व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मला खरे मित्र कसे बनवता येतील?

मला खरे मित्र कसे बनवता येतील?

अध्याय ८

मला खरे मित्र कसे बनवता येतील?

“मी या जिल्ह्याच्या शाळेत आठ वर्षांपासून जातोय, पण या सबंध काळात मी एकही मित्र बनवू शकलो नाही! अगदी एकही नाही.” हे रॉनी नामक एका तरुणाचे खेदपूर्ण उद्‌गार आहेत. त्याच्यासारखेच तुम्हाला देखील काहीवेळा मैत्रींबाबतीत अपेशी ठरल्यासारखे वाटले असावे. पण खरे मित्र म्हणजे नेमके कोण? तसेच ते मिळवण्यामागे कोणते गुपित दडलेले आहे?

एक नीतिसूत्र म्हणते: “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.” (नीतिसूत्रे १७:१७) पण मैत्री म्हणजे केवळ अश्रू पुसण्यासाठी कोणीतरी असणे, यापेक्षाही अधिक काही आहे. मालिनी नामक एक तरुण स्त्री म्हणते: “कधी कधी नावापुरती मैत्रिण तुमची फजिती होताना पाहील आणि वरून असंही म्हणेल की, ‘शेवटी असं होणार हे मला दिसतच होतं, पण तुझ्याजवळ बोलून दाखवण्याची भीती वाटली.’ याउलट, तुम्ही गैरमार्गाने जात असल्याचे खरी मैत्रिण पाहते, तिचं म्हणणं तुम्हाला आवडणार नाही हे तिला माहीत असलं तरी देखील—ती खूप उशीर होण्याआधीच तुम्हाला सावरण्याचा प्रयत्न करील.”

तुम्हाला सत्य सांगण्याइतपत तुमच्याबद्दल कळकळ असलेल्या व्यक्‍तीला तुम्ही, केवळ तुमचा अहंपणा दुखावला गेला म्हणून सोडून द्याल का? नीतिसूत्रे २७:६ म्हणते: “प्रियकराने केलेल्या जखमा विश्‍वासू आहेत, परंतु द्वेषकाची चुंबने कपटी आहेत.” (पं.र.भा.) सांगण्याचे तात्पर्य असे, की प्रामाणिकपणे विचार करणाऱ्‍याला व स्पष्टवक्‍त्‌यालाच आपला मित्र बनवण्याची तुम्ही इच्छा धरावी.

खोटे विरुद्ध खरे मित्र

तेवीस वर्षांची पेग्गी म्हणते की, “सर्वच ‘मित्रमैत्रिणी’ तुमच्या चांगल्या गुणांना वाव देत नाहीत याचा मी स्वतः एक जिवंत पुरावा आहे.” किशोरावस्थेत असतानाच पेग्गीला घर सोडणे भाग पडले होते. तथापि, यहोवाच्या साक्षीदारांपैकी दोघे, बिल व त्याची पत्नी लॉय यांनी तिला मैत्रिपूर्ण वागणूक दिली. त्यांनी पेग्गीसोबत बायबल अभ्यास सुरू केला. “त्यांच्यासोबत घालवलेल्या काही महिन्यांत मला पुरेपूर आनंद, समाधान व शांती लाभली,” असे पेग्गी म्हणते. तरीसुद्धा तिला भेटलेल्या काही तरुणांचा सहवास तिला अधिक पसंत पडला—व तिने बिल आणि लॉय यांना सोडून दिले.

पेग्गी पुढे सांगते: “माझ्या या नवीन ‘मित्रमैत्रिणींकडून’ मी पुष्कळ काही शिकले—स्टेरिओ चोरणे, बनावटी चेक वटवणे, गांजा ओढणे आणि शेवटी, दररोज २०० डॉलरचा खर्च लागणाऱ्‍या मादक पदार्थांच्या व्यसनासाठी पैसे जमवणे.” वयाच्या १८ व्या वर्षी, तिला रे नावाचा एक तरुण पुरुष भेटला जो तिला वाटेल तितके मादक पदार्थ देण्यास तयार होता—तेही फुकटात. “माझ्या सर्व चिंता मिटल्या असं मला वाटलं. आता मला कधीच चोरी करावी लागणार नाही की फसवेगिरी करावी लागणार नाही,” असे पेग्गीला वाटले. तथापि, रेने तिला वेश्‍याव्यवसाय करावयास भाग पाडले. शेवटी पेग्गीने ते शहर व आपल्या उधळ्या “मित्रमैत्रिणींना” सोडून तेथून पळ काढला.

एके दिवशी, दोन यहोवाच्या साक्षीदारांनी पेग्गीला तिच्या नवीन ठिकाणी भेट दिली. “मी त्या दोघींना आलिंगन दिलं तेव्हा माझे डोळे आनंदाश्रुंनी भरून आले; त्या मात्र स्तंभितच झाल्या,” असे पेग्गी त्या घटनेविषयी सांगते. “माझ्या पूर्वीच्या ‘मित्रमैत्रिणींच्या’ दांभिकपणाचा मला वीट येऊ लागला होता, पण हे लोक प्रामाणिक होते.” पेग्गीने आपला बायबलचा अभ्यास पुन्हा सुरू केला.

तथापि, आपले जीवन देवाच्या मार्गांच्या सुसंगतेत आणणे तिच्यासाठी सहजसोपे नव्हते. विशेषतः, धूम्रपान सोडून देणे तिला फार जड गेले. परंतु एका साक्षीदार मित्राने सल्ला देताना म्हटले: “अपेशी ठरल्यावर प्रार्थना करून क्षमा मागण्याऐवजी, आधीच प्रार्थना करून धूम्रपान करण्याची तलफ लागते त्या क्षणी शक्‍ती मिळण्यासाठी याचना का करू नये?” पेग्गी म्हणते: “हा दयाळू व व्यवहार्य सल्ला कामी आला . . . इतक्या वर्षांत पहिल्यांदा मला मनातून शुद्ध असल्यासारखं वाटलं आणि आत्म-सन्मान म्हणजे काय असतो याची जाणीव झाली.”

पेग्गीचा अनुभव नीतिसूत्रे १३:२० मधील बायबलच्या शब्दांची सत्यता पटवून देतो; तेथे असे म्हटले आहे: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” पेग्गी म्हणते: “देवावर प्रेम करणाऱ्‍यांसोबतच माझी मैत्री मी कायम ठेवली असती तर आता एक ओंगळ स्मृती बनलेल्या त्या सर्व घटना मी टाळू शकले असते.”

मित्र मिळवणे

देवावर प्रेम करणारे मित्र तुम्हाला कोठे मिळू शकतात? अर्थातच, ख्रिस्ती मंडळीत. विश्‍वासाचा केवळ दावा करणारे नव्हे तर आपल्या कृतींना विश्‍वासाचा आणि भक्‍तीचा पाठपुरावा देणाऱ्‍या युवकांचा शोध घ्या. (पडताळा याकोब २:२६.) असे युवक शोधणे तुम्हाला कठीण जात असल्यास, तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या ख्रिश्‍चनांशी परिचय करून घ्या. वय हे मैत्रीकरता आडकाठी ठरण्याची गरज नाही. बायबल आपल्याला दावीद आणि योनाथान यांच्यातील आदर्श मैत्रीबद्दल सांगते—तसेच योनाथान वयाने दावीदाच्या वडिलांइतका होता!—१ शमुवेल १८:१.

तथापि, तुम्ही मैत्री कशा सुरू करू शकता?

इतरांबद्दल खरी आस्था

येशू ख्रिस्ताने इतक्या घनिष्ट मैत्री बनविल्या होत्या की त्याचे मित्र त्याच्याकरता प्राण देण्यासही तयार होते. का बरे? एक कारण म्हणजे, येशूला लोकांविषयी कळकळ होती. तो आपणहून पुढाकार घेऊन इतरांना मदत करीत असे. त्याला त्यामध्ये भाग घ्यायची “इच्छा” होती. (मत्तय ८:३) खरोखर, इतरांबद्दल आस्था बाळगणे हे मित्र बनवण्याचे पहिले पाऊल आहे.

उदाहरणार्थ, डेवीड नावाचा एक युवक म्हणतो की, “लोकांबद्दल खरं प्रेम असल्यामुळे आणि इतरांबद्दल खरी आस्था बाळगल्यामुळे” त्याला मित्र बनवण्यात यश मिळाले. तो पुढे म्हणतो: “सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, त्या व्यक्‍तीचं नाव माहीत असणं. तुम्ही नाव आठवणीत ठेवल्यामुळे इतर जण पुष्कळदा प्रभावित होतात. यामुळे, ते तुम्हाला एखाद्या अनुभवाबद्दल किंवा समस्येबद्दल सांगतील आणि मग ती मैत्री वाढू लागते.”

याचा अर्थ तुम्ही सारखेच पुढे पुढे करावे असा होत नाही. येशू हा बढाई मारणारा, किंवा आपलाच टेंभा मिरवणारा नव्हता, तर ‘मनाचा लीन’ होता. (मत्तय ११:२८, २९) प्रामाणिक आस्थाच इतरांना आकर्षित करते. एकत्र मिळून भोजन करणे किंवा एखाद्याला काही कामात मदत करणे अशा लहानसहान गोष्टींमुळेच बहुधा मैत्री वाढू शकते.

“तुम्ही कसे ऐकता”

“तुम्ही कसे ऐकता ह्‍याविषयी जपून राहा,” असा सल्ला येशूने दिला. (लूक ८:१८) देवाच्या शब्दांकडे कान देण्याच्या महत्त्वाविषयी त्याच्या मनात असले, तरी हे तत्त्व विकसित होणाऱ्‍या नातेसंबंधांमध्ये योग्यप्रकारे लागू होते. मैत्री वाढवण्यात चांगला ऐकणारा असणे अत्यावश्‍यक आहे.

इतर काय म्हणत आहेत त्याबद्दल आपल्याला खरीच आस्था असली, तर ते आपल्याकडे आकर्षित होतात. पण यासाठी, ‘तुम्ही आपलेच हित [कदाचित तुम्हाला जे म्हणायचे आहे तेच] नव्हे, तर दुसऱ्‍याचेहि हित पाहिले’ पाहिजे.—फिलिप्पैकर २:४.

विश्‍वासू असा

येशू त्याच्या मित्रांना जडून राहिला. “स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले.” (योहान १३:१) गॉर्डन नामक एक तरुण पुरुष आपल्या मित्रांना अशाचप्रकारे वागवतो: “एका मित्रामधील सर्वात प्रमुख गुण म्हणजे त्याचा विश्‍वासूपणा. कठीण परिस्थिती ओढवते तेव्हाही तो तुम्हाला जडून राहील का? इतरांनी काही कमी लेखणारं भाष्य केलं की, माझा मित्र आणि मी एकमेकांची बाजू घ्यायचो. आम्ही खरंच एकमेकांशी जडून राहिलो—पण फक्‍त आमचे विचार योग्य असायचे तेव्हाच.”

तथापि, खोटे मित्र, ढोंगीपणाने एकमेकांच्या पाठीत सुरा खुपसतात तेव्हा त्यांना त्याचे काहीच सुखदुख वाटत नसते. “असे काही मित्र असतात जे एकमेकांचा नाश करतात,” असे नीतिसूत्रे १८:२४ (NW) म्हणते. हानीकारक चहाडी करण्यात भाग घेऊन तुम्ही एखाद्या मित्राचा नावलौकिक ‘नष्ट’ कराल, की विश्‍वासूपणाने त्याची बाजू घ्याल?

एकमेकांजवळ भावना व्यक्‍त करा

नंतर येशू आपल्या सर्वात गहन भावना सांगून इतरांमध्ये प्रिय बनला. काहीवेळा त्याला ‘कळवळा आल्याचे,’ ‘प्रीती वाटल्याची’ किंवा तो “अति खिन्‍न” झाल्याचेही त्याने सांगितले. एका प्रसंगी तर, तो “रडला” सुद्धा. येशूला आपल्या भरवशाच्या लोकांसमोर स्वतःचे अंतःकरण मोकळे करण्यास कधीच संकोच वाटला नाही.—मत्तय ९:३६; २६:३८; मार्क १०:२१; योहान ११:३५.

अर्थात, याचा अर्थ तुम्हाला भेटणाऱ्‍या प्रत्येकाला तुम्ही तुमच्या भावना सांगाव्यात असा होत नाही. पण तुम्ही सर्वांशी प्रामाणिक असू शकता. तसेच तुम्ही एखाद्याला जाणू लागता किंवा त्यावर भरवसा ठेवू लागता तसे, हळूहळू तुमच्या सर्वात गहन भावना देखील प्रकट करू शकता. त्याचवेळी, इतरांबद्दलच्या समभावना आणि ‘समसुखदुःख’ वाटू लागणे अर्थपूर्ण मैत्रींकरता अत्यावश्‍यक आहे.—१ पेत्र ३:८.

परिपूर्णतेची अपेक्षा करू नका

एखाद्या मैत्रीची सुरवात चांगली झाली, तरीही परिपूर्णतेची अपेक्षा करू नका. “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो. कोणी जर बोलण्यांत चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय.” (याकोब ३:२) शिवाय, मैत्री वाढवण्यासाठी वेळ लागतो आणि त्यात भावनांचाही समावेश होतो. “तुम्ही द्यायला इच्छुक असलं पाहिजे,” असे प्रेस्ली नावाचा एक युवक म्हणतो. “तोच मैत्रीचा मोठा भाग आहे. काही गोष्टींबद्दल तुमच्या स्वतःच्या भावना तर असतातच पण तुम्ही तुमच्या मित्राच्या भावना आणि मतांना वाव देण्यास इच्छुक असता.”

तथापि, प्रेम न करण्याबद्दल मोजावी लागणारी किंमत अर्थात पोकळ एकांतपणा याच्या तुलनेत मैत्रीसाठी मोजावी लागणारी किंमत काहीच नाही. म्हणून मित्र बनवा. (पडताळा लूक १६:९.) उदार असा. इतरांचे ऐका आणि त्यांच्याप्रती खरी आस्था दाखवा. मग, येशूप्रमाणे तुम्हाला असे अनेकजण भेटतील ज्यांना तुम्ही म्हणू शकता, “तुम्ही माझे मित्र आहा.”—योहान १५:१४.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ तुम्ही खऱ्‍या मित्राला कसे ओळखू शकता? कोणत्या प्रकारचे मित्र खोटे असतात?

◻ तुम्ही मित्र कोठे शोधू शकता? ते नेहमी तुमच्या वयाचेच असावेत का?

◻ एखादा मित्र गंभीररित्या अडचणीत असल्यास तुम्ही काय करावे?

◻ मित्र बनवण्याचे चार मार्ग कोणते आहेत?

[६६ पानांवरील संक्षिप्त आशय]

“माझ्या या नवीन ‘मित्रमैत्रिणींकडून’ मी पुष्कळ काही शिकले—स्टेरिओ चोरणे, बनावटी चेक वटवणे, गांजा ओढणे आणि शेवटी, दररोज २०० डॉलरचा खर्च लागणाऱ्‍या मादक पदार्थांच्या व्यसनासाठी पैसे मिळवणे”

[Box on page 68, 69]

माझ्या मित्राचे नाव मी सांगावे का?

तुमचा मित्र अधूनमधून मादक पदार्थ घेत आहे, लैंगिक संबंध ठेवत आहे, फसवेगिरी करत आहे किंवा चोरी करत आहे असे तुम्हाला कळून चुकले—तर तुम्ही कोणा जबाबदार व्यक्‍तीला त्याविषयी सांगाल का? बहुतेकजण, युवकांमध्ये शांत राहण्याच्या विशिष्ट पद्धतीचे पालन करून सांगणार नाहीत.

काहींना दुसऱ्‍यांच्या कामात “चमचा” असे नाव मिळण्याची भीती असते. इतरांना विश्‍वासूपणाची एक चुकीची समज असते. शिस्त हानीकारक असते असा विचार करून, आपल्या मित्राच्या समस्या झाकून ते त्याच्यावर कृपा दाखवत आहेत अशी त्यांची कल्पना असते. शिवाय, शांत राहण्याच्या पद्धतीचा भंग केल्याने एखाद्याला समवयस्कांकडून उपहास सोसावा लागेल किंवा त्यामुळे मैत्री तुटण्याचीही संभावना असते.

तथापि, ली नामक एका युवकाला आपला जिगरी दोस्त, ख्रिस धूम्रपान करत असल्याचे कळाल्यावर त्याने लगेच पाऊल उचलण्याचे ठरवले. ली म्हणतो: “माझा विवेक मला बोचत होता कारण मी कुणाला तरी सांगितलं पाहिजे हे मला ठाऊक होतं!” बायबल काळातील एका युवकाला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. “योसेफ सतरा वर्षांचा असता आपल्या भावांबरोबर कळप चारीत असे . . . तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापास दिली.” (उत्पत्ति ३७:२) योसेफाला माहीत होते की, तो शांत राहिला तर त्याच्या भावांचे आध्यात्मिक हित धोक्यात पडू शकत होते.

पाप नाशकारक, भ्रष्ट करणारी शक्‍ती आहे. एखाद्या चूक करणाऱ्‍या स्नेहीला मदत मिळेपर्यंत तो किंवा ती अधिकाधिक दुष्टपणात गोवला जाऊ शकतो—ही मदत कदाचित कडक शास्त्रवचनीय शिस्तीच्या रूपात देखील असू शकते. (उपदेशक ८:११) परिणामस्वरूप, एखाद्या मित्राचा अपराध लपवल्याने केवळ वाईटच होत नाही तर कायमस्वरूपी नुकसान देखील होऊ शकते.

यास्तव, बायबल आर्जवते: “बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहा ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा.” (गलतीकर ६:१) चूक करणाऱ्‍या मित्राला ताळ्यावर आणण्याची आध्यात्मिक पात्रता तुम्हाजवळ आहे असे कदाचित तुम्हाला वाटणार नाही. पण मदत देण्यास पात्र असणाऱ्‍या कोणा व्यक्‍तीला ही बाब सांगितल्याची खात्री करणे शहाणपणाचे नव्हे काय?

यास्तव, तुम्ही तुमच्या मित्राकडे जाऊन त्याची चूक उघड करावी हे अत्यंत जरूरीचे आहे. (पडताळा मत्तय १८:१५.) यासाठी तुम्हाला धैर्यशील आणि धीट असावे लागेल. खंबीर असा, त्याच्या पापाविषयी खात्रीलायक पुरावा द्या व तुम्हाला काय माहीत आहे आणि तुम्हाला ते कसे कळले ते खासकरून सांगा. (पडताळा योहान १६:८.) तुम्ही कोणालाही त्याविषयी सांगणार नाही असे वचन देऊ नका, कारण देवाच्या नजरेत अशा वचनाला काहीच मूल्य नाही; तो दोष झाकण्याचे खंडन करतो.—नीतिसूत्रे २८:१३.

कदाचित काही गैरसमज झाला असेल. (नीतिसूत्रे १८:१३) जर असे नसले, आणि खरोखरच अपराध घडला असल्यास, असे होऊ शकते, की तुमच्या मित्राला त्याची समस्या उघडकीस आणल्याबद्दल बरे वाटत असेल. चांगले ऐकणारे असा. (याकोब १:१९) “तू असं करायला नको होतंस!” अशा निर्णायक अभिव्यक्‍ती किंवा “तू हे केलंसच कसं!” अशा आश्‍चर्य व्यक्‍त करणाऱ्‍या अभिव्यक्‍ती वापरून त्याच्या भावना मोकळेपणाने बाहेर येत असताना त्यांना दाबून टाकू नका. समभावना दाखवा आणि तुमच्या मित्राला जे वाटते ते जाणून घ्या.—१ पेत्र ३:८.

बहुतेकवेळा, अशा परिस्थितीत तुम्ही देऊ शकता त्याहूनही अधिक मदतीची आवश्‍यकता असते. मग तुमच्या मित्राने त्या अपराधाविषयी त्याच्या पालकांना किंवा इतर जबाबदार प्रौढांना सांगावे, असा आग्रह करा. पण तुमच्या मित्राने ते करायला नकार दिल्यास? त्याला हे सांगा की, उचित कालावधीत त्याने ती बाब स्पष्ट केली नाही तर त्याचा खरा मित्र या नात्याने तुम्हाला त्याच्या वतीने कोणाकडे तरी जाणे भाग पडेल.—नीतिसूत्रे १७:१७.

सुरवातीला तुमच्या मित्राला तुम्ही असे पाऊल का उचलले हे समजणार नाही. तो कदाचित चिडून अविचारीपणाने तुमच्यासोबतची मैत्री देखील मोडू शकतो. पण ली म्हणतो: “कोणाला तरी सांगून मी योग्य तेच केलं हे मला माहीत होतं. माझ्या विवेकाला इतकं बरं वाटलं कारण ख्रिसला आवश्‍यक ती मदत मिळत होती. नंतर त्याने येऊन मला सांगितलं की, मी जे काही केलं त्याबद्दल तो चिडला नाही आणि त्यामुळे मलाही हायसं वाटलं.”

पण तुमचा स्नेही तुमच्या धैर्यशील कार्यहालचालींबद्दल मनात राग बाळगतच असल्यास, तो तुमचा खरा मित्र नव्हताच हे स्पष्ट आहे. पण तुम्ही मात्र देवाप्रती तुमची निष्ठा कायम ठेवली आणि स्वतःला एक खरा मित्र शाबीत केले हे जाणल्याने तुम्हाला समाधान मिळेल.

[६७ पानांवरील चित्र]

मित्रमैत्रिणी बनवण्यात तुम्हाला अडचण वाटते का?

[७० पानांवरील चित्र]

इतरांबद्दल आस्था बाळगणे हे मित्रत्वाची सुरवात करण्याचे सूत्र आहे