व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

माझ्या भावासोबत आणि बहिणीसोबत माझे का जमत नाही?

माझ्या भावासोबत आणि बहिणीसोबत माझे का जमत नाही?

अध्याय ६

माझ्या भावासोबत आणि बहिणीसोबत माझे का जमत नाही?

भावंडांमधील चढाओढ—ती कहाणी काइन आणि हाबेलपासून चालत आली आहे. तुम्ही तुमच्या भावंडाचा (भाऊ किंवा बहीण) द्वेष करता असे नाही. एका युवकाने कबूल केले: “मला आता जाणवत नसलं, तरी अगदी अंतःकरणापासून मी माझ्या भावावर प्रेम करतो असं मला वाटतं. हो, प्रेमच करतो.”

भावंडांमधील नातेसंबंधांच्या मागे इतके वैमनस्य का लपलेले असते? लेखक हॅरीएट वेबस्टर, कुटुंब उपचारतज्ज्ञ क्लॉडिया श्‍वेट्‌झर यांचे म्हणणे सांगतात: “प्रत्येक कुटुंबाचा काही ठेवा असतो, भावनिक आणि भौतिकही.” वेबस्टर पुढे म्हणतात: “मुले भांडतात तेव्हा ते याच ठेव्यासाठी स्पर्धा करत असतात, ज्यामध्ये पालकांच्या प्रेमापासून पैसा आणि कपडालत्ता हे सर्वकाही समाविष्ट असते.” उदाहरणार्थ, कॅमिली आणि तिची पाच भावंडे मिळून तीन बेडरूमस्‌मध्ये राहतात. “कधी कधी मला एकटं राहावसं वाटतं,” असे कॅमीली म्हणते, “आणि त्यांना बाहेर घालवावसं वाटतं पण ते नेहमी तिथंच असतात.”

विशेषाधिकार आणि घरातील जबाबदाऱ्‍या वाटून घेण्यावरूनही भांडणे उद्‌भवू शकतात. मोठ्या मुलांकडून सर्वात जास्त काम करण्याची अपेक्षा केल्यामुळे त्यांना कदाचित राग येईल. एखाद्या मोठ्या मुलाने दादागिरी केल्यास लहान मुलांना चीड येऊ शकते किंवा मोठ्या मुलांना आवडीचे विशेषाधिकार मिळतात तेव्हा त्यांना ईर्ष्या वाटू शकते. ‘माझी बहीण गाडी चालवायला शिकते पण मी शिकू शकत नाही,’ असे इंग्लंडमधील एक किशोरवयीन मुलगी म्हणते. ‘मला खूप चीड येते आणि मी तिला त्रास देण्याचा प्रयत्न करते.’

काहीवेळा मुलांमधील मतभेद फक्‍त व्यक्‍तिमत्त्वातील विरोधामुळे असतात. सतरा वर्षांची नयन तिच्या भावडांबद्दल म्हणते: “दररोज तुम्ही एकमेकांना पाहत असाल, अगदी सकाळ-संध्याकाळ . . . आणि तुम्हाला चीड आणणारे काम करत असलेल्या त्याच त्याच व्यक्‍तीला दररोज पाहिलं—की मग तुमचं डोकं ठिकाणावर राहतच नाही.” लहान ॲन्ड्रे म्हणतो: “तुम्ही घरी असता . . . , तेव्हा तुमच्या खऱ्‍या रूपात असता.” दुर्दैवाने, बहुतेकवेळा ‘तुमच्या खऱ्‍या रूपात असणे’ याचा अर्थ सभ्यता, नम्रता आणि युक्‍ती टाकून देणे असा होतो.

पालकांच्या आवडी, (‘तू आईला जास्त प्रिय आहेस!’) मुलांमधील आणखी एक भांडणाचे मूळ आहे. मानसशास्त्राचे प्राध्यापक ली सॉक मान्य करतात: “एका पालकाला तिची सर्वच मुलं एकसारखीच प्रिय वाटणार नाहीत कारण ते सर्व वेगवेगळे असतात आणि म्हणून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने वागवलं जातं हे अगदी साहजिक आहे.” हे बायबल काळात खरे होते. कुलपिता याकोब (इस्राएल) “आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीति करीत असे.” (उत्पत्ति ३७:३) योसेफाचे भाऊ त्याचा अतिशय द्वेष करू लागले.

विस्तव विझवणे

“सरपण नसल्यामुळे विस्तव विझतो.” असे नीतिसूत्रे २६:२० म्हणते. जंगलातील वणवा बहुधा अग्निरोधकांमुळे म्हणजेच सर्व झाडे काढलेली असतात अशा भागांमुळे थांबवला जातो. वणवा लागलाच, तर तो फक्‍त त्या ठिकाणापर्यंतच पसरतो आणि मग विझून जातो. त्याचप्रमाणे, मतभेद टाळण्याचे—किंवा निदान मर्यादित ठेवण्याचे तरी मार्ग आहेत. वादविवाद वाढण्याआधीच दळणवळण करणे आणि तडजोडीचा मार्ग काढणे हा एक मार्ग आहे.

उदाहरणार्थ, एकान्त न मिळण्याची समस्या आहे काय? असे असल्यास, जेव्हा वातावरण थंड असते तेव्हा, एकत्र बसून खरोखरचा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न करा. (‘मला खोली या दिवशी/या वेळी मिळेल, आणि तुला या वेळी मिळेल.’) मग, जी बोलणी केली आहे त्यानुसार वागून “तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही” असे असू द्या. (मत्तय ५:३७) काहीसा बदल करण्याची आवश्‍यकता भासलीच, तर तो बदल त्याच्या किंवा तिच्या अजाणतेत त्यांच्यावर थोपवण्याऐवजी त्या व्यक्‍तीला आधीच त्याबद्दल सांगा.

एखादी वस्तू कोणाची आहे यावर तुम्ही भांडता का? एका किशोरवयीन मुलीने अशी तक्रार केली: “माझी सावत्र बहीण मला न विचारताच माझ्या सर्व वस्तू वापरते. तिने माझा मेकअप सुद्धा वापरला आणि वर मलाच सांगते की तू आणलेला मेकअप काही धड नाही म्हणून!” तुमच्या पालकांना तुम्ही निकाल देणारे पंच ठरवू शकता. पण त्याहून चांगले म्हणजे, एखाद्या निवांत क्षणी आपल्या भावाबरोबर किंवा बहिणीबरोबर बसून याविषयी बोला. व्यक्‍तिगत “हक्कांबद्दल” निरर्थक काथ्याकूट करण्याऐवजी “दानशूर” असा. (१ तीमथ्य ६:१८) उसने घेण्याबद्दल काही नियम ठरवा, यातील एक नियम म्हणजे, उसने घेण्याआधी ते नेहमी विचारून घेणे हा असू शकतो. आवश्‍यकता भासल्यास, तडजोडी करा. अशाप्रकारे, विस्तव पेटण्याआधी ‘तो विझत असलेला’ तुम्हाला दिसेल!

पण भावंडातील एखाद्याचे व्यक्‍तिमत्त्व तुम्हाला वैताग आणत असल्यास काय? हे खरे की, त्यास बदलण्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून, ‘एकमेकांना प्रीतीने वागवून घेण्याचे’ शिका. (इफिसकर ४:२) भावंडाच्या चुका आणि दोष मोठे करून सांगण्याऐवजी ख्रिस्ती प्रीती अंमलात आणा, जी “पापांची रास झाकून टाकते.” (१ पेत्र ४:८) कठोर किंवा निष्ठुर असण्याऐवजी, “क्रोध, संताप, दुष्टपण, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे” ही दूर करा आणि “तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्‍त” असू द्या.—कलस्सैकर ३:८; ४:६.

‘हा अन्याय आहे!’

“माझ्या बहिणीला जे हवं ते सर्वकाही मिळतं,” अशी एक युवती आपली नाराजी व्यक्‍त करते. “पण माझ्या वेळेस मात्र मला पूर्णपणे वगळलं जातं.” ऐकल्यासारखे वाटते का? पण त्या दोन टोकाच्या अभिव्यक्‍तींकडे नीट लक्ष द्या, “सर्वकाही” आणि “पूर्णपणे.” पण परिस्थिती खरोखरच इतक्या टोकाला गेलेली आहे का? बहुतेक नाही. तसेच ते खरे असले तरीही, दोन विविध व्यक्‍तींना अगदीच समान वागणूक दिली जाण्याची अपेक्षा करणे व्यावहारिक आहे का? मुळीच नाही! तुमचे पालक केवळ तुमच्या व्यक्‍तिगत गरजा आणि स्वभावानुसार तुम्हाला वागवत असतील.

पण पालकांनी एकाच विशिष्ट मुलाला अधिक प्रिय मानणे अयोग्य नाही का? नेहमीच नाही. याकोबाने आपला मुलगा योसेफ याला कसे प्रिय समजले ते आठवा. त्याचे कारण? योसेफ, हा याकोबाची दिवंगत पत्नी राहेल हिचा मुलगा होता. म्हणूनच, याकोबाला आपला हा मुलगा जास्त जवळचा वाटायचा हे अगदी समजण्याजोगे नाही का? तथापि, याकोबाला योसेफाबद्दल प्रेम वाटत असल्यामुळे त्याने त्याच्या इतर मुलांना वगळले नाही, कारण त्याने त्यांच्या हिताबद्दल खरोखर चिंता व्यक्‍त केली होती. (उत्पत्ति ३७:१३, १४) यास्तव, योसेफाबद्दल त्यांना वाटणारी ईर्ष्या निराधार होती!

त्याचप्रमाणे, तुमच्या पालकांना देखील तुमच्या भावाकडे किंवा बहिणीकडे कदाचित समान आवडीनिवडी, एकसारखेच व्यक्‍तिमत्त्व यांमुळे किंवा इतर कारणांमुळे ओढ वाटत असेल. याचा अर्थ ते तुमच्यावर प्रेम करत नाहीत असे नाही. तुम्हाला राग येत असला किंवा ईर्ष्या वाटत असली, तर तुमच्या अपरिपूर्ण अंतःकरणाने तुमच्यावर विजय मिळवला आहे हे लक्षात घ्या. अशा भावनांवर मात करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या गरजा पूर्ण होत असल्यास, भावंडातील एखाद्याकडे जास्त लक्ष दिले जात असल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ होण्याची काय गरज आहे बरे?

भाऊ आणि बहिणी—एक आशीर्वाद

काहीवेळा यावर विश्‍वास करणे कठीण असेल—विशेषतः ते तुम्हाला वैताग आणतात तेव्हा. पण लहान नयन आपल्याला अशी आठवण करून देते: “भाऊ-बहिणी असल्या की मजा येते.” तिला सात भाऊ-बहिणी आहेत. “तुमच्याशी बोलायला आणि आपल्या आवडीनिवडी सांगायला कोणीतरी असतं.”

ॲन मरी आणि तिचा भाऊ ॲन्ड्रे पुढे असे म्हणतात: “तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ठिकठिकाणी जाऊ शकत असला, तरी तुमच्या भाऊ-बहिणींसोबत देखील जाऊ शकता. तुम्हाला खेळ खेळायचा असला किंवा बागेत जायचं असलं तर ते नेहमीच तयार असतात.” डॉन्‍नाला आणखी एक व्यावहारिक फायदा दिसून येतो: “घरातली कामं वाटून घ्यायला कोणतरी असतं.” इतरांनी आपल्या भावाबद्दल किंवा बहिणीबद्दल “खास सल्ला देणारे किंवा ऐकणारे” आणि “समजून घेणारे” असे म्हटले आहे.

तुमच्या भावाबरोबर किंवा बहिणीबरोबर तुम्हाला ज्या समस्या येतात अगदी त्याच नंतरच्या जीवनात इतरांबरोबरही येतील. ईर्ष्या, वस्तूंवरील हक्क, असमान वागणूक, एकांत नसणे, स्वार्थीपणा, व्यक्‍तिगत भेद—अशा समस्या जीवनाचा भाग आहेत. तुमच्या भाऊ-बहिणींसोबत जुळवून घेण्याचे शिकणे हे मानवी नातेसंबंधाच्या क्षेत्रातील उत्तम तालीम आहे.

“तुम्हाला दिसत असलेल्या लोकांशी तुमचं पटत नसलं, तर ज्या यहोवाला तुम्ही पाहू शकत नाही त्याच्याशी तुमचं कसं पटेल?,” असे सतरा वर्षांचा ॲन्ड्रे म्हणतो तेव्हा तो १ योहान ४:२० मधील बायबलच्या शब्दांची पुनरुक्‍ती करतो. तुमच्या भाऊ-बहिणींसोबत मतभेद तर अधूनमधून होतच राहतील. पण तुम्ही वाटून घ्यायला, दळणवळण आणि तडजोड करायला शिकू शकता. अशा प्रयत्नाचा परिणाम? तुम्हाला असे वाटू लागेल की, भाऊ किंवा बहीण असणे इतके काही वाईट नाही.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ भाऊ-बहिणींमध्ये सहसा भांडणे का होत असतात?

◻ एकांत आणि वस्तूंच्या हक्कांवरील भांडणे तुम्ही कशी टाळू शकता?

◻ काही वेळा पालक एकाच मुलाला जास्त प्रिय का समजतात? हे अगदीच अयोग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

◻ एकटे असणे हे एखाद्या मुलाला गैरसोयीचे असते का?

◻ भाऊ-बहिणी असण्याचे काही फायदे कोणते आहेत?

[५२ पानांवरील संक्षिप्त आशय]

“एका पालकाला तिची सर्वच मुलं एकसारखीच प्रिय वाटणार नाहीत कारण ते सर्व वेगवेगळे असतात.”—मानसशास्त्राचे प्राध्यापक ली सॉक

[Box on page 54]

‘मी एकुलता एक आहे’

तुमची ही परिस्थिती असल्यास, तुम्हाला काही उणीव असलीच पाहिजे असे नाही. एक गोष्ट म्हणजे, इतर युवकांचे त्यांच्या भांवडांबरोबर पटत नसले तरीपण स्वतःचे मित्र निवडण्याची मोकळीक तुम्हाला असते (अर्थात तुमच्या पालकांच्या संमतीने). तुम्हाला अभ्यास, मनन किंवा विशिष्ट कलाकौशल्ये विकसित करण्यासही जास्त वेळ मिळेल.—एकाकीपणावरील अध्याय १४ पाहा.

लहान थॉमस आणखी एक फायदा दाखवून म्हणतो: “एकुलता एक असल्यामुळे माझे पालक माझ्याकडे संपूर्ण लक्ष द्यायचे.” प्रमाणापेक्षा अधिक पालकांनी लक्ष दिल्यामुळे एखादा युवक आत्म-केंद्रित होऊ शकतो हे खरे आहे. पण पालकांनी या बाबतीत समतोलपणा दाखवल्यास, त्यामुळे तुम्ही लवकर प्रौढ व्हाल आणि मोठ्या लोकांमध्ये वावरताना तुम्हाला अस्वस्थता वाटणार नाही.

तुम्हाला भाऊ-बहिणी नसल्यामुळे आपापसांत काही वाटून घेण्याचा प्रश्‍न येत नसला, तरी स्वार्थी बनण्याचा धोका तुम्हाला आहे. येशूने सल्ला दिला: ‘देत राहा.’ (लूक ६:३८) मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना आपल्या वस्तू देण्याचा प्रयत्न करा. इतरांच्या गरजांविषयी दक्ष असा, आणि शक्य असेल तेथे मदतीचा हात पुढे करा. लोक अशा औदार्याला प्रतिसाद देतील. मग, तुम्हाला आढळून येईल, की तुम्ही एकुलते एक असला तरी एकाकी नाहीत.

[५३ पानांवरील चित्र]

पुष्कळदा मला बहीण नसल्याची उणीव भासते; पण तरीही मला काही फायदे नक्कीच आहेत