व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आई आणि बाबा विभक्‍त का झाले?

आई आणि बाबा विभक्‍त का झाले?

अध्याय ४

आई आणि बाबा विभक्‍त का झाले?

“माझे बाबा आम्हाला सोडून गेले तेव्हाचं मला आठवतं. काय चाललंय ते आम्हाला कळतच नव्हतं. आईला मग कामावर जावं लागलं आणि आम्ही नेहमी एकटेच राहायचो. काही वेळेस खिडकीजवळ बसलो असता ती सुद्धा आम्हाला सोडून गेली की काय, असं वाटायचं . . . ”—घटस्फोटित कुटुंबातील एक मुलगी.

एखाद्याच्या पालकांचा घटस्फोट म्हणजे, जणू आभाळ कोसळल्यासारखे असू शकते, तो अशा महासंकटासारखा आहे, की ज्यामुळे कायमचे दुःख निर्माण होते. तो बहुधा लज्जा, क्रोध, चिंता, पोरकेपणाची भीती, दोष, खिन्‍नता व रिक्‍तपणाची तीव्र भावना त्याचप्रमाणे सूड घेण्याची इच्छा देखील निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो.

तुमचे पालक अलीकडेच विभक्‍त झाले असल्यास, तुम्ही देखील अशाच भावना अनुभवत असाल. शेवटी, आपले संगोपन आईवडिलांनी, दोघांनी करावे असेच आपल्या निर्माणकर्त्याने उद्देशिले होते. (इफिसकर ६:१-३) तरीही, तुमचा प्रिय पालक आता तुम्हाला दररोज दिसत नाही. “मला बाबांबद्दल खरोखर आदर होता आणि मला त्यांच्यासोबत राहायचं होतं,” असे पॉल दुःखाने सांगतो, तो सात वर्षांचा असतानाच त्याचे पालक विभक्‍त झाले. “पण आईला आमचा ताबा मिळाला.”

पालक विभक्‍त का होतात

बहुतेकवेळा पालकांनी त्यांच्या समस्या लपवून ठेवलेल्या असतात. “माझ्या पालकांचे भांडण होत असल्याचे मला कधीच आठवत नाही,” असे लिन्‌ म्हणाली, जिच्या पालकांनी ती लहान असतानाच घटस्फोट घेतला. “त्या दोघांचं पटतं असा माझा ग्रह होता.” पण पालकांमध्ये भांडणे होत असली तरी, ते खरेच विभक्‍त होतात तेव्हा अगदी धक्काच बसू शकतो!

अनेक प्रकरणांत, पालकांपैकी एक लैंगिक गैरवर्तनाबद्दल दोषी असल्यामुळे ते विभक्‍त होतात. कारण देव, निष्पाप सोबत्याला घटस्फोट घेण्याची परवानगी देतो. (मत्तय १९:९) इतरवेळा, “क्रोध, गलबला व निंदा” ही हिंसेत परिणीत झाल्यामुळे एका पालकाला त्याच्या किंवा तिच्या तसेच मुलांच्या शारीरिक सुरक्षिततेला धोका असल्याची चिंता वाटते.—इफिसकर ४:३१.

हे कबूल आहे, की काही घटस्फोट पोकळ आधारांवर मिळवले जातात. समस्या सोडवण्याऐवजी, काहीजण स्वार्थीपणाने घटस्फोट घेतात कारण ते ‘दुःखी’ असल्याचा किंवा ‘आता एकमेकांच्या प्रेमात नसल्याचा’ दावा करतात. ह्‍या गोष्टी, ज्याला “सूटपत्राचा तिटकारा आहे” त्या देवाला नापसंत आहेत. (मलाखी २:१६) येशूने हे देखील दाखवून दिले, की काहीजण त्यांचे सोबती ख्रिस्ती झाल्यामुळे आपले विवाह मोडून टाकतील.—मत्तय १०:३४-३६.

काहीही असले, तरी तुमच्या पालकांनी शांत राहण्याचे किंवा घटस्फोटाविषयी तुमच्या प्रश्‍नांना अस्पष्ट उत्तरे देण्याचे ठरवले असले तरीपण याचा अर्थ ते तुमच्यावर प्रीती करत नाहीत असा होत नाही. a स्वतःच्याच दुःखात इतके गुरफटले गेल्यामुळे, तुमच्या पालकांना कदाचित त्यांच्या घटस्फोटाविषयी बोलणेच कठीण वाटत असेल. (नीतिसूत्रे २४:१०) परस्परांच्या चुका कबूल करण्यासही कदाचित त्यांना विचित्र किंवा लाजिरवाणे वाटत असेल.

तुम्ही काय करू शकता

तुमच्या पालकांसोबत तुमच्या चिंतांबद्दल शांतपणे बोलण्याचा योग्य वेळ कोणता ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. (नीतिसूत्रे २५:११) घटस्फोट झाल्यामुळे तुम्ही किती दुःखित आणि गोंधळलेले आहात ते त्यांना सांगा. कदाचित, ते तुम्हाला त्याचे समाधानकारक स्पष्टीकरण देतील. पण तसे स्पष्टीकरण न दिल्यास, निराश होऊ नका. आपल्या शिष्यांना अद्याप काही गोष्टी झेपणार नाहीत असे येशूला वाटले तेव्हा त्यानेही त्यांना माहिती देण्यास नाकारले नाही का? (योहान १६:१२) तसेच, तुमच्या पालकांना देखील काही गोष्टी गुप्त ठेवण्याचा हक्क नाही का?

शेवटी, घटस्फोटाचे काहीही कारण असले, तरी तो त्यांच्यामधील मतभेद आहे—तुमच्यासोबतचा नव्हे हे समजून घ्या! ६० घटस्फोटित कुटुंबांच्या अभ्यासात, वॉलरस्टेन आणि केली यांच्या निदर्शनास आले की, घटस्फोटासाठी जोडपी एकमेकांना, त्यांच्या मालकांना, कौटुंबिक सदस्यांना आणि मित्रमैत्रिणींना दोष देत होते. पण संशोधक म्हणतात: “मनोवेधक गोष्ट अशी, की कोणत्याही जोडप्याने मुलांना दोष दिला नाही.” तुमच्याबद्दल तुमच्या पालकांच्या भावना बदललेल्या नाहीत.

काळाच्या ओघात घाव भरणे

“बरे करण्याचा समय” असतो. (उपदेशक ३:३) खरोखरची जखम जसे की, एखादे मोडलेले हाड पूर्णतः बरे होण्याकरता कित्येक आठवडे किंवा महिने लागतात त्याचप्रमाणे भावनिक जखमा बऱ्‍या होण्यासही काही कालावधी लागतो.

वॉलरस्टेन आणि केली या घटस्फोट संशोधकांना आढळले की, घटस्फोट झाल्यानंतर काही वर्षांतच “ग्रासून टाकणारे भय, दुःख, अविश्‍वास यासारख्या . . . भावना एकतर पुसट किंवा पूर्णपणे नाहीशा झाल्या.” काही तज्ज्ञांना असे वाटते, की सर्वात दुःखदायक घटस्फोटाचे परिणाम देखील केवळ तीन वर्षांत नाहीसे होतात. हा अतिशय दीर्घ समय असल्याचे जाणवेल, पण तुमचे जीवन स्थिर होण्याआधी पुष्कळ काही व्हावयाचे आहे.

एक गोष्ट म्हणजे, घटस्फोटाने विस्कळित झालेला घरातील नित्यक्रम पुन्हा एकदा सुरळीत करावा लागतो. तुमचे पालक आपला भावनिक समतोल पुन्हा मिळवेपर्यंत देखील पुष्कळ वेळ जाईल. तेव्हाच ते तुम्हाला आवश्‍यक आधार देऊ शकतील. तुमच्या जीवनात थोडासा नियमितपणा येऊ लागल्यावर तुम्हाला पुन्हा एकदा पूर्वीसारखे वाटू लागेल.

तथापि, शलमोनाने हा इशारा दिला: “‘सांप्रतच्यापेक्षा पूर्वीचे दिवस बरे होते, हे का?’ असे म्हणू नको; हे तुझे विचारणे शहाणपणाचे नव्हे.” (उपदेशक ७:१०) गतकाळाबद्दल विचार करत राहिल्याने तुम्हाला तुमचे वर्तमान दिसेनासे होईल. घटस्फोटाआधी तुमच्या कुटुंबाची स्थिती कशी होती? “नेहमीच खूप भांडणं—ओरडाओरड आणि शिवीगाळ व्हायची,” असे ॲनेट कबूल करते. आता तुमच्या घरात शांतता आहे का?

‘मी त्यांना पुन्हा एकत्र आणू शकतो’

काही युवक आपल्या पालकांना पुन्हा एकत्र आणण्याचे स्वप्न पाहत असतात, त्यांच्या पालकांनी पुनर्विवाह केल्यावरही कदाचित ते अशा कल्पनांचा विचार करत राहतात!

परंतु, घटस्फोट झाल्याचे नाकारल्याने काहीएक बदलत नाही. तसेच तुम्ही कितीही अश्रू गाळले, गयावया केली व योजना आखल्या तरी कदाचित तुमच्या पालकांना पुन्हा एकत्र आणणे हे तुम्हाला शक्य होणार नाही. म्हणून अशक्य गोष्टीवर मनन करत राहून स्वतःला यातना का देत राहावे? (नीतिसूत्रे १३:१२) शलमोनाने म्हटले, ‘हार मानून सोडून देण्याचा समय’ असतो. (उपदेशक ३:६) म्हणून वास्तविकता आणि घटस्फोटाचा कायमपणा ह्‍या गोष्टींचा स्वीकार करा. त्यावर मात करण्याचा हा एक मोठा टप्पा आहे.

तुमच्या पालकांशी सलोखा करणे

तुमचे जीवन विस्कळित करण्याबद्दल आपल्या पालकांवर क्रोधित होणे कदाचित रास्तच असेल. एका तरुणाने त्याविषयी चिडून असे म्हटले: “माझे पालक स्वार्थी होते. त्यांनी आमचा विचार केला नाही आणि ते जे काही करत आहेत त्याचा आमच्यावर कसा परिणाम होईल याचीही कदर त्यांनी केली नाही. त्यांनी मागंपुढं न पाहता निर्णय घेतले.” हे खरेही असेल. पण जीवनभर अतिशय संताप आणि कटुता मनात बाळगून स्वतःला हानी पोहंचवल्याशिवाय तुम्हाला जगता येईल का?

बायबल सल्ला देते: “सर्व प्रकारचे कडूपण, संताप . . . तुम्हापासून दूर करण्यात येवोत; तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा . . . एकमेकांना क्षमा करा.” (इफिसकर ४:३१, ३२) तुम्हाला इतके तीव्र दुःख दिलेल्या व्यक्‍तीला तुम्ही कशाप्रकारे क्षमा करू शकता? तुमच्या पालकांना वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून—चूक करणारे, अपरिपूर्ण मानव म्हणून पाहण्याचा प्रयत्न करा. होय, पालक देखील ‘पाप करतात व देवाच्या गौरवाला उणे पडतात.’ (रोमकर ३:२३) हे जाणल्याने तुमच्या पालकांशी सलोखा करण्यास तुम्हाला मदत मिळेल.

तुमच्या भावना व्यक्‍त करा

“माझ्या पालकांच्या घटस्फोटाविषयी मला कसं वाटलं त्याबद्दल मी खरं तर कधीच बोललो नाही,” असे आम्ही मुलाखत घेतलेल्या एका तरुणाने म्हटले. सुरवातीला तो खंबीर वाटत होता तरी त्याच्या पालकांच्या घटस्फोटाबद्दल बोलू लागला तेव्हा तो अतिशय भावनाविवश झाला—अक्षरशः रडू लागला. इतक्या वर्षांपासून कोंडून ठेवलेल्या भावना उफाळून आल्या. याचे आश्‍चर्य वाटून त्याने कबूल केले: “असं बोलल्यामुळे माझं मन हलकं झालं.”

त्याचप्रमाणे स्वतःला अलिप्त ठेवण्याऐवजी, तुम्हालाही कोणा व्यक्‍तीशी बोलणे मदतदायी असल्याचे आढळेल. तुम्हाला कसे वाटते, कशाचे भय आणि चिंता आहे ते तुमच्या पालकांना सांगा. (पडताळा नीतिसूत्रे २३:२६.) प्रौढ ख्रिस्ती व्यक्‍ती देखील मदत देऊ शकतात. उदाहरणार्थ, घटस्फोटामुळे विलग झालेल्या कुटुंबाकडून कपिलला काहीच आधार मिळाला नाही. तरीही त्याला दुसरीकडे आधार मिळाला. कपिल म्हणतो: “ख्रिस्ती मंडळी माझं कुटुंब बनली.”

त्याहूनही अधिक म्हणजे, तुमचा स्वर्गीय पिता जो ‘प्रार्थना ऐकणारा आहे’ तो तुमचे नक्कीच ऐकेल. (स्तोत्र ६५:२) पॉल नामक युवकाला आपल्या पालकांच्या घटस्फोटानंतर सावरण्यास कशामुळे मदत मिळाली हे तो सांगतो: “मी सतत प्रार्थना करत होतो आणि यहोवा एक खरी व्यक्‍ती माझ्यासमोर आहे असं मला नेहमी वाटायचं.”

पुन्हा जीवनात रमणे

घटस्फोट झाल्यानंतर, सर्वकाही कदाचित पूर्वीसारखे राहणार नाही. परंतु, तुमचे जीवन फलदायी आणि आनंदी होऊ शकत नाही असा याचा अर्थ होत नाही. बायबल सल्ला देते, “आपल्या कामात कधी [मंद होऊ] नका.” (रोमकर १२:११) होय, दुःख, वाईट वाटून घेणे किंवा क्रोध यांमुळे निष्क्रिय होण्याऐवजी तुमच्या जीवनात पुन्हा रमून जा! तुमच्या शालेय कार्यहालचालींत व्यग्र होऊन जा. एखादा छंद जोपासा. “प्रभूच्या कामात . . . अधिकाधिक तत्पर असा.”—१ करिंथकर १५:५८.

त्यासाठी श्रम, निर्धार आणि वेळ लागेल. पण कालांतराने, मोडकळीस आलेला तुमच्या पालकांचा विवाह तुमच्या जीवनातील प्रधान गोष्ट राहणार नाही.

[तळटीपा]

a वॉलरस्टेन आणि केली या संशोधकांच्या तपासानुसार, “[घटस्फोटित पालकांच्या] अभ्यासलेल्या सर्वात लहान चार-पंचमांश मुलांना पुरेसे स्पष्टीकरण अथवा पुढील काळजी घेण्याबद्दल खात्री देखील देण्यात आली नव्हती. परिणामस्वरूप, ते सकाळी उठून पाहतात तो, त्यांचा एक पालक निघून गेल्याचे त्यांना कळते.”

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ पालक विभक्‍त होतात याची काही कारणे कोणती आहेत?

◻ तुमच्या पालकांना त्याविषयी बोलणे का कठीण वाटत असेल? ते बोलण्याचे टाळत असतील तर तुम्ही काय करू शकता?

◻ गतकाळाच्या विचारातच अडकून पडणे अथवा तुमच्या पालकांना पुन्हा एकत्र आणण्याची कल्पना करत राहणे निरर्थक का आहे?

◻ घटस्फोटाच्या परिणामांतून वर उठण्यास स्वतःची मदत करण्यात तुम्ही कोणकोणती सकारात्मक पावले उचलू शकता?

◻ पालकांचा राग आल्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया दाखवू शकता?

[Box on page 36, 37]

‘घटस्फोट माझ्या जीवनाचा नाश करील का?’

पालकांच्या घटस्फोटामुळे, काही युवक खरोखरच आपल्या जीवनाचे वाटोळे करून घेतात. काहीजण शाळा सोडून देण्यासारखे अविचारीपणाचे निर्णय घेतात. इतरकाही, दुर्वर्तन करून त्यांची निराशा आणि राग व्यक्‍त करतात—जणू घटस्फोट घेतल्याबद्दल ते त्यांच्या पालकांना शिक्षाच देत आहेत. डेनी म्हणतो: “माझ्या पालकांच्या घटस्फोटानंतर मी निराश आणि खिन्‍न होतो. मला शाळेत अडचणी येऊ लागल्या आणि मी एका वर्षी नापास झालो. त्यानंतर, . . . वर्गात सर्वजण माझी थट्टा करू लागले आणि मग मी खूप भांडणं करायचो.”

धक्कादायक वर्तणुकीमुळे एखाद्याच्या पालकांचे लक्ष नक्कीच वेधले जाईल. पण यामुळे, आधीच तणावपूर्ण असलेल्या स्थितीला आणखी तणावपूर्ण करण्याव्यतिरिक्‍त अजून काय साध्य होते? खरोखरच, चूक केल्यामुळे चूक करणाऱ्‍यालाच शिक्षा होते. (गलतीकर ६:७) तुमचे पालक देखील दुःखी आहेत आणि तुमच्याकडे दुर्लक्ष केले जाते असे जे तुम्हाला भासते ते द्वेषयुक्‍त नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. डेनीच्या आईने असे कबूल केले: “मी मुलांकडे दुर्लक्ष केलं हे मान्य करते. घटस्फोट झाल्यानंतर, मी स्वतःच इतकी गोंधळून गेले होते की मी त्यांना मदत करूच शकले नाही.”

बायबल इब्री लोकांस १२:१३ येथे सल्ला देते: “आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा, ह्‍यासाठी की, लंगड्यांचा सांधा उखळू नये.” पालकांची शिस्त नसली, तरी गैरवर्तन करण्यास कोणतीही सबब नाही. (याकोब ४:१७) स्वतःच्या कृतींची जबाबदारी स्वीकारा आणि आत्म-शिस्त लावा.—१ करिंथकर ९:२७.

त्याचप्रमाणे, घर सोडून जाण्यासारखे अविचारीपणाचे निर्णय देखील घेण्याचे टाळा. “शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.” (नीतिसूत्रे १४:१५) अशावेळी, तुमचे पालक अतिशय विचलित असल्यामुळे तुमचे ऐकत नसल्यास, दुसऱ्‍या एखाद्या प्रौढ मित्राजवळ तुमचे निर्णय का व्यक्‍त करू नयेत बरे?

तरीही, तुम्हाला तुमच्या भवितव्याबद्दल अनेक चिंता असतील. तुमच्या पालकांचा विवाह अयशस्वी ठरल्यामुळे, तुमचा विवाह तरी यशस्वी ठरेल का या शक्यतेची तुम्हाला चिंता वाटत असेल हे समजण्याजोगे आहे. सुदैवाने, वैवाहिक निराशा—त्वचेच्या रंगाप्रमाणे—तुम्हाला तुमच्या पालकांकडून मिळत नाही. तुम्ही एक वेगळी व्यक्‍ती आहात, आणि भवितव्यात तुमचा विवाह यशस्वी ठरेल की अयशस्वी हे तुमच्या पालकांच्या चुकांवर नव्हे तर तुम्ही व तुमचा सोबती देवाचे वचन कितपत लागू करता यावर अवलंबून असेल.

पूर्वी सहजपणे घेतलेल्या गोष्टींबद्दल—अन्‍न, वस्त्र, निवारा, पैसा—यांविषयी तुम्ही आता कदाचित चिंता करू लागाल. परंतु, घटस्फोट झाल्यानंतर बहुधा पालक आपल्या मुलांचा उदरनिर्वाह करण्याकरता कोणता ना कोणता मार्ग काढतात, मग आईला नोकरी स्वीकारावी लागली तरीसुद्धा. तथापि, विभक्‍ततेतून पार होणे (इंग्रजी) हे पुस्तक वास्तविकपणे असा इशारा देते: “एकेकाळी ज्याद्वारे एखाद्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता त्यातून आता दोन कुटुंबांचा उदरनिर्वाह करावा लागतो व प्रत्येक कौटुंबिक सदस्याला आपला राहणीमानाचा दर्जा जरा खाली आणावा लागतो.”

म्हणून, नवीन कपड्यांसारख्या वस्तूंशिवाय काम भागवण्याचे कदाचित तुम्हाला शिकावे लागेल. पण बायबल अशी आठवण करून देते: “आपण जगात काही आणिले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही; आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” (१ तीमथ्य ६:७, ८) कदाचित, कुटुंबासाठी एखादे नवीन बजेट करण्यातही तुम्ही हातभार लावू शकता. तसेच, यहोवा “पितृहीनांचा पिता” आहे हे देखील लक्षात असू द्या. (स्तोत्र ६८:५) त्याला तुमच्या गरजांविषयी अधिक चिंता आहे याची तुम्ही खात्री बाळगू शकता.

यिर्मयाने निरीक्षिले: “मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे.” (विलापगीत ३:२७) हे खरे की, पालक विभक्‍त होत असलेले पाहताना काही “बरे” वाटत नाही. पण या नकारात्मक अनुभवातून देखील तुम्ही फायदा मिळवून घेऊ शकता.

संशोधक जुडीथ वॉलरस्टेन यांनी निरीक्षिले: “[घटस्फोटित पालकांच्या मुलांचा] कुटुंबावरील संकटामुळे घडलेला भावनिक आणि बौद्धिक विकास उल्लेखनीय तसेच काहीवेळेस हेलावून सोडणारा होता. युवकांनी . . . गांभिर्याने आपल्या पालकांच्या अनुभवांचा विचार केला आणि त्यांच्या स्वतःच्या भवितव्याबद्दल विचारपूर्वक निष्कर्ष काढले. त्यांच्या पालकांनी ज्या चुका केल्या होत्या त्या टाळण्याचे मार्ग शोधण्याबद्दल ते चिंता करत होते.”

यात काहीच शंका नाही, की तुमचे पालक विभक्‍त झाल्याची निशाणी तुमच्या जीवनात नक्कीच राहणार. पण ती निशाणी नाहीसा होणारा व्रण आहे की ओली जखम आहे हे मोठ्या प्रमाणात तुमच्यावर अवलंबून आहे.

[३५ पानांवरील चित्र]

आपल्या डोळ्यांदेखत आपल्या पालकांचा विवाह मोडकळीस येत असल्याचे पाहणे हा, सर्वात दुःखाचा अनुभव असू शकतो

[३८ पानांवरील चित्र]

जीवन कसे असायचे त्या आठवणींचाच विचार करीत बसल्याने तुम्ही केवळ खिन्‍न व्हाल