व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मला समवयस्कांच्या दबावाचा सामना कसा करता येईल?

मला समवयस्कांच्या दबावाचा सामना कसा करता येईल?

अध्याय ९

मला समवयस्कांच्या दबावाचा सामना कसा करता येईल?

वयाच्या १४ व्या वर्षी, कविता आधीच मादक पदार्थांच्या आहारी गेली होती आणि नियमितपणे लैंगिक संबंध ठेवत होती. १७ वर्षांच्या वयापर्यंत, जिम निश्‍चित मद्यातिरेकी बनला होता आणि तो अनैतिक जीवनही जगत होता. दोघेही हे मान्य करतात की, त्यांची जीवनशैली किंवा त्यांची कामे त्यांना मुळीच आवडत नव्हती. मग, ते अशी कामे का करत होते? समवयस्कांचा दबाव!

“मी ज्यांच्यासोबत असायचे ते सर्वजण असली कामं करायचे आणि मग त्याचा जबरदस्त परिणाम माझ्यावरही झाला,” असे कविता सांगते. जिमने देखील मान्य केले व तो म्हणाला, “अलिप्त होऊन मला माझे मित्र गमवायचे नव्हते.”

युवक त्यांच्या समवयस्कांचे अनुकरण का करतात

काही युवक मोठे होतात तसे त्यांच्या पालकांचा प्रभाव कमी होतो, आणि प्रिय बनण्याची व सर्व समवयस्कांनी आपल्याला स्वीकारावे अशी इच्छा अधिक प्रबल होते. इतरांना, केवळ अशा व्यक्‍तीशी बोलावेसे वाटते जी त्यांना “समजून घेईल” किंवा त्यांना प्रिय असल्याची वा हवे असल्याची जाणीव करून देईल. अशा प्रकारचे दळणवळण घरी नसते—तेव्हा हे युवक त्यांच्या समवयस्कांमध्ये ते मिळवतात—आणि सहसा ते खरेही असते. पुष्कळदा, असेही होते की आत्म-विश्‍वासाचा अभाव आणि असुरक्षिततेच्या भावनांमुळे काहीजण समवयस्कांच्या प्रभावाला भेद्य ठरतात.

समवयस्कांचा प्रभाव नेहमीच वाईट असतो असे नाही. एक नीतिसूत्र म्हणते: “तिखे तिख्याला पाणीदार करिते. तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करितो.” (नीतिसूत्रे २७:१७) लोखंडाची सुरी बोथट सुरीला पाणीदार करू शकते त्याचप्रमाणे, इतर युवकांबरोबरील संगत तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाला “पाणीदार” करू शकते आणि तुम्हाला उत्तम व्यक्‍ती बनवू शकते—जर त्या युवकांच्या प्रौढ, हितकर मनोवृत्ती असल्या तरच.

पण बहुतेकदा, दुःखाची गोष्ट अशी आहे की, युवकांमध्ये प्रौढतेचा अभाव दिसून येतो—मानसिक व आध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारचा. अनेक युवकांचे दृष्टिकोन आणि अभिप्राय अनुचित, अविश्‍वसनीय एवढेच काय तर बेपर्वाईचे देखील असतात. असा एखादा युवक समवयस्कांच्या नियंत्रणाखाली विनाहरकत येतो तेव्हा, आंधळ्यांचे आंधळे वाटाडी असल्यासारखाच प्रकार घडतो. (पडताळा मत्तय १५:१४.) त्याचे परिणाम विध्वंसक असू शकतात.

तुमचे समवयस्क तुम्हाला निर्लज्जपणे वागण्यास जबरदस्ती करत नसले, तरीही त्यांचा प्रभाव तुम्हाला त्रासदायक वाटू शकतो. “दुसऱ्‍या मुलांनी तुम्हाला स्वीकारावं याची तुम्हाला जास्त चिंता असते,” असे डेब्बी म्हणते. “मी अठरा वर्षांची होते तेव्हा मला अप्रिय असण्याची अक्षरशः भीतीच वाटायची कारण मग मला कोणी मौजमजा करायला बोलवणार नाही ना. मला वाळीत टाकले जाईल अशी भीती वाटायची.” म्हणून डेब्बीने आपल्या समवयस्कांची स्वीकृती मिळवण्यासाठी खूप परिश्रम घेतले.

माझ्यावर प्रभाव पडत आहे का?

तुम्ही देखील समरूप होण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने वेशभूषा करायला, बोलायला अथवा वागायला लागला आहात का? सतरा वर्षांची सूझी असा दावा करते, “तुम्हाला जे करायचं नाही ते दुसरं कोणी तुम्हाला करायला लावू शकत नाही.” हे खरे आहे, पण समवयस्कांचा दबाव इतका सफाईदार असू शकतो की तुमच्यावर त्याचा कितपत परिणाम होत आहे हे तुम्हाला कळणारही नाही. उदाहरणार्थ, प्रेषित पेत्राचा विचार करा. पेत्र हा धीट, ठाम मताचा असून ख्रिस्ती विश्‍वासाचा एक आधारस्तंभ होता. देवाने पेत्राला प्रकट केले की, सर्व राष्ट्रे व जातीतील लोक त्याचा अनुग्रह प्राप्त करू शकत होते. म्हणून पेत्राने सत्य मानणाऱ्‍या पहिल्या विदेशी लोकांना ख्रिस्ती बनण्यास मदत केली.—प्रेषितांची कृत्ये १०:२८.

तथापि, कालांतराने पेत्र ॲन्टीयोक येथे स्थित होता; ते असे शहर होते जेथे पुष्कळ गैर-यहुदी लोक ख्रिस्ती बनले होते. या सत्य मानणाऱ्‍या विदेशी लोकांसोबत पेत्र अगदी मनमिळाऊ होता. एके दिवशी जेरुसलेममधील काही यहुदी ख्रिस्ती जे अद्यापही गैर-यहुदी लोकांबद्दल भेदभाव बाळगत होते, ते ॲन्टीयोकला आले. आता आपल्या यहुदी समवयस्कांसमोर पेत्र कसा वागला?

पेत्राने स्वतःला विदेशी ख्रिश्‍चनांपासून अलिप्त केले आणि त्याने त्यांच्यासोबत भोजन करायचे नाकारले! का बरे? आपल्या समवयस्कांना अडथळा होईल अशी त्याला भीती वाटली असावी हे स्पष्ट आहे. त्याने असा तर्क केला असावा, ‘हे लोक आहेत तोपर्यंत मी जरा नमते घेतो आणि नंतर ते गेल्यावर वाटल्यास विदेश्‍यांसोबत भोजन करीन. इतक्याशा गोष्टीवरून आमच्यातले घनिष्ट नाते का म्हणून खराब करायचे?’ अशाप्रकारे पेत्र केवळ ढोंग करत होता—तो प्रत्यक्षात ज्यावर त्याचा विश्‍वास नव्हता अशी गोष्ट करून स्वतःचीच तत्त्वे झिडकारत होता. (गलतीकर २:११-१४) यावरून हे स्पष्ट होते की, समवयस्कांच्या दबावापासून कोणीही सुटत नाही.

मी कशी प्रतिक्रिया दाखवेन?

म्हणून, ‘दुसरे काय विचार करतात त्याची मला पर्वा नाही!’ असे म्हणणे सोपे असले, तरी तो निर्धार समवयस्कांचा दबाव असताना टिकवून ठेवणे निराळीच बाब आहे. उदाहरणार्थ, तुम्ही खालील परिस्थितीत काय कराल?

तुमचा एक शाळासोबती इतर सर्व युवकांदेखत तुम्हाला सिगारेट देतो. धूम्रपान करणे चुकीचे आहे हे तुम्हाला माहीत आहे. पण तुम्ही काय कराल हे पाहायला सर्वजण थांबून राहिलेत . . .

शाळेतील मुली त्यांच्या मित्रांसोबत लैंगिक संबंध ठेवण्याविषयी चर्चा करत आहेत. एक मुलगी तुम्हाला म्हणते: “तू कुमारिका तर नाहीस ना?”

इतर मुलींसारखा पोषाख तुम्हालाही घालायचा होता पण आई म्हणते तो फारच आखूड आहे. तुम्ही जो पोषाख घालावा असा तिचा आग्रह आहे त्यामुळे तुम्ही आणखी सहा वर्षे मोठे दिसता असे तुम्हाला वाटते. तुमचे वर्गसोबती तुमची टिंगल करतात. एक मुलगी विचारते, “तुझ्या वरच्या खर्चासाठी जे पैसे मिळतात तेच जमवून तू काहीतरी चांगलं विकत घेऊ शकत नाहीस का? तुला आईला सांगायची गरज नाही. फक्‍त एवढंच की, शाळेतले कपडे तुझ्या लॉकरमध्ये ठेव, झालं.”

या परिस्थिती सामना करायला सोप्या आहेत का? कदापि नाही, पण तुम्हाला तुमच्या समवयस्कांना नाही म्हणायला भीती वाटते, तर मग शेवटी तुम्ही स्वतःला, तुमच्या तत्त्वांना आणि तुमच्या पालकांना नाही म्हणता. समवयस्कांच्या दबावाला तोंड देण्याचे धाडस तुम्ही कसे करू शकता?

“विचारशीलता”

पंधरा वर्षांच्या रॉबिनने धूम्रपान करायला सुरवात केली, तिला इच्छा होती म्हणून नव्हे, तर इतर सर्वजण तसे करायचे म्हणून. ती आठवून सांगते: “नंतर मी विचार करू लागले, ‘मला हे आवडत नाही. मग मी कशाला करतेय?’ म्हणून मी आता ते सोडून दिलंय.” स्वतःकरता विचार केल्यामुळे, ती तिच्या समवयस्कांना तोंड देऊ शकली!

म्हणूनच, बायबल युवकांना “ज्ञान व विचारशीलता” विकसित करण्यास आर्जवते हे उचित आहे. (नीतिसूत्रे १:१-५, NW) विचारशील असणाऱ्‍याला मार्गदर्शनासाठी अननुभवी समवयस्कांवर अवलंबून राहण्याची गरज नसते. त्याच वेळी, तो आत्म-विश्‍वासी होऊन इतरांच्या अभिप्रायांकडे दुर्लक्ष करत नाही. (नीतिसूत्रे १४:१६) तो अथवा ती ‘सुज्ञ व्हावे’ म्हणून ‘सुबोध ऐकण्यास व शिक्षण स्वीकारण्यास’ तयार असतात.—नीतिसूत्रे १९:२०.

परंतु, विचार क्षमता उपयोगात आणल्यामुळे तुम्हाला नापसंत करण्यात आले अथवा तुमचा उपहास देखील केला तर त्यावर आश्‍चर्यचकित होऊ नका. “विचारशील मनुष्याचा [अथवा स्त्रीचा] द्वेष केला जातो,” असे नीतिसूत्रे १४:१७ (NW) म्हणते. पण खरे पाहता, जास्त सामर्थ्य कोणाकडे असते, जे त्यांच्या वासना व भावनांसमोर नमते घेतात त्यांच्याजवळ की जे अयोग्य वासनांना नकार देऊ शकतात अशांजवळ? (पडताळा नीतिसूत्रे १६:३२.) जे तुमचा उपहास करतात त्यांचे भवितव्य काय आहे? तुमच्याही जीवनात शेवटी तेच व्हावे अशी तुमची इच्छा आहे काय? त्यांना केवळ तुमची ईर्ष्या वाटते म्हणून ते उपहास करून स्वतःचीच असुरक्षितता तर लपवण्याचा प्रयत्न करत नसावेत  ना?

पाशापासून दूर राहणे

“मनुष्याची भीति पाशरूप होते,” असे नीतिसूत्रे २९:२५ म्हणते. बायबल काळात, जो अजाण प्राणी आमिषावर झडप घालायचा तो सहजगतीने पाशात सापडत असे. आज, तुमच्या समवयस्कांनी तुम्हाला स्वीकारावे ही इच्छा तुमच्यासाठी अशाचप्रकारचे आमिष ठरू शकते. ते तुम्हाला ईश्‍वरी दर्जांचा भंग करण्याच्या पाशात अडकण्यास भुरळ पाडू शकते. मग, तुम्ही मनुष्याच्या भीतीच्या पाशातून सुटका कशी मिळवू शकता—अथवा तो पाश कसा टाळू शकता?

पहिली गोष्ट, तुमचे मित्र काळजीपूर्वक निवडा! (नीतिसूत्रे १३:२०) जे ख्रिस्ती मूल्ये आणि दर्जे पाळतात अशांसोबत संगत करा. हे खरे की, यामुळे तुमचे मित्रवर्तुळ मर्यादित होते. त्याविषयी एक किशोरवयीन म्हणतो: “शाळेत, मी इतरांशी व मादक पदार्थ आणि लैंगिक संबंधांबद्दल त्यांच्या कल्पनांशी समरूप झालो नाही तेव्हा त्यांनी लगेच माझी साथ सोडली. यामुळे त्यांच्याप्रमाणे वागण्याचा माझ्यावरचा पुष्कळसा दबाव कमी झाला, तरी मला जरा एकटं एकटं वाटू लागलं.” पण, समवयस्कांच्या प्रभावामुळे आध्यात्मिक तसेच नैतिकदृष्ट्या उतरती कळा लागण्याऐवजी थोडाफार एकाकीपणा सहन करणेच उत्तम आहे. एखाद्याच्या कुटुंबातील आणि ख्रिस्ती मंडळीतील संगतीने एकाकीपणाची ही पोकळी भरून काढण्यात मदत मिळू शकते.

तुमच्या पालकांचे ऐकल्याने देखील तुम्हाला समवयस्कांच्या दबावाला प्रतिकार करण्यास मदत मिळते. (नीतिसूत्रे २३:२२) ते, तुम्हाला उचित मूल्ये शिकवण्यात कदाचित परिश्रम घेत असतील. एक तरुण मुलगी म्हणाली: “माझे पालक माझ्याबाबतीत फार कडक होते. काहीवेळा मला आवडायचं नाही, पण त्यांनी तसा आग्रहच धरून माझ्या संगतीवर मर्यादा घातल्या ते बरंच केलं.” पालकांनी दिलेल्या त्या मदतीमुळे, मादक पदार्थांचे सेवन करण्याच्या आणि लैंगिक संबंध ठेवण्याच्या दबावापुढे ती नमली नाही.

बेथ विनशिप हे किशोरवयीनांचे सल्लागार असे निरीक्षण करतात: “जे किशोर कशात ना कशात प्रवीण असतात ते स्वतःच्या दृष्टीत मूल्यवान असतात. स्वतःची चांगली प्रतिमा बनवण्यासाठी त्यांना समवयस्कांच्या स्वीकृतीवर विसंबून राहावे लागत नाही.” तर मग, तुम्ही शाळेत तसेच घरामध्ये जे काही करता त्यात कुशल व कार्यक्षम असण्याचा प्रयत्न का करू नये बरे? विशेषतः, यहोवाचे तरुण साक्षीदार त्यांच्या ख्रिस्ती सेवाकार्यात ‘सत्याचे वचन नीट सांगणारे, लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेले कामकरी’ होण्याचा प्रयत्न करतात.—२ तीमथ्य २:१५.

मनुष्यांच्या भीतीच्या ‘पाशाबद्दल’ इशारा दिल्यावर, नीतिसूत्रे २९:२५ पुढे म्हणते: “पण जो परमेश्‍वरावर भाव ठेवितो त्याचे संरक्षण होते.” कदाचित, आणखी कोणत्याही गोष्टीपेक्षा, देवासोबतचा नातेसंबंध तुम्हाला तुमच्या समवयस्कांना तोंड देण्यास बळकट करू शकतो. उदाहरणार्थ, डेब्बी (आधी उल्लेखिलेली) काही काळापर्यंत लोकांचे अनुकरण करून खूप मद्यपान आणि मादक पदार्थांचे सेवन करत होती. पण, नंतर तिने बायबलचा गंभीरतेने अभ्यास सुरू केला आणि ती यहोवावर भरवसा ठेवू लागली. त्याचा परिणाम? “बाकीची मुलं करतात त्या गोष्टी मी करणार नाही असा मी मनाशी निर्धार केला,” असे डेब्बी म्हणते. तिने आपल्या पूर्वीच्या मित्रमैत्रिणींना सांगितले: “तुम्ही तुमच्या वाटेने जा आणि मी माझ्या वाटेने जाते. तुम्हाला माझी मैत्री हवीय तर माझ्या दर्जांचा तुम्हाला मान राखावा लागेल. मला माफ करा पण तुम्हाला कसं वाटतं त्याची मला पर्वा नाही. मी तर हेच करणार.” डेब्बीच्या सर्वच मित्रांनी तिच्या नव्यानेच प्राप्त झालेल्या विश्‍वासाचा आदर केला नाही. पण डेब्बी म्हणते, “हा निर्णय घेतल्यावर मला त्याचं समाधान वाटलं.”

तुम्ही समवयस्कांच्या दबावाच्या पाशातून सुटका मिळवली तर, तुम्हालाही ‘समाधान वाटेल’ आणि तुम्ही स्वतःला बऱ्‍याचशा दुःखापासून वाचवाल!

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ युवक त्यांच्या समवयस्कांचा प्रभाव स्वतःवर का होऊ देतात? हे नेहमीच वाईट असते का?

◻ प्रेषित पेत्राचा अनुभव समवयस्कांच्या दबावाविषयी आपल्याला काय शिकवतो?

◻ अशा काही परिस्थिती (कदाचित व्यक्‍तिगत अनुभवातील काही) कोणत्या आहेत जेथे नकार देण्याच्या तुमच्या क्षमतेची परीक्षा होते?

◻ हिंमत असेल तर करून दाखव, असं आव्हान करण्यात आल्यास तुम्ही कोणत्या गोष्टींचा विचार कराल?

◻ तुम्हाला मनुष्याच्या भीतीच्या पाशापासून स्वतःचा बचाव करण्यास कोणत्या गोष्टी मदत करू शकतात?

[७४ पानांवरील संक्षिप्त आशय]

“दुसऱ्‍या मुलांनी तुम्हाला स्वीकारावं याची तुम्हाला जास्त चिंता असते,” असे डेब्बी म्हणते. “मला अप्रिय असण्याची अक्षरशः भीतीच वाटायची . . . मला वाळीत टाकले जाईल अशी भीती वाटायची”

[Box on page 75]

‘हिंमत असेल तर करून दाखव!’

“चल, हो पुढे” लिसाच्या वर्गसोबती आग्रह करू लागल्या. “बाईंना सांग त्यांच्या तोंडाचा वास येतो म्हणून!” नाही, हा मौखिक आरोग्याचा विषय मुळीच नव्हता. लिसाला हिंमत असेल तर करून दाखवण्याचे आव्हान केले जात होते—आणि तेही अतिशय जोखिमीचे! होय, लहानसहान मस्करी ते चक्क आत्महत्येसारखी कृत्ये करून दाखवण्याचे इतरांना आव्हान करण्याद्वारे काही युवकांना यातून तेढा आनंद मिळतो.

पण तुम्हाला एखादी मूर्खपणाची, क्रूर किंवा स्पष्टरित्या धोकेदायक असलेली गोष्ट करून दाखवण्याचे आव्हान केले जाते तेव्हा पुन्हा विचार करण्याची ती वेळ आहे. एका सुज्ञ मनुष्याने म्हटले: “गंध्याच्या तेलास, मरून पडलेल्या माश्‍यांमुळे दुर्गंधि येते व ते नासून जाते. तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा यांवर बसतो.” (उपदेशक १०:१) प्राचीन काळात, मौल्यवान तेलाची अथवा सुगंधी द्रव्याची मेलेल्या माशीएवढ्या लहान गोष्टीने नासाडी होत असे. त्याचप्रमाणे, एखाद्याचे कष्टाने प्राप्त केलेला नावलौकिक ‘अल्पमात्र मूर्खपणाने’ कलंकित होऊ शकतो.

बालिश चेष्टांमुळे सहसा कमी मार्क, शाळेतून निलंबित करणे तसेच अटक देखील होऊ शकते! तथापि, तुम्ही पकडले जाणार नाहीत असे तुम्हाला वाटले तर? स्वतःला विचारा, मला जे करायला सांगितले आहे ते उचित आहे काय? ते प्रेमळपणाचे कृत्य आहे का? त्यामुळे बायबलच्या दर्जांचा अथवा माझ्या पालकांनी मला शिकवलेल्या दर्जांचा भंग होईल का? असे असल्यास, माझ्या जीवनावर टवाळकी करणाऱ्‍या युवकांचे नियंत्रण असावे अशी माझी खरोखरच इच्छा आहे का? जे युवक मला माझे जीवन आणि नावलौकिक धोक्यात घालायला सांगतात ते खरोखरच माझे मित्र आहेत का?—नीतिसूत्रे १८:२४ (NW).

मग, जो युवक तुम्हाला आव्हान करत आहे त्याच्याशी तर्क करण्याचा प्रयत्न करा. अठरा वर्षांच्या टेरीला, ‘मी का करावं? मी ते केलं तर त्यातून काय सिद्ध होईल?’ असा उलट प्रश्‍न विचारून “सगळी मजा घालवायला” आवडते. त्याचप्रमाणे, तुमचे काही विशिष्ट दर्जे आहेत आणि त्यानुसार जगण्याची तुमची इच्छा आहे हे देखील स्पष्ट करा. एका तरुण मुलीने एका मुलाला अनैतिक काम करण्यास आव्हान देऊन म्हटले, “तू काय चुकवतोस याची जाणीव नाही तुला.” “जाणीव आहे मला,” तो मुलगा म्हणाला. “नागीण, गरमी, उपदंश . . . ”

होय, तुमच्या समवयस्कांना नाही म्हणण्याचे धाडस केल्याने नंतर पश्‍चात्ताप करावा लागेल असे काही करण्याचे तुम्ही टाळाल!

[७६ पानांवरील चित्र]

युवक बहुधा आधारासाठी एकमेकांशी जडून राहतात

[७७ पानांवरील चित्र]

तुम्हाला जे योग्य असल्याचे ठाऊक आहे त्याच्या उलट कार्य करण्यास तुम्ही समवयस्कांचा दबाव कधी झेललाय का?

[७८ पानांवरील चित्र]

समवयस्कांच्या दबावाला तोंड देण्याचे धाडस करा!