धडा ३४
आपलं यहोवावर प्रेम आहे हे आपण कसं दाखवू शकतो?
बायबलचा हा अभ्यास सुरू केल्यापासून तुम्हाला देवाच्या आणखी जवळ आल्यासारखं वाटतं का? त्याच्यासोबतचं हे नातं तुम्हाला पुढेही मजबूत करत राहायचंय का? तर मग हे नेहमी लक्षात असू द्या, की तुम्ही यहोवावर किती प्रेम करता हे तो पाहू शकतो. तुम्ही त्याच्यावर जितकं जास्त प्रेम कराल, तितकंच तोही तुमच्यावर प्रेम करेल आणि तुमची काळजी घेईल. पण तुमचं यहोवावर प्रेम आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?
१. यहोवावर आपलं प्रेम आहे हे आपण त्याला कसं दाखवतो?
जेव्हा आपण यहोवाच्या आज्ञा पाळतो, तेव्हा आपण दाखवतो की आपलं त्याच्यावर प्रेम आहे. (१ योहान ५:३ वाचा.) तो कोणालाही त्याच्या आज्ञा पाळायची जबरदस्ती करत नाही. याउलट, त्याच्या आज्ञा पाळायच्या की नाही याचा निर्णय तो आपल्यावर सोडतो. कारण त्याची इच्छा आहे की आपण त्याच्या आज्ञांचं “मनापासून पालन” करावं. (रोमकर ६:१७) म्हणजेच, त्याच्या आज्ञा फक्त पाळाव्या लागतात म्हणून नाही, तर त्याच्यावर प्रेम असल्यामुळे आपण त्या पाळाव्यात असं त्याला वाटतं. यहोवाला आवडणाऱ्या गोष्टी करून आणि त्याला न आवडणाऱ्या गोष्टींपासून दूर राहून, तुम्ही दाखवू शकता की तुमचं त्याच्यावर प्रेम आहे. या पुस्तकातले भाग ३ आणि ४ तुम्हाला नेमकं हेच करण्यासाठी मदत करतील.
२. यहोवावर आपलं प्रेम आहे हे दाखवणं कधीकधी कठीण का जाऊ शकतं?
“नीतिमान माणसावर बरेच कठीण प्रसंग येतात.” (स्तोत्र ३४:१९) चांगलं ते करण्याची इच्छा असूनही आपल्या सगळ्यांच्याच हातून बऱ्याच वेळा चुका होतात. यासोबतच आपल्याला आर्थिक अडचणी, दुसऱ्यांकडून वाईट वागणूक आणि अशाच इतर समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. असा एखादा कठीण प्रसंग येतो तेव्हा यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागणं आपल्याला कदाचित अवघड जाईल. याउलट, त्याला न आवडणारी गोष्ट करणं त्या वेळी आपल्याला सोपं वाटेल. पण कठीण परिस्थितीतही जेव्हा तुम्ही यहोवावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागता, तेव्हा तुम्ही हे दाखवून देता की तुमचं त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे. शिवाय, तुम्ही हेही दाखवता की तुम्ही त्याला एकनिष्ठ आहात. आणि जेव्हा तुम्ही असं कराल, तेव्हा तोही तुम्हाला एकनिष्ठ राहील आणि तुमची साथ कधीही सोडणार नाही.—स्तोत्र ४:३ वाचा.
आणखी जाणून घेऊ या
आपण यहोवाच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्याला आनंद होतो असं का म्हणता येईल आणि त्याला विश्वासू राहायला आपल्याला कशामुळे मदत मिळेल, हे जाणून घेऊ या.
३. एक वाद ज्यात तुम्हीही सामील आहात
बायबलमधल्या ईयोबच्या पुस्तकात सांगितलंय की सैतानाने ईयोबवर एक आरोप लावला. पण त्याने हा आरोप फक्त ईयोबवरच नाही, तर ज्यांना यहोवाची सेवा करायची आहे अशा सर्व लोकांवर लावला होता. ईयोब १:१, ६–२:१० वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
-
ईयोब यहोवाच्या आज्ञा का पाळतो, याबद्दल सैतानाने कोणता आरोप लावला?—ईयोब १:९-११ पाहा.
-
सैतानाने सगळ्या मानवांवर, म्हणजे तुमच्यावरही कोणता आरोप लावलाय?—ईयोब २:४ पाहा.
ईयोब २७:५ख वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
-
ईयोबने कसं दाखवलं की त्याचं यहोवावर मनापासून प्रेम आहे?
४. यहोवाला आनंद होईल असं वागा
नीतिवचनं २७:११ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
-
आपण यहोवाच्या आज्ञा पाळतो आणि चांगलं वागतो तेव्हा त्याला कसं वाटतं? आणि का?
५. यहोवाला नेहमी एकनिष्ठ राहा
यहोवावर आपलं प्रेम असल्यामुळेच आपण दुसऱ्यांना त्याच्याबद्दल सांगतो. आणि कठीण परिस्थितीतही जेव्हा आपण हे करत राहतो, तेव्हा आपण दाखवतो की आपण यहोवाला एकनिष्ठ आहोत. व्हिडिओ पाहा, आणि मग पुढे दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा.
-
दुसऱ्यांना यहोवाबद्दल सांगणं तुम्हाला कधीकधी कठीण वाटतं का?
-
व्हिडिओमध्ये, ग्रेसनला त्याच्या भीतीवर मात करायला कशामुळे मदत मिळाली?
जेव्हा आपण यहोवाला आवडणाऱ्या गोष्टींवर प्रेम करतो आणि त्याला न आवडणाऱ्या गोष्टींची घृणा करतो, तेव्हा त्याला एकनिष्ठ राहणं आपल्याला सोपं जातं. स्तोत्र ९७:१० वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
-
आपण आतापर्यंत जे शिकलो त्यावरून तुम्हाला काय वाटतं, यहोवाला कोणत्या गोष्टी आवडतात? आणि त्याला कोणत्या गोष्टी आवडत नाहीत?
-
चांगल्या गोष्टींवर प्रेम करायला आणि वाईट गोष्टींची घृणा करायला आपल्याला कशामुळे मदत मिळेल?
६. यहोवाच्या आज्ञा पाळल्यामुळे आपल्याला फायदा होतो
यहोवाच्या आज्ञा पाळणं नेहमीच चांगलं असतं. यशया ४८:१७, १८ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
-
यहोवा जे काही सांगतो ते नेहमी आपल्या भल्यासाठीच असतं असं तुम्हाला वाटतं का? आणि तुम्हाला असं का वाटतं?
-
बायबलचा अभ्यास केल्यामुळे आणि खऱ्या देवाबद्दल, म्हणजेच यहोवाबद्दल शिकून घेतल्यामुळे आतापर्यंत तुम्हाला कोणते फायदे झाले आहेत?
काही जण म्हणतात: “आपण कसंही वागलो तरी देवाला काय फरक पडतो?”
-
आपल्या वागण्यामुळे यहोवाला खरंच फरक पडतो, हे तुम्ही कोणत्या वचनातून दाखवाल?
थोडक्यात
जेव्हा आपण यहोवाच्या आज्ञा पाळतो आणि कठीण परिस्थितीतही त्याला एकनिष्ठ राहतो, तेव्हा आपण हे दाखवतो की आपलं त्याच्यावर प्रेम आहे.
उजळणी
-
ईयोबच्या उदाहरणावरून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
-
तुमचं यहोवावर प्रेम आहे हे तुम्ही कसं दाखवाल?
-
यहोवाला एकनिष्ठ राहायला तुम्हाला कशामुळे मदत होईल?
हेसुद्धा पाहा
तुम्ही यहोवाला आणि ख्रिस्ती मंडळीला एकनिष्ठ कसे राहू शकता हे जाणून घ्या.
सैतानाने मानवांवर कोणते आरोप लावले आहेत याबद्दल जास्त माहिती घ्या.
“ईयोब देवाशी एकनिष्ठ राहतो” (बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते? भाग ६)
लहान मुलंसुद्धा यहोवावर असलेलं प्रेम कसं दाखवू शकतात ते पाहा.
शाळा-कॉलेजात मुलांना सोबत्यांकडून दबाव येतो तेव्हा ते देवाला एकनिष्ठ कसे राहू शकतात?