व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी माझ्या ‘आईवडिलांचा मान’ का राखावा?

मी माझ्या ‘आईवडिलांचा मान’ का राखावा?

अध्याय १

मी माझ्या ‘आईवडिलांचा मान’ का राखावा?

‘तुमच्या पित्याचा आणि मातेचा मान राखा.’ हे शब्द पुष्कळ तरुणांसाठी अगदीच पुरातन काळातले वाटतात.

पिंकी a या तरुणीने मादक पदार्थ आणि मद्याचा दुरुपयोग करणाऱ्‍या एका मुलासोबत भेटीगाठी करून तिच्या बाबांविरुद्ध उघडपणे बंड केले. ती त्याच्याबरोबर मजा मारायला उद्दामपणे पहाटेपर्यंत घराबाहेर देखील राहत असे. पिंकी म्हणते, “माझ्या मते माझे बाबा फारच कडक होते. मी १८ वर्षांची असल्यामुळे मला माझं बरं-वाईट कळतं असं मला वाटायचं. बाबा फारच कठोर होते आणि मी मौजमजा करू नये अशी त्यांची इच्छा होती असं मला वाटत असल्यामुळं मी बाहेर जाऊन माझ्या मनात येईल तसं वागायचे.”

पुष्कळ युवक पिंकीच्या ह्‍या वर्तणुकीला कदाचित नापसंत करतील. तरीसुद्धा, त्यांच्या पालकांनी त्यांना त्यांची खोली आवरायला, गृहपाठ करायला किंवा विशिष्ट वेळेत घरी परतायला सांगितले, तर पुष्कळजण रागराग करतील, किंवा काहीतर सरळसरळ अवज्ञा देखील करतील! तथापि, पालकांबद्दल एखाद्या युवकाच्या दृष्टिकोनावर केवळ घरातली शांती व अशांतीच नव्हे, तर अक्षरशः त्याचे जीवनही अवलंबून आहे. कारण ‘तुमच्या पालकांचा मान राखा’ ही आज्ञा देवाकडून आहे आणि ही आज्ञा पाळण्यासाठी तो पुढील प्रेरणाही देतो: “ह्‍यासाठी की, तुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायु असावे.” (इफिसकर ६:२, ३) धोके अधिक आहेत. यास्तव, आपल्या पित्याचा आणि मातेचा मान राखणे म्हणजे नेमके काय, याविषयीचा नवा दृष्टिकोन आपण पाहू या.

त्यांचा “मान राखणे” म्हणजे काय

“मान” यामध्ये उचितपणे नेमलेला अधिकार ओळखणे हे गोवलेले आहे. उदाहरणार्थ, ख्रिश्‍चनांना “राजाचा मान राखा,” अशी आज्ञा देण्यात आली आहे. (१ पेत्र २:१७) नेहमीच एखाद्या राजकीय शासकाचा अभिप्राय तुम्हाला पटत नसला, तरीही त्याचे स्थान किंवा पद यास आदर दाखवलाच पाहिजे. अशाचप्रकारे, देवाने कुटुंबामध्ये पालकांना विशिष्ट अधिकार दिला आहे. त्याअर्थी, तुमच्याकरता काही नियम बनवण्यासाठी देवाने त्यांना प्रदान केलेला हक्क तुम्ही ओळखला पाहिजे. इतरांचे पालक कदाचित तुमच्या पालकांपेक्षा अधिक मोकळीक देत असतील हे कबूल आहे. तथापि, तुमच्या पालकांचे काम तुमच्यासाठी उत्तम काय ते ठरवणे हे आहे—शिवाय, निरनिराळ्या कुटुंबांचे निरनिराळे दर्जे असतील.

हे सुद्धा खरे आहे की, उत्कृष्ट पालक कधीकधी दडपशाही करणारे—किंवा अवाजवी देखील असू शकतात. परंतु नीतिसूत्रे ७:१, २ मध्ये एका सुज्ञ पालकाने म्हटले: “माझ्या मुला [किंवा मुली], . . . माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील.” त्याचप्रमाणे, तुमच्या पालकांचे नियम किंवा “आज्ञा” बहुतेकवेळा तुमच्या फायद्यासाठी असतात आणि त्यांतून त्यांचे खरे प्रेम आणि काळजी व्यक्‍त होते.

उदाहरणार्थ, जॉनने आपल्या घराजवळच्या सहा रस्त्यांच्या महामार्गाने न जाता पादचारी मार्गाने जावे असे त्याची आई त्याला नेहमी सांगत असे. एके दिवशी, त्यांच्या शाळेतल्या दोन मुलींनी महामार्गावरूनच शॉर्टकट घेण्याचे धाडस करून दाखवायला त्याला सांगितले. “डरपोक!” या त्यांच्या टोमण्याकडे जॉनने कानाडोळा केला व तो पादचारी मार्गाने चालू लागला. निम्मा मार्ग ओलांडल्यावर, जॉनला चाकांचा कर्कश आवाज ऐकू आला. खाली पाहिल्यावर, त्या मुलींना कारची धडक बसून त्या हवेत फेकल्या गेल्याचे भयानक दृश्‍य त्याला दिसले! हे मान्य आहे की, तुमच्या पालकांचे ऐकणे हा नेहमीच जीवनमरणाचा प्रश्‍न नसेल. तरीसुद्धा, आज्ञापालनाने सहसा तुमचा फायदाच होतो.

‘तुमच्या पालकांचा मान राखणे’ याचा अर्थ सुधारणूक स्वीकारणे, किंवा ती दिली जाते तेव्हा रूसून न बसणे आणि अकांडतांडव न करणे असा देखील होतो. केवळ एक मूर्खच “आपल्या बापाचे शिक्षण तुच्छ मानितो,” असे नीतिसूत्रे १५:५ म्हणते.

शेवटी, मान राखण्यामध्ये वरपांगी आदर किंवा अनिच्छेने दाखवलेल्या आज्ञाधारकतेपेक्षाही अधिक काही गोवलेले आहे. बायबलमध्ये “मान” यासाठी दिलेल्या मूळ ग्रीक क्रियापदाचा मूलतः अर्थ एखाद्याला बहुमोल समजणे असा आहे. यास्तव, पालकांना बहुमोल, अत्यंत आदरणीय व प्रिय समजले पाहिजे. यामध्ये त्यांच्याबद्दल प्रेमळ, कृतज्ञतेच्या भावना बाळगणे समाविष्ट आहे. तथापि, काही तरुणांना त्यांच्या पालकांविषयी प्रेमळ भावना मुळीच नसतात.

समस्या पालक—मान राखण्याच्या पात्रतेचे?

गीना नावाच्या एका युवतीने असे लिहिले: “माझे वडील खूप प्यायचे आणि माझ्या पालकाची भांडणं आणि जोरजोराने आरडाओरड होत असल्यामुळे मला झोपणं शक्यच नव्हतं. मी बिछान्यात पडून नुसती रडायचे. कदाचित आई मला मारेल या भीतीनं मी माझ्या भावना त्यांना सांगू शकत नव्हते. बायबल म्हणते ‘आपल्या पित्याचा मान राख,’ पण ते मला जमायचं नाही.”

जे पालक तापट स्वभावाचे, अनैतिक, मद्यपी किंवा भांडखोर असतात—ते खरोखरच मान मिळवण्याच्या पात्रतेचे आहेत का? होय, कारण बायबल कोणत्याही प्रकारच्या पालकाची ‘थट्टा करण्याला’ धिक्कारते. (नीतिसूत्रे ३०:१७) पुढे नीतिसूत्रे २३:२२ आपल्याला ही आठवण करून देते, की तुमचे पालक तुमचे ‘जन्मदाते’ आहेत. हे एकच कारण त्यांना मान देण्यासाठी पुरेसे आहे. एकेकाळी अत्यंत अनादराने वागणारा ग्रेगरी आता मात्र म्हणतो की, “[माझ्या आईने] माझा गर्भपात केला नाही किंवा मी बाळ असताना मला कचराकुंडीत फेकून दिलं नाही म्हणून मी यहोवा देवाचे आभार मानतो. ती एकटी पालक होती आणि आम्ही सहा जण होतो. तिला नक्कीच कठीण गेलं असेल.”

तुमचे पालक परिपूर्ण नसले, तरी त्यांनी तुमच्यासाठी बराच त्याग केला आहे. ग्रेगरी पुढे म्हणतो, “एकदा तर, आमच्याकडे खायला थोडंफार धान्य आणि रवा एवढंच शिल्लक उरलं होतं, माझ्या आईने ते आम्हा मुलांना करून दिलं, परंतु तिनं स्वतः काहीच खाल्लं नाही. भरल्या पोटी मी झोपलो खरा, पण आईनं का खाल्लं नाही हाच विचार करत राहिलो. आता माझं स्वतःचं कुटुंब असल्यामुळे मला कळतं की ती आमच्यासाठी त्याग करत होती.” (१८ वर्षांपर्यंत एका मुलाला वाढवण्याचा खर्च २५,२३,२०० रुपये इतका होतो असे एका संशोधक अभ्यासाने ठरवले.)

हेही लक्षात घ्या, की एखादा पालक उदाहरणशील नसल्यामुळे तो किंवा ती तुम्हाला जे सांगतात ते सर्वच चुकीचे आहे असा याचा अर्थ होत नाही. येशूच्या काळातील, धार्मिक पुढारी भ्रष्ट होते. तरीही, येशूने लोकांना सांगितले: “ते जे काही तुम्हास सांगतील ते सर्व आचरीत व पाळीत जा; परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका.” (मत्तय २३:१-३; २५, २६) हेच तत्त्व काही पालकांच्या बाबतीतही लागू होणार नाही का?

रागाच्या भावनांना तोंड देणे

एखादा पालक त्याच्या किंवा तिच्या अधिकाराचा गंभीरपणे दुरुपयोग करत असल्याचे तुम्हाला वाटले तर काय? b शांत राहा. बंडाळीने किंवा द्वेषपूर्ण वागणूक आणि भांडखोरपणामुळे काहीएक साध्य होत नाही. (उपदेशक ८:३, ४; पडताळा उपदेशक १०:४.) एका १७ वर्षांच्या मुलीचे पालक आपापसातील क्षुल्लक भांडणांमध्येच गुंतून तिच्याकडे दुर्लक्ष करीत राहिल्यामुळे तिला त्यांच्याबद्दल राग येऊ लागला. या रागामुळे, पालकांनी कष्टाने शिकवलेल्या बायबल तत्त्वांचे ती उल्लंघन करू लागली. केवळ द्वेषी भावनेने तिने लैंगिक अनैतिकता आणि मादक पदार्थांचा धोका पत्करला. “माझ्या आईवडिलांना मी धडा शिकवलाच पाहिजे असं मला वाटायचं,” असे कटुत्वाने ती म्हणाली. परंतु, मत्सराने वागल्यामुळे तिने स्वतःचीच हानी करून घेतली.

बायबल असा इशारा देते: “आपल्या क्रोधाने मोहात पडून तू अपमान करण्यास प्रवृत्त होऊ नको . . . संभाळ, दुष्टतेकडे वळू नको.” (ईयोब ३६:१८-२१) याची जाणीव असू द्या, की पालक त्यांच्या वर्तणुकीसाठी यहोवाला जबाबदार आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या गंभीर अन्यायाबद्दल त्यांना जाब द्यावा लागेल.—कलस्सैकर ३:२५.

नीतिसूत्रे १९:११ म्हणते: “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.” काहीवेळा, एखाद्याच्या पालकाच्या हानीकारक कृत्यांना क्षमा करून त्यांच्याबद्दल विसरून जाणे उचित असते. त्यांच्या चुकांबद्दल विचार करण्यापेक्षा त्यांच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रीत करा. उदाहरणार्थ, डॉडीची आई भावनाशून्य होती आणि तिचे सावत्र वडील दारूडे होते. त्यांच्या दोषांबद्दल विचार केल्यामुळे तिच्यात कशी कटुता निर्माण झाली याकडे लक्ष द्या. ती म्हणते: “माझ्या आईनं कधीच प्रेम व्यक्‍त केलं नाही. कदाचित तिच्यावर अत्याचार झाल्यामुळे प्रेम कसं करावं हे तिला कधी कोणी शिकवलंच नसेल. माझे सावत्र वडील शुद्धीवर असायचे तेव्हाच फक्‍त आम्ही काय करतोय याकडे लक्ष द्यायचे; पण तेही क्वचितच. तरीदेखील, मला आणि माझ्या बहिणीला राहायला घर आणि खायला अन्‍न नेहमी असायचं.”

सुदैवाने, स्वच्छंदी किंवा काळजी न घेणारे पालक अभावानेच आढळतात. तुमचे पालक नक्कीच तुमची काळजी घेत असतील आणि तुमच्यासमोर एक चांगले उदाहरण मांडण्याचा प्रयत्न करीत असतील. तरीसुद्धा, काहीवेळा तुम्हाला त्यांच्यावर राग येऊ शकतो. रॉजर नावाचा तरुण मुलगा हे कबूल करतो, की “कधीकधी आईबरोबर एखाद्या समस्येबद्दल बोलताना मला काय सांगायचंय हे तिला कळायचंच नाही, मग मला अशी चीड यायची की मी द्वेषी भावनेने तिला दुखवायला काहीतरी म्हणायचो आणि अशाप्रकारे तिच्यावर राग काढायचो. परंतु मी तिथून उठून गेल्यावर, मला खूप वाईट वाटायचं आणि तिलाही वाईट वाटलं असेल हे मला ठाऊक असायचं.”

अविचारीपणाचे बोल ‘भोसकल्याप्रमाणे दुःख पोहंचवू’ शकतात, परंतु त्यामुळे तुमच्या समस्या सोडवल्या जाणार नाहीत. “सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.” (नीतिसूत्रे १२:१८; १५:१) रॉजर म्हणतो, “मला कठीण वाटायचं तरी मी जाऊन माफी मागायचो. मग मी अधिक शांतपणे त्या समस्येबद्दल बोलू शकत होतो आणि आम्ही ती सोडवू शकत होतो.”

‘माझ्या बाबांचं म्हणणं खरं होतं’

गंमत म्हणजे, काही युवक त्यांच्या पालकांच्या सूचना टाळून स्वतःच्या आणि आपल्या पालकांच्या नाकी नऊ आणतात, पण काही काळानंतर त्यांना समजते की त्यांच्या पालकांचेच म्हणणे बरोबर होते. उदाहरणार्थ, पिंकीबद्दलच (सुरवातीला जिचा उल्लेख केला होता) पाहा. एकदा ती तिच्या मित्राबरोबर कारमधून फेरफटका मारण्यासाठी गेली. त्याने खूप गांजा ओढला होता व बीयर घेतली होती. त्यांची कार ताशी ६० मैलाच्या वेगात असताना त्याचा ताबा सुटला आणि ती एका विजेच्या खांबावर जाऊन आदळली. पिंकी वाचली—पण तिच्या कपाळावर एक मोठी जखम झाली होती. तिचा मित्र तेथून पळून गेला आणि तो दवाखान्यात तिला भेटण्यासही आला नाही.

पिंकी कबूल करते, “माझे आईवडील दवाखान्यात आल्यावर मी कबूल केलं की बाबांचं म्हणणं खरं होतं आणि ते मी केव्हाच ऐकायला हवं होतं. . . . मी एक घोडचूक केली होती आणि ती अक्षरशः माझ्या अंगाशी आली.” त्यानंतर, मात्र पिंकीने पालकांबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनात काही अमूलाग्र बदल केले.

काही बदल करणे कदाचित तुमच्याकरताही उचित असतील. ‘पालकांना मान’ देणे ही नक्कीच एक जुनी कल्पना वाटत असेल. परंतु असे करणे केवळ शहाणपणाचेच नव्हे, तर देवाच्या नजरेत उचित देखील आहे. तथापि, तुम्हाला तुमच्या पालकांना आदर दाखवायचा असला आणि तुमच्या मते ते नेहमीच तुम्हाला चुकीचे समजत असल्यास किंवा बंधनात ठेवत असल्यास काय? अशा परिस्थितींमध्ये तुम्ही तुमच्या परीने उत्तम ते कसे करू शकता याचे आपण परीक्षण करून पाहू या.

[तळटीपा]

a या पुस्तकातील काही नावे बदललेली आहेत.

b येथे आम्ही शारीरिक किंवा लैंगिक अत्याचाराबद्दल सांगत नाही. तशा परिस्थितीत एखाद्या तरुणाला व्यावसायिक मदत घेण्याची गरज भासेल.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ पालकांचा मान राखणे याचा काय अर्थ होतो?

◻ पालक इतके नियम का बनवतात? त्या नियमांचा तुम्हाला लाभ होऊ शकतो का?

◻ तुमच्या पालकांची वर्तणूक लज्जास्पद असल्यास तुम्ही त्यांचा मान राखावा का? का बरे?

◻ तुम्हाला काहीवेळा तुमच्या पालकांबद्दल जो राग वाटतो त्यास तोंड देण्याचे काही फायदेशीर मार्ग कोणते आहेत? काही मूर्खपणाचे मार्ग कोणते आहेत?

[१६ पानांवरील संक्षिप्त आशय]

“बाबा फारच कठोर होते आणि मी मौजमजा करू नये अशी त्यांची इच्छा होती असं मला वाटत असल्यामुळं मी बाहेर जाऊन माझ्या मनात येईल तसं वागायचे”

[१२ पानांवरील चित्र]

पालकांच्या नियमांविषयी तुमचा कसा दृष्टिकोन असावा?

[१४ पानांवरील चित्र]

लज्जास्पद वर्तणूक असलेल्या पालकांचा तुम्ही मान राखला पाहिजे का?