माझे पालक मला का समजून घेत नाहीत?
अध्याय २
माझे पालक मला का समजून घेत नाहीत?
लोकांनी आपल्याला समजून घ्यावे असे वाटणे स्वाभाविक आहे. तसेच तुमचे पालक, तुम्हाला आवडणाऱ्या अथवा महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींबद्दल टीकात्मक असतील—किंवा त्यांच्याविषयी रस बाळगत नसतील तर तुम्हाला अतिशय निराश झाल्यासारखे वाटू शकते.
सोळा वर्षांच्या रॉबर्टच्या मते, त्याचे वडील त्याच्या संगीताच्या निवडीविषयी समजूनच घेत नाहीत. “ते फक्त ओरडून, ‘बंद कर ते!’ असं म्हणतात,” असे रॉबर्ट म्हणाला. “म्हणूनच मी ते आणि त्यांचं तोंड सुद्धा एकदाचं बंद करतो.” अशाप्रकारे, पालकांची समजून घेण्याची वृत्ती नसते तेव्हा अनेक युवक स्वतःच्याच खासगी विश्वात भावनिकपणे अंतर्मुख होतात. विस्तारित प्रमाणावर घेतलेल्या युवकांच्या एका अभ्यासात, प्रश्न विचारलेल्या २६ टक्के युवकांनी कबूल केले, “मी होता होईल तितकं घराबाहेर राहण्याचा प्रयत्न करतो.”
अशाप्रकारे, पुष्कळ घरांमध्ये युवक व पालक यांच्या दरम्यान एक भला मोठा दरा, किंवा अंतर पडले आहे. त्याचे कारण काय?
“बल” विरुद्ध “पिकलेले केस”
नीतिसूत्रे २०:२९ म्हणते: “बल हे तरुणांस [तरुणींस] भूषण आहे.” तथापि, हीच शक्ती अथवा “बल” तुमच्या व पालकांमधील सर्व प्रकारच्या वितुष्टांचे मूळ ठरू शकते. ते नीतिसूत्र पुढे असे म्हणते: “पिकलेले केस वृद्धांची शोभा आहे.” तुमच्या पालकांचे प्रत्यक्षात “पिकलेले केस” नसतील, पण ते तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत व जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा गोड शेवट होत नसतो याची जाणीव त्यांना असते. कटू व्यक्तिगत अनुभवामुळे, युवक या नात्याने त्यांनी एकेकाळी जोपासलेला त्यांचा आदर्शवाद पार निवळला असेल. अनुभवानिशी —जणू ‘पिकलेल्या केसांमुळे’—प्राप्त झालेल्या या बुद्धीमुळे ते कदाचित काही बाबतीत तुमच्या उत्साहात सामील होणार नाहीत.
लहानगा जिम म्हणतो: “माझ्या पालकांना (मंदीच्या युगातील मुले) असं वाटतं की, महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करायला किंवा त्यांच्यासाठी पैसा खर्च करायला पैशांची बचत करणं जरूरी आहे. पण मी आताही जगतोय. . . . मला खूप प्रवास करायचाय.” होय, एखाद्याचे तारुण्यातील “बल” व त्याच्या पालकांचे “पिकलेले केस” यांमध्ये एक मोठे अंतर असेल. यास्तव, अनेक कुटुंबांत, वेश व केशभूषा, विरुद्ध लिंगी व्यक्तीबरोबरचे वर्तन, मादक पदार्थ व मद्यार्काचा उपयोग, वेळेवरील निर्बंध, सोबती व घरगुती कामे अशा विषयांवर कट्टे दुमत आहे. हा पिढ्यांमधील दरा मिटवला जाऊ शकतो. परंतु, तुमच्या पालकांनी तुम्हाला समजून घ्यावे अशी अपेक्षा करण्याअगोदर, तुम्ही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
पालक देखील मानवच आहेत
“मी लहान होतो तेव्हा, आई ‘परिपूर्ण’ आहे व माझ्यासारख्या कमतरता व भावना तिला नाहीत असं मला स्वभावतः वाटायचं,” असे जॉन म्हणतो. मग, त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला व सात मुलांची काळजी घेण्याची जबाबदारी एकट्या आईच्या खांद्यावर आली. जॉनची बहीण जूली असे आठवून सांगते: “तिला सर्वकाही सांभाळावं लागायचं म्हणून दुःखी होऊन ती कशी रडायची हे मला आठवतं. मग मला कळलं की आमचा दृष्टिकोन चुकीचा होता. तिला सुद्धा नेहमीच सगळं काही अमुकअमुक समयी आणि अमुकअमुक पद्धतीनं करता येत नाही. तिला पण भावना आहेत व ती देखील मानवच आहे हे आम्ही ताडलं.”
तुमचे पालक तुमच्यासारख्याच भावना असलेले केवळ मानव आहेत हे जाणणेच, त्यांना समजून घेण्यासाठी उचललेले मोठे पाऊल आहे. उदाहरणार्थ, तुमचे योग्यपणे संगोपन करण्याविषयी त्यांना अत्यंत अक्षम असल्यासारखे वाटू शकते. किंवा, तुम्हाला तोंड द्याव्या लागणाऱ्या नैतिक धोक्यांमुळे व मोहांमुळे अस्वस्थ होऊन कदाचित ते काहीवेळा अवाजवी प्रतिक्रिया दाखवतील. त्यांना शारीरिक, आर्थिक किंवा भावनिक अडचणींना देखील तोंड द्यावे लागत असेल. उदाहरणार्थ, एखाद्या पित्याला त्यांची नोकरी मुळीच आवडत नसेल पण त्याविषयी ते कधीच तक्रार करत नसतील. म्हणून, त्यांचे लेकरू जेव्हा “मला ती शाळा आवडत नाही,” असे म्हणते तेव्हा सहानुभूतीने प्रतिसाद देण्याऐवजी, ते उलट खेकसून “आता तुला काय झालंय? तसं पाहिलं तर तुम्हाला काहीच त्रास नाही!,” असे म्हणतात यात काही आश्चर्य नाही.
‘दुसऱ्यांचे हित’ पाहा
तर मग, तुमच्या पालकांना कसे वाटते हे तुम्ही कसे ओळखू शकता? ‘आपलेच हित न पाहता दुसऱ्यांचेहि हित पाहण्याद्वारे.’ (फिलिप्पैकर २:४) तुमच्या आईला, ती तरुण असताना कशी होती ते विचारा. तिच्या भावना, तिची ध्येये काय होती? ‘टीन नियतकालिक म्हणते, “तिच्या भावना जाणून घेण्याची तुम्हाला इच्छा आहे व त्यांची कारणे तुम्हाला माहीत आहेत असे तिला वाटल्यास, ती तुमच्या भावनांबद्दलही अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करील अशी शक्यता आहे.” हेच तुमच्या वडिलांच्या बाबतीत देखील खरे ठरेल.
वितुष्ट उद्भवल्यास, तुमचे पालक निष्ठुर आहेत असा लगेच निष्कर्ष काढू नका. स्वतःला प्रश्न करा: ‘माझ्या पालकाची तब्येत बरी नव्हती किंवा त्यांना वा तिला कशाची चिंता होती का? माझ्या अविचारीपणाच्या कृत्याचं किंवा बोलण्याचं त्यांना अथवा तिला वाईट वाटलं का? मला जे म्हणायचंय त्याबद्दल त्यांचा नुसता गैरसमज होतोय का?’ (नीतिसूत्रे १२:१८) अशी समभावना दाखवणे, पिढ्यांमधील दरा मिटवण्याकरता उत्तम सुरवात आहे. आता तुमच्या पालकांनी तुम्हाला समजून घ्यावे याकरता तुम्ही प्रयत्न करू शकता! परंतु, काही तरुण हे काम अतिशय कठीण करून ठेवतात. ते कसे?
दुहेरी जीवन जगणे
सतरा वर्षांची मिनी आपल्या पालकांच्या मर्जीविरुद्ध एका मुलाशी लपूनछपून भेटण्याद्वारे हेच करत होती. आपल्या प्रियकराबद्दल असलेल्या भावना तिच्या पालकांना कळणारच नाहीत असे तिचे ठाम मत होते. स्वाभाविकपणे, तिच्यामधील व त्यांच्यामधील अंतर वाढतच गेले. “आम्ही एकमेकांचं जगणं कठीण करत होतो,” असे मिनी म्हणते. “मला घरी परतायला मुळीच आवडायचं नाही.” तिने लग्न करण्याचा निश्चय केला—घरातून सुटका मिळवण्यासाठी तिला काहीही चालले असते!
आपल्या पालकांच्या नकळत व त्यांनी मना केलेल्या गोष्टी करून—अनेक युवक अशाच प्रकारचे दुहेरी जीवन जगत असतात आणि वरून त्यांचे पालक ‘त्यांना समजून घेत नाहीत’ असे रडगाणेही गातात! सुदैवाने, मिनीला एका प्रौढ ख्रिस्ती स्त्रीकडून मदत मिळाली, जिने तिला सांगितले: “मिनी, तुझ्या पालकांचा जरा विचार कर . . . त्यांनी तुला लहानाचं मोठं केलं. जर तुला हे नातं जपता येत नसेल, तर तुझ्याच वयाची व्यक्ती, जिनं तुला १७ वर्षांचं प्रेमही दिलेलं नाही तिच्यासोबतचं नातं तू कसं जपणार?”
मिनीने प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केले. लवकरच तिला कळाले की तिच्या पालकांचे म्हणणे बरोबर होते व तिचे अंतःकरण जे सांगत होते ते चुकीचे होते. तिने तिच्या प्रियकराशी आपला संबंध तोडला तसेच स्वतःमधील व पालकांमधील दुरावा मिटवण्याचा प्रयत्न करू लागली. अशाचप्रकारे, तुम्ही देखील तुमच्या जीवनातील एखादा महत्त्वपूर्ण किस्सा तुमच्या पालकांपासून गुपित ठेवला असल्यास, त्यांच्याशी प्रामाणिक असण्याची ही वेळ नाही काय?—“मी माझ्या पालकांना कसे सांगू?” ही पुरवणी पाहा.
बोलण्याकरता वेळ काढा
‘आतापर्यंत माझ्या वडिलांसोबत घालवलेला तो सर्वात उत्तम समय होता!,’ असे जॉनने आपल्या पित्यासोबत फिरायला गेलेल्या प्रसंगाविषयी म्हटले. “त्यांच्यासोबत असं एकटं म्हणून मी आयुष्यात सहा तास कधीच घालवले नव्हते. जाताना सहा तास, येताना सहा तास. आम्ही कार रेडिओ
लावलाच नाही. मनसोक्त गप्पा मारल्या. जसं काय आम्ही एकमेकांना नव्यानेच भेटलो होतो. माझ्या कल्पनेपेक्षा ते कितीकरी मोठे आहेत. त्यादिवशी आम्ही मित्र बनलो.” अशाचप्रकारे, तुमच्या आईशी किंवा बाबांशी मोकळ्या मनाने गप्पा मारण्यात चांगला वेळ घालवण्याचा प्रयत्न का करू नये—तेही नियमितपणे?त्याचप्रमाणे इतर प्रौढांशी मैत्री केल्याने देखील मदत होते. मिनी आठवण करून सांगते: “वृद्ध लोकांशी माझा मुळीच घनिष्ठ संबंध नसायचा. पण माझे पालक इतर प्रौढांशी सहवास राखत तेव्हा मी त्यांच्यासोबतच राहण्याचा निश्चय केला. काही वेळाने, माझ्या पालकांच्या वयाच्या या लोकांसोबत माझी मैत्री जमली आणि यामुळे मला जीवनाकडे पाहण्याचा अधिक प्रगल्भ दृष्टिकोन लाभला. आता माझ्या पालकांशी बोलणं मला सोपं वाटू लागलं. घरातलं वातावरण कमालीचं सुधारलं.”
पुष्कळ वर्षांचा अनुभव असलेल्यांसोबत सहवास राखल्याने, तुम्ही जीवनाबद्दल संकुचित, चाकोरीबद्ध दृष्टिकोनातून पाहण्याचेही टाळाल; मात्र तुमच्या समवयस्कांसोबत संगती राखल्याने याच्या उलटच घडू शकते.—नीतिसूत्रे १३:२०.
तुमच्या भावना बोलून दाखवा
‘मी बोलतो ते सत्यच बोलतो, अगदी मनापासून कळकळीने बोलतो.’ (ईयोब ३३:३, सुबोध भाषांतर) कपडे, वेळेवरील निर्बंध किंवा संगीत या बाबींबद्दल तुमचे दुमत होते तेव्हा तुमच्या पालकांशी तुम्ही अशाच पद्धतीने बोलता का?
ग्रेगरी या तरुणाच्या मते, त्याची आई अतिशय अवाजवी होती. म्हणून, घरापासून होता होईल तितके दूर राहून त्याने त्यांच्यामधील संतप्त झगड्याचा सामना केला. पण नंतर, त्याने काही ख्रिस्ती वडिलांच्या सल्ल्यानुरूप कार्य केले. तो म्हणतो, “मला नेमकं काय वाटतं ते मी आईला सांगू लागलो. काही गोष्टी मला का करायच्यात ते मी तिला सांगितलं आणि कदाचित तिला त्याविषयी माहीत असावं असं गृहीत धरलं नाही. मी बहुतेकवेळा माझ्या मनातलं सगळं सांगायचो आणि मी काही चुकीचं करीत नाहीय आणि तिच्या अशा लहान मुलासारख्या वागवण्यानं मला किती वाईट वाटलं हे तिला समजावून सांगितलं. मग ती मला समजून घेऊ लागली आणि हळूहळू सर्वकाही पुष्कळसं सुधारलं.”
अशाच तऱ्हेने, “अगदी मनापासून” बोलून दाखवल्याने पुष्कळ गैरसमज मिटवण्यात मदत होऊ शकते असे तुम्हाला आढळेल.
दुमत झाल्यास काय करावे
परंतु, याचा अर्थ तुमचे पालक लगेचच तुमचे दृष्टिकोन स्वीकारतील असे नाही. यास्तव, तुम्ही तुमच्या भावनांवर ताबा ठेवला पाहिजे. “मूर्ख आपल्या मनातील सर्व क्रोध [भावना] व्यक्त करितो, पण सुज्ञ तो मागे आवरून ठेवितो.” (नीतिसूत्रे २९:११) तुमच्या दृष्टिकोनाच्या फायद्यांविषयी शांतपणे चर्चा करा. “बाकीचे सर्वजण करतात!,” असा वाद घालण्याऐवजी विषयांना धरून बोला.
काही वेळा तुमचे पालक नाही म्हणतील. याचा अर्थ ते तुम्हाला समजून घेत नाहीत असा होत नाही. त्यांना केवळ आपत्ती टाळायची असते. “माझी आई माझ्याबाबतीत खूप कडक आहे,” असे एक १६ वर्षांची मुलगी कबूल करते. “मला एखादी गोष्ट करता येत नाही, किंवा मी विशिष्ट वेळी घरी आलेच पाहिजे, असं ती सांगते तेव्हा मला त्याची फार कटकट वाटते. पण खरं पाहिलं, तर तिला माझी चिंता आहे. . . . ती माझी काळजी घेत असते.”
परस्परांना समजून घेण्यामुळे एखाद्या कुटुंबामध्ये जी सुरक्षा व स्नेहभाव निर्माण होतो तो शब्दात व्यक्त करता येत नाही. यामुळे, मनःस्तापाच्या वेळी घर आश्रयस्थान बनते. पण, हे साध्य करण्यासाठी संबंधित असलेल्या सर्वांनी खरोखर परिश्रम घेण्याची गरज आहे.
चर्चेसाठी प्रश्न
◻ युवक आणि पालकांमध्ये बहुधा वितुष्ट का उद्भवते?
◻ पालकांना योग्यप्रकारे समजून घेतल्याने, त्यांच्याबद्दलच्या तुमच्या दृष्टिकोनावर कसा प्रभाव पडू शकतो?
◻ तुम्ही तुमच्या पालकांना चांगल्या रीतीने कसे समजून घेऊ शकता?
◻ दुहेरी जीवन जगल्याने पालक व तुमच्यामधील दुरावा का वाढतो?
◻ तुम्हाला गंभीर समस्या असतात तेव्हा त्या पालकांना सांगणे उत्तम का आहे? तुम्ही त्याविषयी त्यांना कसे सांगू शकता?
◻ तुमच्या पालकांनी तुम्हाला योग्यप्रकारे समजून घ्यावे यासाठी तुम्ही त्यांची मदत कशी करू शकता?
[२२ पानांवरील संक्षिप्त आशय]
“[तुमच्या आईच्या] भावना जाणून घेण्यासाठी तुम्हाला इच्छा आहे व त्यांची कारणे तुम्हाला माहीत आहेत असे तिला वाटल्यास, ती तुमच्या भावनांबद्दलही अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करील अशी शक्यता आहे.”—‘टीन नियतकालिक
[२०, २१ पानांवरील चौकट/चित्र]
मी माझ्या पालकांना कसे सांगू?
तुमच्या पालकांजवळ एखादी चूक कबूल करणे ही आनंददायक गोष्ट नसते. विजय नामक एक तरुण म्हणतो: “माझ्या पालकांना माझ्यावर खूप भरवसा होता हे मला नेहमी जाणवायचं आणि म्हणून त्यांच्यापुढे जायला मला कठीण वाटत होतं कारण मला त्यांचं मन दुखवायचं नव्हतं.”
जे युवक पालकांना अंधारात ठेवतात त्यांचा विवेक त्यांना बोचत राहतो. (रोमकर २:१५) त्यांच्या चुका एखाद्या “जड ओझ्याप्रमाणे” वाहण्यास फार भारी होऊ शकतात. (स्तोत्र ३८:४) अगदी अनिवार्यपणे, त्यांना आपल्या पालकांना लबाड बोलून फसवणे भाग पडते, अशा तऱ्हेने ते आणखी चुका करतात. यास्तव, देवासोबतचा त्यांचा नातेसंबंध बिघडतो.
बायबल म्हणते: “जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही; जो ते कबूल करून सोडून देतो त्याजवर दया होते.” (नीतिसूत्रे २८:१३) एकोणीस वर्षांच्या बेट्टीच्या म्हणण्याप्रमाणे: “काहीही केलं तरी यहोवाला सर्वकाही दिसतं.”
एखाद्या गंभीर अपराधाशी संबंधित बाब असल्यास, तुमचा अपराध कबूल करून यहोवाकडे क्षमायाचना करा. (स्तोत्र ६२:८) यानंतर, तुमच्या पालकांना सांगा. (नीतिसूत्रे २३:२६) त्यांनी तुमच्यापेक्षा अधिक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले आहेत व बहुतेकवेळा ते तुम्हाला तुमच्या चुका मागे टाकून त्या पुन्हा न आचरण्यास मदत देऊ शकतात. “त्याविषयी बोलल्याने खरोखर मदत मिळू शकते,” असे १८ वर्षांची ख्रिस म्हणते. “मनावरचं ओझं एकदाचं हलकं केलं की मग हायसं होतं.” पण प्रश्न असा येतो की, पालकांना सांगायचे कसे?
बायबल ‘समयोचित भाषणाबद्दल’ बोलते. (नीतिसूत्रे २५:११; पडताळा उपदेशक ३:१, ७.) ते कधी शक्य असते? ख्रिस पुढे म्हणते: “मी संध्याकाळची जेवणं आटपेपर्यंत थांबते आणि मग बाबांना मला त्यांच्याशी काही बोलायचंय म्हणून सांगते.” एका एकट्या पालकाच्या मुलग्याने दुसरी वेळ निवडली: “मी सहसा झोपण्याआधीच आईशी बोलायचो; त्यावेळी ती जास्त निवांत असायची. कामावरून घरी आल्याआल्या मात्र तिला खूप ताण असायचा.”
तुम्ही कदाचित असे काही म्हणू शकता, “आई-बाबा, माझी एक समस्या आहे.” पण, तुमचे पालक कामात दंग असल्यामुळे लक्ष देऊ शकले नाहीत तर? तुम्ही म्हणू शकता, “तुम्ही कामात आहात, मला ठाऊक आहे, पण खरंच मला समस्या आहे. आपण जरा बोललं तर चालेल का?” मग तुम्ही विचारू शकता: “नंतर ज्याविषयी बोलायला
लाज वाटली असं तुमच्या हातून कधी काही घडलंय का?”आता सर्वात कठीण भाग येतो: पालकांना तुम्ही केलेल्या अपराधाबद्दल सांगणे. नम्रतेने बोला आणि “खरे बोला,” तुमच्या अपराधाचे गांभीर्य कमी करू नका किंवा कसलीही माहिती लपवण्याचा प्रयत्न करू नका. (इफिसकर ४:२५; पडताळा लूक १५:२१.) तुमच्या पालकांना समजेल अशा शब्दांत बोला, केवळ तरुणांनाच ज्याचा खास अर्थ कळतो अशा अभिव्यक्ती वापरू नका.
साहजिकच, तुमच्या पालकांना आधी दुःख वाटेल व ते निराश होतील. म्हणून भावनेच्या भरात तुम्हावर शब्दांची वृष्टी झाल्यास, आश्चर्य करू नका किंवा रागावू नका! तुम्ही त्यांच्या सूचना ऐकल्या असत्या, तर कदाचित तुमची अशी स्थिती झाली नसती. म्हणून शांत राहा. (नीतिसूत्रे १७:२७) तुमच्या पालकांचे ऐकून घ्या व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या, त्यांनी ते प्रश्न कसेही विचारले तरीसुद्धा.
निःसंशये, सर्वकाही सुरळीत करण्याविषयी तुम्ही खरेच गंभीर आहात हे पाहून त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडेल. (पडताळा २ करिंथकर ७:११.) तरीसुद्धा, उचित शिस्त स्वीकारण्यास तयार असा. “कोणतीहि शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते; तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते.” (इब्री लोकांस १२:११) हे देखील लक्षात असू द्या की, पुढेही तुम्हाला पालकांच्या मदतीची व त्यांच्या प्रौढ सल्ल्याची गरज भासेल. त्यांना प्रत्येक लहानसहान समस्यांविषयी सांगण्याची सवय लावा म्हणजे मोठ्या समस्या उद्भवतील तेव्हा तुमच्या मनात काय आहे ते सांगण्यास तुम्हाला भीती वाटणार नाही.
[चित्रं]
तुमचे पालक नेहमीपेक्षा अधिक ग्रहणशील मनःस्थितीत असतील अशी वेळ निवडा