“सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, तुम्ही एकमेकांवर गाढ प्रीती करीत राहा”
“सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, तुम्ही एकमेकांवर गाढ प्रीती करीत राहा”
“जगाचा अंत जवळ येत आहे. . . . सर्वांत महत्त्वाची बाब ही आहे की, तुम्ही एकमेकांवर गाढ प्रीती करीत राहा.”—१ पेत्र ४:७, ८, सुबोध भाषांतर.
येशूला माहीत होते, की त्याच्या शिष्यांबरोबरचे त्याचे शेवटले तास अतिशय मोलाचे होते. शिष्यांना कशाचा सामना करावा लागणार आहे हे त्याला माहीत होते. त्यांना भरपूर काम उरकायचे होते; परंतु त्याच्याप्रमाणे त्यांचाही द्वेष व छळ होणार होता. (योहान १५:१८-२०) शेवटल्या रात्री एकत्र असताना त्याने अनेक वेळा त्यांना “एकमेकांवर प्रीति” करण्याची गरज आहे अशी आठवण करून दिली.—योहान १३:३४, ३५; १५:१२, १३, १७.
२ त्या रात्री उपस्थित असलेल्या प्रेषित पेत्राला मुद्दा कळाला. अनेक वर्षांनंतर, जेरुसलेमचा नाश होण्याच्या फक्त काही काळाआधी त्याने प्रेमाच्या महत्त्वावर जोर दिला. त्याने ख्रिश्चनांना असा सल्ला दिला: “जगाचा अंत जवळ येत आहे. . . . सर्वांत महत्त्वाची बाब ही आहे की, तुम्ही एकमेकांवर गाढ प्रीती करीत राहा.” (१ पेत्र ४:७, ८, सुबोध भाषांतर) पेत्राचे हे शब्द, सध्याच्या व्यवस्थीकरणाच्या ‘शेवटल्या काळात’ राहणाऱ्यांसाठी अतिशय अर्थपूर्ण आहेत. (२ तीमथ्य ३:१) “गाढ प्रीती” म्हणजे काय? इतरांबद्दल अशाप्रकारची प्रीती असणे का महत्त्वाचे आहे? आपल्याला इतरांबद्दल अशी प्रीती आहे हे आपण कसे दाखवू शकतो?
“गाढ प्रीती”—म्हणजे काय?
३ पुष्कळ लोक, प्रेमाची भावना निसर्गतःच उत्पन्न झाली पाहिजे असा विचार करतात. परंतु पेत्र कोणत्याही प्रकारच्या प्रेमाविषयी बोलत नव्हता; तो सर्वोच्च प्रतीच्या प्रेमाविषयी बोलत होता. १ पेत्र ४:८ मधील “प्रीती” हा शब्द, आघापी या ग्रीक शब्दाचे भाषांतर आहे. हा शब्द, तत्त्वांनी मार्गदर्शित असलेल्या निःस्वार्थ प्रेमाला सूचित करतो. एका संदर्भ ग्रंथात म्हटले आहे: “आघापी प्रेम अशाप्रकारचे प्रेम आहे ज्याची आज्ञा दिली जाऊ शकते कारण हे प्रेम प्रामुख्याने एक भावना नव्हे तर दृढनिश्चयाचा निर्णय आहे जो एखाद्या व्यक्तीला एका विशिष्ट मार्गाने कार्य करण्यास प्रवृत्त करतो.” स्वार्थीपणाकडे आपला स्वाभाविक कल असल्यामुळे, ईश्वरी तत्त्वांनुसार एकमेकांना प्रेम दाखवा, अशी आपल्याला आठवण करून द्यावी लागते.—उत्पत्ति ८:२१; रोमकर ५:१२.
४ याचा अर्थ, केवळ कर्तव्य म्हणून आपण एकमेकांना प्रेम दाखवले पाहिजे असे नाही. आघापी प्रेम, उबदारपणा, भावना यांच्याविना नसते. पेत्र म्हणाला होता, की आपण “एकमेकांवर गाढ [अक्षरशः, “ताणणारी”] प्रीती” केली पाहिजे. a (तिरपे वळण आमचे.) (किंगडम इंटरलिनियर) असे प्रेम दाखवण्यासाठीसुद्धा प्रयत्नांची गरज आहे. “गाढ” असे भाषांतरीत केलेल्या ग्रीक शब्दाविषयी एका विद्वानाने म्हटले: “या [शब्दाने] आपल्या डोळ्यापुढे एका धावपटूचे चित्र येते जो शर्यतीच्या अंतीम रेषेच्या जसजसा जवळ येतो तसतसे तो आपले सर्व बळ एकवटून आपल्या स्नायूंवर आणखी ताण देऊन धावतो.”
५ यास्तव, आपण सोपे असते तेव्हाच प्रेम दाखवू नये किंवा आपले प्रेम काही लोकांपुरतेच मर्यादित असू नये. ख्रिस्ती प्रेम दाखवण्यासाठी आपण आपले अंतःकरण “ताणले” पाहिजे, अर्थात कठीण असते तेव्हाही प्रेम दाखवले पाहिजे. (२ करिंथकर ६:११-१३) स्पष्टपणे मग, एखाद्या खेळाडूला जसे प्रशिक्षण घेऊन तरबेज व्हावे लागते तसेच हे प्रेम देखील विकसित करण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. एकमेकांवर अशाप्रकारचे प्रेम असणे आवश्यक आहे. का? निदान तीन कारणांसाठी.
आपण एकमेकांवर प्रेम का केले पाहिजे?
६ पहिले कारण, “प्रीति देवापासून आहे.” (१ योहान ४:७) या प्रिय गुणाचा उगम असलेल्या यहोवाने पहिल्यांदा आपल्यावर प्रेम केले. प्रेषित योहान म्हणतो: “देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे, ह्यासाठी की, त्याच्या द्वारे आपणांस जीवन प्राप्त व्हावे, ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीति प्रगट झाली.” (१ योहान ४:९) देवाच्या पुत्राला, मानवी रूपात, दिलेली सेवा पार पाडण्यासाठी व एका वधस्तंभावर मृत्यू सहन करण्यासाठी ‘पाठवण्यात’ आले—हे सर्व “आपणांस जीवन प्राप्त व्हावे” म्हणून. देवाच्या प्रेमाच्या या सर्वोच्च अभिव्यक्तीला आपण कशाप्रकारे प्रतिक्रिया दाखवली पाहिजे? योहान म्हणतो: “देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीति केली तर आपणहि एकमेकांवर प्रीति केली पाहिजे.” (१ योहान ४:११) योहान काय लिहितो त्याची नोंद घ्या, “देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीति केली तर”—केवळ तुमच्यावर नव्हे तर आपल्यावर. (तिरपे वळण आमचे.) मुद्दा स्पष्ट आहे: आपल्या सहउपासकांवर जर देव प्रेम करतो तर आपणही त्यांच्यावर प्रेम केलेच पाहिजे.
७ दुसरे कारण, आपण आता एकमेकांवर प्रेम केले पाहिजे जेणेकरून संकटात असलेल्या आपल्या बांधवांना आपल्याला मदत करता येईल कारण “सर्व वस्तूंचा शेवट जवळ आला आहे.” (१ पेत्र ४:७, पं.र.भा.) आपण ‘शेवटल्या काळच्या कठीण दिवसांत’ जगत आहोत. (२ तीमथ्य ३:१) जगाची परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती, विरोध यांमुळे आपल्याला हालअपेष्टांचा सामना करावा लागतो. आपल्यावर कठीण परिस्थिती येते तेव्हा आपण एकमेकांच्या आणखी जवळ आले पाहिजे. गाढ प्रीती आपल्याला एकमेकांच्या आणखी जवळ आणेल आणि आपल्याला ‘एकमेकांची काळजी’ घेण्यास आणखी प्रवृत्त करेल.—१ करिंथकर १२:२५, २६.
८ आपण एकमेकांवर प्रेम करण्याचे तिसरे कारण हे आहे की सैतानाने आपला गैरफायदा घेऊ नये म्हणून आपण त्याला “वाव देऊ” इच्छित नाही. (इफिसकर ४:२७) सैतान लगेच, आपण अडखळू म्हणून आपल्या सहविश्वासू बंधूभगिनींच्या अपरिपूर्णतांचा—त्यांच्या कमतरतांचा, त्यांच्या दोषांचा, त्यांच्या चुकांचा—उपयोग करतो. एखाद्या बांधवाच्या अथवा बहिणीच्या अविचारी बोलण्यामुळे किंवा कृत्यामुळे आपण मंडळीत जाण्याचे बंद करू का? (नीतिसूत्रे १२:१८) आपल्याला एकमेकांवर गाढ प्रीती असल्यास आपण असे करणार नाही! अशाप्रकारचे प्रेम आपल्याला शांती टिकवून ठेवण्यास व “एकचित्ताने” अर्थात खांद्याला खांदा लावून एकजुटीने देवाची सेवा करण्यास मदत करते.—सफन्या ३:९.
तुम्ही इतरांवर प्रेम करता हे कसे दाखवणार
९ प्रेम दाखवणे घरातून सुरू झाले पाहिजे. येशू म्हणाला होता, की त्याच्या खऱ्या अनुयायांना, त्यांच्या आपापसांत असलेल्या प्रेमामुळे ओळखता येईल. (योहान १३:३४, ३५) प्रेम केवळ मंडळीतच नव्हे तर कुटुंबातही—पती पत्नीत आणि पालक व मुलांमध्ये दिसले पाहिजे. आपल्याला कौटुंबिक सदस्यांबद्दल केवळ प्रेम वाटणे पुरेसे नाही तर आपण ते लाभदायक मार्गांनी व्यक्त केले पाहिजे.
१० पतीपत्नी एकमेकांबद्दल प्रेम कसे व्यक्त करू शकतात? आपल्या पत्नीवर जिवापाड प्रेम करणारा पती—लोकांमध्ये असताना व खासगीत—आपल्या शब्दांद्वारे व कार्यांद्वारे दाखवेल की तो तिच्यावर प्रेम करतो. तो तिच्या प्रतिष्ठेचा आदर करेल आणि तिचे विचार, तिची मते, तिच्या भावना यांचा विचार करेल. (१ पेत्र ३:७) आपल्या हितांआधी तो तिच्या हितांना प्राधान्य देईल आणि तिच्या भौतिक, आध्यात्मिक व मानसिक गरजा पूर्ण करण्यासाठी तो जे करावे लागते ते तो सर्व करेल. (इफिसकर ५:२५, २८) मनापासून आपल्या पतीवर प्रेम करणारी पत्नी, कधीकधी तो तिच्या अपेक्षांनुसार कार्य करत नसला तरी त्याची “भीड” राखेल. (इफिसकर ५:२२, ३३) ती त्याला पाठिंबा देईल, त्याच्या आज्ञेत राहील, त्याच्याकडे अवाजवी मागण्या करणार नाही तर आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रित ठेवण्यास त्याला सहकार्य देईल.—उत्पत्ति २:१८; मत्तय ६:३३.
११ पालकांनो, तुम्हाला तुमच्या मुलांवर प्रेम आहे हे तुम्ही कसे दाखवू शकता? त्यांच्या भौतिक गरजा पुरवण्यासाठी काबाड कष्ट करण्याची तुमची तयारी तुमच्या प्रेमाचा पुरावा आहे. (१ तीमथ्य ५:८) परंतु मुलांना फक्त अन्न, वस्र व निवारा यांचीच आवश्यकता नाही. त्यांनी मोठे होऊन खऱ्या देवाची सेवा करायची असल्यास, त्यांना आध्यात्मिक प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. (नीतिसूत्रे २२:६) यासाठी तुम्हाला कुटुंब यानात्याने बायबलचा अभ्यास करण्यासाठी, सेवेमध्ये भाग घेण्यासाठी आणि ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यासाठी वेळ काढावा लागेल. (अनुवाद ६:४-७) अशा कार्यांत नियमाने भाग घेण्याकरता या कठीण काळांत विशेषकरून बरेच त्याग करावे लागतील. आपल्या मुलांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याची तुम्हाला असलेली काळजी आणि तुम्ही करत असलेले प्रयत्न तुमच्या प्रेमाचा पुरावा आहे; कारण याद्वारे तुम्ही दाखवून देता की तुम्हाला त्यांच्या सार्वकालिक कल्याणाची काळजी आहे.—योहान १७:३.
१२ पालकांनी आपल्या मुलांच्या भावनिक गरजा देखील पूर्ण करण्याद्वारे प्रेम दाखवले पाहिजे. मुले निरागस असतात; त्यांच्या कोमल अंतःकरणाला तुमच्या प्रेमाची शाश्वती हवी असते. तुमचे त्यांच्यावर प्रेम आहे हे त्यांना बोलून दाखवा, त्यांना भरपूर स्नेहभाव दाखवा, कारण यांद्वारे त्यांना, आपण हवेहवेसे आहोत, आपली कदर केली जाते याची खात्री मिळते. त्यांची प्रेमळपणे व मनापासून प्रशंसा करा कारण याद्वारे त्यांना कळेल की तुम्ही त्यांचे प्रयत्न पाहत आहात व तुम्हाला त्यांची कदर आहे. त्यांना प्रेमाने शिस्त लावा कारण अशा शिस्तीमुळे त्यांना दिसून येईल की ते ज्या प्रकारची व्यक्ती बनत आहेत याची तुम्हाला काळजी आहे. (इफिसकर ६:४) प्रेमाच्या या सर्व अभिव्यक्तींमुळे एक सुखी व एकमेकांना सहकार्य देणारे कुटुंब तयार होते जे या शेवटल्या दिवसांतील दबावांचा प्रतिकार करण्यास सज्ज असते.
१३ प्रेम आपल्याला इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करण्यास प्रवृत्त करते. पेत्राने आपल्या वाचकांना “एकमेकांवर गाढ प्रीती करीत राहा” हा सल्ला देताना असे करणे का महत्त्वाचे आहे त्याचे कारण दिले; तो म्हणाला: “प्रीति पापांची रास झाकून टाकते.” (१ पेत्र ४:८) पापांची रास “झाकून” टाकण्याचा अर्थ गंभीर पापांवर पांघरूण घालणे किंवा त्यांना “झाकून” ठेवणे असा होत नाही. अशा गोष्टी उचितपणे मंडळीतील जबाबदार बांधवांना सांगितल्या जातात व ते त्यांना हाताळतात. (लेवीय ५:१; नीतिसूत्रे २९:२४) घोर पाप करणाऱ्यांना, प्रामाणिक जणांना इजा करू देत राहण्यास किंवा त्यांच्याशी गैरवागणूक करू देत राहण्यास परवानगी देणे सर्वात—क्रूर व अशास्त्रवचनीय—ठरेल.—१ करिंथकर ५:९-१३.
१४ बहुतेक बाबतीत, सहविश्वासू बंधूभगिनींच्या चुका तशा पाहिल्यास क्षुल्लक असतात. आपण सर्व कधीकधी आपल्या बोलण्यात व कार्यांत चुका करतो, इतरांची निराशा करतो व त्यांना इजाही पोहंचवतो. (याकोब ३:२) इतर जेव्हा आपले मन दुखावतात तेव्हा आपण लगेच त्याची दवंडी पिटवावी का? यामुळे मंडळीत केवळ खटकेच उडत राहतील. (इफिसकर ४:१-३) पण आपल्याला प्रेम असेल तर आपण आपल्या सहउपासक बांधवाची अगर बहिणीची “चहाडी” करणार नाही. (स्तोत्र ५०:२०) गिलावा आणि रंग जसा भिंतीवरील दोष झाकून टाकतात त्याचप्रकारे प्रेम इतरांच्या अपरिपूर्णता झाकून टाकते.—नीतिसूत्रे १७:९.
१५ प्रेम आपल्याला संकटात असलेल्यांच्या मदतीस धावून जाण्यास प्रवृत्त करेल. शेवटल्या दिवसांतील परिस्थिती बिकट होत जाते तशी आपल्या सहविश्वासू बंधूभगिनींना काही वेळा कदाचित आर्थिक किंवा शारीरिक मदत हवी असेल. (१ योहान ३:१७, १८) उदाहरणार्थ, आपल्या मंडळीतील एखाद्या सदस्याला खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे किंवा त्याची/तिची नोकरी गेली आहे का? अशा वेळी कदाचित आपण आपल्या परिस्थितीनुसार त्यांना आर्थिक मदत देऊ शकतो. (नीतिसूत्रे ३:२७, २८; याकोब २:१४-१७) मंडळीतल्या एखाद्या वृद्ध विधवा बहिणीच्या घराची डागडुजी करण्याची गरज आहे का? मग, पुढाकार घेऊन आपण काही तरी काम करू शकतो.—याकोब १:२७.
१६ आपले प्रेम दाखवणे, हे केवळ आपल्या भागात राहणाऱ्यांपुरतेच मर्यादित नाही. कधीकधी, आपण इतर देशांतील देवाच्या सेवकांविषयी ऐकू जे वादळ, भूकंप किंवा मुलकी गोंधळ यांचे बळी ठरले आहेत. त्यांना अन्न, वस्र किंवा इतर गोष्टींची अत्यंत गरज असेल. ते दुसऱ्या वंशाचे किंवा जातीचे आहेत हे महत्त्वाचे नाही. आपली संपूर्ण “बंधुवर्गावर प्रीति” आहे. (१ पेत्र २:१७) त्यामुळे पहिल्या शतकातील मंडळ्यांप्रमाणे आपण, साहाय्य देण्यासाठी आयोजित केलेल्या मदतकार्यांना पाठिंबा देण्यास उत्सुक असतो. (प्रेषितांची कृत्ये ११:२७-३०; रोमकर १५:२६) या सर्व मार्गांद्वारे जेव्हा आपण प्रेम दाखवतो तेव्हा या शेवटल्या दिवसांत आपण आपल्यातील बंधन आणखी मजबूत करतो.—कलस्सैकर ३:१४.
१७ प्रीती आपल्याला देवाच्या राज्याची सुवार्ता इतरांना सांगण्यास प्रवृत्त करते. येशूच्या उदाहरणाचा विचार करा. त्याने प्रचार का केला, तो लोकांना का शिकवत होता? लोकसमुहाची दयनीय आध्यात्मिक स्थिती पाहून त्याला त्यांचा “कळवळा आला.” (मार्क ६:३४) आध्यात्मिक सत्य शिकवण्याची व आशा देण्याची ज्यांच्यावर जबाबदारी होती त्या खोट्या धार्मिक मेंढपाळांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते, त्यांची दिशाभूल केली होती. येशूला या लोकांविषयी खोल, मनापासून प्रीती व दया होती म्हणून त्याने त्यांना “देवाच्या राज्याची सुवार्ता” सांगून सांत्वन दिले.—लूक ४:१६-२१, ४३.
१८ आजही, पुष्कळ लोक आध्यात्मिकरीत्या दुर्लक्षित, दिशाभूल झालेले व कसलीही आशा नसलेले आहेत. येशूप्रमाणे आपण, अद्याप खऱ्या देवाला ओळखत नसलेल्या लोकांच्या आध्यात्मिक गरजांची जाणीव ठेवली तर, प्रीतीने व दयेने प्रवृत्त होऊन आपणही त्यांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगू. (मत्तय ६:९, १०; २४:१४) उरलेला कमी वेळ लक्षात घेतल्यास, या जीवन वाचवणाऱ्या संदेशाचा प्रचार करणे आणखी निकडीचे बनले आहे.—१ तीमथ्य ४:१६.
“सर्व वस्तूंचा शेवट जवळ आला आहे”
१९ लक्षात ठेवा, पेत्राने, “सर्व वस्तूंचा शेवट जवळ आला आहे” असे म्हटल्यानंतर एकमेकांवर प्रेम करा असा सल्ला दिला. (१ पेत्र ४:७) लवकरच या दुष्ट जगाची जागा देवाचे धार्मिक नवे जग घेईल. (२ पेत्र ३:१३) तेव्हा आज, आत्मसंतुष्ट असण्याची वेळ नाही. येशूने इशारा दिला: “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांवर पाशाप्रमाणे अकस्मात येईल.”—लूक २१:३४, ३५.
२० यास्तव, आपण ‘जागृत राहू या,’ काळाच्या ओघात आपण कोठे आहोत याविषयी सतर्क राहू या. (मत्तय २४:४२) आपले लक्ष विचलित करू पाहणाऱ्या सैतानाच्या कोणत्याही प्रकारच्या मोहापासून आपण सावध राहू या. या थंड, प्रेमहीन जगामुळे आपणही, इतरांबद्दल प्रेम दाखवण्यात थंड पडू नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जो मशीही राज्याद्वारे पृथ्वीसाठी असलेला आपला गौरवी उद्देश पूर्ण करील त्या खऱ्या देवाजवळ अर्थात यहोवाच्या आणखी जवळ आपण येऊ या.—प्रकटीकरण २१:४, ५.
[तळटीप]
a इतर बायबल भाषांतरांमध्ये, १ पेत्र ४:८ येथे आपण “एकनिष्ठेने,” “जिवेभावे,” “सातत्याने” प्रीती करावी असे म्हटले आहे.
अभ्यासासाठी प्रश्ने
• शिष्यांचा निरोप घेताना येशूने त्यांना काय सल्ला दिला आणि पेत्राला मुद्दा कळाला होता हे कशावरून दिसते? (परि. १-२)
• “गाढ प्रीती” म्हणजे काय? (परि. ३-५)
• आपण एकमेकांवर प्रेम का केले पाहिजे? (परि. ६-८)
• तुमचे इतरांवर प्रेम आहे हे तुम्ही कसे दाखवू शकता? (परि. ९-१८)
• ही वेळ आत्मसंतुष्ट असण्याची का नाही आणि आपला काय करण्याचा दृढनिश्चय असला पाहिजे? (परि. १९-२०)
[२९ पानांवरील चित्र]
एकमेकांना सहकार्य देणारे कुटुंब या शेवटल्या दिवसांतील दबावांचा प्रतिकार करण्यास सज्ज असते
[३० पानांवरील चित्र]
प्रीती आपल्याला संकटात असलेल्यांच्या मदतीला धावून जाण्यास प्रवृत्त करते
[३१ पानांवरील चित्र]
देवाच्या राज्याची सुवार्ता इतरांना सांगणे हे प्रीतीचे कृत्य आहे