व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘न्यायनिवाडा करण्याची घटिका’ आली आहे

‘न्यायनिवाडा करण्याची घटिका’ आली आहे

‘न्यायनिवाडा करण्याची घटिका’ आली आहे

प्रकटीकरण, हे बायबलचे शेवटले पुस्तक, आपल्याला ही जाणीव करून देते, की अंतराळाच्या मध्यभागी उडणाऱ्‍या एका देवदूताकडे घोषणा करण्यासाठी “सार्वकालिक सुवार्ता” आहे. तो मोठ्याने म्हणतो: “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा, कारण न्यायनिवाडा करावयाची त्याची घटिका आली आहे.” (प्रकटीकरण १४:६, ७) न्यायनिवाडा करण्याच्या त्याच्या घटिकेत, देवाच्या न्यायदंडाची घोषणा आणि अंमलबजावणी या दोन्हींचा समावेश होतो. “घटिका” म्हटले तर कमी समयाचा काळ. न्यायदंडाची अंमलबजावणी आपण राहात असलेल्या ‘शेवटल्या दिवसांच्या’ समाप्तीस होते.—२ तीमथ्य ३:१, पं.र.भा.

‘न्यायनिवाडा करण्याची घटिका,’ धार्मिकतेवर प्रेम करणाऱ्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हा असा समय आहे जेव्हा देव, या हिंसक, प्रेमहीन व्यवस्थीकरणात खस्ता खाललेल्या आपल्या सेवकांना मुक्‍ती देईल.

सध्याच्या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या नाशाने ‘न्यायनिवाडा करण्याच्या घटिकेचा’ अंत होण्याआधी म्हणजे आता आपल्याला असे आर्जवले जाते: “देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा.” तुम्ही असे करीत आहात का? “माझा देवावर विश्‍वास आहे,” केवळ इतके म्हणणे पुरेसे नाही. (मत्तय ७:२१-२३; याकोब २:१९, २०) देवाबद्दलच्या उचित भयाने आपल्याला त्याचा आदर करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. या भयामुळे आपण वाईट गोष्टींपासून दूर पळाले पाहिजे. (नीतिसूत्रे ८:१३) जे बरे आहे त्याची आवड धरण्यास आणि जे वाईट आहे त्याचा द्वेष करण्यास आपण प्रवृत्त झाले पाहिजे. (आमोस ५:१४, १५) आपण देवाचा आदर करत असलो तर आपण त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकू. त्याचे वचन बायबल नियमितरीत्या वाचण्यास आपण हलगर्जीपणा दाखवणार नाही. आपण सर्व वेळी आणि पूर्ण मनाने त्याच्यावर भरवसा ठेवू. (स्तोत्र ६२:८; नीतिसूत्रे ३:५, ६) देवाचा खरोखर आदर करणारे त्याला स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता, सार्वभौम शासक मानतात आणि त्याला आपल्या जीवनावर अधिकार गाजवण्याचा हक्क आहे म्हणून ते आनंदाने त्याच्या अधीन होतात. या गोष्टींमध्ये आपल्याला सुधारणा केली पाहिजे असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण हे विनाविलंब करू.

देवदूताने ज्या अंमलबजावणीच्या काळाविषयी सांगितले त्या काळाला ‘यहोवाचा दिवस’ असेही म्हटले आहे. सा.यु.पू. ६०७ मध्ये प्राचीन जेरुसलेमवर असा “दिवस” आला होता कारण या शहराच्या रहिवाशांनी, यहोवा आपल्या संदेष्ट्यांद्वारे देत असलेल्या इशाऱ्‍यांकडे दुर्लक्ष केले होते. यहोवाचा दिवस खूप लांब आहे असा विचार करण्याद्वारे त्यांनी आपले जीव धोक्यात घातले होते. यहोवाने त्यांना बजावले होते: “तो जवळच आहे आणि फार त्वरा करतो.” (सफन्या १:१४, पं.र.भा.) सा.यु.पू. ५३९ साली प्राचीन बॅबिलोनवर आणखी एक “यहोवाचा दिवस” आला होता. (यशया १३:१, ६, पं.र.भा.) शहराभोवती असलेले तट आणि त्यांची दैवते यांवर बॅबिलोन्यांचा इतका भरवसा होता, की त्यांनी यहोवाच्या संदेष्ट्यांकरवी दिल्या जाणाऱ्‍या इशाऱ्‍यांकडे कानाडोळा केला. पण एका रात्रीत महान बॅबिलोनवर मेद व पारसांनी विजय मिळवला.

आज आपल्यासमोर काय आहे? आणखी एक विश्‍वव्यापी ‘देवाचा [यहोवाचा] दिवस’ आहे. (२ पेत्र ३:११-१४) “मोठी बाबेल” हिच्याविरुद्ध देवाचा न्यायदंड बजावण्यात आला आहे. प्रकटीकरण १४:८ नुसार एक देवदूत अशी घोषणा करतो: “पडली, मोठी बाबेल पडली.” हे केव्हाच पूर्ण झाले आहे. यहोवाच्या उपासकांना ती आता प्रतिबंध करू शकत नाही. तिच्या स्वतःच्या भ्रष्टाचाराचा आणि युद्धातील सहभागाचा मोठ्या प्रमाणावर पर्दाफाश करण्यात आला आहे. आता तिचा शेवटला विनाश जवळ आला आहे. म्हणूनच बायबल सर्व लोकांना असे आर्जवते: “तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीहि पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा. कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहंचली आहे; आणि तिची अनीति देवाने लक्षात घेतली आहे.”—प्रकटीकरण १८:४, ५.

मोठी बाबेल काय आहे? ती, प्राचीन बॅबिलोनसमान असलेली धर्माची एक विश्‍वव्यापी व्यवस्था आहे. (प्रकटीकरण अध्याय १७, १८) काही समानतांचा विचार करा:

• प्राचीन बॅबिलोनचे याजक राष्ट्राच्या राजनीतीत पूर्णपणे बुडाले होते. आज बहुतेक धर्मांच्या बाबतीत हे खरे आहे.

• बहुतेकदा, बॅबिलोनचे याजक, राष्ट्राच्या युद्धाचे पुरस्कर्ते होते. आधुनिक दिवसांतील धर्मांनी बहुतेकदा, युद्धाला निघालेल्या राष्ट्रांतील सैनिकांवर आशीर्वाद देण्यात पुढाकार घेतला आहे.

• प्राचीन बॅबिलोनच्या शिकवणींमुळे व प्रथांमुळे, बॅबिलोन घोर अनैतिकतेत बुडाले होते. आजचे धार्मिक नेते नैतिकतेविषयी असलेल्या बायबलच्या दर्जांना बाजूला सारतात त्यामुळे पाळकवर्गात आणि चर्चच्या सदस्यांमध्ये सर्रासपणे अनैतिकता दिसून येते. लक्ष देण्याजोगी आणखी एक गोष्ट अशी आहे, की मोठी बाबेल एका वेश्‍येप्रमाणे तिच्याजवळ जे काही आहे त्याचा उपयोग जग आणि जगाच्या राजनैतिक व्यवस्थेत करत असल्यामुळे प्रकटीकरणाचे पुस्तक तिला कलावंतीण म्हणते.

• मोठी बाबेल ‘विषयभोगात’ जगत आहे, असेही बायबल म्हणते. प्राचीन बॅबिलोनमध्ये, पुष्कळ जमीन मंदिराच्या मालकीची होती आणि याजक व्यापारी कार्यांत पुढाकार घेत होते. आज, उपासनास्थळांबरोबर, मोठ्या बाबेलचा विस्तृत व्यापारी जगतावर पगडा आहे. तिच्या शिकवणींमुळे आणि सणासुदींमुळे तिला आणि व्यापारी जगतातील इतरांना भरपूर पैसा मिळतो.

• प्राचीन बॅबिलोनमध्ये मूर्ती, जादूटोणा, चेटूक सर्वसामान्य गोष्टी होत्या; आजही अनेक ठिकाणी हे पाहायला मिळते. मृत्यू, दुसऱ्‍या प्रकारच्या जीवनाकडे जाणारा मार्ग आहे असे समजले जात होते. बॅबिलोनमध्ये, तेथील दैवतांची अनेक मंदिरे व प्रार्थनामंदिरे होती; परंतु बॅबिलोन्यांनी यहोवाच्या उपासकांचा कडाडून विरोध केला. तेच विश्‍वास आणि त्याच प्रथा आज मोठ्या बाबेलचे ओळखचिन्ह आहेत.

प्राचीन काळांत यहोवाने, त्याचा आणि त्याच्या इच्छेला सतत अनादर दाखवणाऱ्‍यांना शिक्षा देण्यासाठी शक्‍तिशाली राजनैतिक व लष्करी राष्ट्रांचा उपयोग केला. अशाप्रकारे सा.यु.पू. ७४० मध्ये अश्‍शूरी लोकांनी शोमरोन्यांचा नाश केला. सा.यु.पू. ६०७ मध्ये बॅबिलोन्यांनी आणि सा.यु. ७० मध्ये रोमनांनी जेरुसलेमचा नाश केला. आणि सा.यु.पू. ५३९ मध्ये मेद व पारसांनी बॅबिलोनवर विजय मिळवला. आपल्या दिवसांत, राजकीय सरकारे, एखाद्या जंगली श्‍वापदाप्रमाणे ‘कलावंतिणीवर’ हल्ला करून तिला नग्न करितील अर्थात तिचे खरे रूप लोकांसमोर उघड करतील, असे बायबलमध्ये भाकीत करण्यात आले आहे. ही सरकारे तिचा पूर्णपणे नाश करतील.—प्रकटीकरण १७:१६.

जगाची सरकारे खरोखरच असे करतील का? बायबल म्हणते, की असे करण्याचे ‘देव त्यांच्या मनात घालेल.’ (प्रकटीकरण १७:१७) हे अचानक होईल. ते आश्‍चर्यकारक, धक्कादायक असेल; याविषयी कोणालाही आधी चाहूल लागणार नाही किंवा ते हळूहळूही होणार नाही.

तुम्ही काय केले पाहिजे? स्वतःला विचारा: ‘तुम्ही अजूनही अशा एखाद्या धार्मिक संघटनेशी जडून आहात का, की जी मोठ्या बाबेलचा भाग असल्याचा पुरावा देणाऱ्‍या अशा शिकवणींमुळे व प्रथांमुळे भ्रष्ट झाली आहे?’ तुम्ही तिचे सदस्य नसला तरी, स्वतःला विचारू शकता: ‘मोठ्या बाबेलच्या मनोवृत्तीचा मी स्वतःवर प्रभाव पडू दिला आहे का?’ कोणत्या प्रकारची मनोवृत्ती? स्वैराचार खपवून घेण्याची, भौतिक संपत्तीबद्दल प्रेम बाळगण्याची, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरण्याची किंवा यहोवाच्या वचनाबद्दल जाणूनबुजून अनादर (लहानसहान वाटणाऱ्‍या गोष्टींतही) दाखवण्याची मनोवृत्ती? तुमच्या उत्तरावर काळजीपूर्वक विचार करा.

यहोवाची स्वीकृती मिळवायची असेल तर, आपली कार्ये आणि आपल्या मनातील इच्छा या दोन्हींद्वारे आपण दाखवून देऊ की आपण खरोखरच मोठ्या बाबेलचा भाग नाही. विलंब करण्याचा आता समय नाही. अंत अचानक येईल याबद्दल आपल्याला सावध करताना बायबल म्हणते: “मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकली जाईल व ह्‍यापुढे कधीहि सापडणार नाही.”—प्रकटीकरण १८:२१.

आणखी घटना घडतील. ‘न्यायनिवाडा करण्याच्या घटिकेतील’ दुसऱ्‍या पैलूत, यहोवा देव विश्‍वव्यापी राजकीय व्यवस्थेचा, त्याच्यातील शासकांचा आणि येशू ख्रिस्ताला सोपवलेल्या त्याच्या स्वर्गीय राज्याच्या अधिकाराला जाणीवपूर्वक नकार दर्शवणाऱ्‍या सर्वांचा झाडा घेईल. (प्रकटीकरण १३:१, २; १९:१९-२१) दानीएल २:२०-४५ मध्ये, प्राचीन बॅबिलोनच्या काळापासून आतापर्यंतच्या राजनैतिक शासनांचे चित्रण करण्यासाठी, सोने, रुपे, पितळ, लोखंड आणि माती यांनी बनवलेल्या एका भव्य मूर्तीचा उपयोग केला आहे. आपल्या दिवसांविषयी भविष्यवाणीत म्हटले आहे: “स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही.” आणि यहोवाच्या न्यायनिवाडा करावयाच्या घटिकेदरम्यान हे राज्य काय करेल याविषयी बायबल म्हणते: “ते या [मनुष्य-निर्मित] सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:४४.

बायबल खऱ्‍या उपासकांना “जगातल्या गोष्टींवर” अर्थात खऱ्‍या देवापासून दूर गेलेले जग पुरस्कार करत असलेल्या जीवनशैलीवर प्रेम करू नका अशी ताकीद देते. (१ योहान २:१५-१७) तुम्ही पूर्णपणे देवाच्या राज्याच्या बाजूने आहात हे तुमच्या निर्णयांवरून व कार्यांवरून दिसून येते का? तुम्ही खरोखरच देवाच्या राज्याला तुमच्या जीवनात प्रथम स्थान देता का?—मत्तय ६:३३; योहान १७:१६, १७.

[१४ पानांवरील चौकट]

अंत केव्हा येईल?

“तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.”—मत्तय २४:४४.

“जागृत राहा, कारण तुम्हास तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही.”—मत्तय २५:१३.

“त्याला, विलंब लागावयाचा नाही.”—हबक्कूक २:३.

[१४ पानांवरील चौकट]

तारीख जाणून काही फरक पडला असता का?

ईश्‍वरी न्यायदंडाची अंमलबजावणी आणखी काही वर्षे तरी होणार नाही हे तुम्हाला खात्रीने माहीत असते तर, त्याचा तुमच्या जीवनावर काही फरक पडला असता का? तुमच्या अपेक्षेप्रमाणे तर अद्याप या जुन्या व्यवस्थीकरणाचा अंत आलेला नाही, मग यामुळे तुम्ही यहोवाच्या सेवेत मंद झाला आहात का?—इब्री लोकांस १०:३६-३८.

अंताची निश्‍चित तारीख माहीत नसल्यामुळे, आपल्याला, आपण देवाची सेवा शुद्ध हेतूंनी करत आहोत हे दाखवून देण्याची संधी मिळते. यहोवाला ओळखणाऱ्‍यांना याची जाणीव आहे, की शेवटल्या मिनिटाला दाखवलेला आवेश पाहून यहोवा आनंदित होणार नाही कारण तो आपले हृदय पारखतो.—यिर्मया १७:१०; इब्री लोकांस ४:१३.

यहोवावर खरोखरच प्रेम करणारे जीवनात नेहमी त्यालाच प्रथम स्थान देतात. इतर लोकांप्रमाणे खरे ख्रिस्ती देखील नोकरी करत असतील. परंतु त्यांचे ध्येय श्रीमंत होण्याचे नव्हे तर स्वतःपुरते आणि इतरांना थोडे देता येईल इतक्या भौतिक वस्तू असणे हे आहे. (इफिसकर ४:२८; १ तीमथ्य ६:७-१२) त्यांनाही हितकारक मनोरंजन आणि दैनंदिन कामातून थोडासा विरंगुळा आवडतो; परंतु यामागे त्यांचा तजेला प्राप्त करण्याचा हेतू असतो, सर्व जग करते म्हणून आपणही करावे हा त्यांचा हेतू नसतो. (मार्क ६:३१; रोमकर १२:२) येशू ख्रिस्ताप्रमाणे त्यांना देवाची इच्छा पूर्ण करण्यात आनंद वाटतो.—स्तोत्र ३७:४; ४०:८.

खऱ्‍या ख्रिश्‍चनांना जगावेसे व यहोवाची अनंतकाळ सेवा करावीशी वाटते. पण विशिष्ट आशीर्वाद मिळण्यासाठी त्यांना, काहीजण करत असलेल्या अपेक्षेपेक्षा जरा जास्त वेळ थांबून राहावे लागत असल्यामुळे ही आशा कमी मोलाची होत नाही.

[१५ पानांवरील चौकट/चित्र]

सार्वभौमत्वाचा वादविषय

देवाने इतक्या दुःखाला अनुमती का दिली आहे हे समजण्यासाठी आपण सार्वभौमत्वाचा वादविषय समजून घेतला पाहिजे. सार्वभौमत्व म्हणजे काय? सार्वभौमत्व म्हणजे अधिपत्य करण्याचे सर्वश्रेष्ठत्व.

यहोवा निर्माणकर्ता असल्यामुळे, संपूर्ण पृथ्वीवर आणि पृथ्वीवरील रहिवाशांवर अधिपत्य करण्याचा त्याचा हक्क आहे. परंतु मानव इतिहासाच्या सुरवातीला यहोवाच्या सार्वभौमत्वाला ललकारण्यात आले होते, असे बायबलमध्ये सांगण्यात आले आहे. दियाबल सैतानाने असा दावा केला की, यहोवा विनाकारण प्रतिबंध घालणारा होता. त्याने असाही दावा केला, की आपल्या पहिल्या पालकांनी देवाच्या नियमांचे उल्लंघन केले आणि ते आपल्या मर्जीनुसार वागले तर त्याचा काय परिणाम होईल याविषयी देवाने त्यांना जे सांगितले होते ते खोटे होते व देवाऐवजी त्यांनी स्वतःच जर स्वतःवर शासन केले तर त्यांचे भलेच होईल.—उत्पत्ति अध्याय २, ३.

देवाने या बंडखोरांचा लगेच नाश केला असता तर त्याची शक्‍ती जरूर दिसली असती परंतु जे वादविषय उभे राहिले होते त्यांचे निरसन झाले नसते. तिथल्या तिथे बंडखोरांचा नाश करण्याऐवजी यहोवाने सर्व बुद्धिमान सृष्टीला, बंडाळीचा परिणाम काय होतो हे पाहू दिले आहे. यामुळे दुःख आले असले तरी आपला जन्म होण्याची संधी मिळाली आहे.

शिवाय, यहोवाने एक मोठा त्याग करून, जे मानव त्याच्या आज्ञेत राहतील व आपल्या पुत्राच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवतील अशांना पाप आणि पापाच्या परिणामांपासून मुक्‍त होण्याकरता एक प्रेमळ योजना केली जेणेकरून ते परादीसमध्ये राहू शकतील. गरज भासल्यास, मेलेल्यांना पुन्हा जिवंत करण्याद्वारे हे साध्य केले जाऊ शकत होते.

वादविषयाचे निरसन करण्यासाठी वेळ दिल्यामुळे यहोवाच्या सेवकांना, ते देवाच्या प्रीतीला प्रतिसाद देऊ शकतात आणि सर्व परिस्थितीत यहोवाशी एकनिष्ठ राहू शकतात हे शाबीत करण्यासाठी संधी मिळाली आहे. देवाच्या सार्वभौमत्वाच्या वादविषयाबरोबर मानवी एकनिष्ठेच्या संबंधित वादविषयाचे देखील निरसन होणे आवश्‍यक आहे जेणेकरून विश्‍वभरात नीतिनियमांविषयी उचित आदर असेल. विश्‍वभरात नीतिनियमांविषयी आदर नसल्यास खरी शांती येणे शक्यच नाही. a

[तळटीप]

a या वादविषयांची आणि त्यांच्या अर्थांची सविस्तर चर्चा यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले, यहोवाजवळ या (इंग्रजी) या पुस्तकात करण्यात आली आहे.

[चित्र]

राजकीय शासनाच्या विश्‍वव्यापी व्यवस्थेचा अंत केला जाणार आहे