिळण्याद्वारे त्यांच्या पुत्रत्वाचे पूर्ण मूर्त-स्वरुप त्यांना प्राप्त होते. तेथे, प्रत्यक्ष यहोवा देवाच्या उपस्थितीत एकतेने सेवा करण्याचा विशेषाधिकार त्यांना मिळेल. देवाच्या या पुत्रांमधले तुलनात्मक दृष्ट्या केवळ थोडेच अजूनही पृथ्वीवर आहेत.—रोम. ८:१४, २३; १ योहा. ३:१, २.

“पृथ्वीवर जे आहे ते” एकत्र करणे

१०. (अ) “पृथ्वीवर आहे” ते काय व केव्हापासून त्यांना उपासनेच्या एकतेत आणण्यात आले आहे? (ब) त्यांचे यहोवाशी काय नाते आहे?

१० स्वर्गीय जीवनाच्या उद्देशाने मानवांना देवाच्या परिवारात एकत्रित करणे ज्यामुळे शक्य होते, तीच “व्यवस्था” “पृथ्वीवर जे आहे” त्याच्याकडेही लक्ष देते. विशेषतः इ.स. १९३५ पासून, ख्रिस्ताच्या बलिदानावर विश्‍वास असलेल्या व्यक्‍तींना पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाच्या आशेसह एकत्र करण्यात आले आहे. अभिषिक्‍त वर्गातील शेष लोकांच्या खांद्याला खांदा लावून ते यहोवाच्या नावाचे गौरव करतात आणि त्याच्या उपासनेला उन्‍नत करतात. (सफ. ३:९; यश. २:२, ३) तो जीवनाचा स्त्रोत असल्याचे मान्य करुन मोठ्या आदराने हे देखील यहोवाला “पिता” म्हणून संबोधतात, व त्याच्या पुत्रांकडून तो करत असलेल्या अपेक्षेप्रमाणे तेही त्याचे गुण प्रकट करण्याचा मनापासून प्रयत्न करतात. येशूच्या सांडलेल्या रक्‍ताच्या आधारे ते त्याच्या सन्मुख मान्यताप्राप्त दर्जा उपभोगतात. (मत्त. ६:९; प्रकटी. ७:९, १४) परंतु त्यांना माहीत आहे की, त्याची मुले म्हणून देवाची पूर्ण स्वीकृती मिळण्याचा आनंद त्यांच्याकरता अजून भविष्यात आहे.

११. (अ) रोमकरांस ८:१९-२१ मध्ये मानवजातीला कोणते वचन देण्यात आले आहे? (ब) अत्यंत उत्कंठेने ते ज्याची प्रतीक्षा करत आहेत ते ‘देवाच्या पुत्रांचे प्रकटणे’ म्हणजे काय?

११ रोमकरांस ८:१९-२१मध्ये दाखवल्याप्रमाणे, ते “देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची” उत्कटतेने वाट पहात आहेत, कारण तेव्हा मानव-सृष्टीतल्या या लोकांची, “नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त” होण्याची वेळ येईल. स्वर्गीय प्रतिफळ प्राप्त झालेले, आत्म्याने अभिषिक्‍त असे देवाचे पुत्र, त्यांच्या गौरवी प्रभूचे, येशू ख्रिस्ताचे साथीदार म्हणून क्रियाशील झाले असल्याचा पुरावा पृथ्वीवरचे मानव पाहतील तेव्हा ते ‘प्रकटणे’ घडेल. या संपूर्ण दुष्ट व्यवस्थेच्या नाशात व त्यानंतर ख्रिस्ताच्या एक हजार वर्षांच्या कारकीर्दीतल्या—ज्यात ‘देवाचे हे पुत्र,’ राजे व याजक म्हणून त्याच्याबरोबर काम करतील—आशीर्वादात ते व्यक्‍त होईल.—प्रकटी. २:२६, २७; २०:६.

१२. मोठ्या संकटानंतर आत्म्याने अभिषिक्‍त असे देवाचे विजयी पुत्र कोणत्या स्तुती-गीतामध्ये सामील होतील, व त्याचा अर्थ काय?

१२ मोठे संकट संपलेले असेल आणि “हे ‘प्रभु’ देवा, हे सर्वसमर्था, तुझी कृत्ये थोर व आश्‍चर्यकारक आहेत; हे ‘राष्ट्राधिपते’, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. ‘हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?’ कारण तूच मात्र ‘पवित्र’ आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रगट झाली आहेत, म्हणून ‘सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करितील.’” अशी हर्षभरित घोषणा करत, ख्रिस्ताशी मिलाप झालेले देवाचे हे पुत्र एकमुखाने देवाची स्तुती करतील तेव्हाची स्थिती किती हर्षदायक असेल! (प्रकटी. १५:३, ४) होय, जुन्या राष्ट्रांतून आलेल्या लोकांनी मिळून बनलेली सर्व मानवजात खऱ्‍या देवाच्या उपासनेमध्ये संयुक्‍त होईल. कबरेतीलही सर्वांचे पुनरूत्थान केले जाईल व यहोवाची स्तुती करण्यात आपला स्वर मिळवण्याची संधी त्यांनाहि दिली जाईल.

१३. मोठ्या संकटातून वाचलेले तात्काळ कोणत्या अद्‌भुत स्वातंत्र्याचा आस्वाद घेतील?

१३ त्यापुढे, दियाबल सैतान ‘ह्‍या युगाचा देव’ राहणार नाही. त्यानंतर यहोवाच्या पृथ्वीवरील उपासकांना त्याच्या अधम प्रभावाशी झगडावे लागणार नाही. (२ करिंथ. ४:४; प्रकटी. २०:१-३) त्यानंतर खोटा धर्म आपल्या प्रेमळ पित्याबद्दल विपर्यस्त कल्पना देणार नाही व मानवी समाजात विघटनकारी प्रभाव म्हणून राहणार नाही. त्यानंतर खऱ्‍या देवाच्या सेवकांना सरकारी पदावरच्या लोकांकडून अन्याय व पिळवणूक सोसावी लागणार नाही. मोठ्या संकटातून वाचलेल्यांसाठी तो किती अद्‌भुत स्वातंत्र्याचा संकेत असेल!

१४. पाप व त्याच्या सर्व परिणामांपासून त्यांना कशाच्या सहाय्याने मुक्‍त केले जाईल?

१४ “जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोंकरा” म्हणून मानवजातीची भूतकाळातली सर्व पापे रद्द करण्यासाठी येशू त्याच्या बलिदानाचे मोल लागू करील, (योहा. १:२९) पृथ्वीवर, जेव्हा येशू एखाद्या व्यक्‍तीच्या पापांची क्षमा झाल्याचे सांगत असे तेव्हा त्याचा पुरावा म्हणून क्षमा केलेल्याला तो बरेही करत असे. (मत्त. ९:१-७) त्याच रीतीने स्वर्गातून तो अंध, कर्णबधीर, मूक, शरीराने अपंग व मानसिक-रोगग्रस्त आणि इतर कोणताही रोग झालेल्या लोकांना आश्‍चर्यकारकपणे बरे करील. हळूहळू, स्वतःला प्रामाणिकपणे देवाच्या नीतिमान मार्गानुसार घडवून आज्ञाधारक व राजी असलेले सर्वजण आपल्यातला ‘पापाचा नियम’ रद्द करतील. त्यामुळे त्यांचे सर्व आचार, विचार आणि त्यांच्या मनातल्या इच्छा त्यांना स्वतःला आणि देवाला संतोषदायक होतील. (रोम. ७:२१-२३; पडताळा यशया २५:७, ८ व प्रकटीकरण २१:३, ४.) येशूच्या हजार वर्षांच्या कारकीर्दीच्या अंतापूर्वी, मानवी पूर्णता प्राप्त करण्यास त्यांना मदत मिळालेली असेल. पाप व त्याच्या सर्व दुखःद परिणामांपासून ते पूर्णपणे मुक्‍त असतील. सर्व जगात पसरलेल्या पार्थिव नंदनवनामध्ये, ‘देवाचे प्रतिरुप’ व त्याच्याशी असलेले त्यांचे ‘सादृश्‍य’, ते यथार्थतेने प्रकट करतील.—उत्प. १:२६.

१५. येशूच्या हजार वर्षांच्या कारकीर्दीच्या अंताला तो कोणती कारवाई करील व त्याचा उद्देश काय असेल?

१५ मानवजातीला पूर्णत्वाला पोहचवल्यावर, या कामासाठी येशूला दिला गेलेला अधिकार, तो पित्याला परत करील. १ करिंथकरांस १५:२८ मध्ये दिलेल्या पूर्वसूचनेनुसारः “त्याच्या [पुत्राच्या] अंकित सर्वकाही झाले असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करुन दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रहि होईल; अशा हेतूने की, देव सर्वांना सर्वकांही व्हावा.”

१६. आता परिपूर्ण केलेल्या सर्व मानवजातीला कोणत्या परिक्षेतून जावे लागेल व का?

१६ एकमेव जिवंत व खऱ्‍या देवाची सेवा करण्याची त्यांची अटळ निवड सिद्ध करण्याची संधी, आता परिपूर्णावस्थेला आणलेल्या मानवजातीला दिली जाईल. या कारणासाठी, येशू ख्रिस्तामार्फत, त्याचे पुत्र म्हणून त्यांना स्वीकारण्यापूर्वी, यहोवा परिपूर्ण केलेल्या या सर्व मानवांची कसून एक शेवटली परिक्षा घेईल. सैतान व त्याच्या दुरात्म्यांना अथांग डोहातून मोकळे केले जाईल. त्यामुळे, यहोवावर खरोखर प्रेम करणाऱ्‍यांचे कायमचे नुकसान होणार नाही. परंतु बेइमानीने यहोवाची अवज्ञा करण्याच्या मार्गाला लागणाऱ्‍यांना, आद्य विद्रोही व त्याच्या दुरात्म्यांसह कायमचे नष्ट केले जाईल.—प्रकटी. २०:७-१०.

१७. यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेनुसार, त्याने निर्माण केलेल्या बुद्धिमान सृष्टीमध्ये पुन्हा कशी परिस्थिती असेल?

१७ त्या शेवटच्या निर्णायक परिक्षेत टिकून राहणाऱ्‍या व परिपूर्ण केलेल्या सर्व मानवांना आता यहोवा, ख्रिस्तामार्फत, आपले पुत्र म्हणून प्रेमाने स्वीकारील. तेव्हा ते ‘देवाच्या मुलांच्या गौरवयुक्‍त मुक्‍तते’मध्ये संपूर्णपणे सहभागी होतील. (रोम. ८:२१) ज्यांच्याकरता यहोवा युगानुयुगासाठी एकमेव देव, विश्‍वाचा सार्वभौम राजा, आणि त्यांचा प्रेमळ पिता असेल, अशा देवाच्या एकत्रित विश्‍व-कुटुंबाचे ते शेवटी एकदाचे भागीदार बनतील. तेव्हा, स्वर्गातील व पृथ्वीवरील यहोवाची बुद्धिमान सृष्टी पुन्हा एकमेव खऱ्‍या देवाच्या उपासनेमध्ये एकत्रित होईल.

पुनरावलोकन चर्चा

• एदेनमधल्या बंडाळीपूर्वी सर्व उपासकांचे यहोवाशी नाते कसे होते?

• देवाच्या पुत्रांवर कोणती जबाबदारी असते?

• आज देवाचे पुत्र कोण आहेत? यापुढे कोण देवाचे पुत्र होतील व एकत्रित उपासनेबद्दल देवाच्या उद्देशाशी त्याचा कसा संबंध आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]