सल्ला ऐका, शिस्तीचा स्वीकार करा
अध्याय १६
सल्ला ऐका, शिस्तीचा स्वीकार करा
१. (अ) सल्ला व शिस्तीची गरज नसलेले कोणी आपल्यात आहेत का? (ब) परंतु आपण कोणत्या प्रश्नांवर विचार करणे फायद्याचे आहे?
“आपण सगळेच पुष्कळ चुका करतो.” या शास्त्रवचनाशी आपल्यातले बहुतेकजण झटकन सहमत होतात. (याको. ३:२) आपण ज्या प्रकारचे लोक असावे असा आग्रह देवाचे वचन करते व आपलीही इच्छा असते, त्यात उणे पडलेले आहोत अशा घटनांची आठवण करणे कठीण नाही. याचा अर्थ, “सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील.” असे जे पवित्र शास्त्र आपल्याला सांगते, ते बरोबर असल्याचे आपण मान्य करतो. (नीती. १९:२०) आपल्याला अशा मदतीची गरज असल्याचे आपण जाणतो. पवित्र शास्त्रातून शिकलेल्या गोष्टींशी आपले जीवन सुसंगत व्हावे म्हणून आपण आपल्या जीवनात जरूर ते बदल केलेले आहेत यात शंका नाही. परंतु ज्यात वेडगळासारखे वागलो अशा एखाद्या विवक्षित बाबतीत एखाद्या ख्रिस्ती बांधवाने आपल्याला वैयक्तिकरित्या सल्ला दिल्यास, आपण कशी प्रतिक्रिया दाखवतो? किंवा, एखाद्या कार्यात आपल्याला सुधारणा कशी करता येईल याविषयी त्याने फक्त एखादी सूचना दिल्यास कसे?
२. (अ) वैयक्तिक सल्ल्याबद्दल आपण कदर का दाखवावी? (ब) आपण कशी प्रतिक्रिया दाखवू नये?
२ अपूर्ण मानवी स्वभावामुळे आपली तात्कालिक आंतरिक प्रतिक्रिया काहीही असली तरी, सल्ल्याबद्दल आपण मनःपूर्वक आभार व्यक्त केले पाहिजेत व तो लागू करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसे करण्याचा परिणाम हितकारक होऊ शकतो. (इब्री. १२:११) परंतु सल्ला मिळाल्यावर, परिस्थितीचे गांभीर्य कमी लेखून वा दुसऱ्यांवर दोष ढकलून, आपण स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असेल. तुम्ही कधी अशी प्रतिक्रिया दाखवली आहे का? त्या प्रसंगांची आठवण झाल्यावर सल्ला देणाऱ्याबद्दल आपल्याला राग येतो का? सल्ला देणाऱ्याच्या चुका काढण्याची किंवा सल्ला देण्याच्या त्याच्या पद्धतीवर टीका करण्याची आपली वृत्ती असते का, जणू त्यामुळे आपल्या दुर्बलतेचे समर्थन होऊ शकेल? अशा वृत्तीवर मात करण्यास पवित्र शास्त्र एखाद्याला मदत करू शकते का?
आपल्या बोधासाठी नमूद केलेली उदाहरणे
३. (अ) सल्ला व शिस्तीबद्दल योग्य दृष्टिकोन उत्पन्न करण्यात आपल्याला मदत करू शकेल असे काय पवित्र शास्त्रात आहे? (ब) शौल व उज्जीया यांनी सल्ल्याला दाखवलेल्या प्रतिक्रियांचे विश्लेषण करण्यासाठी वर दिलेल्या प्रश्नांचा उपयोग करा.
३ या विषयावर विपुलतेने दिलेल्या स्पष्ट बोधाव्यतिरिक्त, सल्ला दिल्या गेलेल्या व्यक्तींच्या खरोखरच्या अनुभवांचा समावेश देवाच्या वचनात आहे. अनेकदा तो सल्ला वळण लावणारा होता, म्हणजे तो मिळालेल्या व्यक्तीला त्याचा कल वा वागणूक बदलण्याची गरज होती. या उदाहरणांचे परिक्षण करण्यासाठी खालील प्रश्नांचा उपयोग तुम्ही कराल तेव्हा, आपल्या सर्वांना फायदेशीर असे पुष्कळसे त्यांत असल्याचे तुम्हाला आढळून येईल:
कीश-पुत्र, शौल: अमालेकाविरूद्ध लढताना, त्यांचा राजा व उत्तम गुरे राखून ठेवल्याने यहोवाची आज्ञा पूर्णपणे पाळण्यात तो उणा पडला होता. (१ शमु. १५:१-११)
शमुवेलाने दिलेल्या तंबीवजा सल्ल्यावरील शौलाच्या प्रतिक्रियेत, तो आपल्या चुकीला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असल्याचे कशावरून दिसून येते? (वचन २०) कोणावर दोष ढकलण्याचा प्रयत्न त्याने केला? (वचन २१) शेवटी चूक कबूल केल्यावर, त्याने कोणती सबब दिली? (वचन २४) येथवर आल्यावरदेखील त्याला सर्वांत जास्त चिंता कशाची असल्यासारखे दिसत होते? (वचने २५, ३०)
उज्जीया: फक्त याजकांनाच धूप जाळण्याचा अधिकार दिला गेला असताना, तो धूप जाळण्यासाठी यहोवाच्या मंदिरात गेला. (२ इति. २६:१६-२०)
उज्जीया राजाला रोखण्याचा प्रयत्न मुख्य याजकाने केला तेव्हा राजा का संतापला? (१६व्या वचनाशी तुलना करा.) यातून काय निष्पन्न झाले? (वचने १९-२१)
४. (अ) शौल व उज्जीया या दोघांना सल्ला स्वीकारणे कठीण का गेले? (ब) आजही ती एक गंभीर समस्या का आहे?
४ या प्रत्येक उदाहरणात, सल्ल्याची गरज असल्याची वस्तुस्थिती स्वीकारणे, त्या व्यक्तीला कठीण का जात होते? स्वतःला अतिमहत्त्व देणे, गर्व, ही मूलभूत समस्या होती. या गुणामुळे आज अनेक जण स्वतःवर दुःखे ओढवून घेतात. वयामुळे वा पदामुळे असो, त्यांच्या दृष्टीने समाजात काही स्थान प्राप्त झाल्यावर, त्यांना वैयक्तिक सल्ला मानवेनासा होतो. त्याच्यामुळे त्यांच्यात उणीव असल्याचे सूचित होते अथवा त्यांच्या लौकिकास बट्टा लागतो असे त्यांना वाटते असे दिसते. पण खरे पाहिल्यास गर्वाने दुर्बलता सूचित होते. हा सर्वसाधारण दोष आहे म्हणून स्वतःमध्ये क्षम्य मानता येत नाही. यहोवा त्याच्या वचनातून व त्याच्या दृश्य संस्थेमार्फत देत असलेल्या प्रेमळ मदतीला एखाद्याने विरोध करावा म्हणून, त्या व्यक्तीची विचार-शक्ती कमकुवत करण्यासाठी सैतान हा फास वापरतो. यहोवा इशारा देतो: “गर्व झाला की नाश ठेवलेला, मनाचा ताठा अधःपतनाचे मूळ होय.”—नीती. १६:१८; तसेच, रोमकर १२:३; नीतीसूत्रे १६:५ पहा.
५. मोशे व दावीद यांच्या विषयीच्या वृत्तांतापासून कोणते धडे घेता येतात हे शोधून काढण्यासाठी या परिच्छेदातील प्रश्नांचा उपयोग करा.
५ याउलट, सल्ला स्वीकारणाऱ्यांची उत्तम उदाहरणे पवित्र शास्त्रात आहेत. त्यांतूनही बहुमोल धडे शिकता येतात. विचारात घ्या:
मोशे: आपले स्वास्थ्य न बिघडवता कामाचा अवजड बोजा कसा हाताळावा याविषयी त्याला त्याच्या सासऱ्याने काही व्यावहारिक सल्ला दिला. मोशेने तो ऐकला व तात्काळ लागू केला. (निर्ग. १८:१३-२४)
मोशेला मोठा अधिकार होता तरी, हितावह सल्ला तो इतक्या सहजी का स्वीकारत असे? (पडताळा गणना १२:३.) तो गुण आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे? (सफ. २:३)
दावीद: व्यभिचार करणे, व मग दाविदाला तिच्याशी लग्न करता यावे व व्यभिचार दडपता यावा म्हणून त्या स्त्रीच्या पतीला ठार करण्यासाठी गुप्त योजना करणे, यांबाबतीत तो दोषी होता. त्यानंतर काही महिन्यांनी दाविदाची कानउघाडणी करण्यासाठी यहोवाने नाथानाला पाठवले. (२ शमु. ११:२–१२:१२)
कानउघाडणी केल्याबद्दल दावीद संतापला का, किंवा त्याने आपल्या चुकीला कमी लेखले, वा दुसऱ्यावर दोष ढकलण्याचा प्रयत्न केला का? (२ शमु. १२:१३; स्तोत्र. ५१: मथळा आणि वचने १-३) दाविदाचा पश्चात्ताप देवाने स्वीकारला याचा अर्थ त्याच्या चुकीचा वर्तनाच्या वाईट परिणामांपासून दावीद आणि त्याच्या परिवाराला मुक्त केले गेले, असा झाला का? (२ शमु. १२:१०, ११, १४; निर्ग. ३४:६, ७)
६. (अ) हितावह सल्ला देणाऱ्यांबद्दल दाविदाला काय वाटले? (ब) असा सल्ला खरोखर स्वीकारल्यास आपला कसा फायदा होऊ शकेल? (क) आपली खरमरीत कानउघाडणी झाल्यास, काय विसरू नये?
६ हितावह सल्ल्याकडे कान देण्याचे फायदे दावीद राजाला चांगले ठाऊक होते, व तो ज्याच्यामार्फत आला, त्याच्यासाठी त्याने देवाचे आभारही मानले. (१ शमु. २५:३२-३५; तसेच, नीतीसूत्रे ९:८ पाहा.) आपण तसे आहोत का? असल्यास, त्यामुळे पश्चात्ताप करायला लावणाऱ्या अनेक गोष्टी बोलण्या वा करण्यापासून आपला बचाव होईल. बथशेबाच्या बाबतीत पाप केल्यामुळे जशी दाविदाची खरमरीत कानउघाडणी झाली, तशा परिस्थितीत आपण आल्यास मिळणारी शिक्षा, आपल्या शाश्वत कल्याणाच्या दृष्टीने यहोवाच्या प्रेमाचा पुरावा आहे, ही वस्तुस्थिती आपण विसरता कामा नये.—नीती. ३:११, १२; ४:१३.
बहुमोल गुण जोपासणे
७. देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी, येशूने दाखवलेला कोणता गुण व्यक्तीमध्ये असलाच पाहिजे?
७ यहोवा आणि आपल्या ख्रिस्ती बांधवांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी आपल्याला काही वैयक्तिक गुण उत्पन्न करण्याची गरज आहे. एका लहान मुलाला आपल्या शिष्यांच्या मध्ये उभे करून, “तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. ह्यास्तव जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होय,” असे म्हणताना येशूने त्या गुणांतील एकावर प्रकाश टाकला. (मत्त. १८:३, ४) त्या शिष्यांना स्वतःमध्ये बदल करण्याची गरज होती. गर्व काढून टाकून त्यांनी नम्रता जोपासायची होती.
८. (अ) आपण कोणापुढे नम्र असण्याची गरज आहे व का? (ब) तसे असल्यास, आपण सल्ल्याला कशी प्रतिक्रिया दाखवू?
८ पुढे प्रेषित पेत्राने त्याच्या ख्रिस्ती बंधूंना लिहिले: “तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करितो आणि लीनांवर कृपा करितो.” (१ पेत्र ५:५) देवापुढे नम्र असले पाहिजे हे आपण जाणतो. पण हे शास्त्रवचन म्हणत आहे की, विश्वास-बंधूंशी असलेल्या आपल्या संबंधांतही नम्र वा लीन असण्याची गरज आहे. तसे असलो तर, त्यांनी सल्ला दिल्यावर आपण वेड्याप्रमाणे रागावणार नाही, तर एकमेकांपासून शिकण्यास तयार असू. (नीती. १२:१५) आणि आपल्या सुधारणेसाठी सल्ला देण्याची गरज आपल्या बंधूंना दिसून आल्यास, आपली घडण करण्यासाठी यहोवा प्रेमळपणे हा मार्ग वापरतो याची जाणीव ठेऊन, आपण त्याचा अव्हेर करणार नाही.—स्तोत्र. १४१:५.
९. (अ) कोणत्या गुणाचा नम्रतेशी निकटचा संबंध आहे? (ब) आपल्या कामाच्या, इतरांवर होणाऱ्या परिणामांबद्दल काळजी का करावी?
९ नम्रतेशी निकटचा संबंध असलेला दुसरा गुण म्हणजे, दुसऱ्यांच्या कल्याणाची खरोखरची चिंता बाळगणे. आपल्या कामाचा इतरांवर परिणाम होतो ही वस्तुस्थिती आपल्याला टाळता येत नाही. दुसऱ्यांच्या विवेकाबद्दल काळजी व्यक्त करण्याचा सल्ला, प्रेषित पौलाने करिंथ व रोम मधल्या सुरूवातीच्या ख्रिश्चनांना दिला. त्यांनी सर्व वैयक्तिक आवडी-निवडी बाजूला साराव्या असे तो म्हणत नव्हता. तर जी गोष्ट चूक आहे असे एखाद्याचा विवेक त्याला सांगत आहे, ती करण्यास तो धजावेल व अंती त्याचा आध्यात्मिक नाश होईल, असे काहीही न करण्याचा आग्रह त्याने त्यांना केला. एकूण तत्त्व स्पष्टतेने व्यक्त करताना पौलाने लिहिले: “कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्याचे पाहावे. . . . म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. यहुदी, हेल्लेणी व देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखळविणारे होऊ नका.”—१ करिंथ. १०:२४-३३; ८:४-१३; रोम. १४:१३-२३.
१०. तो पवित्र शास्त्रीय सल्ला लागू करण्याचा सराव आपण करत आहोत असे कशावरून दिसून येईल?
१० तुम्ही, वैयक्तिक आवडी-निवडीपेक्षा इतरांच्या कल्याणाला अधिक महत्त्व देण्याचा सराव करणारे आहात का? तसे करण्याचे अनेक मार्ग आहेत. तरीही या उदाहरणाचा विचार करा: आपण जोवर मर्यादशील, नीटनेटके व स्वच्छ असू तोवर, सर्वसाधारणपणे पाहता, पोषाख व साज-श्रृंगार या गोष्टी केवळ वैयक्तिक आवडीच्या आहेत. परंतु, तुमच्या आसपासच्या लोकांच्या पार्श्वभूमीमुळे, तुमचा पोषाख आणि साज-श्रृंगाराची पद्धत, राज्याचा संदेश ऐकण्यात लोकांना अडथळा आणत आहे, असे तुम्हाला कळल्यास, तुम्ही जरूर तो बदल कराल का? स्वतःला खूष करण्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीचे जीवन तुम्हाला अधिक महत्त्वाचे वाटते का?
११. ख्रिस्ती असावे अशी आपली खरोखरची इच्छा असल्यास हे गुण जोपासणे महत्त्वाचे आहे, हे कशावरून दिसून येते?
११ वर चर्चा केलेले गुण आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनले की आपले मन ख्रिस्ताच्या मनासारखे होऊ लागले आहे याचा तो पुरावा आहे. नम्रतेमध्ये येशूने अचूक उदाहरण घालून दिले. (योहा. १३:१२-१५; फिलिप्पै. २:५-८) केवळ स्वतःला खूष करण्याऐवजी इतरांची काळजी घेण्यात, आपण गिरवावा असा कित्ता त्याने घालून दिला.—रोम. १५:२, ३.
यहोवाच्या शिस्तीचा अव्हेर करू नका
१२. (अ) देवाला संतोष होईल असे व्यक्तिमत्व असण्यासाठी आपणा सर्वांना कोणते बदल करण्याची गरज आहे? (ब) आपल्याला कशाची मदत होईल?
१२ आपण सर्व पापी असल्याकारणाने, आपल्या देवाचे व्यक्तिमत्व परावर्तित करण्यासाठी आपली वृत्ती, आपले बोलणे व आपले वर्तन यांत बदल करण्याची जरूरी आहे. आपल्याला “नवा मनुष्य” धारण करण्याची गरज आहे. (कलस्सै. ३:५-१४; तीत २:११-१४) कोणत्या क्षेत्रात फेरबदल करण्याची आवश्यकता आहे ते ओळखण्यात व मग ते कसे करावे हे जाणण्यात, सल्ला व शिस्तीची मदत आपल्याला होते.
१३. (अ) आपणा सर्वांसाठी यहोवाने कोणत्या मार्गाने सल्ला व शिस्तीची तरतूद केलेली आहे? (ब) आपण त्याविषयी काय केले पाहिजे?
१३ पवित्र शास्त्र हेच या शिक्षणाचा मूलभूत स्रोत आहे. (२ तीम. ३:१६, १७) तसेच, पवित्र शास्त्राचे साहित्य आणि यहोवाच्या दृश्य संस्थेने योजलेल्या सभा, यातून ते कसे लागू करावे हे पाहण्यास तो आपल्याला मदत करतो. तीच गोष्ट आधी ऐकली असली तरी —वैयक्तिकरित्या असलेली त्याची गरज आपण नम्रपणे मान्य करू का व सुधारणा करण्याचा सतत प्रयत्न करू का?
१४. व्यक्तिगत पातळीवर आपल्यासाठी यहोवा आणखी कोणत्या मदतीची तरतूद करतो?
१४ ज्या गोष्टी आपल्या दृष्टीने विशेष समस्या असतील, अशांशी एकलेपणाने झुंजण्यासाठी यहोवा आपल्यावर सोडून देत नाही. प्रेमापोटच्या काळजीने तो वैयक्तिक मदतीची तरतूद करतो. गृह पवित्र शास्त्र—अभ्यासामार्फत मिळणाऱ्या अशा मदतीपासून लाखो लोकांना फायदा झाला आहे. पुढील आयुष्यात ज्यामुळे मनस्ताप होईल अशा वर्तनापासून मुलांचा बचाव करण्यासाठी त्यांना शिस्त लावण्याची विशेष जबाबदारी पालकांवर आहे. (नीती. ६:२०-३५; १५:५) मंडळीतही आध्यात्मिक गुणवत्ता असलेल्यांना तशी गरज दिसून आल्यास, इतरांमध्ये पूर्णता आणण्यासाठी शास्त्रवचनांचा उपयोग करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. पण त्यांनी ते काम सौंम्य वृत्तीने केले पाहिजे. (गलती. ६:१, २) एकता असलेले लोक म्हणून आपण त्याची उपासना करावी या उद्देशाने वरील मार्गांनी यहोवा आपल्याला सल्ला देतो व शिस्त लावतो.
पुनरावलोकन चर्चा
• आपण व्यक्तिशः कोठे फेरबद्दल करण्याची गरज आहे ते पाहण्यास यहोवा कशी प्रेमळ मदत करतो?
• अनेकांना सल्ला स्वीकारणे कठीण का जाते? हे किती गंभीर आहे?
• सल्ल्याचा स्वीकार करण्यासाठी कोणते बहुमोल गुण आपल्याला मदत करतील? यांमध्ये येशूने कसा कित्ता घालून दिला?
[अभ्यासाचे प्रश्न]