व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रस्तावना—उपयुक्‍त उत्तरे

प्रस्तावना—उपयुक्‍त उत्तरे

प्रस्तावना

उपयुक्‍त उत्तरे

‘माझे पालक मला समजून का घेत नाहीत?’ ‘मी अंमली पदार्थ आणि मद्य घेऊन पाहावे का?’ ‘विवाहपूर्व लैंगिक संबंधांबद्दल काय?’ ‘खरे प्रेम असल्याचे मी कसे ओळखावे?’ ‘भवितव्यात माझ्याकरता काय राखून आहे?’

हे प्रश्‍न विचारणारे तुम्ही पहिले युवक नाहीत—किंवा शेवटलेही नाहीत. परंतु, तरुण लोक जेव्हा असे मूलभूत प्रश्‍न विचारतात तेव्हा त्यांना याबाबतीत पुष्कळशी परस्परविरोधी उत्तरे मिळतात. उदाहरणार्थ, मद्यार्कयुक्‍त पेये घेणे. कदाचित पालक ती घेऊ नयेत असे सांगतील—पण स्वतः मात्र घेत असतील. पत्रिकांमधून आणि टीव्ही कार्यक्रमांमधून त्याची प्रशंसा केली जाते. सवंगडी तुम्हाला ती घेण्यासाठी प्रोत्साहन देत असतील. म्हणूनच, आपण करावे तरी काय या विचाराने अनेक युवक बुचकळ्यात पडले आहेत.

आजच्या युवकांच्या प्रश्‍नांची प्रामाणिक, उपयुक्‍त उत्तरे देण्याची गरज ओळखून सावध राहा!  (इंग्रजी) नियतकालिकाने a जानेवारी १९८२ च्या अंकात “तरुण लोक विचारतात . . . ” हे नवीन सदर सुरू केले. या मालिकेसाठी लगेचच वाचकांकडून अनुकूल प्रतिसाद मिळाला. एका प्रशंसक वाचकाने लिहिले, “या मालिकेवरून तुम्हाला आजच्या तरुणांच्या स्थितीची किती चिंता आहे ते सिद्ध होते.” “हे लेख कधीच संपू नयेत अशी मी आशा आणि प्रार्थना करते,” असे दुसऱ्‍या वाचकाने लिहिले.

आणखी एका तरुण वाचकाने असे लिहिले: ‘मी १४ वर्षांचा आहे आणि मोठं होणं इतकं कठीण असेल असं मला वाटलं नव्हतं. आज तरुणांवर खूप दबाव आहेत. म्हणून या लेखांबद्दल मी आपले फार आभार मानतो. हे लेख प्रकाशित केल्याबद्दल दररोज रात्री मी यहोवाला आभार मानतो.’ तथापि, हे लेख फक्‍त लहान मुलांकरता नव्हते किंवा आमच्या वाचकांना ‘टोकून बोलण्याचाही’ प्रयत्न यात करण्यात आला नव्हता. यास्तव, “तरुण लोक विचारतात . . . ” यास प्रौढांचाही एक प्रशंसक वाचकवर्ग लाभला. “मी ४० वर्षांचा आहे,” असे एका पालकाने लिहिले. “हे लेख म्हणजे देवाने आम्हा पालकांना दिलेलं एकप्रकारचं दानच आहे.” यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमधील या तरुणांना समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी व्यवहार करताना ख्रिस्ती वडिलांना विशेषतः हे लेख उपयुक्‍त वाटले आहेत.

“तरुण लोक विचारतात . . . ” यास इतका उत्साही प्रतिसाद का मिळाला? कारण त्यातली उत्तरे खरोखर उपयुक्‍त  ठरतात! प्रत्येक लेख खोलवर संशोधन केल्यावर लिहिण्यात आला आहे. शिवाय, युवक खरोखर कसा विचार करतात आणि त्यांना कसे वाटते हे जाणण्यासाठी, सावध राहा!  बातमीदार जगभरातील शेकडो तरुणांशी बोलले आहेत! त्यांच्या प्रांजळ अभिव्यक्‍तींमुळे हे लेख वास्तविक आणि व्यावहारिक होण्यासाठी पुष्कळ मदत मिळाली आहे.

तथापि, “तरुण लोक विचारतात . . . ” याच्या यशाचे खरे कारण म्हणजे, त्यातली उत्तरे ही कोणा सिद्धान्तावर किंवा व्यक्‍तिगत अभिप्रायावर नव्हे तर देव वचन म्हणजेच बायबलमधील अनंत सत्यांवर आधारित आहेत. ‘काय बायबल?’  असे तुम्ही विचाराल. होय, बायबलमध्ये तरुणांकरता पुष्कळ गोष्टी आहेत. (पाहा नीतिसूत्रे, अध्याय १-७; इफिसकर ६:१-३.) ते आपल्या निर्माणकर्त्याने प्रेरित केले आहे, ज्याला ‘तरुणपणाच्या वासनांविषयी’ चांगलीच माहिती आहे. (२ तीमथ्य २:२०-२२; ३:१६) बायबल काळापासून आजपर्यंत मानव समाज जरी बदलला असला, तरी तरुणपणाच्या वासनांमध्ये फारसा बदल झालेला नाही. म्हणून बायबल अगदीच अद्ययावत आहे. परंतु, आम्ही बायबलचा सल्ला अशाप्रकारे सादर करण्याचा प्रयत्न केला आहे की ज्यामुळे युवकांना भाषण दिल्यासारखे नव्हे, तर त्यांच्यासोबत कारणमीमांसा केल्यासारखे वाटेल. तसेच, यातील साहित्य यहोवाच्या साक्षीदारांच्या युवकांना विशेषतः लक्षात ठेवून लिहिले असले, तरी बायबलमधील व्यावहारिक सुज्ञतेविषयी आदर असणारी प्रत्येक व्यक्‍ती त्यास वाचून त्याचा आनंद उपभोगू शकते.

अनेक वाचकांच्या विनंत्यांमुळे, आम्ही “तरुण लोक विचारतात . . . ” यांच्या पुष्कळ लेखांचा संग्रह करून तो पुस्तकाच्या रूपात तयार केला आहे. येथे असलेल्या ३९ अध्यायांमध्ये, १९८२ आणि १९८९ दरम्यान सावध राहा!  नियतकालिकांमध्ये आलेल्या सुमारे २०० लेखांपैकी १०० पेक्षा अधिक लेखांमधील माहिती संक्षिप्त रूपात देण्यात आली आहे. यात काही नवीन माहिती देखील देण्यात आली आहे. शिवाय, वेगवेगळ्या देशातल्या आणि वंशाच्या युवकांची पुष्कळ छायाचित्रे देखील यात आहेत.

विषयसूची न्याहाळा आणि तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल चिंता वाटते त्या प्रश्‍नांकडे थेट वळा. परंतु, नंतर वेळ काढून संपूर्ण पुस्तक तुम्ही वाचून काढावे, त्यातली शास्त्रवचने आपापल्या बायबलमध्ये काढून पाहावीत असे आम्हाला सुचवावेसे वाटते.

काही कुटुंबांमध्ये, पालक व मुलांमध्ये मुळीच दळणवळण नसते किंवा हवे तितके ते मोकळे नसते. म्हणून आम्ही प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आढळणारे चर्चेसाठी प्रश्‍न हे सदर जोडले आहे. हे प्रश्‍न प्रत्येक परिच्छेदाचे परीक्षण करण्यासाठी बनवलेले नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या मुलांची परीक्षा घेण्याचे ते माध्यम नाहीत. तर युवकांमध्ये आणि पालकांमध्ये चर्चा सुरू करण्यासाठी ते बनवलेले आहेत. पुष्कळसे प्रश्‍न, स्वतःचा दृष्टिकोन सांगण्यासाठी किंवा चर्चा करत असलेले साहित्य स्वतःच्या परिस्थितीला लागू करण्यासाठी वाव देतात.

म्हणून अनेक कुटुंबांना कौटुंबिक अभ्यासाकरता या पुस्तकाचा उपयोग करायला आवडेल. कुटुंबातील सदस्य आळीपाळीने परिच्छेद वाचून, दिलेली शास्त्रवचने वाचून असे करू शकतात. अधूनमधून, विशिष्ट उपशिर्षके पूर्ण केल्यावर किंवा संपूर्ण अध्याय पूर्ण केल्यावर चर्चेसाठी प्रश्‍न विचारले जाऊ शकतात. सर्वांना निखालसपणे आणि मनमोकळेपणाने आपले विचार व्यक्‍त करण्यास उत्तेजन दिले जाऊ शकते. तरुणांना आपापसांत या पुस्तकाची चर्चा करायला आवडेल.

युवकांकरता सुद्धा हे ‘कठीण दिवस’ आहेत. (२ तीमथ्य ३:१) परंतु, देव वचनाच्या ज्ञानाने तुम्ही जीवनातला हा कठीण समय यशस्वीरित्या पार करू शकता. (स्तोत्र ११९:९) यास्तव, तुम्हाला गोंधळून टाकणाऱ्‍या प्रश्‍नांवर, व्यावहारिक, बायबल-आधारित उत्तरांचा हा संग्रह तुमच्यासमोर प्रस्तुत करण्यास आम्हाला आनंद होत आहे.

प्रकाशक

[तळटीप]

a प्रहरीदुर्ग प्रकाशन सोसायटीद्वारे महिन्यातून दोनदा प्रकाशित होते