व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

माझा स्वभाव इतका बुजरा का आहे?

माझा स्वभाव इतका बुजरा का आहे?

अध्याय १५

माझा स्वभाव इतका बुजरा का आहे?

एका तरुणीने एका वृत्तपत्राला लिहिले, “मी खूप सुंदर दिसते असे मला सगळेजण सांगतात.” तरीही पुढे ती अशी म्हणाली: “लोकांशी बोलणं मला जड जातं. बोलताना, मी कुणाच्या डोळ्यात पाहून बोलले तर माझी घाबरगुंडी होते आणि शब्दच फुटत नाहीत . . . माझ्या कामाच्या ठिकाणी मी कुणाशी बोलत नाही म्हणून मी खूप ‘शिष्ट’ आहे असे लोकांना म्हणताना मी पुष्कळदा ऐकले आहे. . . . मी शिष्ट नाही, मी फक्‍त बुजरी आहे.”

एका सर्वेक्षणात दिसून आले, की प्रश्‍न विचारलेल्यांपैकी ८० टक्के लोक त्यांच्या जीवनात एकेकाळी बुजरे होते आणि ४० टक्के लोक त्यावेळी स्वतःला बुजरे समजत होते. अर्थात, बुजरेपणा मानवाच्या अगदी सुरवातीच्या काळापासून सर्वसामान्य ठरला आहे. बायबल आपल्याला सांगते, की मोशेने इस्राएल राष्ट्रासमोर देवाचा प्रवक्‍ता या नात्याने कार्य करण्यास बुजरेपणामुळे नकार दिला होता. (निर्गम ३:११, १३; ४:१, १०, १३) असेही दिसते, की ख्रिस्ती शिष्य तीमथ्य हा आपले मत प्रकट करण्याच्या बाबतीत आणि योग्यपणे अधिकार गाजवण्याबाबतीत बुजऱ्‍या आणि शांत स्वभावाचा होता.—१ तीमथ्य ४:१२; २ तीमथ्य १:६-८.

बुजरेपणा काय आहे

बुजरेपणा म्हणजे लोकांसोबत—अनोळखी व्यक्‍ती, अधिकारातील व्यक्‍ती, विरुद्धलिंगी व्यक्‍ती किंवा तुमच्या समवयस्कांसोबत देखील—असताना वाटणारी अस्वस्थता होय. त्यामुळे काहींना इतकी लाज वाटते की त्यांच्यावर त्याचा विविध प्रकारे परिणाम होतो. काहीजण बावरून जातात; नजर जमिनीला खिळलेली असते, छातीत धडधडत असते व त्यांच्या तोंडून एकही शब्द फुटत नाही. इतरजण अस्वस्थ होतात व त्यांची बडबड चालूच ठेवतात. इतरांना कशाबद्दलही आपले मत प्रकट करण्यास आणि स्वतःचे अभिप्राय किंवा पसंती व्यक्‍त करण्यास जड जाते.

खरे पाहता, थोडाफार बुजरेपणा असण्याच्या सकारात्मक बाजू असतात. तो सभ्यता आणि नम्रता यांजशी निगडित आहे तसेच “देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे” यास देव पाहतो आणि त्याची प्रशंसा करतो. (मीखा ६:८) सुज्ञ व शालीन असण्यात आणि मक्‍तेदारी न करण्यात व अति क्रोधित न होण्यात आणखी फायदा आहे. बुजऱ्‍या व्यक्‍तीला बहुधा ऐकून घेणारा मित्र मानले जाते. परंतु बुजरेपणा, आपली संपूर्ण क्षमता ओळखण्यास निर्बंध घालीत असेल किंवा मना करत असेल व आपले नातेसंबंध, काम तसेच भावना यांवर अपायकारक परिणाम करत असेल तर त्याविषयी आताच काही केले पाहिजे!

समस्या समजून घेणे ही एक चांगली सुरवात आहे. (नीतिसूत्रे १:५) बुजरेपणा तुम्ही कशाप्रकारची व्यक्‍ती आहात त्याचे वर्णन देत नाही; तो तुमचे वर्तन, परिस्थितींप्रती दाखवलेली प्रतिक्रिया, इतरांसोबतच्या अनुभवांद्वारे तुम्ही शिकलेली व अंमलात आणलेली पद्धत यांचे वर्णन देतो. इतरजण तुमच्याविषयी नकारात्मक अभिप्राय व्यक्‍त करतात, त्यांना तुम्ही आवडत नाही अशी तुमची केवळ धारणा असते. इतरजण तुमच्यापेक्षा अधिक चांगले आहेत किंवा तुमच्यापेक्षा अधिक नॉर्मल आहेत असे तुम्हाला वाटते. तुम्ही इतर लोकांशी संबंध राखण्याचे प्रयत्न केले तर सर्वकाही बिघडेल असे तुम्हाला वाटते. सर्वकाही बिघडेल अशी तुम्ही अपेक्षा करता, आणि बहुतेकवेळा तेच घडते—कारण तुम्ही तणावग्रस्त होता व तुमच्या विचारांनुसार कार्य करता.

बुजरेपणाचा तुमच्या जीवनावरील परिणाम

अलिप्त राहून, बोलणे बंद करून किंवा इतरांकडे लक्ष न देता स्वतःमध्येच गर्क होऊन तुम्ही स्वतःबद्दल भावखाऊ, माणूसघाणे, कंटाळवाणे एवढेच नव्हे तर, बेपर्वा अथवा अज्ञानी असल्याची छाप पाडू शकता. तुमचे विचार स्व-केंद्रित असतात तेव्हा, चालू चर्चेकडे लक्ष देणे कठीण असते. म्हणून तुम्हाला जी माहिती प्राप्त होत असते त्याकडे तुम्ही जास्त लक्ष पुरवत नाही. मग तुम्हाला ज्याची अवास्तव भीती असते अगदी तेच घडते—तुम्ही बावळट दिसता.

खरे पाहता, तुम्ही बुजरेपणाच्या तुरुंगात स्वतःला कैद केले आहे आणि चावी फेकून दिली आहे. तुम्ही हाती आलेल्या संधी वाया घालवता. तुम्हाला केवळ बोलायला आणि स्वतःचे मत व्यक्‍त करायला भीती वाटते म्हणून वास्तविकतेत नको असलेल्या वस्तू किंवा परिस्थिती तुम्ही स्वीकारता. लोकांना भेटण्यातले, नवीन मित्र बनवण्यातले किंवा जीवनातला आनंद वाटणाऱ्‍या गोष्टी करण्यातले समाधान तुम्ही गमावता. परंतु इतरजण देखील काहीतरी गमावत असतात. त्यांना तुमच्यातील खऱ्‍या व्यक्‍तीचे दर्शनच घडत नाही.

बुजरेपणावर मात

वेळ आणि परिश्रमाने वर्तनात बदल केला जाऊ शकतो. सर्वप्रथम, समोरचा माणूस तुमच्याविषयी काही कयास बांधत आहे अशी चिंता करू नका. कदाचित, तो स्वतःच्याच विचारात की आपण काय बोलणार किंवा म्हणणार यातच गुंतलेला असेल. त्याचप्रमाणे, त्या व्यक्‍तीने अविचारीपणाने तुमची टर उडवली तर ती त्याची समस्या आहे हे समजून घ्या. “जो आपल्या शेजाऱ्‍याला तुच्छ मानितो तो बुद्धिशून्य होय.” (नीतिसूत्रे ११:१२) जे मित्र होण्याच्या लायकीचे आहेत ते बाह्‍य स्वरूपांवरून नव्हे तर तुम्ही कशाप्रकारची व्यक्‍ती आहात यावरून निष्कर्ष काढतील.

तसेच, सकारात्मक पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न करा. कोणीही परिपूर्ण नाही; आपणा सर्वांना आपापल्या क्षमता आणि दुर्बळता आहेत. लक्षात असू द्या, की कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचे विविध मार्ग असतात, विविध पसंती व नापसंती असतात. सर्वांपेक्षा निराळा अभिप्राय असणे याचा अर्थ व्यक्‍ती म्हणून तुम्हाला नाकारले गेले आहे असा होत नाही.

इतरांबद्दल योग्य निष्कर्ष काढण्यासही शिका. पूर्वी बुजऱ्‍या स्वभावाचा असणारा एक तरुण म्हणतो: “मी स्वतःमध्ये दोन गोष्टी पाहिल्या . . . पहिली ही की, मी आत्म-केंद्रित होतो. स्वतःबद्दल अतिशय विचार करणारा, मी जे काही म्हणतो त्याबद्दल लोकांचा काय विचार आहे याची चिंता करणारा. दुसरी ही की, मी इतर व्यक्‍तींचे वाईट हेतू आहेत असं ठरवत असे—त्यांच्यावर भरवसा न करणारा व ते मला कमीपणाने लेखतील असा विचार करणारा होतो.”

तो तरुण यहोवाच्या साक्षीदारांच्या एका सभेला हजर राहिला. “तिथं मी एक भाषण ऐकलं आणि त्यामुळे मला खरंच मदत मिळाली,” असे तो आठवून सांगतो. ‘त्या वक्‍त्‌यानं हे दाखवून दिलं की, प्रीती मनमिळाऊ आहे; तुमच्याकडे प्रीती असली तर, तुम्ही लोकांविषयी वाईट नव्हे तर चांगला विचार करता. अशाप्रकारे, लोकांचे वाईट हेतू आहेत असं ठरवणं मी बंद केलं. मी स्वतःला म्हणालो: “ते समजूतदार असतील, नम्र असतील, विचारशील असतील.” मी लोकांवर भरवसा ठेवू लागलो. काहीजण माझा गैरसमज करून घेतील हे मी जाणून घेतलं, पण आता मला असं वाटू लागलं की ती त्यांची समस्या आहे.’

“प्रेम असल्याचे व्यक्‍त करण्याची—इतरांसोबत अधिक मिळून मिसळून वागण्याची गरज आहे हे देखील मी शिकलो,” असे तो स्पष्ट करतो. “सुरवातीला मी याचा प्रयोग लहान मुलांवर करून पाहिला. नंतर मी इतरांना त्यांच्या घरी जाऊन भेटी देऊ लागलो. त्यांच्या गरजा ओळखून घ्यायला, त्यांना मदत करण्याच्या दृष्टीनं विचार करायला मी शिकलो.” अशाप्रकारे लूक ६:३७, ३८ येथील येशूच्या सल्ल्याची सत्यता त्यास पटली: “तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही; कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरविणार नाही. . . . द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. . . . कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल.”

सुरवात करणे

म्हणून मनमिळाऊ असण्यास—अभिवादन करण्यास व संभाषण सुरू करण्यास शिका. नुसते हवामानाबद्दल काही म्हटले तरी चालू शकते. लक्षात ठेवा: तुमच्यावर केवळ ५० टक्के जबाबदारी असते. उरलेली जबाबदारी दुसऱ्‍या व्यक्‍तीवर असते. बोलताना चूक केल्यास, वाईट वाटून घेऊ नका. इतरजण तुम्हावर हसले तर त्यांच्यासोबत स्वतःही हसायला शिका. “काहीतरी चुकलं वाटतं,” असे म्हटल्याने तणावरहित असण्यास आणि संभाषण पुढे चालू ठेवण्यास तुम्हाला मदत मिळेल.

तुम्हाला आरामदायक वाटेल अशा पद्धतीने पेहराव करा, पण तुमचे कपडे स्वच्छ आणि इस्त्री केलेले आहेत याची खात्री करा. ‘आपण चांगले दिसत आहोत’ असा विचार केल्याने तुम्हाला वाटणारी भीती कमी होईल आणि चालू संभाषणाकडे लक्ष देण्यास तुम्हाला मदत मिळेल. ताठ उभे राहा—तरीही अवघडल्यासारखे असू नका. नेत्रसुखद दिसा आणि स्मित करा. मैत्रिपूर्ण नेत्र संपर्क राखा आणि दुसरी व्यक्‍ती जे काही म्हणते त्याला मान डोलावून किंवा शब्दाने संमती दर्शवा.

एखाद्या कठीण परिस्थितीला तोंड देत असताना, जसे की इतरांसमोर भाषण देताना किंवा नोकरीची मुलाखत देताना होता होईल तितक्या तयारीने जा. तुम्ही काय बोलणार याचा आधीच सराव करा. सरावाने बोलण्यातील त्रुटींवर मात सुद्धा केली जाऊ शकते किंवा त्या कमी केल्या जाऊ शकतात. इतर कोणतीही नवीन कौशल्ये संपादन करण्याप्रमाणेच यालाही वेळ लागेल. पण तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येतील, तेव्हा यशस्वी होण्याकरता तुम्हाला आणखी उत्तेजन प्राप्त होईल.

देवाकडून मिळणाऱ्‍या मदतीकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. प्राचीन इस्राएल राष्ट्राचा पहिला राजा शौल हा अतिशय बुजऱ्‍या स्वभावाचा होता. (१ शमुवेल, अध्याय ९ आणि १०) पण कार्य करण्याची वेळ आली तेव्हा, ‘देवाचा आत्मा त्याच्यावर क्रियाशील झाला’ आणि त्याने लोकांना विजय मिळवून दिला!—१ शमुवेल, अध्याय ११.

आज, ख्रिस्ती युवकांवर देव व त्याच्या नीतिमत्वाच्या वाग्दत्त नवीन जगाबद्दल इतरांना शिकवण्यात मदत करण्याची जबाबदारी आहे. (मत्तय २४:१४) ही सुवार्ता सांगणे आणि विश्‍वाच्या सर्वोच्च अधिकाराचे प्रतिनिधीत्व करणे आत्मविश्‍वासास निश्‍चितच प्रेरक ठरेल आणि स्व-केंद्रित न होण्यास मदत करील. यास्तव, तुम्ही विश्‍वासूपणे देवाची सेवा केल्यास, तो तुम्हाला आशीर्वादित करील आणि तुमच्या बुजरेपणावर मात करण्यात तुम्हाला मदत करील याची शाश्‍वती तुम्ही बाळगू शकता.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ बुजरेपणा म्हणजे नेमके काय, आणि एखादी बुजरी व्यक्‍ती इतरांच्या समक्ष कशी वागते? काही अंशी हे तुमच्याही बाबतीत खरे आहे का?

◻ बुजरी व्यक्‍ती इतरांसोबत असताना आत्मविश्‍वास का गमावते?

◻ बुजरेपणा एखाद्या व्यक्‍तीला अपाय कसा करू शकतो?

◻ बुजरेपणावर मात करण्याचे काही मार्ग कोणते आहेत? यातील कोणतेही सल्ले तुमच्याकरता उपयुक्‍त ठरले आहेत का?

[१२१ पानांवरील संक्षिप्त आशय]

बुजऱ्‍या व्यक्‍तीची कोणाशी मैत्री जमत नाही किंवा ती पुष्कळ संधी गमावते

[Box on page 124]

बुजरेपणावर मात करण्यासाठी

बदलण्याची इच्छा बाळगा व बदल खरोखर शक्य आहे असा विश्‍वास बाळगा

नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक कृती करा

स्वतःकरता वास्तविक आणि अर्थपूर्ण ध्येये राखा

तणावरहित कसे असावे आणि चिंतेला कसे तोंड द्यावे ते जाणून घ्या

आधीच एखाद्या परिस्थितीचा सराव करा

प्रगतीशीलपणे यशस्वी असलेल्या अनुभवांकरवी आत्मविश्‍वास संपादन करा

अभिप्रायांत भिन्‍नता असते आणि इतरजण देखील चुका करतात हे लक्षात ठेवा

आहेत ती कौशल्ये वाढवा व नवीन कौशल्ये शिकण्याचा प्रयत्न करा

प्रीती दाखवण्यास आणि इतरांची मदत करण्यास पुढाकार घ्या

योग्य पेहराव करा व आत्मविश्‍वासाने वागा

देवाकडून येणाऱ्‍या मदतीवर विसंबून राहा

ख्रिस्ती सभांमध्ये भाग घ्या आणि इतरांना आपल्या विश्‍वासाबद्दल सांगा

[१२३ पानांवरील चित्र]

इतरजण आपल्याला कमी लेखतात असा बुजऱ्‍या व्यक्‍तीचा ग्रह असतो

[१२५ पानांवरील चित्र]

मनमिळाऊ असण्यास—स्मित करण्यास, इतरांना अभिवादन करण्यास आणि संभाषण चालू ठेवण्यास शिका