प्रश्न २
कोणत्याही प्रकारचा सजीव खरोखरच साधा आहे का?
या विश्वातल्या सर्वात जटिल रचनांपैकी एक म्हणजे तुमचं शरीर. ते जवळजवळ १०० लाख कोटी सूक्ष्म पेशींनी बनलेलं आहे, उदाहरणार्थ हाडांच्या पेशी, रक्त पेशी, मेंदूच्या पेशी इत्यादी.७ खरं पाहता, तुमच्या शरीरात अशा २०० वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत.८
तुमच्या शरीरातल्या या पेशींचे प्रकार, त्यांचे आकार आणि कार्य यांत आश्चर्यकारक विविधता दिसून येते. तरीसुद्धा या लाखो पेशी एकमेकांसोबत मिळून अतिशय गुंतागुंतीची कार्यं पार पाडतात. जणू त्यांचं एक सुसंघटित जाळंच असतं. त्यांच्या तुलनेत, लाखो कंप्युटर्स आणि अतिशय वेगाने माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या केबल्स यांनी मिळून बनलेलं इंटरनेटही अगदी साधं आणि हळू असल्यासारखं वाटेल. सर्वात मूलभूत प्रकारच्या पेशीतही जी कमालीची तांत्रिक कुशलता दिसून येते तिची कोणत्याही मानवी शोधाशी तुलना करता येणार नाही. मग मानवी शरीरातल्या या पेशी कशा अस्तित्वात आल्या?
बरेच शास्त्रज्ञ काय दावा करतात? सर्व सजीव पेशी दोन मुख्य प्रकारांत मोडतात—केंद्रक (Nucleus) असलेल्या आणि केंद्रक नसलेल्या. मानवांच्या, प्राण्यांच्या तसंच वनस्पतींतल्या पेशींमध्ये केंद्रक असतं. तर जिवाणूंच्या पेशींत ते नसतं. केंद्रक असलेल्या पेशींना युकॅरियॉटिक तर केंद्रक नसलेल्या पेशींना प्रोकॅरियॉटिक म्हटलं जातं. केंद्रक नसलेल्या पेशी तुलनेने कमी जटिल असल्यामुळे अनेकांचं असं म्हणणं आहे, की प्राण्यांमधल्या आणि वनस्पतींमधल्या पेशींची या जिवाणूंच्या पेशींतून उत्क्रांती झाली असावी.
खरंतर, अनेक जण असं शिकवतात की लाखो वर्षांपर्यंत, केंद्रक नसलेल्या काही “साध्या” पेशी इतर पेशींना गिळून टाकायच्या. पण या गिळलेल्या पेशी न जिरल्यामुळे त्यांच्या आत तशाच राहिल्या. या सिद्धान्तानुसार, विचार करण्याची क्षमता नसलेल्या “निसर्गाने” आपोआपच या गिळलेल्या पेशींच्या कार्यांत मोठे बदल घडवून आणले, तसंच, गिळणाऱ्या पेशींचं विभाजन झाल्यावरही या बदललेल्या पेशी त्यांच्या आतच राहतील असं निसर्गाने घडवून आणलं.९ a
इब्री लोकांना ३:४) बायबलमध्ये आणखी एका ठिकाणी असं म्हटलं आहे: “हे यहोवा, तुझी कृत्ये किती नानाप्रकारची आहेत! ती सर्व तू ज्ञानाने केली आहेस; पृथ्वी तुझ्या संपत्तीने भरलेली आहे. हा मोठा आणि अफाट समुद्र आहे, त्यात फिरणारे लहानमोठे जीवजंतू असंख्य आहेत.”—स्तोत्र १०४:२४, २५, पं.र.भा.
बायबलमध्ये काय म्हटलं आहे? बायबलमध्ये म्हटलं आहे, की पृथ्वीवर असलेली जीवसृष्टी एका बुद्धिमान निर्माणकर्त्याने बनवली आहे. बायबलच्या एका वचनात दिलेल्या या साध्या तर्कावर विचार करा: “प्रत्येक घर कोणी ना कोणी बांधलेले असते, पण ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या तो देव आहे.” (पुरावा काय दाखवतो? सूक्ष्मजीवशास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे, केंद्रक नसलेल्या सर्वात साध्या सजीव पेशीच्या आत डोकावून पाहणं आणि तिच्या विस्मयकारक रचनेचं परीक्षण करणं आता शक्य झालं आहे. उत्क्रांतिवादाचं समर्थन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते अगदी सुरुवातीच्या सजीव पेशी, केंद्रक नसलेल्या या पेशींसारख्या दिसत असाव्यात.१०
जर उत्क्रांतीचा सिद्धान्त खरा असेल, तर पहिली “साधी” पेशी आपोआप कशी काय निर्माण झाली याचं पटण्यासारखं स्पष्टीकरण या सिद्धान्ताने दिलं पाहिजे. दुसरीकडे पाहता, जर जीवसृष्टीची निर्मिती करण्यात आली असेल, तर मग सर्वात सूक्ष्म सजीवातही विचारपूर्वक केलेल्या रचनेचा पुरावा दिसून आला पाहिजे. तुम्हाला एका केंद्रक नसलेल्या पेशीच्या आत फेरफटका मारायला आवडेल का? पेशीच्या वेगवेगळ्या भागांचं परीक्षण करताना, अशा प्रकारची पेशी आपोआप निर्माण होणं शक्य आहे का, यावर विचार करा.
पेशीची संरक्षक भिंत
केंद्रक नसलेल्या पेशीतून फेरफटका मारण्यासाठी, तुम्हाला या वाक्याच्या शेवटी असलेल्या पूर्णविरामापेक्षा शेकडो पटींनी लहान आकाराचं व्हावं लागेल. पेशीच्या आत प्रवेश करण्यासाठी तुम्हाला एक मजबूत आणि लवचीक आवरण पार करून आत जावं लागेल. हे आवरण एका कारखान्याभोवती असलेल्या विटांच्या भिंतीसारखं असतं. या आवरणाचे जवळजवळ १०,००० थर एकावर एक ठेवले तर एखाद्या कागदाएवढी त्यांची जाडी होईल. पण पेशींचं आवरण हे विटांच्या भिंतीपेक्षा जास्त उच्च प्रतीचं असतं. ते कसं?
कारखान्याभोवती असलेल्या भिंतीप्रमाणेच पेशीचं आवरण बाहेरच्या वातावरणातल्या धोक्यांपासून पेशीच्या आतल्या भागांचं संरक्षण करतं. या आवरणाला अतिशय सूक्ष्म छिद्रं असतात. त्यामुळे ते ऑक्सिजनसारख्या लहान रेणूंना आतबाहेर जाऊ देण्याद्वारे जणू पेशीला “श्वास” घेऊ देतं. पण इतर जटिल प्रकारच्या आणि घातक ठरू शकणाऱ्या रेणूंना ते पेशीच्या परवानगीशिवाय आत प्रवेश करू देत नाही. तसंच, उपयोगी रेणूंना ते पेशीबाहेर पडू देत नाही. पण पेशीच्या आवरणाला हे सगळं कसं काय जमतं?
पुन्हा एकदा कारखान्याची कल्पना करा. कारखान्याच्या फाटकांतून कोणत्या गोष्टी आत किंवा बाहेर जाऊ शकतात, यावर लक्ष ठेवण्यासाठी सहसा पहारेकरी असतात. त्याच प्रकारे, पेशीच्या आवरणात विशिष्ट प्रकारच्या प्रथिनांचे रेणू असतात. हे रेणू कारखान्याच्या फाटकांसारखे आणि पहारेकऱ्यांसारखे काम करतात.
यांपैकी काही प्रथिनांमध्ये (१) एक छिद्र असतं, ज्यातून फक्त ठरावीक प्रकारचे रेणूच पेशीच्या आत किंवा बाहेर जाऊ शकतात. इतर प्रथिने पेशीच्या आवरणाच्या एक बाजूला उघडलेली (२) तर दुसऱ्या बाजूला बंद असतात. त्यांत सामान उतरवण्याची
एक विशिष्ट जागा असते. (३) तिचा आकार फक्त ठरावीक प्रकारचा पदार्थच बसू शकेल, असा असतो. तो विशिष्ट पदार्थ त्या ठिकाणी येताच प्रथिनाची दुसरी बाजू उघडते आणि पेशीच्या आवरणातून सामान आत सोडलं जातं. (४) आणि ही सगळी गुंतागुंतीची प्रक्रिया अगदी साध्यातल्या साध्या पेशीच्या पृष्ठभागावरही घडत असते.कारखान्याच्या आत
आता कल्पना करा, की कारखान्याच्या “पहारेकऱ्याने” तुम्हाला आत जाण्याची परवानगी दिली आहे आणि तुम्ही पेशीच्या आत आला आहात. केंद्रक नसलेल्या पेशीच्या आतल्या भागात, जीवनसत्त्वं, क्षार आणि इतर पदार्थ असलेला पाण्यासारखा द्रव असतो. या पदार्थांचा कच्च्या मालासारखा उपयोग करून, पेशी स्वतःसाठी आवश्यक उत्पादनं तयार करते. पण ही प्रक्रिया अव्यवस्थितपणे घडत नाही. उलट, अतिशय सुव्यवस्थितपणे चालवल्या जाणाऱ्या कारखान्याप्रमाणेच, पेशी हजारो रासायनिक प्रक्रियांचं अगदी बारकाईने नियोजन करते. यामुळे या प्रक्रिया अगदी ठरावीक क्रमाने आणि ठरावीक वेळापत्रकानुसार घडतात.
पेशीचं एक मुख्य काम म्हणजे प्रथिने तयार करणं. हे ती कसं करते? सगळ्यात आधी तुम्हाला पेशी, अमिनो ॲसिड्स म्हटलेले २० वेगवेगळ्या प्रकारचे मूलभूत घटक तयार करताना दिसेल. हे मूलभूत घटक रायबोसोम्सकडे पाठवले जातात. रायबोसोम्सची तुलना अशा स्वयंचलित यंत्रांशी करता येईल, जी अमिनो ॲसिड्सना एका विशिष्ट क्रमाने जोडून विशिष्ट प्रकारचं प्रथिन तयार करतात. काही कारखान्यांतली सगळी कामं ज्या प्रकारे एका मुख्य कंप्युटर प्रोग्रॅमच्या मदतीने नियंत्रित केली जातात, त्याच प्रकारे पेशीतली बहुतेक कामं नियंत्रित करण्यासाठीही एक “कंप्युटर प्रोग्रॅम” किंवा सांकेतिक लिपी असते जिला DNA म्हटलं जातं. (६) कोणतं प्रथिन तयार करायचं आणि ते कसं तयार करायचं याविषयी DNA कडून रायबोसोमला सविस्तर सूचनांची एक यादी मिळते. (७)
प्रथिन बनवलं जात असताना जे घडतं ते अक्षरशः थक्क करणारं असतं! प्रत्येक प्रथिनाची घडी घालून त्याचा एक विशिष्ट त्रिमितीय (Three-dimensional) आकार बनतो. (८) ते प्रथिन कोणतं खास काम करेल हे या आकारावरूनच ठरतं. b कारखान्यात एखाद्या वाहनाच्या इंजिनचे वेगवेगळे भाग जुळवले जात आहेत अशी कल्पना करा. प्रत्येक भागाची जुळवणी योग्य प्रकारे होणं खूप आवश्यक आहे. तरच इंजिन नीट काम करू शकेल. त्याच प्रकारे, जर प्रथिनाची योग्य प्रकारे रचना झाली नाही आणि हव्या असलेल्या आकारात त्याची घडी घातली गेली नाही, तर ते आपलं काम नीट करू शकणार नाही, उलट ते पेशीला घातकही ठरू शकतं.
प्रथिन ज्या ठिकाणी बनवलं जातं त्या ठिकाणाहून, त्याची गरज आहे तिथे ते कसं काय पोचतं? पेशीत बनवल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रथिनात आधीपासूनच जणू एक “पत्ता लिहिलेली चिठ्ठी” असते. यामुळे प्रथिनाची जिथे गरज असेल तिथे ते बरोबर पोचवलं जातं. पेशीत दर मिनिटाला हजारो प्रथिने बनवली आणि पोचवली जातात. तरीही, प्रत्येक प्रथिन न चुकता योग्य ठिकाणी पोचतं.
या वस्तुस्थिती का महत्त्वाच्या आहेत? सर्वात साध्या सजीवांमधले जटिल रेणू स्वतःहून पुनरुत्पादन करू शकत नाहीत. ते पेशीच्या बाहेर आले, तर त्यांचा नाश होऊन ते निकामी होतात. पेशीच्या आतही, इतर जटिल रेणूंच्या साहाय्याशिवाय ते पुनरुत्पादन करू शकत नाहीत. उदाहरणार्थ, ॲडिनोसीन ट्रायफॉस्फेट (ATP) नावाचा एक खास ऊर्जा रेणू तयार करण्यासाठी एन्झाइम्सची गरज आहे. पण एन्झाइम्स तयार करण्यासाठी एटीपी रेणूमधल्या ऊर्जेची गरज आहे. त्याच प्रकारे, एन्झाइम्स बनवण्यासाठी DNA ची (या रेणूविषयी तिसऱ्या भागात चर्चा करण्यात आली आहे) गरज आहे, तर DNA बनवण्यासाठी एन्झाइम्सची गरज असते. तसंच इतर प्रथिनांची निर्मिती फक्त पेशीतच होऊ शकते, पण पेशीसुद्धा फक्त प्रथिनांच्या साहाय्यानेच बनवणं शक्य आहे. c
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ राडू पोपा हे बायबलमधल्या निर्मितीच्या अहवालाशी सहमत नाहीत. तरीसुद्धा, २००४ मध्ये त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला: “प्रयोगशाळेत काळजीपूर्वक नियंत्रित केलेल्या वातावरणात जर आपले प्रयोग यशस्वी ठरले नाहीत, तर मग निसर्गाने आपोआप सजीव सृष्टी निर्माण करणं कसं शक्य आहे?”१३ ते असंही म्हणाले: “सजीव पेशीचं कार्य चालू राहण्याकरता ज्या यंत्रणा आवश्यक आहेत, त्या इतक्या कमालीच्या जटिल आहेत, की त्या एकाच वेळी आपोआप अस्तित्वात येणं अगदीच अशक्य वाटतं.”१४
तुम्हाला काय वाटतं? उत्क्रांतीचा सिद्धान्त हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो, की पृथ्वीवरच्या सजीव सृष्टीची सुरुवात होण्यात देवाचा हात नव्हता. पण, शास्त्रज्ञांना जीवसृष्टीविषयी जितकी जास्त माहिती मिळत आहे तितकंच हे अधिक स्पष्ट होत आहे, की ती आपोआप अस्तित्वात येऊ शकत नाही. यावर स्पष्टीकरण देण्याचं टाळण्यासाठी उत्क्रांतीचं समर्थन करणारे काही शास्त्रज्ञ उत्क्रांतीचा सिद्धान्त आणि जीवसृष्टीची सुरुवात हे दोन वेगवेगळे विषय आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण असं म्हणणं योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का?
उत्क्रांतीचा सिद्धान्त या समजुतीवर आधारित आहे, की अगदी सुरुवातीला एकापाठोपाठ एक आपोआप घडलेल्या काही घटनांमुळे जीवसृष्टी अस्तित्वात आली. त्यानंतर हा सिद्धान्त असा दावा करतो, की आणखी काही घटना घडत गेल्या आणि त्यांतूनच आज पृथ्वीवर दिसणारी विस्मयकारक आणि विविधता असलेली जीवसृष्टी निर्माण झाली. पण, एखाद्या सिद्धान्ताचा पायाच नसेल तर त्या समजुतीवर आधारित असलेल्या इतर सिद्धान्तांचं काय होईल? पाया न घालता बांधलेली कोणतीही उंच इमारत साहजिकच कोलमडून पडेल. त्याच प्रकारे जो उत्क्रांतीचा सिद्धान्त जीवसृष्टीची सुरुवात कशी झाली, याचं स्पष्टीकरण देऊ शकत नाही तोही ढासळून पडेल.
एका “साध्या” पेशीची रचना आणि कार्य यांचं थोडक्यात परीक्षण केल्यावर तुम्हाला काय दिसून आलं? आपोआप घडलेल्या घटनांचा पुरावा, की विचारपूर्वक केलेल्या उत्कृष्ट रचनेचा पुरावा? तुम्हाला अजूनही शंका असेल तर आता सर्व पेशींच्या कार्यांचं नियंत्रण करणाऱ्या “मुख्य कंप्युटर प्रोग्रॅमचं” जवळून निरीक्षण करून पाहा.
a असं घडणं शक्य आहे हे आजपर्यंत कोणत्याही प्रयोगातून सिद्ध झालेलं नाही.
b पेशी जी निरनिराळ्या प्रकारची प्रथिने तयार करते त्यांपैकी एक म्हणजे एन्झाइम्स. विशिष्ट रासायनिक प्रक्रिया जास्त वेगाने घडवून आणण्यासाठी प्रत्येक एन्झाइमची एका खास प्रकारे घडी घातली जाते. पेशीतली निरनिराळी कार्यं योग्य प्रकारे घडवून आणण्यासाठी शेकडो प्रकारची एन्झाइम्स एकमेकांसोबत मिळून कार्य करतात.