व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रूप किती महत्त्वाचे आहे?

रूप किती महत्त्वाचे आहे?

अध्याय १०

रूप किती महत्त्वाचे आहे?

काय! तुम्हाला स्वतःचे स्वरूप आवडत नाही? स्वतःच्या रुपाने समाधानी असणारे लोक क्वचितच असतात. नारसीसस, तलावात स्वतःचे प्रतिबिंब पाहून स्वतःच्याच प्रेमात पडला; तथापि आपल्यापैकी काहीजण स्वतःचे प्रतिबिंब पाहून खिन्‍नच होतात.

‘माझं काहीच मला आवडत नाही,’ असा खेद १६ वर्षांची राणी व्यक्‍त करते. ‘मला वाटतं, मी इतकी काही सुंदर दिसत नाहीय.’ तेरा वर्षांच्या बॉबला सुद्धा अशाचप्रकारचे दुःख वाटते: ‘माझे हे केस मागे असे उभे राहतात म्हणून मला ते मुळीच आवडत नाहीत.’ एखाद्या किशोरवयीनाचे स्वरूप इतक्या जलदगतीने बदलू शकते, की एका मानसशास्त्रज्ञानुसार युवकांना बहुतेकवेळा “स्वतःच्याच शरीरात परकेपणा जाणवतो;” यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होते. यास्तव पुष्कळजण आपला चेहरा, केस, बांधा आणि शरीरयष्टी यांबद्दल असंतुष्ट असतात.

अर्थात, देव स्वतः सौंदर्याची प्रशंसा करतो. उपदेशक ३:११ म्हणते: “आपआपल्या समयी होणारी हरएक वस्तु [देवाने] सुंदर बनविली.” तसेच, इतरजण तुमच्याविषयी कसा दृष्टिकोन बाळगतात व तुमच्याशी कसा व्यवहार करतात यावर तुमच्या स्वरूपाचा निश्‍चितच पुष्कळ प्रभाव पडू शकतो. डॉ. जेम्स पी. कोमर यात भर घालतात: “शरीर स्वरूप हा आत्म-प्रतिमेचा भाग आहे. त्याचा, एखाद्या व्यक्‍तीच्या आत्मविश्‍वासावर व जीवनात ती जे काही करते व करत नाही यावर परिणाम होऊ शकतो.” यास्तव, तुमच्या स्वरूपाबद्दल योग्य ती चिंता बाळगणे हे सुज्ञपणाचे आहे. तथापि, इतरांपासून दूर पळण्याइतकी किंवा स्वतःबद्दल वाईट वाटण्याइतकी स्वतःची लाज वाटू लागते तेव्हा मात्र ही चिंता योग्य राहत नाही.

कोण म्हणते तुम्ही रूपहीन आहात?

गंमत म्हणजे, व्यक्‍तिगत स्वरूपाबद्दल जो खेद वाटतो तो नेहमीच खरोखरच्या शारीरिक न्यूनतांमुळे नसतो. सडपातळ मुलगी वर्गात बसून मी जाड असते तर बरे झाले असते अशी कल्पना करते, तर पलीकडील ओळीतल्या जाड्याजुड्या मुलीला मी किती “लठ्ठ” आहे याचे दुःख वाटत असते. अशाप्रकारची असंतुष्टता कशामुळे निर्माण होते? बऱ्‍यापैकी स्वरूप असणाऱ्‍या युवकांच्या मनात आपण रूपहीन आहोत असा विचार का येतो?

मनोदोषचिकित्सेचे प्राध्यापक रिचर्ड एम. सार्ल्स असे म्हणतात: “पौगंडावस्था हा परिवर्तनाचा काळ आहे ज्यामध्ये शरीराची मोठ्या प्रमाणात पुनर्रचना घडते. . . . नवीन आणि बदलत्या शरीराच्या विक्षिप्तपणाला तोंड देण्याकरता बहुतांश पौगंड त्यांच्या समवस्यक गटाच्या सुरक्षिततेवर अवलंबून राहतात.” पण तुम्ही किती उंच, ठेंगणे, लठ्ठ किंवा सडपातळ आहात—एवढेच काय तर तुमच्या नाकाचा व कानांचा आकार—यावर तुमच्या समवयस्कांचे लक्ष असल्यामुळे ही मोठी चिंतेची बाब बनू शकते. तसेच, तुमच्यापेक्षा इतरांकडे जास्त लक्ष दिले जाते अथवा तुमच्या स्वरूपाविषयी टीका करण्यात येते तेव्हा तुम्हाला कदाचित स्वतःबद्दल वाईट वाटू लागेल.

त्याशिवाय, टीव्ही, पुस्तके आणि चित्रपट यांचाही व्यापक परिणाम आहेच. मोहक पुरुष व स्त्रिया टीव्हीच्या पडद्यावरून आणि नियतकालिकांच्या पानांवरून, पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची विक्री करत आपल्याकडे टकमक पाहत असतात. अशाप्रकारे दळणवळणाची माध्यमे तुम्हाला असा विश्‍वास करण्यास भाग पाडू शकतात, की तुम्ही नितळ त्वचा असलेली सौंदर्यवती किंवा “तगडा पुरुष” नसला तर एकतर मुकाट्याने घरात बसा—नाहीतर निदान जीवनात कधी प्रसिद्ध किंवा आनंदी होण्याचे स्वप्न तरी पाहू नका.

‘त्यांच्या साच्यात कोंबले’ जाऊ नका!

पण तुम्ही विद्रुप आहात असा निष्कर्ष काढण्याआधी तुमच्या शारीरिक त्रुटी कितपत वास्तविक—अथवा कल्पित आहेत असा प्रश्‍न स्वतःला करा. तुम्ही ज्या नाकडोळ्याबद्दल असंतुष्ट आहात (किंवा ज्याकरता तुम्हाला चिडवले जाते) ते खरोखरच इतके कुरूप आहेत का? की तसा विचार करण्यास इतरांनी तुम्हाला भाग पाडले आहे? बायबल सल्ला देते: “सभोवतालच्या जगाला, तुम्हास त्याच्या साच्यात कोंबण्यास वाव देऊ नका.”—रोमकर १२:२, फिलिप्स.

विचार करा: तुम्हाला प्रसिद्ध, यशस्वी अथवा आनंदी असावयाचे असल्यास विशिष्ट प्रकारचे स्वरूप असले पाहिजे अशा विचारास कोण चालना देते? तुम्ही फॅड डायट अनुसरता अथवा महागडी सौंदर्यप्रसाधने खरेदी करता त्याद्वारे नफा मिळवणारे उत्पादक आणि जाहिरात देणारे हेच त्यामागे नाहीत काय? तुमच्याकरता विचारपद्धत ठरवण्यासाठी तुम्ही त्यांना अनुमती का द्यावी? तसेच, समवयस्क तुमच्या रूपाची टीका करत असल्यास, ते मदत व्हावी म्हणून असे करत आहेत—की फक्‍त तुम्हाला कमी लेखण्यासाठी असे करत आहेत? जर नंतरची गोष्ट खरी आहे तर मग अशाप्रकारचे “मित्र” हवेतच कोणाला?

‘आपले अंतःकरण सुज्ञानाकडे लाव’ असा सल्ला बायबल तुम्हास देते. (नीतिसूत्रे २:२) सुज्ञान तुम्हाला तुमच्या शारीरिक स्वरूपाकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहण्यास व प्रसार माध्यमातील प्रचाराबद्दल चोखंदळ असण्यास मदत करील. मोजकेच लोक सुपरमॉडेलसारखे दिसत असतील. तसेच “सौंदर्य उडून जाते.” (नीतिसूत्रे ३१:३०, मराठी कॉमन लँग्वेज) ज्या लोकांना त्यांच्या स्वरूपासाठी पैसा दिला जातो ते लोक शिखरावर असतात पण क्षणभरासाठीच, मग त्यांना एखाद्या नवीन, टवटवीत चेहऱ्‍याकरता बाजूला सारले जाते. त्याचप्रमाणे मेकअप, प्रकाश व्यवस्था आणि छायाचित्रण कला यांद्वारे बहुधा त्यांच्या स्वरूपात आश्‍चर्यकारक बदल केले जातात. (या नामांकित व्यक्‍ती त्यांच्या सौंदर्यप्रसाधन व्यवस्थांविना कशा दिसतात ते पाहिल्यावर तर काहींना धक्काच बसतो!)

म्हणून टीव्ही अथवा नियतकालिकातील एखाद्या मॉडेलसारखे दिसत नसल्यामुळे तुम्हाला उदास होण्याची काहीच गरज नाही. तसेच तुमचे समवयस्क तुम्ही लोभस दिसण्याकरता किती उंच, ठेंगणे किंवा सडपातळ असावे हे ठरविणारे अखेरचे परीक्षक नाहीत. तुमच्या स्वरूपाबद्दल तुम्ही समाधानी असल्यास तुमच्या समवयस्कांकडे अधिक लक्ष देऊ नका. उपरोधिक गोष्ट अशी, की तुमच्या स्वरूपातील तुम्हाला न आवडणारी गोष्ट कदाचित दुसऱ्‍या व्यक्‍तीला हेवा वाटण्यास कारण असेल.

आपल्या परीने उत्तम दिसण्याचा प्रयत्न करा!

काहीवेळा युवकांना खरोखरच स्वरूपाच्या समस्या असतात: निकृष्ट त्वचा, प्रमाणापेक्षा जास्त वजन, कुरूप नाक, मोठे कान, अतिशय ठेंगणी शरीरठेवण. अर्थात, वाढत्या अंगामुळे तुमच्या स्वरूपात अजूनही परिवर्तन होत आहे. मुरूमे, वजन कमीजास्त होणे व अतिवेगवान (अथवा अतिशय मंद) वाढ या गोष्टी किशोरावस्थेतील अरिष्टे आहेत. कालांतराने अशा पुष्कळ समस्या सुटतात.

इतरांच्या बाबतीत तसे घडत नाही. पुष्कळ युवकांना ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते की त्यांचे स्वरूप, तितके सुरेख नाही. लेखक जॉन किलींगर यांनी म्हटले: “अनेक लोकांकरता, देखणे रूप नसणे ही जीवनातील सर्वात दुःखमय वस्तुस्थिती असते जी लहान वयातच त्यांच्या लक्षात येते आणि तिच्याकडे उर्वरित जीवनात क्वचितच डोळेझाक करता येते.” तथापि, तुम्ही चांगले दिसू शकता!

शस्त्रक्रिया, शारीरिक वैगुण्ये सुधारण्याचा खर्चीक व कदाचित जोखिमीचा मार्ग आहे. a परंतु, स्वच्छतेचे साधेसुधे नियम स्वस्त असून तुमची मोहकता वाढवण्यास ते पुष्कळ काही करू शकतात. तुमचे केस एखाद्या सिने-अभिनेता किंवा अभिनेत्रीसारखे चमकदार नसतील, पण ते स्वच्छ असू शकतात; त्याचप्रमाणे तुमचा चेहरा, हात आणि बोटांची नखे देखील स्वच्छ असू शकतात. पांढरे शुभ्र दात आणि स्वच्छ, गुलाबी हिरड्यांमुळे कोणतेही स्मितहास्य लोभस वाटेल. तुम्हाला स्थूलपणाची समस्या आहे काय? तुमचे वजन नियंत्रणात आणायला आहार आणि व्यायामाचा क्रम (कदाचित तुमच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिलेला) पुष्कळ काही करू शकेल.

पालकांच्या संमतीने तुमच्या शारीरिक स्वरूपावर अधिक जोर देणाऱ्‍या आणि तुमच्या त्रुटी कमी करणाऱ्‍या वेशभूषा आणि केशभूषांचा प्रयोग देखील तुम्ही करून पाहू शकता. उदाहरणार्थ, लेखक शेरॉन फेल्टन यांच्या मते, एखाद्या मुलीने “फुगीर केशभूषा किंवा पुढचे केस फुगवल्यास तिचे मोठे नाक झाकले जाऊ शकते.” त्याचप्रमाणे, टोकदार, किडकिडीत चेहरेपट्टी असल्यास, “तरंगित अथवा कुरळ्या केशभूषेने” सौम्य केले जाऊ शकतात व मेकअपचा समंजसपणाने वापर केल्याने मुलीच्या चेहऱ्‍यावरील वैगुण्ये कमी केली जाऊ शकतात. पुरुष असो अथवा महिला, पोषाखाची योग्य निवड केल्याने देखील पुष्कळ काही साध्य होऊ शकते. खुलविणारे रंग आणि उठावदार स्टाईल्स निवडा. वस्त्रावरील रेषांकडे लक्ष द्या: उभ्या रेषा सडपातळ प्रभाव पाडतात; तर आडव्या रेषा त्याच्या उलट प्रभाव पाडतात!

होय, परिश्रम आणि कल्पकता उपयोगात आणून तुम्ही देखणे स्वरूप सादर करू शकता—तुम्हाला निसर्गतः सौंदर्य लाभले नसले तरीही.

संतुलनाची गरज

स्वतःच्या स्वरूपाकडे लक्ष देणे महत्त्वाचे असले, तरी त्यास तुमच्या जीवनातील सर्वात मोठी गोष्ट न बनवण्याबद्दल सावध असा. लोकांच्या स्वरूपाविषयी बायबलमध्ये अत्यंत कमी माहिती आहे याकडे तुम्ही कधी लक्ष दिले का? अब्राहाम, मरीया अथवा येशू देखील कसे दिसत होते हे आपल्याला का सांगण्यात आलेले नाही? स्पष्टतः, देवाच्या नजरेत ते महत्त्वाचे नव्हते.

मनोवेधक गोष्ट अशी, की देवाने एकदा अतिशय प्रभावशाली शरीरयष्टी असलेल्या अलियाब नावाच्या एका तरुणाला राजपदाकरता नाकारले! यहोवा देवाने संदेष्टा शमुवेलाला असे स्पष्टीकरण दिले: “तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको . . . मानवासारखे परमेश्‍वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्‍वर हृदय पाहतो.” (१ शमुवेल १६:६, ७) ज्याचे मत आपल्याला खरोखर महत्त्वाचे वाटते त्या देवाला मात्र आपले स्वरूप सर्वात प्रामुख्याचे वाटत नाही हे जाणणे किती सांत्वनदायक आहे! “[तो] हृदय पाहतो.”

आणखी एक विचार करण्याजोगा मुद्दा: तुमचे बहुतांश मित्र साधारण दिसत नाहीत का? तसेच तुमच्या पालकांचे चित्र एखाद्या फॅशन पत्रिकेच्या मुखपृष्ठावर येईल का? कदाचित नाही. तरीही, त्यांचे सद्‌गुण माहीत असल्याने तुम्ही त्यांच्या स्वरूपाचा क्वचितच विचार करता! तुमच्याजवळ देखील असे काही सकारात्मक गुण आहेत की जे कोणत्याही शारीरिक न्यूनतांपेक्षा—मग त्या खऱ्‍या असोत अथवा कल्पित—श्रेष्ठ आहेत.

तथापि, तुमच्या समवयस्कांच्या दृष्टीत स्वरूपाला महत्त्व असते आणि वेशभूषा व केशभूषेच्या त्यांच्या पद्धती अनुसरण्यास तुम्हावर दबाव येत असल्याचे तुम्हास कदाचित आढळेल. अशा दबावाला तुम्ही कसा प्रतिसाद द्यावा?

[तळटीपा]

a काही वैद्यकीय पद्धती, जसे की वाकडेतिकडे दात नीट करायला तार लावणे यांचे आरोग्याच्या तसेच सौंदर्याच्या दृष्टीने फायदे असू शकतात.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ युवक त्यांच्या स्वरूपाबद्दल इतकी चिंता का करतात? तुम्हाला स्वतःच्या स्वरूपाबद्दल काय वाटते?

◻ प्रसार माध्यम आणि तुमचे समवयस्क हे स्वरूपाच्या महत्त्वाविषयी कोणता दृष्टिकोन उद्युक्‍त करतात? तुम्ही अशा प्रभावाला कसा प्रतिसाद द्यावा?

◻ मुरूम पुटकुळ्यांची समस्या हाताळण्याचे काही मार्ग कोणते आहेत?

◻ तुम्ही उत्तम कसे दिसू शकता? या बाबतीत समतोल राखणे अगत्याचे का आहे?

[८२ पानांवरील संक्षिप्त आशय]

‘माझं काहीच मला आवडत नाही . . . मला वाटतं, मी इतकी काही सुंदर दिसत नाही’

[८८ पानांवरील संक्षिप्त आशय]

तुमच्याजवळ देखील असे काही सकारात्मक गुण आहेत की जे कोणत्याही शारीरिक न्यूनतांपेक्षा श्रेष्ठ आहेत

[८४, ८५ पानांवरील चौकट/चित्र]

‘माझ्या मुरूम पुटकुळ्यांवर एखादा उपाय नाही का?’

मुरूम पुटकुळ्या त्वचेचा एक विकार आहे ज्यामुळे डाग किंवा मुरमे, ब्लॅकहेड, सूज येऊन त्वचा लालसर होणे अथवा फोड यांनी देखील त्वचा विद्रुप होते. पुष्कळ युवकांच्या बाबतीत, हा केवळ काही महिन्यांपुरताच टिकणारा तात्पुरता त्रास नव्हे तर एक गंभीर त्वचा विकार असतो. सर्व वयोगटांतील लोक याने पीडित होऊ शकतात परंतु, किशोरवयीनांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. काही तज्ज्ञांच्या मते, सुमारे ८० टक्के किशोरवयीनांना कमीजास्त प्रमाणात मुरूम पुटकुळ्या येतात.

म्हणून, २,००० किशोरवयीनांना, त्यांना स्वतःबद्दल कोणती गोष्ट मुळीच आवडत नाही असे विचारल्यावर इतर कोणत्याही तक्रारीपेक्षा त्वचेच्या समस्येबद्दल अधिक प्रमाणात सांगण्यात आले यात काहीच आश्‍चर्य नाही. उच्च माध्यमिक शाळेत असतानाच मुरूम पुटकुळ्यांमुळे त्रस्त झालेली सँड्रा नामक एक युवती असे सांगते: “मला इतक्या वाईटरितीने मुरूम पुटकुळ्या आल्या होत्या की मी लोकांपासून माझा चेहरा नेहमी लपवायचे. माझ्या स्वरूपाबद्दल मला लाज वाटायची म्हणून मी बुजऱ्‍या स्वभावाची बनले. . . . मी खूप कुरूप दिसायचे.”—को-एड नियतकालिक.

ही पीडा तुमच्या किशोरावस्थेच्या काळातच—तुम्ही सुंदर दिसावे असे तुम्हाला वाटते तेव्हाच का येते बरे? कारण तुमची वाढ होत असते. पौगंडावस्थेची सुरवात होताच, त्वचेतील ग्रंथींचे कार्य वाढते.

नेमके काय होते? द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया सरळ सोप्या शब्दांत असे मांडते: प्रत्येक ग्रंथी एका केसपुटकात, म्हणजेच, केसाभोवतालच्या लहान पिशवीत स्रवते. सहसा, त्वचेतील रंध्रातून हे तेल बाहेर पडते पण काहीवेळा हे रंध्र तुंबते आणि त्यातील तेल लवकर बाहेर पडत नाही. या तुंबलेल्या रंध्राचा आता ब्लॅकहेड म्हटला जाणारा डाग पडतो कारण त्यात अडकलेल्या तेलाचे ऑक्सिडीकरण होते, ते सुकते आणि काळवंडते. मग पू झाल्यावर त्याची मुरूम पुटकुळी बनते. साठलेल्या तेलात जंतू निर्माण झाल्यावर फोड तयार होतात. या फोडांमुळे कायमचे व्रण पडतात. संसर्ग झाल्याशिवाय—हा संसर्ग बहुधा फोडल्याने किंवा दाबल्याने परिणीत होतो,—मुरुमांचा व्रण पडत नसतो, म्हणून त्यांना फोडू अथवा दाबू नका!

मनोरंजक गोष्ट अशी, की तणाव आणि मानसिक अस्वस्थता त्वचेतील ग्रंथींना उद्दीपित करू शकतात. काहीजणांना एखाद्या महत्त्वपूर्ण प्रसंगाआधीच अथवा परीक्षेआधी किंवा त्यादरम्यान मोठी फुटकुळी येत असलेली दिसते. यास्तव, येशूचे शब्द व्यावहारिक आहेत: “उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उद्याला; ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे.”—मत्तय ६:३४.

दुःखाची गोष्ट म्हणजे, यावर कोणताही चमत्कारिक तरणोपाय नाही. तथापि, मुरूम पुटकुळ्या नियंत्रणात आणण्यास मदत करणारे बेनजॉईल पेरॉक्साईडयुक्‍त (जंतुनाशकारक) जेल, क्रीम, लोशन, वॉशेस, साबणे आणि फेशियल मास्क अशी प्रेस्क्रीपशनविना मिळणारी औषधे उपलब्ध आहेत. (यापेक्षा तीव्र उपाय आवश्‍यक असल्यास, तुमच्या कौटुंबिक डॉक्टरांचा सल्ला घेता येऊ शकतो.) अनेकांना असे आढळते, की बेनजॉईल पेरॉक्साईडयुक्‍त साबण अथवा वॉशने त्वचा स्वच्छ करणे मदतदायी आहे. परंतु, तेलकट साबणे किंवा तेलयुक्‍त सौंदर्यप्रसाधने टाळा.

काही युवकांना असेही आढळले आहे, की सर्वसाधारणपणे आरोग्याची काळजी घेतल्यास—भरपूर व्यायाम, होता होईल तितक्या शुद्ध हवेत वावरणे व पुरेशी झोप—यांमुळे त्यांच्या मुरूम पुटकुळ्यांची स्थिती सुधारते. चरबीरहित आहार फायदेकारक आहे किंवा नाही, हा प्रश्‍न अद्याप वादग्रस्त असला तरीसुद्धा, निःसत्व खाद्यपदार्थ टाळणे व समतोल आहार घेणे हे फायद्याचे आहे यात वादच नाही.

कोणत्याही परिस्थितीत, धीर हा असलाच पाहिजे. लक्षात ठेवा: तुमची समस्या बऱ्‍याच कालावधीपासून निर्माण झाली असल्यामुळे ती एका रात्रीत गायब होणार नाही. आधी उल्लेखिलेली सँड्रा म्हणते: “माझी त्वचा पूर्णतः स्वच्छ होण्यास जवळजवळ एक वर्ष लागलं, पण अवघ्या सहा आठवड्यातच मला फरक दिसू लागले होते.” काही कालावधीपर्यंत तुमचा उपचार जारी राखल्याने तुम्हाला कदाचित काहीसा आराम मिळेल.

दरम्यान, या एक-दोन डागांमुळे तुमचा स्वाभिमान गमावू देऊ नका अथवा इतरांशी बोलण्याचे बंद करू नका. तुम्हाला तुमच्या त्वचेमुळे लाज वाटत असली, तरी तुम्हाला वाटते तितके त्याकडे इतरांचे लक्ष जात नाही. म्हणून सकारात्मक, आनंदी मनोवृत्ती बाळगण्याचा प्रयत्न करा. तसेच तुम्हाला तुमच्या मुरूम पुटकुळ्यांसाठी जे काही करता येईल ते ताबडतोब करा!

[८३ पानांवरील चित्र]

तुमच्या स्वरूपातील तुम्हाला न आवडणाऱ्‍या गोष्टीबद्दल कदाचित दुसऱ्‍या व्यक्‍तीला हेवा वाटत असेल

[८६ पानांवरील चित्र]

युवक बहुधा हे समजून घेत नाहीत, की नियतकालिकातील मॉडेल्सना सौंदर्य प्रसाधन गटांची सेवा असते