व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सर्व सृष्टीला तोंड द्यावा लागणारा वादविषय

सर्व सृष्टीला तोंड द्यावा लागणारा वादविषय

अध्याय ६

सर्व सृष्टीला तोंड द्यावा लागणारा वादविषय

१. (अ) एदेन बागेत सैतानाने कोणता वादविषय उपस्थित केला? (ब) त्याच्या बोलण्यावरुन हा वादविषय कसा सूचित होतो?

 एदेनमध्ये बंड सुरु झाल्यावर अवघ्या सृष्टीवर परिणाम करणारा गंभीर वादविषय निर्माण झाला. हव्वेकडे येऊन सैतानाने असे सुचवले की ती व तिचा पती आदाम ह्‍यांना गंभीररित्या वंचित ठेवले जात होते. त्याने विचारलेः “तुम्ही बागेतल्या कोणत्याहि झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय?” हव्वेने उत्तर दिले केवळ एका झाडाच्या फळाबद्दल देवाने सांगितले की, “ते खाऊ नका; त्याला स्पर्शहि करु नका, कराल तर मराल.” तेव्हा, देवाशी आज्ञाधारक राहण्यावर ना हव्वेचे ना आदामाचे जीवन अवलंबून आहे असे म्हणत, सैतानाने यहोवावर खोटे बोलण्याचा सरळ सरळ आरोप केला. त्याने घडवलेल्या प्राण्यांना देव काही चांगली गोष्ट—जीवनात स्वतःचे मानक ठरवण्याची कुवत—नाकारत होता, असा दावा त्याने केला. सैतानाने निक्षून म्हटले: “तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल.” (उत्प. ३:१-५) तिने स्वतःचे निर्णय घेतल्यास तिचा फायदा होईल असा हव्वेला विश्‍वास वाटावा असा आभास सैतानाने उत्पन्‍न केला. सूचितार्थाने, अधिपत्य करण्याच्या देवाच्या हक्काला तसेच पद्धतीला, तेथे त्याने आव्हान दिले. उद्‌भवलेल्या या वादात वस्तुतः विश्‍वव्यापी सार्वभौमत्व गोवलेले होते.

२. पहिल्या मानवी जोडप्याचे रक्षण कशाने झाले असते?

यहोवाविषयीच्या प्रेमाने हव्वेचे रक्षण केले असते. पतीच्या प्रमुखत्वाबद्दलच्या आदरानेही तिला चुकीपासून अडवले असते. पण तिने फक्‍त तत्कालिक फायद्याचाच विचार केला. मनाई केलेली गोष्ट तिच्या डोळ्यांना हवीशी झाली. सैतानाच्या युक्‍तिवादाने पार फसल्यामुळे तिने देवाचा नियम मोडला. मग तिने आदामाला त्यात गोवले. सैतानाच्या लबाडीने आदाम फसला नसला तरी त्यानेही यहोवाच्या प्रेमास अनादर प्रदर्शित केला आणि यहोवाच्या प्रमुखत्वाकडे दुर्लक्ष करुन आपल्या विद्रोही पत्नीची बाजू घेण्याचे ठरवले.—उत्प. ३:६; १ तीम. २:१३, १४.

३. (अ) यहोवाच्या सार्वभौमत्वावरील सैतानाच्या हल्ल्याशी आणखी कोणत्या वादाचा घनिष्ठ संबंध आहे? (ब) त्याचा परिणाम कोणावर झालेला आहे?

एदेनमधल्या घटनेने सैतानाचा यहोवाच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला संपला नाही. तेथे त्याला मिळालेल्या वरकरणी यशानंतर यहोवावरील इतरांच्या निष्ठेबद्दल त्याने शंका घेतली. तेव्हा हा, पहिल्या वादाशी निकटचा संबंध असलेला दुय्यम वादविषय झाला. त्याच्या या आव्हानात, आदामाचे वंशज आणि देवाचे सर्व आत्मिक पुत्र तसेच यहोवाच्या परमप्रिय ज्येष्ठ पुत्राचाही, अंतर्भाव झाला. ईयोबाच्या काळात सैतानाने आरोप केला की, यहोवाची सेवा करणारे, देव व शासन करण्याची त्याची रीत त्यांना आवडते म्हणून नव्हे तर स्वार्थासाठी त्याची सेवा करतात. कष्टदायक परिस्थितीत पडल्यास ते सर्व स्वार्थी होतील असा मुद्दा त्याने मांडला. तो बरोबर होता का?—ईयो. १:६-१२; २:१-६; प्रकटी. १२:१०.

वादविषयाला त्यांनी दाखवलेली प्रतिक्रिया

४. अनेक मानवांनी यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन का केलेले नाही?

बंड करण्यात इतरही सैतानाला सामील होण्याची शक्यता यहोवाने अमान्य केली नाही. इतकेच काय, एदेन बागेत शिक्षा सुनावताना ‘सैतानाची संतती’ बनणाऱ्‍यांचाही उल्लेख देवाने केला. (उत्प. ३:१५) येशूला मारण्याचे कारस्थान करणारे परुशी आणि ख्रिस्ताचा विश्‍वासघात करणारा यहुदा इस्कर्योत हे त्यातले होते. त्यांनी नकळत चुकीचे पाऊल टाकले नाही. योग्य काय ते माहीत असूनही यहोवा व त्याच्या सेवकांविरुद्ध त्यांनी बुद्धयाच तसा पवित्रा घेतला. परंतु इतर अगणित लोक अज्ञानामुळे यहोवाच्या दंडकानुसार वागले नाहीत.—प्रे. कृत्ये १७:२९, ३०.

५. (अ) हव्वेच्या उलट, यहोवाशी एकनिष्ठ राहिलेल्यांचे त्याच्या वचनाबद्दल काय मत आहे? (ब) नोहाने त्याची निष्ठा कशी सिद्ध केली व त्याच्या उदाहरणापासून आपल्याला कसा फायदा होतो?

या सर्वांच्या विरुद्ध होते विश्‍वासू पुरुष आणि स्त्रिया. त्यांनी आपल्या सृष्टीकर्त्याबद्दल माहिती मिळवली आणि सार्वभौम राजा या नात्याने त्याच्यावरची आपली निष्ठा सिद्ध केली. त्यांनी देवावर विश्‍वास ठेवला. त्याचे ऐकण्यावर आणि त्याच्याशी आज्ञाधारक राहण्यावर त्यांचे जीवन अवलंबून असल्याचे त्यांना माहीत होते. नोहा असाच एक माणूस होता. तेव्हा, “सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे . . . तू आपल्यासाठी . . . तारू कर” असे देवाने नोहाला म्हटल्यावर नोहाने यहोवाचे मार्गदर्शन स्वीकारले. इशारा दिला गेल्यावरही त्या काळचे इतर लोक जणू काही आगळे घडणारच नाही असे, जीवनाच्या नित्याच्या गोष्टी करत राहिले. पण नोहाने एक प्रचंड तारू बांधले आणि यहोवाच्या धार्मिक मार्गांबद्दल इतरांना सांगण्यात तो व्यग्र राहिला. पवित्र शास्त्र अहवालात म्हटल्याप्रमाणे “नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.”—उत्प. ६:१३-२२; तसेच इब्रीयांस ११:७ व २ पेत्र २:५ देखील पहा.

६. (अ) एकनिष्ठ राहणाऱ्‍यांचे दुसरे वैशिष्ट्य कोणते? (ब) सारेने हे गुण कसे प्रदर्शित केले आणि तिच्या उदाहरणापासून आपला कसा फायदा होऊ शकेल?

प्रमुख-पदाच्या तत्त्वाबद्दल गाढ आदर व त्यासोबत यहोवाविषयी वैयक्‍तिक प्रेम या गोष्टी निष्ठावंत लोकांमध्ये विशेषतः दिसून आल्या आहेत. आपल्या पतीच्या मर्यादेबाहेर जाणाऱ्‍या हव्वेसारखे ते नाहीत. किंवा यहोवाच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्‍या आदामासारखेही नाहीत. अब्राहामाची पत्नी सारा हिने हे उत्तम गुण प्रदर्शित केले. तिच्या बोलण्यातच नव्हे तर तिच्या हृदयातही अब्राहाम तिचा “धनी” होता. त्याशिवाय तिचे यहोवावर वैयक्‍तिक प्रेम होते व ती एक विश्‍वासू स्त्री होती. अब्राहामासोबत ती “पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची [देवाचे राज्य] वाट पाहात” होती.—१ पेत्र ३:५, ६; इब्री. ११:१०-१६.

७. (अ) मोशेने कोणत्या परिस्थितीत यहोवाचे सार्वभौमत्व उचलून धरले? (ब) त्याच्या उदाहरणाचा आपल्याला कसा फायदा होऊ शकेल?

अब्राहामाने आपला मायदेश सोडल्यावर सुमारे ४३० वर्षांनी, इजिप्तच्या (मिसर) फारोशी समोरासमोर सामना करताना, मोशेने यहोवाच्या सार्वभौमत्वाला उचलून धरले. मोशेमध्ये आत्मविश्‍वास होता असे नव्हे. उलट योग्य रीतीने बोलण्याच्या स्वतःच्या कुवतीबद्दल तो साशंक होता. पण त्याने यहोवाची आज्ञा पाळली. यहोवाच्या पाठबळाने व अहरोन या त्याच्या भावाच्या मदतीने मोशेने पुनःपुन्हा फारोला यहोवाचा संदेश दिला. फारो हट्टी होता. इतकेच नव्हे तर इस्राएलाच्या काही लोकांनीही मोशेवर कडक टीका केली. पण यहोवाने सांगितलेल्या सर्व गोष्टी मोशेने निष्ठेने केल्या आणि त्याच्याद्वारे इस्राएलांना इजिप्तपासून (मिसर) मुक्‍त केले गेले.—निर्ग. ७:६; १२:५०, ५१.

८. (अ) यहोवाशी एकनिष्ठ राहण्यामध्ये, देवाने स्पष्टपणे लेखबद्ध केलेल्या गोष्टी पाळण्यापेक्षा अधिक गोवलेले असल्याचे कशावरुन दिसून येते? (ब) अशा प्रकारच्या एकनिष्ठतेची कदर ठेवल्यास १ योहान २:१५ लागू करण्यात आपल्याला कशी मदत होईल?

नियमांचे शब्दशः पालन करण्याची, देवाने फक्‍त लेखबद्ध केलेल्या गोष्टी पाळण्याचीच गरज होती असा विचार यहोवाशी एकनिष्ठ असलेल्यांनी केला नाही. पोटीफराच्या पत्नीने व्यभिचार करण्यासाठी योसेफाला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा व्यभिचाराला मनाई करणारी लेखी आज्ञा नव्हती. परंतु एदेन बागेत यहोवाने स्थापन केलेल्या विवाह योजनेबाबत योसेफाला असलेल्या माहितीच्या आधारे, दुसऱ्‍या माणसाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवणे देवाला अप्रिय असेल याची त्याला जाणीव होती. देव त्याला कोठवर इजिप्तच्या लोकांप्रमाणे होऊ देईल याची परिक्षा पाहण्यात योसेफाला रस नव्हता. देवाने मानवजातीशी केलेल्या व्यवहारावर चिंतन करून, व त्यावरून त्याला समजलेली देवाची इच्छा सातत्याने पाळून, त्याने यहोवाच्या मार्गांचे समर्थन केले.—उत्प. ३९:७-१२; पडताळा स्तोत्रसंहिता ७७:११, १२.

९. ईयोबाच्या काळात सैतानाने केलेल्या आरोपाच्या बाबतीत सैतान वारंवार खोटा कसा ठरला आहे?

कठोर परिक्षा आल्यासही, यहोवाला खरोखरी जाणणारे, त्याच्याकडे पाठ फिरवत नाहीत. ईयोबाची मालमत्ता गमावल्यास किंवा त्याचा शारीरिक छळ झाल्यास, यहोवाने प्रशंसा केलेला हा माणूसही देवाला सोडील असा आरोप सैतानाने केला. परंतु सैतान खोटे बोलणारा असल्याचे ईयोबाने सिद्ध केले आणि तेही, त्याच्यावर गुदरलेल्या संकटांचे कारण माहीत नसताना. (ईयो. २:३, ९, १०) तरीही त्यानंतर, आपले तेच खरे हे शाबीत करण्यात सैतानाने बाबेलच्या राजाने स्थापन केलेल्या मूर्तीपुढे उपासना न केल्यास धगधगत्या भट्टीत टाकले जाण्याची धमकी तीन इब्री युवकांना त्याने त्या संतप्त राजाकडून देववली. राजाची आज्ञा आणि मूर्तिपूजेविरुद्ध देवाचा नियम यातून निवड करावी लागल्यावर, ते यहोवाची सेवा करत असून तोच त्यांचा सार्वभौम अधिपती असल्याचे त्यांनी खंबीरपणे सांगितले. देवाशी एकनिष्ठ राहणे त्यांना प्राणाहून अधिक प्रिय होते—दानी. ३:१४-१८.

१०. आपण यहोवाशी खरोखर एकनिष्ठ असल्याचे सिद्ध करणे आम्हा अपूर्ण मानवांना कसे शक्य आहे?

१० यहोवाशी एकनिष्ठ राहण्यासाठी एखाद्याने पूर्ण असले पाहिजे, व एखादीही चूक करणारा पूर्णपणे अपयशी ठरला आहे असे अनुमान यावरून आपण काढावे का? मुळीच नाही! मोशे उणा पडल्याबद्दल पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे अनेकदा सांगते. यहोवाला राग आला पण त्याने मोशेला अव्हेरले नाही. अनेक बाबतीत अनुकरणीय असले तरी प्रेषितांच्यातही दोष होतेच. एकनिष्ठतेसाठी अंतःकरणपूर्वक आज्ञाधारकपणामध्ये सातत्य असावे लागते. परंतु अपूर्णतेचा आपला वारसा लक्षात घेता, कोणत्याही बाबतीत आपण जाणून-बुजून यहोवाच्या इच्छेकडे दुर्लक्ष न केल्यास तो संतोष पावतो. कमकुवतपणामुळे अपराधात पडल्यास आपण प्रामाणिकपणे पश्‍चात्ताप करावा व त्याची सवय लागू देऊ नये. अशा रीतीने, यहोवा ज्याला चांगले म्हणतो ते आपल्याला खरोखर आवडते व जे वाईट असल्याचे तो दाखवतो त्याचा आपल्याला वीट असल्याचे आपण प्रदर्शित करू. पापाची भरपाई करणाऱ्‍या, येशूच्या बलिदानावरच्या विश्‍वासाच्या आधारे आपण देवाच्या दृष्टीत शुद्ध लौकिक मिळवू.—आमो. ५:१५; प्रे. कृत्ये ३:१९; इब्री. ९:१४.

११. (अ) मानवांमध्ये परिपूर्ण सुभक्‍ति कोणी टिकवली व त्यामुळे काय सिद्ध झाले? (ब) त्याच्या कामामुळे आपल्याला कशी मदत होते?

११ असे असले तरी, पूर्ण स्वरूपाची सुभक्‍ती मानवांना शक्यच नाही असे असेल का? जवळपास ४,००० वर्षे या प्रश्‍नाचे उत्तर एक “पवित्र रहस्य” होते. (१ तीम. ३:१६, न्यू.व.) आदामाला पूर्ण निर्माण केले असले तरी त्याने सुभक्‍तीचे परिपूर्ण उदाहरण घालून दिले नाही. ते कोण घालून देऊ शकेल? निश्‍चितच, त्याच्या अपूर्ण वंशजांपैकी कोणी नाही. तसे करणारा येशू ख्रिस्त हा एकमेव माणूस होता. येशूने साध्य केलेल्या गोष्टीने सिद्ध केले की, अधिक अनुकूल परिस्थितीत असलेल्या आदामाची इच्छा असती तर त्याने परिपूर्ण निष्ठा टिकवली असती. देवाच्या निर्मितीच्या कामात खोट नव्हती. त्यामुळे, दैवी कायद्याला आज्ञाधारकता दाखवण्यातच नव्हे तर विश्‍वाचा स्वामी यहोवा याला वैयक्‍तिक भक्‍ती दाखवण्यात येशू ख्रिस्ताचे उदाहरण अनुसरण्याचा प्रयत्न आपण करतो.

आपले वैयक्‍तिक उत्तर काय आहे?

१२. यहोवाच्या सार्वभौमत्वाबद्दल आपल्या वृत्तीविषयी आपण सदैव जागरूक का असले पाहिजे?

१२ आपल्यातील प्रत्येकाला आज या विश्‍वव्यापी वादाला तोंड द्यावयाचे आहे. तो टाळणे शक्य नाही. आपण यहोवाच्या बाजूला असल्याचे उघड सांगितले असल्यास सैतान आपल्याला त्याचे लक्ष्य बनवतो. शक्य त्या सर्व मार्गांनी तो आपल्यावर दबाव आणतो आणि सध्याच्या दुष्ट व्यवस्थेच्या अंतापर्यंत आणत राहील. आपण सावधपणात शिथिलता येऊ देता कामा नये. (१ पेत्र ५:८) या सर्वश्रेष्ठ वादासंबंधाने आपली भूमिका आपल्या वर्तनाने दिसून येते.

१३. (अ) खोटे बोलणे व चोरी यांच्या उगमाबद्दल कोणत्या गोष्टीमुळे आपण त्या टाळाव्या? (ब) या परिच्छेदाच्या शेवटी असलेल्या, काही लोकांना अशा अपराधांकडे वळवणाऱ्‍या परिस्थितीबद्दल, प्रश्‍नांची उत्तरे, एका वेळी एक अशी द्या.

१३ केवळ जगात सर्वसाधारण आहे म्हणून विश्‍वासघातकी वर्तन क्षुल्लक समजणे आपल्याला परवडणारे नाही. निष्ठा टिकवण्यासाठी जीवनाच्या प्रत्येक बाबतीत यहोवाचे नीतिमान मार्ग लागू करणे जरुरीचे आहे. उदाहरणार्थ खालील गोष्टींचा विचार करा:

 (१) आपल्या पहिल्या माता-पित्यांना पापाच्या मार्गाला लावण्यासाठी सैतानाने लबाडी केली. तो “लबाडीचा बाप” बनला. (योहा. ८:४४)

 कोणत्या परिस्थितीत काही वेळा मुले त्यांच्या माता-पित्यांशी प्रामाणिक राहण्यात उणी पडतात? हे टाळणे ख्रिस्ती युवकांसाठी महत्त्वाचे का आहे? (नीती. ६:१६-१९)

 धंद्यातल्या कोणत्या व्यवहारांमुळे एखाद्या व्यक्‍तीचा संबंध सत्याच्या देवाऐवजी ‘लबाडीच्या बापा’बरोबर जोडला जाण्याची शक्यता आहे? (मीखा ६:११, १२)

 आपण आहोत त्यापेक्षा बरे असल्याचे मत व्हावे म्हणून बोलल्यास आणि त्याने इतरांना त्रासही होत नसल्यास ते अयोग्य आहे का? (स्तोत्र. ११९:१६३; पडताळा प्रे. कृत्ये ५:१-११.)

 एखादी व्यक्‍ती गंभीर अपराधात गोवली गेली असल्यास असत्याचा आश्रय घेऊन त्यावर पांघरुण न घालणे महत्त्वाचे का आहे? (नीती. २८:१३)

 (२) चांगल्या व वाईटासंबंधी स्वतः निर्णय घेण्याबद्दल सैतानाच्या प्रोत्साहनाने हव्वेने व नंतर आदामाने कृती केली तेव्हा, त्यांनी सर्वप्रथम केलेली गोष्ट म्हणजे त्यांची नसलेली वस्तू त्यांनी घेतली. ते चोर झाले.

 एखाद्या व्यक्‍तीला निकड असली किंवा ज्याच्या वस्तू घेतल्या जातात त्याच्यापाशी विपुलता असली तर चोरी समर्थनीय ठरते का? (नीती. ६:३०, ३१; १ पेत्र ४:१५)

 आपण राहतो तेथे तो सर्वसाधारण प्रघात असल्यास किंवा घेतलेली वस्तू क्षुल्लक असल्यास ते कमी आक्षेपार्ह आहे का? (रोम. १२:२; इफिस. ४:२८; लूक १६:१०)

१४, १५. (अ) ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या कारकीर्दीच्या शेवटी सर्व मानवजातीवर कोणती परीक्षा येईल? (ब) आपल्या आताच्या कृत्यांचा त्या वेळच्या निष्पत्तीवर काय परिणाम होईल?

१४ ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या कारकीर्दीमध्ये सैतान आणि त्याचे दुरात्मे अथांग डोहात असतील. ते मानवजातीवर प्रभाव टाकू शकणार नाहीत. त्यामुळे किती दिलासा मिळेल! परंतु त्या हजार वर्षांनंतर थोड्या वेळेसाठी त्यांना बंधमुक्‍त केले जाईल. परिपूर्ण केलेल्या मानवजातीतल्या, आपली सचोटी टिकवणाऱ्‍या “पवित्र जनां”वर सैतान आणि त्याचे अनुयायी दबाव आणतील. स्वर्गीय यरुशलेमने पृथ्वीवर स्थापन केलेले नीतिमत्त्व नाहीसे करण्याचा प्रयत्न करून तो, जणू युद्धाच्या पवित्र्यात त्या “प्रिय नगरा”वर चढाई करील.—प्रकटी. २०:७-१०.

१५ मानवांना यहोवाशी बेईमान कृत्ये करण्याची फूस लावण्यासाठी, मागील प्रमाणेच सैतान स्वार्थीपणा व गर्वाला प्रोत्साहन तसेच फसवेगिरीचा उपयोग करण्याची शक्यता आहे. त्या काळात जगण्याचा सन्मान आपल्याला मिळालेला असल्यास आपली व्यक्‍तिगत प्रतिक्रिया कशी असेल? त्या विश्‍वव्यापी वादाविषयी आपली अंतःकरणे कोठे झुकलेली असतील? तेव्हा सर्व मानवजात पूर्णत्वाला पोंहचलेली असल्याने बेईमानीचे कोणतेही कृत्य बुद्धिपुरस्सर केलेले असेल आणि त्याचा परिणाम कायमच्या नाशात होईल. त्याकाळी आपण एकनिष्ठ सिद्ध व्हावे म्हणून त्याच्या वचनाद्वारे वा संस्थेमार्फत यहोवा देत असलेल्या कोणत्याही निर्देशाला तत्पर व सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्‍त करण्याची सवय आपण आताच लावून घेणे किती अगत्याचे आहे! तसे केल्याने विश्‍वाचा सार्वभौम सत्ताधीश म्हणून त्याला आपण खरी भक्‍ती प्रदर्शित करू.

पुनरावलोकन चर्चा

• सर्व सृष्टीला तोंड द्यावा लागणारा वादविषय काय आहे? त्यात आपण कसे गोवले गेलो?

• पृष्ठ ४९ वर दाखवलेल्या प्रत्येक पुरुष व स्त्रीने यहोवाशी वेगवेगळ्या मार्गी जी निष्ठा सिद्ध केली; त्यांचे वैशिष्ठ काय?

• दररोज आपल्या वर्तनाने यहोवाला गौरवण्याची काळजी आपण घेणे अगत्याचे का आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[४९ पानांवरील चौकट/चित्रं]

त्यांनी यहोवाचे सार्वभौमत्व उचलून धरले

नोहा

सारा

मोशे

योसेफ

ईयोब

त्यांच्या उदाहरणाने आपला फायदा कसा होऊ शकतो?