आम्हाला कोण सांगू शकतो?
भाग २
आम्हाला कोण सांगू शकतो?
१, २. जे बनवण्यात आले आहे त्यामागील उद्देश काय आहे हे शोधून काढण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?
जीवनाचा खरा उद्देश कोणता आहे हे आम्हाला कोण सांगू शकतो? समजा, तुम्ही एका यंत्र बनविणाऱ्या उत्पादकाकडे गेला व तुम्हाला परिचित नाही असे एखादे गुंतागुंतीचे यंत्र बनवताना तुम्ही पाहिले, तर ते कशासाठी आहे हे तुम्ही कसे जाणून घ्याल? त्या उत्पादकालाच विचारणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम मार्ग ठरेल.
२ तर मग, आपण स्वतःभोवती या पृथ्वीवर जी अद्भुत रचना पाहात असतो, ज्यामध्ये सर्व जिवंत गोष्टी व लहानातील लहान पेशीही येते, त्याबद्दल काय? एखाद्या पेशीतील लहानातील लहान घटक व अणू फारच अद्भुतपणे व व्यवस्थेने रचलेला आढळतो. याचप्रमाणे ज्या मानवी मनाची इतकी अद्भुत घडण झालेली आहे त्याच्याबद्दल देखील काय? तसेच, आमची सौरव्यवस्था, आकाशगंगा आणि प्रचंड विश्व याबद्दल काय म्हणावे? अशा सर्व रचनांचा कोणी रचनाकार नाही का? खरेच, तोच आम्हाला, या सर्व गोष्टींची त्याने का रचना केली आहे ते सांगू शकतो.
जीवन योगायोगाने घडले का?
३, ४. जीवन योगायोगाने आले असावे याची शक्यता केवढी आहे?
३ “जिवंत प्राण्यामधील गुंतागुंतीची अपूर्व पातळी व संघटना,” याची नोंद घेऊन द एन्सायक्लोपिडिया अमेरिकाना म्हणतो: “फुले, किटक किंवा सस्तन प्राण्यामधील सूक्ष्म परिक्षण विश्वास बसणार नाही इतकी विविध भागांची तंतोतंत सुव्यवस्था प्रकट करते.” अवयवयुक्त जीवाच्या रासायनिक मिश्रणाबद्दल बोलताना ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ सर बर्नाड लोवेल यांनी लिहिले: “लहानातील लहान प्रथीन रेणू तयार होण्यासाठी असणारी योगायोग घडण्याची . . . शक्यता अशक्यकोटीतील आहे. . . . ती साधारणतः शून्यातील आहे.”
४ याचप्रमाणे, फ्रेड होईल या खगोलशास्त्रज्ञाने म्हटले: “कर्मठ जीवशास्त्राचा जीवनाबद्दलचा अजूनही चाकोरीबद्ध दृष्टिकोन हा आहे की, ते सहजगत्या उद्भवले. जीवाच्या आश्चर्यकारक गुंतागुंतीबद्दल अधिकाधिक संशोधन करीत असता जीवशास्त्रज्ञांना आढळले की, ते अकस्मात किंवा योगायोगाने सुरु होण्याची शक्यता खूपच कमी असून ती बहुधा टाळावीच लागेल. जीवन योगायोगाने उद्भवले नसावे.”
५-७. जिवंत गोष्टी योगायोगाने येऊ शकत नाही याबद्दल रेणू जीवशास्त्र कसे परिक्षण देते?
५ विज्ञानशास्त्र क्षेत्रातील अलिकडेच अध्ययनाचे क्षेत्र, रेणू जीवशास्त्र आहे व त्यात जीवाची उत्पत्ती, रेणू व अणू याबद्दलचा अभ्यास आहे. या अभ्यासात जे आढळले त्याबद्दल रेणू जीवशास्त्रज्ञ मिखाएल डेन्टन सांगतात: “प्रचलित असणाऱ्या अगदी साध्यातल्या साध्या पेशीतील रचना इतकी गुंतागुंतीची आहे की, तिची घडण कसल्यातरी नादिष्ट, बहुधा अशक्य अशा घटनेद्वारे झाली आहे हे स्वीकारणेच असंभवनीय वाटते.” “परंतु या जीवव्यवस्थेतील केवळ गुंतागुंतच नव्हे तर त्यांच्या रचेनत आढळून येणारी अविश्वसनीय कल्पकता हीच मोठी आव्हानात्मक आहे.” “या रेणूच्या स्तरावर . . . जीवशास्त्रीय रचनेची उत्पत्ती व ध्येयांची पूर्ती ही अधिक ठामपणे होते.”
६ डेन्टन पुढे म्हणतात: “आपण कोठेही पाहिले, कितीही खोलवर डोकावून बघितले तरी त्यात अभिजात लावण्य व कल्पकतेची सर्वांगपूर्ण अलौकिकता दिसते, जी योगायोगाला दुर्बळ बनवते. एखादा लहानातील लहान कार्यवाहित प्रथीन किंवा जीव, जो आमच्या निर्मितीच्या क्षमतेपलिकडे असून योगायोगाच्या विरुद्ध आहे आणि मानवाच्या बुद्धिने जे काही निर्मिण्यात आलेले आहे त्यापेक्षाही वरचढ आहे अशाची रचना खरेच सहजगत्या होऊ शकते का?” ते आणखी म्हणतात: “एक जिवंत पेशी व उच्च संघटित अशी अजीवशास्त्रीय व्यवस्था म्हणजे एखादा बिलोरी काचेचा तुकडा किंवा बर्फाचा पातळ भुरभुरीत तुकडा यात, आकलन होऊ शकेल इतका मोठा व प्रचंड दरा आहे.” भौतिक शास्त्राचे प्राध्यापक चेट रॅमो म्हणतात: “मला तर खरेच आश्चर्य वाटते. प्रत्येक रेणू हा त्याच्या कामासाठी अत्यंत आश्चर्यकारकपणे तयार झालेला आहे.”
७ रेणू जीवशास्त्रज्ञ डेन्टन शेवटी म्हणतात की, “जे अजूनही हेकेखोरपणे म्हणतात की, ही सर्व नवी वास्तवता शुद्ध योगायोगाचा परिणाम होय,” ते दंतकथा मानणारे आहेत. खरे म्हणजे, जीवाच्या योगायोगाच्या उद्भवण्याच्या तत्त्वासंबंधाने जी डार्विनची मतप्रणाली आहे तिला हे “विसाव्या शतकातील उत्पत्तीविषयक मोठी दंतकथा” म्हणतात.
रचना रचनाकाराची गरज दाखवते
८, ९. बनवलेल्या प्रत्येक गोष्टीला रचनाकार असतो हे दाखवण्यासाठी एखादे उदाहरण द्या.
८ अजीविय साहित्य जीवात अपघाती योगायोगाने आले ही शक्यता इतकी दूरवरची आहे की ती बहुधा शक्यच नाही. ज्या रचना करण्यात आल्या आहेत त्या सर्वांना रचनाकाराची गरज आहे हे पाहता पृथ्वीवरील सर्व अप्रतिम जीवित गोष्टी एकाएकी अपघाताने आलेल्या नाहीत. काही अपवाद तुम्हाला माहीत आहेत का? एकही नाही. रचना जितकी गुंतागुंतीची तितका तो रचनाकार अधिक लायक असला पाहिजे.
९ या गोष्टीचे विदारण आपल्याला या पद्धतीने करता येईल: आपण एखादे चित्र बघतो तेव्हा ते कोणा चित्रकाराच्या अस्तित्वाचा पुरावा देते. आपण एखादे पुस्तक वाचतो तेव्हा त्याचा कोणी संपादक आहे हे मान्य करतो. आपण एखादे घर बघतो तेव्हा त्याचा कोणी बांधणारा आहे हे कळते. आपण रस्त्यावरील रहदारीच्या दिव्यांना पाहतो तेव्हा कायदेमंडळ अस्तित्वात आहे हे समजते. या सर्व गोष्टी ज्यांनी बनवल्या त्या प्रत्येकामागे काहीतरी उद्देश होता. ज्या लोकांनी त्या घडवल्या त्यांच्याबद्दल हवी तितकी माहिती आपल्याला मिळाली नाही तरी असे लोक अस्तित्वात आहेत याबद्दल आपण कधीही संशय धरत नाही.
१०. सर्वोच्च रचनाकार असल्याचा पुरावा आपण कसा बघू शकतो?
१० याचप्रकारे, सर्वोच्च रचनाकाराचे अस्तित्व आपल्याला पृथ्वीवरील त्याची रचना, व्यवस्था व जीवित वस्तुतील गुंतागुंत याद्वारे दिसते. त्या सर्व गोष्टी सर्वोच्च बुद्धिमान व्यक्ती अस्तित्वात असल्याचे सुचवतात. हेच, विश्वातील कोट्यावधी आकाशगंगेद्वारे, ज्यात प्रत्येकी कोट्यावधी तारे आहेत त्यांची रचना, व्यवस्था व गुंतागुंत याबद्दलही खरे आहे. ही सर्व स्वर्गीय मंडले यावर गति, उष्णता, प्रकाश, ध्वनी, गुरुत्वाकर्षणाच्या विद्युतलहरी, व गुरुत्वाकर्षण या अचूक नियमांचे वर्चस्व आहे. मग, कायदे बनविणाऱ्याशिवाय कायदा असू शकतो का? रॉकेट शास्त्रज्ञ डॉ. वेरनहर फोन ब्राऊन यांनी म्हटले: “विश्वातील नैसर्गिक कायदे इतके अचूक आहेत की, चंद्रावर जाण्यासाठी यानाची बांधणी करणे व तेथे जाण्याची वेळ सेकंदाच्या अपूर्णांकात सुद्धा अचूकपणे ठरवणे यात कोणतीही अडचण वाटत नाही. हे नियम कोणीतरी लावून दिले असले पाहिजे.”
११. आपल्याला तो सर्वोच्च रचनाकार दिसू शकत नाही म्हणून त्याचे अस्तित्व आपण का अमान्य करू नये?
११ आपल्याला आमच्या डोळ्यांनी त्या सर्वोच्च रचनाकाराला किंवा कायदेपंडिताला पाहता येणे शक्य नाही हे खरे. पण गुरुत्वाकर्षण, चुंबकीय परिघ, विद्युत किंवा रेडिओ लहरी आपण पाहू न शकल्यामुळे त्यांचे अस्तित्व अमान्य करतो का? आम्ही ते करू शकत नाही, कारण त्यांचे परिणाम आपल्याला दिसून येतात. मग, आपण पाहू न शकणाऱ्या त्या सर्वोच्च रचनाकाराचे व कायदेपंडिताचे अस्तित्व, जेव्हा आपल्याला त्याच्या हाताच्या अपूर्व कृती बघावयास मिळतात, तेव्हा का बरे अमान्य करावे?
१२, १३. निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाबद्दल पुरावा काय सांगतो?
१२ पॉल डेव्हिस हे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणतात की, मानवाचे अस्तित्व हे दैवाचे उपरोधिक लक्षण नव्हे. ते सांगतात: “आपण येथे असावे हा त्यात खरा अर्थ होता.” ते विश्वाबद्दल असे म्हणतात: “माझ्या वैज्ञानिक कामाद्वारे मला हे भौतिक विश्व त्याच्या सर्व कल्पकतेसह इतके आश्चर्यकारक वाटते की, ते निर्बुद्ध तत्त्व आहे हे मी मुळीच मान्य करणार नाही. मला तर वाटते की, त्याचा उलगडा प्रगाढ आहे.”
१३ अशाप्रकारे पुराव्याद्वारे स्पष्ट दिसते की, विश्व, पृथ्वी व तिजवरील सर्व जिवंत गोष्टी ह्या योगायोगाने आल्या नाहीत. त्या अत्यंत बुद्धिमान, शक्तीशाली निर्माणकर्त्याची मूक साक्ष देतात.
पवित्र शास्त्र काय म्हणते
१४. पवित्र शास्त्र निर्माणकर्त्याबद्दल कोणता निर्वाळा पुरवते?
१४ मानवजातीचे सर्वात जुने पुस्तक, पवित्र शास्त्र अगदी हाच निर्वाळा देते. उदाहरणार्थ, पौलाने लिहिलेले इब्रीयांस पत्र या पवित्र शास्त्रातील पुस्तकात आपल्याला असे सांगण्यात आले आहे: “प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्व काही बांधणारा देवच आहे.” (इब्रीयांस ३:४) तसेच प्रेषित योहानाद्वारे लिहिण्यात आलेले पवित्र शास्त्रातील शेवटले पुस्तक सुद्धा असे म्हणते: “हे प्रभो [यहोवा, न्यू.व.], आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले, तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.”—प्रकटीकरण ४:११.
१५. देवाच्या काही गुणांची समज आपल्याला कशी मिळते?
१५ देवाला पाहता येत नाही असे पवित्र शास्त्र म्हणत असले तरी, तो कशा प्रकारचा देव आहे हे त्याने निर्मिलेल्या गोष्टींद्वारे कळून येते. ते म्हणते: “जगाच्या आरंभापासून माणसांनी पृथ्वी, आकाश व देवाने निर्माण केलेले सर्व काही पाहिले आहे; आणि त्याचे अस्तित्व व महान सनातन सामर्थ्य यांचे ज्ञान त्यांना झाले आहे.”—रोमकर १:२०, सुबोध भाषांतर.
१६. मानव देवाला पाहू शकत नाही याबद्दल आपल्याला धन्यता का वाटावी?
१६ अशाप्रकारे पवित्र शास्त्र आपल्याला परिणाम ते कारण ही माहिती कळवते. परिणाम—निर्माण करण्यात आलेल्या भीतीजन्य गोष्टी—एका बुद्धिमान व सामर्थ्यवान कारणाचा, देवाचा पुरावा देतात. तो अदृश्य आहे याबद्दल आम्हाला धन्यता वाटू शकते, कारण सबंध विश्वाचा निर्माता या नात्याने त्याच्या जवळ एवढे प्रचंड बळ आहे की, रक्तामांसाच्या मानवाला त्याला बघून जिवंत राहता येणे शक्यच नाही. या कारणामुळेच पवित्र शास्त्र म्हणते: “[देवाचे] मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.”—निर्गम ३३:२०.
१७, १८. निर्माणकर्त्याबद्दलचा विचार आपल्याला महत्त्वपूर्ण का वाटला पाहिजे?
१७ थोर रचनाकार, सर्वसमर्थ देवाचा विचार आपल्याला सर्वात महत्त्वाचा वाटला पाहिजे. आम्हाला निर्माणकर्त्याने घडवले आहे, तर आमच्या निर्मितीमागे त्याचा नक्कीच काही खास उद्देश, कारण असले पाहिजे. आणि जर जीवनात उद्देश असावा या अर्थाने आमची निर्मिती झालेली आहे तर भविष्यकाळात सर्व गोष्टी ठीकठाक होतील अशी आशा बाळगण्याजोगे कारण राखता येईल. अन्यथा, आमचे जगणे हे कोणतीही आशा न राखता थोड्या काळासाठी राहील व शेवटी मरावे लागेल. याकरताच, आपण देवाचा आम्हासाठी कोणता उद्देश होता हे शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर मग, आपल्याला देवाच्या इच्छेच्या सहमतात जगू इच्छितो की नाही याची निवड करता येईल.
१८ तसेच, पवित्र शास्त्र म्हणते की, निर्माणकर्ता हा प्रेमळ देव असून त्याला आमच्याबद्दल मोठी काळजी वाटते. प्रेषित पेत्राने म्हटले: “तो तुमची काळजी घेतो.” (१ पेत्र ५:७; तसेच योहान ३:१६ व १ योहान ४:८, १६ देखील पहा.) देव आमची केवढी काळजी करतो हे आपल्याला मानसिक व शारीरिकदृष्ट्या केवढ्या अद्भुत पद्धतीने निर्मिले आहे त्याचा विचार करण्याद्वारे समजू शकेल.
“अद्भुत रितीने घडण झाली”
१९. स्तोत्रकर्ता दावीद आमच्या लक्षात कोणते सत्य आणून देतो?
१९ स्तोत्रकर्त्या दाविदाने पवित्र शास्त्र लिखाणाकरवी ही कबूली दिली: “भयप्रद व अद्भुत रितीने माझी घडण झाली आहे.” (स्तोत्रसंहिता १३९:१४) हे निश्चितपणे सत्य आहे, कारण सर्वोच्च रचनाकाराद्वारे मानवी बुद्धी व शरीर याची मोठ्या अद्भुत पद्धतीने घडण झाली आहे.
२०. एक विश्वकोश मानवी मेंदूचे कसे वर्णन करतो?
२० उदाहरणार्थ, तुमचा मेंदु हा कोणत्याही संगणकापेक्षा अत्यंत गुंतागुंतीचा आहे. द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटेनिका परिक्षण करते: “मज्जासंस्थेमध्ये माहिती पसरवण्याची असणारी क्षमता सर्वात मोठ्या दूरसंचार कार्यालयापेक्षा अधिक गुंतागुंतीची आहे; अत्यंत प्रगत संगणकापेक्षाही अधिक श्रेष्ठ प्रकाराने मानवी मेंदूद्वारे समस्या सोडवल्या जातात.”
२१. मेंदू जे काही करून दाखवू शकतो ते पाहिल्यावर आपण काय ठरवावे?
२१ तुमचा मेंदू कोटीच्या संख्येने माहिती व मानसिक चित्रे संग्रहीत करतो. पण तो माहितीचा नुसता संग्राहक नाही. मेंदूमधूनच तुम्हाला शिटी कशी वाजवावी, भाकरी कशी भाजावी, विदेशी भाषा कशी बोलावी, संगणकाचा वापर कसा करावा किंवा विमान कसे उडवावे या गोष्टी कळतात. आपली सुटी कशी जाईल किंवा एखादे फळ चवीला कसे लागेल याची तुम्हाला कल्पना करता येते. तुम्ही कामाचे संयोजन करून ते करू शकता. तुम्हाला योजना आखता येते, रसिकभाव दाखवता येतो आणि प्रीतीही व्यक्त करता येते; तसेच भूत, वर्तमान व भविष्यकाळाबद्दल असलेले आपले विचार सांगता येतात. आम्हाला या अद्भुत मानवी मेंदूची रचना करता येणे शक्य नसल्याने, ज्याने ती केली तो अर्थातच आम्हा कोणाही मानवापेक्षा अत्यंत बुद्धिमान व सर्वोत्तम कुवत असणारा आहे हे निश्चये खरे आहे.
२२. मानवी मेंदूबद्दल शास्त्रज्ञ कोणती कबूली देतात?
२२ मेंदूबद्दल शास्त्रज्ञ कबूल करतात: “या अद्भुत रितीने रचलेल्या, सुव्यवस्थित व विलक्षण गुंतागुंत असलेल्या छोट्या यंत्राद्वारे कसे कार्य केले जाते हे अगदीच दुर्बोध आहे. . . . मेंदू जी विविध कोडी प्रस्तुत करतो ती मानवजातीला सोडवणे कधीच जमणार नाही.” (सायंटिफिक अमेरिकन) तसेच भौतिकशास्त्राचे प्राध्यापक रेमो म्हणतात: “खरे सांगायचे तर, आमचा मेंदू माहिती कशी संग्रहीत करतो किंवा वाटेल तेव्हा तो आम्हाला कसे स्मरण पुरवतो याची अद्याप आम्हाला माहिती नाही. . . . मानवी मेंदूत साधारणतः १० हजार कोटी मज्जापेशी आहेत. प्रत्येक पेशी झाडाप्रमाणे पसरलेल्या फांद्यांच्या माध्यमातून इतर हजारो पेशींसोबत दळणवळण करीत राहते. त्यांच्यामधील जोड कशाप्रकारातील असतील याचा विचारच चक्रावून सोडणारा आहे.”
२३, २४. अद्भुतरित्या रचना करण्यात आलेल्या शरीराच्या काही भागांची माहिती द्या, आणि एका इंजिनियरने कोणता अभिप्राय मांडला?
२३ तुमचे डोळे कोणत्याही कॅमेऱ्यापेक्षा अधिक तंतोतंत व जुळवून घेणारे आहेत, आणि खरे बघता ते पूर्णपणे स्वयंचलित, स्वतःच भिंगे मागेपुढे करणारे आणि रंगीत छायांकन करणारे कॅमेरे आहेत. तुमचे कान विविध आवाज ओळखतात व तुम्हाला मार्गदर्शन व तोल देतात. तुमचे हृदय विविध कार्यक्षम असणारा असा पंप आहे ज्याची सर्वोत्तम अभियांत्रिकांना नक्कल करता आली नाही. तसेच शरीराचे इतर भाग, तुमचे नाक, जीभ, व हात आणि तुमची प्रसारण व पचन संस्था यासारख्या गोष्टी देखील अद्भुत अशाच आहेत.
२४ या कारणामुळेच, मोठ्या संगणकाची रचना व बांधणी करण्यासाठी हाताशी घेतलेल्या एका इंजिनियरने हा विवाद मांडला की: “माझ्या संगणकाला रचनाकाराची गरज आहे तर माझं हे शरीर, जे या प्रचंड व अमर्याद विश्वामधील अगदीच यत्किंचित भाग आहे त्या या भौतिक-रासायनिक-जीवन असणाऱ्या यंत्राला कोणी रचनाकार लागला नसावा का?”
२५, २६. थोर रचनाकार आपल्याला काय सांगू शकेल?
२५ लोकांनी विमाने, संगणक, सायकली व इतर साधने बनविली तेव्हा त्यांच्या मनात यामागे उद्देश होता, त्याचप्रमाणे मानवाच्या मेंदू व शरीराची रचना करणाऱ्याच्याही मनात आमची घडण करताना काहीतरी उद्देश जरूर असला पाहिजे. त्या रचनाकाराठायी कोणत्याही मानवापेक्षा अत्यंत श्रेष्ठ बुद्धी असली पाहिजे, कारण आम्हापैकी कोणालाही त्याच्या रचनेची नक्कल करता येत नाही. या कारणास्तव, तोच असा आहे, जो आम्हाला, त्याने पृथ्वीवर का ठेवले आणि आम्हापुढे कोणते भवितव्य आहे याचे शिक्षण देऊ शकतो हे अगदी व्यवहार्य आहे.
२६ या गोष्टी आपण शिकून घेतल्यावर देवाने आम्हास दिलेला आश्चर्यकारक मेंदू व आमचे शरीर जीवनातील आमच्या उद्देशाची पूर्ती करण्याकडे वापरता येईल. पण त्याच्या उद्देशाबद्दलची माहिती आम्हाला कोठे मिळू शकते? ती माहिती तो आम्हाला कोठे पुरवतो?
[अभ्यासाचे प्रश्न]
[७ पानांवरील चित्रं]
एखाद्या गोष्टीची रचना का करण्यात आली हे शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याच्या रचनाकाराला ते विचारणे
[८ पानांवरील चित्रं]
जिवंत गोष्टीतील गुंतागुंत व रचना डीएनए रेणूत पाहता येईल
[९ पानांवरील चित्रं]
“अत्यंत प्रगत संगणकापेक्षाही अधिक श्रेष्ठ प्रकाराने मानवी मेंदूद्वारे समस्या सोडवल्या जातात”