व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मला देवासोबत घनिष्ट नाते कसे निर्माण करता येईल?

मला देवासोबत घनिष्ट नाते कसे निर्माण करता येईल?

अध्याय ३९

मला देवासोबत घनिष्ट नाते कसे निर्माण करता येईल?

घनिष्ट नाते—आणि तेही देवाच्यासोबत? पुष्कळ लोकांकरता, देव म्हणजे अलग, अगम्य, निर्गुण-निराकार ‘आदि कारण’ आहे असे वाटते. म्हणून, त्याच्यासोबत घनिष्ट नाते निर्माण करण्याची कल्पना तुमच्याकरता अस्वस्थ करणारी एवढेच नव्हे तर भयावहही वाटत असावी.

नाहीतर तुमचा अनुभव लिंडा या तरुणीसारखा असू शकतो. लिंडाचे संगोपन तिच्या ख्रिस्ती पालकांनी केले आणि ती आठवून सांगते: “माझ्या सबंध [किशोरवयीन] आयुष्यात, मी क्वचितच एखादी ख्रिस्ती सभा चुकवली, आणि कधीच एक संपूर्ण महिना प्रचार न करता घालवला नाही, तरीही यहोवासोबत निकटचं व्यक्‍तिगत नातं मी खरं म्हणजे कधीच विकसित करू शकले नाही.”

तथापि, देवाच्या समीप येण्यावरच तुमचे भवितव्य निर्भर करते. येशू ख्रिस्ताने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुझे . . . त्यांनी ज्ञान घ्यावे.” (योहान १७:३, NW) हे ‘ज्ञान घेणे’ म्हणजे फक्‍त वास्तविकता शिकणे किंवा तोंडपाठ करण्याची क्षमता नसून त्यापेक्षाही काही अधिक आहे—हे तर एखादा नास्तिकही करू शकतो. त्यामध्ये देवासोबत नाते वाढवणे, त्याचा मित्र होणे समाविष्ट आहे. (पडताळा याकोब २:२३.) देव अप्राप्य तर मुळीच नाही, त्याउलट आपण ‘त्याचा शोध घ्यावा आणि त्याला प्राप्त करावे’ असे तो सांगतो कारण “तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.”—प्रेषितांची कृत्ये १७:२७.

तुम्ही देवाला कसे जाणू शकता

तुम्ही कधी दूरवरील ताऱ्‍यांकडे एक टक पाहिले आहे का, उसळणाऱ्‍या समुद्राचा आवाज ऐकून आश्‍चर्य केले आहे का, सुंदर फुलपाखराचे नाजूक सौंदर्य पाहून स्तिमित झाला आहात का किंवा एखाद्या इवल्याशा पानाची नजाकत पाहून चक्रावून गेलात का? ही सर्व कृत्ये देवाच्या प्रचंड शक्‍तीची, बुद्धीची आणि प्रेमाची फक्‍त एक झलक दाखवितात. देवाच्या “अदृश्‍य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात” होतात.—रोमकर १:१९, २०.

तथापि, फक्‍त निर्मितीपासून प्रकट होणाऱ्‍या गोष्टींपेक्षाही तुम्हाला अधिक जाणून घेण्याची गरज आहे. यास्तव, देवाने त्याचे लिखित वचन पुरवले आहे. ते पुस्तक, देव कोणी नामहीन प्राणी किंवा निर्गुण-निराकार शक्‍ती नव्हे तर नाव असलेली खरी व्यक्‍ती असल्याचे प्रकट करते. “परमेश्‍वर [यहोवा, NW] हाच देव आहे हे जाणा,” असे स्तोत्रकर्ता म्हणतो. (स्तोत्र १००:३) त्या नावामागील व्यक्‍तीला देखील बायबल प्रकट करते: “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर.” (निर्गम ३४:६) परिणामस्वरूप, मानवजातीसोबत देवाच्या व्यवहारांचा तपशीलवार अहवाल जणू देवाला क्रियाशील रूपात पाहण्यास आपल्याला मदत करतो! यास्तव, बायबलचे वाचन देवाच्या समीप येण्यासाठी अत्यावश्‍यक आहे.

बायबल वाचन रंजक बनवणे

हे खरे की, बायबल हे अतिशय मोठे पुस्तक आहे. त्याचा आकार पाहूनच युवकांना ते वाचण्याची भीती वाटते. काहीजण, बायबल कंटाळवाणे आहे अशी तक्रार सुद्धा करतात. तथापि, बायबल हे देवाने मानवजातीला प्रकट केलेले पुस्तक आहे. आपण अस्तित्वात कसे आलो आणि आपले भविष्य काय याविषयी ते आपल्याला सांगते. पृथ्वीवरील परादीसमध्ये सर्वकाळ जगण्यासाठी काय केले पाहिजे याबद्दल ते खडा न्‌ खडा माहिती देते. मग ते कंटाळवाणे असणे कसे शक्य आहे? बायबल हे हलकेफुलके वाचन नाही आणि त्यात “समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत” हे मान्य आहे. (२ पेत्र ३:१६) पण, म्हणून बायबलचे वाचन कंटाळवाणे असावे असे काही नाही.

छोटासा मार्विन, बायबल वाचन अधिक रोचक करण्याचा एक व्यावहारिक मार्ग सांगतो: “मी त्या दृश्‍याचं चित्र मनासमोर उभं करतो आणि स्वतः तिथं असण्याची कल्पना करतो.” उदाहरणार्थ, दानीएल अध्याय ६ मधील वृत्तान्त पाहा. तो वाचायचा म्हणून वाचून काढण्याऐवजी, तुम्ही दानीएल आहात अशी कल्पना करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या देवाला प्रार्थना करण्याच्या जुलमी आरोपाखाली तुम्हाला अटक केली आहे. शिक्षा कोणती? तर मृत्यू! पर्शियन सैनिक तुम्हाला फरफटत तुमच्या मृत्यूच्या द्वारापाशी—भुकेलेल्या सिंहांच्या गुहेपाशी आणतात.

त्या गुहेच्या तोंडावरील मोठा दगड सरकवताना गडगडणारा आवाज येतो. सिंहांच्या डरकाळ्या ऐकून तुमची पाचावर धारण बसते. भीतीने तुम्ही मागे सरता, पण राजाचे सैनिक तुम्हाला जबरीने मृत्यूच्या त्या गुहेत फेकतात आणि गुहेचे तोंड पुन्हा दगडाने बंद करतात. त्या गर्द काळोखात चाचपडताना तुमच्या अंगाला अचानक एक केसाळ स्पर्श जाणवतो . . .

कंटाळवाणे? मुळीच नाही! पण लक्षात ठेवा: तुम्ही मनोरंजनासाठी वाचन करत नाही. तो वृत्तान्त तुम्हाला यहोवाविषयी काय शिकवतो ते समजण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, दानीएलाच्या अनुभवांवरून यहोवा आपल्या सेवकांवर कठीण परीक्षा येऊ देतो हे दिसून येत नाही का?

त्याचप्रमाणे, नियमित वाचनाचा आराखडा राखण्याचा प्रयत्न करा. तुम्ही दररोज फक्‍त १५ मिनिटांसाठी बायबल वाचन केले तरी जवळजवळ एका वर्षात तुम्ही ते वाचून पूर्ण करू शकाल! एखाद्या कमी महत्त्वाच्या कामातून—जसे की, टीव्ही पाहण्यासारख्या कामातून ‘वेळ काढा.’ (इफिसकर ५:१६) तुम्ही अगदी तन्मयतेने बायबल वाचन करता तेव्हा आता तुमचे देवासोबत घनिष्ट नाते असल्याचे तुम्हाला निश्‍चितच जाणवेल.—नीतिसूत्रे २:१, ५.

प्रार्थना तुम्हाला त्याच्या समीप आणते

लतिका नामक एका तरुणीने निरीक्षिले, “तुम्ही एखाद्या व्यक्‍तीशी बोललाच नाहीत तर तिच्यासोबत व्यक्‍तिगत नातं आहे असं म्हणू शकत नाही.” ‘प्रार्थना ऐकणारा’ या नात्याने यहोवा आपल्याला त्याच्याशी बोलण्याचे आमंत्रण देतो. (स्तोत्र ६५:२) आपण विश्‍वासाने त्याला प्रार्थना केली व “त्याच्या इच्छेप्रमाणे काही[ही] मागितले तर तो आपले ऐकेल.”—१ योहान ५:१४.

लिंडाला (आधी उल्लेखिलेली) व्यक्‍तिगत अनुभवावरून हे शिकायला मिळाले. ती आठवून सांगते की, तिच्या जीवनात एके काळी जेव्हा तिच्या अडीअडचणी आणि ताणतणाव वाढत होते तेव्हा ‘आपल्या समस्यांचे समाधान मिळवण्याकरता ती कित्येक दिवस नित्याने प्रार्थना’ करत राहिली. मग तिला तिच्या समस्यांना तोंड देण्याची शक्‍ती मिळू लागली तेव्हा अप्राप्य वाटणारा देव आता तिला समीप वाटू लागला. के नामक आणखी एका तरुणाला देखील अशाच तऱ्‍हेने प्रार्थनेचे मूल्य कळाले: “काहीवेळा तुम्हाला आपल्या मनातल्या भावना कुणाला तरी सांगाव्याशा वाटतात तेव्हा यहोवाशिवाय दुसरी कोणतीच उत्तम व्यक्‍ती नसते कारण यहोवा समजून घेतो आणि तोच तुमची खरोखर मदत करू शकतो हे तुम्हाला माहीत असतं.”

पण प्रार्थनेमुळे फक्‍त भावनिक समाधान मिळते का? नाही, याकोब १:२-५ आपल्याला आश्‍वासन देते की विविध परीक्षा सामोऱ्‍या आल्यावर आपण ‘देवाजवळ मागत राहिलो तर तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देईल.’ देव आपल्याला कदाचित परीक्षेतून बचावणार नाही पण त्या परीक्षेला तोंड देण्यासाठी लागणारी बुद्धी देण्याची तो हमी देतो! कदाचित, त्या विषयाशी जुळणारी बायबल तत्त्वे तो आपल्या लक्षात आणून देईल. (पडताळा योहान १४:२६.) किंवा तो विशिष्ट गोष्टी, तुमच्या बायबलच्या व्यक्‍तिगत अभ्यासाद्वारे किंवा ख्रिस्ती सभांद्वारे तुमच्या लक्षात आणून देईल. तसेच विसरू नका, “तो तुमची परीक्षा तुमच्या शक्‍तीपलीकडे होऊ देणार नाही, तर . . . तिच्यातून निभावण्याचा उपायहि करील.” होय, तो तुमचा “परित्याग” करणार नाही. (१ करिंथकर १०:१३; २ करिंथकर ४:९) मग, परीक्षेला तोंड देण्यात त्याच्या मदतीचा अनुभव घेतल्याने तुम्हाला देवाच्या समीप असल्यासारखे वाटणार नाही का?

पण फक्‍त व्यक्‍तिगत समस्यांविषयीच प्रार्थना करू नका. आपल्या प्रार्थनेच्या नमुन्यात, येशूने यहोवाच्या नावाचे गौरव करण्याला, त्याच्या राज्याच्या आगमनाला आणि देवाच्या इच्छापूर्तीला प्राथमिक महत्त्व दिले. (मत्तय ६:९-१३) ‘आभारप्रदर्शनासह विनंती करणे’ देखील प्रार्थनेतील एक महत्त्वपूर्ण घटक आहे.—फिलिप्पैकर ४:६.

पण प्रार्थना करणेच तुम्हाला विचित्र वाटत असल्यास काय? त्याविषयीही प्रार्थना करा! तुमचे मन त्याच्यासमोर मोकळे करण्यासाठी त्याच्याजवळ मदत मागा. “प्रार्थनेत तत्पर राहा” आणि कालांतराने यहोवासोबत तुम्हाला एखाद्या जवळच्या मित्रासोबत बोलत असल्यासारखा मनमोकळेपणा जाणवेल. (रोमकर १२:१२) “माझ्यासमोर जेव्हा कधी समस्या येते तेव्हा मी मार्गदर्शनासाठी यहोवाकडे वळू शकते आणि तो मला मदत करील हे मला ठाऊक असतं,” असे तरुण मारिया म्हणते.

देवाशी बोलताना आलंकारिक किंवा ढोंगी भाषा वापरण्याची गरज नाही. “त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा,” असे स्तोत्रकर्ता म्हणाला. (स्तोत्र ६२:८) तुमच्या भावना, तुमच्या चिंता त्याला सांगा. तुमच्या कमजोरीला तोंड देत असताना त्याच्याकडे मदत मागा. तुमच्या कुटुंबावर आणि सह ख्रिश्‍चनांवर त्याच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. तुम्ही चुका करता तेव्हा त्याच्याकडे क्षमेची याचना करा. जीवनाचे दान दिल्याबद्दल दररोज त्याचे आभार माना. जेव्हा प्रार्थना तुमच्या जीवनातील नियमित भाग बनते तेव्हा यहोवा देवासोबत तुमचे घनिष्ट आणि आनंदी नाते बनू शकते.

देवासोबत मैत्री असल्याचे जाहीररित्या प्रकट करणे

आता तुमचे देवासोबत नाते निर्माण झाल्यामुळे इतरांना देखील असेच मूल्यवान नाते जोडण्यास मदत करण्यासाठी तुम्हाला उत्सुकता वाटू नये का? खरे म्हणजे, जे लोक देवाचे मित्र होऊ इच्छितात त्यांच्याकडून ‘तारणासाठी मुखाने कबूल करण्याची’ अपेक्षा केली जाते.—रोमकर १०:१०.

पुष्कळजण, शाळासोबत्यांशी, शेजाऱ्‍यांशी आणि नातेवाईकांशी बोलून, अनौपचारिकरित्या आपल्या विश्‍वासाबद्दल सांगण्यास सुरवात करतात. नंतर, “घरोघर” प्रचार करण्याच्या कार्यात ते यहोवाच्या साक्षीदारांसोबत सामील होतात. (प्रेषितांची कृत्ये ५:४२) तथापि, काही युवकांना हे जाहीर कार्य म्हणजे अडखळण वाटते. “मला वाटतं पुष्कळ तरुण लोकांना घरोघरी जायला लाज वाटते,” असे एक तरुण ख्रिस्ती म्हणतो. “त्यांचे मित्र त्यांच्याबद्दल काय समजतील याची त्यांना भीती असते.”

पण तुम्ही कोणाच्या स्वीकृतीला महत्त्व देता—तुमच्या समवयस्कांच्या की यहोवा या तुमच्या स्वर्गीय मित्राच्या? लाज वाटण्याच्या भीतीला तारण मिळवण्याकरता अडखळण होण्यास तुम्ही वाव द्यावा का? “आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू,” असे प्रेषित पौल आर्जवतो. (इब्री लोकांस १०:२३) तसेच पुरेशा प्रशिक्षणाने आणि तयारीने प्रचार कार्यात खरा आनंद मिळू शकतो हे तुम्हाला आढळेल!—१ पेत्र ३:१५.

उचित वेळ आली, की स्वर्गीय मित्राबद्दल वाटणाऱ्‍या गुणग्राहकतेमुळे देवाला बिनदिक्कतपणे समर्पण करण्यास आणि ते पाण्याच्या बाप्तिस्म्याने चिन्हांकित करण्यास तुम्ही प्रवृत्त झाले पाहिजे. (रोमकर १२:१; मत्तय २८:१९, २०) ख्रिस्ताचा बाप्तिस्माप्राप्त शिष्य बनण्यासाठी जाहीर घोषणा करणे यास साधीसोपी गोष्ट समजू नये. त्यासाठी “आत्मत्याग” करणे—व्यक्‍तिगत महत्त्वकांक्षा बाजूला ठेवून यहोवा देवाच्या नजरेत महत्त्वाच्या असणाऱ्‍या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागते. (मार्क ८:३४) शिवाय, यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक संघटनेसोबत असल्याचे दाखवणे देखील यात सामावलेले आहे.

“मला वाटतं, पुष्कळ तरुण लोक बाप्तिस्मा घेण्यासाठी मागेपुढं करतात,” असे निरीक्षण रॉबर्ट नामक एका युवकाने केले. “त्यांना वाटतं की ते शेवटचं पाऊल आहे आणि तिथून त्यांना पुन्हा माघार घेता येणार नाही.” हे खरे, की देवाला समर्पण केल्यावर कोणी माघार घेऊ शकत नाही. (पडताळा उपदेशक ५:४.) पण “चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे”—मग तो बाप्तिस्मा घेतलेला असो अथवा नसो! (याकोब ४:१७) प्रश्‍न हा आहे की, तुम्ही देवाच्या मैत्रीची कदर बाळगता का? सर्वकाळ त्याची सेवा करण्यास तुम्ही प्रवृत्त झाला आहात का? मग भीतीमुळे तुम्ही देवाचे मित्र आहात हे जाहीर करण्यास माघार घेऊ नका!

देवाच्या मित्रांसाठी सार्वकालिक फायदे

देवाची मैत्री स्वीकारल्याने सबंध जग तुमच्या विरोधात राहील. (योहान १५:१९) तुमचा उपहास होऊ शकतो. अडीअडचणी, समस्या आणि मोहपाश तुम्हावर येऊ शकतात. पण कोणालाही अथवा कोणत्याही गोष्टीला देवासोबतचा तुमचा नातेसंबंध हिरावून घेण्यास वाव देऊ नका. तो आपल्या निश्‍चित पाठिंब्याचे वचन देऊन म्हणतो: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.”—इब्री लोकांस १३:५.

तुमच्या अनंतकालिक हितासंबंधी यहोवा आणि त्याच्या संघटनेला किती आस्था आहे याचा हे पुस्तक केवळ एक पुरावा आहे. या पुस्तकात तुमच्या सर्व प्रश्‍नांविषयी आणि समस्यांविषयी सांगणे शक्य झाले नसले, तरी बायबल बुद्धीचे केवढे अगाध भांडार आहे याची तुम्ही निश्‍चितच पहिल्यापेक्षा अधिक प्रशंसा करत असाल! (२ तीमथ्य ३:१६, १७) समस्या तुम्हाला गोंधळून टाकतात तेव्हा त्या पवित्र पुस्तकात शोध घ्या. (नीतिसूत्रे २:४, ५) तुमचे देव-भीरु पालक असल्यास, तुमच्याजवळ आध्यात्मिक बुद्धी आणि आधाराचा आणखी एक स्रोत आहे—पण फक्‍त तुम्ही आपले मन त्यांच्याजवळ मोकळे केले तरच.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहोवा देवाकडे सर्वांची उत्तरे आहेत हे लक्षात ठेवा. “तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो” आणि तो तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अवघड परिस्थितीतून वाट दाखवू शकतो. (स्तोत्र ४६:१) म्हणून ‘आपल्या तारुण्याच्या दिवसांत, आता, आपल्या निर्माणकर्त्याला स्मरा.’ (उपदेशक १२:१) हे मार्गाक्रमण यहोवाचे अंतःकरण प्रफुल्लित करील. (नीतिसूत्रे २७:११) त्याचप्रमाणे, देवाने आपल्या मित्रांसाठी राखून ठेवलेले प्रतिफळ—अनंत परादीसमध्ये सार्वकालिक जीवन मिळवण्याचा तो एक मार्ग आहे.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ देवासोबत निकटचा नातेसंबंध असणे महत्त्वाचे का आहे?

◻ बायबल देवाविषयी काय प्रकट करते?

◻ तुम्ही बायबल वाचनास सुखकारक आणि प्रतिफळदायी कसे बनवू शकता?

◻ आपला विश्‍वास “मुखाने कबूल” करण्यामध्ये काय सामावलेले आहे? असे करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त होता का? ते का?

◻ देवाच्या समीप जाण्यामध्ये सभांची काय भूमिका आहे आणि त्यांच्यापासून तुम्ही पुरेपुर फायदा कसा प्राप्त करू शकता?

◻ देवाचा मित्र असण्याचे काय फायदे आहेत?

[३११ पानांवरील संक्षिप्त आशय]

देवाच्या समीप असणे माझ्याकरता खरोखर शक्य आहे का?

[३१२ पानांवरील संक्षिप्त आशय]

बायबल हे देवाने मानवजातीला प्रकट केलेले पुस्तक आहे. आपण अस्तित्वात कसे आलो आणि आपले भविष्य काय याविषयी ते आपल्याला सांगते

[३१६, ३१७ पानांवरील चौकट/चित्र]

सभा—देवाच्या नजीक येण्याचे साधन

“यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांची संगत धरल्याने मलाही यहोवाच्या समीप राहायला मदत मिळते असं मला आढळलंय.” असे एका नायजेरियन तरुणाने म्हटले. यहोवाचे साक्षीदार अशाप्रकारच्या सहवासाची व्यवस्था त्यांच्या स्थानीय राज्य सभागृहांमध्ये करतात. (इब्री लोकांस १०:२३-२५) १६ वर्षांच्या अनिताने म्हटले: “राज्य सभागृहात मला खरे मित्र मिळाले.”

तथापि, अशी एकत्रीकरणे केवळ सामाजिक मेळावे नाहीत. राज्य सभागृहांमध्ये पाच साप्ताहिक सभांद्वारे बायबल शिक्षण दिले जाते. तेथे विविध विषयांची हाताळणी केली जाते: थोडक्यात सांगायचे तर, कौटुंबिक जीवन, बायबल भविष्यवाणी, चालचलणूक, सिद्धान्त आणि ख्रिस्ती सेवा. अतिशय शानदार प्रस्तुती जरी नसली, तरी अशा सभा रोचक पद्धतीने प्रस्तुत केल्या जातात. भाषणे आणि सामुहिक चर्चांच्या अधूनमधून मुलाखती आणि सजीव रेखाचित्रे दाखवली जातात. ईश्‍वरशासित सेवा प्रशाला विशेष उल्लेखनीय ठरली आहे कारण तिने हजारोंना प्रभावशाली जाहीर वक्‍ते होण्यास प्रशिक्षित केले आहे.

पण तुम्ही सभांना उपस्थित राहत असल्यास काय? त्यांच्यातून अधिक मिळवण्याचा प्रयत्न करा. (१) तयारी करा: “सभांमध्ये वापरल्या जाणाऱ्‍या पुस्तकांचा अभ्यास करायला मी विशिष्ट वेळ नेमून ठेवला आहे,” असे अनिता म्हणते. यामुळे तुम्हाला (२) सहभाग घेण्यास आणखी सोपे जाईल: तरुण असताना, मंदिरात आध्यात्मिक गोष्टींची चर्चा होई तेव्हा येशू लक्ष देऊन ऐकत, प्रश्‍न विचारत आणि उत्तरे देत असे. (लूक २:४६, ४७) तुम्ही देखील “ऐकलेल्या गोष्टींकडे . . . विशेष लक्ष” लावून आपले मन भरकटू न देण्याकरता नोट्‌स घेऊ शकता. (इब्री लोकांस २:१) श्रोत्यांना सहभाग घेण्यासाठी सांगितले जाते तेव्हा विवेचन करण्यात सामील व्हा.

आणखी एक मदतदायी सल्ला म्हणजे, (३) शिकत असलेल्या गोष्टींचा उपयोग करा: तुम्ही शिकत असलेल्या गोष्टी इतरांना सांगा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही जे काही शिकता ते आपल्या जीवनात लागू करा व जेथे आवश्‍यकता आहे तेथे बदल करा. सत्य तुम्हामध्ये “कार्य करीत आहे” हे दाखवा.—१ थेस्सलनीकाकर २:१३.

सभांना प्राधान्य द्या. तुम्हाला जर पुष्कळ गृहपाठ असला, तर सभेला जाण्याआधी तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. “मला सभांनंतर गप्पा मारायला आणि उशिरापर्यंत थांबायला खूप आवडतं,” असे सिमियन नामक तरुण म्हणतो. “पण मला गृहपाठ असतो तेव्हा मी सभा संपल्या संपल्या घरी जातो.” तुम्ही या सर्वांची कशीही व्यवस्था केली तरी सभांना नियमित राहण्यासाठी होता होईल तितका प्रयत्न करा. त्या तुमच्या आध्यात्मिक वाढीसाठी अत्यावश्‍यक आहेत.

[३१५ पानांवरील चित्र]

बायबल वाचणे हे देवासोबत मैत्री विकसित करण्यास आवश्‍यक आहे

[३१८ पानांवरील चित्र]

“माझ्यासमोर जेव्हा कधी समस्या येते तेव्हा मी मार्गदर्शनासाठी यहोवाकडे वळू शकते आणि तो मला मदत करील हे मला ठाऊक असतं”