व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धडा ५६

मंडळीची एकता जपण्याचा नेहमी प्रयत्न करा

मंडळीची एकता जपण्याचा नेहमी प्रयत्न करा

दावीद राजाने म्हटलं, “भावांनी सोबत मिळून ऐक्याने राहणं, किती चांगलं आणि आनंददायक आहे!” (स्तोत्र १३३:१) आपण आपल्या भाऊबहिणींसोबत असतो तेव्हा आपल्यालाही अगदी असंच वाटतं. पण ही एकता आपोआप निर्माण होत नाही. तर त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे.

१. देवाच्या लोकांमध्ये कोणती गोष्ट खास आहे?

जर तुम्ही दुसऱ्‍या एखाद्या देशात मंडळीच्या सभेला गेलात, तर कदाचित तिथली भाषा तुमच्यासाठी परकी असेल. पण तरीही तुम्हाला तिथे अजिबात परक्यासारखं वाटणार नाही. कारण यहोवाचे लोक नेहमी एकमेकांशी प्रेमाने वागतात. तसंच, ते कोणत्याही देशात राहत असले तरी ते सारख्याच प्रकाशनांतून बायबलचा अभ्यास करतात. हो, आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी आपण “एकतेत [यहोवाची] उपासना” करतो.—सफन्या ३:९, तळटीप.

२. एकता जपण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

“एकमेकांवर शुद्ध मनाने जिवापाड प्रेम करत राहा.” (१ पेत्र १:२२) तुम्ही या सल्ल्याप्रमाणे कसं वागू शकता? दुसऱ्‍यांच्या चुकांकडे लक्ष देण्याऐवजी त्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष द्या. फक्‍त तुमच्यासारख्याच आवडीनिवडी असलेल्यांसोबत मैत्री करू नका. त्याऐवजी तुमच्यापेक्षा वेगळी भाषा, संस्कृती असलेल्या भाऊबहिणींना जाणून घ्यायचा प्रयत्न करा. तसंच, जर विशिष्ट लोकांबद्दल आपल्या मनात चुकीची मतं असतील, तर ती काढून टाकण्याचा आपण होताहोईल तितका प्रयत्न केला पाहिजे.—१ पेत्र २:१७ वाचा. a

३. तुमचे एखाद्या भावासोबत किंवा बहिणीसोबत मतभेद झाले असतील तर तुम्ही काय कराल?

आपण सर्व जण एकतेने आणि प्रेमाने राहतो. पण असं असलं तरी आपण सगळेच अपरिपूर्ण आहोत. त्यामुळे कधीकधी आपण एकमेकांचं मन दुखावतो. म्हणूनच देवाचं वचन आपल्याला सांगतं: “एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा.” आणि पुढे ते असंही म्हणतं: “यहोवाने जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली, तशी तुम्हीही करा.” (कलस्सैकर ३:१३ वाचा.) आपण कितीतरी वेळा यहोवाचं मन दुखावतो, पण तरी तो आपल्याला क्षमा करतो. आणि म्हणून तो अपेक्षा करतो की आपणसुद्धा आपल्या भाऊबहिणींना क्षमा करावी. जर तुमच्याकडून कोणाचं मन दुखावलंय हे तुमच्या लक्षात आलं, तर त्यांच्याशी समेट करण्यासाठी स्वतः पुढाकार घ्या.—मत्तय ५:२३, २४ वाचा. b

आणखी जाणून घेऊ या

मंडळीत शांती आणि एकता टिकून राहावी म्हणून तुम्ही काय करू शकता, यावर विचार करा.

शांती टिकून राहावी म्हणून तुम्ही काय कराल?

४. मनातून भेदभाव काढून टाका

आपलं सगळ्याच भाऊबहिणींवर प्रेम आहे. पण कधीकधी असं होऊ शकतं की जे आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्यांच्यावर मनापासून प्रेम करणं आपल्याला कठीण जातं. मग यासाठी आपण काय करू शकतो? प्रेषितांची कार्यं १०:३४, ३५ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • यहोवा सगळ्याच प्रकारच्या लोकांना त्याचे सेवक म्हणून स्वीकारतो. तर मग जे वेगळ्या संस्कृतीचे आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही कसा विचार केला पाहिजे?

  • तुमच्या भागात कोणत्या प्रकारच्या लोकांशी भेदभाव केला जातो? आणि तुम्ही अशा विचारांपासून दूर का राहिलं पाहिजे?

२ करिंथकर ६:११-१३ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • वेगळ्या संस्कृतीच्या भाऊबहिणींशी मैत्री करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल?

५. मोठ्या मनाने क्षमा करून शांती टिकवून ठेवा

यहोवाच्या हातून चूक होणं शक्यच नाही. त्यामुळे त्याला खरंतर आपल्या क्षमेची कधीच गरज पडणार नाही. पण तरीसुद्धा तो आपल्या चुकांची मोठ्या मनाने क्षमा करतो. स्तोत्र ८६:५ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • या वचनातून आपल्याला यहोवाबद्दल काय कळतं?

  • यहोवा क्षमाशील आहे याबद्दल तुम्हाला त्याचे आभार मानावेसे वाटतात का? आणि का?

  • कधीकधी आपले एकमेकांसोबतचे संबंध कशामुळे बिघडू शकतात?

आपण यहोवाचं अनुकरण करून मंडळीतली एकता कशी जपू शकतो? नीतिवचनं १९:११ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • जेव्हा कोणी चीड येण्यासारखं वागतं किंवा तुमचं मन दुखावतं तेव्हा तुम्ही काय करू शकता?

कधीकधी आपल्यामुळे दुसऱ्‍यांचं मन दुखावलं जातं. तेव्हा आपण काय केलं पाहिजे? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • व्हिडिओमधल्या बहिणीने दुसऱ्‍या बहिणीशी कशा प्रकारे समेट केला?

६. भाऊबहिणींच्या चांगल्या गुणांकडे लक्ष द्या

जेव्हा आपण आपल्या भाऊबहिणींना आणखी जास्त ओळखू लागतो, तेव्हा आपल्याला त्यांच्या चांगल्या गुणांसोबतच त्यांचे दोषही दिसून येतात. पण दोष पाहण्यापेक्षा आपण त्यांच्या चांगल्या गुणांकडे कसं लक्ष देऊ शकतो? व्हिडिओ पाहा, आणि मग खाली दिलेल्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • भाऊबहिणींच्या चांगल्या गुणांकडे लक्ष द्यायला तुम्हाला कशामुळे मदत मिळेल?

यहोवा आपल्या चांगल्या गुणांकडे लक्ष देतो. २ इतिहास १६:९क वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • यहोवा तुमच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देतो, हे कळल्यावर तुम्हाला कसं वाटतं?

सुंदर दिसणाऱ्‍या हिऱ्‍यातही खरंतर दोष असतात, पण तरीही तो मौल्यवान असतो. त्याच प्रकारे आपले सगळेच भाऊबहीण अपरिपूर्ण आहेत, पण तरी ते यहोवाच्या नजरेत लाख मोलाचे आहेत

काही जण म्हणतात: “मी काही त्याला इतक्या सहजासहजी माफ करणार नाही!”

  • इतरांना माफ करायला आपण तयार का असलं पाहिजे?

थोडक्यात

मोठ्या मनाने क्षमा करून आणि सगळ्या भाऊबहिणींशी प्रेमाने वागून तुम्हीही मंडळीची एकता जपायला हातभार लावू शकता.

उजळणी

  • तुम्ही मनातून भेदभाव कसे काढून टाकू शकता?

  • एखाद्या भावासोबत किंवा बहिणीसोबत तुमचे मतभेद झाले असतील तर तुम्ही काय कराल?

  • यहोवाच्या क्षमाशीलतेचं अनुकरण करणं का चांगलंय?

ध्येय

हेसुद्धा पाहा

आपण दुसऱ्‍यांना दोषी का ठरवू नये, हे समजायला येशूने दिलेलं एक उदाहरण आपल्याला कशी मदत करतं ते पाहा.

डोळ्यातला ओंडका काढ  (६:५६)

आपली चूक नव्हती असं वाटत असलं तरीही आपल्याला क्षमा मागण्याची गरज आहे का?

“चूक कबूल करणे शांतिपूर्ण संबंधांचे रहस्य” (टेहळणी बुरूज, १ नोव्हेंबर, २००२)

भेदभाव न करण्याबद्दल काही जण काय शिकले ते पाहा.

वरवर पाहून इतरांबद्दल मत बनवू नका  (५:०६)

आपसांतल्या मतभेदांमुळे मंडळीतली शांती भंग होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता, ते पाहा.

“प्रेमाच्या आधारावर मतभेद सोडवा” (टेहळणी बुरूज, मे २०१६)

a ख्रिस्ती भाऊबहिणींवर आपलं प्रेम आहे. पण जर आपल्याला एखादा संसर्गजन्य रोग झाला असेल तर आपण हे प्रेम कसं दाखवू शकतो? इतरांना आपल्याकडून लागण होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. याविषयी काही विषयांवर स्पष्टीकरण क्र. ६ यात माहिती दिली आहे.

b पैशांचे व्यवहार आणि कायद्याशी संबंधित बाबींबद्दल वाद कसे मिटवावेत हे काही विषयांवर स्पष्टीकरण क्र. ७ मध्ये सांगितलंय.