व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लक्ष दिल्यामुळे त्यांचा जीव वाचला

लक्ष दिल्यामुळे त्यांचा जीव वाचला

लक्ष दिल्यामुळे त्यांचा जीव वाचला

येशू ख्रिस्ताने, जेरुसलेम येथील मंदिरात केंद्रित असलेल्या यहुदी व्यवस्थीकरणाच्या अंताविषयी आगाऊ इशारा दिला होता. हे केव्हा घडेल याची निश्‍चित तारीख त्याने दिली नाही. परंतु त्या नाशाआधी घडणाऱ्‍या घटनांचे त्याने वर्णन केले. त्याने आपल्या शिष्यांना जागृत राहण्यास व धोकेदायक क्षेत्रातून पलायन करण्यास आर्जवले.

येशूने असे भाकीत केले: “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा.” तो असेही म्हणाला: “ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल . . . तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे.” भौतिक मालमत्ता वाचवण्यासाठी मागे जाऊ नये असेही येशूने आपल्या शिष्यांना सांगितले. जीव वाचवण्याकरता त्यांना पलायन करणे आवश्‍यक होते.—लूक २१:२०, २१; मत्तय २४:१५, १६.

दीर्घ काळापासून चाललेली बंडाळी मिटवण्यासाठी सेस्टियस गॅलस, सा.यु. ६६ मध्ये रोमी सैन्य घेऊन जेरुसलेममध्ये आला. त्याने शहरात प्रवेश करून मंदिराला वेढा देखील घातला. शहरात हाहाकार माजला. विनाश अटळ आहे हे जागृत असलेले पाहू शकत होते. पण तेथून पळून जाणे कसे शक्य होते? अचानक, सेस्टियस गॅलस आपले सैन्य घेऊन माघारी गेला. यहुदी बंडखोर सैनिकांनी त्यांचा पिच्छा केला. जेरुसलेम व सर्व यहुदीयातून पळ काढण्याची हीच वेळ होती!

पुढच्या वर्षी, वेस्पेसियन आणि त्याचा मुलगा टायटस यांच्या नेतृत्वाखाली रोमी सैन्य पुन्हा आले. संपूर्ण देशात युद्ध सुरू झाले. सा.यु. ७० च्या सुरवातीला, रोमनांनी संपूर्ण जेरुसलेमभोवती टोकदार खांबांचा तट उभा केला. सर्व पळवाटा बंद करण्यात आल्या. (लूक १९:४३, ४४) शहरातील विविध राजकीय गटातील लोकांनी एकमेकांची कत्तल केली. उरलेले लोक एकतर रोमनांकडून मारले गेले किंवा त्यांना बंदिवान म्हणून नेण्यात आले. जेरुसलेम शहर आणि त्यातील मंदिराचा पूर्णपणे नाश करण्यात आला. पहिल्या शतकातील यहुदी इतिहासकार जोसिफस याच्यानुसार, एक लाखापेक्षा अधिक यहुद्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, मरण पत्करावे लागले. त्या मंदिराची पुनःबांधणी पुन्हा झालीच नाही.

सा.यु. ७० मध्ये ख्रिस्ती जेरुसलेममध्येच राहिले असते तर त्यांना एकतर ठार मारण्यात आले असते किंवा इतरांबरोबर बंदिवान म्हणून नेण्यात आले असते. परंतु, प्राचीन इतिहासकारांनी असा अहवाल दिला, की ख्रिश्‍चनांनी देवाकडून आलेल्या इशाऱ्‍याकडे लक्ष दिले आणि ते जेरुसलेम व सर्व यहुदीयातून यार्देन नदीच्या पूर्वेकडील डोंगरांमध्ये पळून गेले. काही जण पेरिआच्या प्रांतातील पेल्लात जाऊन राहिले. त्यांनी पुन्हा यहुदीयाचे तोंड पाहिले नाही. येशूच्या इशाऱ्‍याकडे लक्ष दिल्यामुळे त्यांचा जीव वाचला होता.

सुस्थापित उगमांकडून येणाऱ्‍या इशाऱ्‍यांकडे तुम्ही गंभीरपणे लक्ष देता का?

ज्या घटनांविषयी अनेक इशारे दिल्यावरही त्या घडत नाहीत तेव्हा पुष्कळ लोकांची सर्वच इशाऱ्‍यांकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती बनते. परंतु, इशाऱ्‍यांकडे लक्ष दिल्याने तुमचा जीव वाचू शकतो.

चीनमध्ये १९७५ साली, भूकंप होणार आहे असे इशारे देण्यात आले होते. अधिकाऱ्‍यांनी लगेच हालचाल केली. लोकांनी प्रतिसाद दिला. हजारो लोकांचा जीव वाचला.

फिलिपीन्समध्ये १९९१ सालच्या एप्रिल महिन्यात, माऊन्ट पिनटुबोच्या उताऱ्‍यावरील गावकऱ्‍यांनी सांगितले, की डोंगरातून वाफ आणि राख बाहेर फेकली जात आहे. दोन महिने डोंगराचे परीक्षण केल्यावर, फिलिपीन इन्स्टिट्यूट ऑफ वोलकॅनोलॉजी ॲण्ड सेसमोलॉजीने धोक्याच्या सूचना दिल्या. लगेच, हजारो लोकांना त्या क्षेत्रातून हालवून सुरक्षित स्थळी नेण्यात आले. जून १५ रोजी पहाटेच, ज्वालामुखीचा जोरदार उद्रेक झाला; आठ किलोमीटर घनफळाची राख वर आकाशात उडाली आणि नंतर गावावर येऊन पडली. इशाऱ्‍यांकडे लक्ष दिल्याने हजारो लोकांचा जीव वाचला.

बायबलमध्ये, सध्याच्या व्यवस्थीकरणाच्या अंताचा इशारा देण्यात आला आहे. आता आपण शेवटल्या दिवसांत जगत आहोत. अंत जसजसा जवळ येतो तसतसे तुम्ही जागृत राहात आहात का? धोकेदायक क्षेत्राच्या बाहेर राहण्यासाठी तुम्ही कार्य करीत आहात का? निकडीची जाणीव बाळगून तुम्ही इतरांनाही जागृत राहण्याचा इशारा देत आहात का?

[२० पानांवरील चित्र]

इशाऱ्‍यांकडे लक्ष दिल्यामुळे, माऊन्ट पिनटुबोचा स्फोट होऊन त्यातून राख उफाळून बाहेर आली तेव्हा हजारो लोकांचा जीव वाचला

[२१ पानांवरील चित्र]

येशूच्या इशाऱ्‍यांकडे लक्ष दिल्यामुळे, सा.यु. ७० मध्ये जेरुसलेमचा नाश झाला तेव्हा ख्रिश्‍चनांचा जीव वाचला होता