व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ४३

मद्यपानाबद्दल बायबलमध्ये काय म्हटलंय?

मद्यपानाबद्दल बायबलमध्ये काय म्हटलंय?

जगातल्या वेगवेगळ्या भागांत, मद्यपान करण्याबद्दल लोकांची वेगवेगळी मतं आहेत. काही जणांना अधूनमधून आपल्या मित्रांसोबत ड्रिंक्स घ्यायला आवडतं. तर काही जण दारूला हातही लावत नाहीत. आणि असेही काही जण आहेत जे नशा चढेपर्यंत दारू पितात. पण याबाबतीत बायबलचा काय दृष्टिकोन आहे?

१. दारू पिणं चुकीचं आहे का?

दारू पिणं चुकीचं आहे असं बायबलमध्ये म्हटलेलं नाही. उलट देवाने आपल्याला दिलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल सांगताना बायबलमध्ये ‘मनाला आनंद देणाऱ्‍या द्राक्षारसाचाही’ उल्लेख केलाय. (स्तोत्र १०४:१४, १५) देवाच्या विश्‍वासू सेवकांपैकी असलेले काही स्त्री-पुरुष मद्य प्यायले असं आपण बायबलमध्ये वाचतो.—१ तीमथ्य ५:२३.

२. जे मद्य घेतात त्यांच्यासाठी बायबलमध्ये काय सल्ला दिलाय?

अतिप्रमाणात दारू पिणं आणि दारूचं व्यसन या दोन्ही गोष्टी यहोवाच्या नजरेत चुकीच्या आहेत. (गलतीकर ५:२१) त्याच्या वचनात असं म्हटलंय, “जे खूप द्राक्षारस पितात . . . त्यांची संगत धरू नकोस.” (नीतिवचनं २३:२०) म्हणून जर आपण पीत असलो, तरी आपण कधीही इतकी जास्त पिऊ नये, की ज्यामुळे आपल्याला नीट विचार करता येणार नाही, किंवा आपल्या वागण्या-बोलण्यावर आपला ताबा राहणार नाही, किंवा आपल्या आरोग्याला हानी होईल. आपण एकट्यात पीत असलो तरीही आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. जर आपल्याला आपल्या पिण्यावर नियंत्रण ठेवायला जमत नसेल, तर आपण पूर्णपणे प्यायचं सोडून देणंच बरं राहील.

३. पिण्याबद्दल इतरांच्या निर्णयांचा आपण आदर कसा करू शकतो?

दारू घ्यायची की नाही हा प्रत्येकाचा वैयक्‍तिक निर्णय आहे. त्यामुळे जर कोणी प्रमाणात पीत असेल, तर आपण त्यांच्याबद्दल चुकीचा विचार करू नये. तसंच जर कोणाची प्यायची इच्छा नसेल, तर आपण त्यांना बळजबरीही करू नये. (रोमकर १४:१०) शिवाय, जर आपल्या पिण्यामुळे दुसऱ्‍यांना त्रास होत असेल तर आपण ते टाळलं पाहिजे. (रोमकर १४:२१ वाचा.) आपण “स्वतःचा नाही, तर दुसऱ्‍याचा फायदा” पाहिला पाहिजे.—१ करिंथकर १०:२३, २४ वाचा.

आणखी जाणून घेऊ या

दारू घ्यायची की नाही आणि घेतली तर किती प्रमाणात घ्यायची, हे ठरवण्यासाठी बायबलच्या काही तत्त्वांवर विचार करू या. तसंच जर तुम्हाला जास्त दारू पिण्याची सवय असेल, तर तुम्ही या सवयीवर कशी मात करू शकता हेही जाणून घेऊ या.

४. तुम्ही पिणार की नाही हे ठरवा

मद्यपानाबद्दल येशूचा काय दृष्टिकोन होता? याचं उत्तर जाणून घेण्यासाठी त्याने केलेल्या पहिल्या चमत्कारावर विचार करा. योहान २:१-११ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • मद्यपानाबद्दल आणि मद्यपान करणाऱ्‍यांबद्दल येशूचा कसा दृष्टिकोन होता, हे आपल्याला या चमत्कारावरून कसं कळतं?

  • मद्यपान करणं चुकीचं आहे, असं येशूने म्हटलं नाही. तर मग एखादी व्यक्‍ती दारू घेत असेल, तर अशा व्यक्‍तीबद्दल खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी कसा विचार केला पाहिजे?

खऱ्‍या ख्रिश्‍चनांना पिण्याची मनाई नसली, तरी प्रत्येक प्रसंगी दारू पिणं योग्यच असेल असं नाही. नीतिवचनं २२:३ वाचा, आणि मग खाली दिलेल्या परिस्थितींमध्ये पिणं योग्य राहील की नाही, यावर विचार करा:

  • तुम्ही गाडी किंवा एखादी मशीन चालवणार आहात.

  • तुम्ही गरोदर आहात.

  • डॉक्टरने तुम्हाला अजिबात प्यायचं नाही असं सांगितलंय.

  • तुम्हाला पिण्यावर नियंत्रण ठेवायला कठीण जातं.

  • कायद्याने तुम्हाला पिण्याची मनाई आहे.

  • तुम्ही अशा एखाद्या व्यक्‍तीसोबत आहात, ज्याला आधी पिण्याची समस्या असल्यामुळे तो आता पूर्णपणे प्यायचं टाळतो.

तुमच्याकडे लग्नाचं रिसेप्शन किंवा इतर कार्यक्रम असेल, तर तुम्ही ड्रिंक्स ठेवावेत का? हे ठरवायला बायबल तुम्हाला कशी मदत करू शकतं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.

रोमकर १३:१३ आणि १ करिंथकर १०:३१, ३२ वाचा. प्रत्येक वचन वाचून झाल्यानंतर या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • हे तत्त्व लक्षात ठेवल्यामुळे यहोवाला आवडेल असा निर्णय घ्यायला तुम्हाला कशी मदत होईल?

प्यायचं की नाही हा प्रत्येक खऱ्‍या ख्रिश्‍चनाचा वैयक्‍तिक निर्णय आहे. एखादा अधूनमधून दारू घेत असेल, तरीसुद्धा विशिष्ट परिस्थितीत कदाचित तो प्यायचं टाळेल

५. किती प्यायची हे आधीच ठरवा

तुम्ही दारू किंवा ड्रिंक्स घ्यायचं ठरवलं तर हे लक्षात असू द्या की दारू पिण्याला जरी यहोवा चुकीचं म्हणत नसला, तरी अतिप्रमाणात पिणं हे त्याच्या नजरेत चुकीचं आहे. याचं काय कारण आहे? होशेय ४:११, १८ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • एखादी व्यक्‍ती खूप जास्त प्यायली तर काय होऊ शकतं?

आपण खूप जास्त पिणं कसं टाळू शकतो? यासाठी आपण आपल्या मर्यादेचं भान ठेवलं पाहिजे. नीतिवचनं ११:२ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • पिण्याच्या बाबतीत स्वतःसाठी आधीच एक मर्यादा ठरवणं का चांगलं राहील?

६. दारूच्या व्यसनावर मात कशी करता येईल?

दारूच्या आहारी गेलेल्या एका माणसाला ही सवय सोडायला कशामुळे मदत झाली ते पाहा. व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा.

  • प्यायच्या सवयीमुळे दिमित्रीच्या वागण्या-बोलण्यावर काय परिणाम झाला?

  • त्याला लगेच दारू सोडता आली का?

  • त्याने हे व्यसन पूर्णपणे कसं सोडलं?

१ करिंथकर ६:१०, ११ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • दारूच्या व्यसनामुळे काय नुकसान होऊ शकतं?

  • जास्त पिण्याची सवय असलेली व्यक्‍तीसुद्धा बदलू शकते, हे कशावरून दिसून येतं?

मत्तय ५:३० वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • हात कापून टाकण्याच्या उदाहरणावरून हे दिसून येतं, की यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी आपल्याला आवडणाऱ्‍या काही गोष्टी पूर्णपणे सोडाव्या लागू शकतात. जास्त पिण्याच्या सवयीवर मात करायचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्ही काय करू शकता? a

१ करिंथकर १५:३३ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • ज्यांचं पिण्यावर नियंत्रण नाही अशांसोबत जर तुम्ही मैत्री केली तर काय होऊ शकतं?

काही जण म्हणतात: “दारू पिण्यात काय चुकीचंय?”

  • तुम्ही काय उत्तर द्‌याल?

थोडक्यात

मद्य हे यहोवाने आपल्याला दिलेल्या चांगल्या गोष्टींपैकी एक आहे. पण अतिप्रमाणात पिणं आणि दारूचं व्यसन या दोन्ही गोष्टी त्याच्या नजरेत चुकीच्या आहेत.

उजळणी

  • मद्यपानाबद्दल बायबलचा काय दृष्टिकोन आहे?

  • जास्त दारू प्यायल्यामुळे कोणते वाईट परिणाम होऊ शकतात?

  • पिण्याच्या बाबतीत इतरांच्या निर्णयांचा आपण आदर कसा करू शकतो?

ध्येय

हेसुद्धा पाहा

दारूच्या बाबतीत तरुण योग्य निर्णय कसे घेऊ शकतात?

दारू पिण्याआधी करा विचार  (२:३१)

पिण्याच्या सवयीवर मात करण्यासाठी कोणती पावलं उचलता येतील, हे जाणून घ्या.

“कहीं मैं ज़्यादा शराब तो नहीं पी रहा?” (ऑनलाईन लेख)

एका माणसाने प्रमाणाबाहेर पिण्याच्या सवयीवर कशी मात केली, हे “मला ‘दारूचं पिंप’ म्हणायचे” असं शीर्षक असलेल्या अनुभवात वाचा.

“बायबलने बदललं जीवन” (ऑनलाईन लेख)

a दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्‍तींना कदाचित यातून मुक्‍त होण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घ्यावी लागू शकते. ज्यांना पूर्वी जास्त पिण्याची सवय होती त्यांना बरेच डॉक्टर असा सल्ला देतात की त्यांनी अजिबातच पिऊ नये.