श्रेष्ठ ज्ञानाचा अप्रतिम उगम
भाग ३
श्रेष्ठ ज्ञानाचा अप्रतिम उगम
१, २. आम्ही पवित्र शास्त्राचे का परिक्षण करावे?
पवित्र शास्त्र हे देवाच्या श्रेष्ठ ज्ञानाचा अहवाल आहे का? जीवनाच्या उद्देशासोबत संबंधित असणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची ते खरेपणाने उत्तरे देऊ शकते का?
२ खरेच, पवित्र शास्त्र आमच्या परिक्षणासाठी अगदी योग्य आहे. याचे एक कारण म्हणजे ते आतापर्यंत रचण्यात आलेल्या पुस्तकांपैकीचे सर्वात असामान्य पुस्तक आहे. पुढील वस्तुस्थितीचा विचार करा.
सर्वात जुने, अगदी विस्तृत प्रमाणात वितरीत झालेले पुस्तक
३, ४. पवित्र शास्त्र केवढे प्राचीन आहे?
३ पवित्र शास्त्र सर्वात जुने पुस्तक असून, त्याच्या काही भागांचे लिखाण साधारणतः ३,५०० वर्षांपूर्वी झाले. पवित्र समजल्या जाणाऱ्या इतर पुस्तकांच्याही पुष्कळ शतके आधीचे ते जुने पुस्तक आहे. त्यातील पहिल्या ६६ पुस्तकांचे लिखाण बुद्ध व कन्फ्युशियसच्या एक हजार वर्षे आधी तर मुहम्मदच्या दोन हजार वर्षांआधी झाले.
४ पवित्र शास्त्रात लिखित असणारा इतिहास आपल्याला मागे पहिल्या मानवी कुटुंबाच्या सुरवातीला नेतो व आपण येथे पृथ्वीवर कसे आलो याचे स्पष्टीकरण देतो. तो आम्हाला मानवाची निर्मिती होण्याआधीच्या काळीही नेतो आणि पृथ्वीची घडण कशी झाली याबद्दलची वस्तुस्थिती कळवतो.
५. प्रापंचिक लिखाणांच्या प्राचीन प्रतींशी तुलना करता पवित्र शास्त्राच्या किती प्राचीन हस्तलिखित प्रती उपलब्ध आहेत?
५ इतर धार्मिक तसेच धार्मिकेत्तर पुस्तकांच्या खूपच कमी जुनी हस्तलिखिते अस्तित्वात आहे. पण, पवित्र शास्त्राची किंवा त्याच्या काही भागाची साधारण ११,००० इब्री व ग्रीक भाषेतील हस्तलिखिते उपलब्ध आहे, यापैकीची काही तर त्यांच्या मूळ लिखाणाच्या तारखेच्या जवळपासची आहेत. पवित्र शास्त्रावर कल्पना करता येणार नाही इतका प्रचंड हल्ला वेळोवेळी होत राहिला तरीही ही त्यातून बचावून राहिली आहेत.
६. पवित्र शास्त्राचे वितरण केवढ्या व्याप्त रुपात झाले आहे?
६ तसेच, पवित्र शास्त्र हे इतिहासात अधिक विस्तृत प्रमाणात वितरीत झालेले पुस्तक आहे. शास्त्रवचनांचा पूर्ण किंवा काही भाग असे मिळून त्याचे सुमारे दोन हजार भाषांमध्ये तीनशे कोटी प्रतींचे वितरण झाले आहे. मानवी कुटुंबाच्या ९८ टक्के लोकांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत पवित्र शास्त्राचे भाग उपलब्ध आहेत असे म्हटले जाते. इतर कोणत्याही पुस्तकाची याच्याइतकी आवृत्ती नाही.
७. पवित्र शास्त्राच्या अचूकतेबद्दल काय सांगता येईल?
७ याचप्रमाणे, इतर कोणतेही प्राचीन पुस्तक अचूकतेच्या बाबतीत पवित्र शास्त्रासोबत तुलना करू शकत नाही. विज्ञान शास्त्रज्ञ, इतिहासकार, भूगर्भसंशोधक, भौगोलिक तज्ज्ञ, आणि भाषातज्ज्ञ हे सर्व सातत्याने पवित्र शास्त्राच्या अहवालाची तपासणी करीत आले आहेत.
वैज्ञानिक अचूकता
८. पवित्र शास्त्र विज्ञानाच्या बाबतीत किती अचूक आहे?
८ उदाहरणार्थ, पवित्र शास्त्र हे विज्ञान शास्त्रीय पुस्तक या अर्थी लिखित झालेले नसले तरी, जेथे कोठे त्याचा विज्ञानाशी संपर्क येतो तेथे ते खऱ्या विज्ञानाशी सहमत दर्शवते. पण इतर पवित्र समजल्या जाणाऱ्या पुस्तकांत वैज्ञानिक दंतकथा, चूका व धादांत खोटेपणा दिसतो. पवित्र शास्त्राच्या वैज्ञानिक अचूकपणापैकी ही केवळ चार उदाहरणे पाहा.
९, १०. पृथ्वीच्या आधाराबद्दल त्या काळी अस्तित्वात असणाऱ्या अशास्त्रीय दृष्टिकोनाला प्रवर्तित करण्याऐवजी पवित्र शास्त्राने त्याबद्दल काय सांगितले?
९ पृथ्वी अंतराळात कशी उभी आहे. प्राचीन काळी, पवित्र शास्त्राचे लिखाण होत होते तेव्हा ही पृथ्वी अंतराळात कशी उभी आहे याबद्दल बरेच अनुमान प्रचलित होते. काहींचा विश्वास होता की, ही पृथ्वी चार हत्तींवर विसावली आहे व हे हत्ती एका मोठ्या कासवाच्या पाठीवर उभे आहेत. इ. स. पूर्वीच्या चवथ्या शतकातील ग्रीक तत्त्ववेत्ता ॲरिस्टॉटल याने असे शिकवले की, ही पृथ्वी रिकाम्या जागेत कधीही टांगता येऊ शकणार नाही. याउलट, त्याचे असे म्हणणे होते की, आकाशातील सर्व ग्रह हे घन, पारदर्शक गोळ्यांच्या पृष्ठभागावर बसवलेले आहेत आणि प्रत्येक गोळा दुसऱ्याभोवती बिलगलेला आहे व पृथ्वी ही अत्यंत आतील गोळ्यात असून बाहेरील गोळ्यात तारे आहेत.
१० तथापि, पवित्र शास्त्राने, त्याच्या लिखाणाच्या काळी अस्तित्वात असणाऱ्या कल्पनाविलासी, अशास्त्रीय शिक्षणाचे प्रतिबिंब दाखवण्याऐवजी (साधारणपणे इ. स. पूर्वी १४७३ मध्ये) असे साधेपणात म्हटले: “[देवाने] पृथ्वी निराधार टांगली आहे.” (ईयोब २६:७) येथे वापरण्यात आलेल्या “निराधार” या शब्दाचा अर्थ मूळ इब्री भाषेत “कशावरही नाही” असा होतो, आणि असा हा शब्दप्रयोग पवित्र शास्त्रात केवळ येथेच दिसतो. पृथ्वीच्या सभोवताली मोकळे अंतराळ आहे असे जे चित्र पवित्र शास्त्राने सादर केले आहे, त्याबद्दल प्रामाण्यांनी पवित्र शास्त्र काळात केवढा अप्रतिम दृष्टिकोन होता हे ओळखले आहे. द थिऑलॉजिकल वर्डबुक ऑफ द ओल्ड टेस्टमेंट हे पुस्तक म्हणते: “ईयोब २६:७ हे त्या काळी ज्ञात असलेले जग अंतराळात उभे असलेले असे थरारक चित्र दाखवते आणि ते भविष्यातील वैज्ञानिक संशोधनाची वाट पाहात होते.”
११, १२. ईयोब २६:७ चे सत्य मानवाला केव्हा समजले?
११ पवित्र शास्त्रातील हे अचूक विधान ॲरिस्टॉटलच्या १,१०० पेक्षा अधिक वर्षांआधी होते. तरी ॲरिस्टॉटलने पृथ्वीबद्दल राखलेला दृष्टिकोन त्याच्या मृत्यूनंतर साधारण २,००० वर्षे शिकवण्याचे चालूच राहिले! सरतेशेवटी, इ. स. १६८७ मध्ये सर आयझक न्यूटन यांनी आपले संशोधन प्रकाशित केले की, ही पृथ्वी इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळात उभी आहे. पण हे तर, पवित्र शास्त्राने पृथ्वी ही “निराधार” टांगली आहे हे अत्यंत साधेपणाने म्हणण्याच्या ३,२०० वर्षांनंतर होते.
१२ होय, पवित्र शास्त्राने जवळजवळ ३,५०० वर्षाआधी अगदी अचूकपणे म्हटले की, पृथ्वीला कसलाही दृश्य आधार नाही, आणि ही वस्तुस्थिती आजच्या गुरुत्वाकर्षण तसेच गतिच्या नियमांच्या आकलनाशी अगदी सुसंगत आहे. एका प्रामाण्याने म्हटले: “ईयोबाला सत्य कसे माहीत होते . . . हा प्रश्न पवित्र शास्त्रवचनांच्या प्रेरणेला नकार देणाऱ्यांना सहजपणे सोडवता येत नाही.”
१३. शतकांआधी लोकांना पृथ्वीच्या आकाराबद्दल काय वाटत होते, पण कशामुळे त्यांचे मन बदलले?
१३ पृथ्वीचा आकार. एन्सायक्लोपिडिया अमेरिकानाने म्हटले: “माणसाला पृथ्वीबद्दल असणारा आरंभीचा ग्रह असा होता की, ती सपाट असून विश्वाच्या कडक व्यासपीठावर आहे. . . . पृथ्वी गोलाकार आहे ही धारणा लोकांचे कुतूहल जागे होण्याच्या काळापर्यंत विस्तृतपणे स्वीकारली जात नव्हती. या सपाट पृथ्वीच्या किनाऱ्यापर्यंत प्रवास करण्याची काही आरंभीच्या दर्यावर्द्यांना भीती वाटत होती. परंतु, होकायंत्राचा शोध व इतर प्रगतीमुळे अधिक लांब पल्ल्याचा समुद्रप्रवास शक्य झाला. या “प्रवासातील संशोधनांनी” प्रकटविले की, आणखी एक कोश स्पष्ट करतो, “जग, बहुतेक लोकांचा विश्वास आहे तसे सपाट नसून गोलाकार आहे.”
१४. पवित्र शास्त्राने पृथ्वीच्या आकाराबद्दल कसे वर्णन दिले व केव्हा?
१४ तरीही, त्या समुद्र प्रवासांच्या साधारण २,७०० वर्षांआधी, पवित्र शास्त्राने म्हटले होते: “हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरूढ झाला आहे.” (यशया ४०:२२) येथे “परिघ” या अर्थी भाषांतरीत करण्यात आलेला इब्री शब्द “गोलाकार” असाही अर्थ देतो हे विविध संदर्भ ग्रंथावरून कळते. या कारणामुळे इतर पवित्र शास्त्र भाषांतरे याप्रकारे म्हणतात: “पृथ्वीचा गोलार्ध” (डुए व्हर्शन) व “गोल पृथ्वी”—मोफॅट.
१५. पृथ्वीसंबंधाने असणाऱ्या अशास्त्रीय दृष्टिकोनाचा प्रभाव पवित्र शास्त्रावर का पडू शकला नाही?
१५ अशाप्रकारे, पृथ्वीचा आधार व तिचा आकार याबद्दल त्या काळी रूढ असणाऱ्या अशास्त्रीय दृष्टिकोनांचा पवित्र शास्त्रावर प्रभाव पडला गेला नाही. त्याचे कारण अगदी साधे आहे: पवित्र शास्त्राचा संपादक हा स्वतःच विश्वाचा घडवणारा आहे. त्यानेच पृथ्वीची निर्मिती केली असल्यामुळे ती कशावर टांगलेली आहे आणि तिचा काय आकार आहे हे त्याला माहीत असले पाहिजे. या कारणामुळे, त्याने पवित्र शास्त्राचे लिखाण करण्याची प्रेरणा दिली तेव्हा इतरांना त्या काळी जे काही वाटत होते त्या अशास्त्रीय दृष्टिकोनांना त्यात समाविष्ट केले जात नाही याची खात्री करून घेतली.
१६. पवित्र शास्त्राच्या विधानाशी जिवंत प्राण्यांची घडण कशी सहमत दर्शवते?
१६ जिवंत प्राण्यातील घटक. “मग परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला.” असे उत्पत्ती २:७ मध्ये म्हटले आहे. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया म्हणते: “जिवंत प्राण्यात आढळणारे सर्व रासायनिक घटक अचेतन गोष्टीत देखील आढळतात.” तेव्हा मानवासहित सर्व जिवंत प्राण्यात आढळणारे मूलभूत रसायन पृथ्वीत देखील आढळते. हे, देवाने मानव व इतर जिवंत प्राण्यांची निर्मिती करताना जे साहित्य वापरल्याची पवित्र शास्त्र माहिती देते त्याच्याशी सुसंगत आहे.
१७. जिवंत प्राणी कसे अस्तित्वात आले त्याबद्दलचे सत्य कोणते आहे?
१७ “आपापल्या जातीप्रमाणे.” देवाने पहिल्या मानवी दांपत्याची निर्मिती केली असे पवित्र शास्त्र म्हणते व यांच्याकडून सर्व मानवी वंश पुढे आला. (उत्पत्ती १:२६-२८; ३:२०) ते असेही सांगते की, इतर जिवंत प्राणी म्हणजे मासे, पक्षी व सस्तन प्राणी यांच्याही बाबतीत तसेच झाले; ते “आपापल्या जातीप्रमाणे” सामोरे आले. (उत्पत्ती १:११, १२, २१, २४, २५) विज्ञानशास्त्रज्ञांना देखील नैसर्गिक निर्मितीत हेच आढळले आहे की, जिवंत जीव हा त्याच्या जातीच्या पालकांकडून उद्भवतो. याला कसलाही अपवाद नाही. याबद्दल भौतिकशास्त्रज्ञ रायमो यांनी परिक्षिले: “जीवन दुसरे जीवन घडवते. ते सर्वदा प्रत्येक पेशीच्या बाबतीत घडते. पण अचेतन गोष्टी जीवनाला कशा घडवतात? हाच जीवशास्त्रामध्ये उत्तर न मिळालेला फार मोठा प्रश्न होय. आतापर्यंत जीवशास्त्रज्ञांनी अंदाजाने थोडेफार उत्तर देण्याचा प्रयत्न केला. अचेतन गोष्टी कशातरी सचेतन गोष्टीत संघटित झाल्या. . . . उत्पत्ती पुस्तकाच्या संपादकाने ते एकंदरीत बरोबर स्पष्ट केले होते.”
ऐतिहासिक अचूकता
१८. पवित्र शास्त्राच्या ऐतिहासिक अचूकतेबद्दल एका वकिलाने काय म्हटले?
१८ अस्तित्वात असणाऱ्या इतर कोणाही पुस्तकापेक्षा पवित्र शास्त्रात प्राचीन इतिहास अत्यंत अचूकपणे आढळतो. ही त्याची ऐतिहासिक अचूकता ए लॉयर एक्झामिन्स द बायबल या पुस्तकात अशा पद्धतीने ठकळपणे मांडण्यात आली आहे: “चांगल्या कैफियतीबद्दल आम्हा वकिलांचा हा नियम असतो की, ‘घोषणेला वेळ व जागेची पुष्टी असली पाहिजे.’ एखादी वीरकथा, दंतकथा व खोटी साक्ष या गोष्टी घटनेला दूर देशी आणि अनिश्चित काळी घेऊन जात असल्यामुळे वरील नियम मोडला जातो. पण पवित्र शास्त्रातील वर्णन आम्हाला कथित गोष्टींची तारीख व ठिकाण अगदी अचूकपणे देते.”
१९. पवित्र शास्त्राच्या ऐतिहासिक वर्णनाबद्दल एक संदर्भग्रंथ काय विवेचन देतो?
१९ द न्यू बायबल डिक्शनरी हे विवेचन देते: “[प्रे. कृत्ये याचा लेखक] आपले वर्णन समकालीन इतिहासाच्या चाकोरीत पुरवतो; त्याच्या लिखाणाची पाने शहर न्यायधीश, प्रांतिय अधिकारी, खंड देणारे राजे इत्यादि गोष्टींनी भरलेली आहेत; आणि दर वेळेला संबंधित वेळ व जागा अगदी अचूक असल्याची दिसते.”
२०, २१. एक पवित्र शास्त्र प्रामाण्य पवित्र शास्त्राच्या इतिहासाबद्दल काय म्हणतात?
२० द युनियन बायबल कंपॅनियन या पुस्तकात लिहिताना एस. ऑस्टीन ॲलिबन म्हणतात: “सर आयझक न्यूटन . . . प्राचीन लिखाणाचे सुप्रसिद्ध टिकाकार देखील होते व त्यांनी पवित्र शास्त्र वचनांचे मोठ्या काळजीने परिक्षण केले होते. त्यांचा याबद्दलचा काय निवाडा होता? ‘मला असे आढळते की,’ ते [न्यूटन] म्हणतात, ‘इतर कोणाही [प्रापंचिक] इतिहासापेक्षा नव्या कराराच्या अस्सलपणाची अधिक खात्री दिसते.’ डॉ. जॉनसन म्हणतात की, ज्युलियस सीझर हा रोममधील राजधानीत वारला यापेक्षा शुभवर्तमानात म्हटल्याप्रमाणे येशू कॅलव्हरी येथे वारला याबद्दलचा अधिक पुरावा आम्हापाशी आहे. खरेच, आम्हापाशी भरपूर पुरावा आहे.”
२१ हाच उगम पुढे म्हणतो: “ज्या कोणाला शुभवर्तमानातील इतिहासाबद्दल संशय वाटतो त्याला विचारून बघा की, सीझर रोमच्या राजधानीत वारला किंवा चार्लमॅग्ने या सम्राटाला रोमी साम्राज्याच्या पश्चिम विभागाचा सम्राट म्हणून इ. स. ८०० मध्ये पोप लिओ ३ याच्याद्वारे शिरोभूषण घालण्यात आले हे मान्य करण्यास त्याच्याकडे कोणते कारण आहे. . . . [इंग्लंडचा] चार्ल्स १ कधी जिवंत होता, मग त्याचा शिरच्छेद झाला आणि त्याच्या ऐवजी ऑलिव्हर क्रोमवेल राजा झाला हे तुम्हाला कसे माहीत आहे? . . . [तसेच] सर आयझॅक न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढण्याचे श्रेय कसे मिळाले? . . . याचे कारण आताच उल्लेखिलेल्या लोकांबद्दलचे प्रतिपादन आपल्यापाशी आहे आणि त्या प्रतिपादनांबद्दल सत्यतेचा ऐतिहासिक पुरावा देखील आहे. . . . अशा प्रकारचा पुरावा सादर केला असताना देखील या लोकांनी विश्वास ठेवण्याचे नाकारले तर अशा लोकांना आम्ही मूर्ख, विकृत व अज्ञानी समजून माघारे लावून देऊ.”
२२. पवित्र शास्त्राच्या अस्सलतेचा स्वीकार काहीजण का करीत नाही?
२२ तो उगम पुढे असा समारोप देतो: “तर आता, पवित्र शास्त्रवचनांच्या अस्सलपणाचा इतका पुरावा पुरवल्यानंतर देखील आपल्याला समाधान होत नाही असे जे म्हणतात अशांबद्दल आम्ही काय म्हणावे? . . . आम्हाला निश्चितपणे सांगता येते की येथे बुद्धी किंवा मस्तक याचा दोष नाही, तर ते अंतःकरण आहे;—ज्यामुळे त्यांचा अहंकार खाली उतरतो अशा कशाचाही स्वीकार करण्याची त्यांची इच्छा नाही व म्हणूनच ते आपल्या मताचे वेगळे जीवन जगतात.”
अंतर्गत सुसंगतता व स्पष्टवक्तेपणा
२३, २४. पवित्र शास्त्रातील अंतर्गत सुसंगतता इतकी असामान्य का आहे?
२३ याचा जरा विचार करा की, एखाद्या पुस्तकाचे लिखाण रोमी साम्राज्याच्या काळी सुरु होऊन ते मध्ययुगीन काळातही चालू राहिले व शेवटी आमच्या २० व्या शतकापर्यंत आले आणि हे सर्व वेगवेगळ्या लेखकांनी लिहिले. या लेखकांचा व्यवसाय सैनिक, राजे, याजक, कोळी, कळप राखणारे आणि वैद्य अशा विविध प्रकारातील असला तर यांच्या लिखाणाबद्दल तुम्हाला काय अपेक्षिता येईल बरे? त्यांचे ते पुस्तक सुसंगत व एकमताचे होईल अशी तुम्ही अपेक्षा धराल का? ‘मुळीच नाही!’ असे तुम्ही म्हणाल. असे असले तरी पवित्र शास्त्राचे लिखाण अशाच परिस्थितीत झाले. तरीदेखील ते वरपांगी नव्हे तर संपूर्णपणे, त्याच्या एकंदर विचारात व लहानसहान माहितीत देखील सुसंगत आहे.
२४ पवित्र शास्त्र ६६ पुस्तकांचा संग्रह असून ते १,६०० वर्षांच्या दरम्यान ४० वेगवेगळ्या लेखकांनी लिहिले. या लिखाणाचा आरंभ इ. स. पू. १५१३ मध्ये होऊन ते इ. स. ९८ मध्ये पूर्ण झाले. लेखक वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे होते, आणि पुष्कळांचा इतर लेखकांसोबत मुळी संबंधच नव्हता. तरीपण त्यांनी लिहिलेले पुस्तक जणू एकाच मनाचे आहे असे दिसते, कारण त्यात मध्यवर्ती व सुसंगत असा विषय सबंध पुस्तकातून दिसून येतो. काहींचा असा विश्वास आहे की, पवित्र शास्त्र हे पश्चिमी वसाहतीचे एक उत्पादन आहे, परंतु ते तसे नसून त्याचे लिखाण पूर्वेकडील लोकांनी केलेले आहे.
२५. पवित्र शास्त्राचा प्रामाणिकपणा व स्पष्टवक्तेपणा पवित्र शास्त्र लेखकांच्या दाव्याला कशी पुष्टी देतो?
२५ बहुतेक प्राचीन लेखकांनी त्यांचे यश व सद्गुण यांचीच केवळ माहिती कळवली; पण पवित्र शास्त्र लेखकांच्या बाबतीत बघता त्यांनी स्वतःच्या चूका कबूल केल्या आणि त्यांचे राजे व नेते यांच्या अपयशाची माहितीही दिली. गणना २०:१-१३ व अनुवाद ३२:५०-५२ मोशेच्या अपयशाची माहिती देते व ही पुस्तके त्यानेच लिहिली. योना १:१-३ आणि ४:१ योनाच्या चुकांची माहिती देते, ते अहवाल त्यानेच लिहिले. मत्तय १७:१८-२०; १८:१-६; २०:२०-२८; आणि २६:५६ वचने येशूच्या शिष्यांद्वारे प्रदर्शित झालेल्या अवगुणांची माहिती देतात. अशाप्रकारे पवित्र शास्त्र लेखकांचा प्रामाणिकपणा व स्पष्टवक्तेपणा देवाने त्यांना प्रेरित केले होते या त्यांच्या दाव्याला आधार देणारा आहे.
त्याचे अत्यंत भिन्नत्वदर्शक आकर्षण
२६, २७. पवित्र शास्त्र वैज्ञानिक व इतर प्रकाराच्या बाबतीत एवढे अचूक का आहे?
२६ पवित्र शास्त्र हे वैज्ञानिक, ऐतिहासिकदृष्ट्या व इतर बाबतीत इतके अचूक आणि इतके सुसंगत व प्रामाणिक का आहे हे ते स्वतःच प्रकट करते. ते दाखवते की, सर्वशक्तीमान, सर्वसमर्थ देव यहोवा, जो निर्माता असून त्याने या विश्वाची रचना केली आहे तोच पवित्र शास्त्राचा संपादक आहे. त्याने लेखनिक म्हणून मानवी पवित्र शास्त्र लेखकांचा उपयोग केला. त्याने आपला पवित्र आत्मा, त्याची क्रियाशील शक्ती याची त्यांना प्रेरणा देऊन जे काही लिहून ठेवण्याची त्याची इच्छा होती ते लिहिण्यासाठी मार्गदर्शित केले.
२७ पवित्र शास्त्रात प्रेषित पौल लिहितो: “प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरिता उपयोगी आहे, ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.” प्रेषित पौलाने आणखी असे म्हटले: “तुम्ही आम्हांपासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले. ते माणसांचे म्हणून नव्हे तर, देवाचे म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते असेच आहे.”—२ तीमथ्य ३:१६, १७; १ थेस्सलनीकाकर २:१३.
२८. यास्तव, पवित्र शास्त्र हे कोठून आलेले आहे?
२८ अशाप्रकारे, पवित्र शास्त्र देव—या एकाच संपादकाच्या मनातून आले आहे. त्याच्याठायी अमर्याद शक्ती असल्यामुळे जे काही लिहिले जात आहे त्याचा प्रामाणिकपणा आमच्या काळापर्यंत टिकून राहात आहे याकडे त्याने लक्ष देणे त्यासाठी खूपच साधी गोष्ट होती. याविषयी, पवित्र शास्त्र हस्तलिखितांबद्दल अग्रेस्सर असणारे अधिकारी सर फ्रेड्रिक केनयन यांनी १९४० मध्ये म्हटले: “शास्त्रवचने जशी लिहिली तशीच आजपर्यंत जतन झाली नसतील या शंकेचे पुसटसे सावटही आता उरलेले नाही.”
२९. दळणवळण करण्याच्या देवाच्या क्षमेतेचे स्पष्टीकरण कसे देता येईल?
२९ हजारो किलोमीटर्स दूर अंतराळातून एवढेच काय पण चंद्रावरून देखील रेडिओ व दूरदर्शन संकेत पाठविण्याची क्षमता मानवाठायी आहे. कोट्यावधी किलोमीटर्स दूरवर असलेल्या ग्रहांचा शोध घेतल्यावर त्यांचे भौतिक सांकेतिक संदेश व चित्रे पृथ्वीवर पाठवण्यात आली. तेव्हा मानवाचा निर्माता आणि रेडिओ लहरींचाही निर्माता ते अगदी सहजपणे करू शकत होता. आपल्या सर्वसमर्थ शक्तीद्वारे, त्याने पवित्र शास्त्राचे अहवाल लिहिण्यासाठी निवडलेल्या माणसांच्या मनाला शब्दरचना व चित्रे पुरवण्याचे कार्य त्याला एक साधी गोष्ट होती.
३०. देवाचा मानवाबद्दल काय उद्देश आहे हे त्यांनी शोधून काढावे अशी देवाची इच्छा आहे का?
३० याखेरीज, ही पृथ्वी व तिजवरील जीवन आणखी अशा काही गोष्टी पुरवून आहेत, ज्या देवाची मानवजातीबद्दल केवढी आस्था आहे ते प्रकटवितात. या कारणामुळे, तो कोण आहे हे मानवांनी शोधण्याची मदत त्यांना मिळण्यासाठी तसेच त्याचे उद्देश काय आहेत याची अभिव्यक्ती करण्यासाठी एका पुस्तकात त्या स्पष्टरुपाने व्यक्त करणे व त्यालाच एक कायमचा लेख म्हणून टिकवणे हे आम्हाला समजण्याजोगे आहे.
३१. लिखित करण्यात आलेला प्रेरित संदेश हा जी माहिती तोंडी कळवण्यात येते त्यापेक्षा अधिक श्रेष्ठ का ठरतो?
३१ आता, देवाने संपादिलेले पुस्तक हे मानवांद्वारे तोंडोतोंडी जी माहिती कळवण्यात आली त्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे ते लक्षात घ्या. तोंडच्या गोष्टी विश्वासार्ह राहू शकत नाही, कारण त्यातील संदेशाचा विपर्यास होऊ शकतो व कालांतराने त्याचा अर्थही बिघडवला जातो. कळवण्यात आलेली माहिती ही कळवणाऱ्याच्या दृष्टिकोनानुसार कळवली जाते. पण देवाने प्रेरित केलेला टिकाऊ लिखित अहवाल हा अत्यंत कमी चुकांचा राहू शकतो. तसेच एखाद्या पुस्तकाचे पुनर्मुद्रण व भाषांतरही होऊ शकते जे विविध भाषेच्या लोकांना वाचता येऊन त्याचा त्यांना लाभ मिळू शकतो. तर मग, आमच्या निर्मात्याने माहिती कळवण्यासाठी या माध्यमाचा उपयोग केला यातील त्याची व्यवहार्यता दिसत नाही का? होय, ते व्यवहार्य असण्यापेक्षा अधिक आहे, कारण हेच त्याने केले असल्याचे निर्माणकर्ता सांगतो.
पूर्ण झालेले भविष्यवाद
३२-३४. पवित्र शास्त्रात असे काय आहे जे इतर पुस्तकात नाही?
३२ पवित्र शास्त्र, ईश्वरी प्रेरणेचे आणखी एक खास चिन्ह बाळगून आहे: ते भविष्यवादांचे पुस्तक असून त्यांची न चुकता पूर्णता होत आहे.
३३ उदाहरणार्थ, प्राचीन सोर नगराचा नाश, बाबेलचे पडणे, यरुशलेमाची पुनर्बांधणी, आणि मेद-पारस व ग्रीसच्या राजांचे उदय व पतन या सर्व गोष्टींचे अगाऊपणे विस्तारीत रुपाने पवित्र शास्त्रात पुष्कळ वर्षांआधीच भाकीत करून ठेवण्यात आले होते. हे भविष्यवाद इतके अचूक होते की, काही टिकाकारांनी त्या घटना घडल्यावर ते लिहिण्यात आले असे व्यर्थ प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला.—यशया १३:१७-१९; ४४:२७–४५:१; यहेज्केल २६:३-६; दानीएल ८:१-७, २०-२२.
३४ यरुशलेमाचा इ. स. ७० मध्ये विनाश झाला त्याबद्दल येशूने दिलेल्या भविष्यवादांची अचूकपणे पूर्णता झाली. (लूक १९:४१-४४; २१:२०, २१) शिवाय येशूने तसेच प्रेषित पौलाने “शेवटल्या काळा”बद्दल सांगितलेले भविष्यवाद आज आमच्या काळी सविस्तरपणे पूर्ण होत आहेत.—२ तीमथ्य ३:१-५, १३; मत्तय २४; मार्क १३; लूक २१.
३५. पवित्र शास्त्रातील भविष्यवाद केवळ निर्माणकत्याकडून का येऊ शकतात?
३५ अशाप्रकारे, भावी घटनांबद्दलचे इतके अचूक भविष्य कोणा मानवी मनाला, कोणी कितीही बुद्धिमान असले तरी, सांगता येणार नाही. ते केवळ विश्वाच्या सर्वसमर्थ व सर्वसुज्ञ निर्मात्यालाच वदवता येईल. याबद्दल आपण २ पेत्र १:२०, २१ मध्ये असे वाचतो: “शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही; कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.”
ते आम्हाला उत्तर देते
३६. पवित्र शास्त्र आम्हास काय सांगते?
३६ या प्रकारे, पवित्र शास्त्राबद्दल, ते सर्वोच्च देवाचे प्रेरित वचन असल्याचा पुरावा स्पष्ट देते. तेच केवळ मानव या पृथ्वीवर का आहे, येथे इतका त्रास का आहे, आणि आमचे भवितव्य ते काय आणि सर्व गोष्टी कशा चांगल्या केल्या जातील याविषयी माहिती देते. ते आम्हाला प्रकटवते की, एक सर्वोच्च देव आहे ज्याने मानव व पृथ्वीची एका उद्देशास्तव निर्मिती केली असून तो उद्देश पूर्ण होणार आहे. (यशया १४:२४) याशिवाय खरा धर्म तो कोणता व तो आम्हाला कसा शोधता येईल याचीही माहिती पवित्र शास्त्र प्रकटवते. या कारणामुळे ते ईश्वरी सुज्ञानाचा एकमात्र उगम आहे, जे आम्हाला जीवनाबद्दलच्या सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांबाबतचे सत्य सांगू शकते.—स्तोत्रसंहिता १४६:३; नीतीसूत्रे ३:५; यशया २:२-४.
३७. ख्रिस्ती धर्मजगताबद्दल काय विचारले जाण्यास हवे?
३७ तथापि, पवित्र शास्त्राच्या खरेपणाचा इतका मुबलक पुरावा जरी उपलब्ध असला तरी जे त्याला मानत असल्याचे म्हणतात ते सर्व याच्या शिक्षणाचा अवलंब करीत आहेत का? आपण ख्रिस्ती धर्माचे आचरण करणारे आहोत असा दावा करणाऱ्या राष्ट्रांचा, ख्रिस्ती धर्मजगताचा उदाहरणादाखल विचार करा. त्यांच्याकडे तर पवित्र शास्त्र कित्येक शतकापासून उपलब्ध आहे. पण त्यांचे विचार व आचार खरेच देवाच्या श्रेष्ठ सुज्ञानानुरुप प्रकट होत आहेत का?
[अभ्यासाचे प्रश्न]
[११ पानांवरील चित्रं]
अंतराळात पृथ्वी आकाशातील इतर ग्रहांमध्ये गुरुत्वाकर्षणाद्वारे आधांतरी आहे असे सर आयझक न्यूटन यांना वाटत होते
पृथ्वी निराधार टांगली असल्याचे पवित्र शास्त्र जे वर्णन देते तो त्या काळचा अप्रतिम दृष्टांत होय, असे प्रामाण्य मानतात
[१२ पानांवरील चित्रं]
सपाट पृथ्वीच्या किनाऱ्यावरून आपण खाली पडू अशी आरंभीच्या काही दर्यावर्द्यांना भीती वाटली होती
[१३ पानांवरील चित्रं]
ज्यूलियस सीझर, सम्राट चार्लमॅग्ने, ऑलिव्हर क्रोमवेल किंवा पोप लिओ ३ हयात होते यांच्यापेक्षा येशू ख्रिस्त अस्तित्वात होता याबद्दलचा अधिक पुरावा आहे
[१५ पानांवरील चित्रं]
यरुशलेमाचा इ. स. ७० मध्ये नाश होण्याबद्दल येशूने दिलेल्या भविष्यवादाची झालेली पूर्णता रोममधील टायटसच्या कमानीद्वारे सिद्ध करण्यात आली