व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी घर सोडावे का?

मी घर सोडावे का?

अध्याय ७

मी घर सोडावे का?

“आई-बाबा:

“मी घर सोडत आहे. मी आधीच सांगितल्याप्रमाणे, मला तुमचा द्वेष वाटतो किंवा तुमचा सूड घ्यायचाय म्हणून मी हे करत नाहीये. तुमच्या इच्छेनुसार मी चार भिंतींमध्ये आनंदी राहू शकत नाही. कदाचित या मार्गानेही मला आनंद मिळणार नाही, पण मला हे करून पाहायचंय, बस.”

या शब्दांत, एका १७ वर्षांच्या मुलीने आपल्या पालकांना लिहिलेल्या निरोप पत्राची सुरवात केली. उदाहरणार्थ, फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीमध्ये, १५ ते २४ वयोगटातील प्रत्येक तिसरी मुलगी आणि प्रत्येक चौथा मुलगा आता वेगळे राहतात. कदाचित तुम्हीही घर सोडण्याचा विचार केला असेल.

विवाह करण्याच्या इच्छेमुळे एखादी व्यक्‍ती ‘आपल्या आईबापास सोडील,’ हे देवाने आधीच पाहिले होते. (उत्पत्ति २:२३, २४) तसेच अलग होण्याची इतरही उचित कारणे आहेत जसे की, देवाची सेवा विस्तारित रितीने करण्याकरता अलग होणे. (मार्क १०:२९, ३०) परंतु, अनेक युवकांसाठी घर सोडणे म्हणजे असह्‍य वाटणाऱ्‍या परिस्थितीतून सुटका मिळवण्यासारखे आहे. एक तरुण पुरुष म्हणतो: “एवढंच की, तुम्हाला जास्त स्वातंत्र्य हवं असतं. तुमच्या पालकांबरोबर घरी राहणं समाधानकारक वाटत नाही. तुमच्यात नेहमीच वादविवाद होत राहतात आणि तुम्हाला काय हवंय हे त्यांना काही समजत नाही. शिवाय, खूप बंधनं असल्यासारखी वाटतात, आणि जे काही करता त्याचं कारण आईवडिलांना द्यावंच लागतं.”

स्वतंत्र राहण्याकरता तयार?

पण तुम्हाला स्वातंत्र्य हवे आहे याचा अर्थ तुम्ही त्यासाठी तयार आहात असा होतो का? एकतर, एकट्याने राहणे तुम्हाला वाटते तितके सोपे नसेल. नोकऱ्‍यांचा बहुतेकवेळा तुटवडा असतो. घरभाडे अतिशय वाढलेले आहेत. मग, आर्थिक तंगी झाल्यावर युवकांना बहुधा काय करणे भाग पाडते? पुलींग अप रूट्‌स या पुस्तकाचे लेखक म्हणतात: “ते घरी परततात आणि त्यांना सांभाळण्याचे ओझे पालकांनी पुन्हा स्वीकारावे अशी अपेक्षा करतात.”

तसेच तुमच्या मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक प्रौढतेबद्दल काय? तुम्हाला आपण मोठे झालो असे वाटत असेल, पण तुमच्या पालकांना तुमच्यामध्ये अद्यापही काही “पोरपणाच्या गोष्टी” दिसत असतील. (१ करिंथकर १३:११) खरे पाहता, तुम्हाला किती स्वातंत्र्य झेपेल हे ठरवण्यास तुमचे पालक सर्वात योग्य नाहीत काय? त्यांचे ठरवलेले मत न जुमानता स्वतंत्र राहण्याचे प्रयत्न केल्याने विपत्तीला आमंत्रण मिळू शकते!—नीतिसूत्रे १:८.

‘माझं माझ्या आईवडिलांशी अजिबात पटत नाही!’

हे तुमच्या बाबतीत खरे आहे का? असे असले, तरी बोरीबिस्तर बांधू लागण्याचे हे काही कारण नाही. युवक या नात्याने, तुम्हाला अद्यापही तुमच्या पालकांची गरज आहे आणि त्यांच्या अंतर्दृष्टीचा आणि बुद्धीचा तुम्हाला पुढील वर्षांमध्ये नक्कीच फायदा होईल. (नीतिसूत्रे २३:२२) त्यांच्याशी व्यवहार करताना तुम्हाला काही अडचण झाल्यामुळे तुम्ही त्यांना थेट आपल्या जीवनातूनच विलग करावे का?

कार्स्टेन नामक एक जर्मन युवक ज्याने पूर्ण-वेळेचा सेवक या नात्याने आपले जीवन व्यतीत करण्यासाठी घर सोडले, तो असे म्हणतो: “तुमच्या पालकांशी पटत नाही म्हणून कधीच घर सोडू नका. त्यांच्याशी जर पटत नाही, तर इतर लोकांशी तुमचं कसं पटेल? घर सोडल्याने तुमची समस्या सुटणार नाही. या उलट, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तुम्ही अतिशय अपरिपक्व आहात हेच यावरून सिद्ध होईल आणि त्यामुळे तुमच्या पालकांसोबत तुमचे संबंध आणखीच दुरावतील.”

नैतिक मूल्ये आणि हेतू

अकालिक घर सोडण्यामध्ये जे नैतिक धोके आहेत त्यांच्याकडेही युवक सहसा दुर्लक्ष करतात. लूक १५:११-३२ मध्ये, येशू एका तरुण पुरुषाबद्दल सांगतो ज्याला स्वतंत्र राहायचे होते आणि म्हणून तो घराबाहेर निघाला. आता आपल्या पालकांच्या चांगल्या प्रभावाखाली नसल्यामुळे तो ‘चैनबाजीचे’ जीवन जगू लागला आणि लैंगिक अनैतिकतेला बळी पडला. काही काळातच त्याने आपले सर्व पैसे उधळून टाकले. त्याला नोकरी मिळणे इतके कठीण झाले होते की, यहुद्यांच्या नजरेत तुच्छ असलेली नोकरी त्याला स्वीकारावी लागली—डुकरांची राखण. परंतु, हा तथाकथित उधळ्या किंवा नासधूस करणारा मुलगा ताळ्यावर आला. आपला अहंकार गिळून तो पुन्हा घरी गेला आणि आपल्या पित्याकडे त्याने क्षमा मागितली.

हा दृष्टान्त, देवाच्या दयाळुपणाला ठळक मांडण्यासाठी सांगण्यात आला असला, तरी त्यामध्ये हा व्यावहारिक धडा देखील आहे: अविचारी हेतूने घर सोडल्यास तुम्हाला नैतिक आणि आध्यात्मिक हानी पोहंचू शकते! असे सांगण्यास दुःख वाटते, की स्वतंत्र मार्गावर चालू लागलेल्या काही ख्रिस्ती युवकांना आध्यात्मिक नुकसान सोसावे लागले आहे. आर्थिकरित्या, सुरक्षित राहता न आल्यामुळे, काहीजण अशा इतर युवकांसोबत मिळून पैसा खर्च करतात ज्यांची जीवनशैली बायबलच्या तत्त्वांच्या विरुद्धतेत आहे.—१ करिंथकर १५:३३.

हॉर्स्ट नामक एका जर्मन युवकाला त्याच्याच वयाच्या घर सोडलेल्या एका तरुणाची आठवण येते: “विवाह झालेला नसतानाही तो त्याच्या मैत्रिणीसोबत राहू लागला. त्यांच्याकडे अशा पार्ट्या चालायच्या जिथं बेसुमार दारू असायची, आणि बहुतेकवेळा त्याला नशा चढायची. तो त्याच्या घरी राहिला असता, तर त्याच्या पालकांनी असं काहीच होऊ दिलं नसतं.” हॉर्स्ट शेवटी म्हणतो: “हे खरं आहे, की एकदा घर सोडलं की जास्त स्वातंत्र्य मिळतं. पण खरं सांगायचं झालं, तर बहुतेकवेळा त्यास वाईट गोष्टी करण्याची संधी म्हणून वापरलं जात नाही का?”

म्हणून तुम्हाला अधिक स्वातंत्र्य हवे असल्यास, स्वतःला विचारा: मला जास्त स्वातंत्र्य हवंय तरी कशाला? भौतिक वस्तू घ्यायला मिळतील किंवा घरात असलो असतो तर, पालकांनी निर्बंध घातला असता अशा पद्धतीने वागण्याची मोकळीक मिळेल म्हणून असं स्वातंत्र्य हवंय का? यिर्मया १७:९ येथे बायबल काय म्हणते ते लक्षात असू द्या: “हृदय सर्वांहून अधिक कपटी आहे आणि ते अतिशय नासके आहे. ते कोण जाणू शकतो?” (पं.र.भा.)

घराबाहेर पडलो नाही तर मी मोठा कसा होणार?

किशोरावस्था (इंग्रजी) हे पुस्तक असे निरीक्षण करते: “फक्‍त घर सोडल्याने [प्रौढतेप्रत] यशस्वी अवस्थान्तर होण्याची हमी मिळत नाही. तसेच, घरी राहिल्याने प्रौढ बनत नाहीत असेही त्यावरून सूचित होत नाही.” खरे पाहता, प्रौढ होणे यात स्वतःचा पैसा, नोकरी आणि घर असण्यापेक्षा कितीतरी अधिक गोवलेले आहे. एक गोष्ट म्हणजे, जीवनावर प्रावीण्य समस्यांना प्रामाणिकपणे तोंड दिल्याने मिळते. आपल्याला नापसंत असणाऱ्‍या परिस्थितींपासून पळ काढल्याने काहीएक साध्य होत नाही. “मनुष्याने आपल्या तारुण्यात जू वाहावे हे त्याला बरे आहे,” असे विलापगीत ३:२७ म्हणते.

उदाहरणार्थ, ज्या पालकांशी पटणे अगदी कठीण आहे किंवा जे अतिशय कडक आहेत अशांचा विचार करा. आता ४७ वर्षे वय असलेल्या मॅकचे वडील त्याला शाळेनंतर लहानमोठी कामं नेमून नेहमीच त्याच्यावर जबाबदारी लादायचे. उन्हाळ्याच्या सुटीत, इतर युवक खेळत असताना मॅकला काम करावे लागत असे. “माझ्या मते, आम्हाला खेळू न दिल्यामुळं माझे बाबा अतिशय कठोर होते,” असे मॅक म्हणतो. “मला पुष्कळदा असं वाटायचं, ‘मी इकडून पळून जाऊ शकलो असतो आणि माझी स्वतःची जागा असती तर किती बरं झालं असतं!’” परंतु, मॅकचा आता वेगळाच दृष्टिकोन आहे: “बाबांनी माझ्यासाठी जे केलं त्याचं मूल्यमापन करता येणार नाही. त्यांनी मला कष्ट कसं करावं आणि हलाखीची परिस्थिती कशी सहन करावी हे शिकवलं. तेव्हापासून मला अधिकच गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागलंय, पण त्यांना सामोरं जाण्याची कुवत आता माझ्यात आहे.”

मूर्खाची रम्य दुनिया

परंतु, फक्‍त घरी राहिल्याने तुम्ही प्रौढ व्हाल अशी हमी मिळत नाही. एक युवक म्हणतो: “माझ्या पालकांबरोबर घरी राहणं म्हणजे मूर्खाच्या रम्य दुनियेत राहिल्यासारखं होतं. ते माझ्यासाठी सगळंच करायचे.” मोठे होण्यामध्ये स्वतःहून काही कामे कशी करावीत हे शिकणे समाविष्ट आहे. हे मान्य आहे, मनपसंत रेकॉर्ड वाजवण्यामध्ये जी मजा येते तशी मजा धुणीभांडी करण्यात येत नाही. पण, या गोष्टी कशा कराव्यात हे तुम्ही शिकलाच नाहीत तर काय होऊ शकते? तुम्ही असहाय प्रौढ बनू शकता आणि तुम्हाला तुमच्या पालकांवर किंवा इतरांवर पूर्णपणे विसंबून राहावे लागेल.

तुम्ही (युवक अथवा युवती असला तर) स्वयंपाक करणे, स्वच्छता राखणे, इस्त्री करणे किंवा घरगुती दुरुस्ती अथवा मोटारगाड्यांची दुरुस्ती करण्याचे शिकून पुढील स्वतंत्रतेसाठी तयार होत आहात का?

आर्थिक स्वतंत्रता

समृद्ध देशांतील युवकांना पैसा म्हणजे, कमवण्यास सोपा आणि खर्च करण्यास तर त्याहूनही सोपा आहे असे वाटते. त्यांना अर्ध-वेळेची नोकरी असल्यास, ते बहुतेकवेळा स्टेरिओ आणि डिझायनर कपड्यांवर आपला पैसा खर्च करत असतात. पण, ते एकट्याने राहायला घर सोडतात तेव्हा त्यांना किती जबरदस्त धक्का बसतो! हॉर्स्ट (आधी उल्लेखलेला) आठवून सांगतो: “मी [एकटा राहू लागलो तेव्हा], महिन्याच्या अखेरीस, माझा खिसा आणि माझं कपाट दोन्हीही रिकामी होत.”

त्यामुळे घरी असतानाच पैसे कसे हाताळावेत हे का शिकून घेऊ नये बरे? तुमच्या पालकांना हे करण्यात पुष्कळ वर्षांचा अनुभव मिळाला आहे आणि ते तुम्हाला पुष्कळ धोके टाळण्यास मदत करू शकतात. पुलींग अप रूट्‌स हे पुस्तक, त्यांना असे प्रश्‍न विचारण्यास सुचवते: ‘दर महिन्याला वीज, इंधन, पाणी, टेलिफोन यांचा खर्च किती होतो? आपण कोणकोणते कर भरतो? आपलं घरभाडं किती आहे?’ तुम्हाला जाणून आश्‍चर्याचा धक्काच बसेल, की काम करणाऱ्‍या युवकांकडे त्यांच्या पालकांपेक्षा जास्त पैसा असतो! म्हणून, तुम्हाला नोकरी असली, तर तुम्ही घरखर्चासाठी योग्य हातभार लावू शकता असे सांगा.

घर सोडण्याआधी शिका

नाही, मोठे बनण्याकरता तुम्हाला घर सोडण्याची गरज नाही. पण तेथे राहत असताना योग्य निर्णयशक्‍ती आणि समंजसपणा प्राप्त करण्यासाठी तुम्ही यत्न केला पाहिजे. तसेच, इतरांशी कसे पटवून घ्यावे हे देखील शिका. तुम्ही टीका, अपयश किंवा निरुत्साह यांचा सामना करू शकता हे सिद्ध करून दाखवा. ‘ममता, चांगुलपणा, सौम्यता आणि इंद्रियदमन’ यांस विकसित करा. (गलतीकर ५:२२, २३) हे गुण प्रौढ ख्रिस्ती पुरुष अथवा स्त्रीची खरी लक्षणे आहेत.

आज ना उद्या, विवाहासारख्या परिस्थिती तुम्हाला तुमच्या पालकांच्या घरट्यातून बाहेर ढकलून देतील. मग, तोपर्यंत घर सोडण्याची घाई का करावी? तुमच्या पालकांशी त्याविषयी बोला. तुम्ही घरात राहिला तर त्यांना आनंद होईल, विशेषतः, तुम्ही कुटुंबाच्या हितासाठी खरोखरच हातभार लावत असाल तर. त्यांच्या मदतीने तुम्ही त्याच घरात राहून मोठे होऊ शकता, शिकू शकता आणि प्रौढ बनू शकता.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ अनेक युवकांना घर सोडण्याची इतकी उत्सुकता का वाटते?

◻ पुष्कळ युवक असे पाऊल उचलण्यास तयार का नसतात?

◻ अकालिक घर सोडण्यामध्ये काही धोके कोणते आहेत?

◻ घरातून पळून जाणाऱ्‍यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते?

◻ घरी राहत असतानाच तुम्हाला प्रौढ बनणे कसे शक्य आहे?

[५७ पानांवरील संक्षिप्त आशय]

“तुमच्या पालकांशी पटत नाही म्हणून कधीच घर सोडू नका . . . इतर लोकांशी तुमचं कसं पटेल?”

[Box on page 60, 61]

पळून जाणे हा तोडगा आहे काय?

एक दशलक्षापेक्षा अधिक किशोरवयीन दर वर्षी घर सोडून पळून जातात. काहीजण, शारीरिक अथवा लैंगिक अत्याचारासारख्या असह्‍य परिस्थितींपासून पळ काढतात. परंतु पुष्कळदा वेळेवरील निर्बंध, शाळेतला नंबर, घरातील कामे आणि मित्रमैत्रिणींची निवड अशा बाबींवरून पालकांसोबत बाचाबाची झाल्यामुळे पळून जाणे घडते.

कदाचित तुमच्या पालकांचा दृष्टिकोन आणि काही बाबींबद्दलची विचारपद्धत तुमच्या विचारसरणीशी मुळीच जुळत नसेल. पण, तुमच्या पालकांना देवासमक्ष तुम्हाला “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणांत” वाढवण्याचे बंधन आहे या वस्तुस्थितीचा तुम्ही कधी विचार केलात का? (इफिसकर ६:४) म्हणून, तुम्हाला धार्मिक सभांना आणि कार्यहालचालींकरता घेऊन जाण्यास ते आग्रह करतील किंवा इतर युवकांसोबत सहवास राखण्यासही प्रतिबंध करतील. (१ करिंथकर १५:३३) पण, म्हणून तुम्ही बंड करावे किंवा पळून जावे का? तुम्हाला देखील देवासमक्ष एक बंधन आहे: “आपला बाप व आपली आई ह्‍यांचा मान राख.”—इफिसकर ६:१-३.

शिवाय, पळून गेल्याने परिस्थिती सुधारत नाही. “पळून गेल्याने तुमच्यापुढे आणखीनच समस्या उद्‌भवतात,” असे एमी आठवून सांगते, जी १४ वर्षांची असताना घरातून पळून गेली होती. मार्गरेट ओ. हाईड, माझा मित्र पळून जाण्याच्या विचारात आहे (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात असे म्हणतात: “पळून जाणाऱ्‍या काहींना खरोखर नोकऱ्‍या मिळतात आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहतात. पण अनेकांच्या बाबतीत, घर सोडण्याआधी जीवन जसे होते त्यापेक्षा आता ते आणखी बिकट झालेले असते.” तसेच टीन नियतकालिक निरीक्षण करते: “किशोरवयीनांना घराबाहेर स्वातंत्र्य मिळत नाही. त्याऐवजी, त्यांना बलात्काऱ्‍यांपासून अथवा लुबाडणाऱ्‍यांपासून संरक्षण नसलेल्या पडक्या इमारतींमध्ये जगणारी, स्वतःप्रमाणेच पळून आलेली अगर घरातून बाहेर हकलून दिलेली इतर मुले भेटतात. तसेच, तरुण मुलांना भ्रष्ट करण्याचा घाणेरडा व्यवसाय करणाऱ्‍या पुष्कळ लोकांनाही त्यांना सामोरे जावे लागते आणि घरातून पळून आलेले किशोरवयीन अशा लोकांना सहजगत्या बळी पडतात.”

पळून आल्यावर, एमीला एका २२ वर्षांच्या मुलाने “जिव्हाळ्याने वागवले” व आसरा देण्याच्या मोबदल्यात तिला “स्वतःसोबत व आपल्या नऊ मित्रांसोबत लैंगिक संबंध ठेवायला” भाग पाडले. ती “प्यायची आणि खूप मादक पदार्थ” सुद्धा घ्यायची. सरिता नामक आणखी एका मुलीवर तिच्या मानलेल्या आजोबाने लैंगिक अत्याचार केल्यामुळे ती पळून गेली. नंतर, ती रस्त्यांवर राहणारी आणि बागेतील बाकांवर किंवा थारा मिळेल तेथे झोपणारी वेश्‍या बनली. अनेक पळून जाणाऱ्‍यांची अशीच गत होते.

पळून जाणाऱ्‍या बहुतांश मुलांकडे फारच कमी उपयोगी कौशल्ये असतात. त्याचप्रमाणे, नोकरीवर घेतले जाण्यासाठी त्यांच्याजवळ आवश्‍यक कागदपत्रेही नसतात: जसे की, जन्मदिन प्रमाणपत्र, सामाजिक संरक्षण कार्ड, स्थायी पत्ता. “मला चोरी करावी लागलीय, भीक मागावी लागलीय,” असे लुईस म्हणते, “पण बहुतेकवेळा चोरीच करावी लागलीय कारण कोणी मागितलं तर तुम्हाला काही देत नाही.” पळून जाणाऱ्‍यांपैकी ६० टक्के मुली असतात, ज्यातील अनेकजण वेश्‍याव्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. अश्‍लील चित्रे काढणारे, मादक पदार्थांचा धंदा करणारे आणि दलाल, पळून आलेल्या मुलांचा गैरफायदा घेण्याच्या हेतूने बस स्थानकांपाशी पाळतीवरच असतात. गांगरून गेलेल्या युवकांना झोपायला जागा आणि खायला अन्‍न देऊ असे कदाचित ते सांगतील. ही मुले घरी ज्या प्रेमाला भुकेली होती ते देखील त्यांना कदाचित दिले जाईल.

तथापि, कालांतराने असे “परोपकारी लोक” मोबदला मागू लागतात. त्याअर्थी त्यांना वेश्‍या म्हणून काम करावे लागेल, विकृत लैंगिक कृत्ये करावी लागतील अथवा अश्‍लील चित्रे काढू द्यावी लागतील. यात काहीच आश्‍चर्य नाही, की पळून गेलेले अनेक जण गंभीररित्या जखमी होतात—कधी कधी तर मरतात देखील!

म्हणूनच शहाणपण यातच आहे, की होता होईल तितका प्रयत्न करून—आणि याचा अर्थ एकदाच नव्हे तर अनेकदा—तुमच्या पालकांशी याविषयी बोला. तुम्हाला कसे वाटते आणि काय घडत आहे हे त्यांना कळवा. (अध्याय २ आणि ३ पाहा.) शारीरिक अथवा लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांत मात्र बाहेरून मदत घ्यावी लागेल.

परिस्थिती कोणतीही असो, त्याविषयी बोला, घर सोडून पळून जाऊ नका. घरातले जीवन तुमच्या कल्पनांप्रमाणे नसले, तरी हे लक्षात असू द्या की तुम्ही पळून गेलात तर परिस्थिती आणखीनच चिघळू शकते.

[५९ पानांवरील चित्र]

एकटे राहण्यासाठी ज्या घरगुती कौशल्यांची गरज आहे ती घरी राहूनच शिकता येतात