व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

माझे हे दुःख व्यक्‍त करणे सामान्य आहे का?

माझे हे दुःख व्यक्‍त करणे सामान्य आहे का?

अध्याय १६

माझे हे दुःख व्यक्‍त करणे सामान्य आहे का?

मिशेलचे वडील वारले तो दिवस त्याला चांगला आठवतो: “मला धक्का बसला होता. . . . ‘हे खरं असूच शकत नाही,’ असे मी स्वतःला म्हणत राहिलो.”

कदाचित तुम्हाला प्रिय असलेली व्यक्‍ती—पालक, भाऊ, बहीण किंवा मित्र—मरण पावली आहे. नुसते दुःख वाटण्याऐवजी तुम्हाला राग येतो, गोंधळल्यासारखे होते आणि भीती देखील वाटते. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला अश्रू अनावर होतात. किंवा तुम्ही तुमचे दुःख मनात दडपून ठेवता.

खरेच, आपली प्रिय व्यक्‍ती मरण पावते तेव्हा भावनिक होऊन प्रतिक्रिया दाखवणे हे स्वाभाविकच आहे. येशू ख्रिस्त देखील, आपल्या जिवलग मित्राच्या मृत्यूची बातमी ऐकून “रडला” आणि आतल्या आत “कण्हला.” (योहान ११:३३-३६, पं.र.भा.; पडताळा २ शमुवेल १३:२८-३९.) कधी न कधी इतरांनाही तुमच्याप्रमाणेच वाटले होते हे जाणल्याने तुमच्यावर कोसळलेल्या संकटाला तोंड देण्यास अधिक मदत मिळेल.

नकार

सुरवातीला तुम्हाला बधिर झाल्यासारखे वाटेल. कदाचित मनातल्या मनात, हे सर्व केवळ एक दुःस्वप्न असावे, कोणी येऊन तुम्हाला जागे करील आणि सर्व काही नेहमीप्रमाणेच असेल अशी आशा तुम्ही बाळगत असाल. उदाहरणार्थ, सिंडीची आई कर्करोगामुळे मरण पावली. सिंडी म्हणते: “ती वारलीय हे मी खरं म्हणजे मान्य केलंच नाहीय. मग, असं काहीतरी घडतं ज्याविषयी मी गतकाळात तिला कदाचित सांगितलं असेल आणि मग मी स्वतःला म्हणू लागते, ‘आता मला आईला हे सांगायचंय.’”

शोकग्रस्त, मृत्यू झाल्याचे सहसा मान्य करत नसतात. त्यांना अचानक मृत व्यक्‍ती रस्त्यावर, समोरून जाणाऱ्‍या बसमध्ये, भुयारी मार्गात वगैरे ठिकाणी दिसल्याचा भास त्यांना होतो. कोणतेही हलकेसे साम्य दिसले तर जे काही वास्तविक घडले आहे ते सर्व कदाचित खोटे आहे अशी आशा मनात तरळू लागते. लक्षात ठेवा, की देवाने मानवाला जिवंत राहण्यास बनवले, मरण्यास नव्हे. (उत्पत्ति १:२८; २:९) म्हणून मृत्यूचा स्वीकार करण्याचे कठीण वाटणे हे केवळ साहजिकच आहे.

“तिनं असं कसं केलं?”

मृत व्यक्‍तीबद्दल काहीवेळा थोडाफार राग वाटू लागतो तेव्हा चकित होऊ नका. सिंडी आठवून सांगते: “आई वारली तेव्हा मला काहीवेळा असं वाटायचं, ‘तू मरणार हे आम्हाला सांगितलं नाहीस. तू काही न सांगताच निघून गेलीस.’ मला अगदी वाळीत टाकल्यासारखं वाटलं.”

भावाच्या अथवा बहिणीच्या मृत्यूमुळे अशाच भावना उद्‌भवू शकतात. “मृत व्यक्‍तीबद्दल राग वाटणे ही मूर्ख गोष्ट आहे,” कॅरेन म्हणते, “पण माझी बहीण वारली तेव्हा मी स्वतःला आवरू शकले नाही. ‘ती मला एकटी सोडून कशी निघून गेली? तिनं असं कसं केलं?’ असे विचार माझ्या डोक्यात सतत यायचे.” काहीजण, भावंडाच्या मृत्यूमुळे ओढवलेल्या दुःखासाठी त्याच्यावर किंवा तिच्यावर चिडतात. काहींना दुर्लक्षित केल्यासारखे वाटते, त्या आजारी भावाला अथवा बहिणीला मरणाआधी वेळ आणि लक्ष दिल्याबद्दल त्यांना कदाचित चीड येऊ शकते. जे दुःखी पालक दुसरे मूल गमावण्याच्या भीतीने अचानक अत्यंत खबरदारी घेऊ लागतात ते देखील मृत व्यक्‍तीवर रागावू शकतात.

“खेद”

दोषी वाटणे देखील वारंवार प्रकट होणारी प्रतिक्रिया आहे. मनात प्रश्‍न आणि शंका गर्दी करतात. ‘आम्ही आणखी काहीच करू शकलो नसतो का? आम्ही दुसऱ्‍या डॉक्टरकडे जायला हवं होतं का?’ मग, खेदपूर्ण विचार तर आहेतच. ‘आम्ही इतकं भांडलो नसतो तर.’ ‘मी आणखी चांगला वागलो असतो तर.’ ‘त्याऐवजी मीच दुकानात गेलो असतो तर.’

मिशेल म्हणतो: “माझ्या वडिलांशी मी आणखी सहनशीलतेने आणि समजूतदारपणे वागलो असतो तर बरं झालं असतं. किंवा ते घरी आल्यावर त्यांचं काम हलकं व्हावं म्हणून मी घरात जास्त काम केलं असतं तर.” तसेच एलीसाने निरीक्षिले: “आई आजारी पडून अचानक वारली, तेव्हा आपापसातले मतभेद मिटलेच नाहीत. आता मला खूप दोषी असल्यासारखं वाटतं. मी तिला काय म्हणायला हवं होतं, काय म्हणायला नको होतं, मी काय चुकीचं केलं ह्‍या सगळ्यांचा विचार माझ्या मनात येतो.”

जे काही घडले त्याबद्दल तुम्ही कदाचित स्वतःला देखील दोषी ठरवाल. सिंडी आठवून सांगते: “आमच्यात जे सर्व वादविवाद झाले आणि मी आईला जो त्रास दिला त्याबद्दल मला दोषी वाटलं. मी तिला त्रास दिल्यामुळेच ती आजारी पडली असं मला वाटलं.”

“माझ्या मित्रांना मी काय सांगणार?”

एका विधवेने आपल्या मुलाबद्दल असे निरीक्षण केले: “जॉनीला त्याचे वडील वारलेत हे इतर मुलांना सांगायला मुळीच आवडत नव्हतं. त्याची त्याला लाज वाटायची आणि लाज वाटते म्हणून चीडही यायची.”

कुटुंबातील मृत्यू आणि दुःख (इंग्रजी) हे पुस्तक स्पष्टीकरण करते: “‘माझ्या मित्रांना मी काय सांगणार?’ हा प्रश्‍न अनेक मुलांकरता [हयात असलेल्या भाऊ-बहिणींना] अति महत्त्वाचा असतो. पुष्कळदा असे होते की, आपण अनुभवत असलेल्या गोष्टी आपल्या मित्रांना समजत नाहीत असे त्यांना वाटते. किती हानी झाली आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्याकडे भावशून्यतेने आणि चेष्टेखोर नजरेने पाहिले जाते. . . . परिणामतः, दुःखित मुलाला कदाचित झिडकारलेले, अलिप्त केलेले आणि काहीवेळा विक्षिप्त देखील वाटेल.”

तथापि, हे समजून घ्या की, काहीवेळा इतरांना दुःखी मित्राला काय म्हणावे हे कळत नसते—म्हणून ते शांत राहतात. तुम्ही एखाद्याला गमावले आहे या गोष्टीवरून त्यांची देखील प्रिय व्यक्‍ती गमावली जाऊ शकते याची त्यांना जाणीव होते. त्याची आठवण त्यांना होऊ नये म्हणून ते तुमच्यापासून दूर जात असतील.

तुमच्या दुःखाला तोंड देणे

तुमचे दुःख ही सर्वसामान्य गोष्ट आहे हे जाणल्याने त्यास समजून घेण्यात मोठी मदत मिळू शकते. परंतु, वास्तविकतेकडे दुर्लक्ष करत राहिल्यास तुमचे दुःख रेंगाळतच राहील. काहीवेळा, एखादे कुटुंब कदाचित जेवणाच्या वेळी मृत व्यक्‍ती जणू जेवायला येणार असल्यासारखी तिच्यासाठी एक जागा मोकळी ठेवील. परंतु, एका कुटुंबाने या समस्येला निराळ्या पद्धतीने हाताळण्याचे ठरवले. त्या कुटुंबातील आई म्हणते: “आम्ही जेवणाच्या टेबलवर नेहमीप्रमाणे ज्या क्रमानं बसायचो ते सोडून दिलं. माझे पती डेवीडच्या खुर्चीवर बसू लागले आणि त्यामुळे तो रिक्‍तपणा भरून काढायला मदत मिळाली.”

काही गोष्टी तुम्ही खरोखर करायच्या होत्या तर काही गोष्टी केल्या नसत्या तर बरे झाले असते, हे खरे असले तरी तुमची प्रिय व्यक्‍ती त्या गोष्टींमुळे मरण पावली नाही हे जाणून घेतल्यानेही मदत मिळते. शिवाय, “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो”—याकोब ३:२.

तुमच्या भावना व्यक्‍त करणे

डॉ. अर्ल ग्रॉल्मन असा सल्ला देतात: “तुमच्यातील परस्परविरोधी भावना जाणून घेणे एवढेच पुरेसे नाही; तुम्ही उघडपणे त्या हाताळल्या पाहिजेत. . . . तुमच्या भावना व्यक्‍त करण्याची हीच वेळ आहे.” स्वतःला अलिप्त करण्याचा हा समय नाही.—नीतिसूत्रे १८:१.

डॉ. ग्रॉल्मन असे म्हणतात, की दुःख अमान्य केल्याने, “तुम्ही केवळ यातना आणि दुःख अधिकच वाढवत असता.” ते असे मार्गदर्शन देतात: “ऐकून घेणारी व्यक्‍ती, तुमच्या सर्व भावना तुम्हाला होणाऱ्‍या तीव्र दुःखाप्रती सर्वसामान्य प्रतिक्रिया आहेत हे समजून घेणारा असा एखादा मित्र शोधा.” पालक, भाऊ, बहीण, मित्र किंवा ख्रिस्ती मंडळीतील वडील बहुधा खरा आधार ठरू शकतात.

तसेच तुम्हाला रडावेसे वाटल्यास काय? डॉ. ग्रॉल्मन पुढे म्हणतात: “काहींच्या बाबतीत, अश्रू हे भावनिक तणावावर सर्वोत्तम उपचार आहेत आणि याला पुरुष त्याचप्रमाणे स्त्रिया व मुलेही अपवाद नाहीत. रडणे हा यातना कमी करण्याचा व दुःख विसरण्याचा स्वाभाविक मार्ग आहे.”

संपूर्ण कुटुंब मिळून तोंड देणे

तुमचे पालक देखील दुःखाच्या समयी अतिशय मदतदायी ठरू शकतात—आणि तुम्ही त्यांच्याकरता मदतीचे ठरू शकता. उदाहरणासाठी, इंग्लंडमधील जेन व सेरा यांचा २३ वर्षांचा भाऊ, डॉरल हा मरण पावला. हे दुःख त्यांनी कसे सहन केले? जेन म्हणते: “आम्ही चौघं असल्यामुळे मी बाबांसोबत जाऊन काम करायचे तर सेरा आईबरोबर काम करायची. अशारितीने आम्ही कधीच एकटे नव्हतो.” जेन पुढे आठवून सांगते: “बाबांना या आधी रडताना मी कधीच पाहिलं नव्हतं. ते पुष्कळदा रडले आणि तसं पाहिलं तर ते चांगलंच होतं व मागचा विचार केला की मी त्यांना सांत्वन द्यायला त्यांच्याजवळ राहू शकले म्हणून मला खूप बरं वाटतं.”

टिकवून ठेवणारी आशा

इंग्लंडमधील डेवीडची १३ वर्षांची बहीण जॅनेट, हॉजकीन्स रोगाला बळी पडली. तो म्हणतो: “अंत्यविधीच्या भाषणात एक शास्त्रवचन उद्धृत केलं होतं त्यानं मला बराच फायदा झाला. तिथं असं म्हटलं आहे: ‘देवाने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला, येशूला, मेलेल्यांतून उठवून ह्‍याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे.’ वक्‍त्‌याने पुनरुत्थानासंबंधी ‘प्रमाण’ या अभिव्यक्‍तीवर जोर दिला. यामुळे अंत्यविधीनंतर मला खूप सामर्थ्य मिळालं.”—प्रेषितांची कृत्ये १७:३१; तसेच मार्क ५:३५-४२; १२:२६, २७; योहान ५:२८, २९; १ करिंथकर १५:३-८ हे देखील पाहा.

बायबलमधील पुनरुत्थानाच्या प्रत्याशेमुळे दुःख नाहीसे होत नाही. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्‍तीचे विस्मरण कधीच होणार नाही. तथापि, अनेकांना बायबलमधील अभिवचनांतून खरे सांत्वन प्राप्त झाले आहे आणि परिणामस्वरूप, आपल्या प्रिय व्यक्‍तीला गमावण्याच्या दुःखातून ते हळूहळू वर उठू लागले आहेत.

चर्चेसाठी प्रश्‍न

◻ मरण पावलेल्या तुमच्या प्रिय व्यक्‍तीबद्दल शोक व्यक्‍त करणे हे स्वाभाविक असल्याचे तुम्हाला वाटते का?

◻ दुःखी व्यक्‍ती कोणकोणत्या भावना अनुभवु शकते व का?

◻ एखादी दुःखी तरुण व्यक्‍ती, आपल्या भावना कशाप्रकारे समजून घेऊ शकते?

◻ प्रिय व्यक्‍ती गमावलेल्या एका मित्राला तुम्ही कसे सांत्वन देऊ शकता?

[१२८ पानांवरील संक्षिप्त आशय]

“ती वारलीय हे मी खरं म्हणजे मान्य केलंच नाहीय. . . . मी स्वतःला म्हणू लागते, ‘आता मला आईला हे सांगायचंय.’”

[१३१ पानांवरील संक्षिप्त आशय]

“आई वारली तेव्हा मला . . . असं वाटायचं, ‘तू मरणार हे आम्हाला सांगितलं नाहीस. तू काही न सांगताच निघून गेलीस.’ मला अगदी वाळीत टाकल्यासारखं वाटलं.”

[१२९ पानांवरील चित्र]

“नाही, हे खरं नाही!”

[१३० पानांवरील चित्र]

आपल्या प्रिय व्यक्‍तीला आपण मृत्यूमुळे गमावतो तेव्हा आपल्याला कोणा कनवाळू व्यक्‍तीचा आधार हवा असतो