प्रश्न ४
सर्व सजीव सृष्टी एकाच पूर्वजापासून आली का?
डार्विनच्या मते सर्व सजीव सृष्टी एकाच पूर्वजापासून अस्तित्वात आली आणि विकसित झाली. त्याच्या कल्पनेनुसार पृथ्वीवरच्या सजीवांच्या इतिहासाची एका मोठ्या वृक्षाशी तुलना करता येईल. नंतर इतर शास्त्रज्ञांनीही असं मत पुढे आणलं, की हा “वंशवृक्ष” सर्वात आधी अगदी साध्या पेशींच्या एका बुंध्यापासून विकसित व्हायला सुरुवात झाली. त्या बुंध्यापासून फांद्या म्हणजेच नवीन जाती उत्पन्न झाल्या. त्यानंतर वनस्पती आणि प्राण्यांच्या निरनिराळ्या कुळांच्या रूपात या फांद्यांना आणखी फाटे फुटले. या फाट्यांना डहाळ्या आल्या, म्हणजेच आज पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या कुळांतल्या सर्व जाती. जीवसृष्टीचा विकास खरोखरच अशा रीतीने झाला का?
बरेच शास्त्रज्ञ काय दावा करतात? बरेच शास्त्रज्ञ असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, की जीवाश्मांचा क्रम (Fossil Record), सर्व जीवसृष्टीचा एकच पूर्वज असल्याच्या सिद्धान्ताचं समर्थन करतो. शिवाय, सर्व सजीवांचं “सॉफ्टवेअर” म्हणजेच DNA जवळजवळ एकसारखंच असल्यामुळे, सर्व सजीव एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत असाही ते दावा करतात.
बायबलमध्ये काय म्हटलं आहे? वनस्पती, समुद्रातले जीव, जमिनीवर चालणारे प्राणी आणि पक्षी यांतले “प्रत्येक जातीचे सर्व जीव” देवाने निर्माण केले असं उत्पत्तिच्या अहवालात म्हटलं आहे. (उत्पत्ति १:१२, २०-२५) या वर्णनानुसार एका ‘जातीत’ निरनिराळ्या प्रकारचे जीव असू शकतात, पण प्रत्येक जातीला दुसऱ्या जातीपासून वेगळं करणाऱ्या काही निश्चित सीमारेषा आहेत. तसंच, बायबलमधल्या निर्मितीच्या वृत्तान्ताच्या आधारावर, जीवाश्मांच्या क्रमात नवीन प्रकारचे जीव पूर्णपणे विकसित झालेल्या स्थितीत अचानक दिसून येण्याची आपण अपेक्षा करू शकतो.
पुरावा काय दाखवतो? पुरावा बायबलमधल्या अहवालाला दुजोरा देतो का, की डार्विनचं म्हणणं खरं असल्याचं सिद्ध करतो? मागच्या १५० वर्षांत सापडलेल्या पुराव्यांवरून काय दिसून येतं?
डार्विनच्या वंशवृक्षाला मूठमाती
अलीकडच्या वर्षांत, शास्त्रज्ञांना वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक एक-पेशीय जीवांच्या तसंच अनेक वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या जनुकीय माहितीचा तुलनात्मक अभ्यास करणं शक्य झालं आहे. अशी तुलना केल्यामुळे डार्विनने सुचवलेल्या ‘वंशवृक्षाला’ कशा प्रकारे फांद्या फुटल्या हे स्पष्ट होईल असं त्यांना वाटत होतं. पण प्रत्यक्षात असं घडलं नाही.
संशोधनातून कोणती माहिती पुढे आली आहे? १९९९ मध्ये जीवशास्त्रज्ञ मॅल्कम एस. गॉर्डन यांनी लिहिलं: “जीवसृष्टीचे अनेक उगम असल्याचं दिसून येतं. जीवसृष्टीच्या वंशवृक्षाचं एकच मूळ असल्याचं दिसत नाही.” डार्विनने म्हटल्याप्रमाणे जीवसृष्टीच्या सर्व प्रमुख शाखा एकाच मध्यवर्ती बुंध्यापासून उत्पन्न झाल्या आहेत हे सिद्ध करणारा पुरावा उपलब्ध आहे का? गॉर्डन पुढे म्हणतात: “एकाच पूर्वजापासून सर्व जीव आले आहेत या सिद्धान्ताची पारंपरिक व्याख्या सध्याच्या वर्गीकरणानुसार ओळखल्या जाणाऱ्या सृष्टींना लागू होत नाही. ही व्याख्या सर्वच नाही तरी बहुतेक २९ a
संघांना, आणि संघांमध्ये समाविष्ट असलेल्या बऱ्याच वर्गांनाही लागू होत नाही.”अलीकडच्या काळातलं संशोधनही एकाच पूर्वजापासून सर्व जीव उत्पन्न झाले या डार्विनच्या सिद्धान्ताचं खंडन करतं. उदाहरणार्थ, २००९ मध्ये न्यू सायंटिस्ट या मासिकात उत्क्रांतीवादी शास्त्रज्ञ एरिक बॉतेस्त असं म्हणतात: “वंशवृक्षाची संकल्पना खरी आहे याचा कोणताही पुरावा आमच्याजवळ नाही.”३० त्याच लेखात उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ मायकल रोस यांनी असं म्हटलं: “वंशवृक्षाच्या संकल्पनेला आता आदरपूर्वक मूठमाती दिली जात आहे, याची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. पण, जी सहजासहजी स्वीकारली जात नाही ती गोष्ट म्हणजे जीवशास्त्राबद्दलचा आपला संपूर्ण दृष्टिकोनच बदलण्याची खरंतर आज गरज आहे.”३१ b
जीवाश्मांचा क्रम काय दाखवतो?
सर्व सजीव एकाच पूर्वजापासून उत्पन्न झाले या संकल्पनेचं समर्थन करण्यासाठी बरेच शास्त्रज्ञ जीवाश्मांच्या क्रमाचा आधार घेतात. ते असा तर्क करतात, की माशांपासून उभयचर (जमीन आणि पाणी दोन्हींवर राहणारे जीव) आणि सरिसृपांपासून (सरपटणारे जीव) सस्तन प्राणी उत्पन्न झाले ही धारणा खरी आहे, हे मानण्यासाठी जीवाश्मांच्या क्रमात पुरावा सापडतो. पण खरं पाहता जीवाश्मांचा क्रम काय दाखवतो?
जीवाश्मशास्त्रज्ञ डेव्हिड एम. राउप म्हणतात: “सजीवांचा क्रमवार विकास झाला हे दाखवण्याऐवजी डार्विनच्या काळातल्या आणि आजच्या भूगर्भशास्त्रज्ञांनाही अतिशय विसंगत आणि तुटक असा क्रम दिसून येतो; दुसऱ्या शब्दांत, जीवाश्मांच्या क्रमात सजीवांच्या जाती अचानक दिसून येतात आणि जितका काळ त्या अस्तित्वात असतात त्या काळादरम्यान त्यांच्यात फार कमी किंवा काहीच बदल होत नाही, आणि मग त्या तितक्याच अचानकपणे क्रमातून नाहीशा होतात.”३२
खरं पाहिलं तर, बहुतेक जीवाश्मं असं दाखवतात, की वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांत बऱ्याच काळापर्यंत फारसा बदल झाला नाही. एका प्रकारचे प्राणी उत्क्रांत होऊन दुसऱ्या प्रकारचे प्राणी तयार होत असल्याचा पुरावा मिळत नाही. वेगळ्या प्रकारचे आणि नवीन गुणधर्म असलेले प्राणी अचानकच दिसून येतात. उदाहरणार्थ, प्रतिध्वनी-स्थान-निर्धारणाची यंत्रणा असलेली वटवाघळं ही जीवाश्मांच्या क्रमात अचानक दिसून येतात. आधी दिसून येणाऱ्या कोणत्याही पूर्वजाशी त्यांचा संबंध असल्याचं दिसून येत नाही.
खरं पाहता, प्राणी सृष्टीतल्या सर्व महत्त्वाच्या वर्गांतल्या निम्म्यापेक्षा जास्त प्राण्यांचा फार कमी काळातच उदय झाल्याचं दिसून येतं. जीवाश्मांच्या क्रमात अनेक नवीन आणि वेगळ्या प्रकारच्या जीवांचा फार कमी काळात इतक्या जलद गतीने उदय झाला, की त्यामुळे जीवाश्मशास्त्रज्ञांनी या काळाला “कॅम्ब्रियन उत्स्फोट” असं नाव दिलं आहे. पृथ्वीच्या इतिहासात हा कॅम्ब्रियन कालखंड कुठे येतो?
हे समजून घेण्यासाठी, संशोधकांनी बांधलेले अंदाज अचूक आहेत असं समजू या. त्यानुसार, फुटबॉल मैदानाच्या लांबीची एक रेषा, पृथ्वीच्या इतिहासाला सूचित करते अशी कल्पना करा. (१) या फुटबॉल मैदानाचे आठ भाग केले, तर त्यांपैकी सात भागांचं अंतर चालून गेल्यावर, जीवाश्मशास्त्रज्ञ ज्याला कॅम्ब्रियन कालखंड म्हणतात तिथे तुम्ही पोचाल. (२) त्या कालखंडात प्राण्यांच्या महत्त्वाच्या वर्गांचा जीवाश्म क्रमात फार कमी काळात उदय झालेला दिसतो. किती जलद गतीने त्यांचा उदय झाला? फुटबॉल मैदानावरून चालत असताना, एका पावलापेक्षाही कमी अंतरात वेगवेगळ्या प्रकारच्या त्या सर्व प्राण्यांचा जीवाश्मांच्या क्रमात अचानक उदय झालेला दिसून येतो!
निरनिराळ्या प्रकारच्या जिवांचा असा अचानक उदय झालेला पाहून उत्क्रांतीचं समर्थन करणारे काही संशोधक डार्विनच्या पारंपरिक सिद्धान्ताविषयी शंका व्यक्त करू लागले आहेत. उदाहरणार्थ, उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ स्टुअर्ट न्यूमन यांनी २००८ साली दिलेल्या एका मुलाखतीत, नवीन जीवप्रकारांचा अचानक उदय होण्याचं स्पष्टीकरण देऊ शकेल असा नवा उत्क्रांतीचा ३३
सिद्धान्त मांडला जाण्याची गरज असल्याचं सांगितलं. ते म्हणाले: “उत्क्रांतीच्या प्रक्रियेत झालेले सर्व बदल समजावून सांगण्यासाठी आजपर्यंत डार्विनने सुचवलेल्या पद्धतीचा वापर केला जात होता. पण यापुढे, इतर सिद्धान्तांसारखाच हाही फक्त एक सिद्धान्त आहे असं समजलं जाईल. प्राण्यांच्या महत्त्वाच्या प्रकारांची उत्क्रांती कशा प्रकारे झाली हे समजावून सांगणाऱ्या पद्धतींपैकी सर्वात महत्त्वाच्या पद्धतीचा दर्जा कदाचित यापुढे या सिद्धान्ताला दिला जाणार नाही.”‘पुराव्यातले’ दोष
पण, मासे उभयचरांत आणि सरिसृप सस्तन प्राण्यांत बदलत असल्याचं दाखवण्यासाठी ज्या जीवाश्मांचा सहसा उपयोग केला जातो, त्यांविषयी काय म्हणता येईल? हे जीवाश्म उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा भक्कम पुरावा देतात का? काळजीपूर्वक परीक्षण केल्यावर, त्यात अनेक दोष असल्याचं लक्षात येतं.
पहिली गोष्ट म्हणजे, सरिसृपांपासून सस्तन प्राणी कसे बनले हे दाखवण्यासाठी ज्या प्राण्यांची उदाहरणं दिली जातात त्यांच्या शरीराचा आकार पाठ्यपुस्तकांत बऱ्याच प्रमाणात फेरबदल करून दाखवला जातो. या प्राण्यांच्या शृंखलेतले सर्व प्राणी सारख्याच आकाराचे असण्याऐवजी, त्यांपैकी काही अतिशय मोठे तर काही लहान असल्याचं दिसून येतं.
याशिवाय, एक दुसरा जास्त गंभीर स्वरूपाचा दोषही आहे. तो म्हणजे, या सर्व प्राण्यांचा एकमेकांशी काही ना काही संबंध आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा पुरावा उपलब्ध नाही. शृंखलेतल्या प्राण्यांमध्ये बऱ्याचदा संशोधकांच्या अंदाजांनुसार लाखो वर्षांचं अंतर दिसून येतं. यांपैकी बऱ्याच जीवाश्मांतल्या मधल्या काळाबाबत प्राणिशास्त्रज्ञ हेन्री जी म्हणतात: “दोन जीवाश्मांच्या मधला काळ इतका मोठा आहे, की अमुक प्राणी अमुक प्राण्याचा पूर्वज किंवा वंशज असावा असं खात्रीने म्हणता येत नाही.”३४ c
मासे आणि उभयचर यांच्या जीवाश्मांबाबत जीवशास्त्रज्ञ मॅल्कम एस. गॉर्डन म्हणतात, की आजवर सापडलेल्या जीवाश्मांमधून आपल्याला “फार कमी उदाहरणं सापडतात. खरंतर त्या काळात या गटांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे अनेक प्राणी होते.” ते पुढे म्हणतात: “त्या विशिष्ट प्राण्यांचा नंतरच्या प्राण्यांच्या उत्क्रांतीवर कितपत प्रभाव ३५ d
पडला, इतकंच काय तर त्यांचा काही प्रभाव पडला किंवा नाही; तसंच त्यांचा एकमेकांशी काय संबंध असावा, हे जाणून घेण्याचा काहीच मार्ग नाही.”“चित्रपट” खरोखर काय दाखवतो?
नॅशनल जियोग्राफिक या नियतकालिकात २००४ मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात जीवाश्मांच्या क्रमाची तुलना “एका अशा चित्रपटाशी [करण्यात आली] ज्यातल्या दर १,००० फ्रेम्सपैकी (चित्रांपैकी) ९९९ फ्रेम्स चित्रपटाचं संकलन करत असताना हरवल्या आहेत.”३६ या उदाहरणाचा काय अर्थ होतो यावर थोडा विचार करू या.
अशी कल्पना करा, की तुम्हाला एका चित्रपटाच्या १०० फ्रेम्स सापडल्या आहेत. मुळात हा चित्रपट १,००,००० फ्रेम्सनी बनलेला होता. तुम्हाला सापडलेल्या १०० फ्रेम्सच्या आधारावर तुम्ही चित्रपटाची कथा कशी काय ठरवाल? कदाचित, चित्रपटाच्या कथेविषयी तुमच्या मनात ठरावीक कल्पना असेल. पण, १०० फ्रेम्सपैकी फक्त ५ फ्रेम्स विशिष्ट क्रमाने मांडल्या, तरच तुम्हाला वाटते तशी कथा तयार होत असेल आणि उरलेल्या ९५ फ्रेम्स अगदीच वेगळी कथा सांगत असतील तर काय? असं असतानाही, त्या ५ फ्रेम्सच्या आधारावर चित्रपटाच्या कथेबद्दल सुरुवातीला तुमच्या मनात असलेली कल्पनाच बरोबर होती असा हट्ट धरणं योग्य ठरेल का? तुम्ही सुचवलेली कथा बरोबर आहे असं दाखवण्यासाठी तुम्ही मुद्दामच त्या ५ फ्रेम्स विशिष्ट क्रमाने मांडल्या आहेत, असं तर नाही ना? त्यापेक्षा, इतर ९५ फ्रेम्स लक्षात घेऊनच कोणतंही मत बनवणं जास्त योग्य ठरणार नाही का?
जीवाश्मांच्या क्रमाविषयी उत्क्रांतीवादी शास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनाशी चित्रपटाच्या या उदाहरणाचा काय संबंध आहे? अनेक वर्षं संशोधक हे कबूल करायला तयार नव्हते, की उपलब्ध जीवाश्मांतले बहुतेक जीवाश्म, म्हणजेच, चित्रपटाच्या ९५ फ्रेम्स, काळाच्या ओघात प्राण्यांच्या जातींमध्ये फार कमी बदल झाल्याचं दाखवतात. मग, इतक्या महत्त्वाच्या पुराव्याबद्दल शास्त्रज्ञ इतका काळ शांत का राहिले? लेखक रिचर्ड मॉरिस म्हणतात: “प्राण्यांचा क्रमवार विकास होतो ही सर्वमान्य कल्पना जीवाश्मशास्त्रज्ञांनी स्वीकारली होती. ३७
सापडलेला पुरावा ही कल्पना खरी नसल्याचं दाखवत असूनही त्यांनी वर्षानुवर्षं ती धरून ठेवली होती. त्यांना सापडलेल्या जीवाश्मांच्या पुराव्याचा ते आजवर, उत्क्रांतीविषयीच्या सर्वमान्य कल्पनांच्या आधारावर अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते.”“उपलब्ध जीवाश्मांचा आधार घेऊन, ते सगळ्या जीवसृष्टीचा इतिहास दाखवतात हा दावा एक वैज्ञानिक कल्पना नाही. त्याची सत्यता पडताळून पाहता येत नाही. हा दावा लहान मुलांना झोपायच्या आधी सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींसारखाच—मनोरंजक, कदाचित माहितीपूर्णही असेल पण तो विज्ञानाला धरून नाही.”—लेखक हेन्री जी यांनी लिहिलेलं इन सर्च ऑफ डीप टाइम—बियॉन्ड द फॉसिल रेकॉर्ड टू अ न्यू हिस्ट्री ऑफ लाईफ, पान क्रमांक ११६-११७
आजच्या काळातल्या उत्क्रांतीवादी शास्त्रज्ञांविषयी काय? पूर्वीप्रमाणेच आजही, ते बहुतेक जीवाश्म आणि जनुकीय पुरावा यांचा भक्कम आधार असल्यामुळे नाही, तर उत्क्रांतीविषयीच्या सध्याच्या सर्वमान्य कल्पनांशी जुळवून घेण्यासाठी जीवाश्मांना विशिष्ट क्रमाने मांडतात, असं तर नाही ना? e
तुम्हाला काय वाटतं? पुरावा कोणत्या निष्कर्षाचं समर्थन करतो? आपण आतापर्यंत लक्षात घेतलेल्या वस्तुस्थितींवर विचार करा.
-
पृथ्वीवर अस्तित्वात आलेला पहिला सजीव “साधा” नव्हता.
-
पेशी तर दूरच, पण तिचे घटकसुद्धा आपोआप अस्तित्वात येणं ही अशक्य गोष्ट आहे.
-
पेशीच्या कार्यांचं नियंत्रण करणारा “मुख्य कंप्युटर प्रोग्राम” म्हणजेच DNA कमालीचा जटिल आहे आणि त्याच्या रचनेत इतकी बुद्धिमत्ता दिसून येते, की मानवाने निर्माण केलेल्या कोणत्याही प्रोग्रॅमपेक्षा किंवा माहिती साठवण्याच्या यंत्रणेपेक्षा तो कित्येक पटींनी वरचढ आहे.
-
जनुकीय संशोधन दाखवतं, की एकाच पूर्वजापासून सजीवांचा उगम झाला नाही. शिवाय, प्राण्यांतल्या महत्त्वाच्या वर्गांचा जीवाश्मांच्या क्रमात अगदी अचानकपणे उदय झालेला दिसतो.
या सर्व वस्तुस्थिती लक्षात घेतल्यावर, जीवनाची सुरुवात कशी झाली याविषयी बायबलमध्ये जे सांगितलं आहे, त्याला पुरावा दुजोरा देतो असा निष्कर्ष काढणं तुम्हाला योग्य वाटत नाही का? पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, की विज्ञान हे बायबलमध्ये निर्मितीबद्दल जे सांगितलं आहे त्याच्या विरोधात आहे. हे खरं आहे का? मुळात बायबल काय सांगतं?
a संघ हा जीवशास्त्रीय शब्द, समान शारीरिक गुणधर्म असलेल्या प्राण्यांच्या मोठ्या गटाला सूचित करतो. शास्त्रज्ञ सर्व जीवांचं वर्गीकरण सात टप्प्यांच्या एका पद्धतीनुसार करतात. प्रत्येक टप्पा हा आधीच्या टप्प्याच्या तुलनेत जास्त विशिष्ट असतो. पहिला टप्पा म्हणजे सृष्टी (Kingdom), जो सर्वात विस्तृत विभाग आहे. त्यानंतरचे विभाग म्हणजे संघ (Phylum), वर्ग (Class), गण (Order), कूळ (Family), प्रजाती (Genus) आणि जाती (Species). उदाहरणार्थ, घोड्याचं वर्गीकरण पुढील प्रकारे करण्यात आलं आहे: सृष्टी, ॲनिमॅलिया; संघ, कॉर्डेटा; वर्ग, मॅमेलिया; गण, पेरिस्सोडॅक्टीला; कूळ, एक्विडी; प्रजाती, एकूस; जाती, कॅबॅलस.
b न्यू सायंटिस्ट मासिकातल्या लेखाने किंवा बॉतेस्त किंवा रोस यांनी उत्क्रांतीचा सिद्धान्त चुकीचा आहे असं सुचवण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यांचा मुद्दा एवढाच आहे, की उपलब्ध पुरावा या सिद्धान्ताचा मुख्य आधार असणाऱ्या डार्विनच्या वंशवृक्षाच्या संकल्पनेचं समर्थन करत नाही. असे शास्त्रज्ञ उत्क्रांतीशीच संबंधित इतर स्पष्टीकरणं शोधण्याचा प्रयत्न करतात.
c उत्क्रांतीचा सिद्धान्त चुकीचा आहे असं हेन्री जी यांचं म्हणणं नाही. त्यांचं म्हणणं फक्त हे आहे, की जीवाश्मांच्या क्रमाच्या आधारावर आपल्याला सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत.
d मॅल्कम एस. गॉर्डन उत्क्रांतीच्या शिकवणीचे समर्थक आहेत.
e उदाहरणार्थ, “ मानवाच्या उत्क्रांतीविषयी काय?” ही चौकट पाहा.
f सूचना: या चौकटीत ज्यांचे शब्द देण्यात आले आहेत त्यांपैकी कोणताही संशोधक बायबलमधली निर्मितीची शिकवण मानत नाही. ते सर्व जीवसृष्टीची उत्क्रांती झाली असं मानतात.
g उत्क्रांतीवादी संशोधक मानवी कुटुंबात आणि मानवांसारख्या दिसणाऱ्या इतिहासपूर्वकालीन जातींच्या प्राण्यांत ज्यांचा समावेश करतात, त्यांच्या संदर्भात “हॉमिनिड” हा शब्द वापरला आहे.