व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या उपासकांना उपभोगता येणारे स्वातंत्र्य

यहोवाच्या उपासकांना उपभोगता येणारे स्वातंत्र्य

अध्याय ५

यहोवाच्या उपासकांना उपभोगता येणारे स्वातंत्र्य

१, २. (अ) देवाने पहिल्या मानवी जोडप्याला कशा प्रकारचे स्वातंत्र्य दिले होते? (ब) त्यांच्या कार्याचे नियमन करणारे काही नियम सांगा.

 यहोवाने पहिल्या मानवी जोडप्याला निर्माण केले तेव्हा, आज मानवांना असलेल्या कोणत्याही स्वातंत्र्याला मागे टाकील असे स्वातंत्र्य त्यांनी उपभोगले. नंदनवन त्यांचे घर होते. जीवनाचा आस्वाद लुटण्यात कोणत्याही आजाराची बाधा नव्हती. मृत्यू त्यांची वाट पाहात नव्हता. परंतु त्यांचे असे हे स्वातंत्र्य अविरत राहण्यामध्ये, देवाच्या नियमांचा आदर हा एक महत्त्वाचा घटक होता.

त्यातले काही नियम शब्दात मांडले गेले नसले तरी, आदाम व हव्वा अशा तऱ्‍हेने घडले होते की, त्यांनी ते पाळणे स्वाभाविकच होते. तेव्हा भुकेने खाण्याची, तहानेने पिण्याची गरज सूचित होत होती. सूर्याच्या मावळण्याने त्यांना गरजेच्या विश्रांती व झोपेला प्रोत्साहन मिळत होते. तसेच यहोवा त्यांच्याशी बोलला व त्याने त्यांना काम नेमून दिले. वस्तुतः ती नेमणूक हा एक नियम होता. कारण तो त्यांच्या कामाची दिशा ठरवणार होता. पण तो किती प्रेमळ व फायदेशीर नियम होता! संपूर्ण समाधान व आपल्या क्षमतांचा उत्तम रीतीने पुरेपूर उपयोग करण्याची कुवत देणारे काम, त्या नियमाने त्यांना दिले. त्यांनी मुले जन्माला आणायची होती, पृथ्वीवरच्या प्राणिमात्रावर प्रभुत्व करायचे होते व संपूर्ण जग व्यापेपर्यंत नंदनवनाच्या सीमा हळूहळू वाढवायच्या होत्या. (उत्प. १:२८; २:१५) देवाने अगांतुक तपशीलाचा भार त्यांच्यावर टाकला नाही. निर्णय घेण्याचा भरपूर वाव त्यांना देण्यात आला होता. कोणीही याहून जास्त काय मागू शकेल?

३. निर्णय करण्यासाठी त्याचे स्वातंत्र्य शहाणपणाने वापरण्यात आदामाला कशी मदत झाली असती?

अर्थात आदामाला निर्णय घेण्याचा विशेषाधिकार देण्यात आला असला तरी, त्याने कोणताही निर्णय घेतल्यास—मग तो काहीही असो—त्याचा परिणाम चांगलाच होईल असा त्याचा अर्थ नव्हता. निर्णय करण्याच्या त्यांच्या स्वातंत्र्यात जबाबदारी सूचित होत होती. त्याच्या स्वर्गीय पित्याचे ऐकून व त्याची कामे पाहून तो शिकत होता. शिवाय शिकलेल्या गोष्टी लागू करता याव्या म्हणून देवाने आदामाला बुद्धीही दिली होती. “देवाचे प्रतिरूप” अशी आदामाची निर्मिती झाली होती. त्यामुळे निर्णय घेताना देवाचे गुण प्रकट करण्याचा त्याचा स्वाभाविक कल असता. देवाने त्याच्यासाठी केलेल्या गोष्टींची त्याला खरी कदर असती व देवाला संतोष देण्याची इच्छा असती तर, त्याने नक्कीच तसे केले असते.—उत्प. १:२६, २७; पडताळा योहान ८:२९.

४. (अ) आदामाला दिलेल्या मनाई हुकुमाने त्याचे स्वातंत्र्य हिरावले गेले का? (ब) तो दंडक योग्य का होता?

त्याच्या निर्मात्या व जीवनदात्यावर मानव अवलंबून असल्याची आठवण म्हणून, यहोवाने त्याला ही आज्ञा दिली: “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा. पण बऱ्‍यावाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ खाऊ नको. कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू अवश्‍य मरशील.” (उत्प. २:१६, १७ न्यू.व.) या नियमाने माणसाचे स्वातंत्र्य हिरावले का? नक्कीच नाही. आज्ञा पाळण्यास किंवा न पाळण्यास आदाम मोकळा होता. या मनाईने माणसावर बोजा पडला नाही. फक्‍त या एका झाडाला स्पर्श न करता त्याला अन्‍नाची रेलचेल होती. परंतु तो ज्या पृथ्वीवर राहतो ती देवाची असून निर्माता या नात्याने देव त्याच्या निर्मितीचा कायदेशीर शासक आहे याची त्याने जाणीव ठेवावी, हे यथोचितच होते.—स्तोत्र. २४:१, १०.

५. (अ) आदाम व हव्वेने त्यांचे गौरवी स्वातंत्र्य कसे गमावले? (ब) त्याची जागा कशाने घेतली व त्याचा आपल्यावर कसा परिणाम झाला आहे?

पण झाले काय? स्वार्थी महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन, खऱ्‍या मार्गदर्शकाचे स्वरूप धारण करून, देवाच्या इच्छेविरुद्ध असलेल्या बाबतीत तिला खात्री देत, एका स्वर्गदूताने हव्वेला फसवले. आणि त्याच्या पित्याची आज्ञा पाळण्याऐवजी, आज्ञाभंग करण्यात आदाम हव्वेला सामील झाला. त्यांच्या अधिकारात नसलेली गोष्ट बळकावल्यामुळे आदाम व हव्वेने त्यांचे असलेले वैभवी स्वातंत्र्य गमावले. त्यांच्यावर पापाचे प्रभुत्व आले आणि देवाने इशारा दिल्याप्रमाणे निश्‍चितपणे त्यांना मृत्यू येणार होता. परिणामी त्यांच्या मुलांना कोणता वारसा मिळाला? दुष्कृत्यांकडे जन्मत: कल, आजारांना बळी पडणाऱ्‍या दुर्बलता आणि म्हातारपणाने उत्तरोत्तर खालावणारी स्थिती तसेच मृत्यू, या मार्गांनी प्रकट होणारे पाप. सैतानाच्या प्रभावाने वारशात मिळालेल्या दुष्कृत्यांकडचा कल विकोपाला गेल्याने असा समाज निर्माण केला आहे की, त्यात प्रत्येकाचे जीवन धोक्याचे झाले आहे. हे, देवाने सुरवातीला मानवजातीला दिलेल्या स्वातंत्र्याच्या किती विरुद्ध आहे!—रोम. ५:१२; ईयोब १४:१; प्रकटी. १२:९.

स्वातंत्र्य कोठे सापडू शकते

६. (अ) खरे स्वातंत्र्य कोठे आढळते? (ब) योहान ८:३१, ३२ मध्ये येशू कोणत्या प्रकारच्या स्वातंत्र्याबद्दल बोलत होता?

सध्याची स्थिती लक्षात घेता, लोकांना आहे त्यापेक्षा अधिक स्वातंत्र्याची आस आहे, यात आश्‍चर्य नाही. पण खरे स्वातंत्र्य कोठे सापडेल? येशू ख्रिस्त म्हणाला: “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधनमुक्‍त करील.” (योहान ८:३१, ३२) एखादा राजकीय शासक वा शासन-पद्धतीऐवजी दुसरी आणल्याने जे स्वातंत्र्य मिळेल अशी आशा लोकांना वाटते, तसे हे संकुचित स्वातंत्र्य नाही. तर ते मानवी समस्यांच्या गाभ्यालाच हात घालते. पापापासून, पापाच्या गुलामगिरीच्या बंधनापासून मिळणाऱ्‍या स्वातंत्र्याची चर्चा येशू करत होता. (योहान ८:२४, ३४-३६ पहा.) तेव्हा, एखादा मनुष्य येशू ख्रिस्ताचा खरा शिष्य झाल्यास, परिणामी त्याच्या जीवनात लक्षणीय बदल होतो, मुक्‍ती मिळते.

७. (अ) आता आपण कोणत्या अर्थाने पापापासून मुक्‍त होऊ शकतो? (ब) ते स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

याचा अर्थ असा नव्हे की, सध्या खऱ्‍या ख्रिश्‍चन लोकांना, पापी वागणुकीकडे झुकणाऱ्‍या जन्मजात वृत्तीचे परिणाम जाणवेनासे झाले आहेत. उलट त्यामुळे त्यांना मोठे प्रयास करावे लागतात. (रोम. ७:२१-२५) परंतु एखादा माणूस खरोखरच येशूच्या शिकवणींनुसार जगल्यास तो पापाचा हीन दास राहणार नाही. त्यानंतर पाप त्याच्याकरता राजासारखे असणार नाही, की त्याने आज्ञा द्याव्या आणि याने त्या पाळाव्या. विवेक बेचैन करणाऱ्‍या ध्येयहीन जीवनाच्या सापळ्यात तो अडकलेला नसेल. देवापुढे तो शुद्ध विवेकाचा उपभोग घेईल; कारण ख्रिस्ताच्या बलिदानावरील विश्‍वासामुळे त्याच्या पूर्वीच्या पापांची क्षमा झाली आहे. पापी वृत्ती डोके वर काढण्याचा प्रयत्न करील. पण ख्रिस्ताच्या सात्त्विक शिकवणी आठवून, तो त्या वाईट वृत्तीनुसार वागणे टाळील तेव्हा, त्याच्यावर पापाचे प्रभुत्व नसल्याचे तो प्रदर्शित करील.—रोम. ६:१२-१७.

८. (अ) खरा ख्रिश्‍चन धर्म आपल्याला आणखी कोणते स्वातंत्र्य देतो? (ब) त्यामुळे ऐहिक शासकांबद्दलच्या आपल्या वृत्तीवर कसा परिणाम व्हावा?

ख्रिश्‍चन आहोत म्हणून आपण मोठे स्वातंत्र्य उपभोगतो. खोट्या शिकवणींच्या प्रादुर्भावापासून तसेच अंधश्रद्धांचे बंधन आणि पापाच्या दास्यत्वाच्या परिणामांपासून आपल्याला मुक्‍त करण्यात आले आहे. मृतांची स्थिती व पुनरुत्थान यांबद्दलच्या उदात्त सत्यांनी आपल्याला हिंसक मृत्यूच्या अवास्तव भीतीपासून मुक्‍त केले आहे. अशी भीती लोकांना त्यांचा विवेक दडपून टाकायला लावते. देवाचे नीतिमान राज्य अपूर्ण मानवी शासनांची जागा घेईल, ही माहिती आपल्याला निराशेपासून मुक्‍त करते. पण लवकरच ही जुनी व्यवस्था नाहीशी होईल, असे म्हणून कायद्याकडे दुर्लक्ष वा सरकारी अधिकाऱ्‍यांना अनादर दाखवण्याचे समर्थन, अशा स्वातंत्र्याने होत नाही.—१ पेत्र २:१६, १७; तीत ३:१, २.

९. (अ) मानवांना आता शक्य असलेले सर्वात जास्त स्वातंत्र्य उपभोगण्यास यहोवा प्रेमाने आपल्याला कशी मदत करतो? (ब) निर्णय घेताना, आदामाने त्याच्या स्वातंत्र्याचा गैरवापर केल्याचा परिणाम स्पष्ट कळत असल्याचे, आपण कसे दाखवू शकतो?

वेगवेगळे प्रयोग आणि चुका करून, जगण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधून काढणे, यहोवा आपल्यावर सोपवत नाही. तो आपली घडण जाणतो. खरे समाधान व वैयक्‍तिक सन्मानाची भावना आपल्याला कशी लाभेल आणि आपल्याला कशाने चिरकाल फायदा होईल, हे त्याला ठाऊक आहे. तसेच त्याचा हेतू अंमलात आणण्याचे त्याचे स्वतःचे वेळापत्रक आणि त्यामुळे आपल्याला करण्यास सुयोग्य अशी कामेही त्याला माहीत आहेत. त्याचप्रमाणे एखाद्याचा अधःपात करणारे किंवा इतरांशी त्याचा संबंध बिघडवणारे, देवाच्या राज्याचे आशीर्वाद प्राप्त करणेही अशक्य करणारे विचार व आचरण यांची त्याला जाण आहे. पवित्र शास्त्र वा त्याच्या दृश्‍य संस्थेमार्फत, प्रेमाने तो आपल्याला या गोष्टींची माहिती देतो. (गलती. ५:१९-२३; मार्क १३:१०; पडताळा १ तीमथ्य १:१२, १३.) त्यानंतर देवप्रदत्त स्वतंत्र इच्छेचा वापर करून कसा प्रतिसाद द्यावा याचा निर्णय घेणे आपल्यावर अवलंबून आहे. सुरवातीला मानवजातीला दिलेले स्वातंत्र्य आदामाने कसे गमावले याबद्दल पवित्र शास्त्र सांगत असलेल्या गोष्टी मनावर घेतल्यास, आपण शहाणपणाने निर्णय घेऊ. यहोवाशी सलोख्याचे संबंध ही, आपल्या जीवनातली सर्वात महत्त्वाची गोष्ट असल्याचे आपण प्रदर्शित करू.

वेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्याची हाव

१०. ख्रिश्‍चन असल्याचा दावा करणाऱ्‍या काही लोकांनी, कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा धरली आहे?

१० काही वेळा, यहोवाचे साक्षीदार म्हणून वाढलेल्या तरुण मुलांना, तसेच काही लहान न म्हणता येण्याजोग्यांना देखील, वेगळ्या प्रकारच्या स्वातंत्र्याची इच्छा होऊ लागते. हे जग मोहक आहेसे वाटू शकेल, आणि जो जो ते त्याचा अधिक विचार करतात तशी, प्रापंचिक लोक करत असलेल्या गोष्टी करण्याची त्यांची इच्छा अधिकच उत्कट होते. अमली पदार्थांनी धुंद होण्याचा, दारू पिण्याचा वा व्यभिचार करण्याचा त्यांचा बेत नसेल. पण शाळा अथवा काम आटोपल्यावर, प्रापंचिक लोकांच्या सोबतीत ते वेळ घालवू लागतील. अर्थातच आपल्या नवीन सोबत्यांनी आपल्याला त्यांच्यातले मानावे, असे त्यांना वाटते. त्यामुळे ते त्यांच्या बोलण्या-वागण्याचे अनुकरण करू लागतात.—३ योहान ११.

११. काही वेळा असे वागण्याचा मोह कोठून येतो?

११ कधी कधी, यहोवाची सेवा करण्याचा दावा करणाऱ्‍या दुसऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीमुळे प्रापंचिक रीतीने वागण्याचा आनंद लुटण्याचा मोह पडतो. एदेन बागेमध्ये सैतानाने हव्वेला कुमार्गाला लावले व त्यानंतर आदामाने तिला सामील व्हावे म्हणून तिने त्याला आग्रह केला, तेव्हाही हेच झाले. सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांमध्येही ते घडले, आणि तीच गोष्ट आपल्या दिवसात देखील होते. अशा लोकांना खळबळजनक घटना आवडतात व ते अत्यंत सुखदायक गोष्टींची हाव धरतात. ते इतरांना “मजा करण्याचा” आग्रह करतात, ते “स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत.”—२ पेत्र २:१८, १९.

१२. (अ) प्रापंचिक वर्तनाचे कोणते दुःखद परिणाम आहेत? (ब) त्यात गुंतलेल्यांना परिणाम ठाऊक असले तरी, अशा गोष्टी करण्याचा अट्टाहास ते का करतात?

१२ याची फळे सुखद नसतात. अवैध लैंगिक संबंधामुळे भावनांचा क्षोभ होतो. तसेच त्यामुळे रोग, नकोसे गरोदरपण आणि लग्न मोडण्याची शक्यताही उत्पन्‍न होऊ शकते. (नीती. ६:३२-३५; १ करिंथ. ६:१८; १ थेस्स. ४:३-८) अंमली पदार्थांच्या वापराने चिडचिडेपणा, अस्पष्ट उच्चार, अंधुक दृष्टी, गरगरणे, श्‍वासोच्छ्‌वास करण्यात कमजोरी, भ्रम व मृत्यूही होऊ शकतो. (पडताळा नीतीसूत्रे २३:२९-३५.) त्याने व्यसन लागू शकते आणि त्या सवयीपायी गुन्हेही होऊ शकतात. अशा आचरणात गुंतणाऱ्‍यांना बहुधा त्याचा परिणाम माहीत असतो. परंतु, उत्तेजन व विषयसुखाच्या त्यांच्या आसक्‍तीमुळे, त्यांचे त्या परिणामांकडे दुर्लक्ष होते. हे स्वातंत्र्य आहे, असे ते स्वतःला सांगतात. पण ते पापाचे दास असल्याचे फार उशीरा त्यांना समजते. आणि पापाची हुकुमशाही किती क्रूर असते! तेव्हा, या बाबतीत आताच विचार करण्याने अशा अनुभवापासून आपला बचाव होण्यास मदत होऊ शकते.—गलती. ६:७, ८.

समस्या कोठे सुरु होतात

१३. (अ) अनेकदा, या समस्यांकडे नेणाऱ्‍या वासना कशा उत्पन्‍न होतात? (ब) “कुसंगती” म्हणजे काय, ते कळण्यासाठी आपल्याला कोणाच्या दृष्टीकोनाची गरज आहे? (क) परिच्छेदाच्या अखेरीस दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देताना यहोवाच्या दृष्टीकोनावर भर द्या. एका वेळी एकाच प्रश्‍नावर अभिप्राय द्या.

१३ थांबा आणि त्या समस्या कोठे सुरू होतात यावर विचार करा. पवित्र शास्त्र खुलासा करतेः “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला व भुलविला जातो तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते.” (याकोब १:१४, १५) पण या वासना कशामुळे चेतवल्या जातात? जे मनात प्रवेश करते त्याने, आणि अनेकदा, पवित्र शास्त्राची तत्त्वे लागू न करणाऱ्‍या लोकांच्या संगतीच्या परिणामाने. “कुसंगती” टाळावी हे आपणा सर्वांना अर्थातच ठाऊक आहे. पण प्रश्‍न असा आहे की, कोणती संगती वाईट असते? या गोष्टीकडे यहोवा कोणत्या दृष्टीकोनातून पाहातो? खालील प्रश्‍न व शास्त्रवचनांवर विचार करण्याने, योग्य निर्णय घेण्यात आपल्याला मदत व्हावी.

काही लोक सज्जन वाटतात याचा अर्थ, ते चांगले सोबती असतील असा होतो का? (पडताळा उत्पत्ती ३४:१, २, १८, १९.)

त्यांचे बोलणे अथवा विनोद, आपण त्यांच्यातले आहोत किंवा नाही, हे सूचित करील का ? (इफिस. ५:३, ४)

देवाच्या उद्देशांसंबंधी आपण विश्‍वास ठेवत असलेल्या गोष्टींवर त्यांचा विश्‍वास नसल्यास, आपल्याला चिंता वाटण्याचे काही कारण आहे का? (पडताळा १ करिंथकरांस १५:१२, ३२, ३३.)

यहोवावर प्रेम नसलेल्या लोकांची संगत आपण पसंत केल्यास त्याला कसे वाटेल? (पडताळा २ इतिहास १९:१, २.)

अविश्‍वासी लोकांसोबत आपण काम करत असलो वा शाळेला जात असलो तरी, सोबती म्हणून त्यांची निवड करत नसल्याचे आपण कसे दाखवू शकू? (१ पेत्र ४:३, ४)

दूरदर्शन पाहणे, मासिके व वृत्तपत्रे वाचणे, हे देखील इतरांशी संगती करण्याचे मार्ग आहेत. सध्याच्या दिवसांमध्ये या साधनांतून येणाऱ्‍या कशा प्रकारच्या मजकुराबाबत सावधगिरी बाळगण्याची विशेष गरज आहे? (नीती. ३:३१; यश. ८:१९; इफिस. ४:१७-१९)

सोबत्यांसंबंधी आपली निवड, आपण कशा प्रकारचे लोक आहोत असे यहोवाला सांगते? (स्तोत्र. २६:१, ४, ५; ९७:१०)

१४. देवाच्या वचनाचा सल्ला आता इमानदारपणे लागू करणाऱ्‍यांना भविष्यात कोणते गौरवी स्वातंत्र्य मिळेल?

१४ आपल्या निकटच्या भविष्यात देवाची नवी व्यवस्था उभी आहे. त्याच्या राज्याद्वारे मानवजात, सैतान व त्याच्या संपूर्ण दुष्ट व्यवस्थेच्या गुलामगिरीच्या प्रभावापासून मुक्‍त होईल. हळूहळू मानवजातीतून पापाचे सर्व परिणाम काढून टाकण्यात येतील. नंदनवनामधील अनंत जीवन त्यांच्यापुढे असेल. ‘प्रभूच्या आत्म्या’शी संपूर्ण सुसंगत असलेल्या स्वातंत्र्याचा आस्वाद शेवटी सर्व सृष्टी घेईल. (२ करिंथ. ३:१७) आता देवाच्या वचनाचा सल्ला मनावर न घेऊन, ते सर्व गमावण्याचा धोका पत्करण्यात शहाणपण आहे का? आज आपले ख्रिश्‍चन स्वातंत्र्य राबवण्याच्या पद्धतीवरून, “देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता”च खरोखर हवी असल्याचे आपण सर्वांनी स्पष्टपणे दाखवावे.—रोम. ८:२१.

पुनरावलोकन चर्चा

• पहिल्या मानवी जोडप्याने कोणत्या प्रकारच्या स्वातंत्र्याचा आस्वाद घेतला? मानवजातीच्या आजच्या अनुभवांशी त्याची तुलना केल्यास काय लक्षात येते?

• जगाच्या विरुद्ध, खऱ्‍या ख्रिश्‍चनांना कोणते स्वातंत्र्य आहे? ते कसे शक्य आहे?

• जगात ज्या प्रकारचे स्वातंत्र्य आहे, ते मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्‍यांना काय किंमत मोजावी लागते?

• “कुसंगती” टाळणे इतके महत्त्वाचे का आहे? कोणती गोष्ट वाईट आहे याबद्दल, आदामासारखा निर्णय न घेता, आपण कोणाचा निर्णय स्वीकारतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]