व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

माझ्या पालकाच्या पुनर्विवाहाला मी कसे तोंड द्यावे?

माझ्या पालकाच्या पुनर्विवाहाला मी कसे तोंड द्यावे?

अध्याय ५

माझ्या पालकाच्या पुनर्विवाहाला मी कसे तोंड द्यावे?

“बाबांनी रीटाशी ज्या दिवशी लग्न केलं तो माझ्या जीवनातील सर्वात वाईट दिवस होता,” असे शेनने आठवून सांगितले. “मला खूप चीड आली होती. बाबांनी, आईशी विश्‍वासघात केल्यामुळे मी त्यांच्यावर फार चिडले होते. आईवर सुद्धा चिडले होते कारण तिने आम्हाला एकटे टाकून विधी विद्यालयात प्रवेश घेतला होता. ती दोन कार्टी, रीटाची मुलं, जी आमच्या घरी राहायला येणार होती त्यांची पण खूप चीड आली होती . . . पण सर्वात जास्त मला रीटाची अतिशय चीड आली होती . . . मला तिचा तिरस्कार वाटत होता. आणि द्वेष वाटणं योग्य नाही हे मला ठाऊक असल्यामुळे, मी स्वतःवर सुद्धा चिडले होते.”—लिंडा क्रेवनने लिहिलेले सावत्र कुटुंबे—सुसंगततेतील नवीन नमुने (इंग्रजी).

पालकांतील एकाने पुनर्विवाह केल्यामुळे तुमचे पालक पुढे एकत्र येतील ही आशा नष्ट होते. त्यामुळे तुम्हाला असुरक्षित, विश्‍वासघात केल्याप्रमाणे व द्वेषपूर्ण देखील वाटू शकते.

परमप्रिय पालकाच्या मृत्यूनंतर लगेचच पुनर्विवाह झाल्यास, आणखीनच वाईट वाटू शकते. “माझ्या आईच्या मृत्यूनंतर मी अतिशय अकसखोर बनले,” असे १६ वर्षांची मिस्सी कबूल करते. “माझ्या बाबांची होणारी बायको माझ्या आईची जागा घेऊ पाहतेय असं मला वाटलं म्हणून मी तिच्याशी फार कठोरतेने वागू लागले.” तुमच्या सख्ख्या पालकाशी निष्ठावान असल्यामुळे तुम्ही सावत्र पालकाप्रती प्रेम प्रदर्शित करू लागता तेव्हा तुम्हाला दोषी देखील वाटू शकते.

म्हणूनच, यात काहीच आश्‍चर्य नाही, की पुष्कळ युवक आपले भावनिक दुःख अपायकारक मार्गांनी व्यक्‍त करतात. काहीजण तर, त्यांच्या पालकांचा नवीन विवाह मोडून टाकण्याची देखील योजना करतात. पण लक्षात असू द्या, की तुमच्या सख्ख्या पालकाने आणि सावत्र पालकाने देवासमोर शपथ घेतली आहे. “म्हणून, देवाने जे जोडले आहे ते माणसाने [किंवा मुलाने] तोडू नये.” (मत्तय १९:६) तसेच, तुम्ही त्यांना विभक्‍त केले तरी त्यामुळे तुमचे सख्खे पालक काही एकत्र येणार नाहीत.

तसेच सावत्र पालकाशी सतत झगडणे देखील निरर्थक आहे. नीतिसूत्रे ११:२९ असा इशारा देते: “जो घरच्यांस दुःख देतो त्याच्या वाट्याला वारा येईल,” म्हणजेच, त्यातून काहीच निष्पन्‍न होणार नाही. पंधरा वर्षांच्या ज्योतीने आपल्या सावत्र आईबद्दल मनात राग बाळगल्यामुळे शेवटी त्यांचे फार कडाक्याचे भांडण झाले. त्याचा परिणाम? एकतर तू माझी निवड कर नाहीतर तिची निवड कर, असे तिच्या सावत्र आईने ज्योतीच्या बाबांना अगदी स्पष्ट बोलून दाखवले. शेवटी ज्योतीला तिच्या सख्ख्या आईकडे जावे लागले—तिने देखील पुनर्विवाह केला होता.

प्रेम तुम्हाला सामना करण्यास मदत करते

पालकांच्या पुनर्विवाहाला यशस्वीरित्या तोंड देण्यामागील रहस्य काय आहे? पहिले करिंथकर १३:४-८ मध्ये वर्णन केल्यानुसार तत्त्वनिष्ठ प्रेम प्रदर्शित करणे:

प्रीती “स्वार्थ पाहत नाही.” याचा अर्थ “आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्‍याचे पाहावे.” (१ करिंथकर १०:२४) एखाद्या पालकाने त्यांना पुन्हा एकदा वैवाहिक सोबत्याच्या संगतीची आवश्‍यकता आहे असे ठरवल्यास, तुम्ही त्याबद्दल राग बाळगावा का?

“प्रीती हेवा करीत नाही.” बहुधा, युवकांना त्यांच्या सख्ख्या पालकांनी इतरांना प्रेम दाखवलेले आवडत नाही. पण तुमच्या पालकांचे तुमच्यावर प्रेम राहणार नाही अशी भीती तुम्हाला बाळगण्याची गरज नाही कारण प्रीती अनेकांना सामील करू शकते. (पडताळा २ करिंथकर ६:११-१३.) तुमचे सख्खे पालक तुमच्यावरचे प्रेम कमी न करता एखाद्या नवीन सोबत्यावरही प्रेम करू शकतात! तुम्ही देखील आपल्या अंतःकरणात एखाद्या सावत्र पालकाला सामावून घ्याल का? असे केल्याने तुम्हाला सोडून गेलेल्या तुमच्या पालकाप्रती तुम्ही अविश्‍वासू झालात असे मुळीच होणार नाही.

प्रीती “गैरशिस्त वागत नाही.” विरुद्ध लिंगाच्या नवीन भावांसोबत किंवा बहिणींसोबत राहू लागल्यामुळे नैतिक दबाव येऊ शकतात. अहवालांनुसार, २५ टक्के सावत्र कुटुंबांमध्ये, कौटुंबिक सदस्यांबरोबर अनुचित लैंगिक संबंध ठेवले जातात.

ज्याच्या आईने पुनर्विवाह केल्यामुळे घरात चार किशोरवयीन सावत्र बहिणी आल्या तो डेवीड म्हणतो, “लैंगिक भावनांवर ताबा ठेवावा लागला.” तुम्हाला फाजील सलगी न ठेवण्याबद्दलही सावध असण्याची गरज आहे व तुमचा पोषाख किंवा तुमचे वर्तन लैंगिकरित्या उत्तेजक नाही याची तुम्ही खात्री केली पाहिजे.—कलस्सैकर ३:५.

प्रीती “सर्वकाही सहन करते . . . सर्वकाही सहन करण्यास आपल्याला शक्‍ती देते.” (चार्ल्स बी. विल्यमचे भाषांतर) काहीवेळा, तुमच्या दुःखी भावना काही केल्या जात नाहीत! मार्लाने असे कबूल केले: “माझ्या घरात मला काहीच किंमत नव्हती असं मला वाटलं. माझा जन्मच झाला नसता तर बरं झालं असतं असं मी माझ्या आईला सांगितलं पण.” मार्लाने बंड केले आणि ती पळूनही गेली! परंतु, ती आता म्हणते: “सहन करणंच सर्वात उत्तम.” तुम्ही अशाचप्रकारे सहन केले, तर तुम्हाला सुरवातीला वाटलेली कटुता, गोंधळ आणि दुःख कालांतराने शमेल.

‘तू माझी खरी आई नाहीस!’ (किंवा, ‘तुम्ही माझे खरे बाबा नाहीत!’)

नवीन पालकांकडून शिस्त स्वीकारणे सोपे नसते, आणि सावत्र पालकाने काही करण्यास सांगितल्यावर, ‘तू माझी खरी आई नाहीस!’ किंवा ‘तुम्ही माझे खरे बाबा नाहीत!,’ असे पटकन बोलावेसे वाटेल. पण, १ करिंथकर १४:२० मध्ये दिलेले तत्त्व लक्षात आणा: “समजुतदारपणाबाबत प्रौढासारखे व्हा.”

तुम्हाला शिस्त देण्याच्या तुमच्या सावत्र पालकाच्या अधिकारास स्वीकारणे हा ‘समजुतदारपणाबाबत तुम्ही प्रौढासारखे झालात’ हे दाखवण्याचा एक मार्ग आहे. तो किंवा ती तुमच्या सख्ख्या पालकाची भूमिका निभावतो किंवा निभावते आणि म्हणून ते आदरास पात्र आहेत. (नीतिसूत्रे १:८; इफिसकर ६:१-४) बायबल काळात, एस्तेरचे पालक निवर्तल्यानंतर तिला एका दत्तक पित्याने किंवा ‘पालनपोषण करणाऱ्‍याने’ सांभाळले. मर्दखय तिचा सख्खा पालक नव्हता तरीसुद्धा तो तिला ‘आज्ञा देत होता’ ज्या तिने प्रौढ झाल्यावरही मानल्या! (एस्तेर २:७, १५, १७, २०) खरे पाहता, सावत्र पालकाच्या शिस्तीवरून तुमच्याविषयी त्यांना प्रेम व चिंता आहे हे दिसून येते.—नीतिसूत्रे १३:२४.

तरीही, उचित तक्रारी राहतीलच. असे असल्यास, “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा,” असे कलस्सैकर ३:१३ मध्ये आर्जवले आहे त्याप्रमाणे वागून स्वतःला ‘प्रौढ’ सिद्ध करा.

सहभागिता करण्यास, तडजोड करण्यास शिका

पंधरा वर्षांची जॅमी आपल्या आईसोबत एकटीच राहायची तेव्हा, तिची स्वतःची वेगळी खोली होती आणि ती महागडे कपडे घालायची. तिच्या आईने पुनर्विवाह केला आणि जॅमीला आता चार मुले असलेल्या कुटुंबात राहावे लागले तेव्हा, सर्वकाही बदलले. “आता मला माझी स्वतःची स्वतंत्र खोली देखील नाही,” असे ती दुःखाने म्हणते. “मला सर्वकाही वाटून घ्यावं लागतं.”

तुम्हालाही कदाचित ज्येष्ठ असण्याचे अथवा एकटे मूल असण्याचे स्थान त्यागावे लागेल. तुम्ही मुलगा असल्यास, दीर्घ काळापर्यंत तुम्ही घरातील कर्ता पुरुष म्हणून काम केले असेल—पण आता हे स्थान तुमच्या सावत्र वडिलांचे झाले असेल. किंवा तुम्ही मुलगी असल्यास, कदाचित तुम्ही व तुमची आई बहिणींसारख्या असाल, दोघी एकाच खोलीतही झोपत असाल, पण आता तुमच्या सावत्र वडिलांमुळे तुम्हाला वेगळे व्हावे लागले असावे.

“तुमचा समंजसपणा सर्वांना कळून येवो,” अशी शिफारस बायबल करते. (फिलिप्पैकर ४:५, NW) येथे वापरलेल्या मूळ शब्दाचा अर्थ “नमणे” असा होतो आणि त्यातून नेहमीच आपला योग्य हक्क बजावू न पाहणाऱ्‍या व्यक्‍तीचा आत्मा प्रदर्शित करतो. म्हणून, नमते घेणारे, तडजोड करणारे असण्याचा प्रयत्न करा. तुमच्या नवीन परिस्थितीचा होता होईल तितका लाभ घ्या आणि गतकाळाचा विचार करत बसू नका. (उपदेशक ७:१०) सावत्र भाऊ आणि बहिणींसोबत सर्वकाही वाटून घेण्याची इच्छा दाखवा आणि त्यांना परक्यांसारखी वागणूक देऊ नका. (१ तीमथ्य ६:१८) तुम्ही एकमेकांना जितक्या लवकर सख्ख्या भाऊ-बहीणींप्रमाणे वागवू लागाल तितक्याच लवकर एकमेकांबद्दल प्रेम वाटू लागेल. घरातील नवीन पुरुषाबाबतीत पाहता, त्याचा राग करू नका. घरातील जबाबदारींचे ओझे उचलण्यात तो हातभार लावतो म्हणून कृतज्ञ असा.

असमान वागवणुकीस तोंड देणे

आपला सावत्र पिता आपल्यावर प्रेम करतो हे कबूल केल्यावर, एक तरुणी म्हणते: “पण फरक पडतोच. ते आमच्याच वयाच्या स्वतःच्या मुलांपेक्षा . . . आमच्याकडून अधिक अपेक्षा करतात, जास्त शिक्षा करतात, आम्हाला इतकं समजून घेत नाहीत. इथंच सर्वकाही अडतं.”

एखाद्या सावत्र पालकाला आपल्या सख्ख्या मुलाबद्दल जसे वाटते तसे त्याला सावत्र मुलाबद्दल वाटणार नाही हे जाणून घ्या. हा फरक, सख्ख्या मुलासोबत रक्‍ताचे नाते असल्यामुळे नव्हे, तर जीवनात एकत्र मिळून घेतलेल्या अनुभवामुळे असतो. तसे पाहिल्यास, रक्‍ताचे नाते असलेला पालकही एका मुलापेक्षा दुसऱ्‍या मुलाचा अधिक लाड करत असतील. (उत्पत्ति ३७:३) तथापि, समान आणि योग्य यामध्ये एक महत्त्वपूर्ण भेद आहे. लोकांची विभिन्‍न व्यक्‍तिमत्त्वे आणि निरनिराळ्या गरजा असतात. म्हणून, तुम्हाला समान वागणूक दिली जात आहे का याबद्दल अनावश्‍यक चिंता करण्याऐवजी तुमचा सावत्र पालक तुमच्या गरजा पूर्ण करतो का हे पाहण्याचा प्रयत्न करा. त्या पूर्ण केल्या जात नाहीत असे तुम्हाला वाटते तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या सावत्र पालकासोबत याबद्दल चर्चा करू शकता.

तुमचे सावत्र भाऊ आणि सावत्र बहिणी देखील भांडणाचे कारण असू शकतात. त्यांना देखील सावत्र कुटुंबातील परिस्थितीशी जुळवून घ्यायला कठीण जात असेल हे विसरू नका. तेही कदाचित तुम्हाला त्यांच्या कुटुंबातील कोणी तिऱ्‍हाईत व्यक्‍ती समजून तुमच्यावर चिडत असतील. म्हणून होता होईल तितके चांगले वागा. ते तुमच्याशी उद्धटपणे वागत असतील, तर ‘बऱ्‍याने वाईटाला जिंकण्याचा’ प्रयत्न करा. (रोमकर १२:२१) शिवाय, सख्ख्या भावंडांमध्ये सुद्धा अधूनमधून भांडणे होतात यात कोणतीच असामान्य गोष्ट नाही.—अध्याय ६ पाहा.

सहनशीलता सार्थक ठरते!

“[एखाद्या] गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा; उन्मत्त मनाच्या इसमापेक्षा सहनशील मनाचा इसम बरा.” (उपदेशक ७:८) सामान्यपणे, सावत्र कुटुंबातील सदस्यांवर भरवसा विकसित होऊन त्यांच्यासोबत अगदीच रूळून जाण्यासाठी पुष्कळ वर्षे लागतात. तेव्हा कोठे सवयींचा आणि मूल्यांचा मेळ बसून व्यवहार्य नित्यक्रम घडून येतो. म्हणून सहनशील असा! तुम्हाला “लागलीच प्रेम” मिळेल किंवा तुमचे “लगेचच कुटुंब” तयार होईल अशी अपेक्षा धरू नका.

थॉमसच्या आईने पुनर्विवाह केला तेव्हा खरे सांगायचे म्हणजे त्याला खूप विचित्र वाटले. त्याच्या आईला चार मुले होती आणि तिने ज्या माणसाशी लग्न केले त्याला तीन मुले होती. “आमच्यात भांडणं, वादविवाद, फाटाफूट, भयंकर भावनिक तणाव असायचे,” असे थॉमस लिहितो. कालांतराने कशामुळे सर्वकाही सुरळीत झाले? “बायबलची तत्त्वे लागू केल्याने; प्रत्येक वेळी लगेचच नाही पण देवाच्या आत्म्याची फळे अंमलात आणल्याने हळूहळू परिस्थिती सुधारल्या.”—गलतीकर ५:२२, २३.

बायबल तत्त्वांप्रमाणे चालल्याने सावत्र कुटुंब यशस्वी ठरते हे आम्ही मुलाखत घेतलेल्या युवकांच्या निम्नलिखित अनुभवांवरून दिसून येते:

यशस्वी सावत्र कुटुंबांमधील युवक

मुलाखत घेणारा: तुमच्या सावत्र पालकांच्या शिस्तीबद्दल राग व्यक्‍त करण्याचे तुम्ही कसे टाळले?

लिंच: माझी आई आणि सावत्र वडील नेहमीच शिस्त देताना सहमत असायचे. समजा काही झालं, तर ते दोघंही निर्णय घ्यायचे, म्हणून मला मार मिळाला की तो दोघांकडून आहे हे माहीत असायचं.

लिंडा: सुरवातीला हे फारच कठीण होतं कारण मी म्हणायचे, “तुम्ही कोण मला सांगणारे?” पण मग, मी विचार केला की बायबल म्हणतं ‘आपल्या आईबापाचा मान राख.’ ते माझे सख्खे वडील नसले, तरी देवाच्या दृष्टीने ते माझे वडीलच होते.

रॉबिन: आईला प्रिय असणाऱ्‍या व्यक्‍तीचा मी राग केल्यास ती दुखावली जाईल याची मला कल्पना होती.

मुलाखत घेणारा: चांगल्या दळणवळणाला कशामुळे चालना मिळाली?

लिंच: तुमचा सावत्र पालक जे काही करतो त्यामध्ये तुम्हाला रस घ्यावा लागतो. मी त्यांना त्यांच्या प्रापंचिक कामात मदत करायचे. आणि काम करताना आम्ही खूप गप्पा मारायचो. यामुळे ते कसा विचार करतात हे मला पाहायला मिळालं. इतर वेळा, आम्ही फक्‍त ‘इकडच्या तिकडच्या’ गप्पा मारायचो.

वॅलरी: मी आणि माझ्या सावत्र आईने एकमेकींच्या संगतीत खूप वेळ घालवला, मग मला तिचा स्वभाव समजला. आम्ही अगदी जिवलग मैत्रिणी झालो.

रॉबिन: माझ्या आईने पुनर्विवाह करायच्या एक वर्षाआधीच माझे वडील वारले होते. मी माझ्या सावत्र वडिलांशी जास्त सलगी ठेवत नव्हतो कारण त्यांनी माझ्या पित्याची जागा घ्यावी हे मला रुचलं नाही. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर सावरण्यासाठी आणि माझ्या सावत्र वडिलांशी जवळीक राखण्यासाठी मदत मिळावी म्हणून मी देवाला प्रार्थना करायचो. मी खूप खूप प्रार्थना केली. यहोवाने खरंच माझ्या प्रार्थनांचं उत्तर दिलं.

मुलाखत घेणारा: जवळीक राखण्यासाठी तू काय केलंस?

वॅलरी: कधी कधी मी माझ्या सावत्र आईला माझ्याबरोबर सिनेमाला यायला सांगायचे—फक्‍त आम्ही दोघीच हं. किंवा मी कधी बाहेर गेले, की तिच्यासाठी फुलं किंवा फुलदाणी आणायचे, म्हणजे मी तिचा विचार करते हे दाखवण्यासाठी काहीतरी घेऊन यायचे. ती त्याची मनापासून प्रशंसा करायची.

एरीक: दोघांनाही आवडेल अशी एखादी गोष्ट पाहावी लागते. माझ्या सावत्र वडिलांनी माझ्या आईशी लग्न केलं होतं आणि आम्ही एकाच घरात राहायचो यापलीकडे आमच्यात काहीएक सारखं नव्हतं. मग, मी देखील त्यांच्याप्रमाणे बायबलमध्ये रस घेऊ लागलो तेव्हा ते सर्वात मदतदायी ठरलं. मी जसजसं यहोवा देवाच्या जवळ गेलो, तसतसं माझ्या सावत्र वडिलांच्याही जवळ येत गेलो. आता मात्र खरंच आमची आवडनिवड एकसारखी झाली होती!

मुलाखत घेणारा: तुम्हाला व्यक्‍तिगतरित्या याचा लाभ कसा मिळाला?

रॉबिन: मी एकटा माझ्या आईबरोबर राहायचो तेव्हा मी बंडखोर आणि खूप लाडावलेला होतो. मला नेहमीच माझ्या मर्जीनं सगळं काही व्हायला हवं असं वाटायचं. आता मी इतरांचाही विचार करण्याचं आणि अधिक निःस्वार्थी बनण्याचं शिकलोय.

लिंच: माझ्या सावत्र वडिलांनी मला एखाद्या मोठ्या माणसासारखा विचार करायला मदत केली. त्यांनी मला कुशलता प्राप्त करण्याचं आणि स्वतःच्या हातांनी काम कसं करायचं ते शिकवलं. अतिशय कठीण समयात मला कुणाचा तरी आधार हवा असायचा तेव्हा ते नेहमी माझ्या पाठीशी असत. खरंच, ते सर्वात उत्तम पिता ठरलेत.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ अनेक युवकांना, त्यांचे पालक पुनर्विवाह करतात तेव्हा कसे वाटते? का?

◻ ख्रिस्ती प्रेम दाखवल्याने एखाद्या युवकाला परिस्थितीचा सामना करण्यास कशी मदत मिळते?

◻ तुम्ही सावत्र पालकाकडून शिस्त स्वीकारावी हे जरूरी आहे का?

◻ तडजोड कशी करावी आणि आपापसांत वाटून कसे घ्यावे हे जाणणे महत्त्वाचे का आहे?

◻ सावत्र भाऊ-बहिणींसोबत तुम्हालाही समानतेने वागवले जावे अशी अपेक्षा तुम्ही करावी का? तुम्हाला योग्यपणे वागवले जात नाही असे वाटल्यास काय?

◻ तुमच्या सावत्र पालकासोबत तुमचे अधिक चांगले जमायला मदत मिळावी म्हणून तुम्ही काय काय करू शकता?

[४५ पानांवरील संक्षिप्त आशय]

“माझ्या बाबांची होणारी बायको माझ्या आईची जागा घेऊ पाहतेय असं मला वाटलं म्हणून मी तिच्याशी फार कठोरतेने वागू लागले”

[४३ पानांवरील चित्र]

पालकाच्या पुनर्विवाहामुळे बहुधा राग, असुरक्षा आणि द्वेषाच्या भावना निर्माण होतात

[४६ पानांवरील चित्र]

सावत्र पालकाच्या शिस्तीबद्दल बहुधा राग व्यक्‍त केला जातो